Sunday, May 23, 2021

A New Driver on the Road...

 



My precious Daughter behind the wheel of thousands of pounds of motorized steel... 


बापरे!! ह्या विचारानेच पोटात खड्डा पडतो.. 

आता, लवकरच ती 'एकटी' कार घेऊन जाईल.. roads, freeways, byways.. स्कूल, मॉल्स, सिनेमा हॉल्स, क्लासेस.. एक हवेहवेसे वाटणारे स्वातंत्र्य.. 

नको.. ह्या विचारात सुद्धा एक विचित्र दहशत जाणवते.. ही भीती, ही दहशत नेमकी कसली आहे? ह्या बाहेरच्या जगात ती एकटी असेल याची का तिला आता माझी गरज नाही याची?.. 

मुलांवर, त्यांच्या संस्कारांवर किती ही विश्वास असला तरीही, प्रत्येक नवीन टप्प्यावर, एक पालक म्हणून आपलं मन साशंक होतंच.. असे अनेक टप्पे असतात जिथं helpless, असुरक्षित, भयभीत, out of control वाटतं.. वेळोवेळी त्यातून मार्ग काढला ही जातो.. आणि हीच पालक म्हणून 'growing-up' process असते.. 

🚗 🚗 🚗 🚗 🚗 🚗 🚗 🚗 🚗 🚗

त्याचे असे झाले की, पंधराव्या वाढदिवस झाला आणि लेकीने कार शिकण्यासाठी 'learning permit' काढले.. आणि ह्या सगळ्या विचारांनी मला पोखरायला सुरुवात केली.. खरंतर मी सुद्धा सोळा-सतराव्या वर्षी कार चालवायला शिकले होते.. पण इथे लेक अजुनी लहान वाटत होती.. 😁 motherly concern दुसरे काय?.. माझी एकंदरीत परिस्थिती पाहता, लेकीने बाबाकडे मोर्चा वळवला आणि बाबा कडून तिची शिकवणी सुरु झाली.. तिचा उत्साह, तिचा आनंद पाहताना, तिची प्रगती ऐकताना मी ही त्यात हळूहळू सामील झाले.. 

नंबरहूड ड्राईव्ह पासून सुरु झालेल्या प्रवासाची मजल ग्रोसरी शॉप, शाळा इथवर गेली.. पाच-सहा मैलाच्या अंतरावर ती सराईतपणे ड्राईव्ह करू लागली.. आता तिला मोठ्ठी अंतरे आणि मोठ्ठी कार खुणावू लागले.. "आई, आज जिमला जाताना मी ड्राईव्ह करू?" तिच्याकडून आलेल्या ह्या प्रश्नाला उत्तर देण्याआधीच "thank you.. see you inthe car" म्हणून गेली सुद्धा.. हे नेमकं काय झालं? हा प्रश्न कधीतरी समोर येणार हे माहिती होतं पण इतक्या लवकर?... स्वतःच्याच विचारात गुंतलेली मी पॅसेंजर सीट वर जाऊन बसले.. "aai, why are you so nervous?"... अगं का म्हणून काय विचारतेस? तू मोठ्ठी कार इतक्या लांब ड्राईव्ह करणार ना म्हणून.. पण हे सगळे शब्द गिळून टाकले आणि म्हणले.. "अगं, कुठं काय.. जायचे ना आपल्याला.." मनातली चलबिचल चेहऱ्यावर उमटू न देण्याचा प्रयत्न करत साईड ला बसून होते.. हळूहळू मी रिलॅक्स होत असल्याची जाणीव झाली.. "कार्टी, काय छान ड्राईव्ह करायला लागलीय.." मुलं तुम्हांला surprise करतात हेच खरं.. मग काय रोज जिमला जाणे सुरु झाले.. रेडिओवर गाणी ऐकत, गाणी म्हणत, वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत तिच्या बरोबर जाताना मला एक वेगळाच आनंद मिळत होता.. तिला ही हक्काची driving partner मिळाली होती.. 

एक दिवस मी तिला सहज म्हणाले, जायचं का freeway वर?.. तिचे डोळे विस्फारले.. त्या डोळ्यात काय नव्हतं? Are you sure? Are you crazy? हे नक्की आईच विचारते आहे ना?.. पहिल्या दिवशी free wayला merge करून पुढचा exit घेऊन परतलो... आणि मग ड्राइविंगचा एक चसकाच लागला.. मुलं मोठ्ठी होत असतांना, नवनवीन ध्येय गाठत असताना, त्या प्रवासात आपण त्याच्या बरोबर असलो तर आपल्याला वाटणारी काळजी, भीती आपोआप कमी होते..  


... Finally, एक वर्षानंतर म्हणजेच सोळा वर्षे पूर्ण झाल्यावर 'Permanent Licence' मिळालं...



Yay.. 👏 👏👏..  So proud of Her.. 😘

Another Step Towards Freedom, Towards Independence, Towards Adulthood.. 


कदाचित मी sentimental ही होत असेन.. पण, licence मिळाल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना, मला तिच्यात माझी छोटी बाहुलीच दिसत होती.. मी स्वतःला खूप शांत ठेवायचा प्रयत्न करत होते.. was trying not to think about the worst.. गाडी चालवण्यासाठी नवीन तिकिट मिळालेली माझी ही लेक, अनेक रस्ते explore करण्यासाठी मिळालेल्या ह्या तिकिटाचा ती नीट आदर करेल ना?.. Freedom comes with big responsibitity हे ती नक्कीच जाणते.. असो.. 

तिने एकटीने ड्राईव्ह करण्यासाठी अजुनी मन तयार होत नव्हते.. पण शेवटी तिच्या हट्टापुढे माघार घ्यायचे ठरवले.. आणि एक surprise plan केले.. 

नेहमी प्रमाणे बाबा तिला वॉटरपोलो प्रॅक्टिस नंतर pickup करायला जाणार.. मी मागून दुसऱ्या कार मधून जायचे.. तिला कार keys देऊन, एकटी ड्राईव्ह करून ये म्हणून सांगायचे.. तिच्या मागून आम्ही ड्राईव्ह करायचे.. एकदम full proof plan... ठरल्याप्रमाणे तिला keys दिल्या.. drive safe and always look both ways म्हणून सांगितले आणि दुसऱ्या कार मध्ये येऊन बसलो.. 

ती निघाली.. मागून माझी कार.. 

थोड्या वेळानं माझ्या लक्षात आलं कि मीच टेन्स होऊन steering घट्ट पकडून ड्राईव्ह करतीय.. मला टेन्स व्हायची काहीच गरज नव्हती.. ह्याच रोड वरून तिने कितीतरी वेळा ड्राईव्ह केले आहे.. फरक इतकाच आहे कि आज ती एकटी आहे.. नेहमी मी बरोबर असते.. 

तर माझी कार तिच्या कार मागून.. एक दोन सिग्नल सगळं ठीक सुरु होतं.. पुढच्याच सिग्नल ला तिची कार सुटली आणि मी अडकले.. आत्तापर्यंत समोर दिसणारी तिची कार एकदम दिसेनाशी झाली.. आणि आम्ही एकमेकांकडे पहिले.. क्षणभर एक पोकळी जाणवली.. आता काय??.. आता एकच.. एक विश्वास... जो आहे आणि नेहमीच असेल.. She is a good, responsible driver, and we are proud of her.. जगाच्या पाठीवर ती कोठे ही जाऊदे, काहीही करुदे, आम्ही असेच तिच्या मागे असू.. 

You fly high baby, chase your dreams.. But promise me, you will look both ways.. 😘



-मी मधुरा.. 

************************************************

Saturday, February 13, 2021

Happy Valentine's Day!! 💞



                  ती:
 

                  आठवतं, ते फुल गुलाबाचं

                  तू माझ्या केसात माळलेलं?

                  अन लाजून चेहरा लपवताना 

                  तू मला कवेत घेतलेलं?                                                 





                                      

💞💞💞💞💞  



                                                                                                    

   

                            तो:

                            म्हणूनच म्हणतो, 

                            मला वेड लागलंय प्रेमाचं 

                            तुझं प्रेम देशील?

                            थांबवून हा स्वप्नांचा खेळ 

                            माझी तू होशील?

                            सावरून सखे मला 

                            हात हाती घेशील?

                            आणखी एक सांग तू 

                            सखा मज म्हणशील? 






💞💞💞💞💞


                                                                  ती:

                                                                  ऐक ना, सुंदर असा 

                                                                  chocolate चा बंगला मला हवा 

                                                                  छोटासा का असेना पण 

                                                                  त्यात तुझा माझा सहवास हवा  

                                                                  सखी बनून आयुष्यभर साथ देईन तुला, 

                                                                  सांग ना, chocolate चा बंगला देशील मला?


💞💞💞💞💞



                                                                                                     

         


                                   

         तो:

         ओम फट स्वाहा म्हणत 

         प्रेमाला माझ्या स्वीकारलंस 

         टेडी बेअर बनून 

         सुख दुःखाला कवटाळलंस

         प्रॉमिस करतो,

         आयुष्यभर सुखात तुला ठेवीन 

         काहीही झाले तरी 

         शेवट पर्यंत साथ तुला देईन..                                                      




💞💞💞💞💞



                ती:

                खरं सांगू?

                तू सोबत असताना 

                आयुष्य कसं सोपं वाटतं.. 

                मिठीत तुझ्या असताना 

                स्वर्ग हि रिता वाटतो..  

                ओठांवर ओठ असताना 

                मन बेधुंद, बेभान होतं.. 

                खरं सांगू? 

                तू सोबत असताना 

                प्रत्येक दिवस Valentine Day वाटतो...     







-मी मधुरा.. 

************************************************

Tuesday, November 17, 2020

माझे मन तुझे झाले..





सती रमाबाई पेशवा स्मारक, थेऊर 



पेशवाईतील जितकी वलयांकित पण तितकीच नियतीनं अन्याय केलेली अशी ही स्त्री रमाबाई, 
यांनी पतीबरोबर सहगमन केले तो दिवस होता १८ नोव्हेंबर १७७२.. 

ऑडिओ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🌱


Sunday, October 25, 2020

नवरात्र नात्यांचे: विजयादशमी!!..

🌿🌼🌿 विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!!🌿🌼🌿



दत्तमहाराज सीमोल्लंघन सोहळा, कुरुंदवाड 


'नवरात्र नात्यांचे' साजरं करताना, रोज एक नातं तुमच्या बरोबर जगताना, काही पडद्याआड गेलेल्या नात्यांना आठवणींच्या रूपाने परत पाहताना, असलेली नाती परत अनुभताना हे नऊ दिवस कसे संपले कळालंच नाही.. 

एकत्र कुटुंबामुळं असेल किंवा माणसांच्या गोतावळ्यामुळं असेल, मी ही सगळी नाती अगदी जवळून, मनापासून आणि भरभरून जगले.. जगते आहे.. 

Thank you all for enriching my life ❤️

जरी मी नवरात्रात, नात्यांमधील देवींबद्दल, शक्तींबद्दल लिहिलं असलं तरी, ह्या सर्व 'शक्तीं'ना नात्यातील 'शिवां'ची जोड असते असं मला वाटतं.. प्रत्येकवेळी ह्या 'शक्तीं'बद्दल लिहिताना त्यांतील 'शिवा'च्या आठवणी तरळून जायच्या.. आजी-आबा, आई-बाबा, काका-काकू, आत्या-काका, मावशी-काका, मामा-मामी, भाऊ-भावजय, बहीण-मेव्हणा, मित्र-मैत्रिणी, मुलगा-मुलगी-सून-जावई, सासू-सासरे, नणंद-दीर.. हे कधी मला एकटे दिसलेच नाहीत.. ह्या जोड्यांमधील प्रत्येक नातं दुसऱ्या नात्याचा भक्कम आधार आहे.. 

नात्यांतील देवींबद्दल लिहिताना.. 
आबा आले तिकडून 
विसरू नकोस बाळा मला 
म्हणाले काहीसं खाकरून 
कोडकौतुक करता तुझं 
आनंदात चिंबचिंब भिजलो.. 
बालपण तुझ्यात पाहताना 
मनोमन नितांत सुखावलो.. 

नात्यांतील देवींबद्दल लिहिताना.. 
दिसला बाबा, काहीसा दमलेला थकलेला
भविष्याचा विचार करत, वर्तमानाच्या गणितात अडकलेला..
म्हणाला, पोरी हे सारं करतोय तुझ्यासाठी, आपल्यासाठी 
काढशील का माझी आठवण, एकदातरी दिवसाकाठी... 
 
नात्यांतील देवींबद्दल लिहिताना.. 
दिसला काका, त्या कोपऱ्यात, मिश्कीलपणे माझ्याकडे पाहताना
म्हणाला, बब्बू, नाव नको देऊ तुझ्या माझ्या नात्याला.. 
माझी परी, माझी परी म्हणून, फिरलो जगभर, घेऊन तुला खांद्यावर
गोड छबी तुझी, टिपत राहिलो कधी कॅमेरावर तर कधी खोल मनावर.. 

नात्यांतील देवींबद्दल लिहिताना.. 
उभा होता मामा, मांडवा बाहेर 
डोळ्यातील पाणी लपवत, कृतार्थपणे मला न्याहाळत...  
नजरेनंच म्हणाला मला, 
छानसा संसार कर, सासर-माहेर जपताना आजोळची ही आस धर.. 
घेऊन ये पोराबाळांना परत तुझ्या आजोळी 
करून पाठीचा घोडा, जगेन साऱ्या आठवणी.. 

नात्यातील देवींबद्दल लिहिताना... 
होता भाऊ बाजूलाच बसलेला, 
थोडासा खोडकर पण तितकाच जबाबदार
हलकेच हातात हात घेऊन म्हणाला, 
असशील तू माझी ताई किंवा असेन मी दादा 
दिसेन मी तुला, तुझ्याच बाजूला सदासर्वदा  
घे तू झेप, मार तू भरारी, घे कवेत ते उत्तुंग शिखर 
अन ये परत माघारी, तुझ्या हक्काच्या घरी, तुझ्या माहेरी.. 

'शक्तीं'च्या मागे खंबीरपणे उभे असणाऱ्या नात्यांतील सर्व 'शिवां'ना शतशः प्रणाम!! 🙏
  
आज ह्या 'शिव-शक्तीं'बरोबर विजयादशमी साजरी करूया.. 

नात्यातील नकारात्मकता, हेवेदावे, द्वेष-मत्सर, गैरसमजुती ह्यांचं रावणाबरोबर दहन करून नात्यांतील राम जपूया.. 

पुन्हा एकदा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!! 

-मी मधुरा.. 
२५ ऑक्टोबर २०२० 

ऑडिओ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿  

Saturday, October 24, 2020

नवरात्र नात्यांचे: नववी माळ - लाडक्या 'लेकी'ची!!..

 🌺नववी माळ - आपल्या लाडक्या 'लेकी'ची!!.. 🌺



फोटो सौजन्य: पूजा आणि रसिका 
 ( माझ्या भाचींच्या घरचे नवरात्र )


जिच्या जन्मामुळे आपल्याला झालेल्या मातृत्वाच्या अनुभूतीची.. मग ती मुलगी असेल, पुतणी असेल वा भाची.. अगदी लहान बहीण सुद्धा!

रागावणारी, रुसणारी पण वेळप्रसंगी, कधी आपली आई, तर कधी मैत्रीण होऊन आपल्याला समजून घेणारी.. अशी आपली लेक.. 

सुख म्हणजे नक्की काय असतं हे जिच्या हास्यातून कळतं.. चैतन्य म्हणजे काय हे जिच्या अखंड बडबडीतून समजतं.. असा हा आपला अमूल्य ठेवा, आपला श्वास, आपली छोटी बाहुली.. आपली लाडकी लेक.. 

जसं वय वाढत जातं तसं हे माय-लेकीचं नातं छान मुरत जातं.. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, वयानुसार नात्यात बदल होत जातो पण मूळ गाभा तोच राहतो.. लेकीची आई होण्यापासून सुरु झालेला हा नात्याचा प्रवास, लेक आपली आई होण्यापर्यँत सुरूच असतो.. 

लेक लहान असताना, आई तिचं सर्वस्व असणं.. आई कशी बोलते, कशी चालते ह्याचं लेकीनं अनुकरण करणं.. आई सारखे कपडे घालावेत, आई सारखे केस असावेत असं लेकीला वाटणं.. लेकीसाठी आई शिवाय जगात सुंदर कोणी ही नसणं.. खरं तर लेकीचं अख्ख विश्व आईत सामावलेलं असतं आणि तसंच आईचं ही.. जगात कोठे ही गेलं, किती ही फॅन्सी फूड खाल्लं तरी 'आईच्या हातचं ते आईच्या' असं लेक म्हणाली कि आईला मेडल मिळाल्यासारखं वाटतं.. "I want to marry you Mommy" असं माझी लेक म्हणायची.. 😂..  त्यावेळी सुखावलेलं माझं मन आयुष्यभर तिच्या साथीचं स्वप्न रंगवायचं.. 

आईच्या मागं मागं शेपटासारखी असणारी लेक, अचानक एक दिवस शाळेत जाऊ लागते.. अन तिचे अवकाश विस्तारू लागते.. तिची बडबड, तिच्या मैत्रिणी ह्यात आई ही हळूहळू सामावू लागते.. नवनवीन गोष्टी लेकीबरोबर explore करताना, अनुभवताना आईला तिचे बालपण परत मिळते.. राहिलेल्या इच्छा, अकांक्षा लेकीच्या रूपात पूर्ण करत राहते.. आणि तिची जीवनाकडे पाहण्याची परिभाषाच बदलून जाते..

लेकीबरोबर खरेदीला जाणं, पार्लरला जाणं, सिनेमाला जाणं, एखाद्या पुस्तकावर चर्चा करणं.. एक हक्काची मैत्रिणीच आईला लेकीच्या रूपात मिळते.. लेकी पुढं मोकळं करणं, सल्ला विचारणं, लेक मोठ्ठी झाल्याची अंतर्मनाला पटलेली खूण असते..  

जिव्हाळ्याचं मैत्रीचं हे नातं, वयाच्या एका टप्यावर, कधी आणि कसं 'frienemy' (friend but enemy) मध्ये बदलतं हे दोघीना पण कळत नाही.. लहान सहान गोष्टींवरून वादावादी, मतभेद होत राहतात.. त्यावेळी शांत राहणं, धीराने घेणं हे महाकठीण काम आईला करावच लागतं.. 'वळचणीचं पाणी परत वळचणीलाच येणार'.. ह्यावर विश्वास ठेवून.. 

उतारवयात, आईची काळजी घेताना, लेक तिची आईच बनून जाते.. आणि माय-लेकीचं हे नातं आपसूकच हळुवार व्हायला लागतं.. पण तरीही, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आईसाठी तिची लेक अजुनी लहानच असते!!.. आणि लेकीसाठी तिची आई हा भक्कम आधार!!.. आईचं एखाद्या वटवृक्षाप्रमाणे कायम लेकीला आधार देणं, सावली देणं आणि लेकीचं त्या वटवृक्षाच्या शीतल छायेत पारंबी होऊन बागडताना एके दिवशी स्वतःच वटवृक्ष होणं.. ही ह्या नात्याची खरी शक्ती आहे, ऊर्जा आहे.. 

खरचं का,
ही फक्त माझी लेक आहे?
नाही, ही तर माझा श्वास आहे 
सर्वांच्या मनावर राज्य करेल 
हे स्वप्नं नाही तर माझा विश्वास आहे..
 
आनंदाचे अगणित क्षण तिच्या
मनमोकळ्या हास्यात दडले आहेत 
जॅकपॉट ज्याला म्हणतात तो 
माझ्या लेकीतच मला गवसला आहे.. 

आभाळा एवढं सुख काय ते
लेक झाल्यावर कळलं आहे 
एक वेगळच आपलेपण तिच्या
प्रत्येक मिठीत मी अनुभवत आहे..

जगण्याची नवीन परिभाषा शिकवणाऱ्या ह्या नात्याला, लेकीला शतशः प्रणाम!! 🙏

-मी मधुरा.. 
२५ ऑक्टोबर २०२०

ऑडिओ ऐकायचा असेल तर येथे क्लिक करा

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺



Friday, October 23, 2020

नवरात्र नात्यांचे: आठवी माळ - जिवलग 'मैत्रिणीची'!!..

 🌸आठवी माळ - जीवाला जीव देणाऱ्या जिवलग 'मैत्रिणीची'!!..🌸


फोटो सौजन्य: लता प्रभुणे 
( माझ्या मैत्रिणीच्या घरचे नवरात्र ) 


आपलं सारं भावविश्व जिच्यात सामावलं आहे अशी ती.. 
रुसवे-फुगवे सहन करणारी.. गोड गुपितं सांभाळणारी.. 
सडेतोडपणे सल्ले देऊन सावरून घेणारी.. आपल्या यशात स्वतःचे यश मानणारी.. 
चांगल्या-वाईट सवयींकडे दुर्लक्ष करून खरी मैत्री जोपासणारी.. अशी जिवलग 'मैत्रिण'.. 

अशी एखादी मैत्रीण असावी .....
        कधी हसवणारी, कधी रागवणारी
        पण अचूक मार्ग दाखविणारी.                        
अशी एखादी मैत्रीण असावी…
        कधी समजाविणारी, कधी समजून घेणारी
        पण गोड शब्दात आपली चूक सांगणारी
अशी एखादी मैत्रीण असावी…
        कधी काळजी घेणारी, कधी अश्रू पुसणारी
        अश्रू पुसता पुसता लढण्याची हिम्मत देणारी
अशी एखादी मैत्रीण असावी…
        कधी भावना जाणणारी, कधी मोकळीक देणारी 
        नजरेत नजर मिळवून अतूट विश्वास दाखविणारी
अशी एखादी मैत्रीण असावी…
        साद घातल्यावर धावत येणारी
        हात हातात घेऊन मैत्रीचे नाते जपणारी

मैत्रीण हे नातं असं आहे कि ते प्रत्येकाला वेगळं भावतं.. ‘जसा भाव तसं नातं’.. खूपदा अनेक मैत्रिणी आयुष्याच्या ठराविक टप्प्यावर भेटतात आणि त्या टप्प्यावर आपलं नाव कोरून जातात.. तो टप्पा त्यांच्या अस्तित्वाने पुरेपूर भरून जातो.. 

अगदी लहानपणापणी एकत्र खेळलेली भातुकली, लावलेलं बाहुला बाहुलीचं लग्न, चिमणीच्या दातांनी वाटून घेतलेला खाऊ ते त्यांच्या बरोबरची लटकी भांडणं, रुसवे फुगवे.. पुढं कॉलेज मध्ये एकत्र बंक केलेले क्लासेस, कॅन्टीन मध्ये मारलेल्या गप्पा, एकत्र केलेला अभ्यास, पावसाळी सहली.. मैत्रिणी बदलतात पण ‘मैत्रीची भावना’ तीच राहते.. ऑफिस, सोसायटी, भिशी, हॉबी ग्रुप सगळ्या मैत्रिणी वेगळ्या पण त्यांच्यातील भावबंध एकच.. मैत्रीचा.. 

ह्या प्रत्येक टप्प्यावरची मैत्री आपल्यात, आपल्या व्यक्तिमत्वात बदल घडवत असते.. आपल्याला एक व्यक्ती म्हणून enrich करत असते.. 

माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर, आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर मी ही अनेक मैत्रिणी जोडल्या.. ह्या मैत्रिणींनी मला नात्यातील unconditional acceptance शिकवला..

इथल्या, अमेरिकेतल्या माझ्या मैत्रिणी, माझ्या कुटुंबाचा एक घटक झाल्या आहेत.. माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत.. पण तरीही, मैत्रिणी म्हटलं कि आठवतो तो शाळेचा ग्रुप आणि आठवते ती "ती".. आमची लाडकी मैत्रीण.. आमची जिवलग मैत्रीण.. प्रज्ञा.. 
आज मी तुला कसं विसरेन??.. तुझ्या बरोबर 'मैत्री'च हे सुंदर नातं, कसं छान उलघडत गेलं.. 
आज आम्ही सगळ्या एकत्र आहोत पण.. पण तू नाहीस.. 
इतकी लांब, कधीच परत न येण्यासाठी, का गेलीस? तू किती ही लांब गेलीस तरी आपल्या मैत्रीचे धागे इथेच आहेत..

अशी अचानक तू निघूनच गेलीस
अन अस्तित्वाने मला दूर केलस..              
रडले, कोलमडले, सैरभर ही झाले 
नकळत संसारात मी गुरफटून गेले  
पण तुझ्या मैत्रीची ओढ इतकी की
त्या आठवणींचीच मी मैत्रीण झाले.
खरं सांगू, 
आयुष्याच्या ह्या वळणावर, मन तुला शोधत असतं 
मैत्रिणींच्या घोळक्यात तुला मिस करत असतं  
समजलेल्या आयुष्याचे बरेच अर्थ तुला सांगायचेत
जगण्याच्या धावपळीत राहिलेले बरेच क्षण
तुझ्या मैत्रीत जगायचेत...   
ये ना ग परत... 
हवी तर झूम मीटिंगच ठेवू.. 
गुजगोष्टी करत घटकाभर विसावू.. 

मैत्रीचे भावबंध जपणाऱ्या सर्व मैत्रिणींना शतशः प्रणाम!! 🙏

-मी मधुरा..
२४ ऑक्टोबर २०२०

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

Thursday, October 22, 2020

नवरात्र नात्यांचे: सातवी माळ - 'नणंदा-भावजयां'ची!!

 🌸सातवी माळ - दोन घराच्या दोन लेकींची 'नणंदा-भावजयां'ची!!... 🌸



फोटो सौजन्य: डॉ. सौ. अंजली गुप्ते 
( माझ्या नणंदेकडचे नवरात्र )


नणंदा भावजया दोघी जणी 
घरांत नव्हतं तिसरं कुणी.. 
शिंक्यावरच लोणी खाल्लं कोणी?
नणंद:- आता माझा दादा येईल गं.. वहिनीचं गाऱ्हाणं सांगीन गं...  ‘दादा तुझी बायको चोरटी'... 
दादा:- घे काठी लगाव पाठी
नणंद:- घरादाराची लक्ष्मी मोठ्ठी.. 

हे भोंडला, हादगा मध्ये म्हटलं जाणार गाणं, ‘नणंद-भावजय’ नात्याबद्दल बरचं काही सांगून जातं.. 

एकमेकींवर, अगदी अधिकारानं केलेल्या रुसव्या फुगव्यात, चुगल्यात, कधीही टोकाचा वाईटपणा येणार नाही हा विश्वास असलेलं, नणंद-भावजयीचं असं मैत्रीचं पण खट्याळ नातं.. 
वहिनीचं गाऱ्हाणं दादाशी करताना, दादानं वहिनीला सजा सुनावली तर लगेच वहिनीच्या लक्ष्मीपणाची आठवण, दादालाच करून देणारी त्याची लाडकी बहीण, घराचं चैतन्य.. 
वहिनीची कायम कठोर समीक्षक आणि समर्थक असणारी अशी ही नणंद.. 

नणंद आपल्या आयुष्यात येते तो क्षण किती मार्मिक असतो ना?..  बोहल्यावर चढलेली नववधू, डबडबलेल्या डोळ्यांनी वरमाला घालते.. आणि वराच्या मागे करवली म्हणून उभी असलेली नणंद तिला दिसते.. पुढे येऊन आश्वासक नजरेनं कलाशातल्या पाण्याची दोन बोट नववधूच्या डोळ्याला ती लावते.. जणू काही वहिनीच्या डोळ्यातलं पाणी पाण्यानच पुसून, या नात्यातला ओलावा प्रस्थापित करते.. दिव्यानं ओवाळून तिचं नवीन घरात स्वागत करते.. आणि नवसंवादाचं, अधिक अधिकाराचं, नवऱ्याच्या खास लाडाचं नणंदेचं नातं, आपला बाज दाखवत नववधूच्या आयुष्यात येतं.. 

कधी भरजरी तर कधी रंगीबेरंगी, कधी टोचणारे तर कधी रेशमी, कधी मखमली, कधी कडक तर कधी मायेनं चिंब भिजवणारे, कधी टचकन डोळ्यात पाणी आणणारे तर कधी भरलेले डोळे टिपणारे.. असे नणंदपणाचे अनेक पदर आपल्या दैनंदिन जीवनात आपसूक गुंततात.. आणि भावबंधांची रेशमी वीण गुंफत जाते.. 

सुखदु:खात धावून येणारी.. सणासमारंभात, कार्यात आपलं अस्तित्व ठळकपणे जाणवून देणारी.. आली नाही तर कमी जाणवणारी.. कायम भावजयीला अप्रत्यक्षपणे धाकांत ठेवणारी.. आणि टाळू म्हटलं तरी मनापासून टाळता येणं शक्य नसणारी.. रागावली तर मनांला हुरहूर अन् सुखावली तर धन्यता वाटेल.. अशी विदूषी म्हणजे नणंद.. या विदूषीचं मन सांभाळणं फारसं कठीण ही नसतं.. नणंदच्या मनातलं माहेर भावजयीनं जपलं की हे नातं कसं छान बहरतं जातं..  

भाऊ तो आपला, भावजय का लोकाची?
माहेरी जाऊन मनं राखावी दोघांची... 
अशी नणंद असेल तर त्याच्यातील नातं नणंद, मैत्रीण, बहीण ह्या चौकटी बाहेर फुलतं.. मग ह्या नात्याला वय नसतं.. तिचा प्रेमळ हवाहवासा वाटणारा दरारा नात्याबरोबर सुरू होतो आणि आपल्याबरोबरच संपतो.. 

अर्थात नणंदेनं सुद्धा भावजयीला तो मान देणं आवश्यक असतंच.. तिच्या आईवडिलांची काळजी घेणारी, माहेर समृद्ध करणारी, भावाची सहचारिणी म्हणून.. एकानं प्रेम दिलं अन् दुसऱ्यानं प्रतिसादच नाही दिला तर.. प्रेम म्हणजे प्रतिसाद.. नणंद भावजय जेव्हा एकमेकींना प्रतिसाद देतात, तेव्हाच या नात्याचे सुरेल पडसाद उमटतात..

नणंद-भावजय-भाऊ या त्रयीतील गोडवा, माधुर्य, स्निग्घता 'शिक्यातलं लोणी अगदी राजरोसपणे खाऊन' जपूया.. 

नातं प्रेमाचं, नातं मैत्रीचं 
नातं आपुलकीचं, नातं विश्वासाचं 
नातं साऱ्या बंधना पलीकडचं 
        .... असं नातं असतं नणंद-भावजयीचं.. 
थोडं हसरं, थोडं रूसवं 
थोडं बोलकं, थोडं रडकं 
असतं मात्र खेळीमेळीचं 
       .... असं नातं असतं नणंद-भावजयीचं.. 
दोन घरच्या दोन लेकी 
होऊन जातात एकरूपी
जगता हे बंधन प्रेमाचं 
        .... असं नातं असतं नणंद-भावजयीचं.. 

ह्या नणंद-भावजयीच्या चिरंतर नात्याला शतशः प्रणाम! 🙏

-मी मधुरा..
२३ ॲाक्टोबर २०२०

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸