Tuesday, August 30, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं १४ ते १७)

 १४. युगंधरा.. सुमती क्षेत्रमाडे.. 


गेल्या महिन्यातच सुमती क्षेत्रमाडेंची 'महाश्वेता' झपाटल्यासारखी वाचली.. 'सुधा'चे गरुड अजुनी मनावर असताना परत दुसरी त्यांच्याच लेखणीतून उतरलेली ही व्यक्तिरेखा.. अकस्मितपणे 'युगंधरा' माझ्या हातात पडली आणि ४७५ पानांची कादंबरी ४ दिवसांत वाचून झाली.. 

स्त्री शक्तीचं परत एक वेगळं रूप.. 'युगा'.. सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशी ह्या कथेची नायिका 'युगंधरा' म्हणजेच 'युगा'.. जी संयमी आहे पण दुर्बल नाही.. जिच्या सत्विकतेमध्येच तिची आत्मशक्ती दडली आहे.. अशी युगा अंतःकरणाला स्पर्शून जाते.. अंतर्मुख करून जाते.. जसं कशी कादंबरी पुढं जाते तसं तशी युगाची अनेक रूप समोर येतात.. स्वभावानं कोमल असलेली युगा प्रसंगी वज्राहून कठीण होताना दिसते.. सात्विक, एकनिष्ठ, मूक प्रीत जपणारी युगा.. पितृभक्त युगा.. हेकट आईला आणि स्वार्थी भावांना समजून घेणारी समंजस युगा.. मैत्री जपणारी युगा.. संपूर्ण आयुष्य मनाविरुद्ध जगावं लागलं तरी तक्रारीचा शब्द ही न उच्चारणारी युगा.. अशी तिची कितीतरी रूपं!.. 

युगा बरोबरच तिच्या आसपासची पात्रं सुद्धा सहजतेनं वावरताना दिसतात.. त्यांचं भावविश्व, त्याचे स्वभाव विशेष तितक्याच ताकदीनं लेखिकेनं मांडले आहेत.. मग त्या तिच्या जीवाभावाच्या मैत्रिणी सुलभा, जयश्री असोत किंवा शेजारच्या माई असोत किंवा तिचे आई वडील भावंडं असोत.. युगा आणि रुचिराचं फुलत जाणारं, उमलत जाणारं नातं सुद्धा अनोखं आहे.. एकाच व्यक्तीवर-अभीवर- प्रेम करणाऱ्या ह्या दोघी.. एक मूकपणे तर दुसरी बायको ह्या नात्याने.. पण कालांतरानं त्यांचं दृढ होणारं नातं.. त्यांचं एकरूप होत जाणं.. एकमेकींच्या सावल्या बनणं.. वाचताना वाटतं, असं नातं जोपासलं गेलं तर 'प्रेम' हे नेहमीच पवित्र राहील.. युगा बरोबरच रुचिरा पण आपल्याला आपली वाटू लागते.. जेव्हा युगा रुचिराला म्हणते कि तुझ्या पायगुणामुळं अभी इतक्या उच्च पदाला पोचला तेव्हा रुचिरानं दिलेलं उत्तर 'युगाताई तुम्ही ह्या घरचा पाया आहात.. मी तर आत्ता आली आहे..' आपल्याला तिच्या प्रेमात पाडतं.. 

एखाद्याचं आयुष्य हे फक्त दुसऱ्याचं करण्यासाठीच असतं.. तसंच काहीसं 'युगा'च ही.. ती सतत दुसऱ्याच्या सुखासाठी झटत राहते.. झिझून झिजून संपून जाते.. अचानक झालेला कादंबरीचा शेवट चुटपुट लावून जातो.. शेवट आवरता घेतला असं मला वाटलं.. अजुनी काही वेगळा शेवट करता आला असता का? असा विचार ही मनात आला.. युगापेक्षा महाश्वेतातील सुधा ही जगणं शिकवते.. परिस्थितीशी झगडून, दोन हात करून उभं राहायला शिकवते.. 

कादंबरी वाचल्यावर 'Spontaneous Overflow of Powerful Feelings' असं मलपृष्ठावर लिहिलेलं तंतोतंत पटतं.. 


-मी मधुरा.. 

***************************************************

१५. मृण्मयी.. गो. नी. दांडेकर.. 



गो. नी. दांडेकरांची मी वाचलेली ही पहिलीच कादंबरी 'मृण्मयी'.. ह्या पूर्वी त्यांचे ललितलेख, दुर्गदर्शन वाचलंय.. स्थळ, दुर्ग, डोंगर दऱ्या त्यांच्या लिखाणातून कश्या प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभ्या राहतात.. ही कांदबरी वाचल्यावर वाटलं, कोकणाचं वर्णन करावं तर गो. नी. दां.नीच!!.. 

ही गोष्ट आहे 'मनू'ची! मनोरमा गणपत खरे ची!.. 

गोष्ट सुरु होते ती तिच्या बाबांपासून.. लहानग्या गणू पासून.. कोकणावर निस्सीम प्रेम करणारा, सुंदर चित्रे रेखाटणारा, अत्यंत हुशार चुणचुणीत असा गणू.. मामाकडं शिकायला असणारा गणू.. असा हा गणू लहान वयातंच भागवत-ज्ञानेश्वरी-गाथा नुसतीच वाचत नाही तर ती आचरणात आणायला ही सुरुवात करतो.. पुढं व्हर्नाक्युलर फायनल ला तालुक्यात दुसऱ्या आलेल्या गणूचं मामीच्या नात्यातल्या मुलीशी सरस्वतीशी लग्न ही होतं.. हातावर हात देऊन पहिली दोन आपत्य गेल्यावर झालेलं हे शेंडेफळ 'मनू'.. आपल्या गोष्टीची नायिका.. अपुऱ्या दिवसाची.. वीतभर लांबीची.. मुडदूस झालेली.. किरकिरी मुलगी.. 

किरकिरी मनू ते विचारी, मनस्वी मनुताई हा प्रवास म्हणजे 'मृण्मयी'.. २५७ पानांच्या ह्या कादंबरी मध्ये कवितांचे रसग्रहण, ज्ञानेश्वरी-गाथा यांचे निरूपण, कोकणाचं निसर्ग वर्णन, कोंकणी आणि वर्हाडी भाषेचा बाज.. सगळंच कसं निगुतीनं एकत्र गुंफलंलय.. 

अर्थार्जनासाठी, कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी तात्या म्हणजेच गणू कोंकण सोडून विदर्भात जातात.. कोंकण सोडतानाची त्याची मनोवस्था तुकारामांच्या ओवीतून खूप छान सांगितली आहे.. रडक्या लेकीला शांत करण्यासाठी ते ज्ञानेश्वरी-गाथातील ओव्या म्हणत असत.. ह्यातून हळूहळू परवचा, ओव्या, श्लोक, अभंग, भूपाळ्या, भजनं यांची मनूला गोडी लागते.. वडिलांबरोबर ज्ञानेश्वरी गीतेतील अध्याय म्हणणं.. गाथेवर चर्चा करणं.. नवनवीन ग्रंथ वाचणं.. ह्यामुळं ती प्रगल्भ होत जाते.. वडिलांबरोबरच्या गप्पांतून, त्यांच्या सहवासातून तिच्यात कोंकण प्रेमाची बीज ही आपसूक रुजत गेली..
 
ऋणमोचन मध्ये झालेली मनू आणि गागडेबाबांची भेट.. तेथील वातावरण.. त्यांचे कीर्तन.. अगदी गुंतून राहायला होत..

अकस्मात वडिलांच्या निधनानंतर, घर चालवण्यासाठी, ज्ञानेश्वरी-गाथावर बोलणाऱ्या मनूची 'ज्ञानेश्वरी वाचणारी मनुताई' ही नवीन झालेली ओळख.. घर चालवण्यासाठी तिनं आणि तिच्या आईनं घेतलेले कष्ट.. कोंकण प्रेमापोटी दारुड्याशी केलेलं लग्न.. सासरी होणारा छळ.. लग्नानंतर वर्षभरातच तिला आलेलं वैधत्व.. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडतंय असं वाटत.. वेळोवेळी ज्ञानेश्वरी-गाथा तील आलेले दाखले मनूची अध्यात्मिक बैठक दर्शवतात.. 
'मृण्मयी' ही नुसती वाचायची कादंबरी नाही तर अनुभवायची आहे.. वडील-मुलगी, आई-मुलगी, मनू-दुर्गा, मनू-चित्रकार, दुर्गाचा नवरा' हे नातेसंबंध आत्म्याशी आत्म्याला जोडतात.. 

कादंबरीच्या शेवटी, मनूचा आणि तिच्यावर हपापलेल्या नजरेनं पाहणाऱ्या जोशींचा संवाद अंगावर काटा आणतो.. 

"काय हवय तुम्हाला? माझं शरीर? हा हाडांचा सापळा? ही दुर्गंधीची खाण? हे रोगांचं आगर? ही क्लेशतरुंची वाडी?... हे काय माझं उरलं आहे? छे छे! हा आहे श्रीहरींच्या रुपावरुन उतरलेला उतारा.. माझी सत्ता तिळमात्र राहिली नाही यावर.. तेव्हा घ्या हे.. विस्कटा.. टाका फाडून.. होऊद्या त्याच्या चिंध्या.. उधळा चहू दिशांना.. मात्र जे कराल ते माझ्यांच्या साक्षीनं होऊद्या.. या माडांच्या झावल्या डोलत असोत.. रातांब्याची पालवी हालत असो.. त्या अवघ्यांच्या कुशीत या शिवनिर्माल्याचं हवं ते होऊद्या.. " 

हे वाचल्यावर 'मृण्मयी' हे पुस्तकाचं नाव सार्थ वाटत.. समर्पण, गाढा विश्वास.. आणि त्यासाठी काहीही करायची तयारी.. म्हणजे मृण्मयी! 

*Thank you मीनू ह्या सुंदर भेटीबद्दल!!


-मी मधुरा.. 

*******************************************

१६. झिम्मा - आठवणींचा गोफ.. विजया मेहता.. 




'बॅरिस्टर नाटकात मावशीचं काम करणारी' इतकीच काय ती विजया मेहतांची ओळख.. ती ओळख ही अशीच ऐकून आणि वाचून.. मध्यंतरी झी वरच्या एका कार्यक्रमात रंगभुमीवर दीर्घकाळ काम करणार्‍या काही अभिनेत्री सुहास जोशी, स्वाती चिटणीस, नीना कुलकर्णी, उषा नाडकर्णी यांनी विजयाबाईंचं नाव आदराने घेऊन त्या गुरुस्थानी असल्याचं सांगितलं होतं.. तसंच विक्रम गोखले, नाना पाटेकर विजयाबाईंना गुरुस्थानी मानतात असं वाचनात आलं होतं.. त्यामुळं विजयाबाईंबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होती.. 'झिम्मा' विजयाबाईंच्या आत्मचरित्राबद्दल कळल्यावर पुढच्या भारतभेटीत ते घेऊन वाचायचं नक्की केलं.. पण त्यासाठी आज उजाडावा लागला.. 

अगदी पाठपोठ 'कव्हर टू कव्हर' म्हणतात ना तसं 'झिम्मा' वाचून काढलं.. 'सेतू स्नेहाचे' या ऋणनिर्देशाच्या भागातलं पहिलंच वाक्य 'लेखन हा माझा प्रांत नव्हे'.. पण हे काही खरं नाही.. अगदी गप्पा माराव्यात असं त्यांचं लिखाण.. त्यात कुठेही आढ्यता नाही कि मानभावीपणा नाही कि खोटी नम्रता नाही.. 'मी लिहू लागते' ह्या प्रस्तावनेत 'मी हे का लिहित आहे' याचा एक स्वतःशीच झालेला संवाद वाचकांच्या साक्षीने त्या लिहितात.. आणि वाचकांना शुभेच्छा देऊन लेखक, दिग्दर्शक, कलाकार, प्रेक्षक आणि त्या स्वतः ह्या सर्वांनी मिळून खेळलेल्या नाटकरूपी झिम्म्याचा खेळ वाचकांच्या मनात गुंजत राहो अशी आशा व्यक्त करतात..  

हे आत्मचरित्र बेबी, विजू जयवंत, विजया खोटे आणि विजया मेहता चार टप्प्यांमध्ये लिहिलंय.. 'विजया मेहता' हे त्यांचं आजचं रुप.. आणि म्हणूनच बाकीच्या तिघींना त्या तृतीय पुरुषी एकवचनात संबोधतात.. त्यांचं स्वतःच्या ह्या रूपांकडं असं त्रयस्थ नजरेनं पहाणं मला खूप आवडलं.. बाईंची कारकिर्द सुमारे पन्नास वर्षांची.. त्यामुळे कामाचा आवाकाही मोठा.. त्यात शिक्षण, प्रायोगिक रंगभुमी, प्रशिक्षण वर्ग, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रकल्प, लोकमान्य रंगभुमी, माध्यमांतरं आणि संस्थांची संचालकपद.. शिवाय महत्त्वाच्या वैयक्तिक घटना.. ह्या सगळ्यांचा हा लेखाजोखा.. पण याचं नुसत दस्तैवजीकरण न करता गप्पांच्या रूपांत सांगितल्यानं उत्सुकता शेवट पर्यंत राहते.. 

सुरुवात होते ती बेबीच्या लहानपणापासून.. जयवंत परिवाराचा मोठ्ठा कुटुंबकबिला, त्यातील बाईंवर प्रभाव पाडून गेलेल्या व्यक्ती, त्यांचं भिवंडीचं घर, मुंबईचं घर, तिथलं वातावरण ह्यांची सुरेख वर्णनं.. ह्या सुरस गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत असं वाटतं.. बेबीच्या काही आठवणी आणि निरीक्षणं तत्कालीन समाजाबद्दल तर आहेतच पण त्याचबरोबर त्या समाजात होणारे बदलही फार सूक्ष्मरीत्या टिपलेले आहेत..

विजू जयवंत आणि विजया खोटे ह्यांचा काळ म्हणजे स्वातंत्र्येत्तर काळ.. संपूर्ण भारतात ह्या काळात सांस्कृतिक 'चळवळी' सुरु होत्या.. जवळ जवळ सर्व कलाप्रकारांमध्ये चांगल्या गोष्टी घडत होत्या.. नवनवे कलाकार उदयाला येत होते.. आणि त्यांची पिढी अश्या वातारणात वाढली ही त्यांच्याकरता अतिशय भाग्याची गोष्ट असं त्या म्हणतात.. शिक्षण सुरु असताना अगदी न कळतच बाई नाटकात येऊन पडल्या, पुढे इथल्याच झाल्या.. नाट्य प्रवासाबरोबरच विजू जयवंत, विजया खोटे यांचं वैयक्तिक आयुष्य, नातेसंबंध ही हळूहळू उलघडत जातात.. त्यांनी मांडलेला मध्ययुगीन ते एकविसाव्या शतकात होणारा हा प्रवास फार रोचक आहे.. बाई स्वत: कुठही "आमच्या काळी... " किंवा "जुनं ते सोनं" चा सूर लावताना दिसत नाहीत.. उलट नवनवीन माध्यमांबद्दल अजूनही उत्सुकतेनं माहिती करून घेताना दिसतात.. 

विजया खोटे आणि मित्रमंडळींनी मिळून सुरु केलेल्या 'रंगायन'चा प्रवास.. सुरुवातीला केलेल्या पु.ल. देशपांडे आणि विजय तेंडूलकरांसारख्या अतिशय भिन्नकुळी नाटककारांच्या एकांकिका करताना बाईंमधल्या अभिनेत्री आणि दिग्दर्शिकेची कस लागलेली पाहायला मिळते.. दिग्दर्शनाची विशिष्ठ पध्दत, नेपथ्याबाबतचा काटेकोरपणा, तालमींमधली शिस्त, भुमिकेमधली 'बॉडी इमेज' शोधण्याचे प्रयत्न, नाट्यसंहितेवर प्रयोग पूर्ण बसेपर्यंत केलेलं काम ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्प्या पध्दतीने उलगडून सांगितलेल्या आहेत.. वयानं आणि अनुभवानं लहान अश्या दिग्दर्शिकेनं  पु.ल. देशपांडे आणि विजय तेंडूलकरांसारख्या दिग्गजांना प्रसंगी संहितेत बदल करायला लावलेलं पाहून बाईंच्या ठाम विचारांचं आणि धैर्याचं कौतूक वाटतं.. नवर्‍याबरोबर इंग्लंडला असताना बाईंनी घेतलेलं नाट्यप्रशिक्षण, तिथले अनुभव, तिथं पाहिलेल्या नाटकांची अतिशय सुरेख वर्णनं पुस्तकात दिली आहेत.. रंगायनचा कालखंड त्रयस्थपणे आत्मपरिक्षण करुन जरी लिहिला असला तरीही लिहिताना बाईंच्या मनावर ताण असावा हे वाचताना नक्कीच जाणवतं.. रंगायनचं फुटणं, एकमेकांवर केले गेलेले आरोप हे जिव्हारी लागण्यासारखेच आहे.. म्हणूनच हा भाग आटोपता घेतला असेल.. 

रंगायन फुटल्यावर बाईंनी व्यवसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं.. ह्या रंगभूमीला 'व्यवसायिक' न म्हणता त्यांनी नाव दिलं 'लोकमान्य'..  ह्या लोकमान्य रंगभूमीला  बाईंनी 'मला उत्तर हवं', 'अखेरचा सवाल', 'जास्वंदी', 'महासागर', 'अजब न्याय वर्तुळाचा', 'संध्याछाया', 'हमिदाबाईची कोठी', 'बॅरिस्टर', 'पुरूष', 'वाडा चिरेबंदी' अशी अनेक सरस नाटकं दिली.. किती तरी वेगवेगळे विषय!..  ह्या नाटकांबद्दल, त्यांच्या संहितेबद्दल, नटसंचाबद्दल, नाटक बसवताना दिग्दर्शनाच्या दृष्टीने केलेल्या विचारांबद्दल, नेपथ्याबद्दल, नाटकांच्या शेवटाबद्दल, प्रयोगांदरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल, तालमींबद्दल बाईंनी अगदी विस्तारानं लिहिलेलंय.. काही काही नाटकांबद्दल वाचताना अक्षरशः अंगावर काटा उभा रहातो..

स्वतःच्या चुकाही बाईंनी प्रांजळपणे काबुल केल्या आहेत.. इतक्या मोठ्या कारकिर्दीत आलेल्या चांगल्या अनुभवाबरोबरच खटकलेल्या गोष्टी ही तितक्याच सहजतेनं मांडल्या आहेत.. मग ती तेंडूलकरांबरोबरची तुटलेली युती असो किंवा भक्ती बर्वेंचा एकपात्री साच्यात अडकलेला अभिनय असो.. नेपथ्यकार गोडश्यांबरोबर झालेले मतभेद असोत किंवा वैयक्तिक आयुष्यातले प्रसंग.. इतकंच काय स्वतःच्या फसलेल्या/पडलेल्या नाटकांचा आढावा ही तटस्थपणे एका वेगळ्या प्रकरणात घेतलेला आहे..  

भारत आणि पूर्व जर्मनी दरम्यान असलेल्या सांस्कृतिक देवाण घेवाण करारा अंतर्गत केल्या जाणार्‍या कार्यक्रमांमध्ये बाईंनी अनेक संस्कृत, मराठी, जर्मन नाटकं भारतात तसेच जर्मनीत केली.. त्यानिमित्तानं त्यांनी अनेक मित्र जोडले.. नंतर नंतर तर त्यांना पूर्व जर्मनीतली गावं त्यांचं माहेरच वाटत होती.. ह्या सगळ्या प्रकल्पां दरम्यानचे अनुभवही अतिशय वाचनीय आहेत.. शांकुतल, मुद्राराक्षस, नागमंडल, हयवदन अशी अस्सल भारतीय नाटकं जर्मन कलाकार कसे सादर करत असतील ह्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.. 

दूरर्शनकरता बाईंनी काही कार्यक्रम, काही त्यांच्या नाटकांवर आधारित चित्रपट ही केले.. हे वेगळं माध्यम हाताळताना स्वतःच्याच कलाकृतींमध्ये केलेला बदल, तो करताना आलेल्या अडचणी नमूद केल्या आहेत.. पुस्तकातील शेवटचे प्रकरण बाईंची एन.सी.पी.ए.च्या संचालक पदाची कारकीर्द.. ह्याबद्दल मात्र खूपच कमी लिहिलंय  असं वाटलं..  

ह्या पुस्तकाने खूप समृद्ध केले.. कलेचा आस्वाद कसा घ्यावा हे शिकवले.. म्हणूनच 'झिम्मा' हे केवळ आत्मचरित्र नाही तर एक संपन्न नाट्यानुभव आहे.. 

'झिम्मा' वाचल्यावर वाटलं 'सवाई' सारखाच नाट्यमहोत्सव व्हायला पाहिजे.. आणि बाईंच्या नाटकांना पुनर्जीवन मिळालं पाहिजे.. 


-मी मधुरा.. 

********************************************

१७.  चेकपॉईंट चार्ली.. डॉ माधवी मेहेंदळे.. 


डॉ माधवी मेहेंदळे यांचं हे १६५ पानी पुस्तक, त्याची लेखनशैली खूपच आवडली.. ह्या लेखन प्रकाराला काय म्हणतात माहिती नाही पण मी हे पुस्तक दोनदा वाचलं.. 

दोन पन्नाशीतील मैत्रिणी, एक अमेरिकेत खूप वर्ष वास्तव्यास असलेली आणि एक भारतीय.. दोघी जर्मनीला प्रवासाला जातात.. हा प्लॉट.. पण एकमेकींशी संवाद न करता फक्त त्यांच्या विचारातून ही कथा पुढे सरकत जाते.. लेखिकेला जे सांगायचं आहे ते वाचण्याची उत्सुकता शेवट पर्यंत अबाधित राहते.. 

वैदेही.. अमेरिकन.. उच्चपदस्त, स्त्रीवादी.. लिव्ह इन रेलशनशिप सध्या एकटी.. आणि दुसरी नेहा.. भारतीय.. संसार जपून स्वतःचा व्यवसाय करणारी.. एका मुलाची आई.. 

जरी दोन वेगळ्या स्त्रिया वेगळ्या राहाणीमानाचं प्रतीक असल्या तरी कोणत्या ही स्त्रीच्या मनातील ‘स्त्री’ म्हणून सतत होत असलेली आंदोलन, ‘स्त्री’ म्हणून त्यांचं असणारं अस्तित्व, जोडीदाराचं मानसिक आणि शारीरिक पातळीवरील स्वामित्व, रूढी परंपरा संस्कार झुगारु पाहणारी ह्या वयातील त्यांची बंडखोरी.. आणि त्याचवेळी नव्यानं सापडत जाणारे पर्याय खूप रंजक पद्धतीनं वाचायला मिळतात.. 

दोन मैत्रिणींचा जर्मन प्रवास दाखवणाऱ्या ह्या पुस्तकाचं असणारं ‘चेकपॉईंट चार्ली' हे नाव खूप बोलकं आहे.. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचे दोन भाग झाले पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी.. आणि ह्या दोन्ही मध्ये उभी राहिली ती बर्लिनची मोठ्ठी भिंत.. ती ओलांडण्यासाठी उभे राहिले ३ चेकपॉईंट.. त्यातील एक ‘चेकपॉईंट चार्ली’.. भिंतीच्या एका बाजूला संपन्न-स्वतंत्र-विकसनशील पश्चिम जर्मनी तर दुसऱ्या बाजूला दरिद्री-वंचित-कुचंबलेलं पूर्व जर्मनी.. त्यामुळं पूर्व जर्मनी मधून प्रत्येक जण पश्चिम जर्मनीकडे जाण्यासाठी धडपडत असतो.. ह्या अर्थाने चेकपॉईंट चार्ली हे बंधनातून मुक्तीकडं जाण्याचं आशावादाचं प्रतीक मानलं जातं.. ज्या पद्धतीनं ह्या दोन मैत्रिणींचा मानसिक, भावनिक प्रवास दाखवला आहे त्याला हे नाव एकदम चपखल बसतं.. 

जर्मनचा अख्खा इतिहास खूप वेगळ्या पद्धतीनं वाचायला मिळतो.. त्यांची मानसिक स्थित्यंतरं दाखवताना हिटलरची मनोवस्था येते.. चार्ली चॅप्लिन मधूनच डोकावतो.. हिटलर आणि चार्ली चॅप्लिन मधील साम्य आणि फरक, ह्या कलाप्रेमी स्त्रियांमुळं पिकासो, दाली, मोझार्ट, जर्मन थिएटर भेटत राहतात.. 

ह्यातील कवितांना विसरून चालणार नाही.. 

पिकासोची बंडखोर वृत्ती पाहिल्यावर वैदेहीच्या मनातील विचार ह्या कवितेतून जाज्वल्यपणे उमटतात.. 

माझा झोका मीच बांधणार 
मीच बसणार 
व मीच झोका देणार 
उंच उंच उंच 
अवकाशाच्या सीमंतापर्यंत.. 

आणि हीच वैदेही प्रवासाच्या शेवटी तिला उमगलेलं जीवनाचं सत्य सांगताना म्हणते.. 

मी म्हणजे कोण?
मी म्हणजे 
निसर्गाच्या ऊर्जेचा एक छोटासा भाग.. 
 
डॉ माधवी मेहेंदळें मधील चित्रकार, कवयित्री आणि सुजाण लेखिकेने वाचकांना दिलेली मेजवानीच आहे.. 

-मी मधुरा..

*************************************

Saturday, July 30, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं १० ते १३)

१०. जगाच्या पाठीवर.. सुधीर फडके.. 


बाबूजी म्हणून ओळखले जाणारे संगीतकार, गायक सुधीर फडके यांचे हे आत्मचरित्र.. खरं तर एक अपूर्ण आत्मचरित्र.. "किर्लोस्कर" मासिकासाठी बाबूजींनी लिहिलेल्या लेखमालेचा हा एक संग्रह पुढे 'जगाच्या पाठीवर' म्हणून प्रकाशित केला.. सावरकरांवरच्या चित्रपटाचा ध्यास त्यांनी घेतल्यामुळे ह्या लेखमालेत केवळ पंधराच भाग बाबूजी लिहू शकले.. आणि हे आत्मकथन अपूर्ण राहिले.. 

बालपण ते पाहिलं ध्वनीमुद्रित गाणं असा बाबूजींचा जीवन प्रवास ह्यात वाचायला मिळतो.. आई गेल्यानंतर सधन असलेल्या कुटुंबाची झालेली वाताहात, वडिलांनी वकिली बंद केल्यावर बदलेली आर्थिक परिस्थिती, उपासमार.. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या आधारावर काढलेले दिवस.. उधारी-उसनवारी आणि गाण्याच्या जीवावर आयुष्य सावरण्याचा केलेला आटोकाट प्रयत्न.. आशा-निराशा, यश-अपयश, मान-अपमान ह्यावर हेलकावणारं आयुष्य.. हे सगळं वाचताना अंगावर काटा येतो, डोळे पाणावतात.. 

कोल्हापूरमध्ये असताना लहानपणीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ते जोडले गेले.. संघाची तत्त्वप्रणाली, ध्येय ह्यानं ते भारावून गेले.. उच्च-नीच, जात-पात लहानमोठ्ठा असे सर्व भेदभाव पूर्णाशानं मिटवून, भाषाभेद, प्रांतभेद नाहीसे करून हिंदू समाजाला एक समान पातळीवर आणण्याचं ध्येय असणारी आणि हे करत असताना देशाला स्वतंत्र करायला कटिबद्ध असलेली अशी हि संघटना त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन गेली.. संघाच्या ओळखीतूनच पुढे ते काम मिळवण्यासाठी मुंबईत आले.. संघाच्या कार्यालयात राहून संघकार्य आणि गाण्याचं शिक्षण देणे-घेणे, संघाची कार्यव्यवस्था पाहणे अशी कामे ते करत.. पण संघातील तत्कालीन पदाधिकाऱ्यांशी मतभेद झाल्यासंघाच्या कार्यालयात राहून संघकार्य आणि गाण्याचं शिक्षण देणे-घेणे, संघाची कार्यव्यवस्था पाहणे अशी कामे ते करत.. पण संघातील तत्कालीन पदाधिकाऱ्यांशी मतभेद झाल्यानं त्यांना संघकार्यालयातून सामानासकट बाहेर काढलं गेलं.. फुटपाथ वर राहण्याची वेळ त्याच्यावर आली.. ते वाचताना अवंठा दाटून येतो.. इतकं सगळं होऊन सुद्धा संघाचं काम ते निष्टेनं करतंच राहिले..  

संघ कार्यालयातून हकालपट्टी झाल्यावर फूटपाथ आणि मग मुंबईचा कंटाळा आल्यावर देशभर भटकंती.. संघातील ओळखींच्या आधारावर गावोगाव फिरून गाण्याचं  कार्यक्रम करून थोडेफार पैसे जमले कि पुढचा प्रवास.. काही ठिकाणी कार्यक्रम होत तर काही ठिकाणी नाही.. कधी राजे-संस्थानिक-जमीनदार ह्याच्या समोर तर कधी देवळात तर कधी रेल्वे स्टेशन.. अनेक विरोधाभास.. गैरसमजामुळं घरच्यांशी, कोल्हापूरशी तुटलेलं नातं, पैसे मागतो म्हणून मित्रांशी आलेला दुरावा.. अश्या अनेक कारणांमुळं आत्महत्या करण्याचा घेतलेला निर्णय.. या भटकंतीत झालेले मान-अपमान, फसवणुक त्याच बरोबर मदतीला आलेले हात यांचं सविस्तर वर्णन पुस्तकात केले आहे.

'पहिलं गाणं रेकॉर्डिंग' ची संधी कितीतरी वेळा आली आणि हातातून निसटून गेली हे वाचतानाचे प्रसंग हृदय द्रावक आहेत.. कलकत्ता हीच कर्मभूमी ठरवून काही दिवसासाठी आजारी भावाला कोल्हापूरला भेटायला आलेल्या बाबूजींची योगायोगानं गदिमांशी झालेली भेट.. त्यामुळं HMV झालेली त्यांची ओळख.. त्यातून मिळालेली गदिमांच्या गाण्याला चाल लावायची पहिली संधी.. नंतर झालेलं त्यांच्या गाण्याचं पाहिलं रेकॉर्डिंग.. HMV न नाकारलेला त्यांचा आवाज.. हे सगळं एखाद्या सिनेमाच्या गोष्टीसारखं वाटतं..

... आणि इथंच त्यांचं आत्मकथन संपतं.. गीतरामायणाची निर्मिती त्यांच्या लेखणीतून उतरायला हवी होती ही खंत नक्कीच आहे.. पण त्यांच्या पत्नी ललिता फडके यांनी गीतरामायण, सावरकर चित्रपट निर्मिती, गोवा-दादरा-नगर हवेली मुक्ती संग्राम ह्या बद्दलच्या आठवणी लिहिल्या आहेत.. पुस्तकांतील फोटोंमुळं पर्सनल टच आला आहे.. 

संगीतकार, गायक म्हणून बाबूजीं तर मोठ्ठे आहेतच पण त्यांचं देशप्रेम, त्यांचं सामाजिक भान हे ही पैलू पहायला मिळतात.. 


-मी मधुरा.. 

****************************************

११. क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता.. मृणालिनी गडकरी.. 

(आयरिश महिलेच्या भारतावरील निष्ठेची कहाणी..)




२०१८ सालच्या भारतवारीतलं.. "ताई चांगलंय.. नवीनच प्रकाशित झालंय.. घेऊन जा' दुकानदार काकांचा सल्ल्यानं घेतलेलं.. स्वामी विवेकानंदांची शिष्या 'भगिनी निवेदिता'.. कदाचित त्यामुळंच जड वाटलेलं आणि वाचायचं मागं पडलेलं.. असं हे पुस्तक ह्या वाचन संकल्पामुळं हातात घेतलं.. ते ही २०२२च्या भारतवारी विमानप्रवासात वाचायला.. 😂 आणि ३७८ पानांचं पुस्तक प्रवासात शेवटची काही पानं वगळता वाचून सुद्धा झालं.. 

'क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता' हे स्वामी विवेकानंदांची शिष्या मार्गारेट नोबल यांचं चरित्र.. जन्मानं आयरिश, नागरिकत्वानं ब्रिटिश 'मार्गरेट'चा मार्गारेट ते भगिनी निवेदिता हा प्रवास आणि त्यांचं भारतातील कार्य याचं अभ्यासपूर्ण संकलन असलेलं मराठीतील पाहिलंच पुस्तक!!.. 'भगिनी निवेदिता' ह्या नावाशी माझा संबंध केवळ घराचा लँडमार्क म्हणून ह्यापूर्वी आला होता.. 'भगिनी निवेदिता बँकेसमोर..' इतकंच.. आणि हे पुस्तक वाचल्यावर इतक्या मोठ्ठ्या व्यक्तिमत्वाबद्दल काहीच माहिती नसावी याची खरोखरी लाज वाटली.. लोकमान्य टिळक, नामदार गोखले, दादासाहेब खापर्डे अश्या महाराष्ट्रातील व्यक्तींशी त्यांचा निकटचा संबंध असून सुद्धा त्यांच्या बद्दल कधीच काही वाचायला मिळालं नाही ह्याची खंत नक्कीच आहे.. 

भगिनी निवेदितांचं खूपसं काम कलकत्ता परिसरात झालं.. त्यामुळं त्यांच्यावरच थोडंफार लिखाण बंगालीमध्ये आठळून येतं.. 'निवेदिता लोकमाता' ह्या शंकरीप्रसाद बसूंनी लिहिलेल्या बंगाली भाषेतील चरित्राचा आधार मृणालिनी गडकरींनी घेतल्याचं म्हटलं आहे.. १८९८ ते १९११(मृत्यू : दार्जिलिंग) इतकाच काय तो भगिनी निवेदितांचा  भारतातील कार्यकाळ.. पण एकदा भारताला, भारतमातेला (जिला त्या नेहमी she असेच संबोधायच्या) आपलं म्हटल्यावर कितीही हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्या तरी त्या परत इंग्लंडला गेल्या नाहीत.. त्यांच्या गुरूंनी स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं सचेतन भारताचं कार्य अत्यंत निष्ठेनं केलं.. थोडक्यात देशप्रेम (भारत), निष्ठा, गुरुभक्ती आणि आत्यंतिक त्याग म्हणजे भगिनी निवेदिता!

भगिनी निवेदिता म्हणजेच मार्गारेट मूळच्या आयरिश.. आयरिशांचे सेल्टिक रक्त क्रांतिकारक निर्माण करणारेच! आजोबा, आजी, वडील ह्या सगळ्यांकडून क्रांतीचे बाळकडू मिळालेली मार्गारेट स्त्रियांसंबंधी, त्यांच्या हक्कासंबंधी वृत्तपत्रातून लेख लिहू लागली.. स्त्रियांबरोबरच तळागाळातील लोकांच्या समस्या, शिक्षण पद्धती ह्याचे मार्मिक आणि परखड चित्रण लेखनातून केले.. पुढे स्वामींजींशी परिचय झाल्यावर भारताला आपली कर्मभूमी मानून येथे ही क्रांतिकारी बदल घडवून आणले.. भारतीय स्त्रियांच्या शिक्षणात वेगळेपणा आणला.. भारतीय संस्कृतीला धक्का न पोचवता स्त्री शिक्षणाला आधुनिकतेची जोड दिली.. स्त्रीला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचं बळ देणारी शिक्षण पद्धती सुरु करून, त्यांच्याकडून निरनिराळ्या वस्तू तयार करून घेऊन 'स्वदेशी'शी त्यांची ओळख करून दिली.. स्वामीजींना अभिप्रेत असणारा 'माणूस' त्या स्त्री मध्ये घडवत होत्या.. पण १९०२ मध्ये स्वामीजींच्या देहवासनानंतर त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य लढ्याच्या गुप्तकार्यात झोकून दिलं.. त्यांची गुप्तहेर संघटना खूप ताकदीची होती.. 

आईची आई होणारी मार्गारेट, मे आणि रिचमंडची जबाबदार मोठ्ठी बहीण मार्गारेट, स्वामीजींची निष्ठावान शिष्या मार्गोट, शारदामातांची लाडकी खुकी (बाळ), शाळेतील विद्यार्थिनींची आवडती सिस्टर, लेखिका मार्गारेट/निवेदिता, कवी मनाची निवेदिता, तेजस्वी निवेदिता, निर्भय निवेदिता, लहानश्या गोष्टीने आनंदी/दुख्खी होणारी निवेदिता, क्रांतियोगिनी निवेदिता अशी अनेक रूपं पाहताना अचंबित व्हायला होत.. त्याचं हे चरित्र वाचल्यावर स्वामीजींनी त्यांना दिलेलं निवेदिता म्हणजेच समर्पिता हे नाव किती समर्पक होत हे पटतं.. 

-मी मधुरा..
 
*****************************************************

१२. महाश्वेता.. डॉ. सुमती क्षेत्रमाडे.. 



केवळ एका शारीरिक व्यंगामुळं पतीकडून अव्हेरल्या गेलेल्या स्त्रीचा अत्यंत संवेदनशील जीवनपट म्हणजे महाश्वेता!!.. डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांची लोकप्रिय कादंबरी.. या कादंबरीवर आधारित 'महाश्वेता' ही टीव्ही सिरीयल पहिली असल्यानं, एक उत्कृष्ठ साहित्य वाचायला मिळणार याची कल्पना होतीच.. ३२८ पानांची ही कादंबरी जसजशी पुढं सरकत गेली तसतशी मनावरील तिचा ताबा अधिक घट्ट होत गेला.. 

(सुधा मूर्तींनी सुद्धा याच कथानकावर आणि याच नावानं “महाश्वेता” कादंबरी लिहिली आहे.. पण सुमती क्षेत्रमाडे त्यांच्या ह्या कादंबरीबद्दल आधी माहिती नव्हतं असं त्यांनी म्हटलेलं आहे..) 

एका लहान गावात, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली आपल्या कथेची नायिका सुधा.. तिच्या अतुलनीय सौंदर्याने मोहित झालेल्या माधवशी लग्न करून ती 'धाकल्या इनामदारबाई' म्हणून देशपांडेच्या वाड्यात गृहप्रवेश करते.. श्रीमंती, उच्च राहणीमान, नोकर-चाकर, भरभरून प्रेम करणारा नवरा यामुळं सुधा आत्यंतिक सुखी जीवन जगत असते.. पण लग्नानंतर काही महिन्यातच तिच्या ह्या सुखी संसाराला 'पांढऱ्या डागांचे' ग्रहण लागते.. सुधाच्या सौंदर्यावर भाळून तिच्यावर आकंठ प्रेम करणाऱ्या माधवला तिच्या पायावरचा हा पंधरा डाग पाहून मोठा धक्का बसतो.. सौंदर्याची पूजा करणारा माधव तिच्याशी संबंध तोडतो.. अतिशय धार्मिक आणि कडक स्वभाव असलेल्या आईसाहेब, तिच्या सासूबाई तिला माहेरी पाठवून देतात.. विविध औषधोपचार, व्रतवैकल्य, देवधर्म करून सुद्धा कोड कमी होत नाहीत तर ते दिवसेंदिवस वाढतच जातात.. तिच्यामुळे आई-वडिलांना होणारा मानसिक त्रास, सगळीकडे होणारी चर्चा, बहिणीचे मोडलेले लग्न आणि नवऱ्याने तोडलेले संबंध यामुळे ती अजून खचून जाते.. 

दिल्लीला उपचार घेण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या सुधाचा प्रवास रोमांचित करणारा आहे.. दिल्लीला उपचारासाठी गेलेली सुधा डॉक्टर न भेटल्यानं, मावशीकाकांबरोबर हिमालयात तीर्थयात्रेला जाते आणि तिथं तिला तिच्या आयुष्याचं ध्येय सापडतं.. गंगामैय्या नावाच्या वृद्ध महिलेबरोबर तिच्या पर्णकुटीत राहण्याचा तिचा निर्णय, स्वामीजींचं तिला भेटणं, स्वामीजींच्या बरोबर असणाऱ्या अनाथ बालकांचा तिला लागलेला लळा, त्यांच्याशी झालेलं भावनिक नातं, घरच्यांसाठी नवऱ्यासाठी झुरणारं तिचं मन.. आणि ह्या सगळ्यांतून बदलत जाणारी, घडत जाणारी सुधा.. कोड आलेल्या मुलीची मानसिकता डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांनी अचूक वर्णन केली आहे.. स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनी हा विषय अगदी व्यवस्थित हाताळला आहे..

थोडक्यात मनुष्य स्वभावाचं दर्शन घडवणारी.. माणुसकी, श्रद्धा, विश्वास ह्याची सांगड घालून शारीरिक व्यंगावर मात करून आयुष्य आनंदात जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुधाच्या जीवनाची उत्कृष्ट कादंबरी...  
 

-मी मधुरा.. 

*****************************************************

१३. ब्र.. कविता महाजन..


'ब्र' सामाजिक विषयावर भाष्य करणारी लोकप्रिय कादंबरी!.. 'ब्र' ह्या कादंबरीबद्दल बरंच ऐकलं होतं.. त्यामुळं पन्नास पुस्तकांच्या यादीत हे नाव अगदी वरती होतं.. 

कादंबरीची नायिका 'प्रफुल्ला' हिचा एक सामान्य गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती हा प्रवास म्हणजे 'ब्र'.. एकट्या, घटस्पोटीत बाईच्या नजरेनं, निरागसपणे पाहिलेलं जग म्हणजे 'ब्र'.. आदिवासी भागातल्या बाईचं जगणं म्हणजे 'ब्र'.. सामाजिक संस्थातलं राजकारण, समाजकारण म्हणजे 'ब्र'.. वास्तवाचं भान असून सुद्धा त्याबद्दल अवाक्षर न बोलणं म्हणजे 'ब्र'.. 

ही कादंबरी वाचल्यावर सुन्न व्हायला होतं.. २००५ मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी.. पण अजुनी त्यातील घटना, घटनांमागची परिस्थिती आजही तशीच असावी ह्याची खंत नक्कीच वाटते.. कादंबरीच्या अर्पणपत्रिकेच्या पानावर 'ज्यांना 'ब्र' उच्चारता आला त्या सर्व जिभांना' हे वाचल्यावर चर्र होतं..  

आदिवासींचं जगणं, मुख्यत्वेकरून महिला, त्यांच्या जगण्यातील अडचणी वाचून डोळ्यांच्या कडा पाणावतात.. मूलभूत गोष्टींसाठी त्यांना झगडताना पाहून सरकार, सामाजिक संस्था ह्यांबद्दल मनात प्रश्नचिन्ह उभं राहतं.. 

आदिवासींचं नृत्य पाहिल्यावर, इतकी विपरीत परिस्तिथी, उपासमार, कुपोषण, उपचारांचे अभाव, अंगावर धड कपडा नाही.. या परिस्थितीत खुलून डोळ्यांत आनंद तेववत नाचतात कशी? हा प्रश्न जेव्हा प्रफुल्लाला पडतो तेव्हा डॉ. दयाळांनी दिलेलं 'कारण ते जिवंत आहेत...' हे उत्तर मनात घर करून राहत..

आता कोणतेही मोह नकोत.. पैश्याअडक्याचे, घरादाराचे, कापडलत्याचे, सोन्याचांदीचे, मुलाबाळांचे, शरीर-इच्छांचे, मानसिक आधारांचे.. ह्या सगळ्यातून मोकळं होऊन सहज स्वाभाविक आयुष्य जगता आलं पाहिजे.. हे नायिकेचे तिच्या अनुभवातुन आलेले विचार आपल्यासाठी ही समर्पक वाटतात.. विचार करायला लावतात.. 

सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करून आयुष्यात पुढं पुढं चालत राहणं हेच तर खरं जगणं.. कांचन वृक्षासारखं!.. मुरुमांना सुद्धा छेद देत जाणाऱ्या त्याच्या मुळांसारखं!.. लाखो सोनफुलांनी उंच वाढत जाणारं.. आभाळाला भिडणारं.. परिस्थितीचं कातळ फोडून निश्चित वाटांनी ठाम जाणारी मूळ असणारं.. अश्मान्तक कांचन!!.. तसंच घडू पाहणारी प्रफुल्ला आपल्याला कादंबरीच्या शेवटी भेटते.. 

'ब्र' जरी आदिवासी पाड्यांबद्दल भाष्य करणारी कादंबरी असली तरी ती त्या पुरतीच सीमित नाही तर महानगर, शहर, खेडेगाव ह्या सगळ्यांना सामावून घेणारी आहे.. 

'ब्र' कादंबरीची हिंदी अनुवादित कादंबरी 'च्यू'  राष्ट्रीय पुरस्काराने गौरवली गेली आहे.. 


-मी मधुरा.. 

***************************************************************

Wednesday, June 29, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं.. (पुस्तकं ६ ते ९)

 ६. यक्षांची देणगी.. जयंत नारळीकर.. 




जयंत नारळीकरांच्या काल्पनिक विज्ञानकथांचा हा कथासंग्रह.. हा कथासंग्रह हातात पडला तेव्हा मन थोडं साशंक होत.. मी आणि विज्ञान एकमेकांपासून कोसो दूर.. पण सगळे लेखनप्रकार वाचून पाहायचे म्हणून हे वाचायला घेतलं आणि प्रत्येक कथेत गुंतून पडले.. हे श्रेय केवळ लेखकाचं.. 

जयंत नारळीकरांनी प्रास्ताविकात म्हटलं आहे कि विज्ञानकथा लिहायची कल्पना त्यांना एका खगोलशास्त्राच्या परिसंवादात चाललेल्या कंटाळवाण्या भाषणात आली.. आणि त्यांनी त्यावेळी 'कृष्णविवर' ही कथा त्या परिसंवादातच लिहायला घेतली.. रिकामपणाची कामगिरी म्हणून हाती घेतलेला हा उपक्रम दोन दिवसात पूर्ण पण  झाला.. 

विसावं शतक हे विज्ञानयुग म्हणून ओळखलं जातं.. ह्या विज्ञानामुळं, त्याच्या अनेक शोधांमुळं मानवाच्या आयुष्यात, त्याच्या दिनचर्येत बरेच अचंबित करणारे बदल घडले.. एकीकडे विज्ञानाचे हे चमत्कार तर दुसरीकडे अंधश्रद्धा, रूढीपरंपरा ह्यात अडकलेला सामान्य माणूस.. हे बदल पचवायचे असतील तर वैज्ञानिक शोध आणि त्याचं तंत्रज्ञान याचं ज्ञान सामान्य माणसाला असणं आवश्यक आहे.. आणि ह्या विचारातून ह्या कथा लिहिल्या गेल्या.. 

ह्या कथासंग्रहाची पहिली आवृत्ती १९७९ मधली.. ह्या कथा त्यापूर्वीच्या इतरत्र प्रकाशित झालेल्या.. तरी त्या आत्ताच्या काळात वाचताना सुद्धा मजा आली.. 

कथा १.. यक्षांची देणगी: पृथ्वीपलीकडे जीवनसृष्टी असेल का?.. हा ह्या कथेचा विषय.. जो खगोलशास्त्र, जीवशास्त्र संख्याशास्त्र, तंत्रशास्त्र ह्या सगळ्या अंगानं विचार करून लिहिला आहे.. अशी जीवसृष्टी असेल तर ती ताऱ्यांपासून ऊर्जा घेत असेल.. नैसर्गिक बदलामुळं जर त्या सृष्टीला ताऱ्यापासून ऊर्जा मिळणे बंद झाले तर.. ते पृथ्वीवर ताबा मिळवल्याचा प्रयत्न करतील.. आणि मग काय होईल?... अशी ही कथा... 

कथा २.. कृष्णविवर: एखादी मोठ्ठी वस्तू स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाने संकुचित होत गेली तर ती बाहेरून दिसेनाशी होते.. ते गुरुत्वाकर्षण इतके प्रचंड असते कि प्रकाश सुद्धा त्या वस्तूकडे खेचला जातो.. अश्या वस्तूला कृष्णविवर (black hole) म्हणतात.. ह्या सिद्धांतावर आधारित ही गोष्ट.. कथेच्या नायकाचे यान अश्या कृष्णविवरात अडकते आणि मग काय होते...

कथा ३.. उजव्या सोंडेचा गणपती: मोबियस पट्टीचा उपयोग करून एखादा चपटया वस्तूला थ्री डायमेंशन मध्ये रूपांतरित करता येते.. तसेच त्या पट्टीचा वापर करून थ्री डायमेंशन चे फोर डायमेंशन मध्ये रुपांतर केले तर डाव्याचं उजव्यात आणि उजव्याचं डाव्यातं रूपांतर झाल्यासारखं वाटेल.. 'आशेर पेरेस' ह्या गणिती सिद्धांतावर ही कथा आहे.. हा सिद्धांत वापरून डाव्या सोंडेच्या गणपतीचं रूपांतर उजव्या सोंडेच्या गणपतीत होतं.. 

कथा ४.. गंगाधरपंतांचे पानिपत: माझी आवडती कथा.. ही कथा क्वांटम थिअरी वर आधारित आहे.. अमुक एक कारणामुळं अमुक एक घडेल.. किंवा ठराविक कारणामुळं ठराविकच काही घडेल.. असं न होता एकाच कारणामुळं एका ऐवजी अनेक संभाव्य गोष्टी घडू शकतात आणि त्या गोष्टींना स्वतःचं असं एक विश्व असतं पण आपल्याला दर्शक म्हणून एकच दिसतं.. असं क्वांटम थेअरी सांगते.. आणि हीच थेअरी पानिपत युद्धाला लावून ही कथा लिहिली आहे.. पानिपत युद्धात मराठे हरलेच नाहीत आणि अख्या हिंदुस्थानात मराठी राजवट आहे.. आणि मग आत्ताचं जग कसं असेल.. ही कथा आहे.. 

कथा ५.. धूमकेतू: धूमकेतू ही गुरुत्वाकर्षणामुळं फिरणारी निर्जीव वस्तू.. तो सूर्यमालेत लांबून येतो आणि सूर्याभोवती चक्कर मारून निघून जातो.. तो बाकी ग्रहांच्या मानानं आकारानं लहान असला तरी त्याचं शेपूट पुष्कळ लांब असू शकतं.. (सूर्य पृथ्वी अंतरा इतके सुद्धा).. हे धूमकेतू पृथ्वीवर आदळले तर प्रचंड नुकसान, प्राणहानी होण्याची शक्यता असते.. आणि ह्याच शक्यतेच्या आधारावर ही गोष्ट आहे.. धूमकेतू मागे जनसमुदायात असलेले गैरसमज कथेत येतात.. 

कथा ६.. पुनरागमन: तंत्रशास्त्रात जसजशी प्रगती होईल जसतशी जीवनात यांत्रिकपणा येण्याची शक्यता असते.. अश्या तऱ्हेचे अतिप्रगत जीवन कंटाळवाणे होईल का? ह्या विचारातील ही कथा.. ह्या कथेचा नायक करटक आणि त्याचा मित्र दमनक परग्रहावरून पृथ्वीवर ती त्यांना राहण्यासाठी योग्य आहे का ते पाहायला येतात.. यांत्रिक जीवनाला कंटाळला करटक पृथ्वीवरील जीवनाच्या प्रेमात पडतो आणि पुढे काय होते अशी ही कथा.. 

कथा ७.. दृष्टीआड सृष्टी: मंगळाच्या पृष्ठभागाची तपासणी करून तिथे जीवसृष्टी नसेल असा निष्कर्ष व्हायकिंग यानाने काढला.. पण त्याच्या पृष्ठभागाखाली एखादी वस्ती असू शकेल का ह्या विचारातून ही कथा लिहिली आहे.. 

कथा ८.. धोंडू: आकाशातून एक प्रकाशाचा गोळा जमिनीवर पडतो.. तो सूर्यमालेत फिरणारा एक दगड असतो.. पण त्या दगडात शास्त्रज्ञांना जीवसृष्टीचे घटक सापडतात.. त्यामुळे सूर्यमालेपलीकडील विश्वात जीवसृष्टीला पोषक वातावरण असेल का? रासायनिक अणूंपासून जीवसृष्टी निर्माण करून उत्तम मेंदूची घडवणूक करून परिपूर्ण जीव निर्माण करता येईल का?.. आणि असे झाले तर काय? अशी ही कथा.. 

कथा ९.. पुत्रवती भव: नावाप्रमाणेच ही नवीन जीवाच्या जन्माची कथा आहे.. नवीन होणाऱ्या बाळाचे लिंग कोणते असावे हे निसर्गाने अजुनी तरी आपल्याकडे ठेवले आहे.. पण जीवनिर्मितीतल्या 'क्रोमोसोम'वर कंट्रोल आणला तर नवीन जीवाचे लिंग समागमापूर्वीच ठरवता येईल का? मुलगा हवा असेल तर पुरुषातील X क्रोमोसोम वर कंट्रोल ठेवायचा आणि मुलगी हवी असेल तर Y वर.. शरद नावाचा शास्त्रज्ञ असा शोध लावतो आणि मग काय होते.. अशी ही कथा.. 

कथा १०.. ट्रॉयचा घोडा: पायोनियर १० हे यान १९७२ मध्ये आपले ग्रहमंडल ओलांडून ते दूरवर जावे ह्या हेतूने केप केनेडीहून पाठवले होते.जर हे यान २०५० मध्ये पृथ्वीच्या दिशेने परत यायला निघाले तर काय होईल? अशी ही कथा.. 

कथा ११.. नौलखा हाराचे प्रकरण: शेरलॉक होमची अनसॉल्व्हड केस.. 'टाईम मशीन' मधून भविष्यकाळात गेल्या नंतर परत वर्तमानात येता येईल का? दिलेल्या कंडिशन्स मध्ये फरक पडला तर कदाचित नाही.. हरवलेला नौलखा हार टाईम मशीन मधून ऑलरेडी तीन पिढ्या पुढे पोचला आहे.. त्यामुळे तो शेरलॉक ला मिळत नाही.. ही गोष्ट वाचताना शाळेतले दिवस आठवले.. 

कथा १२.. अखेरचा पर्याय: भविष्यकाळात आपण इतके यंत्रावलंबी झालेलो असू यंत्रे बंद पडणे हा युद्धाचा प्रकार असू शकेल.. कदाचित ही यंत्रे सौरशक्तीवर चालत असतील.. शत्रुदेशाला असह्यस्थितीत आणून सोडायला ही शक्तिकेंद्रे बंद करायची.. ह्यावर आधारित ही कथा.. 

-मी मधुरा.. 

****************************************************

७. नातिचरामि.. मेघना पेठे.. 



बुकगंगावर पुस्तकं शोधत असताना 'नातिचरामि' ह्या नावानं माझं लक्ष वेधलं.. ह्या नावाचा नक्की अर्थ काय?.. पुस्तकाच्या मलपृष्ठावरून पण काही अंदाज बांधता येईना.. मग गूगलबाबांची मदत घेतली.. 'धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामि'... विवाहाच्या वेळी पतीनं पत्नीला द्यायचं वचन.. इतकी काय ती माहिती मिळाली.. आणि 'इंटरेस्टिंग' असा शेरा मारून पुढं गेले.. नंतर पोर्टलॅंडच्या लोकल लायब्ररीत 'नातिचरामि' showcase stand वर दिमाखात उभं असलेलं दिसलं.. 

'नातिचरामि' ही कादंबरी असली तरी रूढ अर्थाने कादंबरीच्या साच्यात बसणारी नाही.. विशिष्ट कथानक, त्याचा आरंभ, मध्य, शेवट अशा टप्प्यांतून ही कादंबरी पुढं सरकत नाही.. तर नायिका मीरा, घटस्फोटानंतरच तिचं आयुष्य आणि समाज व्यवस्थेतील स्त्री-पुरुष नातेबंधांच्या आखलेल्या चौकटींना झुगारून देत पुरुषी सामर्थ्य रचनेला शह देण्याचा तिचा वैचारिक संघर्ष ह्यातून ती आकार घेते.. 

मीराच्या आत्मनिवेदनातून कादंबरीची सुरुवात होते.. नुकताच घटस्फोट झालेली मीरा तिच्या पण पूर्वी दोघांच्या असणाऱ्या घरात एकटीच परतते.. घरात आत्तापर्यंत असणारं त्याचं अस्तित्व आणि आता त्याचं नसणं, ते रिकामपण, ती पोकळी, त्यातून येणारी एकटेपणाची जाणीव तिला बोलतं करते.. मग भूतकाळ ती वर्तमान म्हणून जगत राहते.. भूतकाळातले तिचे नि तिच्या नवर्‍याच्या आठवणींचे तुकडे जोडता जोडता ती आपल्या विस्कटून गेलेल्या भावविश्वात डोकावते.. तिच्या भावविश्वाला जरी धक्का लागला असला तरी घटस्पोटामुळं तिचं आयुष्य उद्धवस्त झालंय हे तिला मान्य नाही..

मीरा स्वत:ला, स्वत:च्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षांना प्राधान्य देऊन, आड येणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक संकेत, नीतिनियम, मूल्यआचारांच्या संकल्पना तडा देत, तीच आयुष्य ती निडरपणे जगत राहते.. स्वत:शीच वाद-संवाद करत बुरसटलेल्या समाजाशी संघर्ष करत राहते.. तिचा हा संघर्ष अगदी लग्नसंस्थेपासून सुरू होतो.. लग्नसंस्थेचं फोलपण तिला तिच्या नुकत्याच झालेल्या घटस्फोटात दिसतं आणि हीच तिच्यातील सामर्थ्याची पहिली खूण!!.. स्वत:च्या लैंगिक इच्छांचा हवा तसा सन्मान करते आणि एकूणच समाजव्यवस्थेच्या अनेक स्तरांवरील बंधनांची कुंपणं उखडून टाकते.. तिच्या विवाहित 'पुरुष'मित्राला 'लग्न नाही केलं आपण तरी एकत्र राहू शकतो' आणि त्यात काहीच अनैतिक नाही असं सांगते.. थोडक्यात, ही मीरा स्वतंत्र विचारांनी जगणारी आणि तितक्याच उत्कटपणे जगण्याचे मार्ग आपलेसे करणारी आहे..  

मीराच्या आत्मनिवेदनातून ही कादंबरी पुढे सरकत असल्यानं मीराचं व्यक्तिमत्त्व हा या कादंबरीचा गाभा आहे.. आणि ते अतिशय प्रभावीपणे अनेक कंगोऱ्यांसह लेखिकेनं उभा केला आहे..  मीराचा हा स्वतंत्र, धाडसी दृष्टिकोन कमालीचा मुक्त आहे.. तो तिच्यासारख्या अनेक घटस्फोटित स्त्रियांच्या दृष्टिकोनांशी मिळता जुळता वा त्याचं प्रतिनिधित्व करणारा नसेलही, तो तीव्रही असेल, टोकाचाही असेल पण हा दृष्टिकोन एका स्त्रीनं पुरुषी सामर्थ्याला, वर्चस्वाला दिलेलं आव्हान आहे.. आणि हे या कादंबरीचं वैशिष्टय आहे.. वेगळेपण आहे..

नायिका म्हणजे मीरा बरोबर इतर स्त्री व्यक्तिरेखा ही अधूनमधून कादंबरीत डोकावतात.. त्यांना फारसं महत्व नसलं तरी लेखिका त्यांना चेहरे द्यायला यशस्वी झाली आहे.. त्या मानाने पुरुष व्यक्तिरेखा धूसर वाटतात.. त्याच्यातील 'पुरुषी मनोवृत्ती'च ठळकपणे दिसून येते.. त्यांचं सर्वांगीण व्यक्तित्व उभंच राहत नाही.. 

मीराची व्यक्तिरेखा मांडतानाची, कादंबरीचा विषय मांडतानाची सुरुवातीची पंधरा वीस पानं खूप कंटाळवाणी वाटतात.. तसाच शेवटही उरकल्यासारखा वाटतो.. मीराचा तिच्या तिशीपासून सुरु झालेला प्रवास एकदम साठीत येऊन थांबतो.. साठाव्या वाढदिवसादिवशी, तिच्या मित्राबरोबर आठवणींचे अन्वय लावत बसलेली मीरा तिच्या आक्रमक, स्वतंत्र वृत्तीशी विसंगत वाटते.. अशा शेवटामुळं कादंबरीवरची पकड ढिली होऊन जाते..  

अश्या मर्यादा असूनही 'नातिचरामि' वाचकाला गुंतवून ठेवते.. 

(According to Book 'नातिचरामि' म्हणजे Till death do us apart.. )

-मी मधुरा.. 

************************************************

८. बाजिंद.. पै. गणेश मानुगडे.. 


'बाजिंद' पुस्तकाच्या मुखपृष्टाकडं पाहून उत्सुकतेनं हे पुस्तकं हातात घेतलं.. पैलवान लेखक आणि ऐतिहासिक कादंबरी हे समीकरण ही जरा वेगळं वाटलं.. 

'बाजिंद' ही शिवकालीन ऐतिहासिक कादंबरी असली तरी एक काल्पनिक रहस्यकथा आहे.. आदिलशाहीत सुभेदार असलेले 'येसोजी शिर्के' यांची 'यशवंतमाची' स्वराज्यात सामील होतानाचे ऐतिहासिक संदर्भ घेऊन, त्यात काही काल्पनिक तर काही खऱ्या पात्रांचा आधार घेऊन कथानक छान गुंफलं आहे.. 

कथेची सुरुवात होते ती एका जंगली प्राण्यांच्या सुळसुळाटानं हैराण झालेल्या पण खाऊन पिऊन सुखी असलेल्या धनगरवाडीत.. टकमक टोकावरून कडेकोट झालेल्यांच्या रक्ताला सोकावलेले हे जंगली प्राणी..  ह्या प्राण्यांच्या बंदोबस्ताचं गाऱ्हाणं घेऊन, रायगडावर सरकार दरबारी जाण्याचं सखाराम धनगर व त्याचे तीन साथीदार ठरवतात.. आणि सुरु होतो त्यांचा धनगरवाडी ते रायगड हा रोमांचकारी प्रवास!! 

स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख असलेल्या बहिर्जी नाईकांच्या चेल्यानं, खंडोजीनं त्यांना रायगडावर पोहचवण्यास केलेली मदत.. त्यानं प्रवासात सांगितलेली शिवाजी महाराज व शिर्केच्या वैराची, त्यांच्या लढाईची गोष्ट.. शिर्केकन्या सावित्री आणि खंडोजी यांची प्रेमकथा.. प्राणी-पक्षी यांची भाषा जाणणारा सुपर हिरो 'बाजिंद' अश्या अनेक उपकथानकांच्या जोडीनं गुंफलेली अशी ही ऊत्कंठावर्धक कादंबरी..

शिवरायांचं गुप्तहेर खातं कसं काम करायचं याचा कादंबरीतील अनुभव रोमांचीत करतो.. सर्वोत्तम हेरखातं असलेली इस्त्राईलची 'मोसाद' ही संघटना शिवरायांना आणि बहिर्जी नाईकांना आपला आदर्श मानते.. आणि त्यांच्या शिकवणुकीतून चहुबाजुंनी असणाऱ्या अरबी राष्ट्रांच्या वेढ्यात सुद्धा स्वतंत्र ज्यू राष्ट्राची निर्मिती करते.. हे वाचून अभिमानानं उर भरून येतो.. कथेचा शेवट हा बाणूरगड, सांगली येथे बहिर्जी नायकांच्या समाधीपाशी वर्तमानात होतो.. त्यावेळी सखाराम धनगरांचा वैशज किसन, बाजीराव नावाच्या भारताच्या गुप्तहेर खात्यात काम करणाऱ्या युवकाला बहिर्जी नायकांबद्दल भरभरून सांगतो.. त्यांना आदरांजली देतो..      

अलंकारीक वा ऐतिहासिक भाषा न वापरता असलेली साधी सोपी ओघवती भाषा, कथा मांडण्याची पद्धत,  ऐतिहासिक आणि काल्पनिक गोष्टीचा केलेला उत्तम संगम.. ह्या पुस्तकाच्या जमेच्या बाजू आहेत.. 

शेवटी... 

बाजिंद पूर्वार्ध समाप्त 
उत्तरार्ध थोड्याच दिवसांत.. 

असं लिहिल्यानं पुढच्या पुस्तकाची उत्सुकता वाढली आहे.. 

-मी मधुरा.. 

***************************************************************

९. कादंबरी : एक.. विजय तेंडुलकर.. 




विजय तेंडुलकर आणि कादंबरी हे समीकरण तसं नाही पटणारं.. पण जेव्हा 'कादंबरी : एक' ही कादंबरी लोकल लायब्ररीत पहिली तेव्हा विश्वासच बसला नाही.. सखाराम बायंडर, घाशीराम कोतवाल, शांतता कोर्ट सुरु आहे ही त्यांची नाटकं youtube वर पाहिलेली असल्यानं ते फक्त नाटककार म्हणूनच माहिती होते.. सामाजिक विषय हाताळणारे नाटककार.. तसं त्यांचं कोणतंच लेखन साहित्य वाचलेलं नव्हतं.. गूगल बाबांच्या नुसार तेंडुलकरांनी फक्त दोनच कादंबऱ्या लिहिल्या.. 'कादंबरी : एक' आणि 'कादंबरी : दोन'.. एक विषय कौटुंबिक तर दुसरा राजकीय..

'कादंबरी : एक' ही कादंबरी आहे नव्वद दशकातल्या एका आधुनिक चौकोनी कुटुंबाची.. एका कुटुंबप्रमुखाची.. त्याच्या आत्मकथनातून पुढं सरकत जाणारी.. डायरी लिहावी अश्या सध्या सरळ भाषेत लिहिलेली.. त्याच्या आयुष्यात रोज घडण्याऱ्या घटना, त्यांचा तर्क वितर्क हा गाभा असणारी अशी ही २६२ पानांची कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते.. नियम फक्त एकच.. त्या पात्राकडं तटस्थ दृष्टीनं पाहायचं.. 

पन्नाशी उलटलेल्या, व्यवसायातून निवृत्त झालेल्या 'प्रभाकर सुर्वे'च्या दिनचर्येतून कादंबरीची सुरुवात होते आणि हळूहळू त्याच्या कुटुंबाची ओळख होत जाते.. गृहिणी असणारी त्याची बायको, फिल्म इंडस्ट्रीमध्ये जम बसवू पाहणारा डायरेक्टर मुलगा दीपक आणि स्वतःचा बिझनेस करणारी, स्वतंत्र विचारांची, स्त्रीवादी इंजिनिअर मुलगी सुजाता.. सुखवस्तू असं हे चौकोनी कुटुंब.. घडणाऱ्या घटनांच्या मालिकेतून उलघडत जातात ह्या कुटुंबातील नातेसंबंध, नात्याची अपरिहार्यता आणि नात्यांची गुंतागुंत.. आणि त्यातून निर्माण होणारे स्त्री-पुरुष नात्यांचे अनेक पदर..

वैयक्तिक पातळीवर घडणाऱ्या घटनांतून कधी हट्टी, कधी मायाळू, कधी काळजी करणारा तर कधी चक्क उर्मट अहंकारी प्रभाकर डोकावत राहतो.. तर कधी वासनामय प्रभाकर पाहायला मिळतो.. (१९९६ मध्ये पहिली आवृत्ती जेव्हा आली तेव्हा वासनाप्रधान लिखाणामुळं ही कादंबरी वादग्रस्त झाली होती.. )

"निघण्याचे गाव आणि पोचण्याचे गाव या दरम्यान अनेक गावे असतात. इतकेच नव्हे तर गावांमध्ये गावे असतात. ती पाहावीत." 
कादंबरीच्या पहिल्या पानावर लिहिलेलं हे मला खूप भावलं.. 'जगण्याचं सूत्र' असं काही.. 

-मी मधुरा..  

*********************************************************

Monday, May 30, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं.. (पुस्तकं १ ते ५)

 . ओंकाराची रेख जना.. मंजुश्री गोखले.. 




स्त्री आणि शूद्र असून ही युगप्रवर्तक अभंगरचना करणाऱ्या संत जनाबाईं यांची जीवनयात्रा.. 

भागवत संप्रदायातील पहिली स्त्री संत.. संत जनाबाई.. यांच्या बद्दल फारशी माहिती नसल्याने कुतूहलापोटी हे पुस्तक विकत घेतलं.. नुकतंच पुणे-सासवड वारीत चालल्याने ह्या भागवत संप्रदायातील माऊलींना भेटून प्रभावित ही झाले होते.. साल होते २०१८.. वाचू वाचू म्हणून मागं पडलेलं पुस्तक ह्या निमित्त्यानं हातात घेतलं.. हातात घेतलं खरं.. पण त्याची फिकट पिवळ्या रंगाची पाने पाहून, एकदा मनात विचार आला.. हे राहूदे सध्या दुसरं कोणतं तरी वाचू.. पण ह्या ५० पुस्तकं वाचण्यामागं कोणतं ही पुस्तक.. नो बार.. असल्यानं वाचायचंच असं ठरवलं.. आणि मी वेड्यासारखी वाचतच बसले.. दोन दिवसांत ३०८ पानांची कादंबरी मी वाचून काढली.. पहाटे २-३ वाजेपर्यंत वाचलेली अलीकडची पहिलीच कादंबरी.. लेखिकेच्या ओघवत्या लेखणीची कमाल कि ह्या प्रतिभावंत संत जनाबाईच्या जीवनपटाची.. 

संतांची चरित्र असतात पण संत जनाबाईचा आयुष्यपट इतक्या छान खुबीने कथानकात गुंफला आहे की ह्याला कादंबरी म्हणावंसं वाटलं.. कथानकाला थोडं वजन येण्यासाठी एक काल्पनिक पात्र 'भागाबाई' काहीसं नकारात्मक असं दाखवलं आहे.. 

कथा आहे १२व्या शतकातील.. एका अस्पृश्य कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या जनेला तिचे वडील पंढरपुरात दामाशेटीच्या (संत नामदेवांचे वडील) घरी आणून सोडतात.. नामदेवांच्या बरोबर सावलीसारखी राहून त्यांच्याबरोबर भक्तिमार्गावर चालत राहून तिचे जीवन कसं सार्थकी लागतं.. इतकीच काय ती कथा.. त्यांच्या ओव्यांभोवती ही  कथा अगदी बेमालूमपणे गुंफली आहे.. 

'जनी म्हणे जोड झाली विठोबाची।दासी नामाची म्हणोनिया।.. ही जनाची पहिली ओळख.. दासी ह्याचा अर्थ सेवा करणारी शिष्या.. नंतर ती तिच्या अश्या अनेक ओव्यां- अभंगातून भेटत राहते.. विठ्ठलाची निस्सीम भक्त होऊन तर कधी त्याची सखी होऊन तर कधी 'बाप रखुमाई वर। माझे निजाचे माहेर। असं म्हणत एक अल्लड मुलगी बनून.. 

संत ज्ञानेश्वरांनी जनाबाईंना पहिल्यांदा संत म्हणून संबोधलं आणि तीच कीर्तन ऐकल्यावर तिला 'ओंकाराची रेख' म्हणून नावाजलं ही!!.. हे सगळेच प्रसंग खूप कलात्मकरित्या लिहिले आहेत.. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई यांचे जन्मशक सांगणारा अभंग.. एक ऐतिहासिक दस्तावेज.. 
शालिवाहन शके।अकराशे नव्वद।
निवृत्ती आनंदे। प्रगटले।।
त्र्यानवाच्या साली। ज्ञानेश्वर प्रगटले।
सोपान देखिले।शहान्नवात।।
नव्व्यान्नव साली। मुक्ताई देखिली।
जनी म्हणे केली। मात त्यांनी।।

असे अनेक अभंग ओव्या वाचायला मजा येते.. परत परत वाचाव्याशा वाटतात.. 

ज्ञानेश्वरांनी जनाबाईंना ओंकाराची रेख म्हटलं पण त्याचा अर्थ लेखिकेनं कादंबरीच्या शेवटी जनाबाई जेव्हा विठ्ठलाला विचारते मी कोण आहे? शूद्र असूनही मी तुला इतकी प्रिय का आहे? तेव्हा कळतो.. जनाबाईंच्या ह्या प्रश्नाला उत्तर देताना विठ्ठल म्हणतो.. "जने तू माझी तुळस आहेस.. आणि हे तुला झालेलं आत्मज्ञान म्हणजेच अध्यात्म.. ओंकार हा आत्मज्ञानाचा पाया.. आणि ओंकार हे माझंच रूप.. माझ्या रूपाची, भक्तीची,अभंगातून केलेली अभिव्यक्ती म्हणजे ओंकाराचं रेखाटन.. आणि ती तुझ्या अभंगातून आविष्कृत होते म्हणून तू 'ओंकाराची रेख' आहेस.."

संत नामदेव परिवाराचे अभिन्न अंग असणारी संत जनाबाई आणि त्यावेळचा चतुर्वर्ण, श्रद्धा अंधश्रद्धा, कर्मकांड असलेला काळ छान उभा केला आहे.. श्रद्धा, भक्ती सात्विक शक्ती पानोपानी दिसून येते.. यादवकाळातील पांढरी अलौकिक अनुभवासह सजीव केली आहे.. 

-मी मधुरा..

************************************************

. शोध.. मुरलीधर खैरनार.. 




ही गोष्ट सुरु होते १६७० साली.. जेव्हा शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटलं तेव्हा.. ह्या लुटीतला प्रचंड ऐवज स्वराज्यात परत आलाच नाही.. मग तो कुठं गायब झाला?.. ह्या लुटलेल्या ऐवजाचा तीनशे चाळीस वर्षानंतर घेतलेला शोध म्हणजे ही "शोध" कादंबरी.. 

शिवकालीन अस्सल संदर्भ असलेली ही पाचशे पानी कादंबरी झपाटलेल्या सारखी वाचून काढली.. काय नव्हतं त्यात??.. श्वास रोखून धरायला लावणारी रहस्यं.. उत्कंठा वाढवणारा वेगवान घटनाक्रम.. बुद्धिमत्ता, कूटनीती, धाडस, साहस यांनी भरपूर बहात्तर तास चाललेला रोमांचक थरार.. 

वर्तमानातील वास्तवाच्या, टेकनॉलॉजीच्या पार्श्वभूमीवर आधारित असं हे अस्सल मराठी थ्रिलर वाचताना आपण ह्यातील एक पात्रच बनून जातो!!.. ह्या कादंबरीतील तीन मुख्य पात्रं वगळता बाकी सगळी पात्रं काल्पनिक असली तरी वेगळी नक्कीच वाटत नाहीत.. लेखकानं तिथल्या प्रत्येक ठिकाणांचं, स्थळांचं वर्णन इतक्या सहजतेनं, बारीक तपशिलांसह केलं आहे कि त्या कथानकांबरोवर आपण ही तिथंच आहोत असं वाटतं.. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडतंय असं वाटतं.. त्यामुळं वाचता वाचता आपण त्यात हरवून जातो.. हा खूप छान अनुभव होता.. 

ह्या कादंबरी बद्दल फार काही बोलणं म्हणजे त्याच्या वाचनातील आनंद हिराहून घेण्यासारखं आहे.. शिवकाळाबद्दल आस्था असणाऱ्यांनी नक्की वाचावीच अशी कादंबरी!!.. इतकंच सांगून थांबते.. 

-मी मधुरा.. 

*****************************************************

. एका तेलियाने.. गिरीश कुबेर..




रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर "एका तेलियाने" वाचायला मजा आली.. तेलाचं राजकारण समजून घेता आलं.. २५० पानाचं हे पुस्तक विषयामुळं सुरुवातीला जड वाटलं तरी भाषा अतिशय रंजक असल्यानं कुठंही कंटाळवाणं झालं नाही.. 

हे पुस्तक मुख्यत्वे करून फिरतं ते सौदी अरेबियाचे तेलमंत्री यामानी यांच्याभोवती.. ज्याने जवळपास आख्ख्या जगाची तेलसमस्या एकाकी हाताळली.. ती देखील थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २५ वर्षे!.. अनेकदा जीवावर बेतूनही ते मागे हटले नाहीत. 

आखाती देशातल्या तेल राजकारणाचे पैलु लेखकानं छान उलगडले आहेत.. सौदी अरेबियाचे राजे फैजल आणि त्यांचे तेलमंत्री यामानी..  तेल कंपन्यांची आणि अमेरिकेची दुटप्पी राजनिती.. पश्चिम अशियात जम रोवता यावा यासाठी केलेलं गलिच्छ राजकारण (त्यातूनच पुढे लादेन नावाचा भस्मासूर निर्माण झाला)..  तेलामुळे आलेला पैशाचा महापूर आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या.. गडाफीचा आतातायीपणा..  रोनाल्ड रेगन, जिमी कार्टर यांनी केलेल्या चुका या सगळ्याचा उहापोह म्हणजे हे पुस्तक!

रंजक, उद्बोधक आणि माहितीपूर्ण असलेलं हे पुस्तक वाचल्यावर जगातल्या बर्‍याच घटना, युद्धं, करार, आंतरराष्ट्रीय संबंध हे तेलाच्या हितसंबंधाभोवती कसे फिरतात हे कळतं.. देश-देशांतल्या तणावांची दृष्य कारणं काहीही असली तरी त्याच्या मुळाशी तेलाचं राजकारण, हितसंबंध हे एकमेव कारण आहे असं वाटू लागतं..

हे पुस्तक वाचल्यावर, इतिहासाकडं थोड्या वेगळ्या दृष्टीनं पाहताना, भारतीय उपखंडात विशेषतः तुर्कस्तान इराणचा प्रदेशातील मागच्या घटना पाहता, ब्रिटिशांची 'द ग्रेट गेम' ही रशियाविरुद्धची काही शतकं चालू असलेली स्ट्रॅटेजी असावी असं वाटतं.. त्या ग्रेट गेमचा भाग म्हणूनच इंग्रजांनी पाकिस्तानची निर्मिती केली.. जिना-बिना ही नावापुरती प्यादी होती. बलुचिस्तानातील 'गदर' बंदराला रशियाचा संपर्क मिळू नये म्हणून शेकडो वर्षे ब्रिटन धडपडतय.. डुरांड लाईन आखून पाक-अफगाणिस्तान (आणि भारतालाही) कायमची डोकेदुखी निर्माण करणं हा त्याच गेमचा भाग.. हा इतिहास आपल्याकडे फारसा चर्चिला जात नाही.. जीनाला शिव्या दिल्या, भारत सरकरच्या नावानं खडे फोडले की आपला पश्चिम आशियाचा अभ्यास संपतो..


-मी मधुरा…

****************************************************************

. दुनियादारी.. सुहास शिरवळकर.. 


२०१३ साली "दुनियादारी" चित्रपट आला आणि दुनियादारी ह्या शब्दाच्या व्याप्तीशी आणि त्याच्या कर्ता करविता "सुशि" शी माझी ओळख झाली.. चित्रपट थेट काळजात घुसला.. कॉलेजच्या विश्वात घेऊन जाणारी कथा, त्यातील गाणी आणि कलाकार सगळीच भट्टी जमली होती.. म्हणून कादंबरी वाचावी, सुशि ला जवळून अनुभवावं असं त्यावेळी काही वाटलं  नाही.. पण "दुनियादारी" वाचली नसती तर एका मोठ्ठ्या रोमांचक अनुभवाला मुकले असते हे नक्की!! 

सुशिंची दुनियादारी जरी सत्तरच्या शतकातील असली तरी ती वाचताना मला माझं नव्वदच्या दशकातील कॉलेज दिसलं.. त्यामुळेच कि काय पण २७२ पानांची ही कादंबरी एका बैठकीत नाही पण दोन बैठकीत हपापल्यासारखी वाचून संपवली.. पुण्यातील S.P.कॉलेज आणि तिथल्या घटना, तिथले विद्यार्थी जरी कादंबरीच्या केंद्रस्थानी असले तरी हे नाट्य देशातील कोणत्याही कॉलेजमध्ये घडू शकतं.. काल्पनिक आणि सत्याची अप्रतिम सरमिसळ असलेलं हे कथानक कोणत्याही शहरात, कोणत्याही कॉलेजात, कोणत्याही घरात, कोणाच्याही अवती भवती घडणारं आहे.. दोस्ती-यारी, दुष्मनी, आनंद- दु:ख, हेवे-दावे, प्रेम-मत्सर अशा अनेक भावनांचा इथं कल्लोळ आहे.. दोन पिढ्या आणि त्यामधील नातेसंबंध.. त्यांच्यात पडत चाललेलं भावनिक अंतर याचाही वेधलाय.. 

सुरुवातीला भाषा, तोंडच्या शिव्या ह्याची सवय व्हायला वेळ लागला पण तीच भाषा नंतर प्रवाही आणि तरुण, ताजी आणि बिनधास्त वाटू लागली.. थोडक्यात भाषा हा कादंबरीचा आत्मा वाटला.. कोणत्याही क्षणी उठावं आणि दुनियादारीच्या या कट्ट्यावर जाऊन बसावं!.. इतकं साधं आणि सहज आहे.. तुमची, माझी, आपल्या मित्रांची काहीशी काल्पनिक पण प्रातिनिधिक असलेली सत्य अमर कथा आहे.. 

चित्रपट आधी पाहिलेला असल्यानं पुस्तक वाचताना बॅकग्राऊंड ला चित्रपटाचा ट्रॅक सुरु होता.. आणि त्याच बरोबर तुलना करणं ही.. पण मध्येच कोठंतरी हे सगळं थांबलं आणि फक्त मी त्या कथेत वावरत राहिले.. गुंतत राहिले.. इतकं कि त्यातून बाहेर पडणं कठीण होऊन गेलं.. चित्रपट चांगला कि पुस्तक, आधी पुस्तक वाचून चित्रपट पहावा कि चित्रपट पाहून पुस्तक वाचावं.. ह्या सगळ्यांच्या पलीकडं जाऊन मनात घर करून राहिली ती "दुनियादारी"!!..  

पुस्तकात काय आहे हे सांगायला शब्द मिळत नाहीत इतकी ती खोल विचार करायला लावते.. तिच्याबरोबर जगायला लावते.. अनुभवायला लावते..  'लावते' हा शब्दच योग्य आहे कारण एकदा का ती वाचायला सुरुवात केली कि आपण त्यात गुंतत जातो.. 

सुशिंनी वयाच्या केवळ २४व्या वर्षी लिहिलेली ही मास्टर पीस कादंबरी!.. ती वाचताना त्यातील पात्रांशी एवढं एकरूप होऊन जायला होत कि ती पात्र आपल्या आजूबाजूला वावरू लागतात.. काही पात्रांमध्ये आपण स्वताला पाहतो तर काहीमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींना.. तर काहीमध्ये आपल्या निकटवासीयांना.. पात्रं एवढी जिवंत रेखाटली आहेत कि कुणा न कुणाची तरी आठवण व्हावीच.. अगदी आपल्या कॉलेज मध्यल्या कट्ट्याची पण!.. 

श्रेयस तळवलकर - साधा, सालस, निरागस - कॉलेजमध्ये नुकताच जाऊ लागलेला असा कथा नायक.. तसं पाहायला गेलं तर कथेला एकच असा नायक नाही.. सगळीच पात्रं कोणत्या ना कोणत्या अँगलने कथा नायक म्हणून समोर येतात.. S.P.कॉलेज, DSP उर्फ दिग्या, शिरीन, मिनू, राणी मां, नितीन, अश्य्क्या, साईनाथ, MK ह्या सगळ्याबरोबर दुनियादारी माहित नसलेला श्रेयस, त्याचं आयुष्य कसं मार्गावर आणतो, त्याच दुनियादारीत कसा जगतो ,रमतो ते अक्षरशः जिवंत केलय.. 

प्रत्येक पात्राबद्दल लिहायचं म्हटलं तर प्रत्येकाची एक वेगळी कथा तयार होईल.. मित्रांसाठी जीव टाकणारा, चार फटके द्यायची व घ्याच्यची हिम्मत असणारा बिनधास्त, बेताल, निर्भीड दिग्या मनाला चटका लावतो. MK तर कादंबरीचा गाभा आहे.. त्याचे आणि श्रेयसचे संवाद, एकेकाळी प्रेम केलेल्या व ती न मिळाल्यामुळे दारूलाच सोबत करून सगळं आयुष्य जाळून टाकणाऱ्या, जगण्याची भन्नाट philosophy सांगणाऱ्या बेवड्या MKच्या आपण प्रेमात पडतो.. कट्ट्यावरचे अवली मित्र, समंजस मैत्रीण, न आवडणारा पण बेहद्द प्रेम करणारा नवरा असूनही आयुष्यात काहीतरी राहून गेल्यामुळे दुखी असलेली राणीमा.. सगळंच बेस्ट.. प्रत्येकजण आपापल्या जागी कधी बरोबर कधी चूक.. एकंदरीत ज्याच्या त्याच्या दृष्टीने सगळंच बरोबर.. म्हणूनच हि "दुनियादारी".. 

-मी मधुरा.. 

****************************************************************

५. "मी अत्रे बोलतोय".. प्रल्हाद केशव अत्रे.. 




'प्रल्हाद केशव अत्रे' उर्फ आचार्य अत्रे यांचं खूपच कमी लिखाण मी वाचलं आहे.. कदाचित माझ्या पिढीचे पु.ल. देशपांडे हे दैवत असल्यानं त्यांच्या पुढं बाकी विनोदी लेखक कधी वाचलेच गेले नाहीत.. ह्या वर्षी पन्नास पुस्तकं वाचायचा जेव्हा संकल्प केला तेव्हा वाचलेले लेखक, वाचलेली पुस्तके शक्यतो वाचायची नाहीत हे पक्क ठरवलं होत.. अत्रेंचं 'कऱ्हेचे पाणी' हे आत्मचरित्र पन्नास पुस्तकांच्या यादीत नक्कीच आहे.. 

"मी अत्रे बोलतोय".. १९५८ ते १९६९ ह्या काळातील 
अत्रेंच्या भाषणांचा छोटासा संग्रह.. अत्रेंबद्दल फारशी माहिती नसल्याने ह्या भाषणातील प्रसंग, घटना, आजूबाजूचा परिसर समजून घेताना वेळ लागला.. भाषणात उल्लेखलेली काही नावं तर ह्यापूर्वी कधी ऐकली हि नव्हती.. सुरुवातीच्या काही भाषणांसाठी गूगल सर्च करावा लागला पण तिथंही फारशी माहिती उपलब्ध नव्हती..

संयुक्त महाराष्ट्र निर्मिती पासून ते नाट्यपरिषद, वसंत व्याख्यानमाला ते साहित्य परिषद, संभाजी उद्यानातील गडकरींच्या पुतळा आवरण समारंभ ते कवी शुक्ल यांचा षष्ठ्यपूर्ती समारंभ, 'कऱ्हेचे पाणी' पहिल्या खंडाचा प्रकाशन सोहळा ते बालमोहन विद्यालयातील बालदिन, स्वतःचा सत्तरी पूर्ण झाल्याचा सत्कार ते भावार्थ रामायणाचा प्रकाशन सोहळा.. अश्या अनेक ठिकाणी केलेली भाषणं ह्या २१२ पानी पुस्तकांत आहेत.. त्यांच निर्भीड व्यक्तिमत्व आणि स्पष्टवक्तेपणा ह्या भाषणांतून दिसून येतो.. 

१९३६ साली सावरकर निर्बंधमुक्त झाल्यावर घेतलेल्या सभेत अत्रेंनीच प्रथम त्यांचा उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकर असा केला.. आणि त्याच सभेत सावरकरांनी अत्रेंना आचार्य हि उपाधी दिली.. हे ह्यातील एका भाषणातूनच समजले..   


-मी मधुरा.. 

******************************************************************

Monday, May 2, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं

💖 Happy Birthday to ME!! 💖

विश्वासच बसत नाही मी पन्नाशीच्या उंबरठयावर.. आता अजुनी एक पाऊल टाकलं कि उगाचंच मोठठं झाल्यासारखं वाटणार.. "Age is just a Number" हे कितीही खरं असलं तरी हा नंबर खरोखरीच मोठ्ठा आहे.. केसात डोकावणाऱ्या रुपेरी छटा.. चेहऱ्यावर दिसू पाहणाऱ्या अनुभवाच्या सुरुकुत्या.. नको तिथं खुखवस्तू आयुष्याचं शरीरानं मांडलेलं प्रदर्शन.. आयुष्यात येत चाललेलं रिकामपण.. सगळंच नवीन.. ह्या नवीन होऊ घातलेल्या बदलला, ह्या नवीन आयुष्याच्या टप्प्याला कसं घ्यायचं हे प्रत्येकानं आपापलं ठरवायला हवं..  
 
थोडी सुजाण (?.. ) झाल्यापासून दरवर्षी मी माझ्या वाढदिवसाला सरलेल्या वर्षाचं सिंहावलोकन करते आणि ह्यावर्षी काय करायचं ह्याचा अंदाज घेते.. पण ह्यावेळी हे विचारमंथन बरंच आधीपासून सुरु झालं होतं.. हे विशेष वर्ष असल्यानं जरा हटके आणि थोडंसं आव्हानात्मक असं काही तरी करायचं होतं.. काय करता येईल हा विचार करत असताना पहिला विचार मनात आला तो म्हणजे "वाचन".. तशी मी काही 'पुस्तकी किडा' वैगरे तर अजिबातच नाही.. पण थोडे फार वाचत असते.. म्हणून पन्नास पुस्तकं हे माझ्यासाठी नक्कीच आव्हान असणार आहे.. 



पन्नास पुस्तकं.. विविध लेखन/साहित्य प्रकार.. कविता, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, कादंबऱ्या, नाटक.. आधी शक्यतो न वाचलेले लेखक.. आणि न वाचलेली पुस्तकं.. आणि ते हि इथं अमेरिकेत राहून.. (...मराठी पुस्तकं मिळायला खूप त्रास होतो हो.. )

मग काय पुस्तकांची शोधाशोध सुरु झाली आहे.. बुकगंगा साईट वर सध्या पडीक असते.. मैत्रिणींची बुक शेल्फ धुंडाळायला सुरुवात केली आहे.. "कोणी पुस्तकं देता का पुस्तकं.." अशी सध्याची परिस्थिती आहे.. 

बघू हे आव्हान असं पार पडत ते.. (बाकी अजुनी बऱ्याच गोष्टी डोक्यात आहेत...😀 )




-मी मधुरा.. 

************************************************

Tuesday, November 9, 2021

कालाय तस्मै नमः

९ नोव्हेंबर २०२१ 
कृष्णा पंचगंगेच्या तीरावर, वसलेलं माझं छोटसं गांव
मिरवत असते अभिमानानं, लावून त्याचे नांव 
विचारलंच कोणी तर सांगते,
हो, आवडतं मला माझं गांव, तेवढीच माझी त्याच्याशी नाळ.. 

ओलांडता पूल, लागेल खडकाळ वाट 
जाईल ती, हिरव्या शेतातून, दुतर्फा चिंचेच्या झाडातून.. 
पोहचेल थेट वेशीत..  
मग काढेल मार्ग गणपती, महादेव, विष्णू, मारुती, शाकंबरी देवतांच्या गर्दीतून..   
थबकेल जराशी, वाचनालयापाशी.. पोहचेल इतक्यातच माझ्या अंतरीच्या नाळेपाशी..  

दिसेल दिमाखात उभं.. माझं घर..  
काळ्याशार दगडाचं, रुपेरी गजाच्या दाराचं 
सुंदर रंगीत कमानींचं, सोप्यातील विश्वस्त झोपाळ्याचं 
बहरलेल्या अंगणाचं, दारापुढल्या तुळशी वृंदावनाचं..

स्वप्नवत असं माझं नांदत गोकुळ.. 
तीन पिढ्यांच्या नात्याचं, नात्यांच्या गुंतागुंतींच, 
भरलेल्या माणसांचं, येणाऱ्या जाणाऱ्या, अडल्या नडल्याचं
आबांच्या प्रेमळ धाकाचं,आजीच्या गोड गोष्टींचं आणि नित्यकर्माचं
आई-काकूच्या अथांग मायेचं, बाबा-काकांच्या भक्कम अधाराचं 
ताई-दादाच्या शीतल छायेचं, बहीण-भावंडांच्या रुसव्या फुगव्याचं..   

निगुतीनं विणलेलं, प्रेमानं फुलणारं  
सुख-दुःख्ख सगळं काही एकत्र वाटून घेणारं 
भुकेल्याला दाणा देणारं, मायेची उब पांघरणारं
रितीरिवाज, व्रतवैकल्याबरोबर माणुसकी जपणारं 
रामनाम, अन्नदान, भक्तिमार्ग ह्यातून परमार्थ साधणारं 

कालचक्राबरोबर माझं घर ही बदलत गेलं.. 
नवनवीन साज लेवत गेलं.. काही उतरवत गेलं तर नवीन काही चढवत गेलं.. 
आपुलकी, माणुसकीचा गाभा न सोडता, सगळे बदल स्वीकारत गेलं.. 
आबा-आजी मंडळी पडद्याआड गेली.. 
ओघानं आत्यांचं माहेरी येणं कमी झालं, भावंडांचं आजोळी येणं ही लांबत गेलं..
शिक्षणं, उद्योगधंदा, लग्न ह्यामुळं आम्ही मुलं घराबाहेर पडलो.. देश-विदेशात स्थिरस्थावर झालो..
शरीराच्या अंतराबरोबरच हळूहळू मनाची अंतरं ही वाढू लागली.. 
पण ही मनाची अंतरं कधी जाणवली नाहीत कारण घर ह्या नाळेशी आम्ही बांधले गेलो होतो..
सण समारंभ, सुट्ट्यांना तिथं भेटी व्हायच्या... 
लग्न, मंगळागौरी, डोहाळजेवणं, बारशी निमित्त्यानं परत गोकुळ नांदल्याचा आभास ही व्हायचा.. आणि गत आठवणींना उजाळा देत नवीन आठवणी निर्माण करायचा प्रयत्न ही.. यातूनच पुढच्या पिढीची सुद्धा घराशी नाळ जुळत गेली.. 
काळानुरूप बदलाशी जुळवून घेत आई-बाबा, काका काकू ही बाहेर पडले.. 
नांदत्या गोकुळाची स्वप्न पाहत माझं घर मात्र तिथंच उभं राहिलं.. 

एकदा भारतवारीत आईला म्हणाले.. चल घरी जाऊन येऊ, आजी-आबांना भेटून येऊ.. 
ते नसले तरी काय झालं? त्यांच्या आठवणीत थोडं विसावून येऊ.. 
पूल कधी ओलांडला, वेशीतून कधी आलो, मंदिरं कधी गेली काहीच कळालं नाही..
गाडी एका जीर्ण वास्तू समोर उभी राहिली.. 
कुलूप उघडल्यावर, कुरकुरत्या दरवाज्यानं आमचं स्वागत केलं.. भंगलेलं तुळशी वृंदावन पाहून मन उदास झालं.. 
खंगलेली झाड पाहून वाटलं, ह्यांना कधीच येणार नाहीत का फुल?
गंजलेले तावदान, कुजलेली खिडकी, धुळीने माखलेली भांडीकुंडी पाहून मन पिळवटून गेलं.. 
माझं घर.. माझी ओळख.. माझं बालपण.. माझी नाळ.. सगळं एका हुंदक्यानिशी धूसर झालं.. 
अचानक मला माझं घर एका तपस्वी योगी सारखं दिसू लागलं.. चांगला वाईट भूतकाळ स्वतःत सामावून घेऊन, वर्तमानात तेवढ्याच ताकतीनं उभा असलेला कर्मयोगी!
आणि माझं घर.. सरकारांचं घर.. ह्या वास्तूभोवतीची सारी वलयं, निदान माझ्या पुरती तरी, गळून पडली.. 
पिढ्यानपिढ्या अश्वथासारखा उभा असलेला वास्तूपुरुष 'शुभम भवतु' म्हणताना दिसू लागला.. आणि त्याच्याशी माझं वेगळं नातं जोडलं गेलं.. 

माझं घर, आता परत कात टाकतंय.. एखाद्या नागराजासारखी!... 
कात टाकताना होणाऱ्या वेदना, जखमा तनामनावर होतील ही.. पण त्यात नवनिर्मितीचा आनंद ही असेल.. 
अनेक नवीन कुटुंबं, आता ह्या वस्तूला जोडली जातील.. तिथं फुलतील, बहरतील.. छोट्या छोट्या गोकुळांचं नंदनवन होईल.. 
आणि खऱ्या अर्थानं माझं घर, 'माझं घर' न राहता सगळ्यांचा 'आधारवड' बनेल.. आणि 'शुभम भवतु' हा आशीर्वाद देत राहील.. 








-मी मधुरा.. 

************************************************

Monday, October 18, 2021

तोच चंद्रमा नभात...

तोच चंद्रमा नभात... 




मानवी मनाला चंद्राची आणि त्यांच्या कलांची असलेली ओढ अगदी पुरातन काळापासून दिसून येते.. 'चंद्र हवा मज' ह्या रामाच्या बालहट्टापासून आणि चंद्रावर पहिलेवहिले पाऊल उमटविणा-या नील आर्मस्ट्राँगपासून ते समस्त कवी आणि लेखकांपर्यंत, सगळ्यांनाच ह्या शीतल चंद्राने जणू भुरळ घातली आहे.. हजारो लाखो वेळा या कवींनी, लेखकांनी चंद्राला बोलावून, चांदण्या तारे फुलवून, रात्री धुंद करून आपल्याला स्वप्ने पाहायला शिकवली तर कधी त्याला भाकरीची उपमा देऊन सामाजिक आर्थिक परिस्थितीचा आरसा दाखवला.. कधी मनोविश्लेषण करताना चंद्राच्या कलांशी थेट संबंध लावला तर कधी भरती-ओहोटीत दोन प्रेमीयुगलचा.. 

पण तरी ही चंद्राच्या मुलायम, शीतल, शांत स्पर्शातला प्रेमभाव आपल्याला जास्ती भावतो.. मग, बहिणीला त्याच्यात आपला लाडका भाऊ दिसतो तर मुलांना त्यांचा ‘मामा’.. कधी तो 'मेरे भैय्या को संदेसा पहुंचाना रे, चंदा तेरी ज्योत बढे'.. असं म्हणणाऱ्या बहिणीचा तो संदेशवाहक होतो तर कधी 'चंदा मामा मेरे द्वार आना, ले के किरणों के हार आना'...असं म्हणणाऱ्या भाचरांसाठी भेटवस्तू ही आणतो..
  
कधी प्रेमिकेला त्याच्यात आपला प्रियकर दिसतो तर कधी प्रियकराला प्रेमिका.. प्रेमात एरव्ही तिसरा, कबाब में हड्डी असला तरी, 'चंद्र आहे साक्षीला' म्हणत कधी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात तर कधी त्याच्याच पुढे 'ओ रात के मुसाफिर, चंदा ज़रा बता दे, मेरा क़ुसूर क्या है, तू फैसला सुना दे' असे गाऱ्हाणे मांडले जाते.. 'चंदा रे चंदा रे, कभी तो ज़मीं पर आ, बैठेंगे, बातें करेंगे' असे म्हणत कधी तो एकाकीपणाचा सोबती ही होतो.. 
 
कवी लेखकांच्या अंगाखांद्यावर खेळणारा हा चंद्र, आपल्या आयुष्याचा, आपल्या भावविश्वासाचा एक भागच.. ठायी ठायी भरून उरलेला.. प्रेम करायला, प्रेम निभावायला, आपल्याला हवी असते ती चंद्राची सोबत.. 

खूप दिवसांनी भेटलेल्या प्रियकरात मग तिला चंद्रच दिसतो.. 
तुम आये तो आया मुझे याद
गली में आज चाँद निकला
जाने कितने दिनों के बाद
गली में आज चाँद निकला 

आनंदाने मोहरलेल्या प्रेमिकाला पाहून दुनियेचा फेरफटका मारणाऱ्या चंद्रालाच तो विचारता झाला..  
मैंने पूछा चाँद से के देखा है कहीं
मेरे यार सा हसीन
चाँद ने कहा, चाँदनी की कसम
नहीं, नहीं, नहीं.. 

आणि तिच्या सौंदर्याची तुलना चंद्राशीच करायची गुस्ताखी ही करून बसला..   
चौदवीं का चाँद हो या आफ़ताब हो
जो भी हो तुम ख़ुदा की क़सम, लाजवाब हो.. 

खरं तर प्रेमिका इतकी सुंदर आहे कि चंद्राला ही तिचा हेवा वाटावा... 
चाँद आहें भरेगा
फूल दिल थाम लेंगे
हुस्न की बात चली तो
सब तेरा नाम लेंगे

प्रियकराच्या येण्यानं ही रात्र, हा समा कसा जादुई झालाय.. हे सगळं खूप हवंहवंसं वाटतंय.. 'रुक जा रात, ठहर जा रे चंदा' असं म्हणत ती चंद्राला थांबण्याची आर्जव करतीय.. आणि रेंगाळत चालण्याची मनधरणी ही..
धीरे धीरे चल चाँद गगन में 
अरे धीरे धीरे चल चाँद गगन में
कहीं ढल ना जाये रात, टूट ना जायें सपने 
अरे धीरे धीरे चल चाँद गगन में

अशी गोड मनधरणी करणारी प्रेमिका त्याला चंद्रासम दिसतीय.. अरे हे काय?.. "एक रात में दो दो चाँद खिले, एक घुंघट में, एक बदरी में".. हे ऐकून ती गोडशी लाजली अन तो बावरला... 
चाँद सा मुखड़ा क्यों शरमाया
आँख मिली और दिल घाबराया

काल रात्री काय घडले म्हणून उद्या चर्चा होईल.. ते काहीही असो आज तरी.. 
वह चाँद खिला वह तारे हांसे
यह रात अजब मतवारी है
समझने वाले समझ गए हैं
न समझे वह अनाडी हैं.. 

चंद्राची प्रत्येक कला ही मोहक आणि किती ही आपल्या भावविश्वाच्या जवळ जाणारी असली तरी खरा चंद्रोत्सव फुलतो, रंगतो, भावतो, स्मरतो तो कोजागरी पौर्णिमेलाच.. 'शारद सुंदर चंदेरी राती' आटवलेल्या केशरदुधात दिसणारा तोच चंद्र नवीन जागृतीचे, वैभवाचे, आनंदाचे रूप लेवून सोळा कलांनी फुलून येतो.. असा हा चंद्र प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या यामिनी सोबत सदैव राहो हीच सदिच्छा!! 

कोजागिरीच्या चांदणभर शुभेच्छा!!



-मी मधुरा.. 

************************************************