मंदोदरी.. लंकाधिपती रावणाची पत्नी, महापराक्रमी इंद्रजीतची माता ही तिची ओळख.. रामायणात ती आपल्याला रावणाला साथ देणारी, कधी कधी त्याला त्याच्या चुका दाखवून योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणारी पत्नी.. अशी ती भेटते...
मंदोदरी.. एक महान पतिव्रता.. खरं तर रावण आणि रावणाच्या वधानंतर बिभीषण असे दोन पती असलेली मंदोदरी पतिव्रता कशी? हा प्रश्न नक्कीच पडतो.. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रात तर तिला वाली, रावण आणि बिभीषण असे तीन पती असल्याचा उल्लेख आहे.. त्यात असे म्हंटले आहे कि प्रत्येक लग्नानंतरची मंदोदरी वेगळी होती कारण प्रत्येकवेळी तिचे शरिराणू वेगळे होते.. तमोगुणी रावणाबरोबर त्याला अनुसरून तिने व्यवहार केला तर बिभीषणाबरोबर सत्वगुण परिधान करून वागली.. प्रत्येक लग्नात ती पतीशी एकनिष्ठ राहिली म्हणून ती महान पतिव्रता...
मंदोदरी.. पंचकन्या मधील एक व्यक्तिमत्व... अहिल्या, द्रौपदी, सीता, मंदोदरी आणि तारा ह्या पंचकन्या मानल्या आहेत.. त्यांच्या जीवनपटातून नारीवादाच्या भिन्न प्रतिमानांचे प्रदर्शन होते.. पुराणानुसार त्यांच्या नावाच्या उल्लेखाने सुद्धा पाप हरण होते.. 'असुर कन्या' ते 'स्त्री शक्तीचे अनोखे रूप' हा प्रवास कसा घडला असेल? अशी ही मंदोदरी नेमकी कोण होती?
मंदोदरी.. असुरराज मयासुराची मानसकन्या.. एक शापित अप्सरा... पार्वतीच्या शापामुळे ही अप्सरा बेडूक बनून एका तळ्यात बारा वर्षे राहते.. शंकराच्या उपासनेने तिचे बारा वर्षानंतर एका सुंदर तरुणीत रूपांतर होते... हीच ती असुरराज मयासुर आणि हेमा यांची मुलगी मंदोदरी...
मंदोदरी सुंदर तर होतीच पण त्या बरोबर ती दयाळू, धार्मिक आणि सदाचारिणी पण होती... युक्तिवादात ही ती पारंगत होती... प्रामाणिकपणे बोलण्याची क्षमता, हळुवार पण मुद्देसूद बोलणे हे तिचे अजुनी एक वैशिष्ठ... आपले मत स्पष्ट मांडले पाहिजे ह्या बद्दल आग्रही होती.. रावणाशी विवाह झाल्यावर तिला ह्या कौशल्याचा नक्कीच फायदा झाला..
मयासुराकडे आलेला रावण मंदोदरीला पाहतो आणि तिच्या प्रेमात पडतो.. आणि लग्न करायची इच्छा व्यक्त करतो.. मयासुराचा नकार ऐकून क्रोधीत झालेला रावण विद्रोह करतो.. आपल्या वडिलांना भयभीत झालेले पाहून, केवळ रावण हा शिवभक्त आहे ह्या विश्वासावर ती त्याच्याशी लग्न करायला तयार होते.. अत्यंत विश्वासू आणि पतिव्रता असलेली मंदोदरी रावणाच्या चुकीच्या आणि भ्रष्ट वागणुकीला कडकडून विरोध करत असे.. पण रावणाला धार्मिकतेच्या मार्गावर आणणे केवळ अशक्य होते..
सीतेचे अपहरण हे मोठ्ठे आव्हान तिने पेलले.. रावणाच्या वासनाना आवार घालणे शक्य नाही हे तिला माहिती होते… पण तरी लंकेच्या, कुळाच्या भल्यासाठी त्याने सीतेला सोडून द्यावे ह्यासाठी तिने खूप प्रयत्न केले.. सीताचे आयुष्य वाचवण्यासाठी मंदोदरीने आपली शक्ती पणाला लावली.. सीता लग्नाला तयार होत नाही हे सहन करू न शकलेला रावण जेव्हा सीतेवर तलवार उगारतो तेव्हा मंदोदरी त्याला असे करण्यापासून परावृत्त करते आणि सीतेला रामाकडे सुखरुप सोडून येण्यास सांगते... सौन्दर्यावर मोहित होऊन, लग्नासाठी अपहरण केलेल्या पर-स्त्री ला ती अभय देते... हा स्त्रीचा केलेला सन्मान नक्कीच प्रशंसनीय आहे.. युद्धाचा परिणाम माहिती असून सुद्धा, जेव्हा रावण युद्धासाठी निघतो तेव्हा त्याला तिलक लावून त्याच्या विजयाची कामना करते.. पतिव्रता स्त्री प्रमाणे ती सुखात दुःखात त्याच्या मागे उभी राहते...
युद्ध संपल्या नंतर मंदोदरी युद्धभूमीला जेव्हा भेट देते तेव्हा तिथला विनाश पाहून, धारातीर्थी पडलेला आपला पती, मुले, रावण सैना पाहून व्यथित होते.. लंकेचा झालेला विनाश टाळू न शकल्याच्या अपराधी भावनेने ती स्वत:ला महालात कोंडून घेते... मंदोदरीच्या सांत्वनासाठी आलेला राम तिला लंकेच्या साम्राज्ञीच्या कर्तव्याची जाणीव करून देतो.. रावणाची विधवा असली तरी ती एक विदुषी होती.. तिच्यातील असलेल्या कौशल्याचा, राजकारणातील ज्ञानाचा उपयोग लंकेचे राज्य सुराज्य करण्यासाठी करावा... तसेच लंकेच्या भवितव्यासाठी बिभीषणाशी लग्न करून लंकेची सम्राज्ञी म्हणून राज्य करावे... असा मानस ही राम व्यक्त करतो.
अशी हि मंदोदरी..., लंकेच्या हितासाठी बिभीषणाशी लग्न करून लंकेला पुनर्जीवित करते...
-मी मधुरा..
#शक्तिरूपेण ३/९
************************************************

No comments:
Post a Comment