साल २०००.. नोकरीसाठी पुन्हा एकदा चंबू गबाळ आवरलं.. आणि निघालो मुक्काम पोस्ट पोर्टलँडकडं..
त्यावेळी विमानातून पहिल्यांदा पाहिलेलं पोर्टलॅंड!.. इतकं पिक्चर परफेक्ट काही असू शकतं?! असेलच तर फक्त बी. आर. चोपडांच्या सिनेमात!.. टुमदार गाव जिथं हिरो हेरॉईन भेटतात, गाणं गातात, नाचतात आणि परत जातात.. डेट्रॉईट सारख्या सपाट आणि रुक्ष प्रदेशातून आलेल्या मला हे सारं स्वप्नवत वाटत होतं..
त्यावेळी विमानातून पहिल्यांदा पाहिलेलं पोर्टलॅंड!.. इतकं पिक्चर परफेक्ट काही असू शकतं?! असेलच तर फक्त बी. आर. चोपडांच्या सिनेमात!.. टुमदार गाव जिथं हिरो हेरॉईन भेटतात, गाणं गातात, नाचतात आणि परत जातात.. डेट्रॉईट सारख्या सपाट आणि रुक्ष प्रदेशातून आलेल्या मला हे सारं स्वप्नवत वाटत होतं..
डोंगर-दऱ्या, आकाशाशी स्पर्धा करणारी उंचच उंच गर्द हिरवीगार झाडं, ते वळणावळणाचे एकमार्गी अरुंद रस्ते अचानक येणाऱ्या बोगद्यातून जाणारे, ते नदीचं अवाढव्य पात्र आणि त्यावरचे सुंदर पूल, असंख्य धबधबे आणि ढगांशी लपंडाव खेळणारा बर्फाच्छदित माऊंट हूड.. कधीकधी मधूनच डोकावणारा बर्फाच्छदित मफीन टॉप माऊंट सेंट हेलन्स.. अहाहा.. निसर्गानं मुक्त हस्तानं हिरव्या निळ्या असंख्य रंगछटांची केलेली उधळणं.. आणि ह्या सौंदर्यात भर पडणारी पॅसिफिक महासागराची किनारपट्टी!..
आणि ठरवलं सपनोंका घरौंदा का बसेरा काय ते आता इथंच!..
आणि ठरवलं सपनोंका घरौंदा का बसेरा काय ते आता इथंच!..
..आणि मी पोर्टलँडकर झाले.. गेल्या पंचवीस वर्षात ह्या निसर्गसुखाचा मनसोक्त आस्वाद घेऊन सुद्धा अजुनी समाधान होत नाहीय.. दरवेळी ह्या डोंगरदऱ्यातून फिरताना काहीतरी विस्मयजनक पहायला, अनुभवायला मिळतंच..
नमनाला घडाभर कौतुक झालंय आता मूळ मुद्द्याकडं येते..
..तर माऊंट सेंट हेलन्सची चढाई..
माऊंट 'सेंट हेलन्स' पॅसिफिक नॉर्थवेस्टच्या मुकुटातला असा एक माणिक जो आपल्या पोटात जिवंत ज्वालामुखी घेऊन दिमाखात उभा आहे.. इथून दीड-दोन तासाच्या अंतरावर पण शेजारच्या वॉशिंग्टन राज्यात..
ह्या जिवंत ज्यालामुखी असणाऱ्या पर्वतराजाला भेट देण्याचा म्हणजे लांबूनच ऑब्झरवेटरी मधून पाहण्याचा योग यायला २००३ साल उजाडलं.. तसा ही तो लांबून अधूनमधून दिसत असतो पण तरी ही सगळे जातात तशी मी ही पहायला गेले.. टिकमार्क करणं असा काहीसा त्यावेळचा दृष्टीकोन..
नंतर २०१३ साली परत जेव्हा ऋचाला घेऊन गेले, तिथल्या लहान मुलांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी झाले, सेंट हेलेन्सचा इतिहास नव्यानं जाणून घेतला तेव्हा आपसूकच कुतूहल निर्माण झालं.. ह्या पर्वतावर चढाई करता येते हे कळल्यावर पुसटसं वाटून गेलं 'जायला काय हरकत आहे? जाऊया का?'.. पण लगेचच 'असला वेडेपणा कोण करेल?.. मी तर नाही बाबा..' म्हणून पाटी स्वच्छ केली.. त्यावेळी कुठं माहिती होतं Never say NO.. :)
चाळीशी माईलस्टोन बकेट लिस्ट करताना एकदा वाटलं 'सेंट हेलेन्सवर चढाई' लिहू का?.. पण जाऊदे, नकोच.. पुढं ही असं अनेकवेळा वाटलं पण 'जाऊदे' 'नकोच'ची टेप सुरू राहिली.. सेंट हेलेन्स आणि त्याची चढाई ह्याला असलेल्या काहीश्या नकारात्मक वलयामुळं असेल ही कदाचित..
एवरेस्ट बेस कॅम्प (EBC) ट्रेक नंतर मात्र 'सेंट हेलेन्सवर चढाई' च्या पुसटश्या वाटण्याला आकार आला.. माहिती काढणं, ट्रेक visualize करणं सुरु झालं.. आणि EBC च्या सोलो ट्रेक नंतर तब्बल तीन वर्षांनी 'सेंट हेलेन्सवर चढाई' हे मिशन मैत्रिणींच्या सोबतीनं हाती घेतलं..
'गोवा ट्रिप'चं जसं होत तसंच 'मिशन हेलन्स'च ही झालं.. जायचं तर आहे पण सगळ्यांच्या वेळा जमत नाहीत.. कोणी आज हो म्हणतं तर उद्या नाही.. शेवटी तिघी तर तिघी पण ह्यावर्षी 'मिशन हेलन्स' पूर्ण करायचा विडा उचलला..
.. पण हा विडा उचलणं माझ्यासाठी इतकं सोपं नव्हतं.. त्यामागचं नाट्य फ्लॅशबॅक मध्ये..
मिड फेब्रुवारी २०२५.. अडीच महिने भारतात राहून पोर्टलँडला आल्यावर पाहिलं तर इकडं ग्रुप मध्ये 'सेंट हेलन्स'च जोरदार वारं सुरु होतं.. 'अरे वाह.. सेंट हेलन्स.. मस्तच!.. बहुतेक ह्यावर्षी सेंट हेलन्स..' हा विचार मनात आला आणि ह्या विचाराबरोबरच अनेक प्रश्न ही.. अरे बापरे.. सेंट हेलन्स ट्रेक म्हणजे समर, म्हणजे जुलै-ऑगस्ट.. काय माहिती मी कुठं असेन?- भारतात, अबूधाबीत का अमेरिकेत?.. अमेरिकेत असेन तर नेमकी कुठे?- पोर्टलॅंड,ऑस्टिन का फ्लोरिडा?.. आणि इथं पोर्टलॅंड ला असेन तर ट्रेनिंगला कितपत वेळ मिळेल?.. हातात घेतलेलं निवेदनाचं काम, सुरु असलेल्या नाटकाच्या प्रॅक्टिसेस मधून ट्रेक्स करणं कसं शक्य आहे?..
मार्च संपत आला तरी मी कोणत्याच निर्णयाप्रत पोचले नव्हते.. एप्रिल ही असाच गेला.. मे उजाडला.. वाढदिवसासाठी मी फ्लोरीडाला ऋचाकडं.. बीचवर लाटांकडं पहात बसलेली असताना हे सगळं उकलताना दिसलं.. एकत्र सगळ्याचा विचार करून गोधळून जाण्यापेक्षा एक एक गोष्टीवर लक्ष दिलं तर.. 'सेंट हेलन्स चढायचा' हे ध्येय ठेवून जितकी शक्य असेल तितकी तयारी केली तर.. वेळ मिळेल तेव्हा ट्रेक्सना जायचं नाहीतर नेहमीच जिम रुटीन आहेच.. होईल.. 'manifestation'.. 'positive thinking'.. बस्स.. जे हातात आहे ते करू.. जे नाही त्याचा विचार कश्याला करायचा..
.. त्याच रात्री मी सेंट हेलन्स व्हाट्स अँप ग्रुपची सभासद झाले.. अभ्यासपूर्ण, संपूर्ण तयारीनिशी प्रत्येक गोष्ट करायची सवय असल्यानं ह्या ट्रेक बाबत मी जरा साशंक होते पण करूया गं आपण.. करशील तू.. ह्या मैत्रिणींच्या बोलण्यानं हुरूप आला.. 'मिशन हेलन्स' पूर्ण करायचा विडा उचलला..
८ जूनला नाटकाचा प्रयोग झाल्यावर, खऱ्या अर्थानं माझी ट्रेकिंगच्या तयारीला सुरुवात झाली..
(to be continued...)
-मी मधुरा..
************************************************
No comments:
Post a Comment