Friday, September 4, 2020

मिनिमलिझम आणि मी ३...

पसारा सोशल मीडियाचा...

जी गोष्ट वस्तुंच्या बाबतीत तिच नातेसंबंधांच्याही!! खंडीभर मित्र मैत्रिणींची गर्दी अवती भवती करण्यापेक्षा मोजकेच, आयुष्य समृद्ध करणारे मित्र मैत्रिणी जोडणे, जे आहेत ते जपणे हे महत्वाचे..

आपल्या सारख्या सोशल मीडियाच्या व्हर्चुअल जगात जगणाऱ्यांसाठी तर हा पसारा दिवसेंदिवस खूपच मोठ्ठा होत चालला आहे.. फेसबुकवर किती फ्रेंड्स आहेत, इन्स्टा ट्विटर वर किती फॉलोअर्स आहेत ह्यावर होणारी माणसाची पारख आणि व्हाट्स ऍप वर असणारे शेकडो ग्रूप्स.. प्रत्येकाने सातत्याने अपडेट केलेली स्टेटस, टाकलेले फोटो, ते आज कुठे जेवताहेत, कॉफ़ी पिताहेत, त्यांच्या आयुष्यातल्या बारीक सारीक घडामोडी, घटना ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात काडीचाही फ़रक पडणार नसतो पण त्या जाणून घेण्यात आपले कित्येक तास खर्च होतात.. त्यावर प्रतिक्रिया देणे, आलेल्या उत्तराची दखल घेणे, त्यांच्या एका ’लाईक’ ला उत्तर म्हणून आपले चार ’लाईक’.. या सगळ्याला अंत नाही.

प्रत्यक्ष आयुष्यातही आपण नातेवाईकां बरोबरच अनेक लोकांशी जोडले गेलेलो असतो.. शेजारी पाजारी, कॉलनीतले, ऑफिसमधले, मॉर्निंगवॉक-हास्यक्लब-जिम मधले, भिशी-ट्रीप्स-प्रवासात ओळखी झालेले, जोडीदाराचे मित्र-मैत्रिणी.. अगदी रोजचा भाजीवाला, फळवाला, वाणी, इस्त्रीवाला, वॉचमन, कामाला येणाऱ्या बायका..

कधीकधी नुसती ही गर्दी आजूबाजूला असण्याचाही तो ताण येतो.. त्यांच्याशी संबंध ठेवणे, घरी जाणे, बोलावणे, फोनवरुन विचारपूस करणे ही नको वाटू लागते..

खरंच ह्या भरपूर मित्र-मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या, आपल्या जवळच्या लोकांच्या ह्या पसाऱ्यात, गर्दीत वेळेला उपयोगी पडणारे किती असतात?.. काहीवेळा त्या चार उपयोगी पडणाऱ्या लोकांसाठी ही गर्दी, हा पसारा जपावा ही लागतो..
अनेकदा नात्यात, मैत्रीत कडवटपणा आलेला असतो, तर काही चिघळलेली असतात.. पण तरीही आपण ती कितीही ताण आला तरी जपतच राहतो.. एकटं पडण्याच्या भितीतून, आपण आजूबाजूला ही गर्दी जमवलेली नाही ना? याचा काटेकोर, स्पष्ट विचार करायला हवा.. असे नातेसंबंध जपून जगण्यातले अनारोग्य वाढवण्यापेक्षा, आपल्याला सोबत लोकांचा गराडा हवाच हा मनाचा हट्ट कमी केला तर?? कघी चार लोकांसोबत तर कधी कधी एकटेपणाने जगण्यात सुद्धा किती मोठा आनंद आहें, शांतता आहे, सोपेपणा आहे हे कदाचित सहज समजून येईल.

ऑगस्ट २०१९ मध्ये, जेव्हा मी 'सोशल मीडिया डिटॉक्स चॅलेंज' स्वीकारले, तेव्हा पहिल्यांदा फेसबुक वापरणे बंद केले..  फेसबुकवर पोस्ट न करणे इथून सुरुवात झाली.. नंतर दिवसातून एकदा ब्राऊज करणे आणि आता तर दोनचार दिवसातून एकदा ५-१० मिनिटे इतकाच काय तो वापर होतो... महत्वाचे म्हणजे त्यामुळे माझ्या सोशल लाईफ मध्ये बिलबुल फरक पडला नाही... पण अनावश्यक ताण नक्कीच कमी झाला.
तसेच व्हॅट्स ऍप चे पण.. ग्रुप नोटिफिकेशन गेले वर्षभर बंद आहे.. पर्सनल नोटिफिकेशन ऑन असल्याने ते लगेच पहिले ही जातात.. otherwise दिवसातून २-४ वेळा व्हाट्स ऍप पाहिले जाते.. आणि तेवढे सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहण्यासाठी पुरेसे आहे असे मला वाटते..

-मी मधुरा..
१ सप्टेंबर २०२०

No comments:

Post a Comment