Friday, December 30, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं ३३ ते ३६)

 ३३. अकूपार.. ध्रुव भट्ट.. 
अनुवाद.. अंजनी नरवणे.. 



आशयघन कविता आणि गूढ-रहस्यमयी कादंबऱ्या लिहिणारे गुजराती साहित्यिक 'ध्रुव भट्ट'.. 'वाचायलाच हवेत असे लेखक' ह्यात अग्रक्रमांकावर असणारे, साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळवणारे, ज्यांच्या कथानकांवर चित्रपट बनतो असे हे 'ध्रुव भट्ट'.. ह्या लेखकाचं अजुनी एक वैशिष्टय म्हणजे ज्या प्रदेशातील कथा ते सांगतात तिथं स्वतः जाऊन, राहून, अनुभव घेऊन मगच लिहितात.. त्यामुळं त्यांच्या कथा प्रामाणिक आणि सत्याच्या जवळ जाणाऱ्या असतात.. ह्यापूर्वी त्यांची 'तिमिरपंथी' ही कादंबरी वाचली असल्यानं 'अकूपार' बद्दल खूप उत्सुकता होती.. 'अकूपार' ही ध्रुव भट्ट या सिद्धहस्त गुजराती लेखिकाची चौथी कादंबरी.. आपल्या सहज सुंदर लेखन शैलीतून अतिशय उत्कटतेनं चितारली एका चित्रकाराच्या आत्मशोधाची, त्याला सापडलेल्या 'गीर'ची विलक्षण कांदबरी!!..  

ध्रुव भट्टांच्या शिरस्तेप्रमाणे कथानायकाला ह्या ही कादंबरीत नाव नाही.. तर चित्रकार कथानायक पंचमहातत्त्वांपैकी एक असणार्‍या पृथ्वी या महातत्त्वाचं चित्र काढण्यासाठी मुंबईहून गीरच्या अभयारण्यात जातो.. आणि 'गीर'चाच होऊन जातो.. ह्या प्रवासात त्याचा मार्गदर्शक असतो तो त्याचा 'अंतर्मनाचा आवाज'.. हा प्रवास अतिशय तरल, भावोत्कट आणि प्रसंगी भाबडा वाटावा असा आहे.. 

"खमा गीर तुला" (दुःखी नगं होऊ गीर).. हे कादंबरीतील पाहिलं वाक्य.. आईमा नावाच्या एका 'गीर'वर प्रेम करणाऱ्या वृद्धेच्या तोंडचं.. पण आईमा असं एका जंगलाला का म्हणाली? हा कथानायकाला पडलेला प्रश्न आणि ह्या प्रश्नातून निर्माण होणारे असंख्य प्रश्न हा कादंबरीचा प्रवास.. पण जसजसा हा प्रवास पूर्णत्वास येत जातो तसतसं  त्याच्या मनातील प्रश्न, शंका, द्वंद्व यांचं शमन होत जातं.. आणि एका समृद्ध जाणिवेचा त्याला साक्षात्कार होतो.. 

गीर, गीरची जादू, माणूस आणि प्राणी यांचं नातं, माणूस आणि निसर्ग यांचं नातं "खमा गीर तुला" ह्या भावनेतून हळू हळू उलगडत जातं.. सगळं जग सोडून हा चित्रकार नेमका 'गीर'लाच का येतो..'सांसाई', 'आईमा', 'डोरोथी', 'धानू' यांसारखी माणसंच का भेटतात.. त्यानं काढलेल्या 'पृथ्वी'च्या चित्रांमधून मानवी जीवनाच्या विविधरंगी छटाच का रेखाटल्या जातात.. अश्या अनेक सुखद योगायोगांनी ध्रुव भट्ट वाचकांना खिळवून ठेवतात.. संसाई, मुस्तफा, आईमा, अहमद, विक्रम ही पात्रं शेवटपर्यंत वाचकांसोबत राहतात.. 

आईमानं सांगितलेली पृथ्वीतत्वाच्या कासवाची गोष्ट विचार करायला लावणारी आहे.. असा समज आहे कि शेषनागाच्या डोक्यावर पृथ्वी उभी आहे आणि शेषनाग अकुपार नावाच्या कासवावर.. आणि ह्या दोघांनी मिळून पृथ्वीला तोलून धरलंय.. माणूस, प्राणी, जंगल, नद्या, समुद्र ह्या सगळ्यांचं एक संतुलित प्रमाण असतं.. आणि हे प्रमाण हाताबाहेर गेलं, अकुपार आणि शेषनाग ह्यांना सहन होईनास झालं कि ते पृथ्वीला सांगतात, कि मा, आता हे ओझं सहन होत नाही काही तरी मार्ग काढ.. मग पृथ्वी परमेश्वराकडं धाव घेते आणि मग कोणत्या ना कोणत्या रूपानं तो अवतार घेतो.. कधी मासा, कधी वराह, कधी नरसिंह.. आणि आत्ता ही आपण हेच संतुलन राखण्याच्या प्रयत्नात आहोत.. असो.. 

पृथ्वीतत्त्वाची चित्र काढणाऱ्या चित्रकाराचा प्रवास म्हणून हे 'अकुपार' ज्याच्यावर हे पृथ्वीतत्त्व उभं आहे.. 


-मी मधुरा.. 

************************************************

३४. एकेक पान गळावया.. गौरी देशपांडे.. 


'गौरी देशपांडे' आत्मभान जागवणारी, विसाव्या शतकातील आधुनिक स्त्रीवादी साहित्यिका.. जीवनातील वास्तवता व सत्यावर आधारित असणारी, वाचकास अंतर्मुख करणारी अशी त्यांची लेखनशैली.. व्यक्तिस्वातंत्र्य, माणूसपणा, स्त्रीजाणिवा हा त्यांच्या लेखनाचा गाभा.. 'गोफ' वाचल्या नंतर तर मी त्यांच्या लेखनच्या प्रेमातच पडले..  त्यांच्या स्त्रीवादी लेखनातून, स्त्री मनाची स्पंदने टिपताना स्त्री स्वातंत्र्यापेक्षा वैचारिक व्यक्तिस्वातंत्र्यावर त्यांचा असणारा भर मला जास्ती भावतो.. स्त्रीवादी रोमॅंटिझिम, इंटेलेक्चुअल रोमॅंटिझिम किंवा रोमॅंटिक लीगसी यांसारख्या संकल्पना मराठी साहित्यात आणण्याचं धाडस गौरी देशपांडे यांनी केलं.. 'एकेक पान गळावया' हा त्यांचा तीन कथांचा कथा संग्रह.. त्यातील स्त्रीव्यक्तिरेखा काय सांगतील? कश्या अश्या असतील? ह्या बद्दल मोठ्ठी उत्सुकता होती.. 

एकेक पान गळावया' या पुस्तकातील कथा १९८० च्या दशकातील भारतीय स्त्रीच्या भावविश्वाचा आढावा घेतात.. ह्या कथांमधील नायिका स्वतंत्र आहे, तिला स्वतःचे विचार, स्वतःची मतं आहेत जी ती आत्मविश्वासानं मांडते.. चुकीच्या वागण्याची, चुकीच्या निर्णयांची कबुलीही ती तितक्याच प्रांजळपणे देते.. आणि त्या वागण्याचं, विचारांचं विश्लेषणही करते.. ह्या कथेंतील सगळ्यांचं स्त्री व्यक्तिरेखा 'आदर्श स्त्री' च्या चौकटीबाहेर पडून आयुष्य जगताना दिसतात..

गौरी देशपांडे याचं लिखाण सहज, सोप्प असं नक्कीच नाहीये.. ते पचनी पडायला वेळ लागतोच..  
कथा १: 'कारावासातून पत्रे'- निम्म्याहून अधिक गोष्ट वाचेपर्यंत सगळं 'डोक्यावरून'च गेलं.. पण नंतर त्या लेखनातील मेख लक्षात आल्यावर वाचायला मजा आली.. सुरुवातीला कथेच्या नावावरून वाटलं की पत्ररूपी संवाद असेल.. पण ही पत्रं आहेत एकतर्फी लिहिलेली.. नायिकेनं, अमेरिकेतल्या मित्राला मनू ला लिहिलेली.. ही नायिका तिच्या जीवनात घडणाऱ्या इतंभूत बातम्या मनूला पत्रातून लिहीत असते.. मनूनं तिला कधी पत्र लिहिलं का नाही ह्याचा अंदाज मात्र शेवट पर्यंत येत नाही.. तिची त्या बाबत काही हरकत किंवा तक्रार हि दिसत नाही.. त्यामुळं कदाचित हे डायरी लेखन असेल का असं ही वाटतं.. नायिकेच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येकांची नावं कळतात पण नायिकेचं नाव गूढच राहतं.. कदाचित ती अश्या अनेक स्त्रियांचं प्रतिनिधीत्व करत असेल.. तर ही घटस्फोटित नायिका मनू नावाच्या विवाहित माणसाच्या प्रेमात पडते.. आणि त्याच्या बरोबर livein मध्ये राहू लागते.. काही वर्षानंतर मनू नोकरीसाठी परदेशी जातो.. तो गेल्या नंतर तिच्या आयुष्याबद्दल, तिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक पुरुषाबद्दल ती त्याला पत्रानं कळवत राहते.. तिच्या लैगिक सुखाबद्दल सुद्धा ती त्याच्याशी मोकळेपणानं बोलते.. त्याच्या विरहाबद्दल बोलते.. कथेच्या शेवटी  ताजा कलम मध्ये 'कारावासातून पत्रे' ह्या शीर्षकाचा उलगडा होतो..  
कथा २: 'मध्य लटपटीत'- सुशिक्षित, नोकरी करणारी, आपल्या संसारात सुखी असणारी मध्यम वयीन नायिका.. आपला नवरा जयंत बरोबर कामानिमित्य परदेशी जाते.. सुरुवातीचे नाविन्यपूर्ण दिवस संपतात आणि वास्तवाची जाणीव होते.. सगळं सुख असून सुद्धा आयुष्यात पोकळी जाणवू लागते.. बोर्डिंग मध्ये असणारी मुलं, मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि परदेशातील एकाकीपणा.. नेमकं आयुष्यात काय हरवलंय याचा शोध घेत भारतात परत येते.. हा शोध घेता घेता कथेच्या शेवटी तीच तिला  गवसते आणि तिच्या मनात तरळतो एक चिरंतन आनंद.. ह्या ही कथेत ही नायिका अनामिक च आहे.. 
कथा ३: 'एकेक पान गळावया'- 'राधा' कथा नायिका.. पेशानं लेखिका.. भरपूर शिकलेली, विचारी.. तिचा प्रियकर, सहचारी, पती माधव, भारतीय दूतावासात नोकरी करणारा.. माधवच्या नोकरीमुळं भरपूर फिरलेली अनुभव संपन्न राधा.. आणि ह्या अनुभवाच्या बैठकीतून तिचं आसणारं लेखन.. उतारवयातील माधवच्या आकस्मित मृत्यूनंतरचं राधाचं आयुष्य, आधीच्या आयुष्याचे उतारवयावर होणारे पडसाद म्हणजे 'एकेक पान गळताना..' फिरतीच्या नोकरीमुळं बोर्डिंग मध्ये, एकाकी वाढलेली मुलं, परदेशातील त्याचे मित्र मैत्रिणी, तिथलं आयुष्य, भारत आणि परदेश ह्या दोन स्तरावरील असलेले आयुष्यातील बंध.. म्हटले तर सोपे म्हटले तर क्लिष्ट.. नवरा बायको, आई-वडील-मुलं, मित्र यांच्यातील भावबंधपण लेखिकेनं अगदी सहजतेनं उलगडलेले आहेत.. ही कथा वाचताना त्या-त्या जागी उभं राहून विचार करायला लावते. 


-मी मधुरा.. 

************************************************

३५. मैत्रेयी.. डॉ अरुणा ढेरे..


मैत्रेयी.. पौराणिक कथांमधली विदुषी.. खरं तर ह्या खेरीज मैत्रेयी बद्दल मला फारशी अशी माहिती नव्हतीच.. 'मैत्रेयी' हे पुस्तक वाचंच असा आग्रह ही झालेला.. इतकी मोठ्ठी विदुषी आणि ८८ पानांचं पिटुकलं पुस्तक.. नेमकं काय लिहिलं असेल ह्या पुस्तकात?ही उत्सुकता पण होतीच.. पुस्तकाच्या पहिल्या पानावर 'उपनिषदांनो-- मैत्रेयी तुमच्यातून आली' इतकंच.. आणि दुसऱ्या पानावर 'माझ्या मनातील मैत्रेयी' ही अरुणाताईंनी स्वतः लिहिलेली पुस्तकाची प्रस्थावना.. सुरुवातीलाच त्या लिहितात हि काही कथा, कादंबरी नाही.. जे काही मैत्रेयीबद्दल वाचलं, ऐकलं त्यातून जशी ती भावली तशी ती लिहिली.. ह्या लिखाणाला ऐतिहासिक तसंच उपनिषदांचा संदर्भ नक्कीच आहे.. 

याज्ञवल्क ऋषींच्या दोन भार्या एक कात्यायनी आणि दुसरी मैत्रेयी.. मैत्रेयी, जनक राजाचा प्रधान 'मित्र'ची कन्या.. जनक दरबारात सीतेसह सहभागी असणारी युवती.. दरबारात ब्रह्मज्ञानच्या चर्चेसाठी आलेला 'याज्ञवल्क', त्याला मैत्रेयीनं पाहिलं, ऐकलं आणि प्रभावित होऊन वरलं सुद्धा!.. ऐहिक ऐश्वर्य मागे ठेवून ती त्याच्या आश्रमात प्रवेशली.. आणि त्याच्या जीवनाशी समर्प्रित झाली.. वेदांपासून उपनिषदापर्यंतचा तिचा याज्ञवल्क बरोबरचा विचार प्रवास, याज्ञवल्क बरोबरचा तिचा वैवाहिक जीवन प्रवास, त्यांच्या जगण्यातील जाणिवांचे रंग ह्यातून याज्ञवल्कच्या आयुष्यातील मैत्रेयी आकार घेते..

याज्ञवल्क आणि मैत्रेयी यांच्या तात्त्विक, वैचारिक चर्चेतून त्यांच्या सहजीवनाचं सुंदर काल्पनिक विश्व अरुणाताईंनी निर्माण केलं आहे.. अगदी आठवणीत रममाण होण्यापासून ते रतिक्रीडा, सौंदर्य आणि सौंदर्याच्या कल्पना मग त्या देहाच्या असोत मनाच्या, अनुभवानं विचारात होणारे बदल, आत्मज्ञान ते यज्ञसंस्था.. असे कितीतरी विषय.. 'सौंदर्य म्हणजे काय तर पाहणाऱ्याच्या मनाचाच खेळ..' किती बरोबर आहे ना?.. कोणी कोणाला सुंदर दिसते किंवा दिसत नाही.. सौंदर्य म्हणजे व्यक्तिसापेक्ष कल्पना.. रतिक्रीडेला तर यज्ञकर्म म्हटलं आहे.. पण ती विवेकानं व्हायला हवी.. ही चर्चा वाचण्याजोगी आहे.. 

मला आवडलेलं.. 'विसंवादातून नवा संवाद उभा राहतो.. फक्त हा विसंवाद दुबळा नको.. सुंदर संवादाची ओळख व्हायची असेल तर सबळ विसंवादाचं स्वागत व्हायला हवं.. आज आपण सुंदर आयुष्य जगत असू तर ते मागे अनेक विसंवादाला तोंड दिल्यामुळेच.. किती प्रगल्भ विचार आहे हा.. 
आणि दुसरं आवडलेलं.. याज्ञवल्कला सूर्य आवडतो तर मैत्रेयीला चंद्र.. याज्ञवल्क म्हणतो सूर्य आवडावा कारण त्यात तेज आहे.. सूर्य जीवनदायी आहे.. सूर्य जागवतो.. त्यामुळं सूर्य आवडायला हवा.. त्यावर मैत्रेयी म्हणते आवड वेगळी आणि गरज वेगळी.. सूर्य तर विकासाच्या सलगतेत आधीच थांबतो.. एकदा जी वाढ झाली ती झाली.. विकासाच्या बिंदूवर तो कायमचा स्थिरावला आहे.. पण चंद्राचं असं नाही.. उत्पत्ती-स्थिती-लय हा विकास त्यात आहे.. लय म्हणजे संपणं नव्हे.. त्यापुढं उत्पत्ती आहे.. त्यामुळं हे दुष्टचक्र नाही.. जन्म-जीवन-मृत्यू हे जीवनाचं सत्य म्हणजे चंद्र.. 

ह्या सगळ्या चर्चा, तर्क-वितर्क वाचताना अरुणाताईंच्या विचारांची कमाल वाटते.. याज्ञवल्क आणि मैत्रेयी हे दोन वेगळ्या विचारधारांची व्यक्तिमत्व.. ह्या दोन्ही बाजूंचे विचार तितकेच स्वच्छ असायला हवेत.. लिहिण्याआधी ते स्वतःत रुजवायला ही हवेत.. ह्या विचारांत स्थैर्य ही हवं.. आणि ही विचारांची बीज वाचकांत रुजायला ही हवीत.. खरंच हे पुस्तक म्हणजे छोट्या पाकिटात मोठ्ठा धमाका असं आहे.. कधी ही कोणतं ही पान उघडावं आणि वाचावं..

माझ्यासाठी आत्ता ह्या आयुष्याच्या टप्प्यावर महत्वाचं.. जीवनाला काळाचं कसलं बंधन.. व त्याच्या गतीनं अखंड ऋतुचक्र फिरवतच राहणार.. आपण कसे वाढतो आहोत, उमलतो आहोत हे आपलं आपल्याला कळायला हवं.. कणाकणातून अनुभावगंधाच्या वादळानं तेजाचे कळे धुमारायला हवेत.. प्रसन्नतेचा दीप्तिगोल अंतर्बाह्य फुलायला हवा.. असं स्वतःच मनोमन उमलण अनुभवलं की आपोआप काळाचं भान विसरायला होतं.. थोडक्यात age is just a number.. भरभरून जगणं महत्वाचं..    


-मी मधुरा.. 

************************************************

३६. अमलताश.. डॉ. सुप्रिया दीक्षित.. 


'अमलताश'.. बहावा.. पिवळ्या धमक झुंबरांनी फुलणारं सुंदर झाड.. प्रसिद्ध लेखक प्रकाश संत आणि डॉ. सुप्रिया दीक्षित यांचं खास आवडतं.. म्हणून त्यांच्या ह्या जीवन कथेचं नाव ही 'अमलताश'.. एक साधंसुधं, सौम्य आणि निर्मळ आत्मकथन.. खुप सकारात्मक आणि समाधान देणारं.. व्यवसायानं डॉक्टर असणाऱ्या सुप्रिया दीक्षित, लेखिका नाहीत हे कोठेही जाणवत ही नाही.. जाणवत राहतं ते फक्त उत्कट प्रेम आणि जीवन जगण्याचा उत्साह..   

'लंपट'च वेड लावणारे प्रकाश संत.. त्यांच्या 'वनवास', 'चांदण्यांचा रस्ता' ह्या पुस्तकाची झालेली पारायणं.. अश्या लेखकाबद्दल त्यांच्या सहचारिणीनं काय लिहिलं असेल?    प्रकाश संत आणि इंदिराबाई संत ह्याचं असलेलं मायलेकाचं नातं.. त्यांचे असलेले एकत्रित भावबंध.. हे जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता आणि त्याच बरोबर मनात असलेल्या  त्यांच्या प्रतिमेला तडा तर जाणार नाही ना ही धाकधूक.. फक्त दोन अपवाद वगळता लेखकांच्या बायकांच्या मनोगतांचा मी धसकाच घेतलाय.. आपल्याला भावलेला लेखक हा त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो.. तो माणूस म्हणून नवरा म्हणून त्या लेखकाच्या कोनाशी सुसंगत असेलच असं नाही.. परत ते कथानक कसं मांडलय, कथानकाला काय सांगायचंय ह्यावर त्या माणसाकडं पाहायचा दृष्टीकोन बदलतो.. आणि प्रकाश संतांच्या बाबतीत मला ही रिस्क नको होती.. 
  
डॉ. सुप्रिया दीक्षितांच्या मनातले संत एकदम लख्ख आणि उजळ आहेत.. त्यामुळं काही सायास न करता 'जसं घडलं तसं सांगितलं' इतक्या सहजतेनं प्रवाहीपणे हे आत्मकथन लिहिलंय.. स्वतःचं बालपण, बालमित्र संत आणि संतांसोबतचं सहजीवन, कौटुंबिक भावविश्व, मित्र परिवार, मुलांचं कौतुक या सर्वांबद्दल कोणताही आविर्भाव न ठेवता त्या आपल्याशी बोलतात.. आयुष्यात आलेल्या असंख्य कटू प्रसंगांचं भांडवल न करता त्यांना पानाच्या डाव्या बाजूइतकंच महत्व आहे असं त्या म्हणतात.. माणसं माणसांसारखीच वागतात.. म्हणून त्यांची वैगुण्ये अधोरेखित करू नयेत.. हे त्याचं मला भावलेलं वाक्य.. 

'अमलताश'.. म्हणजे संतांच्या सोबतीनं जगलेल्या आयुष्याबद्दलची कृतज्ञता.. संतांच्या अभिव्यक्तीला डॉ. सुप्रियांच्या सशक्त सहकार्यामुळं, त्यांच्यातील ऋजुतेमुळं आणि संतांवरच्या निर्व्याज प्रेमामुळं प्रवाहीपण आलं असं मला वाटतं.. 


-मी मधुरा.. 

************************************************ 
 



   


Tuesday, November 29, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं २८ ते ३२)

 २८. ते चौदा तास.. अंकुर चावला..
अनुवाद: मृणालिनी नानिवडेकर



मुंबई ताज हॉटेल हल्यावर बरीच पुस्तकं लिहिली गेली.. वेगवेगळ्या अँगलनं.. 'Black Tornado' कमांडोंच्या अँगलनं तर 'The Siege' हल्ल्याचा संपूर्ण दस्तऐवज..  अजमल कसाबच्या भारतातील खटल्यातील अप्रकाशित कागदपत्रांपासून ते ताज मधील २६/११ पूर्वीचे आणि नंतरचे दैनंदिन व्यवहार ते तिथले ग्राहक, त्यांनी अनुभवलेलं २६/११ ह्या सगळ्यांचा समावेश.. हे पुस्तक मी पूर्वी वाचायला घेतलं होतं पण ते वाचवलं नाही.. नंतर कधीतरी भारतवारीत 'ते चौदा तास' हे पुस्तक वाचून तरी बघू  म्हणून घेऊन ठेवलं.. आणि आता हल्ल्याच्या १४ वर्षांनंतर हा थरार वाचला..  

'14 Hours An Insider's Account of the 26/11 Taj Attack' हे पुस्तक म्हणजे 'अंकुर चावला' यांचा 'Taj Attack Surviver' ह्या भूमिकेतून लिहिलेला अनुभव.. आणि सकाळ वृत्तपत्राच्या पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी त्याचा केलेला अनुवाद म्हणजे 'ताज हल्ला आतून अनुभवताना.. ते चौदा तास'.. ताज मध्ये ऑपरेशन्स मॅनेजमेंट ट्रेनी असणाऱ्या अंकुरच्या अनुभवांची रोलर कोस्टर राईड म्हणजे हे पुस्तक.. लेखनात परिपक्वता नसली तरी त्यावेळचा प्रसंग, त्या भावना वाचकांपर्यंत पोचवण्यात अंकुर चावला यशस्वी झाला आहे.. १३० पानांचं डायरी स्वरूपात लिहिलेलं हे पुस्तक वाचताना कंटाळा येत नाही.. 

प्रस्तावनेमध्ये 'अंकुर चावला' चा थोडक्यात परिचय होतो.. मूळचा दिल्लीचा रहिवासी असणारा अंकुर हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी सिमल्याला जातो.. तेथून मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून ताजमहाल पॅलेस हॉटेल मुंबई येतो.. ताजच्या वैभवाचा, खानदानी ऐटीचा, शाही इतमामाचा तो एक भाग बनतो.. दिल्ली आणि मुंबई ह्या दोन शहराच्या राहणीमानातील तफावत अनुभवत, ताज मधले काम, तिथली शिस्त ह्याचे धडे घेत, नवीन मित्रांबरोबर मजा करत ट्रैनिंग चे चार महिने पूर्ण होतात.. आणि उजाडतो २६ नोव्हेंबर २००८.. तो काळा दिवस.. बार मध्ये आज त्याच लेबलिंगचं काम.. कस्टमर बरोबर 'माल्ट' विषयी बोलत असताना एक मोठ्ठा धमाका होतो.. वेळ रात्री ९ वाजून २४ मिनिटे.. काय झालं हे पहायला तो बाहेर जातो.. आणि पाहतो अस्ताव्यस्त रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं एक शरीर आणि राखाडी रंगाची बॅकपॅक घेतलेला रायफलधारी माणूस.. पाठोपाठ गोळ्यांचे आवाज.. आणि सुरु होतं एक थरारक नाट्य.. 

सुरुवातीचा काही भाग खूपच कंटाळवाणा वाटतो.. पहिल्या २०-२५ पानांनंतर पकड वाढते, वेग वाढतो आणि वाचकाला पूर्णपणे भावनिक उच्च पातळीवर घेऊन जातो.. मृत्यूचे भय, डोळ्यासमोर आयुष्याचा दिसणारा सरलेला सारीपाट, रक्तपात, निपचित पडलेले निरपराध लोकं, मानसिक शारीरिक त्रासातून जाणारी जीव मुठीत धरून असणारी माणसं यांचं शक्तिशाली आणि मार्मिक केलेलं चित्रण.. ह्या सर्व त्रासदायक वावटळीत थरारात हॉटेलच्या स्टाफचं कर्त्यव्यापासून कधीही परावृत्त न होणं.. ह्यात आपण गुंतत जातो..  

-मी मधुरा.. 

************************************************

२९. कॉलनी.. सिद्धार्थ पारधे.. 


पुन्हा एकदा आत्मकथा!.. एका व्यासंगीक कॉलनीच्या अपत्याची.. कॉलनीनं पाहिलेल्या, कॉलनीनं घडवलेल्या, कॉलनीच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या एका व्यक्तिमत्वाची!!.. साहित्यिकांनी एकत्र नांदावं म्हणून आचार्य अत्रे आणि अनंत काणेकर साकारलेल्या साहित्य सहवासातील एका कष्टकऱ्याची.. 'सिद्धार्थ पारधे' नामक एका वाचमनच्या मुलाची!!!... ज्या कॉलनीत साक्षात सरस्वती नांदते, त्या कॉलनीच्या परिसस्पर्शानं एका पारधी जमातीच्या मुलाचं कसं सोनं झालं याची ही कथा.. 

पारधी समाज.. बाकी समाजाच्या दृष्टीनं बदनाम झालेली भटकी जमात.. गांवाबाहेर राहणारी, भीक मागून, चोऱ्यामाऱ्या करून पोटाची खळगी भरणारी जमात.. एका  गांवचा शेर संपला कि पुढचं गांव.. सतत भटकत राहणारी.. पुलिसांच्या रडारवर असणारी.. अश्याच पुलिसांच्या, सावकाराच्या त्रासाला कंटाळून लक्ष्मण भिकाजी पारधे आपली पत्नी  कोंडाबाई आणि मुलांना घेऊन मुंबई गाठतात.. आणि साहित्य सहवास कॉलनीच्या बांधकामावर बिगारी मजूर म्हणून काम करू लागतात.. खाडी बुजवणं ते बिल्डिंगची पायाभरणी ते बांधकाम ते स्लॅब टाकणं ते मिस्त्री/प्लम्बर अशी काम करत तिथंच तयार होणाऱ्या बिल्डिंगपाशी झोपडी टाकून राहू लागतात.. बायको मुलंबाळं ही इथंच काम करू लागतात.. जसजश्या बिल्डींग्स तयार होत गेल्या, माणसांनी गजबजू लागल्या तसं त्यांच्या कामाचं स्वरूप पण बदलू लागलं.. लक्ष्मण आता ह्या कॉलनीचा वाचमन म्हणून काम करू लागला तर कोंडाबाई कॉलनीच्या घराची धुणीभांडी तर सिद्धार्थ दूध-वर्तनामपत्रं लाईन, गाड्या पुसणं अशी काम.. सगळं कुटुंब साहित्य सहवास मध्ये दिवसभर राबू लागलं.. आपलं काम संपल्यावर सिद्धार्थ तिथल्या मुलांबरोबर खेळात असे.. त्यांच्या बरोबर खेळण्या बोलण्यातून तो घडत गेला.. शिकत सावरत गेला..  

बिगारी मजुराचा मुलगा ते एक उच्चशिक्षित नोकरदार हा सिद्धार्थचा प्रवास थक्क करणारा आहे.. ह्या प्रवासात जे काही अनुभवलं, भोगलं, सहन केलं आणि अपार दारिद्र्यावर मात करून स्वतःला कसं घडवलं हे प्रांजलपणानं, मनमोकळेपणानं कथन केलंय, सांगितलंय.. त्याच्या वडिलांचं लक्ष्मणचं कॉलनीत येणं ते त्यांचा मृत्यू असा ह्या आत्मकथनाचा प्रवास.. त्यामुळं ही गोष्ट 'लक्ष्मण पराधे'ची पण आहे..

सिद्धार्थ पराधेंच हे कथन वाचकाच्या मनाशी संधान बांधत.. हे सगळं आपल्या भोवतीच घडतंय असं वाटतं.. सचिन तेंडुलकर, वि.वा. करंदीकर, व.पु.काळे ही नावं ह्या खडतर प्रवासात गार वाऱ्याची झुळूक बनून येतात.. 


-मी मधुरा.. 

************************************************

३०. बहुरूपी.. नारायण धारप.. 


'बहुरूपी'.. खरं तर मला 'प्रशांत दामलें'च 'बहुरूपी' वाचायचं होतं.. मराठी 'स्टींफन किंग', नारायण धारप यांचं नाही.. कॉलेज जीवनात 'नारायण धारप' भरपूर वाचलं.. उगाचंच इंग्लिश कादंबरी वाचल्याचा फील येऊन भारी वाटायचं.. आणि नुकत्यातच 'ग्रहण' वाचलं.. बहुतेक मालिकेचा परिणाम असावा.. त्यामुळं आत्ता ह्या पन्नास पुस्तकांच्या लिस्टमध्ये नारायण धारप नव्हतेच.. बहुतेक सारख्याच नावानं घोळ झाला.. ('एक बहुरूपी' नावाचं अशोक मामांचं आत्मचरित्र पण आहे..)    

नारायण धारपांच्या 'बहुरूपी'नं खूपच निराश केलं.. अतिशय सुमार कथानक आणि लेखन पण.. नुसतीच म्हणायला रहस्य कथा.. कोणताही ट्विस्ट नाही.. कोणतेही थ्रिल नाही.. अगदी अपेक्षेप्रमाणं सगळं घडत जातं.. 'अजय' ह्या कथेचा नायक.. जो पेशानं नट आहे.. एक संस्थान वाचवण्यासाठी तो त्या राणीसाहेबांचा मुलगा म्हणून नाटक करायला तयार होतो.. आणि ह्या प्रवासात तो कशी वेगवेगळी रूपं घेतो आणि ते संस्थान वाचवतो अशी हि कथा.. 

कोणतेही पुस्तक मध्यात सोडायचं नाही म्हणून कसंतरी वाचून पूर्ण केलं.. चेटकीण, ४४० चंदनवाडी, ग्रहण, स्वाहा लिहिणारे नारायण धारप हेच का इतकी शंका निर्माण व्हावी इतपत हे पुस्तक टुकार आहे..  


 -मी मधुरा.. 

************************************************

३१. पडघवली.. गो. नी. दांडेकर.. 


'पडघवली'.. गो.नी.दांच्या भाषेतून रेखाटलेलं कोकणातील एका समृद्ध खेड्याचं शब्दचित्र!!.. १९५०चं दशक.. आठ वर्षाची अंबा लग्न होऊन खोतांची सून अंबावाहिनी म्हणून पडघवलीत प्रवेशते.. आणि तिच्याच जीवनपटातून उलगडत जाते ही 'पडघवली'.. निसर्गानं आपलं वैभव अनंत हस्ते जिच्यावर उधळलंय अशी ही 'पडघवली'.. 

सुरुवातीलाच आत्येसासूबाईनी अंबावहिनीला सांगितलेल्या गोष्टींतून या गावाचा रंजक इतिहास वाचकाला समजतो.. समृद्ध वारसा असणारी, जीवाला जीव देणारी माणसं  असणारी, शेजारधर्म पाळणारी, पाप-पुण्याला अनन्यसाधारण महत्त्व असणारी 'पडघवली'.. 'पडघवली'चं रक्षण करण्यासाठी इथं गिऱ्होबा आहे आणि भरभरून आशीर्वाद देणारा गेंगण्याचा मारुतीराया सुद्धा आहे.. ह्या गोष्टी ऐकत ऐकत, माडा-पोफ़ळीच्या बागेतून फिरत फिरत, गावातील प्रत्येक व्यक्तीशी नातं जोडत आपसूकच आपण पडघवलीकर होऊन जातो.. ही गोनीदांच्या लेखन शैलीची कमाल.. ब्राह्मणी भाषा, कुलवाड्यांची भाषा एवढी अफलातून सादर केलीय की आपल्या समोरच संभाषण घडतंय, आपण गावातून फेरफटका मारतोय असं वाटावं.. सगळ्या व्यक्तिरेखा आजूबाजूला जिवंतपणे वावरत असतात.. जशी पडघवलीची लाडकी खोतीण 'अंबावहिनी'.. मनमिळावू, प्रेमळ, गावाविषयी आत्मीयता असणारी.. झाडपाल्याच्या औषधांनी गाववाल्यांना बरं करणारी अनेक बाळंतिणींना सोडवणारी.. आडल्या नडल्यांना मदत करणारी.. गावाचा भक्कम आधार असणारी.. तिच्यात आपल्याला आई आजी दिसू लागते..

जसजशी कथा पुढं सरकत जाते, पिढी बदलत जाते तसतसा गावातला आपुलकीचा झरा आटत जातो.. व्यंकूभावोजींसारख्या लोभी, हव्यासी आणि गावात दबदबा असण्याऱ्या माणसांमुळं आणि इतरांच्या हतबलतेमुळं पडघवलीला लागलेली उतरती कळा मनाला चटका लावून जाते.. अंबूवहिनीचा नवरा महादेव, गावाचा खोत असूनही त्याच्या नाकर्तेपणामुळं, व्यंकूवरच्या आंधळ्या विश्वासामुळं तो ही काही करू शकत नाही.. ह्यातच हाय खाऊन महादेवाचा अंत होतो.. रया गेलेली, माणुसकी हरवलेली  पडघवली सोडून मुलाकडे मुंबईला जाण्याचा निर्णय अंबावाहिनी घेते.. 

'पडघवली' ही फक्त कथा नाही तर आपल्या देशातल्या गावांची प्रातिनिधिक स्वरूपात मांडलेली शोकांतिकाच म्हणावी लागेल.. आपल्या देशातल्या गावाचं चित्र आजही पडघवलीपेक्षा वेगळं नाही.. 

विजय देव, वीणा देव, रुचिर कुलकर्णी आणि मधुरा देव यांनी साकारलेलं 'पडघवली'चं अभिवाचन storytell वर उपलब्ध आहे.. 


-मी मधुरा.. 

************************************************

३२. सो कुल.. सोनाली कुलकर्णी.. 



'सो कुल..' ह्या हटके नावानं आणि पुस्तकाच्या मुखपृष्ठानं माझं लक्ष वेधलं.. २००५ ते २००७ ह्या दोन वर्षात लोकसत्ताच्या पुरवणीत तिनं केलेल्या स्तंभलेखनाचं हे संकलन.. ह्या संवेदनशील अभिनेत्रीनं नेमकं काय लिहिलंय ह्याची उत्सुकता तर होतीच.. मृणाल कुलकर्णी नंतर आता सोनाली कुलकर्णी काय म्हणतीय म्हणून पुस्तक लगेच चाळायला घेतलं.. पहिल्या 'हस्तांदोलन' ह्या लेखानं झालेली सुरुवात मस्तंच.. मग फावल्या वेळेत जेव्हा मोठ्ठी मोठी पुस्तकं वाचण्याइतका वेळ नसेल तेव्हा हे लेख वाचत राहिले.. एकूण १०२ लेखांचं हे संकलन आज वाचून पूर्ण झालं.. 

ललित लेखनाकडं झुकणारी लेखनशैली.. चित्रपट क्षेत्रातील अनुभव, आसपासच्या व्यक्ती, प्रसंग, घटना, दैनंदिन आयुष्यातील स्ट्रेस पासून ते मैत्री, स्त्रीचं स्त्री असणं, ते  निसर्ग, संगीत, वाढदिवस, फॅशन अश्या अनेक विषयांवर केलेलं हे लेखन.. घेतलेला वैचारिक वेध.. बरेच लेख अंतर्मुख करतात.. एक अभिनेत्री अशी असलेली तिची  इमेज गळून जाणवते ती संवेदनशील व्यक्ती.. जाणवतो तो अभिनयाबरोबरच आयुष्याकडं ही गांभीर्यानं पाहणाऱ्या सुसंस्कृत अभिनेत्रीचा हा मनमोकळा संवाद.. स्वत:शी आणि वाचकांशीही!!..


-मी मधुरा.. 

************************************************

Sunday, October 30, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं २४ ते २७)

 २४. हृदयस्थ.. डॉ. अलका मांडके..


'हृदयस्थ' ही कहाणी आहे सुप्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितू मांडके यांची.. त्यांचं शल्यकौशल्य, कामाचा झपाटा, संवेदनशीलता आणि त्यांनी पाहिलेलं कार्डियाक हॉस्पिटलचं भव्य स्वप्न हे सारं यथार्थपणे उभं केलंय त्यांची सहचारिणी डॉ. अलका मांडके यांनी!.. एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबरोबर तीन दशकांपेक्षा जास्त काळ अनुभवलेल्या सहजीवनाचा हा आलेख.. दृश्य-अदृश्य, मुलायम-काटेरी, विनम्र-करारी असे कितीतरी परस्पर विरोधी कंगोरे असलेला हा सहजीवनाचा पट मनाला भिडला नाही तर नवलच!..  

'हृदयस्थ'ची भाषा साधी, सरळ, प्रवाही असणं हे ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य.. डॉ. अलकाताई, डॉ. नीतू मांडके यांच्या आयुष्यात सहाध्यायी, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, गृहिणी, समव्यवसायी अश्या विविध नात्यांनी वावरल्या.. त्यांच्या निवेदनात पतीविषयी नितांत विश्वसनीयता तर आहेच पण पारदर्शकताही दिसून येते.. डॉ. नीतू बरोबर स्वतःच्या व अन्य व्यक्तींच्या गुणदोषांची मोकळेपणानं केलेली चर्चा.. कोठेही आत्मप्रौढी नाही कि दोष मांडताना कचरणं नाही.. गरुडझेप, गगनभरारी यासारख्या शब्दांचा अर्थ हे पुस्तक वाचताना नक्कीच कळतो.. 'हृदयस्थ' हे नाव सर्वार्थाने सार्थ वाटतं..  

सुरुवातीला दोघांकडची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगत बी. जे. मेडिकल कॉलेजला नीतू बरोबर घालवलेले मोहवून टाकणारे क्षण, त्याचं चिडणं, प्रेमानं पत्रं लिहिणं, सडेतोड पण फटकळ स्वभावामुळं घडलेले किस्से यातून नीतू मांडके यांचं महत्वाकांक्षी पण प्रेमळ व्यक्तिमत्त्व समोर येतं.. अभ्यासाव्यतिरिक्त फुटबॉल आणि बॉक्सिंगसारख्या अनेक क्रीडाप्रकारांमध्ये त्यांचा सहभाग, त्यांची तीक्ष्ण ग्रहणशक्ती, आत्मविश्वास, निर्भीडपणा, कष्टप्रवृत्ती, सहनशक्ती, आध्यात्मिकता, सकारात्मकवृत्ती, नेतृत्व, कला, वाचनाची आवड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामुळं घडलेलं त्यांचं अष्टपैलु व्यक्तिमत्व दिसून येतं.. 

एम.बी.बी.एस. नंतर डॉ नीतू यांनी हृदयविकार आणि हृदयशस्त्रक्रियांसंबंधीचं शिक्षण घेतलं तर डॉ अलका मांडके यांनी अ‍ॅनेस्थेशीयाचं.. हृदयविकारासंबंधी सखोल माहिती घेण्यासाठी, अद्यावत तंत्रज्ञान शिकण्यासाठी प्रथम ते ब्रिटनला गेले.. काही वर्षे तिकडे राहून नंतर अमेरिकेला गेले.. जगविख्यात डॉक्टर पिकासीओ आणि मागधी याकुब यांचे पुर्ण मार्गदर्शन त्यांना मिळाले.. परदेशात राहून जास्त पैसे कमावण्याचा पर्याय न स्वीकारता आपल्या देशाची सेवा करण्यासाठी ते परत भारतात आले.. ज्ञान मिळवण्यासाठी त्या दोघांनी केलेला स्ट्रगल वाचून अंगावर काटा येतो.. 
 
त्यांच्या कामाचा वेग, चपळाई, व कामातील सफाई बघून बाकीचे सर्जन लोकं अवाक होत.. अतिशय कार्यक्षम, सेवातत्पर, प्गाअनेक प्रसिध्द खेळाडुंच्या, नेते व अभिनेत्यांच्या वधानी, रूग्णांबद्दल आत्मीयता व तळमळ असलेले डॉक्टर म्हणून त्यांची किर्ती सगळीकडे पसरु लागली.. काही महिन्यांच्या बालकांपासून ते वृध्दांपर्यंत अनेक अवघड शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी करून दाखविल्या.. बाळासाहेब ठाकरे ते अनेक प्रसिध्द खेळाडू, नेते-अभिनेते ते सामान्य नागरिक असे अनेक रुग्ण मृत्युच्या दाढेतुन बाहेर काढले.. त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता.. ह्याकाळात अलकाताईंमधील स्त्री प्रतिभेचं दर्शन घडतं.. 

डॉ नीतू मांडके यांची स्वप्न पाहण्याची, महत्वाकांक्षीपणाची कक्षा खुपच भव्य दिव्य होती.. हृदयविकारांशी व हृदयशस्त्रक्रियांशी संबंधित आधुनिक व अद्ययावत सोयी सुविधांनी, आपत्कालीन यंत्रणांनी सुसज्ज असलेलं सुपर स्पेशॅलिटी रूग्णालय बांधणं हे ते स्वप्न.. आणि हे स्वप्न पूर्ण करण्याचा या जिद्दीने पेटून उठलेले डॉ नीतू.. हृदयविकारावरील उपचाराची किंमत पाहता शिक्षक, कलाकार आणि गरीब जनता ह्याकडून ते फी घेत नसत.. गरिबांवर आणि सर्वसामन्यांवर उपचार करण्यासाठी बांधत असलेलं २०० कोटीची गुंतवणूक असलेलं १८ मजली हॉस्पिटल.. बऱ्याच राजकीय सामाजिक व्यत्ययानंतर, बरेच चढउतार अनुभवून एकदाचं बांधकाम सुरु झालं.. पण त्याचं काम अर्ध्याहून अधिक पुर्ण होत असतानाच त्यांना देवाज्ञा झाली.. लाखो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचा हृदयाच्या झटक्यामुळं अवघ्या ५२ व्या वर्षी मृत्यू व्हावा हे दुर्दैव!.. त्यांच्या पश्चात डॉ. अलका मांडके यांनी त्यांचं स्वप्न रिलायन्स ग्रुपच्या मदतीनं साकारलं.. कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल या नावानं.. 'कोणाच्या मदतीनं का असेना पण नीतूचं स्वप्न सत्यात उतरलं' हे वाचताना खूप वाईट वाटतं.. पण तिथल्या कॉन्फरन्स रूम ला डॉ. नीतू मांडकेंचं नाव हे योग्य वाटतं..  

काळाच्या प्रवाहात पुढं वाहत जाण्याशिवाय पर्याय नसतो.. पण अशी काही माणसं असतात की जी स्वच्छेनं असं वाहणं डावलून आपल्या प्रवाहाची दिशा ठरवतात आणि पोहत राहतात.. असंच डॉ. नीतू मांडके हे एक व्यक्तिमत्व.. 'हृदयस्थ' हातात पडल्यापासून एका विलक्षण अवस्थेत दिवस गेले.. कधी गंभीर, कधी कणखर तर कधी डोळ्यांच्या कडा पाणावल्या.. 'माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला' हे जरी कितीही खरं असलं तरी डॉ. नीतू मांडकेंचा शेवट चुटपुट लावून जातो.. एका हृदयरोगतज्ज्ञांचा शेवट हृदयक्रिया बंद पडून व्हावा हे वाचून मन हेलावून गेलं.. 

अलौकिक जीवन गुणांचा ठसा उमटविणाऱ्या डॉक्टर नीतू मांडके यांच्या पवित्र स्मृतीला शतश: प्रणाम!! 


-मी मधुरा.. 

************************************************

२५. हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तमराव.. श्याम मनोहर.. 


श्याम मनोहर आफळे.. मराठी कथा-कादंबरीकार व नाटककार.. कादंबरीचे रूढ आकृतिबंध झुगारणारा, कादंबरीच्या नावातही वेगळेपणा जपणारा अवलिया लेखक.. माझ्या लिस्ट मधलं 'शंभर मी' हे त्यांचं पुस्तक.. पण उपलब्धतेअभावी 'हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तमराव..' ह्याची वर्णी लागली.. त्यांचा लेखनप्रकार समजायला क्लिस्ट असतो अश्या अभिप्रायामुळं जरा घाबरतच हे पुस्तक वाचायला घेतलं.. मलपृष्ठावरून पुस्तकाचा अंदाज बांधता येईना.. पहिलं पान उलटलं आणि "तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो, तू माझ्याशी वाईट वागलास की मी तुझ्याशी वाईट वागतो, मग माझं म्हणून काय असतं?" हे वाचून 'मानवी वर्तन' किंवा 'तत्वज्ञान' हा तर विषय नाही ना?.. अशी शंका आली.. चंद्रशेखर जहागीरदार ह्यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचल्यावर तर अधिकच गोंधळून गेले.. १५ पानी प्रस्तावना वाचायला आणि ती समजून घ्यायला मला दोन दिवस लागले.. 

सतत वावरणारी १५-२० पात्रं आणि त्याचा एकमेकांशी होणारा संवाद हे कादंबरीचं एकंदरीत स्वरुप.. कधी ही कथानायक विरहित कादंबरी वाटते तर कधी 'घडलेली घटना' हेच कथानायक वाटते तर कधी सगळी पात्रं कथानायक म्हणून आलटून पालटून समोर येत राहतात.. समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून आलेली ही पात्रं, त्यांचे एकमेकांशी येणारे संबंध, परस्परक्रिया, त्यांतील विसंगती, गुंतागुंत हे सगळं माणसां संबंधीची आस्था न सोडता आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्घतीनं लेखकानं व्यक्त केलंय.. पात्रांचे त्यांच्या जगण्यातून अनुभवास येणारे नैतिक प्रश्न, एखाद्या घटनेनंतर त्यांना होणारी अस्वस्थतेची तीव्र जाणीव त्याच्यातील संवादातून समोर येते.. पुस्तक जसजसं वाचत गेले तसतसं कथेचा, लेखनशैलीचा, 'बिटवीन द लाईन्स' वाचण्याचा अंदाज येत गेला आणि कथेत छान रमत गेले.. 

श्याम मनोहरांची ही कथा प्रामुख्यानं दोन पात्रांमधील एका घटनेभोवती फिरत राहते.. आणि संवादरूपानं पुढं पुढं सरकत राहते.. 
तर, साल-१९८३.. घटना स्थळ- तालुका स्तर बी-बियाणं ऑफिस.. ईश्वरराव आणि पुरुषोत्तमराव उच्चपदस्थ अधिकारी आणि मित्र.. सुखदेव, आत्माराम, काणे, यार्दी, खामकर, भोसले, जालिंदर, जोशी हे इतर कर्मचारी.. कथेच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांमधील संवाद.. 'एखादी गोष्ट केली किंवा झाली कि संपलं असं का होत नाही??..' ह्या बोलण्यातून ऑफिसमध्ये एक खळबळजनक घटना घडलेली आहे हे कळतं.. मध्येच एकजण 'ईश्वरराव थोबाडीत मरणाऱ्यातील नाहीत' असं म्हणतो.. तर लगेच दुसरा '...आणि पुरुषोत्तमराव खोटं बोलणाऱ्यातील नाहीत'.. मग तिसरा उत्स्पुर्तपणे म्हणतो 'ईश्वररावांनी खरोखर पुरुषोत्तमरावांच्या थोबाडीत दिली?'.. ह्या घटनेचा प्रत्येकाच्या विचारांवर, आयुष्यावर, परस्पर संबंधावर झालेला परिणाम हा पुस्तकाचा आशय.. ह्या बरोबरच प्रत्येकाच्या खाजगी आयुष्यातील घटना घडताना दिसतात.. यार्दीच्या नवजात बालकाच्या मृत्यूनं सगळ्यांच्या मनावर विचारांवर घेतलेला ताबा आणि त्यामुळं आलेली आयुष्याच्या लघुतेबद्दलची समजूतदार चमक कथेच्या शेवटी पाहायला मिळते.. साधं सरळ कथानक सवांदातून ज्या पद्धतीनं खुलवलंय ते वाचायला मजा येते.. 


-मी मधुरा.. 

***********************************************************

२६. साद देती हिमशिखरे.. कै. जी. के. प्रधान.. 
अनुवाद.. डॉ. रामचंद्र जोशी.. 


'साद देती हिमशिखरे'- कै. जी. के. प्रधान यांच्या Towards the Silver Crest of Himalayas' ह्या इंग्रजी कादंबरीचा डॉ रामचंद्र जोशी यांनी केलेला हा अनुवाद..  Towards the Silver Crest of Himalayas.. काहीतरी भन्नाट प्रवास वर्णन असणार.. मी केलेल्या ट्रेक शी मिळतंजुळतं वाचायला मिळणार म्हणून पुस्तक हातात घेतलं.. मलपुष्ठ वाचलं आणि गोंधळून गेले.. मलपृष्ठ न वाचताच एखादं पुस्तक घेतलं कि असंच होतं.. 'संसार टाकून परमार्थाची कास धरावी आणि अखेरीस हिमालयातील गुहेत, जेथे नियतीने आपली जागा राखून ठेवली आहे आणि जी आपणास स्वप्नात दिसली होती, तेथे जाऊन परमात्म्यासी अनुसंधान साधावे अशी ओढ एका अत्यंत बुध्दिमान आणि दर्जेदार खेळाडू असलेल्या तरुणाला लागते.'.. हे वाचल्यावर पुढं काय वाढून ठेवलं आहे ह्याची जाणीव झाली.. तत्वज्ञान, परमार्थ-अध्यात्म ह्याचं वावडं आहे असं नाही.. दासबोध, भगवद्गीता, भागवत हे मी वाचून समजून घेण्याचा प्रयत्न ही करते आहे.. आत्ता अश्या प्रकारचं पुस्तक वाचावं असं अजिबात वाटत नव्हतं.. पण पुस्तक आणलंच आहे तर वाचायचं म्हणून वाचायला सुरुवात केली.. तत्वज्ञानाचा काही भाग दोन-तीनदा वाचून सुद्धा डोक्यावरून गेला.. 

'माधव' हा ह्या कादंबरीचा नायक.. कथेची सुरुवात होते ती माधवला पडलेल्या एका स्वप्नानं.. स्वप्नांत तो एका हिमशिखरावर फिरत असतो.. तिथलं सौंदर्य डोळ्यांत भरून घेत असतो.. अचानक अंदाज चुकून दरीत पडणार इतक्यात एक साधूपुरुष त्याला सावध करतो.. घाबरलेला माधव त्यांच्या बरोबर एका गुहेत जातो.. गरम गरम दूध पिऊन हुशारी आल्यावर माधव जेव्हा जायला निघतो तेव्हा साधूपुरुष त्याला म्हणतो ही गुहा तुझीच आहे.. तुझ्या येण्याची आम्ही वाट पाहू.. आणि माधवला जाग येते.. ह्या विलक्षण स्वप्नानंतर त्याला सुखद अनुभूतीची जाणीव होते.. अभ्यासात खेळात अग्रेसर माधव ह्या घटनेचा साधुपुरुषाचा सतत विचार करू लागतो.. एक दिवस मित्राला सोबत म्हणून तत्वज्ञानावरील व्याख्यानाला गेलेला माधव व्याख्याता स्वामीजी आणि स्वप्नातील साधुपुरुष ह्यांच्यातील साम्य भेद शोधायचा प्रयत्न करतो.. स्वामीजींच्या बोलण्यानं भारावलेला माधव तत्वज्ञानाची पुस्तकं वाचायला सुरुवात करतो.. ह्यातून तो अध्यात्माकडं ओढला जातो.. गूढतत्वज्ञान आणि अध्यात्म ह्यांच्या मूलतत्वाचा शोध घ्यावा असं त्याला वाटू लागतं.. त्यामुळं तो त्याचा अधिकतर वेळ स्वामीजींच्या सानिध्यात घालवायला सुरुवात करतो..  

पुढं स्वामीजींचे गुरुदेव आणि माधव यांची भेट होते.. गुरुजींच्या विचारांनी प्रभावित माधव त्याच्या सानिध्यात राहू लागतो.. गुरुदेवांच्या तत्वज्ञानातून त्याला चिरंतर सुखाचा मार्ग सापडतो.. सांसारिक भौतिक सुखं सोडून अध्यात्माचा ध्यास घेऊन अखेरीस 'हिमालयातील त्या गुहेत' जिथं नियतीनं जागा राखून ठेवली होती, जी जागा स्वप्नात दिसली होती, तिथं जाऊन माधवच परमात्म्याशी अनुसंधान होतं.. 

सुख-समाधान-शांती, तंत्र-मंत्र-साधना, गुरुचं महत्व, श्रद्धा-भक्ती-समर्पण, सत्य-असत्य, ईश्वरचं असणं-नसणं, ऐहिक-अध्यात्मिक-पारमार्थिक सुख ह्यावर गुरुदेवांनी वेळोवेळी केलेली प्रवचनं, चर्चा ह्यातून माधवाचा अध्यात्मिक प्रवास घडत जातो.. ही प्रवचनं, ह्या चर्चा ह्याचा सविस्तरपणे पुस्तकांत उल्लेख केला आहे.. एकंदरीत अध्यात्मिक मार्गातील साधकांना, अध्यात्म मार्गाचा शोध घेणाऱ्या शोधकाला हे पुस्तक म्हणजे समृद्ध करणारा अनुभव आहे..   


-मी मधुरा.. 

************************************************

२७. रामनगरी.. राम नगरकर.. 



'रामनगरी' ह्या पुस्तकाचा उल्लेख जेव्हा 'must read' पुस्तकांत आला तेव्हा हे नेमके कोण राम नगरकर म्हणून मी गूगल केलं.. पण 'रामनगरी' वगळता त्यांच्या बद्दल फारशी माहिती मिळाली नाही.. निळू फुलें बरोबरच्या काही चित्रपटात त्यांचं नाव दिसलं तर 'विच्छा माझी पुरी करा' ह्यात दादा कोंडकें बरोबर.. 'रामनगरी' पुस्तक - 'रामनगरी' चित्रपट - 'रामनगरी' एकपात्री प्रयोग ते ही फक्त मराठीत नाहीत तर इंग्रजीत ही!.. आणि त्यामुळं 'रामनगरी'ला आत्मचरित्रांतला एक मानदंड समजलं जातं.. हे वाचून माझी 'राम नगरकर' ह्या व्यक्तिमत्वाबद्दलची उत्सुकता वाढली..   

'रामनगरी' हे पुस्तक वाचायला घेतलं.. रामची रामनगरी - पु.ल.देशपांडे.. अशी प्रस्तावना वाचल्यावर 'राम नगरकर' ह्या माणसाच्या उंचीचा अंदाज घेणं अवघड झालं.. केवळ २०० पानाच्या ह्या आत्मकथेला पु.लं.ची ५ पानी प्रस्तावना.. अजब आहे सगळं.. असं म्हणत मी पुस्तक वाचायला सुरुवात केली.. (दिवाळी असल्यानं) एका बैठकीत नाही पण दोन दिवसात वाचून काढलं.. विनोदी ढंगानं लिहिलेली ही आत्मकथा मनाला चटका लावून गेली.. 

राम नगरकरांचे वडील पेशानं न्हावी तर आई तमाशाची पार्श्वभूमी असलेली.. संगीत तसं त्यांच्या रक्तातच.. तमाशा-कलापथक-लोकनाट्य-नाटक-सिनेमा हा प्रवास घडतो तो ह्या 'रामनगरी'त.. ह्या नगरीतील रामाचं जगणं, ते जगणं जगताना आलेले नानाविध अनुभव, अपमानाचे प्रसंग, आलेली कटुता, झालेली फजिती हे वाचताना पोट धरून हसू ही येते तर माणसाच्या स्वभावातील विसंगती, अहंकार, उपेक्षा, समाजातील जातींच्या उतरंडीनं आलेले मानहानीचे प्रसंग वाचताना चिमटे ही बसतात.. 

एका सोंगाड्यानं, एका विनोदी माणसानं स्वतःच्या आयुष्याची गुणदोषांनीयुक्त अशी सांगितलेली ही गोष्ट.. ह्या जीवनकहाणीचा कालावधी फार मोठ्ठा नसल्यानं ह्याला आत्मचरित्र न म्हणता आत्मकथा म्हणणं योग्य होईल असं मला वाटतं.. ह्या कथेत आज्जा मारुती, वडील विठोबा, आई गोदा, बायको राधा यांचा उल्लेख वारंवार येतो..  स्वतःचा जन्म आणि शेजाऱ्याच्या घराला लागलेली आग, बापाचं हा जन्मताच पळून जाणं त्यामुळं मिळालेलं पांढऱ्यापायाचं हे बिरुद.. आजोळी मामाच्या तमाशातलं त्याच सोंगाड्यापण.. रेडिओवर गाण्यासाठी घरातून पळून जाणं.. तिथं अपयश आल्यावर परत येऊन पोष्ट खात्यात नोकरी करणं.. गाणं-नाटकामुळं राष्ट्रसेवादलाशी झालेली ओळख.. आणि नंतर बदलत गेलेलं आयुष्य म्हणजे रामनगरी..

रामनगरीतील काही प्रसंग जसं त्यांचं रेडिओमधील नोकरीसाठी घरातून पळून जाणं, स्वतःच्या लग्नाला जाताना त्यांनी घेतलेली थडग्यावरची विश्रांती असं काही लेख रूपात पूर्वी वाचलं होतं.. 

चांगभलं! ऋणनिर्देशला दिलेलं नाव.. स्वतःच्या आयुष्याचा देवतेसमोर, जोतिबासमोर नाचणारी काठी असा केलेला हा उल्लेख.. 'सुजाण वाचकांच्या रंगशिळेसमोर माझी काठी नाचवायला मी उभा आहे '.. असं त्यांचं म्हणणं किती सार्थ आहे हे पुस्तक वाचल्यावर कळतं..    

'राम नगरकर यांची रामनगरी' हा एकपात्री प्रयोग ऑडिओ रूपात youtube वर आहे.. त्यांच्याच आवाजात त्यांचा हा प्रवास नक्कीच ऐकायला आवडेल.. 

-मी मधुरा.. 

************************************************

Thursday, September 29, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं १८ ते २३)

 १८. कोसला.. भालचंद्र नेमाडे.. 



कोणती पुस्तकं वाचायची याचा शोध घेत असताना, भालचंद्र नेमाडेंचं 'कोसला' हे 'must read'- 'वाचायलाच हवं' ह्या श्रेणीत होतं.. भालचंद्र नेमाडे हे नाव मी ऐकलेलं पण नव्हतं.. खरं सांगायचं तर मी मोजक्याच काही लेखकांचं साहित्य ह्यापूर्वी वाचलं होतं.. 'भालचंद्र नेमाडें' हे नाव गूगल केलं तर त्यांच्या बद्दल आणि ह्या कादंबरीबद्दल मिळालेली माहिती अचंबित करणारी होती.. ज्ञानपीठ आणि साहित्य अकॅडमी पुरस्कार विजेते पद्मश्री भालचंद्र नेमाडे.. मराठी साहित्यातील नावाजलेलं नाव आणि कोसला ही त्यांची पहिली आणि सर्वात जास्त विक्री झालेली कादंबरी!.. १९६३ मध्ये प्रकाशित झालेल्या 'कोसला'च्या आत्ता पर्यंत २५ पेक्षा जास्ती आवृत्ती असून त्याचं  आठ साऊथ एशियन भाषांबरोबरच इंग्लिश मध्ये भाषांतर झालंय.. अबब!!.. आणि भारतातून आणायच्या पुस्तकांच्या यादीत 'कोसला'ची नोंद झाली.. आणि शिपमेंट मिळायचाच अवकाश लगेचच वाचायला ही घेतलं..

खानदेशातील सांगवी नावाच्या खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला आपल्या कथेचा नायक 'पांडुरंग सांगवीकर'.. १९६० दशकातील तरुण प्रतिनिधी.. याचा जीवनप्रवास म्हणजे 'कोसला'.. First Person Perspective - प्रथम पुरुषी कथानकामध्ये हा जीवनप्रवास मांडल्यानं हे एक आत्मकथन म्हणून आपण वाचतो.. डायरी पद्धतीनं ह्यातील बराचसा भाग लिहिला आहे.. व्याकरण, प्रमाणभाषा ह्याला खाट मारून ग्रामीण बोली भाषा वापरल्यानं वेगळ्याच ढंगात हे आत्मकथन रंगतं.. पांडुरंगाच्या जीवनप्रवासात त्याचं कॉलेज, वस्तीगृह, मित्र आणि त्यांच्या टोळ्या, त्यांचा खोटेपणा, उथळ प्राध्यापक याचबरोबर वक्ते-पुढारी आणि त्यांचं समाजकारण, राजकारण, आध्यात्म, लग्न-नातेसंबंध असे अनेक विषय येतात आणि ह्यामुळं तुटत चाललेला पांडुरंग कधी उद्वेगानं, कधी गंभीरतेनं, कधी चिडून, कधी उपरोधानं, कधी तुच्छतेनं जगण्यातील विसंवाद, विसंगती मांडत राहतो.. हे पुस्तकं एका बैठकीत वाचून संपवण्यासारखं नक्कीच नाही.. काही प्रसंग वाचल्यावर पुस्तक बाजूला ठेवून त्यावर विचार करावासा वाटतो.. किंवा आता बास म्हणून पुस्तक मिटलं जातं.. पुस्तकाची सुरुवात म्हणजे पांडुरंगाचं बालपण हलकं फुलकं, मजेशीर पण थोडं खोचक असं आहे.. जशी कथा उभारत जाते तशी ती वाचकाच्या मनाचा ताबा घ्यायला सुरुवात करते.. पुस्तक संपता संपता emotionally drain व्हायला होत.. 

पुस्तकाच्या पहिल्या पानावरच 'शंभरातील नव्यान्नवास' असं लिहून लेखकानं कथेचा नायक पांडुरंग हा आपल्या सारखाच सर्वसामान्य आहे हे सांगितलं आहे.. खेड्यात राहणारा, खेड्यालाच आपले विश्व समजणारा आणि त्या विश्वात आत्मविश्वासानं वावरणारा सधन कुटुंबातील पांडू मॅट्रिक नंतर उच्च शिक्षणासाठी पुण्याला येतो.. डोळ्यांत भविष्याची उज्ज्वल स्वप्नं घेऊन.. पहिल्याच वर्षी कॉलेजच्या डिबेटिंग सोसायटीचा सेक्रेटरी, हॉस्टेलचा प्रीफेक्ट बनतो, गॅदरिंगला नाटक ही दिग्दर्शित करतो.. पण हे सगळं करताना तो त्याच्याच मित्रांकडून वाईटरित्या फसवला जातो.. शिक्षकांचा आणि घरच्यांचा विश्वास गमावून बसतो.. आणि कमीपणाची भावना न्यूनगंड निर्माण करते.. आणि त्यातूनच मग सुरु होते त्याची बंडखोरी.. बेजबाबदारपणा, टवाळक्या करणं.. ह्यात कॉलेजची वर्षे वाया जातात.. परिणाम अयशस्वी आयुष्य.. शिक्षण नसल्यानं नोकरी नाही.. आणि शहरात राहिल्यानं खेड्यात करमत नाही.. यातून त्याला आलेली जगण्यातील उदासीनता.. लहान बहिणीच्या अकस्मात मृत्यूनं तो आधीच भावभावनांपासून अलिप्त झालेला असतो.. त्यांत त्याचं साधू महंत यांच्या नादी लागणं, अध्यात्मिक वाचन आणि त्यातून अधिकच जगण्यातला फोलपणा जाणवू लागतो.. शिक्षणामुळं, पुण्यातील पुरोगामी विचारांमुळं त्याच्यातील बदललेल्या जीवनमूल्यांशी त्याला करावी लागणारी तडजोड.. शेवटी तो आहे त्या परिस्थितीला शरण जाऊन तटस्थपणे जीवन जगण्याचा निर्णय घेतो.. तो त्याच्या भोवती एक कवच तयार करतो.. हे कवच म्हणजेच ककून म्हणजेच कोशिटा म्हणजेच कोसला!.. 

ह्या कादंबरीची सफलता विषयाबरोबरच भालचंद्र नेमाडेंच्या लेखनशैलीची पण आहे.. इतका गंभीरविषय खूपच सचोटीनं मांडला आहे.. पांडुरंग आणि त्याच्या मित्रांच्या भटकंतीचे प्रसंग अंगावर रोमांच आणतात तर त्याच्या लहान बहिणीचा मृत्यू डोळे ओले करतात.. पांडुरंगाचा अस्वस्थपणा आपल्याला ही अस्वस्थ करून सोडतो.. 

वैयक्तिक सांगायचं झालं तर.. मी पण माझ्या शिक्षणासाठी लहान गावातून शहरात गेली आहे.. माझ्या आसपास अशी उदाहरणं ही पाहिली आहेत.. उदासीनतेमुळं तेव्हा ही टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या होत होत्या आणि आता ही होतात.. वर्षानुवर्षे, पिढ्या बदलल्यातरी हे होतच आहे.. समाज म्हणून आपण फोल गेलो आहोत का? ह्याकडं गांभीर्यानं पाहायला हवं.. 

-मी मधुरा.. 

***************************************************

१९. गोफ.. गौरी देशपांडे.. 


सासू आणि सून या नातेसंबंधातील गुंतागुंत, त्यातील वेगवेगळी भावस्पंदनं यांचा हा हृदयस्पर्शी गोफ.. 

'गौरी देशपांडे' विसाव्या शतकातील आधुनिक स्त्रीवादी साहित्यिका.. पुरोगामी विचारसरणीचा वारसा असलेल्या धोंडो केशव कर्वे यांची नात.. प्रसिद्ध लेखिका, मानववंश शास्त्रज्ञ इरावती कर्वे यांची कन्या.. कौटुंबिक पार्श्वभूमी, पाश्चात्य देशातील वास्तव्य, सांस्कृतिक परिवर्तन यातून घडलेलं त्यांचे व्यक्तिमत्व.. आणि ते वेगळेपण सिद्ध करणारी, वाचकास अंतर्मुख करणारी अशी त्यांची लेखनशैली.. व्यक्तिस्वातंत्र्य, माणूसपणा, स्त्रीजाणिवा हा त्यांच्या लेखनाचा गाभा.. 
 
'गोफ'.. माँ (सासू) आणि वसुमती (सून) दोन सामर्थ्यवान स्त्रियांमधील परिस्थितीमुळं बदलत जाणाऱ्या नात्याचा विणलेला गोफ.. 'वसुमती' स्वतंत्र बाण्याची तडफदार नायिका.. तर 'माँ' एक पारंपरिक स्त्री.. घुंगट ही पाळून राहिलेली.. जगण्याच्या गरजेतून कर्तबगार झालेली.. दोघींचा लढा एकच.. व्यसनाधीन नवरा आणि त्याच्या मृत्यूनंतर मिळालेलं एकटीनं मुलाला मोठं करण्याचं आव्हान.. त्यात कोळपत गेलेलं तारुण्य.. पोटाच्या पोराला गमावल्यावर 'माँ'साठी हा प्रवास अजुनी ही खडतर..

'सुलक्षण'च्या मृत्यू बरोबरच माँ आणि वसुमती यांचं सुलक्षणशी असलेलं आई आणि बायको नातं संपून उरतं ते फक्त सासू-सून हे नातं.. जे नातं सुलक्षण असताना ही कधी आकारच घेऊ शकलं नाही.. ‘सुलक्षण’ गेला तो त्याच्या अति व्यसनांपायी  कमजोर होऊन.. पण 'सासूच्या लाडाकोडानं तो बिघडला' असं वसुमतीचं म्हणणं तर 'इतकी खमकी होती तर माझ्या मुलाला हिनं असं कसं जाऊ दिलं?' असं माँ च.. त्याच्या जाण्यानं उध्वस्त झालेलं दोघींचं जग, त्यांत उरलेल्या धागेदोऱ्यांना न जुमानता वसुमतीचं माहेरी राहणं, तिनं हट्टानं निवडलेलं तडजोडीचं आयुष्य, त्यातून मार्ग काढत तिला तिच्या हक्काच्या घरी आणण्यापर्यंतचा प्रवास लेखिकेनं मोठ्ठ्या ताकदीनं उभा केला आहे.. कालांतरानं सहवासानं सासू आणि सून हे नातं विसरून त्या कश्या एकमेकींकडं ‘माणूस’ म्हणून बघू लागतात आणि त्यातूनच मायेचा, प्रेमाचा, आपुलकीचा, समजुतीचा नवा गोफ कसा विणला जातो हाच या कादंबरीचा ‘धागा'.. 

कादंबरीत माँ आणि वसुमती ही दोनच पात्रं आहेत.. कथा उलघडत जाते अशी इतर पात्रं समोर येतात पण ती 'माँ' आणि 'वसुमतीच्या' निवेदनातून भेटत राहतात..  

'माँ': दोन पिढयांना समजून घेणारी, त्यांना स्वीकरणारी, आयुष्यातील टप्पेटोणप्यांना धीरानं सामोरी जाणारी, समजूतदार, पोक्त अनुभवी स्त्री.. लग्न म्हणजे काय हे कळायच्या आतच जेमतेम सोळाव्यावर्षी गर्भवती असलेल्या 'माँ' विधवा होतात.. जन्माच्या जोडीदाराबरोबरच संसारसुख ही गेलं.. पोटाच्या पोराला घेऊन कुठं जायचं? कोणाच्या तोंडाकडं पाहायचं? माहेरी जायचं का सासरी राहून मुलाला त्याच्या हक्क मिळवून द्यायचा?.. मुलाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्या सासरी राहून जीवाचं रान करतात पण हे सगळं मिळवत असताना बाकीचे कुटुंबीय मायलेकांत विष कालवतात.. ज्याच्यासाठी हे केलं तो ते सगळं लाथाडून नाटक सिनेमाच्या धंद्यात जातो.. स्क्रिप्ट रायटर म्हणून.. परस्पर लग्नही करतो.. पहिल्यांदा सासरी आलेल्या सुनेचं, वसुमतीचं स्वागत केलं ते ‘वसुमती, ये बेटा' म्हणून.. कोठेही नाराजी न दाखवता.. 'बेटा' हे शब्द ऐकल्यावर वसुमती खडीसाखरेसारखी विरघळली आणि सासूच्या पाया पडली.. किती तो धोरणीपणा, किती ती सुज्ञता, किती तो व्यवहारीपणा.. 

‘वसुमती’: चाळीशीला आलेली उच्चशिक्षित, १२ वर्षाच्या मुलाची आई.. तसा तिचा आणि सुलक्षणचा १४-१५ वर्षाचा संसार.. सुरुवातीचे नवनवालईचे दिवस संपतात ते सुलक्षणाच्या कुलक्षणाच्या ओळखीत.. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो.. आदित्यच्या जन्मानंतर काही वर्ष चांगली जातात.. पण एक रात्री बेशुद्ध अवस्थेत सुलक्षणला पाहून तिच्या लक्षात येतं की आता त्याला कोणीही वाचवू शकत नाही.. आपलं किंवा मुलाचं प्रेमही नाही! व्यसनी वडिलांची मुलावर सावली ही पडू नये म्हणून ती त्याला होस्टेलला पाठवते.. एका सुशिक्षित व्यसनी नवऱ्याच्या बायकोच्या वाट्यालाजे  येतं ते सारं वसुमतीच्या वाट्याला येतं.. सुलक्षण सारख्या बुद्धिमान माणसाचा असा ‘ऱ्हास’ व्हावा आणि तो मी उघड्या डोळ्यांनी बघावा त्याची चीड वसुमतीच्या मनात असते.. हळूहळू मृत्यूकडं सरकरणारा 'सुलक्षण' या जगातून निघून जातो.. जो वसुमतीच्या लेखी आधीच गेलेला असतो.. प्रत्यक्ष तिची आईही म्हणते 'सुटलीस बाई'.. पण तरीही खूप काही गमावल्याची भावना का सुलक्षण वरचा राग  तिला छळत राहतो.. अजुनी त्रासात राहिलो तर हा त्रास कमी वाटेल म्हणून कि काय ती आई आणि वहिनीच्या त्रासात माहेरी राहणे पसंत करते.. बाहेर नोकरी करून मोलकरणीसारखी घरची कामं पण करते..  

अश्या ह्या दोन सामर्थ्यवान स्त्रियांच्या नात्याचा गोफ विणण्याचं काम करतो 'धर्मकीर्ती'.. एक बुद्धधर्म स्वीकारलेला अमेरिकन.. धर्मकीर्ती बरोबरच 'आदित्य' वसुमतीचा  मुलगा, 'जसपाल' वसुमतीचा मित्र, 'आनंद' माँ चा मानलेला मुलगा आपल्याला भेटत राहतात.. धर्मकीर्तीच्या तोंडाची वाक्यं मनात घर करून राहतात..   
* "आपण ज्याला दान करतो, तोच आपल्यावर खरं तर उपकार करत असतो"
* "स्वतःशी इमानदारी करायची तर कधीतरी दुसर्याशी बेमानी करायलाच लागते"
* "आपसूक हाती आलेल्या गोष्टींची माणसाला किंमत वाटत नाही. वाटते, ती धडपड, कष्ट करून मिळवलेल्या श्रेयाची!"

१२० पानांचा हा गोफ एका दिवसांत वाचून संपवला.. 'गौरी देशपांडे' लिखाण समजायला कठीण असलं तरी मला ते खूप आवडलं.. आता 'एक एक पान गळावया..' च्या प्रतीक्षेत.. 


-मी मधुरा.. 

***************************************************

२०. बारोमास.. सदानंद देशमुख.. 



'बारोमास' सदानंद देशमुख यांची साहित्य अकादमी पुरस्कार विजेती कादंबरी.. शेतकरी आणि शेतीचे वास्तव दाखवणारी, ग्रामीण जीवनाचा व्यापक वेध घेणारी एक शोकांतिका.. कमालीचा ज्वलंत विषय पण सहज सोप्या बोलीभाषेतील कथात्मक लिखाणामुळं वाचली जाते.. विश्वास पाटलांचं 'झाडाझडती' वाचल्यानंतर असे सामाजिक विषय असणाऱ्या कादंबऱ्या वाचायचं टाळलं होतं.. पण नुकत्यात 'ब्र' वाचून प्रभावित झाल्यानं हे पुस्तक वाचायचं ठरवलं.. 

भारतासारख्या कृषिप्रधान देशातील कृषिव्यवस्था म्हणण्यापेक्षा भारतीय समाजव्यवस्था आणि गल्ली पासून दिल्ली पर्यंत चालणारं राजकारण.. आणि त्यांनी घेतलेले शेतकऱ्याचे बळी हे काही आपल्याला नवीन नाही.. शेतकरी कुटुंबाचा वारसा असलेल्या मला ह्या परिस्थितीची जाणीव होती पण त्याची आच कधी जाणवली नव्हती.. कदाचित पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाची शेती पाहिल्यानं असेल.. किंवा भरपूर पाण्याच्या आणि सुपीक जमिनीच्या वरदहस्तामुळं असेल.. पण जेव्हा पारंपरिक शेती-आधुनिक शेती अशा पेचात सापडलेल्या शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित-संवेदनशील तरुणांच्या खडतर जीवनाचं चित्रण 'बारोमास' कादंबरीतून घडलं तेव्हा सुन्न व्हायला झालं.. सुशिक्षित पण लाच द्यायला पैसे नाहीत म्हणून केवळ शेती करणारा तरुण.. नोकरी नाही, शेतीत पैसा नाही म्हणून नाउमेद झालेला आणि बुवाबाजीच्या नादी लागलेला तरुण.. आर्थिक विवंचनेतून होणाऱ्या आत्महत्या.. शेती व्यवसाय करणाऱ्या मुलांचा विवाहाचा मुद्दा.. शेतकरी संघटना.. शेतकरी चळवळ.. पतसंस्था आणि त्यातील राजकारण.. अश्या अनेक गोष्टी आपल्याला अस्वस्थ करतात.. आणि हे अखंड सुरु आहे म्हणून कादंबरीचं नाव 'बारोमास' म्हणजे बारा महिने.. सतत, अविरतपणे सुरु असलेली शेतकऱ्याची परवड..  

चारशे पानांची भरघोस आणि घसघशीत जीवनदर्शन घडवणारी 'बारोमास' ही कादंबरी एका नायकाभोवती फिरत असली तरी त्या नायकाचं सगळं कुटुंब, त्याच्या आजूबाजूचा समाज हे कथेचं कथानक आहे.. आणि शेतीला पार्श्वभूमी आहे ती जागतिकीकरणानंतरच्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीची.. तर कथेचा नायक एकनाथ तनपुरे.. एम.ए.बी.एड. झालेला सुशिक्षित तरुण.. कुटुंबात आई शेवंतामाय अस्सल शेतकरी, वडील सुभानराव माळकरी, लग्न झालेली मोठ्ठी बहीण मंगलाक्का, सुशिक्षित पण बेकार लहान भाऊ मधू आणि एकनाथची शहरी, शिकलेली बायको अलका जिनं एकनाथच्या शिकक्षणाकडं पाहून त्याच्याशी लग्न केलंय.. लाच न देऊ शकल्यानं एकनाथ वडिलोपार्जित शेती करू लागतो तर त्याचा धाकटा भाऊ शेती न करता गुप्तधनाच्या शोधार्थ लागतो.. नोकरीतून मिळणारं स्थैर्य व सुखासीनता शेतीमध्ये मिळू शकत नसल्यानं एकनाथची व त्याच्या कुटुंबाची घुसमट सुरु होते.. शेती व्यवसायाला नाराज अलका कायमची माहेरी निघून जाते.. शिक्षण आहे पण नोकरी नाही, शेती आहे पण पिकत नाही, लग्न झालंय पण संसार नाही अशी एकनाथची परिस्थिती.. आर्थिक स्थैर्याच्या अभावामुळं भावाभावात संबंध बिघडू लागतात.. गुप्तधन मिळवण्यात अपयशी झालेला मधू नोकरीच्या दलालाच्या जाळ्यात चांगलाच अडकतो आणि सुपीक शेती सावकाराकडं गहाण टाकतो.. ना नोकरी मिळते ना शेती परत मिळते.. ह्या धक्क्यानं वडील सुभानराव आत्महत्या करतात.. इकडं कर्जाला कंटाळून मंगलाक्काचा नवरा ही आत्महत्त्या करतो.. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेचा पाश एकनाथच्या कुटुंबाभोवती आवळला जातो.. आणि त्यात अख्ख्या कुटुंबाचा ऱ्हास होतो.. यात लहरी निसर्ग, सावकार, बॅंका, भ्रष्ट सरकार आणि त्यांचे राजकारण, रोजंदारीवरील गडी असे सगळेच घटक आपापली भुमिका अगदी चोख बजावतात..

खरं सांगायचं तर मला ही कादंबरी फारशी भावली नाही.. लिखाणांत ग्रामीण भाषेचा लहेजा वाचायला छान वाटला पण हा विषय अजुनी खूप वेगळा मांडता आला असता असं वाटलं.. शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचं खडतर जीवन खोटं आहे असं अजिबातच नाही पण ज्या पद्धतीनं शेतकरी हा लढा लढतो आहे ती हिम्मत इथं दिसली नाही.. प्रत्येक ठिकाणी नकारात्मकता जास्ती जाणवली.. 

कादंबरी वाचल्यावर वाटलं- बास झालं आता.. 'इडा पीडा टळो आणि बळीराजाचं राज्य येवो..' 


-मी मधुरा.. 

***************************************************

२१उद्या.. नंदा खरे.. 



नंदा खरेंची 'अंताजींची बखर' आणि 'बखर अंतकाळाची' ही पुस्तकं माझ्या लिस्ट मधली.. ती उपलब्ध नसल्यानं आणि "नंदा खरेंच हे पुस्तक वाचून बघ" ह्या दुकानकारकाकांच्या सल्ल्यानं 'उद्या' ह्या पुस्तकाची वर्णी लागली.. २०२० मध्ये 'उद्या'ला साहित्य अकॅडमीचा पुरस्कार जाहीर केला होता पण नंदा खरेंनी तो नाकारला.. इति काका.. 'डिस्टोपियन नॉवेल' ह्या प्रकारात हे पुस्तकं मोडतं म्हणजेच भविष्यकाळाच्या गंभीर चित्रणातून जागतिक, सामाजिक, तांत्रिक, आर्थिक बदलांवर केलेली तीव्र टीका.. असं ह्याचं स्वरूप.. अजुनी काकाच बोलत होते.. वेगवेगळे लेखनप्रकार वाचणार आहेस ना मग हे वाचंच.. 

पुस्तक वाचायला घेतलं.. पहिल्या दोन पानांतच खूप कंटाळा आला.. काय वाचते आहे काहीच कळत नव्हतं.. अजुनी चार पानं वाचून पाहू म्हणून वाचत राहिले.. ना भाषेचा अंदाज येईना ना विषयाचा.. नुसते शब्दानंतर शब्द आणि वाक्यांनंतर वाक्य.. कधी ती प्रमाण मराठीत तर कधी ग्रामीण तर कधी हिंदीत तर कधी इंग्रजीत.. मध्येच कधी तरी पकड जाणवायची आणि लगेच सुटून जायची.. रोज २५-३० पानं वाचत कसंतरी २८५ पानांचं पुस्तक पूर्ण केलं..  

‘उद्या’ कादंबरी म्हणजे मनुष्याच्या तात्त्विक उत्क्रांतीचा कथात्मक शोध.. मानवाच्या मूल्यात्मक उत्क्रांतीचा पट.. एकूण १५ कथांचा हा पट.. सुरुवातीला कथा वेगळ्या वाटल्या तरी नंतर त्या एकमेकांत गुंतत जातात.. गुहेत राहणारा, शिकार करणारा माणूस सामाजिक-राजकीय व्यवस्था निर्माण करतो.. नंतर ह्या व्यवस्थेशीच त्याचा संघर्ष सुरु होतो..  ज्या तंत्रज्ञानाचा, ज्या व्यवस्थेचा आधार माणसानं घेतला त्याच तंत्रज्ञानाच्या, व्यवस्थेच्या सापळ्यात तो अडकत तर नाही ना?.. अनेक तत्त्वप्रणाली, अनेक राजकीय प्रणाली ह्यात त्याचं स्वातंत्र्य हरवत तर नाही ना?.. असं उद्या वाचताना जाणवतं.. 

वैश्विक पातळीवरचं साम्राज्यवादी जाळं हे या कादंबरीचं कथानक.. तांत्रिक सुखसोयींबरोबरच आलेला सर्वेलन्स, चेहऱ्यांवरचे बारीक हावभाव टिपणारं सॉफ्टवेअर, कॅमेरे, अस्तित्व-कार्ड ह्यामुळं हरवलेलं स्वातंत्र्य.. 'गर्ल्स हंटिंग', स्त्रियांचं घटतं प्रमाण.. शालेय शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत मूल्यवृद्धीच्या मोहात अडकलेले तरुण.. अशी पोट कथानकं.. मुख्य चार कथानकं.. वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांत गुंफलेली..  

कथानकाची सुरुवात होते मुंबईकर लेखनिक-अनुवादक 'सुदीप जोशी'च्या कथेनं..  सुदीप, महानगरातील माणसांच्या लोंढ्यातील हा एक सुशिक्षित, पांढरपेशा कामगार.. ज्याला खाजगी आयुष्य असं नाहीच.. 'अस्तित्व' कार्ड हरवल्यावर त्याच डळमळलेलं अस्तित्व.. आणि आश्रयासाठी त्याचं एका राजकीय दलात सामील होणं.. हे ह्या कथेचं स्वरूप.. दुसरं कथानक विदर्भातलं.. तिनखेडा गावातलं.. कॉलेजच्या मुलांना उच्चशिक्षणाची, नोकरीच्या चांगल्या संधींची ओळख करून देणारे भाकरे गुरुजी.. जे त्यांचा बौद्धिक आणि मानसिक आधार आहेत.. तिसरं कथानक हैद्राबाद मधले उच्चपदावरचे सरकारी सनदी अधिकारी जोडपं 'अनू आणि अरुण सन्मार्गी'.. यशस्वी आणि सुखी.. अनू कायम आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर आणि अरुण 'एक्सप्रेशन रेकग्निशन' या नवीन तंत्रासाठी नावाजलेला तंत्रज्ञ.. जागतिक पातळीवरच्या घोटाळ्यात त्यांचं अडकणं.. आणि चौथं कथानक दिल्लीस्थित 'सानिका धुरू'च.. एक धाडसी पत्रकार जी एक हटके स्टोरीसाठी विदर्भाच्या नक्षलवादी भागातील एका जंगलातील गावात जाऊन राहते.. तिथे ती निराळीच जीवनपद्धती अनुभवते.. त्यावर पुस्तक लिहायचा निर्णय घेते.. पण नक्षलवाद्यांकडून मारली जाते.. 

ही सगळी कथानकं एकत्र येण्याचा हिंसक उत्कर्षबिंदू घडतो तो विदर्भातल्या जंगलात.. अत्यंत परिणामकारक शेवटातून..


-मी मधुरा.. 

***************************************************

२२. तिमिरपंथी.. ध्रुव भट्ट.. 
अनुवाद.. सुषमा शाळीग्राम..  


अंधारातील कृतिप्रवणता हीच जीवनशैली असणार्‍या जमातीवरील अनोखी कहाणी.. 

आशयघन कविता आणि गूढ-रहस्यमयी कादंबऱ्या लिहिणारे गुजराती साहित्यिक 'ध्रुव भट्ट'.. 'वाचायलाच हवेत असे लेखक' ह्यात अग्रक्रमांकावर असणारे, साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळवणारे, ज्यांच्या कथानकांवर चित्रपट बनतो असे हे 'ध्रुव भट्ट'.. ह्या लेखकाचं अजुनी एक वैशिष्टय म्हणजे ज्या प्रदेशातील कथा ते सांगतात तिथं स्वतः जाऊन, राहून, अनुभव घेऊन मगच लिहितात.. त्यामुळं त्यांच्या कथा प्रामाणिक आणि सत्याच्या जवळ जाणाऱ्या असतात.. अनुवादित लेखन प्रथमच वाचत असल्यानं, 'वाचताना मजा येणार का?' ही शंका नक्कीच मनात होती.. पण अगदी पहिल्या पानापासूनच पुस्तकाची पकड जाणवली.. 'बॉर्न क्रिमिनल्स' ही ओळख असणारा समाज, तिथली एक वेगळीच दुनिया आणि त्या दुनियेची एक वेगळीच दुनियादारी म्हणजे 'तिमिरपंथी' कादंबरी..

'तिमिरपंथी' म्हणजेच 'रात्रीचे प्रवासी'.. चौर्य (चोरी) कला हा व्यवसाय करणारी पण त्यात नैतिकता बाळगणारी, पोटापाण्यासाठी गावोगाव भटकणारी अशी ही भटकी जमात 'तस्कर' जमात.. अश्याच एका भटक्या पाड्यावर राहणारी, आई 'तापी'कडून गौरवर्णी लावण्य आणि पिता 'रघु'कडून चौर्य कामगिरीतलं कसब मिळालेली सरस्वती उर्फ सरसती उर्फ 'सती'.. जिज्ञासू, चौकस, धाडसी असणारी 'सती'.. समयसूचक आणि प्रसंगावधानी 'सती'.. ऐकलेल्या गोष्टींवर स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता असणारी 'सती'.. आपली कथानायिका.. पाड्यातील अशिक्षित सती ते पाड्यातील मुलांसाठी शाळा काढण्याचं स्वप्न पाहणारी सती ह्या तिच्या प्रवासाभोवती कथनाक फिरत राहते.. 

पाडीवर स्वच्छंद आयुष्य जगणारी अल्लड सती योगायोगानं, शहरातील ब्रिटिश सरकारनं अश्या जमातीसाठी तयार केलेल्या सेटलमेंट मध्ये, आपल्या आजीकडं राहायला येते.. सुरुवातीला गोंधळली सती लवकरच शहरातील नवीन वातावरणाशी जुळवून घेते.. आजीच्या पाठिंब्यामुळं थोडंफार लिहावाचायाला ही शिकते.. आजीच्या गोष्टीतून, सेटलमेंट मधल्या वातावरणातून सजग झालेल्या सतीला आपला समाज शिक्षणावाचून कसा उपेक्षित राहिला आहे ह्याची प्रकर्षानं जाणीव होते.. शोषित आणि भटक्या समाजाला, स्थिर समाजाच्या प्रवाहात आणायचं असेल तर त्याला शाश्वत, संस्कारक्षम शिक्षण हाच एक पर्याय आहे.. म्हणून त्यासाठी ती पडेल ते कष्ट करायला तयार असते.. शाळा काढायला पैसा हवा आणि तो मिळवण्यासाठी ती तिचं चौर्यकलेचं कसब वापरायला मागंपुढं पाहत नाही.. दुनियेत सगळेच चोर आहेत तर मग त्या चोराकडं मी चोरी केली तर काय बिघडलं? असं तीच मत.. 

सतीनं केलेली गुजरात, कच्छ, राजस्थान प्रदेशातील व्यावसायिक भटकंती थक्क करणारी आहे.. भौगोलिक, सामाजिक बारीक सारीक तपशिलांसह केलेलं प्रवास वर्णन कथेत जिवंतपणा आणतं.. अधूनमधून व्यक्तिरेखांच्या तोंडात येणारी बोलीभाषा तिथल्या मातीशी वाचकाला जोडते.. २६० पानांची ही कादंबरी खूप छान खिळवून ठेवते.. लिहिण्यासारखं बरंच आहे पण रहस्यमयी कादंबरी असल्यानं शब्द आवरते घेते.. 😂
   

-मी मधुरा.. 

***************************************************

२३. ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी.. प्रतिभा रानडे.. 



दुर्गा भागवतांचं कुठलंच पुस्तक मी आजतागायत वाचलेलं नाही.. कदाचित क्लिष्ट विषय हाताळणारी लेखिका म्हणून असेल.. किंवा त्यांच्या सारख्या विदुषीचे विचार, काळाच्या पुढं जाऊन केलेलं लेखन समजणार नाही म्हणून असेल.. किंवा व्यासपर्व नंतर त्यांच्यावर झालेल्या टीकेमुळं असेल.. पण यंदाच्या भारतवारीत मिळालेल्या ह्या 'ऐसपैस गप्पां'च्या भेटीमुळं, मला दुर्गाबाई थोड्यातरी कळाल्या आणि आता त्यांच्या लेखनाबद्दलची उत्सुकता वाढलीय असं म्हणायला हरकत नाही.. Thank you मीनू माझी दुर्गाबाईंशी ओळख करून दिल्याबद्दल.. ह्या सुंदर भेटीबद्दल.. 

'ऐसपैस गप्पा' हा शब्दच किती बोलकाय!!.. अवकाश भरून उरलेल्या गप्पा.. अगदी दूरवरच्या आदिवासी पाड्या ते दुर्गाबाईंच्या मनात खोल रूजलेल्या गोष्टीं..  युगायुगांपासून चालत आलेली महाकाव्यं ते सद्यस्थितीतील भोवताल.. सामाजिक-राजकीय प्रश्न ते स्त्रियांचे प्रश्न.. बाईंचा लेखनप्रवास ते त्यांचे आदर्श.. त्यांचे कलागुण ते त्यांच्या जन्म-मृत्यूच्या संकल्पना.. कितीतरी प्रतलांना स्पर्शून जाणाऱ्या ह्या गप्पा आपली विचारदृष्टी व्यापक करतात हे मात्र नक्की.. सुरुवातीला जेव्हा पुस्तकाची अनुक्रमणिका पहिली तेव्हा हे पुस्तक डोक्यावरून जाणार असं वाटलं.. पण सगळी पुस्तकं वाचून पाहायची ह्या मनाशी बांधलेल्या खूणगाठीमुळं पुस्तक वाचायला सुरुवात केली.. 

दुर्गाबाई एक अजब रसायन.. पाच भागांच्या संवादातून दुर्गाबाईच्या व्यक्तिमत्वातील अव्यक्त कोपरे उलघडत जातात.. त्यांच्या साधेपणातला भव्य, सालस, सुसंस्कृतपणा आकार घेऊ लागतो.. सुरुवातीला रामायण-महाभारत, वेद-पुराण ह्यावर चर्चा करणाऱ्या विदुषी दुर्गाबाई अचानक फुलापानांत रमणाऱ्या, कविता करणाऱ्या हळव्या मनाच्या लेखिका म्हणून समोर येतात.. अखंड शिकण्याचा ध्यास घेतलेली ही लेखिका कलाकुसर, स्वयंपाक ह्या विषयांत ही तितकीच रमते.. माधव जुलिअन च्या कविता वाचल्यानंतर स्वतःच्या कविता कविता नाहीत, मी कवयत्री नाही हे त्या प्रांजळपणे स्वीकारतात.. आजारपणाशी सामना करताना जगायची उमेद नसताना एक वाऱ्याची झुळूक त्यांना जगण्याची शक्ती देऊन जाते आणि त्यांचं निसर्गाशी घट्ट नातं जोडलं जातं.. 'मी माझ्याकडं बाई म्हणून न पाहता माणूस म्हणूनच पाहिलं' किंवा 'मला जगण्याचं सुख वाटत बघ' हे वाचल्यावर अवाक व्हायला होत.. असं जगण्यावर प्रेम करणाऱ्या दुर्गाबाई आपल्या मृत्यूवर कविता करून मोकळ्या होतात.. आणि त्या कवितेनच ह्या गप्पांची सांगता होते..  

२२४ पानांचं दुर्गाबाईंच्या बरोबरच्या गप्पांचं पुस्तक पाच भागात विभागलं आहे.. 
भाग एक: 'संस्कृतीच्या पाऊलखुणा'.. संस्कृती म्हणजे काय बरोबरच स्त्रिया आणि संस्कृती, संस्कृतीच्या मिथ्यकथा आणि त्यांची निर्मिती, ईश्वर आणि त्याचे दशावतार, तांत्रिक मांत्रिक पंथ ह्यावर त्यांच्या गप्पा रंगतात.. मिथ्यकथा समाजाला स्थिरता देतात म्हणून जुन्या मिथ्यकथांच्या जागी विचारवंतानी, साहित्यिकानी नव्या कल्पना रचल्या पाहिजेत.. असं त्या आवर्जून सांगतात.. 
भाग दोन: 'साहित्य चिंतन'.. दुर्गाबाईनी कायमच परखडपणे आपले विचार मांडले.. विषय संपूर्णपणे समजून घेऊन, त्यावरच्या टीकाटिपण्या वाचून त्यांनी नेहमी लेखन केले.. त्यामुळं व्यासपर्वावरील टीकेला त्यांनी तितक्याच समर्थपणे तोंड दिले.. व्यासपर्व बरोबरच सीता आणि द्रौपदीचा मृत्यू, बाणभट्टांची कादंबरी, महाकाव्यं, श्लील-अश्लील वांग्मय, साहित्त्यिक आणि सांस्कृतिक चळवळ ह्यावर गप्पा मारल्या आहेत.. एक खूप गमतीची गोष्ट मला इथं समजली- 'कादंबरी' हा शब्द आपण कानडी भाषेतून उचलला आहे.. बाणभट्टांच्या कथेच्या नायिकेचं नाव कादंबरी.. आणि मग त्या लेखन प्रकारालाच 'कादंबरी' म्हटलं जावू लागलं..    
भाग तीन: 'बौद्धांचे योगदान'.. गौतमाच्या जन्मापासून नवबौद्धांपर्यंतच्या काळाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आहे.. बौद्ध धर्म व पाली वाड्मयाचा खोलवर अभ्यास करुन काही ग्रंथांचं त्यांनी केलेलं मराठीमधील भाषांतर.. त्याच बरोबर महावीर आणि बुद्ध या दोघांच्या तत्वांमधला, विचारांमधला फरक.. मोक्ष-निर्वाण, स्वर्ग नरकाच्या कल्पना.. प्रत्येक धर्माची मृत्युबाबतची मते ह्यावरील विवेचन त्यांनी केलं आहे.. 
भाग चार: दुर्गाबाईंचा लेखन प्रवास.. शाळेतील हौशी कवयत्री दुर्गा ते साने गुरुजींच्या साधना मासिकात लेख लिहिणारी दुर्गा हा प्रवास.. त्यांचं समाजशास्र, मानववंशशास्त्र ह्यावरील लेखन.. आदिवासी तमासगीर समाजाचे त्यांचे अनुभव.. विणकाम,पाकशास्त्र, धर्मशास्त्र, स्त्रीमुक्ती.. शब्दांचा प्रत्यय.. अनेक लोककथा, लोकगीतातून वेगवेगळ्या प्रथा-परंपरांची माहिती, वेगवेगळ्या रांगोळ्या त्यांचं महत्व, त्यांचे अर्थ यांची माहिती या गप्पांमधून मिळते..
भाग पाच: एक परमगंभीर सत्य-मृत्यू.. ख्रिस्त, बुद्ध, श्रीकृष्ण, भीष्म, तुकाराम, गांधी, कर्ण ह्या सगळ्यांचे मृत्यू ह्यावर सविस्तर चर्चा करून समाधी घेणं म्हणजे काय तर आयुष्याच्या पराकोटीच्या कृतार्थ स्थितीला पोचल्यावर तिथेच शाश्वत राहाण्यासाठी निर्विकार मनाने पत्करलेला मृत्यू असं त्या म्हणतात.. इच्छामरणाचा हक्क त्या मानतात तसेच पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास असल्याचं ही सांगतात.. स्वतःच्या मरणाबद्दल तर्कनिष्ठ विचार करणाऱ्या बाई आपल्या बहिणीच्या मृत्युबद्दल बोलताना फार हळव्या होतात.. 

हे पुस्तक वाचताना त्यांच्या गप्पांत हरवून जातो.. ह्या गप्पांचं वैशिष्ठय म्हणजे प्रश्नातून उत्तर अन उत्तरातून प्रश्न ओघानं येत राहतात.. गप्पांमध्ये बाईच्या उत्तरानंतर कधीकधी प्रतिभाताई स्वतः अनेक नव्या गोष्टीही सांगतात आणि परत त्यावर बाईंची प्रतिक्रिया.. आपल्यासमोर दोघी गप्पा मारतायत असं वाटतं!.. 

दुर्गाबाईंच्या साहित्याच्या प्रतीक्षेत.. 


-मी मधुरा.. 

***************************************************

Tuesday, August 30, 2022

'पोर्टलंड टू कोस्ट' (PTC).. Relay Race

'पोर्टलंड टू कोस्ट' (PTC).. "Things To Do Before I Turn Fifty" ह्या माझ्या 'बकेट लिस्ट' मधला एक महत्वाचा इव्हेंट.. 

ऑगस्ट मधील शेवटच्या शुक्रवारी असणारी ही रेस.. गेली चार वर्ष मी टीम मिळवण्याचा प्रयत्न करतेय.. 😔.. आता ह्यावर्षी माझा शेवटचा चान्स.. जुलै महिना उजाडला.. आणि मी माझ्या मनाची समजूत घातली की बकेट लिस्ट मधल्या सगळ्यांचं गोष्टी पूर्ण होत नसतात.. पुढच्या वर्षी बघू..

कट टू.. पोर्टलंड एअरपोर्ट.. भारतात जाण्यासाठी बोर्डिंग ची वाट पाहते आहे.. मैत्रिणीचा फोन.. अजुनी बोर्ड झाली नसशील तर मेसेज बघ आणि लगेच रिप्लाय कर.. मी मेसेज बॉक्स ओपन करते.. आणि एकदा नाही दोनदा मेसेज वाचते.. परत मैत्रिणीला फोन करते.. हे नक्की खरं आहे ना.. PTC च्या टीम मध्ये दोन जागा रिकाम्या आहेत आणि आपण PTC करत आहोत.. मी उडी मारत उद्गारते "That's Awesome".. म्हणतात ना, सच्चे दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने मे लग जाती है.. 

.... yeeee!!!! 👏👏  Finally मी PTC करतीय 🎉.. आणि ह्या गोड बातमीनं माझ्या भारतदौऱ्याची सुरुवात होते..

🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️


आता थोडं ह्या इव्हेंट विषयी..  


पोर्टलंड मधील 'हूड टू कोस्ट' (HTC) आणि 'पोर्टलंड टू कोस्ट' (PTC ) हे मानाचे इव्हेंट्स.. ह्यांना "मदर ऑफ ऑल रेस" असं संबोधलं जातं.. 
चाळीस वर्षांपूर्वी  'हूड टू कोस्ट' (HTC) साधारण २०० मैलांची (३२० किमी) ही रनिंग रिले रेस सुरु झाली.. माऊंट हूडवरून सुरु झालेली हि रेस डोंगर-दऱ्यातून, लहानमोठ्ठ्या गावातून, नदी किनाऱ्यावरून, दिवस-रात्र पळत शेवटी पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर संपते..
त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी चालणाऱ्यांसाठी 'पोर्टलंड टू कोस्ट' (PTC ) साधारण १३० मैलांची (२१० किमी) ही  वॉकिंग रिले रेस सुरु झाली.. HTC सारखीच, तोच रोड मॅप पण पोर्टलंड पासून सुरु होऊन चालत (फक्त चालतच.. रन, जॉग केले तर तुम्ही रेस मधून बाद..) शेवटी पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर पोचायचं..

या रिले रेसची लॉजिस्टिकस भन्नाट आहेत.. 
साधारणपणे वर्षभर आधीपासून टीम रेजिस्ट्रेशन सुरु होते.. १००० HTC (रनर्स) टीम्स आणि ४५० PTC (वॉकर्स) टीम्स.. त्यात आदल्या वर्षीच्या विनिंग टीम्सना डायरेक्ट एन्ट्री मिळते आणि बाकी जागा लॉटरी पद्धतीनं भरल्या जातात.. म्हणजेच HTC च्या १००० टीम्स, प्रत्येकी १२ रनर्स म्हणजे एकूण १२००० रनर्स तसेच PTC च्या ४५० टीम्स, प्रत्येकी १२ वॉकर्स म्हणजेच एकूण ५४०० वॉकर्स आणि काही हजार स्वयंसेवक.. २०० मैलाच्या HTC साठी ३६ exchange poits तर १३० मैलाच्या PTC साठी २४ exchange poits.. HTC च्या १३व्या exchange point पासून PTC सुरु होते..  

प्रत्येक टीमसाठी 2 व्हॅन्स, ज्यात प्रत्येकी ६ वॉकर्स/रनर्स असतात.. प्रत्येक व्हॅनला त्यांचे अंतर आणि स्टार्टींग पॉईंट नेमून दिलेला असतो.. व्हॅन १ पासून रेसची सुरुवात होते.. त्यातील ६ जणांची टर्न झाली की मोठ्ठा exchange point असतो तिकडे व्हॅन २ मधील ६ जण चालायला/पळायला सुरुवात करतात.. त्यांचे नेमून दिलेले अंतर झाले कि परत exchange point कि व्हॅन १ चा पुढचा टप्पा सुरु होतो.. असे २ मोठ्ठे exchange points असतात.. एक जण चालत/पळत असताना उरलेले पाचजणं पुढच्या exchange point ला जाऊन थांबतात.. 

🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️


... तर अशी ही PTC करायला मिळणार म्हणून मी खूप excited होते.. भारतात आल्यावर सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या.. आणि नंतर लक्षात आले कि माझ्याकडं ट्रेन करण्यासाठी जेमतेम ६ आठवडे आहेत आणि त्यातील ५ आठवडे तरी मी इथे भारतातच आहे.. आधीच्या हाफ मॅरेथॉन च्या अनुभवावर हे तारुन नेऊ हा विश्वास नक्कीच होता.. 

१६ ऑगस्टला रात्री पोर्टलंड ला परत आले आणि पुढे ८-९ दिवसातच रेस.. शुक्रवार - शनिवार (२६ आणि २७ ऑगस्ट).. १७ ऑगस्टला ट्रेल जायचा प्लॅन केला पण ३६ तासाच्या प्रवासानंतर शरीर साथ देईना.. मग 'योगा'वर समाधान.. १८ ऑगस्टला ट्रेल वर गेले आणि माझी भंभेरली.. पेस १३ च्या ऐवजी १४.५.. दुसऱ्या दिवशी १४.२.. पुढचे काही दिवस १३.८ लाच अडकले.. आता मात्र मला माझ्या परफॉर्मन्स चं प्रेशर यायला लागलं.. ह्यापूर्वी मी कधी ही रिले केली नव्हती.. ग्रुप माझ्यासाठी नवीन होता.. ग्रुप लिजिस्टिकस माहिती नव्हते.. ह्या सगळ्या विचारांनी आदल्यादिवशी धड झोपही लागली नाही.. 


शुक्रवार २६ ऑगस्ट..  

आमच्या टीमचा स्टार्ट टाईम सकाळी ६:३० चा.. सकाळी सव्वा पाचच्या दरम्यान एका ठिकाणी जमून, व्हॅन लोड करून ६:१० पर्यत इव्हेंटच्या ठिकाणी पोचलो.. जस्ट उजाडत होतं.. अश्या इव्हेंट्सच्या वेळचं वातावरण खूपच चार्मिंग असतं.. नानातर्हेने सजवलेल्या व्हॅन्स, वॉकर्सची चेहेलपेहेल, स्वयंसेवकांची गडबड, निरनिराळे स्टॉल्स.. एका जत्रेचं स्वरूप आलं होतं.. गर्दी टाळण्यासाठी १५-२० मिनिटाच्या अंतराने ८-१० टीम्स स्टार्टींग पॉईंटला असतात..  





मी टीम मध्ये नवीन असल्यानं आणि अनुभव नसल्यानं मला त्यातल्यात्यात easy टप्पा मिळाला होता.. दोन्ही टप्पे साधारणपणे ४ मैलाचे म्हणजे ७-८ किमी चे होते.. माझा पहिला टप्पा सकाळी १०:१० मिनिटांनी सुरु होणार होता.. आणि मी टीम मधली चौथी वॉकर होते.. दुसरा टप्पा रात्री ११:१५च्या दरम्यान असणार होता..


A Typical Batton Exchange


सकाळी १०:०५च्या दरम्यान कानात ipods घालून मी चालायला सुरुवात केली.. Hwy30.. Scappoose गावाचा परिसर.. ढगाळ हवामान.. कित्त्येक हाफ मॅरॅथॉनसचा अनुभव पाठीशी.. पण मला चढ उतारावर चालायची सवय.. इकडे एकदम फ्लॅट रोड.. त्यामुळं सुरुवातीला चालायला जड गेलं.. पण १३.२८ पेस न मी माझं अंतर पूर्ण केलं.. आणि ३ रोड किल्स मिळाले.. 

'रोड किल'.. ही संकल्पना खूपच भारी आहे.. एखाद्या VDO Game सारखी.. दुसऱ्या टीमच्या मेम्बरला क्रॉस करून पुढं जाणं म्हणजे त्या मेंबर ला मारणं.. म्हणजे रोड किल्लीन्ग.. आणि अश्या 'रोड किल्स' चा काउन्ट मोठ्ठ्या कौतुकानं vans वर लिहिलेला पण असतो.. 




दुपारी २ च्या दरम्यान Van Exchange झाले.. आमची पहिल्या टप्प्याची कामगिरी एकदम तुफान होती.. ४ मिनिट Expected Time च्या आधी! 

नंतर लंच Pickup करून पुढच्या Van Exchange Point ला जाऊन थांबलो.. आता रात्री ८:१५ पर्यंत आम्हाला विश्रांती.. 


Rest Area at Van Exchange Point

रात्री ११:१० ला माझा टप्पा.. अंधारात पहिल्यांदाच चालणार होते.. तेही अमावास्येच्या मिट्ट काळोखात.. अनोळखी रस्त्यावर.. कपाळावर हेड लाईट लावून, glow in the dark safty jacket घालून मी एकदम सज्ज होऊन बसले.. मनात थोडी धाकधूक होती.. नंबर २०२९ अनाऊसमेन्ट झाली.. exchange point ला जाऊन थांबले.. बॅटन हातात घेतली.. चालायला सुरुवात करणार तेवढ्यात stop.. stop.. wrong batton.. आणि  काही कळायच्या आतच माझ्या हातातून बॅटन कोणीतरी काढून घेतली.. आणि दुसरी बॅटन हातात आली.. त्या बरोबर एक आवाज गो..गो.. 



..मी चालायला सुरुवात केली.. हलका पाऊस होताच.. रेंज नसल्यानं आणि गाणी स्टोर केलेली नसल्यानं बरोबर दुसरा आवाज असा नाही.. त्यामुळं मनातल्या, डोक्यातल्या विचारांचा प्रचंड गोंधळ ऐकू येत होता.. डोळ्यांत बोट घातलं तरी काही दिसणार नाही इतका अंधार.. नाही म्हणायला समोर एक लुकलुकता प्रकाश.. मगाशी बॅटन चुकलेला वॉकर असेल.. त्याच्या मागं झपाझप चाललं सुरु झालं.. त्याला गाठायचं.. आणि ह्या विचारात बाकी मनातला आणि डोक्यातला गोंधळ कमी व्हायला लागला.. काही वेळातच त्याला मागं टाकलं.. पुढं अजुनी दोघ चालतं होती.. थोड्याचं वेळात त्यांना हि मागं टाकलं.. आणि लक्षात आलं कि आता ह्या अंधाराची मला सवय होती आहे.. कपाळावरच्या बॅटरी च्या प्रकाशात जितकं दिसेल तितकंच पाहायचंय आणि चालत राहायचं.. stay in present.. पुढचा विचार असा नाहीच.. चढ-उतार आहे कि सरळ रस्ता कि वळणाचा रस्ता.. काहीच दिसत नसल्यानं फक्त पावलं उचलत राहायचं.. पूर्णपणे आजूबाजूच्या वातावरणाला स्वाधीन व्हायचं.. फक्त मी, माझा श्वास आणि माझी पावलं.. एक झपाटलेपण.. आणि ह्यात एक नाद सापडत गेला आणि मी त्या अंधारात विरघळत गेले.. such a spiritual experience.. total surrenderness.. 'अवघा रंग एक झाला'.. मीच अंधार होऊन गेले.. समोर काय होत माहिती नाही पण मन आणि पावलं कश्याचा तरी वेध घेत होती.. इतक्यात well done!!.. नंबर २०२९.. ह्या आवाजानं तंद्री भंग झाली.. त्या नादातच व्हॅन मध्ये जाऊन बसले.. किती वेळ लागला.. काय पेस.. कशाचीच फिकीर नव्हती.. डोळे पिटून तशीच बसून राहिले.. किती तरी वेळ.. काहीवेळानं भानावर आले.. एक दैवी अनुभव.. ह्या अनुभवासाठी पुन्हा पुन्हा मला हे करायला आवडेल.. 

शनिवार २७ ऑगस्ट:

माझं अंतर पूर्ण होई पर्यंत शनिवार उजाडला.. १३.२ च्या पेसनं मी माझं अंतर पूर्ण केलं.. आणि ८ रोड किल्स.. एकूण ११ रोड किल्स.. way to go.. 

मला दिलेल्या वेळेपेक्षा २ टप्पे मिळून दोन मिनिट जास्ती लागली.. पण मी माझ्या पर्फोर्मन्ससाठी खुश आहे..


पहाटे २:३० च्या दरम्यान आमचा शेवटचा van exchange झाला.. आता फायनल डेस्टिनेशन 'बीच'.. ड्राईव्ह करून बीच हॉटेलवर पोचेपर्यंत पहाटेचे ३:३० वाजले.. आता लास्ट वॉकर येईपर्यंत विश्रांती.. expected time होते सकाळी ९:२०.. 

🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️







सकाळी ८:३० वाजताच तयार होऊन बीच वर पोचलो.. 
    









.... आणि... 

Whoo Whoo.. २६ तास ४८ मिनिटाच्या अखंड चालण्यानंतर सकाळी ९:१८ मिनिटांनी फिनिश लाईन क्रॉस केली.. 








We got 1st Place in 'Mixed Champion Masters' category and 9th Place overall.. 👏👏👏






रेस संपली तरी 'रेस हाय' अजुनी मनात आहेच.. जबरदस्त अनुभव... बाप फीलिंग!!



.....आणि हो.. आयोजक आणि स्वयंसेवक यांना विसरून चालणार नाही.. यांच्या शिवाय हा इव्हेंट होणं शक्यच नव्हतं.. 

इतक्या छान इव्हेंट बद्दल आयोजकांचे अभिनंदन आणि सर्व अडचणींना तोंड देत हा इव्हेंट यशस्वी करण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या स्वयंसेवकांना मनाचा मुजरा..


-मी मधुरा.. 
३० ऑगस्ट २०२२