Friday, September 8, 2017

घडी रे घडी...

भारतातून घरी आल्या आल्या एक लॉंड्री बास्केट भरून कपडे माझी घडी घालण्यासाठी वाट पाहत होते तर काही घडी घातलेले कपडे इस्त्री करायची वाट पहात होते. भारतातील आरामदायक सुट्टी नंतर हे काम नक्कीच कंटाळवाणे होते. इतरवेळी सुट्टीहून आल्यानंतर सर्व प्रथम बॅगा उघडून मळलेले कपडे घुवून, घडी करून जगाच्या जागी जातात आणि बॅगा स्टोअर रूम मध्ये! त्याशिवाय मला झोप येत नाही की अन्न गोड लागत नाही. ह्याला अपवाद मात्र इंडिया ट्रीपचा असतो. बॅगा उघडल्या की छान इस्त्री केलेले कपडे कपाटात विसावण्यासाठी सज्ज असतात. ते एक सारखे घडी केलेले कपडे पाहिले की इस्त्रीवल्या काकांबद्दल उर अभिमानाने भरून वैगरे येतो. समाजातील ७० ते ८० टक्के लोकांना परीटघडीचे कपडे देऊन सभ्य बनवण्याचे काम हे काका लोक करतात. दुपट्टा पासून ते साडी पर्यंत, बुशशर्ट पासून ते सूट पर्यंत, धोतरा पासून ते पँट पर्यंत, कुर्ती पासून ते अनारकली पर्यंत हे 'घडी मास्तर' सगळे काम कसे लिलया पार पाडतात. कपड्याची दोन टोके एकत्र करून कपड्याचा मध्य काढणे, शर्टच्या चौकोनाचे तीन समान भाग करणे, अनारकली सारख्या आकारमानाने जाडजुड असणार्या कपड्याला समद्वीभुज त्रिकोणात घडी करून त्याचे मोठ्या चौकोनातून छोट्या चौकोनात रूपांतर करणे हे केवळ भुमिती तज्ञच करू शकतो. मला हा 'घडी मास्तर' चा कोर्स कोठे असेल तर नक्की करायला आवडेल.

तशी आपली ह्या घडीशी ओळख अगदी लहानपणापासुन होते. बालवाडीत जाताना त्रिकोणी घडी घातलेल्या रूमाला पासून चा हा प्रवास आयुष्याच्या प्रत्येक टप्यात वेगवेगळ्या घडीशी ओळख करत सुरूच असतो. नविन पुस्तकांना खाकी रंगाची कव्हर घालताना केलेल्या घड्या, हस्तकला वर्गात केलेल्या ओरोगामीच्या क्लिष्ठ घड्या, वही मधील पानांच्या घड्या, साखर झोपेतून कसेतरी डोळे चोळत उठल्यावर केलेली पांघरूणाची घडी, आईला लाडीगोडी लावायच्या वेळी केलेली साडीची घडी, सुट्टीत दुपारी सगळ्या भावंडांनी मिळून केलेल्या रोजच्या कपड्यांच्या घड्या, पोळीच्या घड्या, आता मोठ्ठी झालीस असे करू नकोस म्हणताना पडणार्या आईच्या कपाळावरील घड्या, कपड्यांच्या घड्या आणि त्यावरून घरोघरी होणारी छोटीमोठी भांडणे, जिम मध्ये पोटावरील घड्या (वळ्या) उतरवताना होणारी दमछाक आणि आयुष्याची घडी बसवताना अश्या केलेल्या आणि कराव्या लागणार्या असंख्य घड्या... 

कपड्यांची घडी घालणे ही एक कला आहे. माधवाच्या चौचष्ट कला मध्ये याचा समावेश आहे का नाही माहिती नाही पण असायला हवा. साडीच्या दुकानात, तयार कपड्यांच्या दुकानात घड्या घालणारी ही खास माणसे दिवसभर घड्या करून आपल्या संसाराची घडी बसवतात. जेव्हा ह्या कपड्यांच्या घड्या मोडायची वेळ येते ना मग त्या इस्त्रीवाल्या काकांनी केलेल्या घड्या असोत किंवा नवीन कपड्यांच्या, अंगात एकदम स्फुरण येते.. अश्या कपड्यात मिरवण्याचे समाधान काही औरच असते. 

बायकांसाठी 'घडी मोडणे' हा एक सोहळाच असतो. चांगला दिवस पाहून नवीन कपड्यांची, साडीची घडी मोडली जाते. जेव्हा मैत्रिणी, सासू सुना एकमेकींच्या साड्यांच्या घड्या मोडतात तेव्हा त्यांच्यातील प्रेम नक्कीच वाढत असेल. 

अनंत घडीचे डाव... त्याला जीवन ऐसे नाव.... हेच खरे!


-मी मधुरा.. 
७ सप्टेंबर २०१७
************************************************

No comments:

Post a Comment