Sunday, May 10, 2020

हरवलेला 'मे' महिना..

मे महिना माझा अत्यंत लाडका महिना!.. कदाचित अस्मादिकांचे ह्या भूतलावर ह्याच महिन्यात अवतरण झाल्याने ही असेल ☺️ 

संपूर्ण वर्षातील नावानं लहान पण कर्मानं महान असलेला हा महिना!!.. मराठी असो वा इंग्लिश, व्याकरणाच्या आणि अक्षरांच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर 'मे' महिना सर्वात लहान.. पण मज्जा-मस्ती, धम्माल करण्यासाठी 'मे' महिना म्हणजे पर्वणीच.. ना शाळा, ना अभ्यास, कितीही मस्ती करा, कितीही खेळा-बघडा, छोटं-मोठठं, हवं-नको ते सारं करा.. 

अमेरिकेत 'मे' महिन्याला म्हणावं तसं महत्व नसलं तरी, मला तो हव्याहव्याशा भूतकाळात घेवून जातो..  

साधारण ३० एप्रिलच्या आसपास प्रगतीपुस्तक हातात पडायचं.. पालकांना अपेक्षित गुण मिळवून दाखवले कि ते खूश.. त्यावेळी त्यांच्या अपेक्षाही फारश्या नसायच्या म्हणा.. मग काय?.. बाहेर भर दुपारचं रणरणतं ऊन असो किंवा रात्रीचं टप्पोरं चांदणं.. घरांत पाय ठरायचा नाही.. लगोरी, डबाईस पाईस, गोट्या, भोवरा, क्रिकेट, टिकरी, विटी-दांडू, लपंडाव असे कितीतरी खेळ खेळून पालकांच्या नाकात दम आणायचो.. 

दुपारच्या वेळी कोणाकडं तरी अड्डा जमवून पालकांच्या झोपेचं खोबरं करण्यात तर हातखंडाच!.. उन्हात बाहेर खेळायचं नाही हे त्यांचं फर्मान तंतोतंत पाळायचो त्यामुळं त्यांची बोलती बंद.. कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, सापशिडी, नवा व्यापार ह्या बैठ्या खेळाबरोबरच आवळे, चिंचा, कैऱ्या, अंगणात असलेली वाळवणं यांचा फडशा पाडण्यात दुपार जायची.. ज्याच्याकडं अड्डा जमायचा त्याच्या घरी रसना, सरबताचे असंख्य डाग आम्ही असल्याची साक्ष देत असत.. हे सगळं माहिती असून ह्याकडं कधी कानाडोळा करून तर कधी ओरडायचा नुसता आव आणून खाऊची सोय कोण्या काकूनं किंवा आईनं केलेली असायची.. बैठे खेळ न आवडणारी माझ्यासारखी मंडळी पुस्तकं वाचत तिथंच पडीक असायची..

लहान मोठ्ठी सगळी मुलं-मुली एकत्र खेळायचो.. कधी कधी मुलं-मुली अशी भांडण ही होत.. आमच्या मुलींचा भातुकलीचा खेळ मांडला जायचा.. बाहुला बाहुलीचं लग्न तर मोठ्ठा सोहाळा.. ह्यात मुलं पण उत्साहानं भाग घेत.. बाहुला-बाहुलीना नवीन कपडे शिवण्यापासून ते फराळाचं करणं, सजावट, मंगलाष्टका, वरात सगळं उत्साहानं केलं जायचं.. कधी एखादी आज्जी भरतकाम, विणकाम शिकवे.. 

पाच वाजले कि भाड्यानं सायकल घेऊन गावभर भटकणं हा तर आवडीचा उद्योग.. ज्यांना सायकल चालवता येत नाही त्यांना सायकल शिकवणं आणि बदल्यात कधी 'गारेगार' कधी 'कुल्फी' ही कमाई खूप मोठ्ठी वाटायची..

संध्याकाळी घरी आल्यावर आजी कंपल्सरी आंघोळ करायला लावायची.. दिवसभर उन्हात तापवलेल्या पाण्याने अंघोळ (झळोणी) केली कि उन्हाळा बघत नाही असं तिचं म्हणणं.. शिजवलेल्या कैरीचा गर आणि उन्हात तापवलेलं पाणी.. काय मस्त वाटायचं  अंघोळ करायला.. एकदम फ्रेश.. मग शुभंकरोती म्हणून झाली कि सगळ्या मुलांची एकत्र जेवणं.. आपलं ताट घेऊन अंगणात जमायचं, चांदण्यात गप्पा मारत जेवताना नावडीची भाजी सुद्धा कशी पोटात जायची ते कळायचं सुद्धा नाही.. उन्हाळ्यात संध्याकाळी हमखास दिवे जायचे.. सिनेमाच्या गोष्टी रंगून रंगून सांगितल्या जायच्या विथ म्युझीक...

अंगणात ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत गाद्या टाकून झोपणं हा आनंदाचा उच्च्यांक!.. बिनाका ऐकून झाली कि भुताखेतांच्या गोष्टीना सुरुवात व्हायची.. चांदण्या एकमेकांना जोडून आकार तयार करत कधी झोप लागायची कळायचंच नाही..

जेव्हा मी माझ्या मुलीला ऋचाला अशी धम्माल मे महिन्या ऐवजी जुलै-ऑगस्ट महिन्यात तिच्या उन्हाळी सुट्टीत करताना पाहते, मनसोक्त, अल्लड होऊन बागडताना पहाते, अभ्यासाचं किंवा कोणत्याही कलासचं टेन्शन न घेता सुट्टी घालवताना पहाते तेव्हा मला माझा हरवलेला मे महिना 'जुलै-ऑगस्ट' मध्ये सापडतो.. 

ऋचा ही जुलै-ऑगस्ट महिन्याची आतुरतेनं वाट पाहत असते.. कधी एकदा भारतात आजी-आबांकडं मिरजेला जाते.. तो मळा, ती नदी, ती विहीर, ते वडाचे झाड आणि मनात वर्षभर जपलेली नाती.. हे सगळं अनुभवायला ती आतुरलेली असते.

                                                                                                    
-मी मधुरा.. 

************************************************

No comments:

Post a Comment