Saturday, November 2, 2024

अध्याय ९ 'राजविद्याराजगुह्ययोग'

श्रीपरमात्माने नमः  
अध्याय 'राजविद्याराजगुह्ययोग
( परम गोपनीय ज्ञान )



श्रीभगवद्गीतेच्या अठरा अध्यायांच्या मध्यभागी असणारा हा परम पवित्र अध्याय!.. गीतेचं संपूर्ण सार ह्या अध्यायांत सांगितलं आहे.. श्रीभगवद्गीतेचा पूर्वखंड इथं संपतो आणि मूळ प्रयोजनही! असं म्हटलं जातं.. 

ज्ञानेश्वर माउलींना हा अध्याय इतका परमप्रिय होता कि संजीवन समाधीत आसनस्थ होताना त्यांनी हाच अध्याय समोर ठेवला होता..

"राजविद्याराजगुह्ययोग" ह्या नावातच त्याची महती आहे.. राज म्हणजे चमकणारा.. गुह्य म्हणजे गोपनीय.. म्हणजेच 'जीवनाला चमकावणारं, उजळवणारं गोपनीय ज्ञान'..   

जीव, जग आणि जगदीश्वर यांच्या गुप्त रहस्यमय संबंधाचं ज्ञान.. 


तर, भौतिक जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्त होण्यासाठी, स्वतःचं ध्येय साध्य करण्यासाठी, सर्वांना अवलंबता येण्यासारखी जीवनपद्धती ह्या अध्यायात मुखत्वे सांगितली आहे.. त्याचबरोबर परमात्माच्या चराचरात भरून राहिलेल्या अस्तित्वाचं वर्णन केलं आहे.. ज्ञानाच्या माध्यमातून भगवंताशी जोडलं जाणं म्हणजे ज्ञानयोग, कर्माच्या माध्यमातून भगवंताशी जोडलं जाणं म्हणजे कर्मयोग आणि संपूर्ण श्रद्धेनं, प्रेमानं, निष्ठेनं भगवंताशी एकरूप होणं म्हणजे भक्तियोग.. या ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग मार्गांचा सुंदर त्रिवेणी संगम ह्या अध्यायात पाहायला मिळतो.. 

'परमात्माच ह्या जगाचा निर्माता, पालनकर्ता आहे, तेव्हा त्यांच्यापाशीच बुद्धी स्थिर ठेवून, त्याचा पूजक हो.. सर्व कर्मे त्याला अर्पण करून त्याच्याठायी समर्पित हो, म्हणजे तू त्यास (परमात्म्यास) जाऊन मिळशील..' असा उपदेश करून ह्या अध्यायाची सांगता होते..  


अध्यायाची सुरुवात श्रीभगवानुवाच नं होते.. सुरुवातीलाच भगवान अर्जुनाला 'तू दोषरहित असल्यानं, मी तुला परम् गोपनीय, रहस्यमय असं *ज्ञान, त्याच्या *विज्ञानासहित (अनुभूतीचं ज्ञान) प्रदान करतो.. जे जाणल्यानं तू कर्मबंधातून, भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखांतून मुक्त होशीलअसं म्हणतात.. भगवान हे गोपनीय ज्ञान अर्जुनालाच का प्रदान करणार आहेत? त्याला ते अनुसूय (द्वेष करणारा), दोषरहित असं का संबोधत आहेत?.. माऊली म्हणतात, 'यालागी सुमनु आणि शुद्धमती। जो आनिंदकु अनन्यगति। पै गा गौप्यही परी तयाप्रती। चाळवी जे सुखे।।'.. म्हणजेच प्रशस्त अंतःकरणाचा, शुद्ध बुद्धीचा, निंदा करणारा एकनिष्ठ असा तुझ्यासारखा भक्त असेल तर त्याला गुपित सांगायला आनंदच आहे..


हे ज्ञान 'राजविद्या' म्हणजे सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ, पवित्र, उत्तमात उत्तम, प्रत्यक्ष अनुभवास येणारं, धर्मास अनुसरून असणारं, सुखानं प्राप्त होणारं, अविनाशी असं आहे.. आणि या ज्ञानाची प्राप्ती झाली असता दुसरा जन्म घेण्याचं कारणच रहात नाही.. 

हे ज्ञान 'राजगुह्य' म्हणजे दिव्य ज्ञान.. जीवात्मा आणि शरीर ह्यातील भेद जाणणं.. जीवात्मा हा शरीराहून भिन्न आहे आणि त्याचं स्वरूप अव्यय, अविनाशी आणि शाश्वत आहे हे जाणणं.. 

..आणि एकदा हे जाणलं कि ह्या ज्ञानची परिणती भक्तीमध्ये होते.. परंतू ज्यांची ह्या भक्तीमार्गावर श्रद्धा नाही त्यांना परमेश्वर प्राप्ती होत नाही आणि ते जन्म-मृत्यूच्या मार्गावर भौतिक जगतात परत येतात..


परमात्म्याच्या अव्यक्त (निर्गुण) स्वरूपानं हे जग व्यापलं आहे.. जरी तो सर्वव्यापी असला तरी प्राकृत इंद्रियाद्वारे त्याची अनुभूती होऊ शकत नाही.. कारण स्थूलरूपात भौतिक जगच दिसतं.. सूक्ष्मरूपात परमात्म्याचं रूप दिसण्यासाठी ज्ञानचक्षुंच लागतात.. सर्व जीव, भूतमात्र परमात्म्याठायी स्थित आहेत पण तो त्यांच्या ठायी नाही.. जसं मातीपासून बनलेल्या घड्यात माती असते पण मातीत घडा नसतो तसंच परमात्म्यापासून जग निर्माण झालं असलं तरी परमात्म्यात जग नसतं..

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, 'कां बीजचि जाहलें तरु। अथवा भांगारचि अळंकारु। तैसा मज एकाचा विस्तारु। तें हें जग॥'.. अर्थात बीजापासून झाड, सोन्यापासून अलंकार, तसंच माझ्यापासून जग, हा माझा विस्तार आहे.. बीजापासून वृक्षाची निर्मिती झाल्यावर बीज लुप्त होते, सोन्यापासून दागिना घडल्यावर शुद्ध सोनं नाहीसं होतं तसंच परमात्म्यापासून जगाची उत्पत्ती झाल्यावर तो देखील लुप्त होतो.. 


सर्व भूतमात्रांना उत्पन्न करणारा, त्यांचं पालनपोषण आणि रक्षण करणारा परमात्मा, सर्व जीवात असून सुद्धा व्यक्त सृष्टीपासून अलिप्त असतो.. ज्याप्रमाणं सर्वत्र वाहणारा वायू आकाशामध्ये स्थित असतो, त्याचप्रमाणं सर्व भूतमात्र, ही सृष्टी परमात्म्यामध्ये स्थित असते.. आकाशात सर्वत्र भरून राहिलेला वायू जेव्हा वाहतो तेव्हा तो आकाशापासून निराळा भासतो.. आकाश जसं वायूच्या हालचालींपासून अलिप्त असतं तसंच परमात्मा ही सर्व गोष्टींपासून अलिप्त असतो.. हा सर्व मायेचा खेळ आहे.. 


प्राणिमात्रांची उत्पत्ती, स्थिती, लय घडते ती 'माये'च्या, प्रकृतीच्या प्रभावामुळं.. *कल्पाच्या अंती ही सारी सृष्टी, जीवजंतू, भूतमात्र परमात्म्याच्या प्रकृतिरूप अव्यक्त स्वरूपात लय पावतात आणि नवीन कल्पाच्या आरंभी परमात्म्याची त्रिगुणीशक्ती 'माया'द्वारे पुन्हा उत्पन्न होतात.. कल्प जेव्हा आपलं कर्म पूर्ण करतो तेव्हा तो ही संपून जातो.. कल्पच काय पण परमात्मा ही त्याच्या भौतिक कर्मापासून सुटला नाही.. सृष्टी निर्माण करणं, जीवांची निर्मिती, त्यांचं संरक्षण आणि शेवटी शमन हे त्याचंच तर काम आहे.. प्रकृतीच्या मदतीनं, कर्मानुसार सृष्टीची पुनःपुन्हा निर्मिती होते आणि प्रकृतीच्या नियंत्रणाखालीच तिची उत्पत्ती आणि संहार ही होतो.. जसं कर्म तसा स्वभाव, जसा स्वभाव तसे गुण (रजो, सत्व, तम) आणि त्या नुसार नवीन जन्म.. अश्याप्रकारे परमात्मा आपलं कर्म करत राहतो आणि आपण आपलं.. परमात्म्याची कर्माविषयीची अनासक्ती आणि तटस्थपणे काम करण्याची वृत्ती ह्यामुळे ही सर्व कर्मे त्याला बद्ध करू शकत नाहीत.. 


परमात्म्याचं सर्वश्रेष्ठ स्वरूप जाणणारे अज्ञानी, त्याच्या मनुष्यरूपी अवतारात त्याची अवज्ञा करतात.. आणि एरवी अंतःकरणपूर्वक नाशवंत देहाच्या ठायी अविनाशी परमात्मा पाहतात, त्याची पूजा करतात.. निराकाराला आकार देऊन, सर्वव्यापकाला ठराविक ठिकाणी बद्ध करून, दागदागिने घालतात.. स्वयंमेव असणाऱ्यांची मूर्ती तयार करतात.. स्वयंसिद्ध असणाऱ्यांची प्राणप्रतिष्ठा करतात.. कुळगोत नसताना कुळाचं वर्णनही करतात.. अश्या अज्ञानी माणसांचा जन्म व्यर्थच होय.. असे असूरी मोहिनी प्रकृतीचे लोक व्यर्थ आशा, व्यर्थ कर्म आणि व्यर्थ ज्ञान ह्यात आपले जीवन नष्ट करतात..  

परंतु दैवी प्रकृतीचे लोक ज्यांनी इंद्रियांना नियंत्रित केलंय, ज्यांनी आपलं चित्त स्थिर केलंय, जे आत्मबुद्धी आहेत, ज्यांनी भागवतभक्ती अंगिकारली आहे असे महात्मे, परमात्माला अविनाशी सर्व जीवांचे आदिस्थान जाणून एकनिष्ठेनं भजतात.. तर यत्नशील, दृढव्रत आणि नित्य योगयुक्त असणारे, परमात्म्याचे सतत कीर्तन-वंदन करीत भक्तीनं उपासना करतात. थोडक्यात जसे भक्त तशी त्यांची भक्ती.. दैवी प्रकृतीचे लोक आपल्या भजनातून, कीर्तनातून उपासना करतात तर ज्ञानयोगी परमात्म्याला निर्गुण, निराकार मानून त्याची उपासना करतात तर काही एकमेवाद्वितीय रूपात तर काही निरनिराळ्या रूपात, तर कोणी विराटविश्वरूपात उपासना करतात..  


श्रीभगवान विराट विश्वरूपी स्वरूपाचं वर्णन करताना म्हणतात

मीच कर्मकांड आणि विधी अनुष्ठान ही मीच.. यज्ञ विधानापासून प्रकट होणारा यथाविधी यज्ञ ही मीच.. नानाप्रकारच्या औषधी, धृत, समिधा, होमद्रव्य ही मीच आणि अग्नी ही मीच.. 

देवांना अर्पण करण्याचा मंत्र ही मीच आणि पितरांना तर्पण देण्याचा मंत्र ही मीच.. 

ह्या जगताचा पिता, माता, आणि पित्याचाही पिता मीच.. आधार ही मीच.. 

जे जे पवित्र आणि जे कांही ज्ञेय आहे ते ही मीच.. ॐकार मी, ऋग्वेद (संपूर्ण प्रार्थना), सामवेद(समत्वभाव) यजुर्वेद(यज्ञांचे विधिनिषेध) ही मीच.. 

ज्याच्या आश्रयाने विश्वाचा कारभार चालतो तो त्रैलोक्याचा स्वामी मीच.. आकाशाची व्याप्ती, वायूची गती, समुद्राची मर्यादा, अग्नीचं जाळणं, मेघाचा वर्षाव, पर्वताचं अचल असणं, पृथ्वीनं सृष्टीचा भार वाहणं हे सगळं माझ्याच आज्ञेनं होते.. मीच उष्णता देतो, मीच पाण्याची वाफ करतो आणि पुन्हा पाऊस ही मीच पडतो..   

मीच जीवनाचं ध्येय आणि आश्रयस्थान.. मीच रक्षणकर्ता, पोषणकर्ता आणि जिवलग सखा.. जीवन आणि उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या अवस्थेंचं मूळ ही मीच.. बीजापासून वृक्ष आणि वृक्षापासून परत बीज-हे अविनाशी बीज ही मीच..

सत् (चेतन) आणि असत् (स्थूल) ही मीच..  

अमृततत्व ही मीच आणि मूर्तिमंत मृत्यू ही मीच..   


वेदाध्ययन करणारे, यज्ञाद्वारे परमात्म्याचं पूजन करणारे त्यांच्या पुण्यफलानुसार इंद्रलोकास पोचून देवांप्रमाणं दिव्य भोग उपभोगतात.. स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याची पुंजी संपली की परत मृत्युलोकांत जन्माला येतात.. अश्याप्रकारे वेदोक्त धर्माचं पालन करून जे इंद्रियभोग उपभोगतात ते पुनः पुन्हा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकतात.. परंतु जे अनन्य भावनेनं परमात्म्याचं चिंतन करत त्याला भजतात, त्यांचं 'योगक्षेम' तो पाहतो म्हणजेच त्यांच्या गरजा तो पूर्ण करतो, त्यांचं रक्षण करतो..   

जे अन्य देव-देवतांची श्रद्धेनं उपासना करतात, ते देखील पर्यायानं परमात्मा परमेश्वराचीच आराधना करतात.. देव-देवतांची उपासना करणारे देवलोकास जातात, पितरांची उपासना करणार्यांना पितृलोक मिळतो तर भूत-पिशाश्च पूजकास भूतलोक मिळतो आणि जे परमात्माची आराधना करतात ते परमात्म्यास्वरूपाला प्राप्त होतात..    


प्रेमानं, भक्तीनं, श्रद्धेनं अर्पण केलेलं एखादं पान, फुल, फळ किंवा पाणी ही परमात्मा मोठ्ठ्या प्रेमानं स्वीकारतो.. माऊली म्हणतात, 'येर पत्र, पुष्प, फल। हे भजावया मिस केवळ। वाचुनि आमचा लाग निष्फळ। भक्तिभाव।।'.. म्हणजेच, पान, फुल, फळ ही भक्तिकारण्याकरिता निमित्तमात्र आहेत.. भक्ततत्त्वा खेरीज बाकी सर्व व्यर्थ आहे.. परमात्मा भक्तीचा भुकेला आहे.. श्रीभगवान म्हणतात, "हे कौन्तेया, तू जे करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर.. असं केल्यानं तू शुभाशुभफलरुपी कर्मबंधनांतून मुक्त होशील.. कर्मफलांच्या त्यागानं तुझं अंतःकरण शुद्ध होऊन, माझ्यापाशी मन स्थिर होईल  आणि तू मुक्त होऊन मला प्राप्त होशील.."


सर्व प्राणिमात्र परमात्म्याला, भगवंताला सारखेच आहेत.. कोणी आवडता नाही की कोणी नावडता, कोणी शत्रू नाही की कोणी मित्र.. श्रीभगवंत म्हणतात,'समोS सर्वभूतेषु' मी सर्व जीवांच्या ठिकाणी समभावी आहे.. परंतु जो कोणी भक्तिभावानं परतम्याला भजतो, त्याची उपासना करतो, सेवा करतो, तो परमात्म्याठायी स्थित आहे.. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात'तेवीं आम्हां तयां परस्परें। बाहेरी नामाचींचि अंतरें। वांचूनि आंतुवट वस्तुविचारें। मी तेचि ते॥'.. म्हणजेच, भक्त आणि भगवंत बाह्य नामरूपात्मक देहदृष्टीनं वेगळे असले तरी अंतरंग आत्मदृष्टीनं एकच आहेत..

जर अत्यंत दुराचारी व्यक्तीनं देखील अनन्य भक्तीनं परमात्म्याची उपासना केली तर त्याला साधूच समजावं.. कारण त्याचा विचार, त्याच्या बुद्धीचा निश्चय योग्य आहे.. जे भगवंताला प्रेमभावनेनं भजतात, आपल्या आयुष्याचा शेवट भक्तिमार्गावर करतात ते जरी पूर्ववयात दुराचारी असले तरी ते आत्ता साधूच आहेत.. कारण अंतःकाळी जी बुद्धी असते, तीच गती पुढील जन्मी प्राप्त होते.. तो पुढच्या जन्मात लवकर धर्मात्मा होतो आणि निरंतर शांतीला प्राप्त होतो.. थोडक्यात, भक्ती कधीही नाश पावत नाही.. 

परमात्म्याच्या भक्तीत रममाण ब्राह्मण (ब्रह्मत्व प्राप्तीची इच्छा), राजर्षी (शौर्य, स्वाभिमान, दृढ निश्चयी), स्त्रिया, वैश्य, शूद्र किंवा नीच कुळात जन्मलेले सर्वच परमश्रेष्ठ गतीला जातात.. हे सगळे भेद समाजानं केलेले, भगवंताला सगळे सारखेच..  


थोडक्यात, परमात्म्याठायी मन ठेव, त्याचा भक्त हो, त्याचा पूजक हो, त्याला नमस्कार कर.. पूर्णपणे समर्पित होऊन त्याची उपासना केलीस तर नक्कीच त्याला प्राप्त करशील.. इतकं सांगून अध्यायाची सांगता होते.. 


ऐक *अनुसूया, तू शुद्धबुद्धी, दोषरहित 

म्हणून सांगतो तुज गोपनीय गुपित 

मुक्त होण्या कर्मबंध अन् दुःखातून 

स्व-ध्येय साधण्या त्रिगुणी मायेतून ।।१।। 


जाणुनी ज्ञान-विज्ञान, भूती-अनुभुती

अन् जीव, जग आणि जगदीश्वर नाती  

ज्ञानातून ज्ञानमार्ग, अनुभूतीतून कर्ममार्ग 

अन् भगवंतांशी एकरूप होण्या भक्तिमार्ग ।।२।।


स्थूलरूपे दिसे भौतिक जग   

 अन् सूक्ष्मरूपे परमात्म्याचं रूप

जरी सर्वव्यापी तरी ही विरक्त  

जाण तू त्याचे अव्यक्त स्परूप ।।३।।


उत्पत्ती-स्थिती-लय कालचक्र हे सृष्टीचं

त्रिगुणांच्या मायेसवें कर्म असे परमात्माचं

करी पालनपोषण, सारं त्याच्याठायी स्थित 

असूनी नसे चराचरी जसं लुप्त बीज वृक्षांत ।।४।। 


सगुण-निर्गुण, साकार-निराकार परमात्म्याची रूपं 

भजे जो प्रयत्ने-भक्तिभावे, पावे त्यासी तो समीप

तोच माता-पिता, तोच वेद-ज्ञान, ओंकार, आश्रयस्थान 

तोच अमृततत्व, तोच मृत्यू, सत्-असत् ज्यात स्थित ।।५।।  


उपभोगती स्वर्गसुख, करुनी वेदोक्त धर्माचरण

होता रिता पुण्यसंचय, पुनश्च भाळी जन्म-मरण 

अनन्यभावे भजूनी परमात्मा, चिंतावे योगक्षम 

करुनी आराधना, मिळे परमात्मास्वरूप निजधाम ।।६।।   


जाणूनी हा 'राजविद्याराजगुह्ययोग' प्रभुमुखातून
करुया संपूर्ण समर्पण, ठेवून कृष्णचरणी तन-मन
आचरता हे परमगुपित, होऊ कृष्णभावनेत रममाण
साधू परमलक्ष्य परमप्राप्ती, करुनी सारं कृष्णार्पण ।।७।। 

हरी  तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

********************  


*अनुसूय : द्वेष न करणारा

*ज्ञान म्हणजे सिद्धांत आणि विज्ञान म्हणजे त्या सिद्धांतांचं प्रात्यक्षिक, ज्ञानाची अनुभूती घेऊन सिद्ध झालेलं ज्ञान.. 

*भगवद्‌गीतेनुसार ज्ञानाचा अर्थ ‘स्व’ची अनुभूती, स्वत:बद्दलचे आंतरिक ज्ञान, 'आत्मज्ञान'.. 

*..आणि आत्मज्ञान म्हणजे आपण केवळ देहरुपी जडतत्त्व नसून आपल्यात चेतनारूपी परमात्मतत्त्व आहे याची असणारी जाणीव..

*कल्प: सनातन धर्मातील कालगणनेचं परिमाण.. १००० युगचक्राचं एक कल्प.. १२००० दिव्यवर्षांचं एक युगचक्र.. ३६० मानवी वर्षाचं एक दिव्यवर्ष.. ४.३२ अब्ज मानवी वर्षांचं एक कल्प..   



-मी मधुरा.. 

************************************************

No comments:

Post a Comment