Friday, August 15, 2025

अध्याय २ 'सांख्ययोग'

श्रीपरमात्माने नमः 
अध्याय २ "सांख्ययोग" 
(गीतेचे सार)



कुरुक्षेत्रावर आप्तस्वकीयांना युद्धासाठी सज्ज पाहून अर्जुनाची गात्रं क्षीण होतात आणि त्याच्या मनात विचारांचं काहूर माजतं.. युद्ध केलं तर ते नक्कीच जिंकू पण त्या युद्धासाठी कितीतरी आप्तस्वकीय, निरपराध लोक मारली जातील.. राज्य उपभोगण्यासाठी, युद्धासाठीचा होणारा हा संहार त्याला मान्य नाही आणि युद्ध न करणं हे ही क्षत्रिय धर्माविरुद्ध.. ह्या विषादात असणारा अर्जुन 'हे युद्ध करण्यापेक्षा, दुर्योधनाकडून असा मी निहत्ता असतानाच मारला गेलो तर मला जास्ती आनंद होईल' असे म्हणून त्याच्या रथाच्या मागील बाजूस हताश होऊन बसतो.. आणि इथं पहिल्या अध्यायाची सांगता होते.. 
अश्या हताश झालेल्या अर्जुनाला त्याच्या शंकांचं समस्यांचं निराकरण करून युद्धासाठी, स्वधर्म पालनासाठी प्रेरित करण्याची सुरुवात दुसऱ्या अध्यायापासून होते..  

*'सांख्ययोग' अध्यायाच्या सुरुवातीलाच असंख्य विचार आणि दुविधांच्या कोंडीत अडकलेला अर्जुन, त्यातून बाहेर पाडण्यासाठी श्रीकृष्णाला आर्जव करतो आणि त्यांचं शिष्यत्व पत्करतो.. यांच्यातील गुरु आणि शिष्य संभाषणातून भगवदगीतेतील अगाध ज्ञानाचा उगम होतो.. म्हणून श्रीकृष्ण ह्या ज्ञानाचे आद्य अध्यात्मिक गुरु आहेत तर गीता जाणणारा अर्जुन प्रथम शिष्य आहे.. 
भगवदगीतेत ह्या आध्यत्मिक गुरूचा उल्लेख *'श्रीभगवान' असा केला आहे.. 'श्रीभगवान' म्हणजे परमसत्य.. परमात्म्याचं आणि निर्विशेष ब्रह्माचं उगमस्थान.. 

.. तर ह्या अध्यायात श्रीभगवान गोंधळलेल्या, स्वधर्म पालनाच्या मार्गावरून भरकलेल्या अर्जुनानं युद्धस्थ होण्यासाठी शरीर आणि आत्म्याचं स्वरूप, कर्माचं महत्व, बुद्धीचं स्थैर्य आणि ह्या ज्ञानानं येणारी स्थितप्रज्ञता सांगून शाश्वत सुखाचा मार्ग उभा करतात.. आत्म्याचा विकास हा परमार्थाचा पाया आहे.. आत्मा म्हणजे काय? कर्मयोग ज्ञानयोग म्हणजे काय? कर्माचा ज्ञानाशी संबंध म्हणजेच बुद्धियोग काय? परमार्थ कसा साधावा, ब्रह्मत्वापर्यंत कसं पोचावं.. हे सांगून ह्या अध्यायाची सांगता होते.. 

करुणेननं व्याकुळ झालेल्या, पाण्यानं डोळे डबडबलेल्या, निराशेच्या गर्तेत खोलवर जात असलेल्या अर्जुनाला त्याचा सखा, सारथी, समुपदेशक श्रीकृष्ण परखडपणे सांगतो कि हे नपुंसकासारखं, पुरुषत्वाला बाधा आणणारं त्याचं वर्तन त्याच्यासारख्या वीराला अशोभनीय आहे.. पण तरीही मनःशांती हरवलेला अर्जुन 'मी युद्ध करणार नाही' ह्यावर ठाम असतो.. पितामह, गुरु द्रोण यांच्यावर बाणांनी प्रतिहल्ला करणं केवळ अशक्य.. त्यांना मारून ऐश्वर्याचा भोग घेण्यापेक्षा भिक्षा मागणं श्रेयस्कर.. क्षत्रिय धर्म, कर्म यासाठी आप्तेष्टांना मारायचं?.. युद्ध जिकलं तरी आप्तेष्टांच्या अनुपस्थितीचं काय?.. धर्मतत्व आणि नीतिनियमांच्या ज्ञानावर आधारित अर्जुन अनेक युक्तिवाद करतो.. आणि शेवटी असहाय्य होऊन श्रीकृष्णाला निश्चित कल्याणकारी मार्गदर्शन करण्याची विनंती करतो.. श्रीकृष्णाचं शिष्यत्व स्वीकारतो..  

आता येथून पुढे गीताज्ञानाला सुरुवात होते..

अर्जुनाचा युक्तिवाद ऐकून श्रीभगवान म्हणतात की अर्जुना, तू एखाद्या विद्वानांप्रमाणे बोलतो आहेस खरा पण जो विद्वान आहे, ज्याला शरीर आणि आत्म्याचं ज्ञान आहे तो जीवित आणि मृतावस्थेबद्दल शोक करत नाही.. शरीर हे नाशवंत आहे, पण आत्मा चिरंतर आहे.. जे शरीर तू आपल्या बाणांनी विदीर्ण करणार आहेस ते शरीर नाश पावणारंच आहे, तू नष्ट केलंस तरी किंवा नाही केलंस तरी.. आत्मा हा अविनाशी आहे.. त्यामुळं असा कोणताच काळ नव्हता कि जेथं मी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे-महाराजे नव्हते किंवा भविष्यकाळ ही असा नसेल कि आपण कोणीच नसू.. आपण येतो आणि जातो.. जन्म-मृत्यूचं हे कालचक्र अखंडपणे सुरूच राहतं.. म्हणून तू गेलेल्यांचं आणि युद्धात मारले जाणाऱ्यांचं दुःख करू नकोस.. 

जसं बालपण-तारुण्य-वृद्धावस्था तसंच मरण.. ही झाली शरीराची स्थित्यंतरं.. ह्या शरीराच्या स्थित्यंतरामुळं जीवात्म्यात काहीही बदल होत नाही.. तो तसाच असतो आणि मृत्यूनंतर नवीन जन्मात नवीन शरीर धारण करतो.. जी सुखदुःख या शरीरापासून, इंद्रियांच्या जाणिवेपासून निर्माण होतात ती अटळ आणि विनाशी असतात.. ती भोगूनच संपवावी लागतात.. आणि हे जे जाणतात ते सुखदुःखांनी विचलित होत नाहीत.. असे ज्ञानी निश्चित मोक्षप्राप्ती करतात.. 

थोडक्यात, भौतिक शरीर म्हणजेच *भौतिक प्रकृती हे नश्वर तत्व आहे, असत आहे, ते चिरकाल टिकू शकत नाही.. भौतिक शरीर आणि मनामध्ये कितीही बदल झाले तरी जीवात्मा नित्य स्थायी राहतो.. म्हणून जीवात्मा म्हणजेच आत्मतत्व हे शाश्वत, निरंतर आणि अंतिम सत्य आहे.. भौतिक प्रापंचिक सुखदुःखातून बाहेर पाडण्यासाठी विचारवंत, ज्ञानी ह्या आत्मतत्वाचा, संपूर्ण शरीराला व्यापून टाकणाऱ्या अश्या ह्या अविनाशी चैतन्य तत्वाचा ध्यास धरतात.. ज्या चैतन्यानं सारं जग व्यापलं आहे.. हेच चैतन्य, हीच चेतना म्हणजे जीवात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा.. चैतन्य विरहित देह म्हणजे मृतदेह.. त्यामुळं नाशवंत शरीराच्या मोहापेक्षा चैतन्यमयी आत्माचं स्वरूप जाणणं आवश्यक आहे..

आत्मा हा पूर्ण ज्ञानमय आणि पूर्ण चेतनेनं युक्त असतो.. म्हणूनच चेतना हे आत्म्याचं लक्षण आहे.. 
आत्मा जन्म घेत नाही आणि मरत ही नाही.. आत्म्याला जन्म नसल्यामुळं त्याला भूत, वर्तमान, भविष्य ही नाही.. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा- निरंतर- आणि अनादि आहे.. तो मरत ही नाही किंवा मारला ही जात नाही.. शरीराचा नाश झाला तरी तो नाश पावत नाही.. जसं मनुष्य जुन्या वस्त्राचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो तसंच आत्मा निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो..  
आत्म्याचे ना शस्त्रानं तुकडे करता येतात, ना त्याला अग्नीनं जळता येतं, ना पाण्यानं भिजवता येतं, ना वाऱ्यानं सुकवता येतं.. आत्मा अभेद्य, अदाह्य, अक्लेद्य, अशोच तर आहेच पण तो सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि त्रिकाल राहणारा सनातनी आहे..  
आत्म्याला रंग, रूप, आकार नाही म्हणून तो अचिंत्य- चित्तानं चिंतन न करता येणारा- आहे.. तो विकाररहित आहे.. अव्यक्त आहे कारण इंद्रियांनी त्याला अनुभवता येत नाही..

त्यामुळं, आत्म्याचा वरवर विचार करून शरीराबद्दल शोक करू नकोस.. जो जन्माला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे.. म्हणून तुझ्या कर्तव्यपालनात तू असा शोक करणं योग्य नाही.. त्यामुळं हे भरतवंशजा तू युद्ध कर.. - असं श्रीभगवान अर्जुनाला सांगतात.. 

जोपर्यंत आत्मा शरीरात आहे तोपर्यंत त्याला धर्मतत्त्वानुसार नेमून दिलेलं कर्तव्य पालन, स्वधर्म पालन करावंच लागतं.. ह्या कर्तव्यपालनाचं स्वधर्मपालनाचं महत्व सांगताना श्रीभगवान म्हणतात.. क्षत्रिय धर्मानुसार युद्ध करणं, सर्व प्रकारच्या संकटांपासून प्रजेचं रक्षण करणं, कायदा सुव्यवस्था राखणं हे तुझं कर्तव्य आहे.. युद्ध ही क्षत्रियांसाठी नामी संधी असते.. युद्ध जिंकलंस तर राज्योपभोग आणि कर्तव्य पालन करताना हार जरी झाली तरी स्वर्गाची दारं खुली होतील.. पण हे युद्ध नाकारलंस तर एक वीर योद्धा म्हणून तुझी असलेली कीर्ती गमावशील, रणांगण सोडून पाळलेला हा काळिमा लागेल, आणि धर्माचरण न केल्याचं पाप ही.. अपकीर्ती, अपयश, अपमान ह्याहून अधिक दुःखकर ते काय?.. अशी दुष्कीर्ती मृत्यूपेक्षा ही भयंकर!.. सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय ह्याचा विचार न करता कर्तव्यासाठी युद्ध कर.. रणभूमीवर मारला गेलास तर स्वर्गप्राप्ती होईल किंवा विजयश्री मिळवून पृथ्वीचं साम्राज्य उपभोगशील, त्यामुळं उठ आणि दृढनिश्चयी होऊन युद्ध कर..  

अर्जुनानं युद्धस्थ व्हावं म्हणून श्रीभगवानांनी आत्तापर्यंत सृष्टीची उत्पत्ती, शरीर आणि आत्म्याचं स्वरूप, व्यक्तीचा स्वधर्म म्हणजेच *सांख्यबुद्धी ह्याबद्दल सांगितलं.. स्वधर्माचं पालन करताना कर्म कसं करावं, कर्मबंधनातून मुक्त कसं व्हावं हा मार्ग म्हणजेच कर्मयोग ते पुढं सांगतात.. 
हा मार्ग दृढनिश्चयी आणि एका ध्येयानं प्रेरित असा आहे.. ज्ञानी, विचारी कधी कधी वेदांतील अलंकारिक शब्दांवर आसक्त होऊन स्वर्गाप्रत जाण्यासाठी निरनिराळी *सकाम कर्मे करून चांगला जन्म, शक्ती मिळवून ऐश्वर्यशाली जीवन, इंद्रियतृप्तीची इच्छा करतात.. आणि असे जे इंद्रियतृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात आसक्त आहेत, मोहित आहेत ते दृढनिश्चयी होऊ शकत नाहीत..    

ही सर्व *सकाम कर्मे, भौतिक कार्यें भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या क्रिया आणि प्रतिक्रियांमुळं घडतात.. भौतिक शरीराचं अस्तित्व जोपर्यंत आहे तो पर्यंत हे घडत राहणार.. पण सर्व भौतिक द्वंद्वातून मुक्त होऊन, लाभ-संरक्षण-काळजी ह्यातून मुक्त होऊन ह्या त्रिगुणांच्या पलीकडं स्थित होण्यासाठी श्रीभगवान कर्म कसं असावं हे सांगतात.. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि॥.. म्हणजेच, फलाची अपेक्षा न करता, धर्म आणि कर्तव्य म्हणून कर्म करायचं.. यश-अपयश ह्याकडं समभावानं पाहून, यश-अपयशाचा विचार न करता कर्म करायचं.. आणि ह्या समभावालाच योग असं म्हणतात.. आणि असं योगयुक्त होऊन कर्म केल्यानं कर्मफलापासून मुक्ती मिळते.. जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन भौतिक सुखदुःखापलीकडील स्थानाची भगवद्धमाची प्राप्ती होते.. योगयुक्त कर्म केल्यानं बुद्धी-मन स्थिर होतं.. वेदांतील अलंकारिक भाषेनं ते विचलित होत नाही.. परिणामी आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित होऊन दिव्य भावनेची प्राप्ती होते.. 

योगयुक्त कर्म करून ज्याची बुद्धी-मन स्थिर झालं आहे, जो समाधिस्थ झाला आहे त्याला काय म्हणतात? त्याची लक्षणं काय आहेत? तो वागतो बोलतो कसा? त्याला कसं ओळखावं? असे अनेक प्रश्न अर्जुनाला पडतात..    
.. तर, ज्याची बुद्धी स्थिर आहे, इंद्रियतृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केल्यानं ज्याचं मन आत्मसंतुष्ट आहे त्याला 'स्थितप्रज्ञ' म्हणतात.. 
ज्याला आत्मशांतीसाठी दुसऱ्या कशावरच अवलंबून रहावं लागत नाही तोच आपल्या वासनांचा त्याग करू शकतो.. जो दुःखानं विचलित होत नाही, दुःखी होत नाही किंवा सुखानं हर्षोल्हासित होत नाही, सुखप्राप्तीसाठी झटत नाही.. जो काम, क्रोध, भय, मोह एकाच भावनेनं पाहतो त्याचीच बुद्धी स्थिर राहू शकते.. शुभ-अशुभ, चांगलं-वाईट कशाशीच त्याचं ममत्व नसतं.. तो नेहमी आत्मचिंतनात मग्न असतो.. असा स्थिरबुद्धी स्थितप्रज्ञ, कासव जसं त्याचे अवयव कवच्यात समेटून घेतं तसंच तो त्याची इंद्रियं सर्व विषयसुखांपासून अलिप्त ठेवून आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवतो.. 

इंद्रियं इतकी प्रबळ आणि उच्छृंखल असतात कि त्यावर ताबा मिळवणाऱ्या मनाला बळजबरीनं खेचून नेतात.. मग विषयसुखांच्या आसक्तीमुळं काम उत्पन्न होतो आणि कामातून क्रोध.. क्रोधातून मूर्खपणा आणि मूर्खपणातून स्मृतिनाश.. स्मृतिनाशातून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशातून सर्वनाश.. त्यामुळं इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचं संयमन करून मनाला दृढपणे स्थिर करावं लागतं.. मग हे स्थिर होणं भगवंताठायी, भगवंत सेवेमध्ये असेल किंवा कोणत्या कार्यांत.. मनाचं असं स्थिर होणं म्हणजे एकाग्रता.. स्थिर होऊन एकाग्रतेनं काही करणं म्हणजे समाधिस्थ होणं.. अशा प्रसन्न भावनेमध्ये भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात आणि बुद्धी स्थिर होते.. 

अशा स्थिरबुद्धी साधकानं ताब्यात ठेवलेल्या इंद्रियांनी विषयसुखांचा उपभोग घेतला तरी तो अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करतो.. कारण अश्या साधकाकडं इंद्रियतृप्तीची इच्छा-मोह, स्वामित्वाची भावना-मिथ्या अहंकार नसतो.. मी-माझं ह्यातील द्वंद्व त्यानं संपवलेलं असतं आणि असा साधकच वास्तविक शांती प्राप्त करू शकतो.. ह्या स्थितीला श्रीभगवान *'ब्राह्मी स्थिती' म्हणजेच 'आध्यत्मिक स्थिती' असं म्हणतात.. ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली कि मोह संपतो.. जिवंतपणी मोक्षाचा अनुभव मिळतो आणि मृत्यूनंतर भगवदधाम म्हणजेच ब्रह्मत्वाची प्राप्ती होते.. 

.. आणि इथं दुसऱ्या अध्यायाची सांगता होते.. भगवदगीतेच्या तत्वज्ञानातील हा पहिला अध्याय असला तरी संपूर्ण गीतेचं सार सांगणारा आहे.. आत्मा, अंतरात्मा, परमार्थ, ब्रह्मत्व या बरोबरच कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग ह्यावर भाष्य करणारा आहे..
भावनिक गुंतागुंतीत गुरफटलेल्या अर्जुनाला जे तुझ्या हातात नाही, तुझ्या मर्यादेच्या पलीकडं आहे त्याचा विचार न करता तुझ्या नियंत्रणात जे आहे त्याचा विचार कर... म्हणणेच युद्धाच्या परिणामांचा विचार न करता कर्तव्य पालन कर.. स्वधर्माचे पालन करताना स्थितप्रज्ञाप्रमाणं भावनांवर अंकुश ठेव आणि ध्येयापर्यंत पोच.. हे सांगताना श्री भगवान शाश्वत सुखाचा मार्ग ही दाखवतात.. 
शाश्वत सुख हवं असेल तर शाश्वत आणि क्षणिक काय हे जाणलं पाहिजे.. 'सांख्य' तत्वानुसार दृश्य सृष्टी ही क्षणिक तर आत्मा शाश्वत असतो.. क्षणिक सृष्टीचा भाग असणारे आपण जोपर्यंत क्षणिकातून बाहेर येत नाही तोवर शाश्वत सुख मिळणार नाही.. क्षणिकातून बाहेर येणं म्हणजे क्षणिकांत गुंतवणारं सुख आणि दुःख ह्यातून बाहेर येणं.. सुख-दुःखातून बाहेर येणं म्हणजे ह्याकडं समभावानं पाहणं.. समभाव हवा असेल तर इंद्रियांवर संयम हवा.. इंद्रियावर संयम म्हणजे मनावर ताबा.. मनावर ताबा म्हणजे बुद्धीनं मनावर विजय मिळवणं.. आणि असा जो विजय मिळवतो तो स्थितप्रज्ञ..
असा स्थितप्रज्ञ शाश्वत सुखाच्या मार्गावर असतो कारण तो ते सुख बाहेर न पाहता स्वतःत पहातो.. म्हणून त्याला त्याच्या कर्माची फलं बाधत नाहीत.. सुखदुख:च्या पलीकडं जाऊन भगवंताशी एकरूप होणं त्याला जमतं.. आणि तो ब्रह्मत्वाला पोचतो..     

अडकलो मी सख्या कोंडीत धर्म-अधर्माच्या 

आर्जव तुज होऊन गुरु काढ बाहेर दुविधांच्या 

असेन मी नपुंसक, नसेल वर्तन वीरा शोभनीय 

धर्म-कर्मा मारणे आप्तेष्ट असे मज अकलनीय ।।१।।


पार्था, भाष्य जरी तुझे विद्वानाचे नसशी तू विद्वान 

विद्वान खरा असे ज्याला शरीर आत्म्याचं ज्ञान 

शरीर असे नाशवंत तर आत्मा चिरंतर 

मारलेस तू कोणा जरी आत्मा असे अमर ।।२।।


बाल-तारुण्य-वृद्ध-मरण अशी शरीर स्थित्यंतर 

मृत्यूनंतर करतो धारण आत्मा एक नवीन शरीर

आत्मा-आत्मतत्व अंतिम सत्य आहे जे शाश्वत  

ह्या अविनाशी चैतन्याचा ध्यास धरती विचारवंत ।।३।।


करावे धर्म-कर्म पालन त्यागूनी कर्म फलांची आशा  

पहावे यश-अपयश समभावे त्यजुनी इंद्रियतृप्तीची इच्छा  

कर्मबंधने होशी मुक्त करता हे योगयुक्त धर्म-कर्माचरण 

जन्म-मृत्यूचा टळून फेरा मिळते भगवदधाम निश्चित जाण ।।४।।


जाणूनी हा 'सांख्ययोग' प्रभुमुखातून

होऊ स्थितप्रज्ञ ठेवून स्थिरबुद्धी इंद्रिय संयमातून 

मिळेल आत्मशांती संपता द्वंद्व शाश्वत अन क्षणिकाचे 

होईल ब्रह्मत्व प्राप्ती पाहता अंतरी स्वरूप भगवंताचे ।।५।।



हरी तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

********************  

 


*भगवान : संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल, संपूर्ण यश, संपूर्ण सौंदर्य, संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य यांनी युक्त म्हणजे भगवान- असं भगवान ह्या शब्दाचं स्पष्टीकरण आचार्य पराशर मुनी यांनी केलं आहे..   

*भौतिक प्रकृती : निसर्गातील भौतिक घटक पृथ्वी, पाणी, हवा, अग्नी आणि आकाश, आणि त्यांचे गुणधर्म..

*सांख्य : सांख्य हे एक तत्व आहे.. सांख्यतत्त्वाच्या मते हे ब्रह्माण्ड दोन तत्वांनी बनलंय.. एक अविनाशी तत्व 'पुरुष' म्हणजेच चैतन्य/आत्मा आणि दुसरं विनाशी तत्व 'प्रकृती'.. पुरुष आणि प्रकृतीच्या संयोगानं सृष्टीचं सृजन होतं.. नश्वर शरीर नष्ट झालं की आत्मा मुक्त होऊन अविनाशी तत्वात सामावतो.. 

*सकाम कर्म : फलांच्या (परिणामांच्या) इच्छेनं केलेलं कर्म 

*ब्राह्मी स्थिती : भौतिक बंधनातून मुक्तता


-मी मधुरा.. 

************************************************

Sunday, August 3, 2025

चढाई 'माऊंट सेंट हेलन्स'ची.. (उत्तरार्ध )



 'माऊंट सेंट हेलन्स चढणं' हे ट्रेकर्स वर्ल्ड मधलं मानाचं पान.. एकतर जिवंत ज्वालामुखीमुळं निर्माण झालेलं वलय आणि दुसरी त्या ट्रेकची कठीणता.. 

वॉशिग्टन स्टेटच्या नैऋत्य दिशेला (SouthWest) स्थित हा पर्वत पोर्टलँडपासून दीड तासाच्या अंतरावर तर सिएटल पासून साधारण साडेतीन तासाच्या अंतरावर आहे.. 
पॅसिफिक नॉर्थवेस्ट भागातल्या बाकी ट्रेक्सपेक्षा खूप वेगळा असणारा हा ट्रेक.. समर आणि विंटर दोन्ही सिझन करता येणारा.. समर मध्ये कठीण पण नॉन टेक्निनल तर विंटर मध्ये पूर्णपणे टेक्निनल क्लाइंब.. दोन्ही सीझनसाठी दोन वेगळे मार्ग.. 

समर सीझनसाठी मॉनिटर रिज ट्रेल, जो क्लाइंबर्स बिव्होक येथून सुरू होतो.. जाऊन येऊन १० मैल.. आणि ४५९८ फूट उंच इतकी चढाई.. थोडक्यात अशक्य उंच चढ.. strenuous hike मध्ये याची गणना होते.. 
हा ट्रेल तीन भागात विभागलेला आहे.. 
  • Ptarmigan Trail.. जो फॉरेस्ट मधून जातो.. साधारण २ मैल अंतराचा हा ट्रेल १००० फूट चढाईचा आहे.. 
  • Boulder Fields.. मोठमोठ्या दगड-धोंड्याचा ट्रेल.. अवघड असा साधारण २ मैलाचा हा ट्रेक २५०० फूट चढाईचा आहे.. 
  • Ash Field.. ज्वालामुखीच्या राखेचा भूभाग.. साधारण १ मैलाचा हा भुसभुशीत राख आणि वाळू मिश्रित ट्रेल १००० फूट चढाईचा आहे.. 
हा ट्रेल चढायला साधारणपणे ५ ते ६ तास लागतात आणि तितकेच उतरायला ही!..  


मॉनिटर रिज ट्रेल चढण्यासाठी ऍथलिट असायची, प्रोफेशनल क्लाइंबर असायची आवश्यकता नाही.. पण तरीही इतका कठीण नक्कीच आहे कि जिथं चांगलाच कस लागेल.. त्यामुळं प्रॉपर ट्रेनिंग, mental physical फिटनेस, ट्रेकिंगची-हाइकिंगची सवय आवश्यक आहे.. असं म्हणतात Hiking is often a mental game.. मन स्ट्रॉंग असेल तर कल्पनेपलीकडंच्या, ताकदीपेक्षा जास्त गोष्टी ही साध्य करता येतात.. 

माऊंट सेंट हेलन्स चढण्यासाठी लागणाऱ्या परमिटमुळं ही ह्या ट्रेक ला आगळं वेगळं महत्व प्राप्त झालंय.. प्रत्येक दिवशी १०० लोकं म्हणजे १०० परमिट्स मिळतात.. महिन्याच्या एक तारखेला ती ओपन होतात आणि पुढच्या ५-१० मिनिटात सोल्ड आऊट ही होतात.. त्यामुळं एक महिना आधीपर्यंत तुम्हाला माहिती ही नसतं की तुम्ही कोणत्या दिवशी ट्रेक करणार आहात, किती दिवस ट्रेनिंगसाठी आहेत.. महिना ठरवून त्यातील शक्य असणारे, अजिबात शक्य नाही असे दिवस आधीच ठरवावे लागतात.. ग्रुप लीडरला हे परमिट घ्यावं लागतं त्याच्या ग्रुप मधल्या मेम्बरच्या नावासकट.. ग्रुप मेंबर्स बदलले तरी चालतात पण ग्रुप लीडर नाही.. ग्रुप लीडरला काही कारणास्तव शक्य झाले नाही तर पूर्ण ग्रुप कॅन्सल होतो.. कॅन्सल झालेले मेंबर्स, ग्रुप परमिट्स परत विकली जातात.. त्यामुळं परमिट मिळालं नाही तरी खचून न जाता रोज अपडेट्स पहात राहायचं.. आमच्या ग्रुप मध्ये माझ्या एका मैत्रिणीच्या नवऱ्याची एन्ट्री अश्याच एक कॅन्सल मेंबर परमिटमुळं झाली.. ते ही आधी दोन आठवडे.. 


.. कोण येणार कोण नाही, जुलै का ऑगस्ट करता करता शेवटी जुलै महिन्यात परमिट मिळतंय का पहायचं आणि नाही मिळालं तर ऑगस्ट मध्ये परत प्रयत्न करायचा असं ठरलं.. जुलै ऑगस्ट समर ट्रेल साठी खूपच पॉप्युलर असल्यानं परमिट मिळेलच ह्याची खात्री नव्हती.. जुलैच्या सुरुवातीला परमिट मिळालं तर मला फक्त ४-५ आठवडेच ट्रेनिंगसाठी मिळणार होते.. त्यामुळं जुलैच्या शेवटच्या आठवडा सगळ्यांसाठी योग्य होता.. आणि नशिबानं २९ जुलैच परमिट आम्हाला मिळालं.. 



The 29th Jully, It is! 
  
आता माझ्याकडं जूनचे ४ आठवडे आणि जुलैचे चे ४ आठवडे असे ८ आठवडे ट्रेनिंगसाठी होते..  

वर्षभर तसं माझं ट्रेनिंग सुरूच असतं.. जिमला जाणं, वजनं उचलणं मला मनापासून आवडतं.. आठवड्यातून २ दिवस वेट ट्रेनिंगसाठी मी ट्रेनरकडं जाते.. १ दिवस योगा, २ दिवस मशीनवर कार्डिओ आणि वीकेंडला long walks.. हे वर्षभर सुरूच असतं.. पण सेंट हेलन्स साठी लागणारा हायकिंगचा सराव माझ्याकडं नव्हता.. 

८ जून ला नाटकाचा प्रयोग झाल्यावर लगेचच मी हायकिंग ग्रुप जॉईन केला.. आणि १३ जूनला पहिली प्रॅक्टिस/ट्रेनिंग हाईक केली.. किंग्स माउंटन.. पहिलीच हाईक ती ही very challenging one.. ही हाईक करण्यासाठी हायकर्स प्रॅक्टिस हाईक करतात.. माझ्यासाठी ही हाईक 'मैं कितने पानी में हूँ' हे जोखण्यासाठी होती.. in and out 5 miles with 2500 foot elevation gain.. very steep but gradual gain.. ५ तासात ही हाईक पूर्ण केल्यावर कॉन्फिडन्स वाढला.. 

सेंट हेलन्स साठी अश्याच प्रॅक्टिस हाईकची गरज होती.. ते ही खांद्यावर ४-५ किलोचं वजन म्हणजे ४ लिटर पाणी, स्नॅक्स, लंच, लाईट जॅकेट इत्यादी इत्यादी असलेली सॅक घेऊन.. अक्टऊल ट्रेकच्या दिवशी लागणाऱ्या सामानाची लिस्ट बरीच मोठ्ठी होती..  
त्यानंतर प्रत्येक आठवड्याला कधी पिटॉक मॅन्शन-रोझ गार्डन, फ्लिकर-मार्कम हिल-कौन्सिल क्रेस्ट अश्या फॉरेस्ट पार्क, वॉशिंग्टन पार्क मधल्या ५-६ मैलाच्या २५०० उंच चढ असणाऱ्या छोट्या हाईक्स केल्या तर कधी मोठ्या challenging हाईक्स केल्या..   
टेबल माउंटन वॉशिंग्टन.. १२ मैल प्लस.. ३५०० फूट चढाई 
डॉग माउंटन वॉशिंग्टन.. ६ मैल प्लस.. ३००० फूट चढाई 
एन्जल रेस्ट ड्रॅगन रेस्ट.. १० मैल प्लस.. ३१०० फूट चढाई 

वजा दोन आठवडे.. 
कोणत्याही इव्हेंटसाठी शॉपिंग हा एक आनंददायी अनुभव असतो.. ऑनलाईन शॉपिंगमुळं ह्या अनुभवात नक्कीच बदल झालाय.. पण मैत्रिणी एकत्र आल्यात आणि शॉप्पिंगचे किस्से नाहीत हे अशक्य.. एकसारखे टी शर्ट, एकसारखे गॉगल्स खरेदी तर मस्ट.. ह्यापासूनच खरेदीचा श्री गणेशा झाला.. 
ह्या ट्रेकसाठी काही 'खास हव्यातच' अश्या गोष्टी होत्या.. उदाहरणार्थ, शेवटच्या पॅच मध्ये बुटात वाळू जाऊ नये म्हणून गेटर्स, पहाटे ट्रेकला सुरुवात करायची म्हणून हेड टॉर्च, मोठमोठ्ठे खडक दगड धोंडे चढताना हाताला इजा होऊ नये म्हणून गार्डन ग्लोव्हस..

एकदा ट्रेकचा फॉरेस्टचा भाग संपला कि बाकी सगळा ट्रेक उजाड असल्यानं जुलै ऑगस्ट मध्ये हायकिंग म्हणजे उन्हाचा त्रास.. म्हणून सकाळी सूर्योदयापूर्वीच ट्रेकला सुरुवात करायची कि जेणेकरून सूर्य डोक्यावर यायच्या आत ट्रेक पूर्ण होईल.. कधी, कोणाकडं, किती वाजता भेटायचं, कोण गाडी चालवणार हे सगळं नियोजन ही झालं.. आणि ग्रुप मध्ये सर्प्राइझिंग एन्ट्री झाली.. मैत्रिणीच्या नवऱ्याची!.. त्यानं स्वखुशीनं ड्रायव्हिंगची जबाबदारी घेतली.. 


The Day! 29th July.. 

पहाटे चारच्या सुमारास चढायला सुरुवात करायची ह्या हिशोबानं पहाटे अडीच वाजता गाडीला स्टार्टर मारायचा ठरवला.. पण निघे निघे पर्यंत तीन वाजलेच.. रोड कंडिशन्स, रस्त्याची कामं ह्यामुळं क्लाइंबर्स बिव्होक ट्रेल-हेड ला पोचायला पावणे पाच झाले..
निरभ्र आकाशात लुकलुकणारे तारे आज कितीतरी दिवसांनी पाहिले.. 
एकदम शांत अशी ही कॅम्प साईट.. कॅम्प साईट कसली जंगलातच झाडांच्या खाली गाड्यांचं पार्किंग.. आणि आत झाडीत ट्रेकर्सचे टेन्ट्स.. ना पाण्याची सोय ना लाईटची.. पण टॉयलेटची सोय मात्र आहे.. हे एकुलते एक टॉयलेट.. नंतर ट्रेक करून परत खाली येई पर्यंत कोणतीही सोय नाही.. शॉर्ट बिझनेस ट्रेलवर करायचा आणि बिग बिझनेस साठी स्वतःच्या पूप बॅग्स कॅरी करायच्या..   
मधूनच येणारा किड्यांचा आवाज.. हेडलाईट लावून ट्रेकच्या तयारीत असणारे ट्रेकर्स.. आणि आमच्या गप्पा ह्यांनीच काय ती शांतता भंग होत होती..


सकाळी ५:१० 


क्लाईम्बर्स रजिस्ट्रेशन लॉगबुक मध्ये आमची नावं, परमिट नंबर, गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर लिहून एन्ट्री केली.. 
आणि 'मोरया' म्हणून ट्रेकला सुरुवात.. 

PC Prasad


कपाळावर हेडलाईट्स लावून, हातात वॉलकिंग पोल्स घेऊन अंधारात फोटो काढण्याचा अयशस्वी प्रयत्न ही केला..   

सुरुवातीचा जंगलातून जाणारा हा दोन मैलाचा साधारणपणे १००० फूट उंचीवर नेणारा Ptarmigan trail.. हा ट्रेल करण्यासाठी परमिटची आवश्यकता नाही..  

हा ट्रेल न थांबता पूर्ण करून ब्रेकफास्टसाठी थांबायचं ठरलं..   



सव्वा सहाच्या दरम्यान सूर्योदय असल्यानं दिवस फुटायला सुरुवात झाली होती.. 

Mount Adam in the background
PC Supriya

Ptarmigan trail.. खूप सुंदर सिनिक ट्रेल.. 
त्यात सकाळच्या उगवतीच्या प्रकाशात दिसणारे बर्फाच्छादित पर्वत.. 
फोटो काढत, रमतगमत हा ट्रेल पूर्ण करायला पावणे दोन लागले.. 

सकाळी ७:००

निघाल्यापासूनचा पहिला ब्रेक..
सकाळपासून काहीही न झाल्यामुळं आता सणकून भूक लागली होती..

PC Supriya
 
ट्रेल संपल्या संपल्या समोर दिसते ते बोल्डर फिल्ड.. 


स्ट्रेचिंग, खाणं-पिणं, बायो ब्रेक असा २० मिनिटाचा मोठ्ठा ब्रेक घेऊन बोल्डर्स चढण्यासाठी सज्ज झालो..
  


PC Anjani
हे बोल्डर्स चढणं म्हणजे चढाईचा कहर आहे.. नेमका असा ट्रेल नसल्यानं लाकडी पोल मार्करवर लक्ष ठेवत आपणच आपला मार्ग काढायचा..
मोठ्ठ्या मोठ्या उंचीचे हे दगड चढताना दमछाक होते.. उंच आणि लांब ढांगा, अप्पर बॉडी आणि तोल सांभाळत चढत राहायचं.. हे बोल्डर्स जरी चॅलेंजिंग दमवणारे असले तरी चढताना मजा आली.. पण शेवटचा Weather Monitering Station पर्यंतचा पॅच संयमाची परीक्षा घेणारा होता.. 


दुसरा मोठ्ठा ब्रेक: १०-१५ मिनिट
Weather Monitering Station इथं बोल्डर्स फिल्ड संपून शेवटचा वोल्कॅनिक ऍशचा पॅच सुरु होतो असं वाचलं होतं.. पण त्या ही पुढं असणारे बोल्डर्स पाहून थोडी निराशा झाली.. लांबून फक्त बोल्डर्स आहेत असं दिसलं तरी बोल्डर्स आणि ऍश असं काहीसं असलेला हा पॅच.. दहा मिनिटातंच पुढं ऍश फिल्ड सुरु झालं.. 
सकाळी ७:२० दरम्यान सुरु झालेलं बोल्डर्स फील्ड साधारण पावणे दहाच्या दरम्यान संपलं.. २ मैल आणि २५०० फूट चढ ह्यासाठी ब्रेक धरून साधारण अडीच तास लागले.. 

सकाळी ९:४५

Climbing the Ash

बोल्डर्स सुरु झाल्यापासून लांबवर दिसणारी क्रेटरची रिम आता अगदी नजरेच्या टप्प्यात दिसत असली तरी अजुनी १ मैल लांब होती.. आणि तिथवर पोचण्यासाठी १००० फुटाचा चढ बाकी होता.. ज्यालामुखीच्या राखेतून आणि वाळूतून चढ चढणं खरोखरीच चॅलेंजिंग होतं.. आत्तापर्यंतच्या ट्रेक मधला शेवटचा आणि अतिशय अवघड भाग.. २-४ पावलं पुढं गेलं तरी एखादं पाऊल मागं यायचं.. कधीही न संपणारा असा हा चढ.. चढतच रहायचा.. जरा जोर देऊन भरभर चालायचा प्रयत्न केला तर तितकंच मागं यायला व्हायचं.. slow and steady with small strides हा मंत्र कामाला आला..  


शेवटची पाच पावलं.. काय असेल त्या रिम मागं? ह्या विचारात मी कधी रिमपाशी पोचले कळालंच नाही.. अवाक होऊन नुसती पहात उभी होते.. किती वेळ चढायला लागला हे आता गौण होतं.. नजरेचं पारणं फिटल्यावर ते विलक्षण विलोभनीय अद्भुत व्हीडिओत कैद करताना घड्याळाकडं नजर गेली.. ११ वाजत आले होते..  


Mt. St. Helen's Crater, Mt. Rainer at the back and Spirit Lake  


                                     crater view                                                360 view

पहिली उत्सुकता ओसरल्यावर, फोटो-व्हीडिओ रेकॉर्डिंग झाल्यावर, आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य पहात बरोबर आणलेल्या सॅन्डविचेसवर ताव मारला.. 
वरून ५००० फूट खाली पाहताना चढून आलेली ऍश, बोल्डर्स खूपच भयावह वाटत होते.. नेमकं काय काय करून वर आलोय आणि आता हे सारं उतरून परत जायचंय हा विचार ही नको वाटत होता.. शांतपणे गार वाऱ्यात इथंच पडून राहावं असं वाटत होतं.. 

क्रेटरकडं पाहताना निसर्गाच्या ह्या अद्भुत निर्मितीचं खूप अप्रूप्य वाटत होतं.. आजूबाजूला इतकी सुंदरता आणि ह्या सुंदरतेच्या मध्ये एक जिवंत लाव्हा डोम.. किती तरी सुंदर विलोभनीय गोष्टी आकार घेत आहेत, नवीन ग्लेशियर तयार होत आहेत ते ही एका विध्वंसक पटलावर.. 
एव्हरेस्ट पण तसंच.. अन्नपूर्णा पण सतत लॅण्डस्लाइडस होत असून सुद्धा सृजनशील आहे.. दोन विरुद्ध, दोन टोकाच्या गोष्टी, स्टार्क काँट्रास्ट एकत्र.. दोन्हीत तीच ऊर्जा पण हेतू निराळा.. खरंच खूप आश्चर्यचकित व्हायला होत असं काही पाहिलं की.. सत्याची जाणीव होते..
ह्या सगळ्या अवाढव्य अगणित अज्ञात रहस्यात आपण किती क्षुद्र, तुच्छ आणि एक इटुकला पिटुकला कण, अंश आहोत हे कळतं..
डोमकड पाहत शांत बसून होते.. कृतज्ञता होती फक्त.. त्याच्या आणि माझ्या असण्याची आणि मला ते अनुभवण्याची, पाहण्याची संधी मिळाल्याबद्दलची..
  


दुपारी १२:१०

सव्वा बाराच्या सुमारास खाली उतरायला सुरुवात केली.. ऍश वरून उतरताना मज्जा येत होती.. पण ब्लॉल्डर्सवरून उतरणं जड जात होतं.. वर चढून येताना दिसत असणारे लाकडी पोल्स वरून दिसत नव्हते.. ऑल ट्रेल्स मॅप पहात पहात, अंदाज घेत उतरावं लागलं.. बऱ्यापैकी उन्हाचा तडाखा ही जाणवत होता.. फॉरेस्ट ट्रेल पाशी आल्यावर हुश्श करत ब्रेक घेतला.. अडीच पावणेतीन तासात इथवर आलो होतो..  
आता अगदी शेवटचं २ मैल अंतर राहिलं होतं.. ते ही नेहमीच्या सरावासारखंच टेरेन असणारं.. पण दमल्यामुळं आणि आता झालंय ह्या निःश्वासात ह्या होम स्ट्रेच साठी दीड तास लागला.. 
दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी ऑफिशिअली ट्रेक संपला.. 

दुपारी ४:१०

अश्याप्रकारे पहाटे ५:१० ला सुरु केलेला ट्रेक ११ तासांच्या अखंड परिश्रमानंतर सफल संपूर्ण झाला.. 

Thank you Supriya, Anjani and Prasad for making this happen! ❤️
And Thank you for capturing these beautiful moments too! 💕


-मी मधुरा.. 

************************************************