Friday, September 4, 2020

मिनिमलिझम आणि मी ४...

"द मिनिमलिस्ट"..

क्लटरफ़्री, पसारामुक्त जीवन पद्धती म्हणजे मिनिमलिझम.. साधेपणाने जगण्याचे एक सूत्र..

मिनिमलिझम किंवा मिनिमलिस्ट जीवन पद्धतीचे अवलंबन म्हणजे कमीतकमी, अत्यावश्यक गरजेच्या, स्वत:ला महत्वाच्या वाटणा-या वस्तुंसोबत जगणे.. एका साध्या, मिनिमलिस्ट जीवन पद्धतीकडे घेऊन जाणारी ही वाट, प्रत्येकाची वेगळी...
आयुष्य जास्तीत जास्त सोपेपणाने जगणे, कमीत कमी वस्तु वापरणे, गरजेपुरतेच जमवणे आणि कोणत्याही ताण तणावाशिवाय आनंदात जगणे हा विचार वाचताना कितीही आकर्षक, हवासा वाटला तरी प्रत्यक्षात अंगीकारणे तसे कठीणच.. पण हे अंगीकारून, "मिनिमलिझम" जीवन पद्धतीचा प्रसार करणारा अमेरिकेचा "जोशुआ बेकर" विरळाच.. त्याच्या ह्या “द मिनिमलिस्ट” चळवळीची सुरुवात झाली ती, त्याने घरातला, गराज मधला ओसंडून वहाणारा पसारा, वस्तुंची अडगळ आवरायला काढली त्या दिवशी.. ड्राइव्हवे वरचा प्रचंड मोठा ढिगारा पाहून जोशुआचा म्हातारा शेजारी त्याला सहज म्हणाला, “खरंच तुला या इतक्या गोष्टींची गरज होती का?” या प्रश्नाचे उत्तर शोधताना जोशुआचे पुढचे आयुष्य बदलून गेलं.. आणि मग जोशुआने नुसती अडगळच नाही तर घरातल्या इतरही अनेक वस्तु डोनेट, रिसायकल करायला सुरुवात केली. यातूनच कमीतकमी वस्तुंसोबत जगण्याची, मिनिमलिस्ट जीवन पद्धती त्याला सापडली आणि मग मिनिमलिस्ट ब्लॉगर्स चळवळ सुरु झाली..

’मिनिमलिझम’ म्हणजे सर्वसंगपरित्याग नाही किंवा कोणतेही आधुनिक फॅड ही नाही. त्याकरिता कोणत्याही गोष्टीचा त्याग करणं, कोणत्याही बंधनात अडकवून घेणं अपेक्षित नाही. ही एक पर्यायी जीवनपद्धती आहे. व्यक्तिगणिक त्याला रोजच्या जगण्याला लागणाऱ्या आवश्यक गोष्टी बदलत असतात. काहीजणांना स्वत:चं घर, कार, टीव्हीसेट या गोष्टी आवश्यक वाटू शकतात तर काही जणांना अनावश्यक.. प्रत्येकालाच एका साचेबद्ध पद्धतीने ही जीवनपद्धती स्वीकारणे कितपत शक्य आहे? जोशुआच्या भाषेत "मिनिमलिझम" जीवन पद्धती म्हणजे “शंभरहून कमी गोष्टींसोबत जगणं”.. रोज ठरवून काही गोष्टी कमी केल्या, नवीन वस्तु आणण्यापेक्षा आहेत त्यांचाच नवा उपयोग शोधून काढला तर हे ध्येय बघता बघता साध्य होऊ शकतं.
"जगताना मुक्तपणा, मोकळेपणा जाणवायला हवा" हे मिनिमलिस्ट जीवन पद्धतीचे मुख्य सूत्र... भिती, असुरक्षितता, स्पर्धा, काळजी, तणाव यापासून मुक्ती... अपराधभाव, नैराश्य जोपासणा-या ग्राहक-संस्कृतीच्या चंगळवादी जाळ्यात अडकून रहाण्यापासून मिळालेली मुक्ती... मात्र ह्यासाठी जाणीवपूर्वक, विचार करुन आयुष्यातील प्रायॉरिटीज ठरवायला हव्यात..
आलिशान घर, लक्झरी कार, कुटुंबाकरता चैनीच्या वस्तु खरेदी करायच्या आहेत? खुशाल खरेदी करा.. करिअरच्या मागे धावायचं आहे? तसं करा.. पण त्या आधी आयुष्यातील प्रायॉरिटीज ठरावा.. उगाचच ग्राहक-संस्कृती, जाहिराती यांच्या मा-याखाली दबून जाऊन, स्वत:ची विचारशक्ती हरवून, आपल्या आयुष्यातल्या सर्वात आनंद देणा-या इतर गोष्टींना डावलून हे करु नका इतकं साधं मिनिमलिस्ट जीवन पद्धतीचे सूत्र आहे..

घर-संसार व्यवस्थित सांभाळून, वस्तुंचा उपभोग घेऊनही मिनिमलिस्ट जीवन पद्धती जोपासता येते.. फक्त त्या वस्तुंना, चैनीला स्वत:च्या आयुष्यात किती महत्व द्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचं.. आपले आरोग्य, नातेसंबंध, छंद, व्यक्तिमत्वाची जोपासना, एक व्यक्ती म्हणून आपली होणारी वाढ यापेक्षा या वस्तु मोठ्या आहेत का? हे तपासून पाहायचं.. आपण ह्या भोवतालच्या पर्यावरणाचा, समाजाचा एक घटक आहोत, आपलं आयुष्य जगताना त्यांचंही देणं ही लागतो ह्याचे भान ठेवून, आजूबाजूच्या पर्यावरणाचा एक भाग होऊन जगायचं..

प्रत्येकाचे क्लटरफ़्री, मिनिमलिस्ट लाइफ़स्टाईल जोपासण्याचे ध्येय वेगवेगळे असू शकते. तेव्हा ही जीवनपद्धती कश्यासाठी हवी आहे? हे तपासून पहिले पाहिजे.. साधं रहाणीमान हवं आहे, पैसे वाचवायचे आहेत कि खरेदी कमी करायची आहे?, धावपळ-दगदग कमी करून ताण-तणाव कमी करायचे आहेत का असलेले व्याप कमी करून क्लटरफ़्री जगायचं आहे?, कि पर्यावरण स्नेही व्हायचं आहे?... मग इतरांनी काय काय केलय यापेक्षा, नेमक्या कशाने आपल्याला आनंद मिळेल, ध्येयाप्रत पोचता येईल याचा शांतपणे विचार करुन, वेळेची एक चौकट ठरवून त्यानुसार वागता येईल.

२००८ च्या अनुभवानंतर, "२ वर्षात जे काही वापरले नाही ते पुढे लागणार नाही" हे अवलंबण्याचा प्रयत्न करते आहे.. हा विचार थोडा त्रासदायक आहे पण ह्यामुळे निदान बरीच वर्षे कपाटात पडून असलेल्या गोष्टींचा विचार होतो, कदाचित त्या काढून ही टाकल्या जातात.. आणि प्रत्येक नव्या खरेदीच्या वेळी क्रेडीट कार्ड पुढे करण्याआधी “खरंच याची गरज आहे का?” हा प्रश्न स्वतःला विचारून खात्री करून घेते..

One step at a time किंवा अश्या baby steps घेत थोडे जरी मिनिमलिझम अंगिकारता आले तरी बराच पसारा कमी होईल, नाही का? “शंभरहून कमी गोष्टींसोबत जगणे” सध्या जरी अशक्य वाटत असले तरी, आपण शंभर गोष्टी कमी करायचा नक्कीच प्रयत्न करू शकतो..

-मी मधुरा..
२ सप्टेंबर २०२०

No comments:

Post a Comment