मुल चार-पाच वर्षाचं झालं की त्याला तुळपुळे गुरुजींकडं पाठवायचं हा त्या काळचा म्हणजे माझ्या लहानपणीचा पायंडा.. अक्षरओळख होण्याआधी त्याची स्तोत्रांशी तोंडओळख सुरु व्हायची.. हातात छोटीशी कापडी पिशवी.. त्यात गणपती स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, मनाचे श्लोक अशी छोटी छोटी पुस्तक.. 'स्तोत्र' हा शब्द उच्चारता ही न येण्याचं हे वय..
वर्गाची सुरुवात सूर्यनमस्कारानं.. वयाप्रमाणं पाच, अकरा, एकवीस सूर्यनमस्कार घालायचे.. गुरुर्ब्रह्मा, वक्रतुंड सारख्या लहान स्तोत्रांनी सुरुवात होऊन गणपती स्तोत्र, भीमरूपी, मनाचे श्लोक शिकवले जायचे.. गणपती अथर्वशीर्ष, रामरक्षा तोंडपाठ झाली, स्पष्ट म्हणता आली की गुरुजींकडचं शिक्षण पूर्ण व्हायचं.. इथलं शिक्षण संपलं तरी स्तोत्र पठण हा दिनचर्येचा अविभाज्य भाग असायचा.. अंघोळ झाली की सगळी स्तोत्रं म्हणायची.. पण रामरक्षा मात्र, संध्याकाळी दिवेलागण झाली कि, शुभंकरोती नंतर.. प्रत्येक श्लोकांचा, स्तोत्रांचा क्रम ही ठरलेला..
.. तर नित्यपाठ, परवचा वर्गात मी रामरक्षा म्हणायला शिकले.. आज ही ती अगदी उत्तम म्हणते.. पण ती का म्हणायची, तिचा नेमका अर्थ काय हे तेव्हा ही माहिती नव्हतं आणि आत्ता ही नाही.. अर्थ माहिती करून घ्यावा अशी विचारधाराच नव्हती.. स्पष्ट उच्चार आणि पाठांतरामुळं होणारी तल्लख बुद्धी हाच मुख्य उद्द्येश.. काही वर्षांपूर्वी विदुषी डॉ धनश्री लेले यांच्या व्याख्यानात रामरक्षा कवच आणि त्याचा अर्थ ऐकला आणि भारावून गेले.. अश्या पद्धतीनं रामरक्षा शिकली पाहिजे असं वाटलं..
२०२६ मध्ये नवीन काय शिकावं हा विचार करत असताना 'रामरक्षा' स्तोत्राची आठवण झाली.. आणि वर्षाच्या सुरुवातीस येणाऱ्या 'राम नवमी'चं औचित्य साधून लगेचच अभ्यासाला सुरुवात करायची असं ठरवलं..
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
सुरुवात अगदी सुरुवातीपासूनच करूया.. म्हणजे रामरक्षेच्या निर्मितीपासून..
सगळ्या पौराणिक कथांप्रमाणे ह्या कथेची सुरुवात ही कैलासात होते..
एकदा माता पार्वतीनं भगवान शंकारांना विचारलं की श्रीविष्णुसहस्रनामावली सारखं रामाचं एखादं स्तोत्र आहे का?.. तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या ‘रामरक्षा’ स्तोत्रविषयी सांगितलं..
आद्य-कवी वाल्मिकींनी १०० कोटी श्लोक असलेल्या रामायण महाकाव्याची निर्मिती केली.. हे सुमंगल, सुरचित रामायण देव, दानव, मानव सर्वांनाच हवं असं वाटू लागलं.. योग्य न्यायाच्या अपेक्षेनं ते भगवान शंकरांकडं गेले.. ते कुणाला मिळावं यासाठी खूप वादविवाद चर्चा झाली.. शेवटी भगवान शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचं ठरवलं..
१०० ही सम संख्या असल्यानं सामान वाटणी केल्यावर एक श्लोक राहिलाच.. अनुष्टुप छंदातील ह्या श्लोकात असणाऱ्या एकूण ३२ अक्षरांची ही वाटणी झाली.. वाटणी नंतर शिल्लक राहिलेली दोन अक्षरं भगवान शंकरांनी स्वत:कडं ठेवली आणि सर्वांना जाण्यास सांगून ते ध्यानासाठी बसले..
भगवानांनी स्वतःकडं ठेवून घेतलेली ती दोन अक्षरं कोणती हे जाणून घेण्यासाठी देव, दानव, मानव ते ध्यानातून उठण्याची वाट पाहू लागले.. खूप वेळ झाला तरी ध्यानातून ते बाहेर येत नाहीत हे जाणून कंटाळून सगळे निघून गेले.. पण एक ऋषीं मात्र तिथंच थांबले.. वाट पाहता पाहता त्यांना डोळा लागला.. आणि नेमकं त्याचवेळी भगवान ध्यानातून बाहेर आले.. आपली वाट पाहून डोळा लागलेल्या ऋषींकडं पाहून त्यांना त्यांचं खूप कौतुक वाटलं.. ते ऋषी म्हणजे बुधकौशिक ऋषी.. आशीर्वाद म्हणून ऋषींच्या स्वप्नात जाऊन भगवानांनी रामरक्षा सांगितली.. भगवान शंकरांच्या वाणीमुळं रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर मंत्रमय आणि तारक झालं आहे..
स्वप्नांत भगवानांनी सांगितली ही रामरक्षा 'बुधकौशिक' ऋषींनी लिहून काढली..
याचं वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेलं आहे.
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर:। तथा लिखितवान्प्रात: प्रबुध्हो बुधकौशिक: ।।
🌸🌸🌸
आता ज्या बीजाक्षरांपासून रामरक्षेची निर्मिती झाली त्या 'रा' आणि 'म' बीजाक्षरांविषयी थोडंसं..
असं म्हणतात कि ही बीजाक्षरं ॐ इतकीच अनादी आहेत..
वैष्णवांचा अष्टाक्षरी मंत्र 'ॐ नमो नारायणाय' आणि शैवांचा पंचाक्षरी मंत्र 'नमः शिवाय' ह्या दोन मंत्रांच्या बीजापासून राम ह्या शब्दाची उत्पत्ती होते.. भगवान श्री विष्णूचा अवतार 'श्री राम' जन्माला येण्या आधीपासून 'राम' मंत्र रूपात अस्तित्वात होता..
'राम' चा अजुनी एक अर्थ सांगितला जातो.. तो असा..
प्रत्येक अक्षरांशी संबंधित अशी एक देवता असते..
र + आ + म = राम
र म्हणजे अग्नी, आ म्हणजे सूर्य, म म्हणजे चंद्र
पापाचा नाश करून अज्ञान दूर करून मनःशांती देतो तो राम.. म्हणजेच परब्रह्म परमात्मा..
'शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक नाम दासा अंतरी'..
ह्या 'लवलवती विक्राळा' शंकराच्या आरतीच्या शेवटच्या दोन ओळी.. समर्थ रामदासांनी ह्या ओळीत बीजाचं सार सांगितलं आहे.. १०० कोटी श्लोकातून राहिलेलं बीज, ह्या श्लोकांचं सार 'रा आणि म'.. राम.. ह्या बीजाक्षरांचा जप भगवान शंकर सतत करत असतात..
भगवान शंकरांचं रामनामाबद्दलचं प्रेम भक्ती, रामनामाची महती सांगायची तर खुद्द त्यांच्या 'काशी'त, जिथं मरण आलं असता निश्चित मोक्षप्राप्ती होते अशी मान्यता आहे अश्या 'काशी'त, जळणाऱ्या प्रत्येक देहाच्या कानात 'श्रीराम जय राम जय जय राम' हा तारक मंत्र म्हंटला जातो..
🌸🌸🌸
बुधकौशिक ऋषींच्या कृपेनं प्राप्त हे स्तोत्र एक वरदान आहे..
आरोग्य, दीर्घायुष्य, विद्या, विजय, सुख समृद्धी देणाऱ्या, वास्तुदोष दूर करणाऱ्या.. भीती, भूतबाधा अरिष्ठांचं निरसन करणाऱ्या.. मनावर, वाणीवर चांगले संस्कार करणाऱ्या ह्या प्रभावी स्तोत्राचं अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे..
।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।
🙏
*आनंद रामायणातील जन्मकांडात पाचव्या सर्गात हे रामरक्षा स्तोत्र भगवान श्री शंकरांनी माता पार्वतीला सांगितल्याचा, माता पार्वतीनं हे स्तोत्र कार्तिकेयला शिकवल्याचा.. आणि ह्या स्तोत्राच्या प्रभावानंच कार्तिकेय तारकासुराचा वध करण्यास समर्थ झाल्याचा उल्लेख आहे..
-मी मधुरा..
************************************************