नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
२०२६ चा नवा कोरा दिवस, नवी ऊर्जा देणारा सूर्योदय आणि १० कि.मी. धावणं!!.. ह्यापेक्षा नवं-वर्षाची चांगली सुरुवात काय असू शकते?!..
रात्री बारा वाजता गत वर्षाला बाय बाय म्हणत अतिशबाजीच्या रोषणाईत नववर्षाचं स्वागत करावं.. पहाटे पहाटे चालायला/धावायला जावं.. आणि उगवत्या सूर्याच्या साक्षीनं नवं वर्षाची सुरुवात करावी.. ही नॉर्थ अमेरिकेत राहणाऱ्या माझ्यासाठी स्वप्नवत वाटणारी गोष्ट.. पण हे शक्य झालं ते केवळ सध्या फ्लोरिडावासी असल्यानं..
.. गेल्या काही वर्षांत सोलो ट्रिप्स, ट्रेकिंग, नेहमीची भारतवारी ह्या निमित्त्यानं वेगवेगळ्या देशांतून माझा प्रवास होतो आहे.. त्यामुळं वर्षांतून तीन-चार महिने माझं पोर्टलॅंडला नसणं हे सवयीचंच.. पण गेल्या संपूर्ण वर्षात कसे तरी तीन महिने मी पोर्टलॅंडला होते.. त्यामुळं मैत्रिणींनी मला ग्लोबल सिटीझन असं घोषित केलंय.. इतके दिवस फ्रिक्वेंट फ्लायर असणारी मी आता ग्लोबल सिटीझन झाले आहे..
२०२५ मध्ये जवळजवळ साडेचार पाच महिने मी भारतात होते.. त्यात चारधाम यात्रा, श्रीलंका हा प्रवास झाला.. बाकी सहा-सात महिने अमेरिकेत असले तरी बहुतेकवेळा फ्लोरिडात मुलीकडंच होते..
तसं पहायला गेलं तर पोर्टलॅंड,फ्लोरिडा, पुणे, मिरज ही चारी माझीच घरं.. पण ती खरंच माझी घरं आहेत का? मी त्यांची आहे का?.. कधी कधी तर मला ही घरं चक्क अनोळखी वाटतात.. कदाचित एका घराची सवय होईपर्यंत दुसऱ्या घरी जाण्यामुळं असेल.. तिथल्या वस्तूंशी, तिथल्या वातावरणाशी नव्यानं नातं जोडताना हरवायला होतं.. हवामानात बदल, वेळेचा फरक या बरोबरच खाण्यापिण्याच्या सवयी-वेळा, स्वयंपाकाच्या पद्धती, वागणं-बोलणं-कपडे सगळ्यांशीश जुळवून घ्यावं लागतं.. कधी कधी मी नेमकी कोण? हा प्रश्न ही पडतो.. अलिप्तपणे ह्याकडं पाहिलं की हळू हळू मी मला सापडत जाते.. आणि स्वतःला शोधणं सापडणं ह्या खेळांत मजा येते..
स्वतःला एकदा शोधलं की झालं असं मुळीच नसतं.. दहा इंद्रियांकडून क्षणोक्षणी मिळणाऱ्या माहितीच्या गोंगाटात गोंधळात सहजच गुंतायला हरवायला होतं.. त्यामुळं सतत स्वतःला शोधून मार्गावर आणायला, स्वतःत झालेल्या चांगला वाईट बदलांचा आढावा घ्यायला, स्वतःबरोबर वेळ घालवायला मला आवडतं.. त्यासाठी भटकंती.. एकटीनं भटकणं.. देशात, परदेशात.. सोलो ट्रेक्स, आश्रमात राहणं, अनोळखी लोकांबरोबर प्रवास करणं.. वर्षातले ते दहा-पंधरा दिवस फक्त माझे असतात.. माझ्यासाठी असतात..
२०२६ च्या नववर्षाच्या शुभेच्छां बरोबरच बरेच जणांनी विचारलं.. मग, ह्यावर्षी कुठं दौरा?.. अजुनी तरी मी चारधाम यात्रेच्या गारुडाखालीच वावरती आहे.. बघू, जस जसं वर्ष पुढं सरकत जाईल तसा अंदाज येईल, नियोजन ही होईल..
२०२६ काय घेऊन येतंय ह्याची उत्सुकता तर नक्कीच आहे..
-मी मधुरा..