पॅनडॅमिक मध्ये एकदाचा मुहूर्त लागला.. इंग्लिश गीता, ज्ञानेश्वरी आणि युट्यूब व्हीडिओ ह्यावरून गीता शिकायला सुरुवात केली.. प्रत्येक अध्यायाचा अभ्यास करून त्यावर स्वतःच्या नोट्स काढायच्या.. हे अभ्यासाचं स्वरूप.. दीड वर्षात गीता एकदा वाचून झाली.. पण त्यावेळी अधिकृत (अर्थासहित) संस्कृत गीता वाचली नाही ह्याची खंत मनात राहिली..
कट टू.. जुलै २०२४.. एका व्हाट्स अँप गृप मध्ये गीता परिवाराचं 'Learn Geeta' हे फ्लायर मिळालं आणि कोण आनंद झाला.. अगदी अभ्यासपूर्ण, पद्धतशीर असलेलं स्वरूप, स्वयंसेवकांचे त्या मागचे कष्ट, सेवाभावी भाव ह्याच खूप आश्चर्य वाटलं.. अश्या संस्थेशी जोडल्या गेल्याच्या समाधाना बरोबरच आता माझी सुप्त इच्छा पूर्ण होणार होती..
श्लोक पठण शिकत असताना परत गीताचा नव्यानं अभ्यास करायचं ठरवलं.. मग रोजचे शिकवलेले श्लोक, त्यातील शब्दांच्या संधी सोडवून त्यांचा अर्थ लावायचा प्रयत्न सुरु केला.. माझ्या आधीच्या नोट्स आणि “भगवतगीता जशी आहे तशी” संदर्भासाठी होतेच.. श्लोकांचा अर्थ आपल्या अभ्यासाच्या श्लोकांच्या बाजूला लिहून ठेवायला लागले.. श्लोक म्हणताना त्याचा अर्थ माहिती असेल तर म्हणायला अजुनी मजा येते.. भावना आपोआपच श्लोकात उतरतात.. नुसतं गीता पठणच नाही तर अध्यायांचं विवेचन, संस्कृत व्याकरण अश्या सर्वांगानं परिपूर्ण रूपात गीता शिकायला मिळतीय..
सगुण भक्ती की निर्गुण भक्ती
गोंधळ पार्था मनी वसे
सर्वाहूनी श्रेष्ठ असा 'भक्तियोग'
श्रीकृष्ण सखा सांगत असे ।।१।।
साकार रूप की निराकार रुप
श्रद्धा ज्याच्या मनी वसे
सर्वांठायी हितार्थ हा समबुद्धी
प्राणप्रिय मज असे ।।२।।
अनन्य भावे अर्पून कर्मे
हृदयी ज्या मी स्थिर वसे
जन्म-मृत्यू संसारसागरा
उद्धार करण्या मी असे ।।३।।
समर्पून तन मन बुद्धी
माझ्या कार्यात जो वसे
निःसंदेह ह्या पूर्णसिध्दीचा
माझ्यामध्येच वास असे ।।४।।
असमर्थ अश्या मनी
इच्छा प्राप्ती माझी वसे
ज्ञान-ध्यान, कर्मफल त्यागे
ठायी त्या आत्मशांती असे ।।५।।
सहृदयी, निरहंकारी ज्या मनी
मैत्री अन् करूणा वसे
संतुष्ट, संयमी, दृढनिश्चयी
मज अत्यंत प्रिय असे ।।६।।
सुख-दुःख, हर्ष-उद्विग्न, भय-चिंता
क्षणी समभाव वसे
तटस्थ, पवित्र, कुशल, परित्यागी
मज अत्यंत प्रिय असे ।।७।।
शीत-उष्ण, शत्रू-मित्र, मान-अपमान
यासव समभाव वसे
इच्छा-आकांक्षा, शुभाशुभ त्यागी
अनिकेत मज प्रिय असे ।।८।।
जाणूनी हा 'भक्तियोग' प्रभुमुखातून
करू अविनाशी भक्तिमार्गाचे अनुकरण
श्रद्धेने हे परमलक्ष्य साधून,
होऊ कृष्णप्रेमी करूनी संपूर्ण समर्पण.. ।।९।।
हरी ॐ तद् सद्
॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥
********************
माझी नुकतीच L1 लेव्हल पूर्ण झाली.. ज्यात अध्याय १२ 'भक्तियोग' आणि अध्याय १५ 'पुरुषोत्तमयोग' यांचा समावेश होता..
एकूण चार लेव्हल मध्ये गीतापठण शिकवले जाते.. ते ही मोफत..
खाली गीतापरिवाराची लिंक देतीय..
खूप छान कविता! भक्तिरसपूर्ण .
ReplyDeleteफारच छान. अतिशय सोप्या , सुंदर शब्दात व लयबध्दतेत भक्ती योगाचे सार सांगितलं. अप्रतिम.
ReplyDelete