Tuesday, November 9, 2021

कालाय तस्मै नमः

कृष्णा पंचगंगेच्या तीरावर, वसलेलं माझं छोटसं गांव
मिरवत असते अभिमानानं, लावून त्याचे नांव 
विचारलंच कोणी तर सांगते,
हो, आवडतं मला माझं गांव, तेवढीच माझी त्याच्याशी नाळ.. 

ओलांडता पूल, लागेल खडकाळ वाट 
जाईल ती, हिरव्या शेतातून, दुतर्फा चिंचेच्या झाडातून.. 
पोहचेल थेट वेशीत..  
मग काढेल मार्ग गणपती, महादेव, विष्णू, मारुती, शाकंबरी देवतांच्या गर्दीतून..   
थबकेल जराशी, वाचनालयापाशी.. पोहचेल इतक्यातच माझ्या अंतरीच्या नाळेपाशी..  

दिसेल दिमाखात उभं.. माझं घर..  
काळ्याशार दगडाचं, रुपेरी गजाच्या दाराचं 
सुंदर रंगीत कमानींचं, सोप्यातील विश्वस्त झोपाळ्याचं 
बहरलेल्या अंगणाचं, दारापुढल्या तुळशी वृंदावनाचं..

स्वप्नवत असं माझं नांदत गोकुळ.. 
तीन पिढ्यांच्या नात्याचं, नात्यांच्या गुंतागुंतींच, 
भरलेल्या माणसांचं, येणाऱ्या जाणाऱ्या, अडल्या नडल्याचं
आबांच्या प्रेमळ धाकाचं,आजीच्या गोड गोष्टींचं आणि नित्यकर्माचं
आई-काकूच्या अथांग मायेचं, बाबा-काकांच्या भक्कम अधाराचं 
ताई-दादाच्या शीतल छायेचं, बहीण-भावंडांच्या रुसव्या फुगव्याचं..   

निगुतीनं विणलेलं, प्रेमानं फुलणारं  
सुख-दुःख्ख सगळं काही एकत्र वाटून घेणारं 
भुकेल्याला दाणा देणारं, मायेची उब पांघरणारं
रितीरिवाज, व्रतवैकल्याबरोबर माणुसकी जपणारं 
रामनाम, अन्नदान, भक्तिमार्ग ह्यातून परमार्थ साधणारं 

कालचक्राबरोबर माझं घर ही बदलत गेलं.. 
नवनवीन साज लेवत गेलं.. काही उतरवत गेलं तर नवीन काही चढवत गेलं.. 
आपुलकी, माणुसकीचा गाभा न सोडता, सगळे बदल स्वीकारत गेलं.. 
आबा-आजी मंडळी पडद्याआड गेली.. 
ओघानं आत्यांचं माहेरी येणं कमी झालं, भावंडांचं आजोळी येणं ही लांबत गेलं..
शिक्षणं, उद्योगधंदा, लग्न ह्यामुळं आम्ही मुलं घराबाहेर पडलो.. देश-विदेशात स्थिरस्थावर झालो..
शरीराच्या अंतराबरोबरच हळूहळू मनाची अंतरं ही वाढू लागली.. 
पण ही मनाची अंतरं कधी जाणवली नाहीत कारण घर ह्या नाळेशी आम्ही बांधले गेलो होतो..
सण समारंभ, सुट्ट्यांना तिथं भेटी व्हायच्या... 
लग्न, मंगळागौरी, डोहाळजेवणं, बारशी निमित्त्यानं परत गोकुळ नांदल्याचा आभास ही व्हायचा.. आणि गत आठवणींना उजाळा देत नवीन आठवणी निर्माण करायचा प्रयत्न ही.. यातूनच पुढच्या पिढीची सुद्धा घराशी नाळ जुळत गेली.. 
काळानुरूप बदलाशी जुळवून घेत आई-बाबा, काका काकू ही बाहेर पडले.. 
नांदत्या गोकुळाची स्वप्न पाहत माझं घर मात्र तिथंच उभं राहिलं.. 

एकदा भारतवारीत आईला म्हणाले.. चल घरी जाऊन येऊ, आजी-आबांना भेटून येऊ.. 
ते नसले तरी काय झालं? त्यांच्या आठवणीत थोडं विसावून येऊ.. 
पूल कधी ओलांडला, वेशीतून कधी आलो, मंदिरं कधी गेली काहीच कळालं नाही..
गाडी एका जीर्ण वास्तू समोर उभी राहिली.. 
कुलूप उघडल्यावर, कुरकुरत्या दरवाज्यानं आमचं स्वागत केलं.. भंगलेलं तुळशी वृंदावन पाहून मन उदास झालं.. 
खंगलेली झाड पाहून वाटलं, ह्यांना कधीच येणार नाहीत का फुल?
गंजलेले तावदान, कुजलेली खिडकी, धुळीने माखलेली भांडीकुंडी पाहून मन पिळवटून गेलं.. 
माझं घर.. माझी ओळख.. माझं बालपण.. माझी नाळ.. सगळं एका हुंदक्यानिशी धूसर झालं.. 
अचानक मला माझं घर एका तपस्वी योगी सारखं दिसू लागलं.. चांगला वाईट भूतकाळ स्वतःत सामावून घेऊन, वर्तमानात तेवढ्याच ताकतीनं उभा असलेला कर्मयोगी!
आणि माझं घर.. सरकारांचं घर.. ह्या वास्तूभोवतीची सारी वलयं, निदान माझ्या पुरती तरी, गळून पडली.. 
पिढ्यानपिढ्या अश्वथासारखा उभा असलेला वास्तूपुरुष 'शुभम भवतु' म्हणताना दिसू लागला.. आणि त्याच्याशी माझं वेगळं नातं जोडलं गेलं.. 

माझं घर, आता परत कात टाकतंय.. एखाद्या नागराजासारखी!... 
कात टाकताना होणाऱ्या वेदना, जखमा तनामनावर होतील ही.. पण त्यात नवनिर्मितीचा आनंद ही असेल.. 
अनेक नवीन कुटुंबं, आता ह्या वस्तूला जोडली जातील.. तिथं फुलतील, बहरतील.. छोट्या छोट्या गोकुळांचं नंदनवन होईल.. 
आणि खऱ्या अर्थानं माझं घर, 'माझं घर' न राहता सगळ्यांचा 'आधारवड' बनेल.. आणि 'शुभम भवतु' हा आशीर्वाद देत राहील.. 






-मी मधुरा.. 
९ नोव्हेंबर २०२१

Monday, October 18, 2021

तोच चंद्रमा नभात...

तोच चंद्रमा नभात... 




मानवी मनाला चंद्राची आणि त्यांच्या कलांची असलेली ओढ अगदी पुरातन काळापासून दिसून येते.. 'चंद्र हवा मज' ह्या रामाच्या बालहट्टापासून आणि चंद्रावर पहिलेवहिले पाऊल उमटविणा-या नील आर्मस्ट्राँगपासून ते समस्त कवी आणि लेखकांपर्यंत, सगळ्यांनाच ह्या शीतल चंद्राने जणू भुरळ घातली आहे.. हजारो लाखो वेळा या कवींनी, लेखकांनी चंद्राला बोलावून, चांदण्या तारे फुलवून, रात्री धुंद करून आपल्याला स्वप्ने पाहायला शिकवली तर कधी त्याला भाकरीची उपमा देऊन सामाजिक आर्थिक परिस्थितीचा आरसा दाखवला.. कधी मनोविश्लेषण करताना चंद्राच्या कलांशी थेट संबंध लावला तर कधी भरती-ओहोटीत दोन प्रेमीयुगलचा.. 

पण तरी ही चंद्राच्या मुलायम, शीतल, शांत स्पर्शातला प्रेमभाव आपल्याला जास्ती भावतो.. मग, बहिणीला त्याच्यात आपला लाडका भाऊ दिसतो तर मुलांना त्यांचा ‘मामा’.. कधी तो 'मेरे भैय्या को संदेसा पहुंचाना रे, चंदा तेरी ज्योत बढे'.. असं म्हणणाऱ्या बहिणीचा तो संदेशवाहक होतो तर कधी 'चंदा मामा मेरे द्वार आना, ले के किरणों के हार आना'...असं म्हणणाऱ्या भाचरांसाठी भेटवस्तू ही आणतो..
  
कधी प्रेमिकेला त्याच्यात आपला प्रियकर दिसतो तर कधी प्रियकराला प्रेमिका.. प्रेमात एरव्ही तिसरा, कबाब में हड्डी असला तरी, 'चंद्र आहे साक्षीला' म्हणत कधी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात तर कधी त्याच्याच पुढे 'ओ रात के मुसाफिर, चंदा ज़रा बता दे, मेरा क़ुसूर क्या है, तू फैसला सुना दे' असे गाऱ्हाणे मांडले जाते.. 'चंदा रे चंदा रे, कभी तो ज़मीं पर आ, बैठेंगे, बातें करेंगे' असे म्हणत कधी तो एकाकीपणाचा सोबती ही होतो.. 
 
कवी लेखकांच्या अंगाखांद्यावर खेळणारा हा चंद्र, आपल्या आयुष्याचा, आपल्या भावविश्वासाचा एक भागच.. ठायी ठायी भरून उरलेला.. प्रेम करायला, प्रेम निभावायला, आपल्याला हवी असते ती चंद्राची सोबत.. 

खूप दिवसांनी भेटलेल्या प्रियकरात मग तिला चंद्रच दिसतो.. 
तुम आये तो आया मुझे याद
गली में आज चाँद निकला
जाने कितने दिनों के बाद
गली में आज चाँद निकला 

आनंदाने मोहरलेल्या प्रेमिकाला पाहून दुनियेचा फेरफटका मारणाऱ्या चंद्रालाच तो विचारता झाला..  
मैंने पूछा चाँद से के देखा है कहीं
मेरे यार सा हसीन
चाँद ने कहा, चाँदनी की कसम
नहीं, नहीं, नहीं.. 

आणि तिच्या सौंदर्याची तुलना चंद्राशीच करायची गुस्ताखी ही करून बसला..   
चौदवीं का चाँद हो या आफ़ताब हो
जो भी हो तुम ख़ुदा की क़सम, लाजवाब हो.. 

खरं तर प्रेमिका इतकी सुंदर आहे कि चंद्राला ही तिचा हेवा वाटावा... 
चाँद आहें भरेगा
फूल दिल थाम लेंगे
हुस्न की बात चली तो
सब तेरा नाम लेंगे

प्रियकराच्या येण्यानं ही रात्र, हा समा कसा जादुई झालाय.. हे सगळं खूप हवंहवंसं वाटतंय.. 'रुक जा रात, ठहर जा रे चंदा' असं म्हणत ती चंद्राला थांबण्याची आर्जव करतीय.. आणि रेंगाळत चालण्याची मनधरणी ही..
धीरे धीरे चल चाँद गगन में 
अरे धीरे धीरे चल चाँद गगन में
कहीं ढल ना जाये रात, टूट ना जायें सपने 
अरे धीरे धीरे चल चाँद गगन में

अशी गोड मनधरणी करणारी प्रेमिका त्याला चंद्रासम दिसतीय.. अरे हे काय?.. "एक रात में दो दो चाँद खिले, एक घुंघट में, एक बदरी में".. हे ऐकून ती गोडशी लाजली अन तो बावरला... 
चाँद सा मुखड़ा क्यों शरमाया
आँख मिली और दिल घाबराया

काल रात्री काय घडले म्हणून उद्या चर्चा होईल.. ते काहीही असो आज तरी.. 
वह चाँद खिला वह तारे हांसे
यह रात अजब मतवारी है
समझने वाले समझ गए हैं
न समझे वह अनाडी हैं.. 

चंद्राची प्रत्येक कला ही मोहक आणि किती ही आपल्या भावविश्वाच्या जवळ जाणारी असली तरी खरा चंद्रोत्सव फुलतो, रंगतो, भावतो, स्मरतो तो कोजागरी पौर्णिमेलाच.. 'शारद सुंदर चंदेरी राती' आटवलेल्या केशरदुधात दिसणारा तोच चंद्र नवीन जागृतीचे, वैभवाचे, आनंदाचे रूप लेवून सोळा कलांनी फुलून येतो.. असा हा चंद्र प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या यामिनी सोबत सदैव राहो हीच सदिच्छा!! 

कोजागिरीच्या चांदणभर शुभेच्छा!!

-मी मधुरा.. 
१९ ऑक्टोबर २०२१



Friday, August 6, 2021

पदरावरती जर्तारीचा मोर नाचरा हवा..

आज ७ ऑगस्ट.. नॅशनल हॅन्डलूम डे.. 




वर्षभरात असे कित्त्येक दिवस येतात अन जातात ही.. 'काय एक एक फॅड' म्हणून आपण त्याकडं दुर्लक्ष ही करतो.. पण ह्या दिवसाकडं, माझं विशेष लक्ष वेधलं गेलं ते त्यातील 'हॅन्डलूम' ह्या शब्दामुळं.. हॅन्डलूम वरील माझ्या प्रेमामुळं.. नॅशनल हॅन्डलूम डे म्हणून ७ ऑगस्टच का? तर त्याला मोठठं ऐतिहासिक कारण आहे.. साधारण एकशे सोळा वर्षांपूर्वी, ७ ऑगस्ट १९०५ मध्ये कोलकत्तात स्वदेशी आंदोलन सुरु झाले.. परदेशी वस्तूंवर बहिष्कार आणि स्वदेशीचा अवलंब हे ह्या आंदोलनाचं स्वरूप होतं.. म्हणून हा दिवस..  
 
"हॅन्डलूम" ह्या शब्दाशी, माझी ओळख करून दिली ती माझ्या जावेनं, मंजिरीनं.. तिच्या साड्यांच्या व्यवसायानं.. (Manjiri Silks).. साडी आवडू लागली ती सासूबाईंमुळं आणि साड्यांवर प्रेम करू लागले ते मंजिरीमुळं असं म्हटलं तर वावगं होणार नाही.. लग्न करून मंजिरी घरी आली ती सोबत साड्यांची असंख्य दालनं  घेऊनच.. तिच्या बरोबर त्या दालनांमधून मनसोक्त फिरताना नानाविध साड्यांशी ओळख झाली.. साड्यांबद्दलचा तिचा अभ्यास, त्याचा आवाका पाहताना नवल वाटायचं.. नारायणपेठ, कांजीवरम, पैठणी, गडवाल, इरकल, कलमकारी अश्या अनेक साड्यांचे पोत तिच्यामुळं कळू लागले.. कस्टमर्सना साडी प्युअर सिल्क हॅन्डलूम आहे, किंवा हॅन्डलूम कॉटन आहे हे सांगताना हॅन्डलूम ह्या शब्दावर तिचा असणारा जोर विशेष जाणवायचा.. 'हॅन्डलूम'मुळं ह्या साड्या महाग असल्यातरी तितक्याच मौल्यवान असतात हे लक्षात आलं आणि हॅन्डलूम बद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली.. 

हॅन्डलूमची डाय हार्ड फॅन झाले ती नारायणपेठ ट्रिप मध्ये.. तिथल्या लूम्स पाहिल्यावर, तिथल्या लूम्सवर काम करणारे विणकर पाहिल्यावर, त्यांचे कष्ट, त्यांचे  विणकाम, कलेबद्दलची आसक्ती पाहिल्यावर.. त्यांच्या बोलण्यातून त्यांची कलेवरची निष्ठा, त्या कलेच्या परंपरेचे जतन आणि संगोपनासाठीचे प्रयत्न समजल्यावर त्यांच्याशी एक भावनिक नातं जोडलं गेलं.. एक हॅन्डलूम साडी विणण्यासाठी तीन ते चार आठवडे लागतात आणि हा वेळ कारागिरी नुसार कमी जास्त होऊ शकतो.. वंशपरंपरागत मिळालेला ह्या कलेचा वारसा ही घराणी जपत आहेत.. संपूर्ण कुटुंबे ह्या लूम्स वर काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.. जेव्हा अशी हातानं विणलेली साडी आपण नेसतो तेव्हा फक्त सहा वार कापड नेसत नसतो तर कोणाच्या तरी विचारप्रक्रियेला, कोणाच्या तरी कौशल्याला मूर्त रूप देत असतो आणि त्याच बरोबर विणकरांच्या कुटुंबाला जगण्यासाठी मदत ही करत असतो.. 

देशातील विविधता जशी प्रांतागणिक बदलत जाते तसेच हॅन्डलूम विणकाम ही बदलताना दिसते. तिथली संस्कृतीक वारसा, architecture, कला यांचा  प्रभाव विणकामात दिसून येतो.. उदाहरणादाखल, बनारसी साडीवरील पानाफुलांनी बनलेल्या जाळ्या किंवा बनारसी घाट, केरळच्या कसाऊ साडीवरील बाहुल्यांचे मोटिफ किंवा साऊथच्या साडीमध्ये असणारे सोनेरी जरीकाम.. तसेच तिथल्या हवामानाप्रमाणे सिल्क, कॉटन, लिनन अशी माध्यमही बदलताना दिसतात. माझ्या मते, ह्या नुसत्या साड्या नाहीत तर सहा वारामध्ये सामावलेला समृद्ध असा वारसा आहे.. 

विविध प्रांतातील विणकरांची कला एकत्र पाहायची संधी म्हणजे हॅन्डलूम प्रदर्शन.. हॅन्डलूम बद्दल आस्था असणाऱ्यांसाठी नक्की हा स्वर्गच असेल.. अमेरिकेत असल्याने भले अश्या प्रदर्शनांना माझं जाणं झालं नाही पण माझ्यासाठी मंजिरीचं 'Manjiri Silks' किसी एक्सिबिशन से कम नहीं हैं.. हलक्या फुलक्या नारायणपेठ, कलमकारी, इकत पासून पैठणी, गडवाल ते कांजीवरम अश्या उत्तम सिल्कच्या, नानाविध पोतांच्या, रंगसंगतींच्या हॅन्डलूम, हॅन्ड पिक्ड साड्या मंजिरीकडे पाहायला मिळतात आणि मला माझा स्वर्ग भेटतो.. 

हॅन्डमेड (हातानं केलेल्या) आणि हॅन्ड वुवन (हातानं विणलेल्या) वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी, विणकरांचा सन्मान करण्यासाठी, युनिअन गव्हर्मेंटने घोषित केलेला  "हॅन्डलूम डे" नक्कीच स्वागतार्ह्य आहे. 

अश्या ह्या हॅन्डलूम विणकरांना, त्यांच्या कलेला मानाचा मुजरा 🙏







-मी मधुरा.. 
७ ऑगस्ट २०२१

Sunday, August 1, 2021

मन उधाण "मैत्री"चे…

💕Happy Friendship Day Everyone!!💕

"मैत्री"



कुणी मित्र म्हणतं तर कुणी मैत्रीण.. कुणी दोस्त म्हणतं तर कुणी यार.. कुणी ‘ए भिडू’ असं म्हणत खांद्यावर हात ठेवतं तर कुणी 'कशी आहेस?' असं म्हणतं मिठी मारतं.. कुणी काहीही म्हणो पण ही एक भावना आहे, हे एक भावविश्व आहे.. "मैत्री"चं!!.. 

आपल्या आनंदात सहभागी होणारी आणि दु:खातही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी अशी ही "मैत्री"!!!.. ही मैत्री जगावीच लागते.. अनुभवावीच लागते.. 

                    प्रत्येकानं प्रेमात पडावंच असं काही नाही 
                    पण पडावं प्रेमात "मैत्री"च्या असंच आहे काही.. 

                    प्रियकर-प्रेयसी हवीच असं काही नाही 
                    पण हवी एकादी समजूतदार "मैत्री" असंच आहे काही.. 

                    सतत हातात हात असावाच असं काही नाही 
                    पण असावी सोबत, साथ न सोडणाऱ्या "मैत्री"ची असंच आहे काही.. 

                    मनातलं सार सांगावंच असं काही नाही 
                    पण न सांगता, नकळत उमजत जावं "मैत्री"त असंच आहे काही.. 

                    गिफ्ट्स, प्रॉमिसेस द्यावीतच असं काही नाही 
                    पण द्यावा जीवाला जीव, ओतावा जीव "मैत्री"त असंच आहे काही.. 

मैत्रत्वाची भावना जपणाऱ्या सर्वांना मैत्रीदिनाचा खूप खूप शुभेच्छा!!

-मी मधुरा.. 
१ ऑगस्ट २०२१

Sunday, July 25, 2021

तो आणि ती २

गावाबाहेरचा तो डोंगरमाथा.. हा डोंगर आणि गावाला वेढा घातलेली नदी.. ही दोन मौल्यवान आभूषणं गावाची!!.. 




गाडी डोंगराच्या दिशेने वळली आणि त्याचे मन बालपणात.. कितीतरी आठवणी आहेत ह्या डोंगराच्या.. मित्रांबरोबर सायकलवरून "तो" इकडे यायचा.. मनात "ती"चे नाव घेत.. मनात "ती"चे नाव ठेवून न थांबता डोंगरमाथ्यावर पोचता आले तर "ती" नक्की मिळते, हा त्या मित्रांचा समज.. आणि जेव्हा असे झाले, तेव्हाच त्याने ठरवले, "ती"ला घेऊन इकडे नक्की यायचे.. आणि आज "ती" त्याच्या बरोबर होती..




गाडीत बसून "तो" आणि "ती" निघाले खरे, पण काय बोलायचं, कुठून सुरुवात करायची हेच कळत नव्हतं.. काहीतरी जुजबी संभाषण सुरु होतं .. पठारावर गाडी लावून "तो" आणि "ती" मनोऱ्याच्या दिशेने चालू लागले.. चढावर त्याने दिलेला हात अजुनी ही तसाच तिच्या हातात होता, तो उबदार स्पर्श खूप काही सांगत होता.. धुंद गारवा, मावळतीला चाललेला सूर्य आणि हातात हात घेऊन बसलेले "तो" आणि "ती"... मनातल्या भावना सांगायला एकदम पिक्चर परफेक्ट सिच्युएशन... पण दोघे शांत होते.. कदाचित शब्दांपेक्षा असं त्यांचं एकमेकांबरोबर असणंच आज महत्वाचं होतं.. हरवलेलं गावसल्याचं स्पर्शानंच जणू कबूल केलं होतं..
 
अंधार पडू लागला तसं "तो" आणि "ती" भानावर आले.. जड पावलांनीच गाडीकडे निघाले.. 

आता पुढे काय? हा विचार "ती" करत असतानाच "तो" म्हणाला, "हा हात असाच माझ्या हातात आयुष्यभर हवा आहे.. पण आत्ता सोडशील??.. मला ड्राइव्ह करायचंय.." इतकं बोलून त्यानं हळूच "ती"च्या हातावर आपले ओठ टेकवले.. "ती" मोहरून गेली... क्षणभरच त्याच्या हातांचा वेळखा "ती"च्या भोवती पडला.. 

चाहे तुम कुछ ना कहो, मैने सुन लिया
के साथी प्यार का मुझे चुन लिया, चुन लिया... 



.... एक शांत, आल्हाददायी संध्याकाळ एकदम जादुई होऊन गेली.. अचानक हवेत हवाहवासा वाटणारा गारवा आला.. वाऱ्याच्या झुळूके बरोबर "ती"चा दुपट्टा हवेत उडू लागला.. मनात प्रेमाची चंद्रकोर आणि डोळ्यात स्वप्नांच्या असंख्य चांदण्या लुकलुकू लागल्या.. 

"हा हात असाच आयुष्यभर हातात हवा आहे.. ' ... प्रेमाचे पहिले शब्द.. ये किसी नशेसे तो कम नही थे.. ही प्रेमाची पहिली धुंदी.. ये पहला नशा.. 

प्रेमाची ही पहिली कबुली.. आणि ह्या कबुलीचा असर.. हा 'खुमार' दोघांच्या ही डोळ्यांत.. ह्या शिवाय दुसरं सुंदर काय असू शकतं??..


💕💕💕💕💕


गाडी पूढे जात होती... आणि 'तो' आणि 'ती' मात्र अजुनी त्या धुंद क्षणात रेंगाळत होते.. 

त्याचं मन "ती"च्या दुपट्याबरोबर हेलकावे घेत होतं.. सगळं स्वप्नवत वाटावं असं.. 'प्रेमाची कबुली', 'प्रेमाचा इजहार' सारं कल्पनातीत... शाळेत असल्यापासून "ती"ला  'I Love You' म्हणण्याची केलेली प्रॅक्टिस.. अनुभवलेले ते रोमांच.. आणि आज ते 'ढायी अक्षर प्रेम के..' न बोलताच केलेला प्रेमाचा इजहार... आणि आता "ती"चा हात हातात घेऊन, तिच्या बरोबर सारा आसमंत कवेत घ्यावं.. असं काहीसं असणारं feeling..  

उड़ता ही फिरूँ इन हवाओं में कहीं
या मैं झूल जाऊँ इन घटाओं में कहीं
एक कर दूँ आसमान और ज़मीं
कहो यारों क्या करूँ, क्या नहीं



इतकी वर्ष मनात जपून ठेवलेलं प्रेम आज व्यक्त झालं होतं.. सगळ्यांना ओरडून सांगावसं वाटत होतं.. "Yes!!! I'm in Love.. We are in Love.. "..  एकतर्फी प्रेमाची, अव्यक्त भावनांची, एकाकीपणाची मधली सारी वर्षे अचानक धूसर होऊन गेली.. 
                                                               

त्यानं "ती"च्याकडं पहिलं.. 


त्यानं धरलेला हात हृदयाशी ठेवून, "ती" डोळे मिटून बसली होती.. क्षणभर "ती"च्या डोळ्यांच्या कडा पाणवल्याचा भास त्याला झाला. "तो" काही बोलणार इतक्यात "ती"ने  तिचा हात, गियर बॉक्स वरील त्याच्या हातावर अलगद ठेवला.. "ती"च्या मिटलेल्या डोळ्यातून काही अश्रू गालावरून ओघळले. आणि त्यांनी थेट त्याच्या काळजाचा ठाव घेतला.. ही प्रेमाची अनुभूती, हा क्षण त्याला रंध्रारंध्रात सामावून घ्यायचा होता.. त्यानं क्षणभर डोळे मिटले आणि खोलवर श्वास घेतला.. 



दोघं ही निशब्द.. 

त्याला आठवत होती ती मनोऱ्याकडून हातात हात घेऊन चालत येताना एकत्र पडणारी त्यांची पावलं.. त्याच्या आयुष्यात "ती"च येणं.. आणि ही साथ, ही सोबत अशीच हवी आहे हे त्याचं सांगणं... 

ह्या शांततेत गाव कधी आलं दोघांनाही कळालं नाही.. "ती"नं डोळे उघडून त्याच्याकडं पाहिलं.. प्रेमानं, विश्वासानं भरलेली ती नजर.. उफ्फ.. 

"जाऊया ना?".. "ती"च्या प्रश्नाने "तो" भानावर आला.. "हं... "... असं म्हणत त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेऊन गालावर हलकेच ओठ टेकवले.. 
 

उसने बात की कुछ ऐसे ढंग से
सपने दे गया वो हज़ारो रंग के
रह जाऊँ जैसे मैं हार के
और चूमें वो मुझे प्यार से



त्याच्या ओठांचा तो हळुवार स्पर्श अजुनी "ती"ला जाणवत होता..  हातात हात गुंफून पूर्ण संध्याकाळ त्या दोघांनी एकत्र घालवली होती.. "ती"चा हात त्याच्या हातात असणं ही त्याला आवडलं होतं.. 'आयुष्यभर हा हात असाच हातात आवडेल' हे त्याचे बोलणे "ती"च्या कानात रुंजी घालत होते..

पुढे कित्येक वेळ, "तो" आणि "ती" प्रेमाचा पहिला नशा, पहिला खुमार अनुभवत, हातात हात घेऊन तसेच बसून होते.. 
                                                                                               







-मी मधुरा.. 
२६ जुलै २०२१

Sunday, May 23, 2021

A New Driver on the Road...

 



My precious Daughter behind the wheel of thousands of pounds of motorized steel... 


बापरे!! ह्या विचारानेच पोटात खड्डा पडतो.. 

आता, लवकरच ती 'एकटी' कार घेऊन जाईल.. roads, freeways, byways.. स्कूल, मॉल्स, सिनेमा हॉल्स, क्लासेस.. एक हवेहवेसे वाटणारे स्वातंत्र्य.. 

नको.. ह्या विचारात सुद्धा एक विचित्र दहशत जाणवते.. ही भीती, ही दहशत नेमकी कसली आहे? ह्या बाहेरच्या जगात ती एकटी असेल याची का तिला आता माझी गरज नाही याची?.. 

मुलांवर, त्यांच्या संस्कारांवर किती ही विश्वास असला तरीही, प्रत्येक नवीन टप्प्यावर, एक पालक म्हणून आपलं मन साशंक होतंच.. असे अनेक टप्पे असतात जिथं helpless, असुरक्षित, भयभीत, out of control वाटतं.. वेळोवेळी त्यातून मार्ग काढला ही जातो.. आणि हीच पालक म्हणून 'growing-up' process असते.. 

🚗 🚗 🚗 🚗 🚗 🚗 🚗 🚗 🚗 🚗

त्याचे असे झाले की, पंधराव्या वाढदिवस झाला आणि लेकीने कार शिकण्यासाठी 'learning permit' काढले.. आणि ह्या सगळ्या विचारांनी मला पोखरायला सुरुवात केली.. खरंतर मी सुद्धा सोळा-सतराव्या वर्षी कार चालवायला शिकले होते.. पण इथे लेक अजुनी लहान वाटत होती.. 😁 motherly concern दुसरे काय?.. माझी एकंदरीत परिस्थिती पाहता, लेकीने बाबाकडे मोर्चा वळवला आणि बाबा कडून तिची शिकवणी सुरु झाली.. तिचा उत्साह, तिचा आनंद पाहताना, तिची प्रगती ऐकताना मी ही त्यात हळूहळू सामील झाले.. 

नंबरहूड ड्राईव्ह पासून सुरु झालेल्या प्रवासाची मजल ग्रोसरी शॉप, शाळा इथवर गेली.. पाच-सहा मैलाच्या अंतरावर ती सराईतपणे ड्राईव्ह करू लागली.. आता तिला मोठ्ठी अंतरे आणि मोठ्ठी कार खुणावू लागले.. "आई, आज जिमला जाताना मी ड्राईव्ह करू?" तिच्याकडून आलेल्या ह्या प्रश्नाला उत्तर देण्याआधीच "thank you.. see you inthe car" म्हणून गेली सुद्धा.. हे नेमकं काय झालं? हा प्रश्न कधीतरी समोर येणार हे माहिती होतं पण इतक्या लवकर?... स्वतःच्याच विचारात गुंतलेली मी पॅसेंजर सीट वर जाऊन बसले.. "aai, why are you so nervous?"... अगं का म्हणून काय विचारतेस? तू मोठ्ठी कार इतक्या लांब ड्राईव्ह करणार ना म्हणून.. पण हे सगळे शब्द गिळून टाकले आणि म्हणले.. "अगं, कुठं काय.. जायचे ना आपल्याला.." मनातली चलबिचल चेहऱ्यावर उमटू न देण्याचा प्रयत्न करत साईड ला बसून होते.. हळूहळू मी रिलॅक्स होत असल्याची जाणीव झाली.. "कार्टी, काय छान ड्राईव्ह करायला लागलीय.." मुलं तुम्हांला surprise करतात हेच खरं.. मग काय रोज जिमला जाणे सुरु झाले.. रेडिओवर गाणी ऐकत, गाणी म्हणत, वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत तिच्या बरोबर जाताना मला एक वेगळाच आनंद मिळत होता.. तिला ही हक्काची driving partner मिळाली होती.. 

एक दिवस मी तिला सहज म्हणाले, जायचं का freeway वर?.. तिचे डोळे विस्फारले.. त्या डोळ्यात काय नव्हतं? Are you sure? Are you crazy? हे नक्की आईच विचारते आहे ना?.. पहिल्या दिवशी free wayला merge करून पुढचा exit घेऊन परतलो... आणि मग ड्राइविंगचा एक चसकाच लागला.. मुलं मोठ्ठी होत असतांना, नवनवीन ध्येय गाठत असताना, त्या प्रवासात आपण त्याच्या बरोबर असलो तर आपल्याला वाटणारी काळजी, भीती आपोआप कमी होते..  


... Finally, एक वर्षानंतर म्हणजेच सोळा वर्षे पूर्ण झाल्यावर 'Permanent Licence' मिळालं...



Yay.. 👏 👏👏..  So proud of Her.. 😘

Another Step Towards Freedom, Towards Independence, Towards Adulthood.. 


कदाचित मी sentimental ही होत असेन.. पण, licence मिळाल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना, मला तिच्यात माझी छोटी बाहुलीच दिसत होती.. मी स्वतःला खूप शांत ठेवायचा प्रयत्न करत होते.. was trying not to think about the worst.. गाडी चालवण्यासाठी नवीन तिकिट मिळालेली माझी ही लेक, अनेक रस्ते explore करण्यासाठी मिळालेल्या ह्या तिकिटाचा ती नीट आदर करेल ना?.. Freedom comes with big responsibitity हे ती नक्कीच जाणते.. असो.. 

तिने एकटीने ड्राईव्ह करण्यासाठी अजुनी मन तयार होत नव्हते.. पण शेवटी तिच्या हट्टापुढे माघार घ्यायचे ठरवले.. आणि एक surprise plan केले.. 

नेहमी प्रमाणे बाबा तिला वॉटरपोलो प्रॅक्टिस नंतर pickup करायला जाणार.. मी मागून दुसऱ्या कार मधून जायचे.. तिला कार keys देऊन, एकटी ड्राईव्ह करून ये म्हणून सांगायचे.. तिच्या मागून आम्ही ड्राईव्ह करायचे.. एकदम full proof plan... ठरल्याप्रमाणे तिला keys दिल्या.. drive safe and always look both ways म्हणून सांगितले आणि दुसऱ्या कार मध्ये येऊन बसलो.. 

ती निघाली.. मागून माझी कार.. 

थोड्या वेळानं माझ्या लक्षात आलं कि मीच टेन्स होऊन steering घट्ट पकडून ड्राईव्ह करतीय.. मला टेन्स व्हायची काहीच गरज नव्हती.. ह्याच रोड वरून तिने कितीतरी वेळा ड्राईव्ह केले आहे.. फरक इतकाच आहे कि आज ती एकटी आहे.. नेहमी मी बरोबर असते.. 

तर माझी कार तिच्या कार मागून.. एक दोन सिग्नल सगळं ठीक सुरु होतं.. पुढच्याच सिग्नल ला तिची कार सुटली आणि मी अडकले.. आत्तापर्यंत समोर दिसणारी तिची कार एकदम दिसेनाशी झाली.. आणि आम्ही एकमेकांकडे पहिले.. क्षणभर एक पोकळी जाणवली.. आता काय??.. आता एकच.. एक विश्वास... जो आहे आणि नेहमीच असेल.. She is a good, responsible driver, and we are proud of her.. जगाच्या पाठीवर ती कोठे ही जाऊदे, काहीही करुदे, आम्ही असेच तिच्या मागे असू.. 

You fly high baby, chase your dreams.. But promise me, you will look both ways.. 😘


 -मी मधुरा..  
२३ मे २०२१
 

Saturday, February 13, 2021

Happy Valentine's Day!! 💞



                  ती:
 

                  आठवतं, ते फुल गुलाबाचं

                  तू माझ्या केसात माळलेलं?

                  अन लाजून चेहरा लपवताना 

                  तू मला कवेत घेतलेलं?                                                 





                                      

💞💞💞💞💞  



                                                                                                    

   

                            तो:

                            म्हणूनच म्हणतो, 

                            मला वेड लागलंय प्रेमाचं 

                            तुझं प्रेम देशील?

                            थांबवून हा स्वप्नांचा खेळ 

                            माझी तू होशील?

                            सावरून सखे मला 

                            हात हाती घेशील?

                            आणखी एक सांग तू 

                            सखा मज म्हणशील? 






💞💞💞💞💞


                                                                  ती:

                                                                  ऐक ना, सुंदर असा 

                                                                  chocolate चा बंगला मला हवा 

                                                                  छोटासा का असेना पण 

                                                                  त्यात तुझा माझा सहवास हवा  

                                                                  सखी बनून आयुष्यभर साथ देईन तुला, 

                                                                  सांग ना, chocolate चा बंगला देशील मला?


💞💞💞💞💞



                                                                                                     

         


                                   

         तो:

         ओम फट स्वाहा म्हणत 

         प्रेमाला माझ्या स्वीकारलंस 

         टेडी बेअर बनून 

         सुख दुःखाला कवटाळलंस

         प्रॉमिस करतो,

         आयुष्यभर सुखात तुला ठेवीन 

         काहीही झाले तरी 

         शेवट पर्यंत साथ तुला देईन..                                                      




💞💞💞💞💞



                ती:

                खरं सांगू?

                तू सोबत असताना 

                आयुष्य कसं सोपं वाटतं.. 

                मिठीत तुझ्या असताना 

                स्वर्ग हि रिता वाटतो..  

                ओठांवर ओठ असताना 

                मन बेधुंद, बेभान होतं.. 

                खरं सांगू? 

                तू सोबत असताना 

                प्रत्येक दिवस Valentine Day वाटतो...     






-मी मधुरा.. 
१४ फेब्रुवारी २०२१