Wednesday, March 7, 2018

मी स्वयंसिद्धा!!!

मी स्वयंसिद्धा!!!

आज ८ मार्च, जागतीक महिला दिन! महिलांच्या अधिकारांची, स्त्री पुरुष समानतेची दखल घेण्याचा दिवस! आजच्या भाषेत सांगायचे तर 'Super Women' ह्या किताबाचा गौरव सोहळा साजरा करण्याचा दिवस... त्यासाठी जगभरात सगळीकडे खास कार्यक्रम आयोजित केले जातात...  विविध क्षेत्रातल्या महिलांचे सत्कार- त्यांच्या मुलाखती , आरोग्य चाचण्या, योगाभ्यास, डाएट टिप्स, मेक ओहर  अश्या अनेक गोष्टीनी परिपूर्ण समारंभ आयोजित केले जातात... सगळीकडे नुसते उत्साहाचे वातावरण असते.. सोशल मीडियामुळे तर हा दिवस जरा जास्तच गाजत वाजत येतो..



शंभर वर्षांपूर्वी जेव्हा ह्या दिवसाची गरज भासली तो काळ आणि आज ह्यात नक्कीच फरक आहे.. आजची महिला कोठेही कमी नाही तर काकंणभर सरसच आहे... महिला दिनाचा संबंध केवळ स्त्री मुक्तीशी न लावता सखोल विचार करणे आवश्यक आहे. आजची स्त्री पारंपरिक बंधनातून मुक्त झाली तरी सुपर वूमन च्या जाळ्यात मात्र नक्कीच अडकलेली आहे. तेव्हा आजचा दिवस साजरा करताना, स्वतःला 'Super Women' सिद्ध करताना आपण आपल्याला, आपल्यातल्या स्त्रीला विसरून तर गेलो नाही ना? हे पाहणे जरुरीचे आहे. आपल्यातल्या स्त्रीला मुक्त करणे गरजेचे आहे.. तिला वेळ देणे गरजेचे आहे... आपल्या बिझी रुटीन मधून वेळ काढून आपण जिमला जातो, मित्र मैत्रिणींना भेटतो, शॉपिंगला जातो, ब्युटी पार्लरला जातो आणि  ह्याला स्वतःसाठी वेळ दिला असे ही म्हणतो.. पण खरंच हा वेळ स्वतःसाठी होता का? तर नाही.. हा वेळ स्वतःसाठी नसून Super Women मधल्या एका पत्राचा तो भाग होता. आपल्याला खरी गरज आहे ती एका 'क्षणभर  विश्रांतीची'...  एका  pause ची...  स्वतःला जोखायची , स्वतःला ओळखायची , स्वतःची पाठ स्वतः थोपटायची...  Super Women ह्या पलीकडे जाऊन स्वतःचा शोध घ्यायची...  आज ह्या महिला दिनाच्या निमित्याने एक संकल्प करूया .. आपण थोड्यावेळ थांबू या... स्वतःसाठी, स्वतःला ओळखण्यासाठी, स्वतःला appreciate करण्यासाठी वेळ देऊया.. आपले आत्मभान मिळवूयाचा प्रयत्न करूया .. दररोज असे काही क्षण, थोडा वेळ जर  आपण आपल्याला दिला तर मग प्रत्येक दिवस महिला दिन होईल..

मी एक लहानपणी गोष्ट वाचली होती..  'नाचणाऱ्या मोराची'... त्या गोष्टीतल्या छोट्या मुलीला नाचणारा मोर आपल्या अंगणात हवा असतो. हा मोर खूप स्वछंदी असतो.. आनंद लुटणारा असतो.. तो मोर तिला सांगतो तू आनंदाने नाचायला हवस तरच मी तुझ्याकडे येईन. ही मुलगी मोर आपल्या घरी यावा म्हणून आनंदाने राहायचा प्रयत्न करते. शेवटी मोराची वाट पाहणे ती विसरूनच जाते कारण आता तिला आनंदी राहण्यासाठी मोराची गरज नसते.. ती स्वतःच मोर बनून स्वछंदीपणे आनंदाने नाचत असते. आपल्याला मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायचं, आपल्याला जे हवं ते आपणच आपल्यात शोधायचं!! हा त्या गोष्टीचा मतितार्थ !!! तो एकदा समाजाला कि आत्मभान नक्कीच येत.. स्वयंसिद्धा नक्कीच होता येतं..

आपल्याला मनाच्या अंगणात नाचणारा मोर तर हवा असतो पण त्यासाठी आपणच मोर व्हायचं असतं हे मात्र बऱ्याच वेळा पार विसरून जातो. आपल्या नवऱ्यावर, मुलांवर, इतर सुहृदांवर प्रेम करताना आपण आधी आपल्यावरच प्रेम करणं गरजेचं असतं. दुसऱ्यांना भरभरून देताना आपण आपल्याला समृद्ध करत रहायचं असतं, नाहीतर आपल्याजवळ आहे ते इतरांना देऊन देऊन कधी ना कधीतरी रितेपणाचा अनुभव मनाला ग्रासून राहणारच असतो.

*"दुसऱ्यांसाठी जगताना स्वतःलाही वेळ देता यायलाच हवा. मुलांच्या निकोप वाढीविषयी आपण जितके जागरूक असतो, तितक्याच कसोशीने आपण  स्वतःच्या व्यक्तिमत्वाचीही वाढ जोपासायला हवी, मग अश्या कोणत्याही दिवसाची खास गरज वाटणार नाही आपण स्वयंसिद्धा आहोत हे सांगायला"*

Happy Women's Day!!!

-मी मधुरा...
८ मार्च २०१८

No comments:

Post a Comment