Friday, August 15, 2025

अध्याय २ 'सांख्ययोग'

श्रीपरमात्माने नमः 
अध्याय २ "सांख्ययोग" 
(गीतेचे सार)



कुरुक्षेत्रावर आप्तस्वकीयांना युद्धासाठी सज्ज पाहून अर्जुनाची गात्रं क्षीण होतात आणि त्याच्या मनात विचारांचं काहूर माजतं.. युद्ध केलं तर ते नक्कीच जिंकू पण त्या युद्धासाठी कितीतरी आप्तस्वकीय, निरपराध लोक मारली जातील.. राज्य उपभोगण्यासाठी, युद्धासाठीचा होणारा हा संहार त्याला मान्य नाही आणि युद्ध न करणं हे ही क्षत्रिय धर्माविरुद्ध.. ह्या विषादात असणारा अर्जुन 'हे युद्ध करण्यापेक्षा, दुर्योधनाकडून असा मी निहत्ता असतानाच मारला गेलो तर मला जास्ती आनंद होईल' असे म्हणून त्याच्या रथाच्या मागील बाजूस हताश होऊन बसतो.. आणि इथं पहिल्या अध्यायाची सांगता होते.. 
अश्या हताश झालेल्या अर्जुनाला त्याच्या शंकांचं समस्यांचं निराकरण करून युद्धासाठी, स्वधर्म पालनासाठी प्रेरित करण्याची सुरुवात दुसऱ्या अध्यायापासून होते..  

*'सांख्ययोग' अध्यायाच्या सुरुवातीलाच असंख्य विचार आणि दुविधांच्या कोंडीत अडकलेला अर्जुन, त्यातून बाहेर पाडण्यासाठी श्रीकृष्णाला आर्जव करतो आणि त्यांचं शिष्यत्व पत्करतो.. यांच्यातील गुरु आणि शिष्य संभाषणातून भगवदगीतेतील अगाध ज्ञानाचा उगम होतो.. म्हणून श्रीकृष्ण ह्या ज्ञानाचे आद्य अध्यात्मिक गुरु आहेत तर गीता जाणणारा अर्जुन प्रथम शिष्य आहे.. 
भगवदगीतेत ह्या आध्यत्मिक गुरूचा उल्लेख *'श्रीभगवान' असा केला आहे.. 'श्रीभगवान' म्हणजे परमसत्य.. परमात्म्याचं आणि निर्विशेष ब्रह्माचं उगमस्थान.. 

.. तर ह्या अध्यायात श्रीभगवान गोंधळलेल्या, स्वधर्म पालनाच्या मार्गावरून भरकलेल्या अर्जुनानं युद्धस्थ होण्यासाठी शरीर आणि आत्म्याचं स्वरूप, कर्माचं महत्व, बुद्धीचं स्थैर्य आणि ह्या ज्ञानानं येणारी स्थितप्रज्ञता सांगून शाश्वत सुखाचा मार्ग उभा करतात.. आत्म्याचा विकास हा परमार्थाचा पाया आहे.. आत्मा म्हणजे काय? कर्मयोग ज्ञानयोग म्हणजे काय? कर्माचा ज्ञानाशी संबंध म्हणजेच बुद्धियोग काय? परमार्थ कसा साधावा, ब्रह्मत्वापर्यंत कसं पोचावं.. हे सांगून ह्या अध्यायाची सांगता होते.. 

करुणेननं व्याकुळ झालेल्या, पाण्यानं डोळे डबडबलेल्या, निराशेच्या गर्तेत खोलवर जात असलेल्या अर्जुनाला त्याचा सखा, सारथी, समुपदेशक श्रीकृष्ण परखडपणे सांगतो कि हे नपुंसकासारखं, पुरुषत्वाला बाधा आणणारं त्याचं वर्तन त्याच्यासारख्या वीराला अशोभनीय आहे.. पण तरीही मनःशांती हरवलेला अर्जुन 'मी युद्ध करणार नाही' ह्यावर ठाम असतो.. पितामह, गुरु द्रोण यांच्यावर बाणांनी प्रतिहल्ला करणं केवळ अशक्य.. त्यांना मारून ऐश्वर्याचा भोग घेण्यापेक्षा भिक्षा मागणं श्रेयस्कर.. क्षत्रिय धर्म, कर्म यासाठी आप्तेष्टांना मारायचं?.. युद्ध जिकलं तरी आप्तेष्टांच्या अनुपस्थितीचं काय?.. धर्मतत्व आणि नीतिनियमांच्या ज्ञानावर आधारित अर्जुन अनेक युक्तिवाद करतो.. आणि शेवटी असहाय्य होऊन श्रीकृष्णाला निश्चित कल्याणकारी मार्गदर्शन करण्याची विनंती करतो.. श्रीकृष्णाचं शिष्यत्व स्वीकारतो..  

आता येथून पुढे गीताज्ञानाला सुरुवात होते..

अर्जुनाचा युक्तिवाद ऐकून श्रीभगवान म्हणतात की अर्जुना, तू एखाद्या विद्वानांप्रमाणे बोलतो आहेस खरा पण जो विद्वान आहे, ज्याला शरीर आणि आत्म्याचं ज्ञान आहे तो जीवित आणि मृतावस्थेबद्दल शोक करत नाही.. शरीर हे नाशवंत आहे, पण आत्मा चिरंतर आहे.. जे शरीर तू आपल्या बाणांनी विदीर्ण करणार आहेस ते शरीर नाश पावणारंच आहे, तू नष्ट केलंस तरी किंवा नाही केलंस तरी.. आत्मा हा अविनाशी आहे.. त्यामुळं असा कोणताच काळ नव्हता कि जेथं मी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे-महाराजे नव्हते किंवा भविष्यकाळ ही असा नसेल कि आपण कोणीच नसू.. आपण येतो आणि जातो.. जन्म-मृत्यूचं हे कालचक्र अखंडपणे सुरूच राहतं.. म्हणून तू गेलेल्यांचं आणि युद्धात मारले जाणाऱ्यांचं दुःख करू नकोस.. 

जसं बालपण-तारुण्य-वृद्धावस्था तसंच मरण.. ही झाली शरीराची स्थित्यंतरं.. ह्या शरीराच्या स्थित्यंतरामुळं जीवात्म्यात काहीही बदल होत नाही.. तो तसाच असतो आणि मृत्यूनंतर नवीन जन्मात नवीन शरीर धारण करतो.. जी सुखदुःख या शरीरापासून, इंद्रियांच्या जाणिवेपासून निर्माण होतात ती अटळ आणि विनाशी असतात.. ती भोगूनच संपवावी लागतात.. आणि हे जे जाणतात ते सुखदुःखांनी विचलित होत नाहीत.. असे ज्ञानी निश्चित मोक्षप्राप्ती करतात.. 

थोडक्यात, भौतिक शरीर म्हणजेच *भौतिक प्रकृती हे नश्वर तत्व आहे, असत आहे, ते चिरकाल टिकू शकत नाही.. भौतिक शरीर आणि मनामध्ये कितीही बदल झाले तरी जीवात्मा नित्य स्थायी राहतो.. म्हणून जीवात्मा म्हणजेच आत्मतत्व हे शाश्वत, निरंतर आणि अंतिम सत्य आहे.. भौतिक प्रापंचिक सुखदुःखातून बाहेर पाडण्यासाठी विचारवंत, ज्ञानी ह्या आत्मतत्वाचा, संपूर्ण शरीराला व्यापून टाकणाऱ्या अश्या ह्या अविनाशी चैतन्य तत्वाचा ध्यास धरतात.. ज्या चैतन्यानं सारं जग व्यापलं आहे.. हेच चैतन्य, हीच चेतना म्हणजे जीवात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा.. चैतन्य विरहित देह म्हणजे मृतदेह.. त्यामुळं नाशवंत शरीराच्या मोहापेक्षा चैतन्यमयी आत्माचं स्वरूप जाणणं आवश्यक आहे..

आत्मा हा पूर्ण ज्ञानमय आणि पूर्ण चेतनेनं युक्त असतो.. म्हणूनच चेतना हे आत्म्याचं लक्षण आहे.. 
आत्मा जन्म घेत नाही आणि मरत ही नाही.. आत्म्याला जन्म नसल्यामुळं त्याला भूत, वर्तमान, भविष्य ही नाही.. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा- निरंतर- आणि अनादि आहे.. तो मरत ही नाही किंवा मारला ही जात नाही.. शरीराचा नाश झाला तरी तो नाश पावत नाही.. जसं मनुष्य जुन्या वस्त्राचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो तसंच आत्मा निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो..  
आत्म्याचे ना शस्त्रानं तुकडे करता येतात, ना त्याला अग्नीनं जळता येतं, ना पाण्यानं भिजवता येतं, ना वाऱ्यानं सुकवता येतं.. आत्मा अभेद्य, अदाह्य, अक्लेद्य, अशोच तर आहेच पण तो सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि त्रिकाल राहणारा सनातनी आहे..  
आत्म्याला रंग, रूप, आकार नाही म्हणून तो अचिंत्य- चित्तानं चिंतन न करता येणारा- आहे.. तो विकाररहित आहे.. अव्यक्त आहे कारण इंद्रियांनी त्याला अनुभवता येत नाही..

त्यामुळं, आत्म्याचा वरवर विचार करून शरीराबद्दल शोक करू नकोस.. जो जन्माला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे.. म्हणून तुझ्या कर्तव्यपालनात तू असा शोक करणं योग्य नाही.. त्यामुळं हे भरतवंशजा तू युद्ध कर.. - असं श्रीभगवान अर्जुनाला सांगतात.. 

जोपर्यंत आत्मा शरीरात आहे तोपर्यंत त्याला धर्मतत्त्वानुसार नेमून दिलेलं कर्तव्य पालन, स्वधर्म पालन करावंच लागतं.. ह्या कर्तव्यपालनाचं स्वधर्मपालनाचं महत्व सांगताना श्रीभगवान म्हणतात.. क्षत्रिय धर्मानुसार युद्ध करणं, सर्व प्रकारच्या संकटांपासून प्रजेचं रक्षण करणं, कायदा सुव्यवस्था राखणं हे तुझं कर्तव्य आहे.. युद्ध ही क्षत्रियांसाठी नामी संधी असते.. युद्ध जिंकलंस तर राज्योपभोग आणि कर्तव्य पालन करताना हार जरी झाली तरी स्वर्गाची दारं खुली होतील.. पण हे युद्ध नाकारलंस तर एक वीर योद्धा म्हणून तुझी असलेली कीर्ती गमावशील, रणांगण सोडून पाळलेला हा काळिमा लागेल, आणि धर्माचरण न केल्याचं पाप ही.. अपकीर्ती, अपयश, अपमान ह्याहून अधिक दुःखकर ते काय?.. अशी दुष्कीर्ती मृत्यूपेक्षा ही भयंकर!.. सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय ह्याचा विचार न करता कर्तव्यासाठी युद्ध कर.. रणभूमीवर मारला गेलास तर स्वर्गप्राप्ती होईल किंवा विजयश्री मिळवून पृथ्वीचं साम्राज्य उपभोगशील, त्यामुळं उठ आणि दृढनिश्चयी होऊन युद्ध कर..  

अर्जुनानं युद्धस्थ व्हावं म्हणून श्रीभगवानांनी आत्तापर्यंत सृष्टीची उत्पत्ती, शरीर आणि आत्म्याचं स्वरूप, व्यक्तीचा स्वधर्म म्हणजेच *सांख्यबुद्धी ह्याबद्दल सांगितलं.. स्वधर्माचं पालन करताना कर्म कसं करावं, कर्मबंधनातून मुक्त कसं व्हावं हा मार्ग म्हणजेच कर्मयोग ते पुढं सांगतात.. 
हा मार्ग दृढनिश्चयी आणि एका ध्येयानं प्रेरित असा आहे.. ज्ञानी, विचारी कधी कधी वेदांतील अलंकारिक शब्दांवर आसक्त होऊन स्वर्गाप्रत जाण्यासाठी निरनिराळी *सकाम कर्मे करून चांगला जन्म, शक्ती मिळवून ऐश्वर्यशाली जीवन, इंद्रियतृप्तीची इच्छा करतात.. आणि असे जे इंद्रियतृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात आसक्त आहेत, मोहित आहेत ते दृढनिश्चयी होऊ शकत नाहीत..    

ही सर्व *सकाम कर्मे, भौतिक कार्यें भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या क्रिया आणि प्रतिक्रियांमुळं घडतात.. भौतिक शरीराचं अस्तित्व जोपर्यंत आहे तो पर्यंत हे घडत राहणार.. पण सर्व भौतिक द्वंद्वातून मुक्त होऊन, लाभ-संरक्षण-काळजी ह्यातून मुक्त होऊन ह्या त्रिगुणांच्या पलीकडं स्थित होण्यासाठी श्रीभगवान कर्म कसं असावं हे सांगतात.. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि॥.. म्हणजेच, फलाची अपेक्षा न करता, धर्म आणि कर्तव्य म्हणून कर्म करायचं.. यश-अपयश ह्याकडं समभावानं पाहून, यश-अपयशाचा विचार न करता कर्म करायचं.. आणि ह्या समभावालाच योग असं म्हणतात.. आणि असं योगयुक्त होऊन कर्म केल्यानं कर्मफलापासून मुक्ती मिळते.. जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन भौतिक सुखदुःखापलीकडील स्थानाची भगवद्धमाची प्राप्ती होते.. योगयुक्त कर्म केल्यानं बुद्धी-मन स्थिर होतं.. वेदांतील अलंकारिक भाषेनं ते विचलित होत नाही.. परिणामी आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित होऊन दिव्य भावनेची प्राप्ती होते.. 

योगयुक्त कर्म करून ज्याची बुद्धी-मन स्थिर झालं आहे, जो समाधिस्थ झाला आहे त्याला काय म्हणतात? त्याची लक्षणं काय आहेत? तो वागतो बोलतो कसा? त्याला कसं ओळखावं? असे अनेक प्रश्न अर्जुनाला पडतात..    
.. तर, ज्याची बुद्धी स्थिर आहे, इंद्रियतृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केल्यानं ज्याचं मन आत्मसंतुष्ट आहे त्याला 'स्थितप्रज्ञ' म्हणतात.. 
ज्याला आत्मशांतीसाठी दुसऱ्या कशावरच अवलंबून रहावं लागत नाही तोच आपल्या वासनांचा त्याग करू शकतो.. जो दुःखानं विचलित होत नाही, दुःखी होत नाही किंवा सुखानं हर्षोल्हासित होत नाही, सुखप्राप्तीसाठी झटत नाही.. जो काम, क्रोध, भय, मोह एकाच भावनेनं पाहतो त्याचीच बुद्धी स्थिर राहू शकते.. शुभ-अशुभ, चांगलं-वाईट कशाशीच त्याचं ममत्व नसतं.. तो नेहमी आत्मचिंतनात मग्न असतो.. असा स्थिरबुद्धी स्थितप्रज्ञ, कासव जसं त्याचे अवयव कवच्यात समेटून घेतं तसंच तो त्याची इंद्रियं सर्व विषयसुखांपासून अलिप्त ठेवून आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवतो.. 

इंद्रियं इतकी प्रबळ आणि उच्छृंखल असतात कि त्यावर ताबा मिळवणाऱ्या मनाला बळजबरीनं खेचून नेतात.. मग विषयसुखांच्या आसक्तीमुळं काम उत्पन्न होतो आणि कामातून क्रोध.. क्रोधातून मूर्खपणा आणि मूर्खपणातून स्मृतिनाश.. स्मृतिनाशातून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशातून सर्वनाश.. त्यामुळं इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचं संयमन करून मनाला दृढपणे स्थिर करावं लागतं.. मग हे स्थिर होणं भगवंताठायी, भगवंत सेवेमध्ये असेल किंवा कोणत्या कार्यांत.. मनाचं असं स्थिर होणं म्हणजे एकाग्रता.. स्थिर होऊन एकाग्रतेनं काही करणं म्हणजे समाधिस्थ होणं.. अशा प्रसन्न भावनेमध्ये भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात आणि बुद्धी स्थिर होते.. 

अशा स्थिरबुद्धी साधकानं ताब्यात ठेवलेल्या इंद्रियांनी विषयसुखांचा उपभोग घेतला तरी तो अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करतो.. कारण अश्या साधकाकडं इंद्रियतृप्तीची इच्छा-मोह, स्वामित्वाची भावना-मिथ्या अहंकार नसतो.. मी-माझं ह्यातील द्वंद्व त्यानं संपवलेलं असतं आणि असा साधकच वास्तविक शांती प्राप्त करू शकतो.. ह्या स्थितीला श्रीभगवान *'ब्राह्मी स्थिती' म्हणजेच 'आध्यत्मिक स्थिती' असं म्हणतात.. ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली कि मोह संपतो.. जिवंतपणी मोक्षाचा अनुभव मिळतो आणि मृत्यूनंतर भगवदधाम म्हणजेच ब्रह्मत्वाची प्राप्ती होते.. 

.. आणि इथं दुसऱ्या अध्यायाची सांगता होते.. भगवदगीतेच्या तत्वज्ञानातील हा पहिला अध्याय असला तरी संपूर्ण गीतेचं सार सांगणारा आहे.. आत्मा, अंतरात्मा, परमार्थ, ब्रह्मत्व या बरोबरच कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग ह्यावर भाष्य करणारा आहे..
भावनिक गुंतागुंतीत गुरफटलेल्या अर्जुनाला जे तुझ्या हातात नाही, तुझ्या मर्यादेच्या पलीकडं आहे त्याचा विचार न करता तुझ्या नियंत्रणात जे आहे त्याचा विचार कर... म्हणणेच युद्धाच्या परिणामांचा विचार न करता कर्तव्य पालन कर.. स्वधर्माचे पालन करताना स्थितप्रज्ञाप्रमाणं भावनांवर अंकुश ठेव आणि ध्येयापर्यंत पोच.. हे सांगताना श्री भगवान शाश्वत सुखाचा मार्ग ही दाखवतात.. 
शाश्वत सुख हवं असेल तर शाश्वत आणि क्षणिक काय हे जाणलं पाहिजे.. 'सांख्य' तत्वानुसार दृश्य सृष्टी ही क्षणिक तर आत्मा शाश्वत असतो.. क्षणिक सृष्टीचा भाग असणारे आपण जोपर्यंत क्षणिकातून बाहेर येत नाही तोवर शाश्वत सुख मिळणार नाही.. क्षणिकातून बाहेर येणं म्हणजे क्षणिकांत गुंतवणारं सुख आणि दुःख ह्यातून बाहेर येणं.. सुख-दुःखातून बाहेर येणं म्हणजे ह्याकडं समभावानं पाहणं.. समभाव हवा असेल तर इंद्रियांवर संयम हवा.. इंद्रियावर संयम म्हणजे मनावर ताबा.. मनावर ताबा म्हणजे बुद्धीनं मनावर विजय मिळवणं.. आणि असा जो विजय मिळवतो तो स्थितप्रज्ञ..
असा स्थितप्रज्ञ शाश्वत सुखाच्या मार्गावर असतो कारण तो ते सुख बाहेर न पाहता स्वतःत पहातो.. म्हणून त्याला त्याच्या कर्माची फलं बाधत नाहीत.. सुखदुख:च्या पलीकडं जाऊन भगवंताशी एकरूप होणं त्याला जमतं.. आणि तो ब्रह्मत्वाला पोचतो..     

अडकलो मी सख्या कोंडीत धर्म-अधर्माच्या 

आर्जव तुज होऊन गुरु काढ बाहेर दुविधांच्या 

असेन मी नपुंसक, नसेल वर्तन वीरा शोभनीय 

धर्म-कर्मा मारणे आप्तेष्ट असे मज अकलनीय ।।१।।


पार्था, भाष्य जरी तुझे विद्वानाचे नसशी तू विद्वान 

विद्वान खरा असे ज्याला शरीर आत्म्याचं ज्ञान 

शरीर असे नाशवंत तर आत्मा चिरंतर 

मारलेस तू कोणा जरी आत्मा असे अमर ।।२।।


बाल-तारुण्य-वृद्ध-मरण अशी शरीर स्थित्यंतर 

मृत्यूनंतर करतो धारण आत्मा एक नवीन शरीर

आत्मा-आत्मतत्व अंतिम सत्य आहे जे शाश्वत  

ह्या अविनाशी चैतन्याचा ध्यास धरती विचारवंत ।।३।।


करावे धर्म-कर्म पालन त्यागूनी कर्म फलांची आशा  

पहावे यश-अपयश समभावे त्यजुनी इंद्रियतृप्तीची इच्छा  

कर्मबंधने होशी मुक्त करता हे योगयुक्त धर्म-कर्माचरण 

जन्म-मृत्यूचा टळून फेरा मिळते भगवदधाम निश्चित जाण ।।४।।


जाणूनी हा 'सांख्ययोग' प्रभुमुखातून

होऊ स्थितप्रज्ञ ठेवून स्थिरबुद्धी इंद्रिय संयमातून 

मिळेल आत्मशांती संपता द्वंद्व शाश्वत अन क्षणिकाचे 

होईल ब्रह्मत्व प्राप्ती पाहता अंतरी स्वरूप भगवंताचे ।।५।।



हरी तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

********************  

 


*भगवान : संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल, संपूर्ण यश, संपूर्ण सौंदर्य, संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य यांनी युक्त म्हणजे भगवान- असं भगवान ह्या शब्दाचं स्पष्टीकरण आचार्य पराशर मुनी यांनी केलं आहे..   

*भौतिक प्रकृती : निसर्गातील भौतिक घटक पृथ्वी, पाणी, हवा, अग्नी आणि आकाश, आणि त्यांचे गुणधर्म..

*सांख्य : सांख्य हे एक तत्व आहे.. सांख्यतत्त्वाच्या मते हे ब्रह्माण्ड दोन तत्वांनी बनलंय.. एक अविनाशी तत्व 'पुरुष' म्हणजेच चैतन्य/आत्मा आणि दुसरं विनाशी तत्व 'प्रकृती'.. पुरुष आणि प्रकृतीच्या संयोगानं सृष्टीचं सृजन होतं.. नश्वर शरीर नष्ट झालं की आत्मा मुक्त होऊन अविनाशी तत्वात सामावतो.. 

*सकाम कर्म : फलांच्या (परिणामांच्या) इच्छेनं केलेलं कर्म 

*ब्राह्मी स्थिती : भौतिक बंधनातून मुक्तता


-मी मधुरा.. 

************************************************

No comments:

Post a Comment