७ सप्टेंबर २०१७
प्रिय आजीस,
नुकतीच मी गारवड्याला, तुझ्या माहेरी म्हणजेच माझ्या पणजोळी जाऊन आले. त्याचे असे झाले कोयनानगर ला आम्ही सगळे मावस बहीण भावंडे जमलो होतो. कऱ्हाड पासून पाटण फाट्याला आमची गाडी लागली आणि मन एकदम गारवड्यात पोचले. आणि तुझी प्रकर्षाने आठवण आली. तुझ्या प्रेमाची उब परत अनुभवण्यासाठी त्यावेळीच ठरवले की परतताना गारवड्याला नक्कीच जायचे. तुझ्या बरोबर जगलेले ते क्षण परत जगायचे. पेरूच्या बागेत, आमराईत, गणपतीच्या देवळात, बहुलेश्वराच्या देवळात पाय तुटेपर्यंत भटकायचे.. पारंब्या खेळायच्या, ओढ्यात पाय सोडून मनसोक्त गप्पा मारायच्या. ह्या प्लॅन मध्ये बाबा आणि मनीषला पण सामील करून घेतले. आम्ही सगळेच खूप एक्सायटेड होतो... बाबा त्यांच्या आजोळी जाणार म्हणून आणि आम्ही ते समक्ष अनुभवणार म्हणून! संपूर्ण प्रवासात फक्त जुन्या आठवणी परत परत चघळत होतो. तू , मामा आजोबा, मामी आजी, मावशी आजी सगळ्यांना परत परत भेटत होतो. जस जसे गारवडे जवळ येत होते आम्ही ओळखीच्या खाणाखुणा शोधायला लागलो. पण एक ही ओळखीची खूण सापडेना. खूप बदल आहे ग आपले गारवडे..
एका टुमदार खेड्याचे/गावाचे स्वप्न मनात घेऊन मी गारवड्यात यायचे ठरवले. गाडी गणपतीच्या देवळासमोर उभी राहिली आणि माझी तंद्री भंग पावली. माझा विश्वासच बसेना कि आम्ही गावात आलो आहोत. गणपतीच्या देवळापेक्षा ओढा आणि त्यावरचा पूल हे जास्ती जवळचे असल्याने पटकन पावले तिकडे वळाली. पण जे समोर पाहिले त्यावर विश्वासच बसेना. आजी, आता गावात यायला ओढ्यावरचा पूल लागत नाही. पूर्वी सारखा ओढा ही नाही आता. ओढ्याचा शोध घेत घेत आम्ही बहुलेश्वराच्या देवाळापर्यंत जाऊन पोचलो.. तेथे नाही म्हणायला चार पाच झरे दिसले आणि हायसे वाटले. निदान झरे तरी शिल्लक आहेत. आपण बहुलेश्वराला जाताना झऱ्याच्या पाण्यातून चालत जायचो पण आता तेथे मोठ्ठी भिंत बांधली आहे आणि देवळाचे प्रवेशद्वार ही बदलले आहे. वाडाची झाडे अजुनी आपली साक्ष सांगत उभी आहेत. आठवते, त्याच्या पारंब्या खेळत आम्ही ओढ्याच्या पाण्यात उड्या मारायचो. ओढा भरून तेथे आता रस्ता झाला आहे. ओढ्याच्या आठवणी आता मनातल्या कोपऱ्यात जपून ठेवायच्या बस्स.
आपल्या खाजगी गणपतीच्या देवळाचा जिर्णोद्धार झाला पण खुद्द स्वारी एका वेळच्या पूजेला महाग झाली आहे. देऊळ खूपच प्रशस्त आणि हवेशीर बांधून झाले आहे पण देवळाबाहेर तण, कचरा यांचे साम्राज्य झाले आहे. पाहायला आपल्यापैकी तेथे कोणीच नाही. गावातली लोक वाट पाहत आहेत कि कोणी तरी याची जबाबदारी घेईल आणि स्वच्छ सुंदर देऊळ गावाला मिळेल. गावात अजुनी जोशी सावकारांच्या आठवणी सांगणारे लोक आहेत पण थोडेच दिवसात ते ही काळाच्या पडद्याआड जातील. मग काय होणार? नोकरी धंद्या निमित्य सगळे बाहेर पडले, पडायलाच पाहिजे पण आपली मुळे विसरून कसे चालेल?
गुरवाला बोलावयाच्या निमित्याने गावातून फेरफटका मारला. गाव खूपच सुधारले आहे. घरोघरी डिश टीव्ही, मोबाईल, गाड्या, पक्की घरे.. काय नाही आहे तिथे.. गावाचा पूर्वीचा चेहरा मोहराच बदलला आहे. आपला वाडा ह्या सगळ्यात जुन्या आठवणी एकवटून कसा तरी उभा आहे. एका काळाची शान सांगणारा आता मूकपणे आपले अस्तित्व सांगत आहे. घर बंद असल्याने आत जाता आले नाही. तो चौसोपी वाडा, वाड्यामागे परस, परसामागे आमराई काय थाट होता.. निवृत्ती मास्तरांच्या बागेतील पेरूची चव अजुनी जिभेवर आहे.
गावातून जाताना जाणवले लग्न होऊन तू सुभेदारवाडी ला आलीस त्यावेळी तुला काय वाटले असेल? दोन्ही गावाच्या ठेवणीत तसा फारसा फरक नाही, घाटावरच्या गावातून कृष्णा काठच्या गावात आणि सावकाराच्या घरातून सरदार घराण्यात हाच काय तो बदल.. वयाच्या दहाव्या वर्षी कसे मॅनेज केले असशील? तुझ्या मनात काय विचार असतील? तेव्हा फारशी माहेरी जायची पद्धत ही नव्हती. आपले गाव, जिथे आपण खेळलो, बाघडलो, आपलं घर आता ते तुटणार हे सुद्धा कळायचं तुझं वय नव्हतं. आई काकू जेव्हा माहेरी जात असतील तेव्हा तुला ही वाटले असेल ना गारवड्याला जावे. आपण सगळे पहिल्यांदा गारवाड्याला गेलो तेव्हा 'माहेरच्या माणसांसारखेच गावाशी पण एक अतूट नाते असते' हे मी तुझ्या डोळ्यात पाहिले.. आणि माझी ह्या गावाशी कायमची गट्टी झाली. बाबा, काका,आत्या फारसे आजोळी गेलेच नाहीत. पण त्यांच्या मनात ही आजोळ बद्दल हळवा कप्पा आहे.
बदल ही काळाची गरज आहे. आपण कितीही बदललो तरी आपली मुळे विसरू शकत नाही. तुला हे आत्ता सांगायचे कारण म्हणजे मी जेव्हा अनेक देशात-गावात फिरते तेव्हा मनात खात्री असतेच कि आपली मुळे अजुनी गावात आहेत, जिथं आपण वाढलो. पण त्या गावातले बदल पाहताना, लोकांच्या अनोळखी नजरेला तोंड देताना किंवा जुन्या लोकांची ओळख पटायला वेळ लागतो, तेव्हा वाटते, आपण सगळे विसरत तर चाललो नाही ना? त्याचवेळी ओळखीच्या जागा, लोक, चालीरीती पाहून आपण ही त्याच गावाचे आहोत ही खात्री पटते आणि आधार ही वाटतो.
गावातून निघताना परत ती वडाची झाडे दिसली अनेक पारंब्याने बहरलेली.. अश्याच पारंब्या सारखे आम्हीही बहरत विस्तारत आहोत. आपण कितीही दूर गेलो तरी मुळे तिथेच असतात.. जस या पारंब्याच एक मूळ तू आहेस, एक मूळ मी ही आहे आणि एखाद मूळ ऋचा ही आहे. जस हे गारवडे माझ्या मनात घर करून आहे तसेच एखादे गारवडे ऋचाच्या मनात पण वसेल. हा माझा विश्वास आहे.
तुझी
मधु
-मी मधुरा..
************************************************
No comments:
Post a Comment