ॐ
( त्रिगुणमयी माया )
प्रकृती (देह) आणि पुरुष (आत्मा) ह्यांच्या ऐक्यातून सृष्टीची निर्मिती होते.. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुणांच्या, मायेच्या प्रभावानं आत्मा संसारात रममाण होतो.. त्याला सुखदुःखं भोगावी लागतात.. म्हणजेच सर्व देहधारी जीव सत्व, रज आणि तम ह्या भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या अधिपत्याखाली असतात.. माऊली म्हणतात, जे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगे। होईजे येणे जगे। आत्मगुण संगे। संसारिया।।.. जो ह्या गुणांपासून विरक्त होतो तोच मुक्ती पावतो..
आत्म्याला प्रकृतीचा संग कसा होतो? त्याला सुखदुःखं कशी भोगावी लागतात? आत्म्याला गुणांची बाधा कशी होते? गुणातीत होणं म्हणजे काय?.. ह्या बद्दल हा अध्याय भाष्य करतो.. थोडक्यात, सत्व, रज, तम हे गुण आणि त्यांचा मानवी जीवनावरील प्रभाव ह्याचं वर्णन ह्या अध्यायात दिसून येतं..
अध्यायाची सुरुवात 'श्रीभगवान उवाच' नं होते.. भगवान म्हणतात, "अर्जुना, सर्व ज्ञानांतील उत्तम ज्ञान, 'ज्ञानानां ज्ञानमुत्तमम' मी तुला पुन्हा सांगतो, जे जाणल्यानं सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झाली आहे.." यापूर्वी ही भगवानांनी जीवन सार्थक होण्यासाठी 'परम गोपनीय ज्ञान' 'राजविद्याराजगुह्य'योगात सांगितलं आहेच.. पण आत्तापर्यंत सांगितलेल्या ज्ञानापेक्षा ही श्रेष्ठ असं ज्ञान इथं सांगून ते अधिक प्रबोधन करू इच्छितात.. या परिपूर्ण दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर, परमात्म्य स्वरुपाशी एकरुप झालेले जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात.. ते सृष्टीच्या उत्पत्तिकाळी जन्मत ही नाहीत आणि प्रलयकाळी नाश ही पावत नाहीत..
तत्त्वतः ब्रह्मरुप असलेली भौतिक प्रकृति हीच सर्व जीवांचं, प्राणिमात्रांचं उत्पत्तीस्थान आहे.. त्या भौतिक प्रकृतीत परमपुरुष परमात्मा जेव्हा उत्पत्तिकारक बीज पेरतो, तेव्हा "माये"च्या संयोगानं 'विकार व गुण' वृद्धी पावतात आणि त्यापासून सर्व जीवांची उत्पत्ति शक्य होते.. सर्व योनींमध्ये उत्पन्न होणाऱ्या जीवांचं उत्पत्तिस्थान *महदब्रह्म म्हणजेच भौतिक व्यापक प्रकृती आहे आणि उत्पादक बीज प्रदान करणारा जनक परमात्मा आहे.. हे जीव आपल्या पूर्वकर्मांनुसार विविध रूपांत जन्म घेतात.. आत्मा जरी दिव्य असला तरीही जेव्हा तो प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा प्रकृतिपासून उत्पन्न होणारे सत्त्व, रज व तम हे तीन गुण अविनाशी, निर्विकार आत्म्याला देहांत बद्ध करुन ठेवतात..
हे त्रिगुण एकाचवेळी जीवात्म्याठायी वास करत असतात.. कधी रज-तमगुणांना पराभूत करुन सत्त्वगुण प्रकट होतो तर कधी सत्त्व-तमगुणांचा पाडाव करुन रजोगुण तर कधी सत्त्व-रजगुणांना जिंकून तमोगुण वृद्धि पावतो..
सत्वगुणी इतर रज-तमगुणी बद्धांच्या तुलनेत सुज्ञ, बुद्धिमान असतो.. भौतिक दुःखानी तितकासा प्रभावित न होता, ज्ञानामध्ये प्रगती करत राहतो.. 'अधिक ज्ञान अधिक सुख' ह्या सुखाच्या भावनेमुळं सतत काम करण्याची इच्छा आणि जीवनाबद्दलचं आकर्षण ह्यामुळं तो पुनःपुन्हा जन्म घेत राहतो.. प्रकाशमयी व निर्दोष असा हा सत्त्वगुण निर्मळ असल्यामुळं सुख आणि ज्ञान यांच्या संगानं जीवात्म्याला बांधून टाकतो..
रंजनरुप असा हा रजोगुण वासना आणि महत्वाकाक्षांच्या आसक्तिपासून निर्माण होतो.. कर्मफलांची अपेक्षा जीवात्म्याला कर्माशी बांधून ठेवते, बद्ध करते.. हे जग, आधुनिक संस्कृती रजोगुण प्रगत झाल्याचं एक उदाहरण..
सत्वगुणांच्या अगदी विपरीत, मोहांत पाडणारा हा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न होतो आणि जीवात्म्याला कर्तव्याविषयी दुर्लक्ष, आळस व झोप यांनी बद्ध करतो..
अश्याप्रकारे सत्वगुण मनुष्याला सुखानं बांधतो तर रजोगुण सकाम कर्माशी आणि तमोगुण ज्ञानावर पडदा घालून कर्तव्यमूढतेशी बांधतो..
जेव्हा देहाची सर्व द्वारं ज्ञानानं प्रकाशित होतात त्यावेळी सत्त्वगुणाची वाढ झाली असं समजावं.. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, "सर्वेंद्रियांच्या आंगणीं । विवेक करी राबणी । साचचि करचरणीं । होती डोळे ।।".. सर्व इंद्रियांच्या अंगणात विवेक पहारा करतो व हातापायांच्या ठिकाणी खरोखरच डोळे होतात.. म्हणजे हातपाय कर्मेंद्रियं असूनही त्यांना चांगलं वाईट निवडण्याची शक्ती येते.. दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, तोंड, जननेंद्रिय आणि गुद अशी शरीरामध्ये नऊ द्वारं आहेत.. ही द्वारं जेव्हा ज्ञानामुळं सारासार विचार करून, डोळसपणे राजहंसाप्रमाणं चांगलंच आत्मसात करतात तेव्हा सत्वगुणांची वाढ झाली असं समजावं.. मृत्यूनंतर सत्वगुणींना 'देवयोनी' म्हणजेच ब्रह्मलोक, स्वर्गलोक अश्या उच्चतर लोकांची प्राप्ती होते आणि ते दैवी सुखाचा उपभोग घेतात.. पुण्याचा घडा संपला कि परत जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकतात..
रजोगुण वाढला असता लोभ, कर्मफलाची अपेक्षा, अनियंत्रित इच्छा, लालसा हे विकार उत्पन्न होतात.. रजोगुणी कोणत्याही स्थितीत कधीच संतुष्ट रहात नाही.. त्याला सदैव अधिकाची लालसा असते.. त्याच्या इंद्रियतृप्तीला अंतच नसतो.. मृत्यूनंतर रजोगुणी सकाम कर्मे करण्यासाठी परत 'मनुष्ययोनी'त जन्म घेतात..
तमोगुणांची वृद्धि झाली असता अज्ञानामुळं अंधकार, आळसामुळं निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह हे दोष पछाडतात.. मृत्यूनंतर तमोगुणी अधोगतीला जावून 'पशुयोनी'त जन्म घेतात किंवा नरकात जातात..
सात्विकगुणांतील (पुण्य)कर्मांचं फळ निर्मळ व ज्ञानमय, रजोणांतील कर्मांचं फळ दुःखकारक तर तमोगुणांतील कर्मांचं फळ अज्ञानकारक असतं.. सत्त्वगुणांपासून ज्ञान उत्पन्न होतं, रजोगुणांपासून लोभ व तमोगुणांपासून दु:कृत्य, मोह व अज्ञान उत्पन्न होतात.. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, "तैसे मध्योर्ध्व अध। हे जे गुणवृत्तिभेद। ते दृष्टीवांचूनि शुद्ध। वस्तुचि असे॥.. म्हणजे उत्तम गति, मध्यम गति व अधोगति हे गतीचे भेद गुणवृत्तींच्या भेदामुळं आहेत.. ती गुणांची दृष्टी जर टाकली तर ब्रह्म वस्तु शुद्ध आहे तशीच आहे.. थोडक्यात, प्रकृतीच्या गुणांशिवाय दुसरा कोणी कर्ता नाही, हे जो जाणतो आणि गुणांच्या पलीकडं असलेलं परमतत्व ओळखतो, तो परमस्वरूपाला प्राप्त होतो.. देहाच्या उत्पत्तीला कारणीभूत असणाऱ्या ह्या त्रिगुणांवर जो विजय मिळवतो, तो जन्म-मृत्यू, वार्धक्य इत्यादी दुःखापासून मुक्त होऊन अमृताचा म्हणजे मोक्षाचा, परमानंदाचा उपभोग घेतो..
त्रिगुण आणि त्यांचे मानवी जीवनावरील प्रभाव समजून घेतल्यावर अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो, "हे प्रभो, या त्रिगुणांना उल्लंघून गेलेला पुरुष कोणत्या लक्षणांनी युक्त असतो? त्याचं आचरण कसं असतं? आणि तो या तीन गुणांच्या पलीकडं कसा जातो?.."
गुणातीत मनुष्याची लक्षणं आणि त्याच्या आचरणाबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं देताना श्रीभगवान सर्वप्रथम सांगतात की, ह्या दिव्यावस्थेमध्ये स्थित झालेला, प्रकाश (सत्त्वगुण), प्रवृत्ति (रजोगुण), मोह (तमोगुण) उत्पन्न झाले तरी त्यांचा द्वेष करीत नाही आणि ते नाहीसे झाले तरी त्यांची लालसा करीत नाही.. कारण त्याला माहिती असतं की भौतिक देहानं बद्ध झालेला नेहमीच त्रिगुणांपैकी एका गुणाच्या नियंत्रणाखाली असतो.. तो कर्मफलाविषयी उदासीन असून त्रिगुणांनी विचलित होत नाही.. गुणच वर्तन करीत आहेत असं जाणून तो स्थिर असतो.. सदोदित धैर्याने युक्त असा असतो.. त्याला सुख-दुःख, माती-दगड-सोनं, प्रिय-अप्रिय, मान-अपमान, तसेच निंदा-स्तुति समसमान वाटतात.. मित्र व शत्रु यांच्याकडं तो समदृष्टीनं पाहतो..
असा गुणातीत ब्रह्म स्वरूप जाणावा कारण ब्रह्म म्हणजे भौतिक विकारांपासून मुक्त होणं.. वेदांमध्ये म्हटलंय 'ब्रह्मैव संब्रह्माप्येति'.. ब्रह्म झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती होते.. आणि गुणातीत होण्यासाठी, त्रिगुणांच्या पलीकडं जाण्यासाठी भक्तिमार्गाचा अवलंब करावा असं सांगून ह्या अध्यायाची सांगता होते.. भगवान म्हणतात, "जो माझी म्हणजेच परमात्म्याची एकनिष्ठ भक्तिमार्गानं उपासना करतो तो या तीनही गुणांच्या पैलपार जाऊन ब्रह्मरुप होण्याला पात्र होतो.. कारण अविनाशी आणि निर्विकार अशा ब्रह्माचं, सनातन अशा धर्माचं, निरतिशय (अखंड) अशा सुखाचं अधिष्ठान मीच, परमात्माच आहे..."
ऐक अर्जुना, सांगतो तुज
'ज्ञानानां ज्ञानमुत्तमम'
अभ्यासे जोपासती ज्ञान जे ऋषीमुनी
मिळे परमसिद्धी अन् स्थान निजधामी ।।१।।
जाणुनी असे परिपूर्ण दिव्य ज्ञान
होशील तू गुणातीत ब्रह्मरूपासमान
ना जन्म जन्मसी, ना नाश पावसी
स्थिरावून तन-मन भगवंत सेवेसी ।।२।।
संयोग प्रकृती-मायेचा, स्रोत हा जीवनाचा
प्रदाता बीज परमात्मा, होई जनक सृष्टीचा
ठरवती संचित कर्मे नाना रूपे विविध योनी
करुनी कार्ये त्रिगुणांसंगे, जीव हा बद्ध जीवनी ।।३।।
नांदती सत्व-रज-तम एकाच आत्म्याठायी
पण अधिक सत्वगुण करी बद्ध सुख-ज्ञानाशी
होता अधिक रजोगुण होई बद्ध सकाम कर्माशी
अन् अधिक तमोगुण करी बद्ध कर्तव्यमूढतेशी ।।४।।
ज्ञानमय कर्मफले सत्वगुणी जाईल देवलोकी
वासनांमय कर्मफले रजोगुणी जन्मेल मनुष्यलोकी
अज्ञानें अधोगती तमोगुणी भोगेल नरकलोकी
अन् त्रिगुण विजयी गुणातीत परमानंद वैकुंठलोकी ।।५।।
जाण गुणातीत, जो उदासीन कर्मफलापरी
ना द्वेष ना लालसा ज्याची त्रिगुणमायेवरी
असे समदृष्टी प्रिय-अप्रिय, शत्रू-मित्रांवरी
राखे समभाव निंदा-स्तुती, मान-अपमानापरी ।।६।।
अनादि मी, अंत मी, मीच असे त्रिगुणातीत
गुंतवा मन माझ्याठायी, होण्या षडरिपू रहित
होऊन संलग्न भक्तीमध्ये, होशी उन्नत ब्रह्मस्थराप्रत
मिळता आत्मसाक्षात्कारी ज्ञान, स्थित तू परमात्माप्रत ।।७।।
जाणूनी हा 'गुणत्रयविभागयोग' प्रभुमुखातून
अभ्यासू विवेके जीवात्मा-परमात्मा त्रिगुणमायेतून
पाहू समबुद्धी समदृष्टी समभावे खेळ हा परमात्म्याचा
अनासक्त, गुणातीत 'भगवद भक्ती' मार्ग हा निजधामाचा ।।८।।
हरी ॐ तद् सद्
॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥
********************
*महदब्रह्म : आकाश, जल, तेज आणि वायू सहित सर्व चोवीस तत्त्वं म्हणजे भौतिक शक्ती.. आणि ह्या तत्वांच्या समूहाला महदब्रह्म किंवा भौतिक प्रकृति असं म्हणतात..
No comments:
Post a Comment