काही अनोळखी माणसं जीव लावतात तर काही जिवाभावाची माणसं अनोळखी होतात.. काही श्वास भास ठरतात तर काही भास श्वास बनतात.. मनापासून हवं असलेलं हिसकावलं जातं तर कधी माहितीच नसलेलं दान पदरात पडतं.. ह्या लेखाजोखा कसा ही असला तरी कृतज्ञतेन पुढं जात, सुखाची आस मनात ठेवत, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आनंदानं सज्ज व्हायचं..
बापरे!! एकदम तत्वज्ञान!??.. काही नाही हे फक्त डिसेंबर वाईब्स आहेत.. वर्षभराच्या सगळ्या घटनांची, आठवणींची, अनुभवांची पोती असलेली ट्रेन डोळ्यांसमोरून गेली ना म्हणून.. आता ही ट्रेन कधी पॅसेंजर ट्रेन बनून तर कधी सुपरफास्ट ट्रेन बनून रोज जात राहील.. आणि विचारांची मंडई होईल.. आता ह्या मंडईतून, ह्या पोत्यांमधून आवश्यक तेवढं सामान बरोबर घेऊन नवीन वर्षाच्या प्रवासाला निघायची तयारी सुरु करायची इतकंच..
एक भरलेलं आठवणींनी तर दुसरं स्वप्नांचं पोतं!
जसा रात्री नंतर दिवस अन् दिवासा नंतर रात्र!
एकात असेल इतिहास तर दुसर्यात नव्याची आस
गाठीशी एकाच्या अनुभव अन् दुसर्याकडं विश्वास!
तेवढ्याच तारखा, तेवढीच थंडी, तसाच चेहरा मोहरा
वेगळी ओळख, वेगळा अंदाज, वेगळा ढंग मात्र न्यारा!
बांधली गेलीत अशी दोघं जशी धाग्याची दोन टोकं
लांब असूनही एकमेकांपासून निभावतात आपलं नातं!
सोडून दिलेलं डिसेंबरनं, जानेवारी आपलंसं करतो
अन् जानेवारीनं केलेले संकल्प डिसेंबर निभावत राहतो!
जानेवारी ते डिसेंबर प्रवास अकरा महिन्याचा असतो
पण डिसेंबर ते जानेवारी आपण एका क्षणात पोचतो!
अन् जेव्हा जवळ येतात तेव्हा वर्षच बदलून टाकतात!
दोघांनी मिळूनच खरं तर बाकी महिन्यांना बांधुन ठेवलंय
पण होणारी त्यांची ताटातूट जगासाठी सोहळा झालाय!
*'दिसंबर और जनवरी का रिश्ता' ह्या हिंदी कवितेवर आधारित..
-मी मधुरा..
No comments:
Post a Comment