Thursday, December 7, 2023

२०२३ मावळताना..

मावळतीच्या संधीप्रकाशात स्वतःबरोबर वेळ घालवणं, स्वतःतल्या चांगल्या वाईट बदलांकडं, आलेल्या अनुभवांकडं तिऱ्हाईत होऊन पाहणं मला आवडतं.. मग त्यासाठी कोणता खास दिवस हवा असं ही नाही.. पण वर्षभरात काय केलं आणि येणाऱ्या वर्षात काय करायचं ह्याचा आढावा घेण्याचा दिवस मात्र नक्कीच ठरलेला आहे 'माझा वाढदिवस'.. अधेमधे स्वतःकडं त्रयस्थ होऊन पाहणं गरजेचं असतं असं मला वाटतं.. त्यामुळं स्वतःतील गुण-दोष, स्वतःची बलस्थानं-कमकुवत स्थानं डोळसपणे पाहता येतात.. आणि त्यावर काम करणं सोपं जातं..  
 
२०२३ तसं माझ्यासाठी खासंच.. एकतर माझं अर्ध-जन्मशताब्दी वर्ष.. ऋचाचं हायस्कूल ग्रॅज्युएशन, कॉलेज ऍडमिशन, कॉलेज नामक तिच्या नव्या आयुष्याची नवी सुरुवात थोडक्यात proud mom moment हे ही ह्याच वर्षात.. आणि त्यानंतर सुरु होणारी माझी सेकेंड इंनिंग.. ऋचा लांब जाण्यानं, जरी माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण होणार असली, तरी ह्या 'सेकेंड इंनिंग' बद्दल खूप कुतूहल, उत्सुकता होती.. आयुष्याला नवा आकार देण्याचं स्वप्न ही होतंच.. कदाचित ह्यामुळं ऋचाचं नसणं थोडं सुसह्य झालं.. 

"ही वाट दूर जाते" ह्या कार्यक्रमासाठी निवेदन, कविता वाचन केले.. एका फॅशन शो मध्ये पण भाग घेतला.. 'साडीची बदलत जाणारी रूपं' ही ह्या फॅशन शो ची थिम.. माझं नऊवारी प्रेम जगजाहीर (पोर्टलॅंड जाहीर) असल्यानं मला विचारलं.. नऊवारी पण हटके स्टाईल म्हणून मी 'देवसेना ड्रेप' ठरवला.. ड्रेप थोडा कॉम्प्लिकेटेड असला तरी शिकायला मज्जा आली.. 

"छूमंतर" मराठी नाटक.. लेखन, दिग्दर्शन, कलाकार सगळं पोर्टलॅंडकर्स.. ह्या नाटकाचं सहाय्यक दिग्दर्शन करायची संधी मला मिळाली.. माझ्या कवितेला पण ह्या नाटकाचा भाग होता आलं.. हा अनुभव समृद्ध करणारा होता.. नाटक, नाटकाचं लिखाण 
हे कलाकार, प्रेक्षक आणि दिग्दर्शक ह्या तिघांच्या नजरेतून पाहता आलं.. ह्या आधी बॅकस्टेज केलं होतं पण दिग्दर्शकाला मदत करणं म्हणजे सगळ्या आघाड्यावर लढण्यासारखं होतं.. कलाकारांना डायलॉग साठी मदत, अबसेन्ट कलाकारांचे डायलॉग म्हणणं, क्लू देणं.. आणि सगळ्यांत महत्वाचं टाईम कंमिटमेन्ट सगळ्यांआधी यायचं आणि सगळे गेल्यावर जायचं.. ते दोन तीन महिने मंतरलेले होते.. 

इतक्या सगळ्या चांगल्या अनुभवांना एक गालगोट लागलंच.. आयुष्याला नवा आकार देण्याचं स्वप्न तर पाहिलं पण चॉईस पॉईंट ला थोडी गडबड झाली.. स्वप्न पाहताना नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी लक्षातच आल्या नाहीत.. हे अपूर्ण स्वप्न एक दिवस नक्की सत्यात उतरेल कारण ह्या स्वप्नाचा हात मी अजुनी सोडलेला नाही.. ह्या स्वप्नाबद्दल नंतर परत कधी.. 


-मी मधुरा.. 

************************************************

Thursday, September 28, 2023

ही वाट दूर जाते..

शांता शेळके जन्मशताब्दी वर्ष


कधी आठवण लपलेली असते 

हृदयाच्या बंद कप्प्यात 

कधी आठवण लपलेली असते 

वसंतातल्या गुलमोहोरात 

कधी ती लपलेली असते 

सागराच्या अथांग निळाईत 

र कधी ती लपलेली असते 

बहरलेल्या चैत्रपालवीत 

या साऱ्यांभोवती फिरत असतो 

श्वास आपला मंद धुंद 

आणि यातूनच मग दरवळतो 

तो आठवणींचा बकुळगंध 

तो आठवणींचा बकुळगंध 


आणि आज शांताबाई शेळक्यांच्या अनंत आठवणींचा बकुळगंध घेऊन आम्ही येत आहोत. 


नमस्कार मंडळी! मी मधुरा..



ब्लॉगपोस्टची अशी सुरुवात पाहून आश्चर्य वाटलं असेल ना?






.. तर, काही नाही हो.. ओरेगॉन मराठी मंडळ प्रस्तुत 'ही वाट दूर जाते' ह्या म्युझिकल प्रोग्रॅमची ही होती सुरुवात.. 


आणि ह्या प्रोग्रॅमचं निवेदन करायची संधी मला मिळाली.. 






मराठी साहित्य समृद्ध करण्यात शांताबाईंचा खूप मोठ्ठा वाटा आहे हे आपण जाणतोच.. त्यांची विविध बाजाची गाणी, त्यांच्या कविता, त्यांचं लेखन ह्या साऱ्यांची चव नुसती चाखायची म्हंटली तरी सुद्धा तीन साडे तीन तास नक्कीच पुरणार नव्हते..


सुप्रिया, मी, शुभांगी आणि शंतनू 


इतक्या मोठ्ठ्या कार्यक्रमाचं अभ्यासपूर्वक निवेदन करणं कोण्या एकाच काम नव्हे.. आमचा चार जणांचा चमू त्यासाठी अखंड कार्यरत होता.. त्यांच्या बद्दल किती बोलू किती नको असं प्रत्येकाला झालं होतं.. गाणी तर आधीच ठरली होती.. आम्हाला त्या गाण्यांच्या अनुषंगानं बोलायचं होतं.. आणि त्यातूनच शांताबाईंच्या व्यक्तिमत्वाची, जीवन प्रवासाची ओझरती ओळख करून द्यायची होती.. निवेदनाचा वेळ कमी करून गायकांना अजुनी एखादं गाणं बसवता आलं तर हवं होतं आणि आम्हाला एखादं गाणं कमी करून निवेदनाची वेळ वाढवून हवी होती.. कविता वाचनासाठी सुद्धा असंच.. ८ कवितांपासून झालेली सुरुवात वेळे अभावी फक्त ५ कवितांवर येऊन थांबली.. ह्या साऱ्या प्रवासांत शांताबाई घरच्याच होऊन गेल्या..




कार्यक्रमाची सुरुवात "ही वाट दूर जाते" संतूर वादन.. घनरानी साजणा, असता समीप दोघे सारखी रोमँटिक गाणी.. किलबिल किलबिल सारखं बालगीत, लहान मुलींचा नाच.. वल्हव रे नाखवा, माझ्या सारंगा वर कोळी नृत्य..  रेशमाच्या रेघांनी सारखं लावणी नृत्य.. काटा रुते कुणाला सारखं नाट्यगीत, शालू हिरवा पाचूंनी मढवा सारखं लग्नगीत.. शूर आम्ही सरदार सारखं स्फुर्तीगीत.. आले रे गणपती, मागे उभा मंगेश सारखी भक्तिगीतं.. चांदण्या रात्रीतले स्वप्न.. ही चाल तुरुतुरु सारखं उडते गीत.. कविता वाचन आणि शेवटी असे मी नसेन मी.. अशी साधारण कार्यक्रमाची रूपरेखा.. 


आमच्या ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सहभागी कलाकारांचा वयोगट.. वयवर्षे सहा ते पासष्ट.. सगळ्यांनी आपल्या लाडक्या शांताबाईंसाठी जीव तोडून मेहनत केली.. अमेरिकेत जन्मलेल्या,वाढलेल्या बालचमूंची तर त्या शांताआजी होऊन गेल्या.. ही सगळी गाणी गायकांनी गायली आणि वादकांनी त्यांना साथ दिली.. 



मी केलेल्या निवेदनाच्या काही क्लिप्स.. 


 

काटा रुते कोणाला..



शालू हिरवा..



शूर आम्ही सरदार..



मागे उभा मंगेश..



कविता वाचन.. 


'पैठणी' ही कविता वाचणं माझ्यासाठी एक भावनिक आव्हानच होतं.. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा ही कविता मी वाचलीय, ऐकलीय तेव्हा तेव्हा माझे डोळे भरून आलेत.. ह्या पैठणीत, नेहमी मला माझी आजी दिसते.. अशीच तिची ही एक खास साडी होती.. आणि एक खास नथ ही! जी तिच्या आजेसासूबाईंनी तिला दिली होती.. (ह्या नथीची ही एक ब्लॉगपोस्ट आहे.. वाचली नसेल तर अवश्य वाचा..) 


माझ्याकडं माझ्या आजीच्या मऊ नऊवारी साडीची गोधडी आहे.. तिच्या स्पर्शातून मला आजी भेटते.. ती अंगावर घेतली कि आजीच्या मायेची छान उब मिळते.. 


पैठणी कविता वाचन..


आम्ही हा कार्यक्रम पोर्टलॅंड बरोबरच सिएटलला पण केला.. कार्यक्रमाचं बरंच कौतुक ही होतंय.. BMM च्या ऑडिशनसाठी पण व्हीडिओ पाठवलाय..  बघू काय होतंय ते..🤞



-मी मधुरा.. 

************************************************

Sunday, July 30, 2023

एक नवीन पर्व..

 

My Precious Daughter Leaving For College.. 



Rucha, my bundle of joy, 

लवकरच तू शिक्षणासाठी बाहेर पडशील.. तुझ्या ड्रीम कॉलेजमध्ये, तुझ्या ड्रीम फील्ड मध्ये काम करशील.. तुझ्यासारखीच मी पण excited आहे.. २% एक्सेप्टन्स रेट असलेल्या मेडिकल प्रोग्रॅम मध्ये तुझं झालेलं सिलेक्शन खरोखरंच अभिमानास्पद आहे.. पण.. घरापासून इतक्या दूर??.. एकदम अमेरिकेच्या दुसऱ्या टोकालाच.. ५००० किमी अंतर, ५-६ तास विमानाचा प्रवास, तीन तास टाईम डिफरंस असणाऱ्या फ्लोरिडा स्टेट मध्ये.. ह्या विचार सुद्धा नको वाटतोय.. जसं जसे जायचे दिवस जवळ येत आहेत तसं तशी चलबिचल वाढतीय.. अभिमान, उत्सुकता, कुतूहल, भीती, काळजी अश्या अनेक भावनांची दाटीवाटी होतीय.. मन अनेक विचारांनी अनेक दिशांना खेचलं जातंय.. 

डॉर्म रूम मिळण्याचा दिवस समजल्यापासून तुझं सुरु झालेलं काउंट डाऊन, तुझ्या खोलीतील व्हाईट बोर्डवरचे 'आज पासून इतके दिवस' असे ठसठशीत लिहिलेले आकडे, म्हणजे 'our days are numbered', ह्याची मला होणारी जाणीव.. १२८ दिवसांपासून सुरु झालेला हा प्रवास आता अगदी बोटावर मोजता येईल इतक्या दिवसांवर येऊन ठेपलाय गं.. खरंच, इतके कमी दिवस राहिले?.. आता, अजुनी काही दिवसंच मी तुला दररोज पाहू शकेन.. रात्री भेटू शकेन, टक करू शकेन, गुड नाईट किस करू शकेन.. शेजारच्याच रूम मध्ये तू आहेस ह्यानं मी ही निर्धास्त झोपू शकेन.. मला माहितीय कि जरी तू इथं नसलीस तरी मी तुझी आईच असणार आहे.. आपल्यातील बॉण्ड तसाच असणार आहे.. पण तरी ही it's not the same.. 

किटू, ही अठरा वर्ष किती झपाट्यानं गेली गं.. तुझा जन्म, तुझं दात येणं, तुझं पॉटी ट्रेनिंग, तू टाकलेलं पहिलं पाऊल,  तुझे पहिले बोल-अखंड बडबड ते तुझं प्री स्कुल-एलिमेंटरी स्कूल.. अजुनी जशाचा तसा आठवतोय तुझा प्रीस्कूल चा पहिला दिवस.. तुझं मला सोडून जाताना रडणं.. स्कूल बाहेर बाकावर, तीन तास माझं बसून राहणं.. ते एक पर्वचं होतं.. नाही का?.. स्विमिंग लेसन्स, स्विमिंग कॉम्पिटिशन्स ते गाण्याचा, नाचाचा क्लास.. मिडल स्कूल- हायस्कूल ते वॉटरपोलो Jr. Olympics, ड्रायविंग लायसन्स ते कॉलेज एप्लिकेशन्स.. हायस्कूल ग्रॅज्युएशन आणि आता शिक्षणासाठी तुझं घराबाहेर पडणं.. हे सगळं कालंच घडल्यासारखं वाटतंय.. अगदी पापणी लवेपर्यंत एका पर्वातून दुसऱ्या पर्वात गेल्यासारखं.. 

आता तुझ्या आयुष्यातील एका नवीन पर्वाची सुरुवात होतीय.. आनंद, खूप सारे पर्याय, आशा-आकांक्षा आणि अनेक संधींनी भरलेला असा हा टप्पा.. आठवणींना उराशी बाळगून नवीन स्वप्नांचे स्वागत करणारा.. आत्तापर्यंत तू केलेल्या कष्टांचं, तुझ्या अनुभवांचं संचित बरोबर घेऊन स्वतःला शोधायचा तुझा हा प्रवास.. मान्य आहे की हा प्रवास, तुझ्या एकटीचा  आहे, पण तसा तो माझा ही आहे.. जरी ह्या प्रवासात तुझ्या हातात स्टेरिंग व्हील असलं तरी तुला प्रोत्साहन द्यायला, तुझं कौतुक करायला मी नेहमीच साईडच्या सीट वर बसलेली असेन.. भरपूर संधींनी, प्रगल्भ शक्यतांनी परिपूर्ण असा हा प्रवास, अनुभव संपन्न आणि आयुष्याला दिशा देणारा असेल.. भविष्य शाश्वत करणारा असेल.. कदाचित ह्या प्रवासात अनेक खाचखळगे, अडथळे येतील पण पुढं एका समृद्ध आयुष्याचं चित्र आहे.. आणि विश्वास ठेव, हा प्रवास नेहमी तुझ्या लक्षात राहील.. It will be always close to your heart.. 

... पण तो पर्यंत मला माझ्या मनाला आवर घातला पाहिजे.. तुझ्या बरोबरचे प्रत्येक क्षण, प्रत्येक आठवणी हृदयाशी जपून ठेवायच्या आहेत.. आणि पुढचा प्रत्येक दिवस 'stay in the moment' वागायचंय.. प्रत्येक क्षण तुझ्या बरोबर जगायचंय.. तुझं तुझ्या मैत्रिणींशी फोनवर बोलणं-हसणं, तुझं मग्न होऊन वेब सिरीज पाहणं, तुझं स्वतःला विसरून पुस्तकं वाचणं सगळं डोळ्यांत साठवून ठेवायचंय.. तुझा अस्ताव्यस्त बेड, रूमभर पसरलेले कपडे-सामान ह्याकडं कानाडोळा करायचाय.. तुझ्या बाथरूम मधल्या तुझ्या सोपचा, तुझ्या परफ्युमचा वास खोलवर घ्यायचाय.. तू लावलेल्या मोठ्या आवाजातील गाण्यांनी कान भरून घ्यायचेत.. कारमध्ये होणारी चर्चा, आपल्या गप्पा, एकत्र गायलेली गाणी सारं सारं जपून ठेवायचंय.. हसताना चमकणारे तुझे डोळे आणि चुण्या पडणारं तुझं नाक, तुझा प्रेमळ स्पर्श, तुझं लाडानं जवळ येणं, तुझं आई आई करणं, तुझी मिठी, तुला दिलेला आणि घेतलेला पापा, झोपताना केलेलं टकइन आणि गुड नाईट किस.. किती आणि काय काय सांगू?? 

माझं मन सांगतंय कि, हे उरलेले दिवस त्यासाठी अपुरे आहेत.. ह्यासाठी सगळं आयुष्य पण कमी पडेल.. मी जे हे राहिलेले काही दिवस, क्षणभंगूर क्षणांमध्ये पकडण्याचा, मनात साठवण्याचा प्रयत्न करतीय त्यापेक्षा हा बॉण्ड, हे नातं, हे प्रेम खूप मोठठं आणि अधिक खोलवर रुजलेलं आहे.. ह्या घरात, तुझे माझ्या बरोबर रहायचे दिवस मर्यादित असतील पण आई म्हणून नाही.. हो ना?.. जो पर्यंत माझा श्वास सुरु आहे तो पर्यंत मी कायम तुझ्या बरोबर आहे.. आणि कदाचित नंतर सुद्धा!.. फारच फिलॉसॉफिकल झालं ना.. बघ, सध्या असेच माझे विचार कसे ही कोठे ही भटकत असतात.. 

नजीकच्या भविष्यात आपण रोज एकत्र नसू, पण आपण एकत्र बांधले गेलेलो आहोत.. आपल्या टॅटू सारखं.. आपलं रोजचं जगणं जरी एकत्र नसलं तरी मी आहे.. सतत तुझ्या बरोबर.. just one call away.. just one text away.. 

हे कदाचित तुला सांगायच्या बहाण्यानं, मी माझं मलाच सांगत असेन.. 

उरलेले काही दिवस हा काही शेवट नाही.. ही तर नवीन सुरुवात आहे.. नवीन स्वप्नांची, नवीन आयुष्याची.. A new chapter to explore and grow.. A new chapter to live and learn.. A new chapter to find yourself..  



So, go and chase your Dreams!!



-मी मधुरा.. 

************************************************ 

Saturday, July 15, 2023

माझं हेअर डोनेशन!!

माझं हेअर डोनेशन!!

खरं तर, दान केलेलं ह्या हाताचं त्या हाताला सुद्धा कळू न देणारी आपली संस्कृती.. पण, मी तर माझ्या ह्या 'दाना'बद्दल ब्लॉगपोस्टच लिहायला घेतली!.. 

'केस' हा आपल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय.. आणि 'घने लंबे लेहराते बाल' हे एक सुंदर स्वप्न!.. त्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो.. नानाविध प्रकारची तेलं, शाम्पू कंडिशनर, स्पा ह्यात आपण रमतो.. केस गळणं, केस पांढरे होणं, हेअर कट्स, हेअर स्टाईल्स, bad hair day हा तर आपला नेहमीचाच गप्पांचा विषय!.. नाही का?

'माझे केस' नेहमीच माझ्या ओळखीचा अविभाज्य भाग राहिले आहेत.. दाट, काळा, कंबरेपर्यंत लांब असा केशसंभार वयाची तेवीशी होईपर्यंत मी वागवला.. कॉलेज मध्ये असताना, माझ्या एका मैत्रीणीनं, आठवडाभर, रोज एक नवीन hairstyle, करून येण्याचं मला दिलेलं challenge, मी कोण हौसेनं पूर्ण केलं होतं.. असो.. लांब केस संभाळणं, त्यांची काळजी घेणं मोठ्ठ्या जिकिरीचं काम.. त्यामुळं अमेरिकेला येण्यापूर्वी, माझ्या केसांना जी कात्री लागली ती कायमचीच.. सुरुवातीला बिचकत बिचकत, सहा इंच कमी करून, केलेल्या डीप यू हेअर कट चा, हळूहळू खांद्यावर रुळणारा लेअर कट झाला.. पण तरी सुद्धा केसांचा डौल कायम राहिला.. आणि माझी ओळख ही!.. ह्यात माझं श्रेय असं काहीच नाही.. आई-बाबांच्या genes ची कृपा दुसरं काय?😁.. Genes कितीही चांगले असले तरी केस गळणं, bad hair daysना मी ही तोंड देत असते..  
 
असे सुंदर केस एकदम देऊनच टाकावेत, दान करावेत असं का वाटलं? मला लख्ख आठवतंय, ह्याची सुरुवात झाली २००९ च्या सुमारास तिरुपतीला.. तिथला 'केशदान' सोहळा पाहून अवाक व्हायला झालं होतं.. हे केशवपन कोणी पापमुक्त होण्यासाठी तर कोणी कृतज्ञता म्हणून तर कोणी नवस फेडण्यासाठी करतात.. तरीही, कसे ही केस असोत ते कापून दान करणं, आणि त्या भादरलेल्या डोक्यानं समाजात वावरणं ही इतकी सहज सोपी गोष्ट नक्कीच नाही.. त्यावेळी आयुष्याच्या लो फेज मधून जात असताना सुद्धा असा विचार मला माझ्यासाठी भयावह होता..   

याच सुमारास माझ्या मावशीला कॅन्सर झाला.. किमो दरम्यान केस गेल्यानं ती डोक्याला ओढणी, स्ट्रोल बांधू लागली.. 'खोट्या केसांचा विग' ह्या पर्यायावर तिनं केव्हांच खाट मारली होती.. त्यावेळी मला पहिल्यांदा वाटलं कि माझे केस देऊन तिच्यासाठी विग करावा.. पण ते तितकं सोपं नव्हतं.. हे नाही जमलं तरी कॅन्सर पेशंट्स साठी काही तरी करावं असं सतत वाटत होतं.. त्यावर्षी मी 'ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च अँड क्युअर'ची फंड रेझिंग हाफ मॅरेथॉन (२१किमी) केली.. आणि पुढं जमेल तशी करतंच राहिले.. मध्यंतरीच्या काळात 'बॉडी अँड ऑर्गन डोनेशन' ही केलं.. पण 'हेअर डोनेशन' मागं पडलं ते पडलंच.. यथावकाश त्याची नोंद 'बकेट लिस्ट' मध्ये झाली.. 

'बकेट लिस्ट' मध्ये 'हेअर डोनेशन' लिहिलं खरं, पण त्यासाठी मोठ्ठी तपस्या करावी लागणार होती.. हेअर डोनेशन साठी कमीतकमी १० इंच केस, ते ही कोणतीही ट्रीटमेंट न केलेले.. ना डाय ना हायलाईट्स ना पर्म.. सुदैवानं पांढरे केस ही समस्या नसल्यानं हा प्रश्न नव्हता.. पण इतके लांब केस वाढणं, त्यासाठी लागणारा संयम आणि ते सांभाळणं हे आव्हान नक्कीच होतं.. पॅनडॅमिकच्या काळात, त्या दोन वर्षात हे कदाचित शक्य झालं असतं.. पण त्यावेळी 'Do it Yourself Challenge' घेत घरच्याघरी 'लेअर कट' केला.. आणि 'हेअर डोनेशन'ला पूर्णविराम लागला.. 

पॅनडॅमिक नंतर लगेचच, माझी अगदी जवळची मैत्रिण ब्रेन ट्युमरशी लढत असताना, ट्रीटमेंट दरम्यान तिची खंगावत जाणारी तब्बेत, तिचे गळणारे केस, केस गेल्यानंतरच तिचं गोजिरं रूप आणि समाजात वावरण्यासाठी तिनं करून घेतलेला केसांचा विग.. हे सगळं जवळून पाहताना 'हेअर डोनेशन'च्या realistic possibilityची, एक वास्तववादी शक्यतेची जाणीव झाली.. मी जर मदत केली तर एखाद्याच्या आयुष्याचा, त्याच्या जगण्याचा अर्थ बदलू शकतो.. आणि मी 'हेअर डोनेशन'च मनावर घेतलं.. 

डिसेंबर २०२१.. सुरुवातीला माझे लेयर्स एकाच लेव्हलचे करून घेतले जेणेकरून केस वाढवणं सोपं जाईल.. १२ इंच, १ फूट केस वाढवायला मला तब्बल १४ महिने लागले.. ह्या १४ महिन्यांचा प्रवास खडतर होता.. जसे केस वाढत होते तशी त्यांची निगा राखणं, काळजी घेणं कठीण होत होतं.. रेग्यूलर जिम करत असल्यानं आठवड्यातून दोनदा केस धुण्याची असणारी सवय हळू हळू त्रासदायक होऊ लागली.. केस गळण्याचं प्रमाण ही वाढत होतं.. त्यावेळी संयमाची खरी कसोटी होती.. 'मी हे केस चांगल्या कारणासाठी वाढवत आहे' असं सतत स्वतःला सांगायला लागायचं.. कोणी म्हणालं, "अरे वा, केस छान वाढलेत.." मी लगेच म्हणायची, "हो, 'हेअर डोनेशन'साठी वाढवते आहे".. "हो का! तुझा अनुभव नक्की सांग. आम्हाला ही असं करायला आवडेल" असा प्रतिसाद ही खूपदा ऐकायला मिळायचा.. त्यामुळं ह्या 'विचारा'ला एक बांधिलकी राहिली.. केसांना तेल लावताना, त्यांची काळजी घेताना, केस वाढवताना ते आपण दुसऱ्यासाठी वाढवतो आहोत.. आणि ते एके दिवशी कापले जाणार आहेत, हे आत्मभान मी जपलं होतं.. जीवन जगण्याच्या अर्थाच्या किती जवळंच आहे ना हे?       





इथं अमेरिकेत बऱ्याच धर्मादायी संस्था आहेत ज्या 'हेअर विग' साठी काम करतात.. मी माझे केस 'Locks of Love' ह्या संस्थेला दिले.. प्रत्येक संस्थेचे केस घेण्याबद्दलचे वेगवेगळे निकष, नियम असतात.. सहसा स्वच्छ धुवून वाळवलेले, पोनीटेल मध्ये एकत्र बांधलेले कमीतकमी १० इंच लांबीचे केस एका पारदर्शक प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून त्यांना पाठवायचे असतात.. ह्या केसांपासून विग तयार करणे खर्चिक काम असते.. त्यामुळे काही संस्था माफक पैसे आकारतात.. 


       
थोडक्यात, 'केस' प्रत्येक व्यक्तीच्या आत्मसन्मानाचा महत्वाचा भाग असतात.. जर का आपण आपल्या 'केशदान' ह्या छोट्याश्या कृतीतून, कोणाच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकत असू, त्यांचा दिवस उजळवू शकत असू, त्यांना आत्मविश्वास देऊ शकत असू तर हे करायला काय हरकत आहे?.. "It’s just hair. Don’t worry, it will grow back!"



-मी मधुरा.. 

************************************************ 

Wednesday, June 14, 2023

गोंदण.. माय-लेकीच्या प्रेमाचं..

गोंदण.. माय-लेकीच्या प्रेमाचं.. अर्थात.. टॅटू.. 

लहानपणी उन्हाळी सुट्टी संपली की हमखास वर्गातल्या एखाद्या मुलीच्या नाकात सोन्याची नाजूक तार, तारेच्या गाठीला एखादा मोती, लाल मणी दिसायचा.. तर एखादीच्या दोन भिवयांच्या मध्ये किंवा मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मागच्या बाजूला गोंदणाचा एकदा हिरवा ठिपका.. काही समाजात हा हिरवा ठिपका म्हणजे 'मुलगी वयात आली..' ह्याचं प्रतीक.. मग बाकीच्या मुलींमध्ये कुजबुज सुरु व्हायची.. आणि 'कित्ती गावठी' हा शेरा मारून आम्ही रिकामे व्हायचो.. तसं पाहायला गेलं तर गोंदणाशी असणारी ही काही पहिली ओळख नव्हे.. शेतात काम करणाऱ्या, घरी कामाला येणाऱ्या बायकांच्या हातावर नवऱ्यांच्या नावापासून ते देवदेवता ते धार्मिक चिन्हं चितारलेली पहिली आहेत.. त्यामुळं गोंदण आणि कष्टकरी समाज हे रुढावलेलं समीकरण.. 

मग ह्या गोंदणाशी एकदम संबंध आला तो इकडं अमेरिकेत आल्यावर.. इथल्या लोकांच्या गोऱ्यापान रंगावर खुलणारं कधी हिरवं, कधी काळं तर कधी रंगेबिरंगी गोंदण पाहून हरकायला व्हायचं.. अंगावर नको तिथं टोचून घेऊन त्यात काहीबाही घालणाऱ्या, अंगभर गोंदून घेणाऱ्या ह्या माणसांबद्दल कुतूहल तर होतंच पण भीती ही वाटायची.. असं टोचून घेणं, गोंदवण हे अतिशय बंडखोरीचं लक्षण मानलं जातं.. पण नंतर हा ही समज हळूहळू कमी होऊ लागला आणि जगभर 'टॅटू' एक फॅशन सिम्बॉल म्हणून रूढ झाला.. तरी ही मी कधी गोंदवून घेईन असं मला वाटलं नव्हतं.. 

अभिनेत्री नीना कुळकर्णींच्या उजव्या दंडावरची सरस्वती पाहिली आणि मी त्या टॅटूच्या प्रेमात पडले.. मग काय, नुकत्याच लिहायला सुरुवात केलेल्या बकेट लिस्ट मध्ये 'टॅटू' ला मानाचं स्थान ही मिळालं.. पण बकेट लिस्ट मध्ये असणं आणि प्रत्यक्षात करणं वेगळं.. आपली ओळख, आपलं व्यक्तिमत्व ह्याचा मोठ्ठा भाग असणारा हा टॅटू.. एकदा काढला कि कायमचा.. खूप उलट सुलट विचार.. बकेट लिस्ट मधलं सगळंच पूर्ण होत असं नाही.. अशी मनाची समजूत काढत मधली खूप वर्षे गेली.. 

कट टू.. मुलीचा सोळावा वाढदिवस.. "आई, lets go to Wyoming.. I really really really want to have a tattu.."  "काय?.. टॅटू? आणि त्यासाठी वायोमिंग?" माझ्यातली आई उद्गारली.. उद्गारली कसली जवळ जवळ किंचाळलीच.. तर काय म्हणे तिथंच फक्त टॅटूसाठीच लीगल एज सोळा आहे.. "बघू" म्हणून मी विषय संपवायच्या प्रयत्नात.. पण ती थोडीच हेका सोडतीय.. माझीच मुलगी ती.. मी नाक टोचण्यासाठी आईचं डोकं खाल्लं होतं.. पण टॅटू?.. बाजूला तिची बडबड सुरूच होती.. मैत्रिणी कोणता टॅटू काढणार आहेत.. वॉटरपोलो टीम मध्ये कोणाकडं आहे.. आणि तिला कुठं आणि कसे टॅटू हवे आहेत.. बापरे.. अंगभर टॅटू असलेली माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर नाचू लागली.. 'नको' म्हणत मी डोळे झाकून घेतले.. 'अगं नको काय? पिंटरेस्ट वरचे नमुने तरी बघ' म्हणून ती मला कॉम्पुटर वर दाखवू लागली.. 

किती सुंदर होती ती टॅटू डिझाईन्स!!.. काळ्या-हिरव्या-रंगीबेरंगी शाईची.. लहान-मोठ्ठी.. काही अगदी बारीक रेघांची तर काही ठसठशीत.. मन एकदम हरकून गेलं.. त्या शाईच्या दुनियेत ऋचा बरोबर मी ही हरवत गेले.. आणि बघता बघता, बोलता बोलता एकत्र टॅटू चं स्वप्न दोघींच्या मनांत रुंजी घालू लागलं.. मनगटावर अगदी छोटंसं सिम्बॉलिक असं काही तरी काढायचं.. माय-लेकीच्या प्रेमाशिवाय दुसरं काय सिम्बॉलिक असणार??.. फावल्या वेळात टॅटू डिझाईन्स पहाण्याचा नादच लागला.. शेवटी एकदाचं 'Mom n Baby Orca' जोडी वर शिक्कामोर्तब झालं.. आणि आठराव्या वाढदिवसाचं count down सुरु झालं.. 

पण इतक्या सरळपणानं झालं तर कसं?.. एक दिवस ऋचा शाळेतून घरी आली आणि म्हणाली.. "I can not have a Tattu on my wrist.." का?.. तर म्हणे.. डॉक्टर प्रोफेशन साठी शरीराच्या दर्शनीय भागावर टॅटू असणं हे नियमबाह्य आहे.. असं शाळेत सांगितलंय.. आणि बाईसाहेबांना तर डॉक्टर व्हायचाय.. (..आता तर Medical ला admission पण मिळाली..) "मग आता गं?".. एवढासा चेहरा करून मी.. "don't worry, we can have it on our collarbone which can be easily hide..".. इति ऋचा.. घरी येईपर्यंत टॅटूसाठी दुसरी जागा पण ठरली होती.. आणि आधीचं डिझाईन तिथं चांगलं दिसणार नाही म्हणून त्यावर खाट ही मारून झाली होती.. आता नवीन शोधाशोध.. 

डिझाईन ठरलं.. दिवस ठरवला १४ डिसेंबर.. म्हणजे ऋचाचा अठरावा वाढदिवस.. दोन महिने आधीपासूनच तिनं 'टॅटू आर्टिस्ट्स शोध मोहीम' हाती घेतली.. नेट वर reviews वाचून, मित्रमैत्रिणींशी बोलून काही नावं शॉर्टलिस्ट केली.. मग त्या लोकांना जाऊन भेटलो.. ती place, तिथलं hygiene, आर्टिस्टचा कॉन्फिडन्स, एकूणच तिथलं वातावरण, vibes हे पाहायचं असतं म्हणे.. आर्टिस्ट ठरली.. तिनं डिझाईन approve केलं.. आणि १४ डिसेंबरला दुपारी १ वाजता भेटायचं ठरलं.. 

पहिला टॅटू जिथं स्किन थोडी जाड असते अश्या ठिकाणी हातावर, पायावर काढावा म्हणजे कमी दुखतं म्हणे.. आम्ही तर अतिशय नाजूक ठिकाणी टॅटू काढणार होतो.. त्यामुळं किती दुखेल, डिझाईन पूर्ण काढून होईल का नाही.. ह्याची खात्री नव्हती.. पण आम्ही दोघी बरोबर असल्यानं आणि खरंच, अगदी मनापासून टॅटू हवा असल्यानं आम्हाला कितीही दुखलं तरी चालणार होतं.. 

The Day, १४ डिसेंबर.. 
बरोबर दुपारी १ वाजता उत्साहित चेहऱ्यांनी आम्ही तिकडं पोचलो.. सुरुवातीला पेपरवर्क, नंतर डिझाईनचा साईझ, त्याचं टेम्पररी टॅटूत रूपांतर, त्याचा प्रिंटाऊट.. हे सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यावर तिनं तिची आयुधं टेबलवर मांडली आणि पहिलं कोण? असं विचारताच ऋचा शेजारच्या खुर्चीत जाऊन बसली सुद्धा!.. टॅटू काढायची जागा स्वच्छ पुसून टेम्पररी टॅटू काढून, तो योग्य ठिकाणी, आम्हाला हवा तसाच आहे ना ही खात्री झाल्यावर तिनं ऋचाला बेडवर झोपायला सांगितलं.. आणि तिच्या आयुधांची माहिती द्यायला सुरुवात केली.. ही गन.. हे नोझल.. ही शाई.. जेव्हा मी ही शाई डिझाईन मध्ये भरेन म्हणजे ही गन डिझाईन वरून फिरवेन तेव्हा खोल श्वास घ्यायचा.. मांजर नखांनी ओचकारलंय असं वाटेल.. नमनाला घडाभर झालं असेल तर आता काढना बाई.. असे भाव ऋचाच्या चेहऱ्यावर.. 

एकदाची तिनं त्या गन मध्ये शाई भरली.. आणि अलगद हातांनी गन घेऊन डिझाईन ट्रेस करू लागली.. मी आपली ऋचाचे हावभाव पहात शेजारी बसले.. दुखतंय का? कसं वाटतंय हे प्रश्न तर होतेच.. अधून मधून तिचं नॉसल बदलणं, शाई भरणं, मध्येच ऋचाला रिलॅक्स हो म्हणून सांगणं सुरु होतं.. टॅटू काढायला जवळ जवळ अर्धातास लागला.. टॅटू झाल्यावर ऋचाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अमूल्य होता.. ह्यापेक्षा चांगली गिफ्ट काय असू शकते?.. दहा मिनिटाच्या ब्रेक नंतर तिनं मला बोलावलं.. परत सगळी माहिती सांगून झाल्यावर माझ्या टॅटू ला सुरुवात झाली.. पेपर वरच डिझाईन स्किनवर टॅटू म्हणून नक्की कसं दिसतं हे माहिती असल्यानं ती उत्सुकता आता नव्हती.. टॅटू काढताना दुखलं का?.. तर दुखलं अजिबातच नाही.. पण सुरुवातीला थोडं uncomfortable वाटलं इतकंच.. थोड्यावेळानं त्याची सवय होऊन गेली.. 

Meaning of our Tattu.. Mom and Daughter with infinity of Love

पण खरंच हा अनुभव खूप छान होता.. आणि ह्या टॅटू मागचा विचार पण.. घरातून शिक्षणासाठी बाहेर पडताना आमच्या दोघींचं असं काही तरी ती बरोबर घेऊन जाईल आणि माझ्यापाशी ही ते राहील.. आयुष्यभरासाठी..


-मी मधुरा.. 

************************************************ 





Tuesday, May 23, 2023

फलित.. पन्नास पुस्तकं वाचन संकल्पाचं..

'पन्नास पुस्तकं वाचन संकल्प' सफल संपूर्ण.. अजुनी खरंच वाटत नाहीय कि मी बारा महिन्यात पन्नास पुस्तकं वाचलीत.. नुसती वाचली नाहीत तर त्या पुस्तकांचा आढावा ही घेतला.. 

पन्नास पुस्तकं वाचण्याचा संकल्प केला खरा पण तो पूर्णत्वास जाणार कसा??.. त्यात कोणतीही पन्नास पुस्तकं नाहीत तर फक्त मराठी पुस्तकं.. विविध लेखन/साहित्य प्रकार.. कविता, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, कादंबऱ्या, नाटक.. शक्यतो न वाचलेले लेखक.. आणि न वाचलेली पुस्तकं.. असं ही घालून घेतलेलं बंधन.. ते ही इथं अमेरिकेत राहून.. मोठठं आव्हानच होतं.. 

बारा महिन्यात पन्नास पुस्तकं म्हणजे प्रत्येक महिन्याला साधारण चार पुस्तकं.. म्हणजे आठवड्याला एक.. बापरे!!.. इतकं घड्याळ्याच्या काट्यावर पुस्तकं वाचायची सवय ही नाही.. इकडं आल्यापासून पुस्तकं वाचली ती गम्मत म्हणून.. शक्यतो दिवाळी अंक किंवा भेट म्हणून मिळालेली पुस्तकं.. शुद्ध आनंदासाठी.. पूर्णपणे स्वान्तसुखाय!.. किंवा कधी कधी लेखनात संदर्भ शोधण्यासाठी.. एकदा वाटलं, ताकदी पेक्षा मोठठं आव्हान घेतलं का?.. पण, 'एक बार कमीट किया तो खुदकी भी नाही सुनते' असं म्हणत हे आव्हान कसं पेलता येईल ह्याचा विचार करायला सुरुवात केली..

पहिलं आव्हान इतकी पुस्तकं मिळवायची कशी? आणि दुसरं म्हणजे वाचनासाठीचा वेळ.. घरात असलेल्या एक दोन पुस्तकांनी संकल्पाची सुरुवात तर झाली.. दुपारचा वेळ वाचनासाठी पक्का केला.. कोणती पुस्तकं वाचायची ह्याची यादी तयार करायला घेतली.. लायब्ररी, मैत्रिणींची बुक शेल्फ्स, बुकगंगा.कॉम सारख्या वेबसाइट्स धुंडाळायला सुरु केले.. पाहता पाहता पुस्तकांची यादी आकार घ्यायला लागली.. त्याच बरोबर पहिल्या महिन्यात पाच पुस्तकं वाचून ही झाली.. आणि 'मैं कर सकती हैं'.. हा आत्मविश्वास आला.. 

जुलै मधली भारतवारी.. म्हणजे तत्पूर्वीच्या साधारण दहा बारा पुस्तकांची 'कोणी पुस्तक देता का पुस्तक' असं म्हणत सोय केली.. नुसत्या दुपारच्या वाचनानं कदाचित इतकी पुस्तकं वाचून होणार नाहीत म्हणून शाळेच्या pickup line मध्ये, waiting room मध्ये, रात्री झोपण्यापूर्वी, वेळ मिळेल तेव्हा फक्त पुस्तक वाचन.. सतत बरोबर पुस्तक असण्याची सवय झाली.. ह्या दोन तीन महिन्यात वाचन इतकं अंगात भिनलं होतं की विमान उडायच्या आधीच झोपणारी मी, जवळ जवळ संपूर्ण प्रवासात वाचत होते.. परिणाम, मुंबई येईपर्यंत 'क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता' हे ३८० पानांचं पुस्तक वाचून संपलं देखील..       

पुण्यात गेल्यावर पहिली भेट दिली ती 'पुस्तकपेठे'ला.. तिथल्या नव्याकोऱ्या पुस्तकांच्या वासानं कसं मंत्रमुग्ध व्हायला झालं.. पुस्तकं हातात घेऊन वाचण्यातलं सुख किंडल मध्ये नक्कीच नाही.. पुस्तकांचा तो स्पर्श, त्यांचा तो वास, त्यातील अक्षरांचं जिवंत होऊन तुमच्याशी बोलणं.. एक वेगळाच कनेक्ट जाणवतो.. नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी दिलेल्या पुस्तकांत त्यांचं प्रेम जाणवत राहतं.. 


तीन डझनाहून अधिक नवी कोरी पुस्तकं.. ती शिस्तीत लावण्यातला आनंद.. त्या पुस्तकांच्या सामायिक गंधानं भरून गेलेलं वातावरण.. अनेक लेखक आणि विषय-वैविध्य.. आणि इतकी पुस्तकं एकत्र पाहिल्यावर आलेलं उत्साह मिश्रित दडपण.. 

.. पण आज पन्नास पुस्तकांच्या संकल्पपूर्ती नंतर जाणवतंय की हे ध्येय अवघड असलं तरी अशक्य नव्हतं.. थोडं रुटीन बदलायची गरज होती.. वाचनाला प्राधान्य देण्याची गरज होती.. आणि पुस्तक आवडलं नाही तरी शेवट पर्यंत नेटानं वाचण्याच्या संयमाची ही गरज होती.. 

जेव्हा मी हा 'वाचन संकल्प सफल संपूर्ण' म्हणते तेव्हा ह्या वाचनाचं फलित काय?.. हा प्रश्न समोर येतोच.. मुळात वाचनाच्या भौतिक लाभांपेक्षाही वाचनामुळं समृद्ध होणारं जीवन अधिक मोलाचं असतं.. पुस्तकातल्या विचारांनी समृद्ध तर झालेच.. पण ह्या वाचनातून मिळालेला आत्मिक आनंद अधिक मोलाचा वाटतो जो कालातीत असेल.. 

... 'पुस्तक वाचन' इथं नक्कीच थांबणार नाही.. आता ते जगण्याचा एक भाग बनलं आहे.. रोजचा निदान अर्धा तास तरी वाचनासाठी! हा मंत्र जपायचा.. 

*आचार्य अत्रेंचं 'कऱ्हेचें पाणी' वाचायला घेतलं आहे.. आठ ही खंड मिळाल्यानं पुढचे काही महिने आचार्यांच्या सोबतीत..


मी वाचलेली पन्नास पुस्तकं.. 

व्यक्तिरेखा.. 
ओंकाराची रेख जना.. मंजुश्री गोखले 
क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता.. मृणालिनी गडकरी 
ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी.. प्रतिभा रानडे
मैत्रेयी.. डॉ अरुणा ढेरे 
दास डोंगरी राहातो.. गो. नी. दांडेकर 
लेखक आणि लेखने.. शांता शेळके 
रावण राजा राक्षसांचा.. शरद तांदळे
साद देती हिमशिखरे.. कै. जी. के. प्रधान (अनुवाद.. डॉ. रामचंद्र जोशी) 

आत्मचरित्र.. 
जगाच्या पाठीवर.. सुधीर फडके
झिम्मा - आठवणींचा गोफ.. विजया मेहता
रामनगरी.. राम नगरकर
हृदयस्थ.. डॉ. अलका मांडके
कॉलनी.. सिद्धार्थ पारधे
अमलताश.. डॉ. सुप्रिया दीक्षित 
स्मृतिचित्रे.. लक्ष्मीबाई टिळक

सामाजिक.. 
एका तेलियाने.. गिरीश कुबेर
"मी अत्रे बोलतोय".. प्रल्हाद केशव अत्रे
 ब्र.. कविता महाजन

कादंबरी.. 
बारोमास.. सदानंद देशमुख 
दुनियादारी.. सुहास शिरवळकर 
नातिचरामि.. मेघना पेठे
कादंबरी : एक.. विजय तेंडुलकर 
महाश्वेता.. डॉ. सुमती क्षेत्रमाडे
युगंधरा.. सुमती क्षेत्रमाडे
मृण्मयी.. गो. नी. दांडेकर 
पडघवली.. गो. नी. दांडेकर
कोसला.. भालचंद्र नेमाडे
बहुरूपी.. नारायण धारप 
शाळा.. मिलिंद बोकील
हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तमराव.. श्याम मनोहर
उद्या.. नंदा खरे

रहस्यमय, थरार .. 
शोध.. मुरलीधर खैरनार
बाजिंद.. पै. गणेश मानुगडे 
ते चौदा तास.. अंकुर चावला
तिमिरपंथी.. ध्रुव भट्ट (अनुवाद सुषमा शाळीग्राम) 
अकूपार.. ध्रुव भट्ट (अनुवाद अंजनी नरवणे) 
तत्वमसि.. ध्रुव भट्ट (अनुवाद अंजनी नरवणे)
वंशवृक्ष.. डॉ. एस. एल. भैरप्पा (अनुवाद सौ. उमा कुलकर्णी) 
विश्वस्त.. वसंत वसंत लिमये

कथासंग्रह.. 
गोफ.. गौरी देशपांडे
सो कुल.. सोनाली कुलकर्णी
प्रेमातून प्रेमाकडे.. डॉ. अरुणा ढेरे 
एकेक पान गळावया.. गौरी देशपांडे

ललितलेख..   
परिपूर्ती.. इरावती कर्वे 

नाटक..
युगांत.. महेश एलकुंचवार

विज्ञानकथा..   
यक्षांची देणगी.. जयंत नारळीकर 

प्रवासवर्णन.. 
चेकपॉईंट चार्ली.. डॉ माधवी मेहेंदळे 
अपूर्वरंग ४ जपान.. मीना प्रभू

महाभारत.. 
व्यासपर्व.. दुर्गा भागवत
पर्व.. डॉ. एस. एल. भैरप्पा (अनुवाद सौ. उमा कुलकर्णी) 


-मी मधुरा.. 

************************************************ 


Tuesday, May 2, 2023

Golden Birthday!... Yet Another Milestone!!





Happy 50th Birthday To ME!!... 

सकाळी आरश्यासमोर उभी राहून स्वतःलाच शुभेच्छा दिल्या.. दरवर्षी प्रमाणं.. आणि मनात विचार आला 'अरे बापरे, पन्नास!.. पाच दशकं.. जितकं जगले त्याच्या निम्मचं जगायचं बाकी आहे'.. एकदम चर्रर्र झालं.. It's Okay.. स्वतःकडं हसून पाहिलं आणि तो विचार झटकून टाकला.. 

तर अजुनी एक milestone!.. १६..१८..२५.. ४०.. आणि आता ५०.. खरं तर हे आकडेच.. पण ह्या आकड्यांचा संबंध जसा वयाशी येतो तसं सगळं समीकरणच बदलतं.. केसातल्या रुपेरी छटा.. चेहऱ्यावर अनुभवाच्या सुरुकुत्या.. नको तिथं खुखवस्तू आयुष्याचं शरीरानं मांडलेलं प्रदर्शन.. आयुष्यात येत चाललेलं रिकामपण.. आणि ओघानं येणाऱ्या तब्बेतीच्या तक्रारी.. कदाचित ह्याकडं जरा गांभीर्यानं पहावं म्हणून हे milestones असतील.. असो..

आज खूप मोठठं झाल्यासारखं वाटतंय.. गेल्या पाच दशकांत सोबत करणारे सगळे चेहरे डोळ्यासमोर येत आहेत.. काही सोबत आहेत तर काही नाहीत.. आजी-आबा त्यांच्या बरोबरचं समृद्ध आयुष्य.. दोन्ही काका.. साजरे केलेले वाढदिवस.. डोक्यावर कापूस, दुर्वा ठेवून 'कापसासारखी म्हातारी हो.. दुर्वासारखा वेल वाढू दे' असा औक्षण करून आशीर्वाद देणारी आजी.. आई-काकूचं त्या नंतर औक्षण करणं.. आणि सगळ्यांनी एकत्र केलेलं जेवण.. ओरपलेली खीर.. इतका साधा सरळ साजरा होणारा वाढदिवस.. आज सासूबाई असत्या तर पन्नासाव्या वाढदिवसाचं किती कौतुक केलं असतं त्यांनी.. घरगुती वाढदिवस.. मैत्रिणी बरोबर चाट खाऊन साजरे केलेले वाढदिवस.. नाईस फॅन्सी रेस्टोरेंट मधलं डिनर सेलेब्रेशन.. ऍनालॉग पासून ते डिजिटल पर्यंतचा हा पन्नास वर्षाचा प्रवास.. आणि ह्या प्रवासात मिळालेलं आप्तस्वकीय, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांचं भरभरून प्रेम.. 

'आई, तुला जर का तुझ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यातील एखादी घटना बदलायची संधी मिळाली तर तू काय बदलशील?..' इति ऋचा.. खरंच काय बदलायला आवडेल मला?.. मी बराच वेळ विचार केला.. आणि म्हणाले.. 'काहीच नाही..' कदाचित काही वर्षांपूर्वी ह्याचं उत्तर वेगळं असतं.. पण आज मी कृतज्ञ आहे.. जे काही मला आयुष्यानं दिलं, जे काही अनुभव आले त्यामुळं आजची मी आहे.. स्वतःच्या नजरेतून आयुष्याकडं पाहणारी.. काही कमी असेल तर ती भरून काढायचा प्रयत्न करणारी.. आयुष्याकडं सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणारी.. 

स्वतःशी संवाद साधत, स्वतःला ओळखण्याचा, स्वतःला हवं-नको पाहण्याचा प्रयत्न सुरु करून आज दहा वर्ष झाली.. कधी त्यात यश आलं कधी नाही.. कधी काय हवं ते सापडलं कधी नाही.. कधी नवीन हाताशी येताना असलेलं सुटून गेलं.. तर कधी अपेक्षा नसताना पण काहीतरी मिळून गेलं.. हीच तर खरी गंमताय.. नाही का?.. ह्याच 'चाळीस मैल' दगडावर विसावून, आयुष्याचा मागोवा घेऊन, पुढील प्रवासाचं एक चित्र मी रेखाटलं होतं.. त्यातील काही रंग, काही छटा, काही वळणं प्रवासात धूसर झाली तर काही नव्यानं खुलून आली.. आज 'पन्नास मैल' दगडापाशी हे चित्र पाहताना त्यात स्वतःचा ब्लॉग तयार करून त्यावर व्यक्त होण्यापासून ते हिमालयातील ट्रेक, स्टेज परफॉर्मन्स ते अँकरिंग ते रॅम्प वॉक, पर्मनंट टॅटू ते योगा अभ्यास ते सोलो ट्रिप्स, हेअर डोनेशन ते एका वर्षात पन्नास पुस्तकं वाचणं, अगदी गाण्याचा क्लास ते 'पोर्टलॅंड टू कोस्ट' रेस हे सगळं दिसतंय..  

..अजुनी बरंच काही करायचंय.. व्हॉइस मोडूलेशन्स, कॅलिग्राफी शिकायचीय.. RV तून नॅशनल पार्क्सना जायचंय.. लेह लडाख बुलेट राईड करायचीय.. तुकाराम गाथा वाचायचीय.. विपासना 'स्व'चा शोध.. सामाजिक देणं giving back to society.. आणि असंच काही काही.. 

पुढच्या milestone वरचं चित्र कसं असेल बरं?  



-मी मधुरा.. 

************************************************ 

Saturday, April 29, 2023

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं ४९, ५०)

४९. युगांत.. महेश एलकुंचवार..  


युगांत.. नाटककार महेश एलकुंचवार यांची 'वाडा चिरेबंदी'-'मग्न तळ्याकाठी'-'युगांत' अशी तीन नाटकं असलेली नाट्यत्रयी.. आठ-नऊ तासांची ही नाट्यत्रयी करण्याचं धाडस दिग्दर्शक चंद्रशेखर कुलकर्णी, लेखक महेश एलकुंचवार आणि निर्माते अरुण काकडे करू जाणे.. १९९४ साली हे नाटक रंगभूमीवर आलं आणि मराठी नाट्य रसिकांनी ह्या अनोख्या नाट्यप्रयोगाला बऱ्यापैकी प्रतिसाद पण दिला.. हे नाटक मला पाहायला जरी मिळालं नसलं तरी २८-२९ वर्ष उशिरा का होईना वाचलं तरी.. 'बेटर लेट देन नेवर' असं नक्कीच वाटलं.. 

विदर्भातील धरणगावकर देशपांडे कुटुंबातील तीन पिढय़ांचं असलेलं हे चित्रण.. 'वाडा चिरेबंदी' मध्ये कुटुंबप्रमुख व्यंकटेश उर्फ तात्याजी निवर्तल्यानंतर त्यांची पत्नी, तीन  मुलगे आणि एक मुलगी यांच्यातील मानसिक-भावनिक संघर्ष पाहायला मिळतो तर 'मग्न तळ्याकाठी' मध्ये तिसऱ्या पिढीतील.. 'युगांत' हा थोडासा निराशावादी, फिलोसोफिकॅल.. ह्या त्रियीचे काळ, विषय, प्रसंग म्हटलं तर वेगळे नि म्हटलं तर एकमेकात गुंतलेले.. शहर-खेडं, जगण्यातलं कटू वास्तव आणि त्याच बरोबर जपलेला खानदानी खोटा बडेजाव, मोडकळीस आलेली कुटुंब व्यवस्था, सरकारी अनास्था, आर्थिक आणि सामाजिक विदारक परिस्थिती आणि त्यामुळं होणारी स्थित्यंतरं.. आणि ह्या भोवतालच्या परिस्थितीला शरण गेलेली नाटकातील पात्रं.. सगळीच ना पूर्ण चांगली ना पूर्ण वाईट..

पुस्तक वाचताना प्रसंग अक्षरशः डोळ्यासमोर उभे राहतात.. पुस्तकाच्या सुरुवातीलाच कलाकार आणि त्यानं साकारलेलं पात्र अशी ओळख करून दिल्यानं, नाटक वाचताना प्रत्येक पात्राला एक चेहरा, लकब, आवाज मिळतो.. आणि ते पात्र सजीव होऊन वावरू लागतं..

सुनील बर्वेंनी 'युगांत' ह्या नाट्यत्रयीला ही पुनर्जीवन दिलं तर काय मज्जा येईल..  


-मी मधुरा.. 

************************************************ 

५०. पर्व.. डॉ. एस. एल. भैरप्पा.. 
अनुवादिका.. सौ. उमा कुलकर्णी.. 



पन्नास पुस्तकांच्या वाचन संकल्पातील हे पन्नासावं पुस्तक!.. खूप वेगवेगळे लेखक, लेखनप्रकार, लेखन विषय वाचायला मिळले.. याबद्दल सविस्तर नंतर लिहीनच.. 

डॉ. एस. एल. भैरप्पा, जेष्ठ कन्नड साहित्यिक यांचं मी वाचलेलं हे दुसरं पुस्तक.. 'वंशवृक्ष' वाचून अक्षरशः भारावले होते मी.. 'महाभारत' आणि 'डॉ. एस. एल. भैरप्पा'- काय नवीन लिहिलं असेल ह्यांनी?.. ह्याची खूप उत्सुकता होती.. ७७६ पानांची ही कादंबरी.. आभाळा एवढ्या उंचीची पात्रं, त्यांची जीवनमूल्यं, त्याचे संघर्ष, चमत्कार-शाप-वरदान या पलीकडं जाऊन प्रत्येक पात्राचा घेतलेला शोध.. मानववंशशास्त्र, समाजशास्त्र यातून त्यांच्या वर्तनाची लावलेली संगती.. महाभारताची विलक्षण प्रत्ययकारी अनुभूती देणाऱ्या ह्या कलाकृतीचा रसपूर्ण, सहज सुंदर मराठी अनुवाद केलाय सौ. उमा कुलकर्णी यांनी..

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर वयोवृद्ध भीष्म, रथात उभा कृष्ण आणि काहीतरी विचार करणाऱ्या द्रौपदीचा चेहरा.. आत्ता काहीतरी ते सांगतील, बोलतील असा.. कधी एकदा हे पुस्तक वाचेन असं झालं होतं.. पण वाचलेलेच विषय, व्यक्तिचरित्र ह्या संकल्पात वाचायचे नाहीत ठरवल्यानं मागं पडलेलं हे पुस्तक शेवटी वाचायला घेतलंच.. महाभारत युद्ध आणि त्या मागची थोडी पार्श्वभूमी असं कथानक असलेलं हे 'पर्व'.. प्रत्येक पात्राच्या नजरेतून, आठवणींतून लिहिलं गेलेलं.. आणि पुढं पुढं सरकत जाणारं.. एखाद्या साखळी सारखं.. भीष्म, कृष्ण, कुंती, द्रौपदी, कर्ण, पांडव, दुर्योधन, धृतराष्ट्र, सात्यकी, विदुर अशी अनेक पात्रं येत जात राहतात..  थोडक्यात 'पर्व' म्हणजे ह्या कथानायकांच्या नजरेतून घडलेलं महाभारत युद्ध.. 
   
महाभारत म्हटलं कि समोर उभी राहतात ती अनेक पात्रं.. त्यांच्या अनेक बाजू.. अनेक विचार.. अनेक कथा.. आणि त्यातून आपल्या मनांत रेखाटल्या गेलेल्या त्यांच्या प्रतिमा.. काही काळ्या तर काही पांढऱ्या.. काही देवतुल्य तर काही दुष्ट, राक्षसी.. पण 'पर्व' मध्ये भैरप्पांनी या सर्व पात्रांना माणूस म्हणून एकाच पातळीवर तोललं आहे.. त्यांच्या चुका, त्यांच्यातील कमकुवतपणा, त्यांच्यातील धाडस शक्ती, त्यांनी केलेलं काम त्यामागची त्यांची विचारधारा याचा अभ्यास करून.. आणि हीच ह्या पुस्तकाची जमेची बाजू.. जी इतर महाभारत पुस्तकांपेक्षा 'पर्व' ला वेगळं करते.. यांत कोणी देव नाही, कोणाला उगीचच मोठठं केलं नाही.. षडरिपूनी बनलेला माणूस म्हणून सगळ्यांकडं पाहताना कुठं ही मूळ गाभ्याला धक्का लागलेला नाही.. प्रेम, वासना, मनाची गुरफट यातून कादंबरीला वेगळीच दिशा मिळते.. ही एक कादंबरी आहे.. महाभारताचा अभ्यास किंवा त्यातील बारकावे नाहीत हे मात्र लक्षात घेऊन वाचायला हवे..   

सुरुवातीची ५०० पानं तहानभूक हरपून वाचून काढली.. पण कादंबरीत जसं युद्ध सुरु झालं तशी ती रटाळ होऊ लागली.. हळूहळू पकड ढिली झाली.. आणि नुसत्या ओळी वाचून पुस्तक संपवलं.. 


-मी मधुरा.. 

************************************************ 



Wednesday, March 29, 2023

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं ४६ ते ४८)


४६. रावण राजा राक्षसांचा.. शरद तांदळे..  




अनार्य दासीपुत्र दशग्रीव ते त्रिलोकीचा राजा, राक्षसांचा राजा रावण हा प्रवास अद्भुत करणारा आहे.. 

लेखकाच्या लेखणीतून रावण जेव्हा त्याच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडतो तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वाचे ज्ञात असलेले सर्व गडद रंग हळूहळू फिकट होत जातात आणि समोर उभा राहतो तो "महानायक".. दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना एकत्र करून राक्षस संस्कृतीची निव ठेवणारा महानायक... "रक्ष: इति राक्षस:".. रक्षण करणारा रक्षक म्हणजेच राक्षस ही विचारधारा जपणारा महानायक.. स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत भेदभाव नसलेली संस्कृती उभी करणारा राक्षस संस्कृतीचा जनक असणारा महानायक.. 

अनार्य दासीपुत्र असल्याने जन्मदात्यानं नाकारलेलं त्याचं आर्यपण.. आर्य का अनार्य हा "स्व"चा शोध घेण्यात भरकटलेलं बालपण.. धर्माला महत्व देणाऱ्या धर्मनितीमुळं बिथरलेल्या बालपणात शापित आयुष्य संपवण्याचा निर्णय.. कर्तृत्वावर नाही तर कुळावर श्रेष्ठत्व ठरवणाऱ्या दांभिकांकडून झालेली उपेक्षा, अवहेलना, अपमान आणि ह्यातून तयार झालेला बंडखोर.. ज्या बंडखोरीला अफाट ज्ञानाची बैठक ही आहे.. 

हे सगळं वाचताना मनात एक कल्लोळ उठतो.. त्याच्यामुळं आयुष्य उध्वस्त झालं अश्या बंदिवान कुबेराला गुरुदक्षिणा म्हणून सोडून देणं, इंद्रादी देव, शनी ह्यांना बंदिस्त करणारा रावण संपूर्ण कादंबरीत कुतूहल निर्माण करतो.. 

असुर आणि भटक्या जमातीवर अंकुश ठेवण्यासाठी सुमाली आजोबांनी दिलेलं दशानन हे नाव.. दहा डोकी आणि २० हात असणारं ते रूप.. खरंच किती सार्थ होतं.. बुद्धिबळ, रुद्रवीणा, रावणसंहिता, कुमारतंत्र, शिवतांडव स्त्रोत्रा बरोबरच दर्शन शास्त्र, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद ह्या सारख्या अनेक विषयातील असलेलं पांडित्य.. सगळं अचंबित करणारं आहे.. हे एक मेंदू असलेल्या एका डोक्याचं काम नव्हे.. 

माता कैकसीनं दिलेलं ध्येय.. सुमाली, पौलत्स्य आजोबांनी दाखवलेली प्रकाशवाट.. प्रहस्त मामानं दिलेली लढायची उर्मी.. भावांचे वैचारिक संभाषण.. स्वसंवादातून झालेलं बौद्धिक द्वंद्व.. ब्रह्मदेवाचं मार्गदर्शन.. नारदमुनींचा सल्ला.. महादेवांनी दिलेली संघर्ष करायची प्रेरणा.. असे उल्हसित करणारे, रोमहर्षक प्रसंग यामुळं उपेक्षित राहिलेल्या रावणाच्या व्यक्तिमत्वाला न्याय दिला गेला आहे.. 

आईच्या अपमानाचा प्रतिशोध घेणारा मुलगा, सख्खे सावत्र बहीण भाऊ सगळ्यांना बांधून ठेवणारा कुटुंबवात्सल्य पुरुष, जनतेची कुटूंबाप्रमाणे काळजी घेणारा आदर्श राजा.. शिव आराधना करणारा निस्सीम भक्त.. हे ही व्यक्तिमत्वातील पैलू प्रभावीपणे दाखवले आहेत.. 

स्त्री वर शस्त्र उचलणं हा अधर्म.. ह्यातून शूर्पणखावर झालेल्या अत्याचाराच्या सूडाच्या भावनेतून सीतेचं केलेलं अपहरण.. अधर्म, अनीती ह्यावर त्याचं स्वतःशीच सुरु असलेलं द्वंद्व.. हे वाचताना अंगावर काटा येतो.. आप्तस्वकीयांच्या मृत्यूचे कारण, मेघनाद च्या मृत्यूनंतर झालेली हळहळ वाचून हृदयाला पीळ पडतो.. "लंकेत प्रत्येकाला जगण्याचं, धर्माचं, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे तर मला माझ्या पतीसोबत सती जायचं स्वातंत्र्य हवं आहे" हे सुलोचनाच वाक्य हादरून टाकतं.. 
 
रावणाचा पराजय समोर दिसत असताना मंदोदरीनं त्याच्याशी केलेला संवाद विशेष उल्लेखनीय आहे..  

मृत्यूशैय्येवर असताना, आपल्या मुलाच्याच वध करणाऱ्या लक्ष्मणाला शिष्य म्हणून स्वीकारायचं अलौकिक धाडस, औदार्य रावणाकडं होतं.. शेवटी न राहून रावण म्हणतो "लक्ष्मणा तुझ्या भावाला सांग, दोन बुद्धिमान पुरुषांनी संवाद न करता लढलं तर त्यात धूर्त आणि लबाड लोकांचा फायदा होतो.. जसा सुग्रीव आणि बिभीषणाचा होणार आहे.. कपटी लोकांचा आधार घेऊन मिळालेला विजय निराशेचा गर्तेत नेत असतो.. " 
रावणाचं हे वाक्य रामायणाचे आयाम बदलून टाकतं..


-मी मधुरा.. 

************************************************

४७. परिपूर्ती.. इरावती कर्वे.. 


परिपूर्ती.. इरावती कर्वे यांचा ललित लेख संग्रह.. 'युगांत' हे महाभारतावर भाष्य करणारं त्यांचं पुस्तक ह्यापूर्वी वाचलं होतं.. ह्या पन्नास पुस्तकांच्या संकल्पात त्यांचं एखादं तरी पुस्तक वाचावं असं वाटत होतं.. 'संस्कृती', 'भोवरा', 'गंगाजल' ही पुस्तकं त्यावेळी उपलब्ध नव्हती.. म्हणून हा पर्याय.. अठरा छोटे छोटे लेख असलेलं १४० पानांचं पुस्तकं.. मलपृष्ठ वाचल्यावर थोडेसे स्त्रीवादाकडं जाणारे लेख असतील असं वाटलं.. पहिली आवृत्ती १९४९ ची असल्यानं त्या काळात जाऊन ते लेख वाचावे लागणार हा अंदाज ही होता.. काही लेख मनाला भावून गेले.. तर काही डोक्यावरून गेले.. 

पहिलाच 'प्रेमाची रीत' हा जर्मनीत असताना आलेल्या स्पर्शाच्या अनुभवांवरचा लेख.. इरावतीबाई जर्मनीत असताना त्यांना जाणवलेल्या स्पर्शाच्या, प्रेमाच्या रीती आणि नंतर भारतात परतल्यावर घडणाऱ्या मजा, निरीक्षणं, किस्से, वस्तुस्थिती यावरील सुंदर लेख.. असांकेतिक अनुभव त्या मोठ्ठ्या खुबीनं मांडतात.. हे सगळं लिहिताना विनोदाचा पदर त्यांनी कोठंच सोडला नाही.. 

एका लेखात त्यांनी एका मिशनरी ननचं व्यक्तिचित्र रेखाटलंय.. त्या ननबाई व इरावतीबाई फॅमिली कोर्ट चालवत असताना एका तरुण वेश्येची केस त्यांच्यापुढे येते.. पोलीस तिला जामिनावर सोडायला तयार नसतात.. तेव्हा ननबाई तिला आपल्या घरी पोलीस संरक्षणाखाली घेऊन जातात.. अश्या परिस्थतीत सुद्धा ढाराढूर झोपलेली ती वेश्या आणि त्या वेश्येकडं बघत रात्र जागून काढणारी ती नन.. हे ऐकल्यावर त्या बाईंना उद्देशून त्या म्हणतात, ‘बाई गं, पुढच्या जन्मी पाच पांडवांची राणी नि शंभर कौरवांची आई हो!’.. वैषयिक स्पर्शाचंच समाजकारण, राजकारण, धर्मकारण – असं सारंच त्या विनोदात किती ऐटीत, सहजगत्या गुंफलंय.. 

कधी दोन पुरुषांमधली शारीरिक हाणामारी, कधी नवऱ्यानं बायकोला मारणं, कधी अतोनात वात्सल्यानं भरलेले असे हे लेख.. त्यांच्यातलं बाईपण ह्या सगळ्या लेखात प्रामुख्यानं दिसून येतो.. मन मोकळ्या, काळाच्यापुढे चार पावलं चालणाऱ्या, नवऱ्याला ‘दिनू’ म्हणणाऱ्या आणि मुलांची ‘इरु’ ही हाक रोज ऐकणाऱ्या एक फेमिनिस्ट  पण त्याच वेळी समाजाच्या रीती जाणणाऱ्या आणि पाळणाऱ्या, समाजाशी बांधल्या गेलेल्याही एक समाजशास्त्रज्ञ.. एका लेखात, पंढरीच्या वाटेवर अडाणी बायांसोबत पायी पायी चालताना, त्यांच्यातीलच एक होऊन त्यांच्या संसारातील व्यथा जाणून घेताना ही विदुषी लेखिका दिसते.. ज्या सहजतेनं त्यांनी ह्या अडाणी बायकांना आपलंस केलं त्याच सहजतेनं त्यांनी जर्मन आजीचा मुका स्वीकारला होता.. 

...आणि शेवटचा लेख 'परिपूर्ती'.. स्वतःची सामाजिक ओळख.. महर्षींची सून.. सुप्रसिद्ध प्राध्यापकांची पत्नी.. सुविद्य स्त्री ते कॉलेज मध्ये जाणाऱ्या कर्व्यांनी आई.. अशी परिपूर्ण ओळख म्हणजे जीवनाची परिपूर्ती.. असं त्या लिहितात.. 


-मी मधुरा.. 

************************************************

४८. विश्वस्त.. वसंत वसंत लिमये.. 



विश्वस्त.. वसंत वसंत लिमये यांची चित्तथरारक ऐतिहासिक रहस्यमय कादंबरी.. मुखपृष्ठावरील मोरपीस पाहिल्यावर हा विश्वस्त कृष्ण तर नसेल ना? हा विचार मनात आला पण त्याही पेक्षा जास्त लक्ष वेधून घेतलं ते लेखकाच्या नावानं!.. 'वसंत लिमये' म्हणजे मराठीतील 'डॅन ब्राउन' इति गुगल.. आणि म्हणे पुस्तकाचा ट्रेलर असणारं मराठीतील हे पाहिलंच पुस्तक.. ट्रेलर पाहून ह्या विश्वस्ताबद्दलची उत्सुकता जास्तचं वाढली.. हे पुस्तक लिहायला म्हणे साडेचार वर्ष लागली.. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग करणारा, मुंबई आय.आय.टी. तुन बी.टेक. झालेला हा अवलया पक्का भटक्या आहे.. पुस्तक लिहिण्यापूर्वी तो त्या भागात जाऊन भटकून येतो.. असो.. तर इतिहासात घडलेल्या घटना, काही ऐतिहासिक पुरावे, आजूबाजूचं साध्याच वास्तव ह्या सत्यांवर आधारित लिहिलेलं हे काल्पनिक कथानक.. द्वापार युगापासून सुरु झालेलं हे कथानक चाणक्य, मेहमूद गझनी, सरदार पटेल असा प्रवास करत वर्तमानात म्हणजे २०१७ सालात पुण्याच्या कॅफेत येतं.. प्रत्येक युगातील थरारक प्रवास वाचकाला नक्कीच खिळवून ठेवतो..  

कथानाकाचा पाया आहे श्रीकृष्णाची बुडालेली द्वारका!.. द्वारका बुडाली तर तिच्या वैभवाचं काय झालं? जर ते बुडालं असेल तर ते कुठं असेल? ते कुणाला खरंच मिळू शकेल का? द्वारकेचा 'विश्वस्त' श्रीकृष्णाची त्या विषयी काही योजना होती का?.. असेल तर तर ती पूर्ण झाली का?.. विश्वस्त आला कि वारसदार आलेच.. मग कृष्णाचा वारस कोण असेल? उद्धव?.. यादवांचा संपूर्ण संहार शक्य असेल का? कृष्ण तो होऊ देईल का? यादव ह्या संहारून वाचले असतील तर ते सध्या कुठं असतील? काय करत असतील?.. अशा अनेक गूढ अर्थातच काल्पनिक शंकांवर हे कथानक गुंफलं आहे.. 

पाचशे वीस पानांची ही मोठ्ठी कादंबरी वाचकाला नक्कीच खिळवून ठेवते.. टेबलाच्या, भिंतीच्या रंगापासून ते सजावट पर्यंतचे डिटेल्स कधी कधी कंटाळवाणे होऊ शकतात.. तसेच काही संदर्भ नसते तरी चालले असते असं वाटलं.. स्कॉटलंड मधील प्रसंग वाचताना प्रवासवर्णन वाचतो आहोत कि काय असं वाटून गेलं.. काही पात्रांची ओळख करून देण्यासाठी अख्ख प्रकरण खर्ची घातलंय.. वाचताना खटकत नाही पण खरंच ह्याची गरज होती का हा विचार नक्कीच मनात येतो.. 

सध्याचा एक प्रबळ राजकीय पक्ष, त्या पक्षाला पूरक असलेली संघटना, त्या संघटने मागचे विचार, आणि त्या पक्षाचा प्रबळ असा नेता 'वाघा'..  त्या नेत्याची राजकारणाची समज, त्याचे प्रचार तंत्र, आणि इतर पात्रांच्या तोंडून त्याचं होत असलेलं कौतुक.. आणि नंतर हा 'वाघा' कादंबरीचं एक पात्रच बनून जातो.. इतकं कि 'वाघा'च श्रीकृष्णाचा 'निर्मोही' आणि 'सत्प्तात्र' वारसदार बनतो.. 

मला 'विश्वस्त' कादंबरी वाचताना मजा आली.. पण 'खजिन्याचा शोध' कथानक असणारी 'मुरलीधर खैरनार' यांची 'शोध' ही कादंबरी नक्कीच उच्च दर्जाची आहे असं मला वाटतं.. 


-मी मधुरा.. 

************************************************

Monday, February 27, 2023

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं ४२ ते ४५)

 ४२. लेखक आणि लेखने.. शांता शेळके.. 



शांता शेळके.. बापरे!.. साहित्यसृष्टीतलं एक थोर व्यक्तिमत्व!.. कथा, कादंबऱ्या, समीक्षात्मक लेखन, ललितलेख, व्यक्तिचित्रणं, अनुवाद, कविता असे अनेक लेखनप्रकार हाताळणाऱ्या साहित्यिका.. परंतु कविता आणि गीतलेखन माझ्या जास्त आवडचं आणि जवळचं.. 'पैठणी' कविता तर मी जगते माझ्या आजीच्या गोधडीत.. 'गजानना श्री गणराया’ ऐकलं कि दिवस कसा मंगलमय होऊन जातो.. ‘वल्हव रे नाखवा' ऐकलं कि मन कसं आनंदानं भरून जातं.. ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?' असं म्हणत कुठल्याही संकटाला भिडायला तयार.. 'ऋतू हिरवा ऋतू बरवा' ऐकलं कि कसं मोहरून जायला होतं.. 

'शांता शेळके' माझ्या पन्नास पुस्तकांच्या वाचनात नाहीत असं कसं शक्यय.. त्यांचं 'लेखक आणि लेखने' वाचून बघ हा पुस्तकपेठच्या अनघा काकूंचा सल्ला.. मराठी साहित्यात वेळोवेळी ज्या लक्षणीय कलाकृती निर्माण झाल्या त्या संबंधीचं त्याचं हे लेखन.. स्वातंत्रपूर्व काळ ते १९८० पर्यंतच्या काळातील कथा, कादंबरी, ललितलेख, संकलन, कविता अश्या विविध साहित्याचा ह्यात समावेश आहे.. वेगवेगळ्या वैशिष्ठपूर्ण पुस्तकांविषयी त्या इथं वाचकांशी रसाळ गप्पा मारतात..  पुस्तकाच्या प्रास्ताविकात त्या म्हणतात, "पुस्तकाने दिलेला कलात्मक आनंद कुणाबरोबर तरी वाटून घेतल्याखेरीज तो आपण स्वतःही पुरतेपणी उपभोगला आहे असं मला वाटत नाही".. आणि हे मला तंतोतंत पटलं.. मला ही पुस्तक वाचून झालं कि त्या पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केल्याशिवाय चैन पडत नाही.. ह्या लेखनांना त्या 'आस्वादक समीक्षा' असं संबोधतात.. 

'लेखक आणि लेखने' मधील पहिलं पुस्तक 'दत्तो अप्पाजी तुळजापूरकर' यांचं 'माझे रामायण'.. १९२७ साली प्रकाशित झालेलं हे एक आत्मकथन.. आत्मकथन ह्या लेखनप्रकारात अजुनी एका पुस्तकाचा समावेश आहे - 'दया पवार' यांचं 'बलुतं'- वयाच्या चाळीसाव्या वर्षी केलेलं हे आत्मकथन.. 'फकिरा' ही 'अण्णाभाऊ साठे' यांची दलित जमातीचं वास्तव्य दाखवणारी कादंबरी.. 'मनोहर शहाणे' यांची 'धाकटे आकाश' ही विकलांग मधुची कथा..  'बाळकृष्ण प्रभुदेसाई' यांची कोकण पार्श्वभूमी असलेली 'जहाज' ही कथा.. 'पाचोळा' 'बोराडे' यांची शिंप्याच्या आयुष्यावरील कथा.. 'वसंत आबाजी डहाके' यांचा 'योगभ्रष्ट' कथासंग्रह.. अश्या विविध कथा-पुस्तकांचं समीक्षण आहे.. 

त्याचबरोबर 'निशब्द शारदा' हे मराठी रंगभूमी आणि मराठी संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या पत्रांचं 'हरिभाऊ मोटे'नी केलेलं संकलनात्मक पुस्तक.. 'आठवणीतल्या कविता' स्वातंत्र्यपूर्व काळातील कवितांचं संकलन.. तसेच 'नरहर कुरुंदकर' यांचा 'पायवाट' समीक्षात्मक लेखांचा संग्रह.. तर 'मुदगंध' 'इंदिरा संत' आणि 'आदिकाळोख' 'गुरुनाथ धुरी'यांचे  ललितलेख संग्रह यांचे समीक्षण आहे.. 'आदिमाया' 'विं दा करंदीकर', 'पंखपल्लवी' 'कवी निकुम्ब' यांच्या कविता संग्रहावर भाष्य आहे.. हे वाचून कविता कशी वाचायची ह्याचा थोडाफार अंदाज आला.. 'कवितारती' ही 'विजया राजाध्यक्ष' याची काव्यसमीक्षा.. 'गीतयात्री' 'माधव मोहोळकर' यांनी हिंदी चित्रपट गीतांचा अनेक अंगानी घेतलेला वेध.. अशी विविधांगी, विविधरंगी पुस्तकांबद्दल वाचायला मिळालं.. 

ह्यातील चटका लावून गेलं ते 'चोरलकाठ'.. 'भालचंद्र राजाराम लोवलेकर' उणेपुरे ३४ वर्षाचं आयुष्य लाभलेला स्वातंत्रपूर्व काळातील कवी.. आणि त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला त्यांचा कथासंग्रह 'चोरलकाठ'.. त्यांचा जीवनपट, त्यांच्या तारुण्यसुलभ कविता यांचा समावेश ह्या पुस्तकांत आहे.. 

शांताबाईंचं असं जरी हे पुस्तक नसलं तरी त्यांची लेखनवैशिष्ठ्य इथंही जाणवतात.. 


-मी मधुरा.. 

************************************************

४३. व्यासपर्व.. दुर्गा भागवत.. 



'व्यासपर्व'.. 'महाभारत' महाकाव्यातील व्यक्तिरेखा लिहिण्यामागचा व्यासांचा विचार म्हणजे 'व्यासपर्व'.. महाभारतातील व्यक्तिरेखांची असणारी पारंपारिक ओळख पुसून टाकणारा वेध म्हणजे व्यासपर्व.. महाभारत महाकाव्याचा असा आढावा घ्यावा तर तो दुर्गाबाईंसारख्या विदुषींच!.. सत्प्रवृत्तीच्या युधिष्ठिर-कृष्णापासून ते खलप्रवृत्तीच्या दुर्योधन-अश्वत्थाम्यापर्यंत, वैरागी प्रवृत्तीच्या भीष्म-विदुर पासून ते कुलवधू कुंती-द्रौपदीपर्यंत सर्व व्यक्तिरेखा आणि त्यांच्याद्वारे मानवी भावविश्वाचा रचलेला हा महापट व्यासांनी काय कौशल्यानं लिहिलाय हे दुर्गाबाई लिलया दाखवून देतात..

महाभारत म्हटलं कि कौरव-पांडव, त्यांच्यातील भाऊबंदकी, द्रौपदीचं वस्त्रहरण, पांडवांचा वनवास, युद्ध, श्रीकृष्णानं सांगितलेली गीता थोड्याफार फरकानं असं चित्र उभं राहतं.. यातील ज्ञानावर तत्वज्ञानावर बरीच पुस्तकं लिहिली गेली.. मृत्युंजय, युगंधर सारख्या पुस्तकांतून त्या व्यक्तिरेखेच्या नजरेतून संपूर्ण महाभारत विषद केलं गेलं.. पण 'व्यासपर्व' हे त्या सर्वांपेक्षा वेगळं ठरतं.. ह्या महापटातील दहा व्यक्तिरेखांवर दुर्गाबाई त्यांच्या दृष्टीकोनातून परिक्षण करत व्यासांच्या मनातील व्यक्तिरेखेपर्यंत पोचायचा प्रयत्न करतात..  

तसंच, महाभारत म्हटलं की समोर येतं ते समाजशास्त्र.. आणि मानवी व्यवहार.. प्राचीन इतिहास, भारतीय संस्कृती याचा वेध महाभारतातून अभ्यासकांनी घेतलाय.. किंबहुना अशा प्रत्येक अभ्यासाचा महाभारत हा आधार राहिलाय.. कुणाला गीतेच्या अनुषंगानं तो धर्मग्रंथ वाटतो तर कुणाला त्यातलं नाट्य भावतं.. कुणाला राजकारण तर कुणाला नीतीशास्त्र.. प्रस्तावनेची सुरुवात 'त्या भारतीय विचार-विमर्षाच्या विश्वात महाभारताचा स्वीकार किंवा अ-स्वीकार का झाला असावा?' हे सांगत करतात..  त्या म्हणतात, “काव्यसमीक्षेचे प्रतिकूल अंग डावलून, अन्य यशोदायी धोरणांनी महाभारताचा अर्थ धोरणी तत्त्वज्ञांनी, पंडितांनी व राजकारणपटूंनी स्वतःच्या आवडीच्या जीवनक्षेत्राच्या समर्थनासाठी विविध प्रकारे लावला. त्यामुळे इतर अनेक क्षेत्रे उजळली. विचारांचे क्षितिज रुंदावले. संस्कृतीच्या कक्षा वाढल्या. परंतु त्यातले काव्यमय भाव मात्र झाकोळून गेले.”.. आणि म्हणूनच त्यांना महाभारतातील काव्य, व्यासांची लेखनशैली ह्यावर भाष्य करावंसं वाटलं असेल.. ११० पानी पुस्तकं, त्यातील पहिली २० पानं प्रस्थावना त्यात खूप अवघड अलंकारित मराठी..  

‘व्यासपर्व’मध्ये दुर्गाबाईंनी टिपलंय ते महाभारताचं हे काव्यमय आणि तत्सम भावांचं, रंगांचं वैशिष्ट्य.. एकेका व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवत.. कृष्णापासून सुरू होणारा हा प्रवास द्रौपदी या एकमेव स्त्री व्यक्तिरेखेपाशी येऊन थांबतो.. एकेका व्यक्तिरेखेसाठी योजलेले शीर्षकच मुळी वाचकाशी बोलू लागते – 'पूर्णपुरूष' अर्थात कृष्ण, 'मोहरीतली ठिणगी' द्रोण.. यात एकलव्य प्रामुख्यानं येतो.. 'कोंडलेले क्षितीज' अश्वत्थामा, 'व्यक्तिरेखा हरवलेला माणूस' दुर्योधन, 'एकाकी' कर्ण, 'परीकथेतून वास्तवाकडे' अर्जुन, 'मुक्त पथिक' युधिष्ठीर, 'अश्रू हरवल्यावर' भीष्म, 'माणसात विरलेला माणूस' विदुर आणि 'कामिनी' द्रौपदी.. कृष्ण ते कृष्णा ह्या प्रवासात धृतराष्ट्र, नकुल, सहदेव, भीम, कुंती भेटत राहतात.. 

थोडक्यात 'व्यासपर्व' म्हणजे एक मुक्त चिंतन म्हणायला हरकत नाही.. 


-मी मधुरा.. 

************************************************

४४. प्रेमातून प्रेमाकडे.. डॉ. अरुणा ढेरे.. 


'प्रेमातून प्रेमाकडे'.. दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या, वयाच्या त्या त्या टप्प्यावरच्या मैत्रीचा ज्येष्ठ कवयित्री-लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांनी घेतलेला वेध.. स्त्री-पुरुषांमधील मैत्र  अलगदपणे उलघडत त्यांच्यातील माणूसपणाचा तळ शोधण्याचा त्यांनी केलेला प्रामाणिक प्रयत्न.. स्वामी विवेकानंद-भगिनी निवेदिता, गोपाळ कृष्ण गोखले-सरोजिनी नायडू, गांधीजी-सरलादेवी चौधुराणी-मेडेलिन स्लेड(मीरा बेन), रविंद्रनाथ टागोर-अन्नपूर्णादेवी-कादंबरीदेवी, सुभाषचंद्र बोस-एमिली, सेनापती बापट-अॅना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-फॅनी, अॅनी बेझंट, श्रीधर व्यंकटेश केतकर-नागूताई, हरी नारायण आपटे-काशीबाई कानिटकर, बाबुराव गोखले या दिग्गजांच्या आयुष्यातील उत्कट मैत्रीच्या भावबंधांचे नाजूक पदर हळूवारपणे डॉ. ढेरे यांनी उलगडून दाखविले आहेत.. 

‘प्रेमातून प्रेमाकडे’ हा पहिला लेख समर्पित आहे तो गुरु-शिष्याच्या एका जोडीला.. स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांना.. गुरू-शिष्यांमधला निखळ, निर्मळ, परस्परांविषयीच्या अतीव आदर आणि विशुद्ध स्नेहभाव यांनी जोडलं गेलेलं हे नातं.. लंडनमध्ये स्वामीजींचं व्याख्यान ऐकून प्रभावित झालेली मार्गारेट १८९८ मध्ये ब्रह्मचारिणी व्रताची दीक्षा घेऊन आपला देश, धर्म, संस्कृती मागं सोडून 'निवेदिता' या नावानं या देशात आली, इथेच रमली आणि आपल्या गुरुचं चिरंतन स्मारक आपल्या कार्यातून उभं केलं.. 

भारतसेवक समाजाची संकल्पना मनाशी बाळगून राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीचे स्वप्न पाहणारे, समाजाच्या उत्कर्षाची साधना करणारे थोर लोकसेवक गोपाळ कृष्ण गोखले यांच्या कार्याला बंगालमध्ये, तिथल्या विद्वानांच्या वर्तुळात मानाचे स्थान होते.. इथेच त्यांना भगिनी निवेदिता, सरोजिनी नायडू आणि सरला रॉय भेटल्या.. 'मैत्र जीवांचे' ह्या लेखात ह्या सौहार्दाच्या मित्रत्वाबद्दल लिहिले आहे.. भगिनी निवेदितांच्या निधनानंतर श्रद्धांजलीच्या भाषणात आपल्या भावना व्यक्त करताना गोखले म्हणाले  कि ‘सृष्टीतल्या एखाद्या शक्तीचा साक्षात्कार व्हावा तशी त्यांची भेट असे’.. तर ‘स्नेहस्निग्ध आश्वासन’ या लेखात गोखले व सरोजिनी नायडू यांच्यातल्या  स्नेहभावाविषयी वाचायला मिळते.. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशसेवेसाठी सर्वस्व पणाला लावलेल्या उभयतांना कसोटीच्या काळात रक्ताच्या नात्यापलीकडच्या स्नेहसंबंधातून कसं बळ मिळालं याचा प्रत्यय येतो.. 

‘एका आध्यात्मिक प्रेरणेचा उदयास्त’ या लेखात महात्मा गांधी आणि त्यांची आध्यात्मिक पत्नी सरलादेवी चौधुराणी यांच्या मैत्रीतल्या नात्यावर डॉ. ढेरेंनी प्रकाश टाकला आहे.. परस्परविरोधी स्वभावामुळं नि राजकीय मत भिन्नतेमुळं त्यांच्या एकत्र येण्यातच दुराव्याची नांदी होती.. त्या क्रांतिकारी विचारांच्या, स्वयंभू तेजानं  तळपणाऱ्या तर गांधीजी सत्य-अहिंसेचा मार्ग चोखाळणारे.. एवढा विरोधाभास असूनही या मैत्रीची उत्कटता एवढी होती की ते आध्यात्मिक पतिपत्नीच्या नात्यापर्यंत पोचले.. ‘उत्कट प्रेमभक्ती’ या लेखात गांधीजी आणि मेडेलिन स्लेड (मीरा बेन) यांच्यातल्या नात्याविषयी वाचायला मिळतं.. ब्रिटनमधल्या गर्भश्रीमंत घरात जन्माला आलेली ही मुलगी गांधीजींचं चरित्र वाचून भारावली.. ती भारतात आली त्यावेळी ती तेहतीस वर्षांची तर गांधीजींनी वयाची साठी पार केली होती.. दांडीयात्रेत सामील होण्याचं भाग्य लाभलेल्या आणि गांधीजी या व्यक्तीमध्ये गुंतलेल्या मेडेलिनाचे मानसिक गुंते उलगडून दाखवत तिच्या आणि गांधीजींच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंचं दर्शन लेखिकेनं घडविलं आहे.. 

‘नलिनी- द लोटस फ्लॉवर’, ‘मानसलक्ष्मी’ आणि ‘मावळतीची रानभूल’ या तीन लेखांमधून विश्वकवी रविंद्रनाथ टागोर यांना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेल्या अन्नपूर्णा तर्खड, त्यांची भावजय कादंबरीदेवी आणि व्हिक्टोरिया ओकॅम्पो यांच्याबरोबरच्या तरल आणि उत्कट मैत्रीच्या नात्याविषयी अरुणा ढेरेंनी लिहिले आहे.. या मैत्रीच्या प्रवासात त्यांच्या मैत्रिणींचे आणि पत्नीचे आयुष्य कोणत्या वळणावर येऊन उभे राहिले, याचे दर्शन घडविताना त्यांच्या प्रतिभेतील आणि व्यावहारिक आयुष्यातील अनेक पापुद्रे डॉ. ढेरेंनी सूक्ष्मपणे उलगडून दाखविले आहेत.. 

‘वादळी रणातलं नाजूक नातं’ ही सुभाषचंद्र बोस आणि एमिली शेकेल यांच्या मैत्रीची कथा.. स्वातंत्र्यलढ्यातील वादळांनी लटेपून गेलेल्या आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयानं झपाटलेल्या सुभाषबाबूंच्या जीवनात या मैत्रीचं नेमकं स्थान काय होतं याविषयी या लेखात वाचायला मिळतं.. ‘एका हरीण पाडसाची गोष्ट’ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना लंडनमध्ये भेटलेली फॅनी यांच्या मैत्रीची कथा.. विचारांशी आणि जीवनध्येयांशी जोडल्या गेलेल्या या मैत्रीचं स्वरूप किती वेगळं, समृद्ध, संपन्न आणि प्रगल्भ होतं हे वाचताना जाणवतं.. ‘माझा की जीव भाजला’ या लेखात सेनापती बापट आणि त्यांच्या वीरवृत्तीवर, साहसावर प्रेम करणारी त्यांची रशियन मैत्रीण अना खोस यांच्यात निर्माण झालेल्या भावबंधांचे दर्शन घडतं.. चार्ल्स ब्रॅडलॉ आणि अॅनी बेझंट यांच्या मृत्युंजयी मैत्रीविषयीही या पुस्तकात वाचायला मिळतं.. 

‘उजेड आणि अंधार’ या लेखात ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर आणि नागूताई जोशी यांच्या न जुळलेल्या मैत्राविषयी लेखिकेनं लिहिलं आहे.. नागूताईंचा नकार जड अंतःकरणानं पचविलेल्या केतकरांनी इंग्लंडमध्ये भेटलेल्या एडिथ कोहन यांच्याशी लग्नाचा निर्णय घेतला.. ‘घरगुती वासाचा’ हा लेख ह.ना. आपटे व काशीबाई कानिटकर यांच्यातल्या निरभ्र हृदयसंवादा विषयी खूप काही सांगणारा आहे.. 

अश्या या थोर स्त्री-पुरुषांच्या नाजूक व अवघड अशा आंतरिक भावसंबंधांचा मागोवा घेणं ही एक जोखीमच होती.. आपल्या मनावर, विचारांवर ठसा उमटवणारे हे सारे  थोर पुरुष.. त्यांच्याकडं अश्या दृष्टीनं पाहणं, वाचणं, लिहिणं ही सोपी गोष्ट नाही.. डॉ. अरुणा ढेरेंनी आपल्या संशोधन-अभ्यासातून यशस्वीपणे हे  पार पाडले आहे.. 


-मी मधुरा.. 

************************************************

४५. "शाळा".. मिलिंद बोकील..


शाळा.. मिलिंद बोकील यांची अतिशय गाजलेली कादंबरी.. ह्या कथानकावर आधारित 'शाळा' ह्या मराठी चित्रपटातील गाणी सोडली तर आवडावं असं काहीच नव्हतं.. त्यामुळं पुस्तकाकडून फारश्या अपेक्षा नव्हत्याच.. शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील हळवा कोपरा असतो असं म्हणतात.. तसं मला शाळेबद्दल अतीव प्रेम, हळवा कोपरा वैगरे असं काही नव्हतं.. शाळेच्या शेवटच्या दिवशी सुद्धा शाळा संपणार पेक्षा मैत्रिणी बरोबर नसणार ह्याची खंत जास्त होती.. त्यामुळं कोणत्या भावनिक ओढीसाठी हे पुस्तक आवर्जून वाचावं असं ही नव्हतं.. पण वाचून पहायला काय हरकत आहे म्हणून 'शाळा' हातात घेतलं.. 
 
मलपृष्ठावरील एका वाक्यानं मात्र माझा लगेच ताबा घेतला.. "शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.." .... अगदी अगदी.. माझ्या ही मनात रोज एक वेगळीच शाळा भरायची.. त्यात गणित नसायचं.. सन सनावळी नसायच्या.. ना भाषेचे नियम असायचे ना नियमात गुरफटलेलं शास्त्र.. ना PT ची परेड ना सामाजिक शिक्षणाचं भान.. मुक्त संचार असलेलं एक प्रांगण मनात असायचं.. अशी शाळा एक दिवस तरी असावी असं वाटायचं.. 

पहिली ३०-४० पान वाचायला खूप जड गेली.. कदाचित भाषेमुळं असेल.. पण त्या नंतर एका दमात पुस्तक वाचून काढलं.. कधी मी माझ्या शाळेतल्या बाकावर जाऊन बसले माझं मलाच कळालं नाही.. माझ्या वर्गात मला गोष्टीतली सगळी पात्र ही दिसायला लागली.. चिवचिवणाऱ्या चिमण्या.. स्टायलिश आंबेकर.. आपल्या हिरोची धडकन शिरोडकर.. पासून ते जोशी, चित्रे, बॅक बेंचर्स मुलं.. सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडत होतं.. हेड मास्तर अप्पा, मांजरेकर सर, बेंद्रे मॅडम, गणोबा शिपाई सगळे अवती भोवती वावरत होते.. 

मिलिंद बोकीलांच्या शाळेतील विद्यार्थी कधी झाले माझं मलाच कळलं नाही.. अख्ख ९ ब चे वर्ष मी परत जगले.. काही जगलेले.. आणि काही जगायचे राहिलेले... 


-मी मधुरा.. 

************************************************


Sunday, January 29, 2023

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं ३७ ते ४१)

 ३७. स्मृतिचित्रे.. लक्ष्मीबाई टिळक.. 


रेव्हरंड टिळक अर्थात नारायण वामन टिळक.. एकोणिसाव्या शतकातील मराठीतील प्रसिद्ध कवी.. त्यांच्या पत्नीनं लक्ष्मीबाईनी लिहिलेलं अविस्मरणीय आत्मकथन म्हणजे स्मृतिचित्रे.. हिंदू संस्कारांमध्ये वाढलेली एक स्त्री विक्षिप्त पतीला साथ देताना कशी बदलत जाते आणि स्वतःचा कसा विकास करत जाते याचा उत्तम आलेख म्हणजे स्मृतिचित्रे.. 

१८५७चा बंडाचा काळ.. एका महाराचं पाणी अंगावर उडाल्यानं विटाळ झाला म्हणून कडक सोवळं पाळणारे वडील.. ह्या सोवळ्याच्या जाचात अडकलेलं लक्ष्मीबाईंचं बालपण.. कोणाचीही घुसमट व्हावी, विकृती निर्माण व्हावी असं वातावरण.. पण लक्ष्मीबाईनी ते सर्व सहजतेनं स्वीकारलं ते केवळ त्यांच्या खेळकर आणि आनंदी स्वभावामुळं.. त्या स्वतःच्या स्वभावाचं वर्णन मनानं व शरीरानं चिवट असं करतात.. जातीभेदाच्या भक्कम भिंती, त्यात वडिलांचं कडक सोवळं, जबाबदारीपासून भरकटलेलं त्यांच वागणं.. त्यामुळं लक्षमीबाईंना त्यांच्या आत्यानं सांभाळलं.. आणि पुढं एक गोत्री असणाऱ्या टिळकांशी विवाह करण्यासाठी आत्यानं त्यांना दत्तक ही घेतलं.. लग्न झाल्यावर त्यांच्या परिस्थितीत काहीच फरक पडला नाही.. 'सासुरवास' ह्या प्रकरणात त्यांनी सासऱ्यांचा लहरीपणा आणि झालेला जाच ह्याचं चित्रण केलंय.. त्यांच्या सासूबाई कविता करायच्या, बायबल वाचायच्या, शिवण टिपण करायच्या.. हे सासऱ्यांना आवडत नसल्यानं त्यांनी त्यांचा खूप छळ केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू ही झाला.. लक्ष्मीबाईंचे कधी सासरी कोड कौतुक झालं नाही.. ‘मोलाची दळणी करा नि लुगडी घ्या, बांगड्या भरा’ इति सासरे.. नवऱ्यानं कामात केलेली थोडी मदत हाच काय तो ओलावा.. असं त्या लिहितात.. लाडू लपवून ठेवून सुनेवर केलेला चोरीचा आरोप, मुलात आणि सुनेत भांडण लावण्याचा केलेला प्रयत्न.. असे बरेच कटू प्रसंग त्या लिहितात.. पण कुठंच सासऱ्यांबद्दल अपशब्द वापरत नाहीत.. 

कविता करणारे, कवितेत स्वतःला विसरणारे, पटकन दुसऱ्यावर विश्वास टाकणारे, भोळे मालमनाचे टिळक.. त्यामुळं येणाऱ्या अनेक अडचणींना लक्ष्मीबाईंना तोंड द्यावे लागे.. टिळकांच्या स्वभावाचे अनेक पैलू पुस्तकात दिसतात.. बोलता बोलता कविता करणारे टिळक, रागात-चिडल्यावर कविता करणारे टिळक उत्तम कीर्तनकार ही होते.. पैसा जोडावा, साठवावा हा स्वभाव नसल्यानं कायमच गरिबीच्या छायेत असणारा संसार संभाळताना होणारी दमछाक, होणारी भांडणं यांचं खुमासदार वर्णन त्यांनी केलं आहे.. लक्ष्मीबाईंनी संसारात न गुरफटता शिकावं, मोठठं व्हावं असं टिळकांना वाटे.. टिळक फक्त दोनच गोष्टीना घाबरत.. एक देव आणि दुसरे लक्ष्मीबाई.. 

टिळकांचं धर्मांतर.. लक्ष्मीबाईंच्या जीवनातील खडतर काळ.. निर्जीव ओंडक्यासमान झालेलं त्यांचं आयुष्य.. त्यांचा कशावरच ताबा नसल्यानं त्या वेड्या होतील की काय अशी त्यांच्या बहिणीला वाटणारी भीती.. पण त्या काळात त्यांना तारलं ते त्यांच्या माहेरच्या माणसांनी आणि त्यांच्या  दुःखाला वाट मिळाली ती त्यांच्या कवितानं.. कालांतरानं नवराबायकोत पत्रव्यवहार सुरू झाला.. धर्मांतरानंतरची त्यांची झालेली भेट त्यांनी भावस्पर्शी शब्दात मांडलीय.. ह्या आत्मचरित्रात अनेक लोकांची गर्दी दिसून येते.. अनेक नावं अधून मधून डोकावत राहतात.. सुरुवातीला मी नावांचा संबंध लावायचा प्रयत्न केला पण तो नंतर सोडून दिला.. 

लक्ष्मीबाईंचं धर्मांतर.. टिळकांच्या बरोबर वावरताना अगदी टप्प्याटप्पानं, सहजपणे त्यांनी धर्मांतर केलं असं जाणवलं.. त्यांनी स्वतःमध्ये घडवलेला बदल, त्यांची विचारप्रक्रिया  ‘दोघांचा एक संवाद’ या प्रकरणात वाचायला मिळतो.. पक्षी, प्राणी ह्यामध्ये जसा भेद नाही तास माणसांत पण नसावा.. ह्या विचारानं त्यांनी सगळ्या समाजाच्या हातचं खायला प्यायला हरकत घेतली नाही.. बदलत्या विचाराबरोबर बदलत जाणारा संसार आणि बदलत जाणारा समाजीक विचार याचं समर्पक चित्रण पहायला मिळतं.. त्याच्या उभयतांच्या स्वभावाबद्दल ‘फिकिरीची माळ माझ्या गळ्यात घातली व बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली’ असं त्या लिहितात.. सेवाभाव, दुसऱ्यांना मदत करणं, येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी सदैव घर खुलं असणं, मानापमान-कीर्ती ह्याची पर्वा नसणं असे अनेक पैलू दिसून येतात..

'स्मृतिचित्रे'ची खासियत म्हणजे टिळकांच्या कवितांची, त्यांनी रचलेल्या अभंगांची लयलूट.. त्याचं ख्रिस्त धर्माचं लिखाण वाचताना त्या लिखाणावर हिंदू धर्माची पकड जाणवते.. त्यांनी सांगितलेला ख्रिस्त धर्म का हिंदी ख्रिस्त धर्म असल्यानं टिळक ख्रिस्त धर्मच्या मुख्य प्रवाहापासून लांब राहिले.. ‘ख्रिस्तायन’ हा ग्रंथ पूर्ण करण्याचा ध्यास टिळकांनी घेतला होता.. पण त्यांच्या मृत्यूनंतर तो अपुरा ग्रंथ लक्ष्मीबाईंनी पूर्ण केला.. टिळकांनी ‘ख्रिस्तायन’चे साडेदहा अध्याय लिहिले तर लक्ष्मीबाईनी तो ग्रंथ पुढे चौसष्ठ अध्याय लिहून पूर्ण केला.. एका अशिक्षित बाईनं हे काम अशा प्रकारे पूर्ण करावं.. ही केवढी मोठ्ठी विद्वत्ता!!

स्वतंत्र बाण्याच्या लक्ष्मीबाईंनी ठामपणे निर्णय घेत, कलंदर पतीशी, गरिबीशी झगडत स्वतःची बौद्धिक, अध्यात्मिक प्रगती केली ह्याला तोड नाही.. ‘स्मृतिचित्रे’ म्हणजे  प्रांजळपणे व पारदर्शकपणे लिहिलेल्या आठवणी..  


-मी मधुरा.. 

************************************************

३८. दास डोंगरी राहातो.. गो. नी. दांडेकर.. 



दास डोंगरी राहातो.. एका लोकोत्तर व्यक्तीमत्वाचा शोध घेणारं 'गो. नी. दांडेकर' यांचं हे अनोखं पुस्तक!.. श्रीसमर्थांचं लीळाचरित्र!!.. रामदासाचं चरित्र सांगणारी एक  रसाळ कादंबरी.. 

पुस्तकाची सुरुवात होते ती अजुनी अंगाची हळद न निघालेल्या आणि नाशिकच्या रामाला भेटण्याची आस असणाऱ्या नारायणाच्या प्रवासानं!.. बोहल्यावर चढेपर्यंत तुझं सगळं ऐकेन हे नारायणानं आईला दिलेलं वचन आणि पुढं 'सावध रे सावध' या शब्दांनी त्याचं बदललेलं आयुष्य.. मनात वसणारा राम मंदिरातल्या मूर्तीत न दिसल्यानं कासावीस झालेला नारायण रामाचा शोध घेत नाशिकात राहतो.. हनुमानाच्या प्रेरणेनं नारायणाचा रामदास होतो.. मग धर्मशाळेत राहून, माधुकरी मागून, प्राचीन ग्रंथांचं वाचन अभ्यास करत त्याच वेगळं जीवन सुरु होतं.. यतींसमवेत शास्त्रचर्चा, मुनींशी परमार्थचिंतन, एकांतात रघुवीरस्मरण, प्रसंगी लहानमुलांबरोबर हास्यविनोद आणि त्यातून समाज प्रबोधन असा दिनक्रम.. नारायण ते रामदास ते रामदासस्वामी ते समर्थ असा हा त्यांचा प्रवास त्यांच्याच श्लोकातून, ओव्यांतून, काव्यांतून उलगडत जातो.. 

संसारात राहून परमार्थ कसा करावा हे सांगणारे समर्थ, स्वराज्याच्या पायाबांधणीत तितक्याच ताकतीने उभे होते.. निश्चयाचा महामेरू। बहुजनास आधारु। अखंड स्थितीचा निर्धारु। श्रीमंत योगी।।.. असे राजांबद्दल काढलेले उद्गार असतील किंवा मराठा तितुका मिळवावा।आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा।.. महाराष्ट्रधर्म, त्याचा कुलाचार सांगणं असो.. शिवाजी महाराज आणि रामदासस्वामी यांच्यातील प्रसंग गोनीदांनी खूप छान रेखाटले आहेत..  

.. पण.. हे चरित्र अपूर्ण वाटते.. त्यांचा दासबोध लिहिण्यापर्यंतचाच प्रवास ह्यात आहे.. सज्जनगड आणि आणि त्यांचे शेवटचे दिवस नसल्याची रुखरुख वाटते.. 


-मी मधुरा.. 

************************************************

३९. अपूर्वरंग ४ जपान.. मीना प्रभू.. 


'पन्नास पुस्तकं' वाचन संकल्प.. पस्तीस पुस्तकं वाचून झाली तरी अजुनी प्रवासवर्णन वाचायचं राहिलंच.. पु.लं. नंतर फारशी प्रवासवर्णनं वाचलीच नाहीत.. कधीतरी एखादं दुसरं वाचलं असेल पण फारसं आवडलं नाही.. मी जसा प्रवास करायला लागले, वेगवेगळे देश फिरायला लागले तसं सुरुवातीला प्रवासाच्या टिपण्या, नोंदी नंतर प्रवासवर्णन लिहू लागले.. प्रवासवर्णन हे माहितीप्रत वर्णन असावं त्याचा शोऑफ होणार नाही ह्याची खबरदारी लिहिताना घेतली गेली पाहिजे.. आणि तेच कोठेतरी सोशल मीडियामुळं हरवताना दिसतंय.. असो.. तर डिसेंबर मधल्या भारतवारीत माझ्या गोड मैत्रिणीनं लतानं मला हे 'अपूर्वरंग ४ जपान' पुस्तक भेट म्हणून दिलं.. आणि माझी मीना प्रभूंशी ओळख झाली..   

'अपूर्वरंग' या मालिकेतील हे शेवटचं पुस्तक!.. जपान.. पूर्व आशियाचा मुकुटमणी असणारा, शून्यातून उभा राहिलेला, अध्यात्म पासून ते तंत्रज्ञानापर्यंत वावर असणारा देश म्हणजे जपान.. जपानच काय पण इतर हि पूर्वेकडील देश मी अजुनी पाहिलेले नाहीत.. त्यामुळं ह्या देशाबद्दल, आपल्या भारतीय संस्कृतीच्या जवळ जाणाऱ्या संस्कृतीबद्दल वाचण्याची उत्सुकता होतीच.. आणि मीनाताईंच्या लेखणीनं ती पुरी पण झाली.. जपलेल्या श्रद्धाळू परंपरे बरोबरच वेगानं वाढणारं तंत्रज्ञान-आधुनिकीकरण यांची सांगड घालताना जपानी माणसाची होणारी धालमेल उदाहरण देऊन त्या सहज दाखवतात.. 'साकारा'च वर्णन तर केवळ अप्रतिम.. इकडं ही चेरी ब्लॉसम पाहिला आहे पण 'साकारा' पाहायला तरी जपानला जायलाचं हवं.. काही वेळा पाल्हाळ वाटलं तरी आपण त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष फिरतोय असं ही वाटलं..

आता अपूर्वरंग मधली बाकी तीन पुस्तकं ही सवडीनं नक्की वाचेन..


-मी मधुरा.. 

************************************************

४०. वंशवृक्ष.. डॉ. एस. एल. भैरप्पा.. 
अनुवाद.. सौ. उमा कुलकर्णी.. 



डॉ. एस. एल. भैरप्पा.. जेष्ठ कन्नड साहित्यिक.. आणि 'वंशवृक्ष' ही त्यांची 'कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार (१९६६)' विजेती कांदबरी!.. सनातन धर्मपरंपरा आणि आधुनिक काळातील बदलती जीवन-मूल्ये यांतील संघर्ष आणि त्यांचे कौटुंबिक पातळीवर उमटणारे भावकल्लोळ प्रभावीपणे चित्रित करणारी अशी ही कलाकृती.. साहित्य अकादमीचा पहिला अनुवाद पुरस्कार (१९८९) आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळणारी अशी ही कलाकृती!.. मराठीतील ह्या सन्मानांसाठी 'एस.एल.भैरप्पा'नी रेखाटलेल्या भक्कम व्यक्तीरेखा आणि मूळ कादंबरीतील रसोत्कटता अनुवादातही जशीच्या तशी ठेवण्याचं कौशल्य सौ. उमा कुलकर्णींचं! 

वंशवृक्ष.. सनातन धर्म आणि परंपरेवर भाष्य करणारी तसेच आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अंतर्दृष्टी असणारी संवेदनशील कादंबरी.. बहुपत्नीत्व, विधवा पुनर्विवाह, विवाह संस्कार, वंशवृद्धी असे बहुस्तरीय कथानक असणारी १९६५ सालातील ही कादंबरी त्या काळाच्या बराच पुढचा विचार मांडणारी.. अपत्त्यावर पहिला अधिकार कोणाचा?.. पित्याचा की मातेचा? बीजाचा की क्षेत्राचा?.. महाभारतापासून उद्भवलेला हा प्रश्न डॉ. भैरप्पानी आधुनिक काळाची पार्श्वभूमी घेऊन चर्चिला आहे.. वेदविद्यापारंगत श्रीनिवास श्रोत्री-त्यांची पत्नी भागीरथम्मा-बालमैत्रीण लक्ष्मी, इतिहास संशोधक सदाशिव-नागलक्ष्मी करुणारत्ने आणि साहित्याचा प्राध्यापक राज-कत्त्यायनी नंजुंड यांच्या नातेसंबंधांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा हा प्रश्न कसाला लागतो तेव्हा भैरप्पांच्या प्रतिभेची उंची या कादंबरीत पानोपानी जाणवते.. 

वेदविद्यापारंगत श्रीनिवास श्रोत्री, इतिहास संशोधक सदाशिव आणि आधुनिक विचारमूल्ये असणारी कत्त्यायनी असे तीन जीवनप्रवाह आणि ह्या जीवन प्रवाहातील अनेक पात्रं, आणि त्या पात्रांचा असणारा स्वतःचा दृष्टीकोन, त्यांची स्वतःची मूल्ये आणि सामाजिक मूल्ये ह्यांचा हा संघर्ष.. वैयक्तिक सुखाच्या पूर्ततेसाठी परंपरेनं प्रस्थापित सामाजिक मूल्यांना आव्हान केल्यानं होणारी नैतिक कोंडी याचं हे चित्रण.. वेदविद्यापारंगत श्रीनिवास श्रोत्रीची विधवा सून कात्यायनीनं स्वतःच्या सुखासाठी आपल्या तीन  वर्षाच्या मुलाला मागं ठेवून पुनर्विवाह करणं.. इतिहास संशोधनाला मदत होईल म्हणून श्रीलंकन मुलीला सदाशिवनं द्वितीय भार्या म्हणून आणणं.. आणि श्रीनिवास श्रोत्रींची सनातन जीवनपद्धती आणि त्यांचं संन्यास घेणं.. आपल्या सुखांसाठी, महत्वाकांक्षेसाठी प्रत्येक पात्रांनी घेतलेले निर्णय त्या पात्रांना रंजक बनवतात.. 

३२२ पानांचं हे पुस्तक अक्षरशः दोन दिवसांत वाचून काढलं.. मूळ कन्नड भाषेतील हा 'वंशवृक्ष' संस्कृत, हिंदी, मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.. 


-मी मधुरा.. 

************************************************

४१. तत्वमसि.. ध्रुव भट्ट.. 
अनुवाद.. अंजनी नरवणे.. 



'तत्वमसि'.. आशयघन कविता आणि गूढ-रहस्यमयी कादंबऱ्या लिहिणारे ध्रुव भट्ट यांची 'साहित्यिक अकादमी पुरस्कार' मिळालेली अजुनी एक कादंबरी!.. ह्या शृंखलेतील त्यांची तिसरी कादंबरी.. प्रत्येक कादंबरीचा विषय वेगळा, कथानक वेगळं.. तिथं स्वतः जाऊन, राहून, अनुभव घेऊन लिहिल्यानं सत्याच्या जवळ जाणारं कथानक.. कधी गीरचं अभयारण्य तर कधी गुजरात कच्छ भागातील पाड्या.. आता तत्वमसि मध्ये काय?.. नर्मदा नदी, नर्मदेच्या खोऱ्यात राहणारे आदिवासी, परिक्रमावासी, आश्रम.. आणि गूढ रहस्य.. 

ध्रुव भट्टांच्या शिरस्तेप्रमाणे कथानायकाला ह्या ही कादंबरीत नाव नाही.. तर, विदेशात राहणारा, जन्मानं भारतीय असणारा, 'मानव संसाधन विकास' (human resource development ) ह्या विषयाचा अभ्यास करणारा असा हा तत्वमसीचा कथानायक जो आपल्या अमेरिकन प्रोफेसरांच्या सांगण्यावरून आदिवासींबद्दल संशोधन करायला भारतात येतो.. काहीसा अनिच्छेनेच.. भावनांमध्ये वाहवत न जाणारा, तर्कसंगत विचार करणारा, देव आणि धर्म ह्या भ्रामक कल्पना मानणारा, विज्ञानवादी कथानायक माँ नर्मदेच्या सानिध्यात येतो आणि सुरु होतो त्याचा त्याला अंतर्बाह्य बदलणारा रहस्यमयी अद्भुत प्रवास..  

अठरा वर्षांनी भारतात आलेला कथानायक नर्मदेच्या खोऱ्यात असणऱ्या जंगलातील आदिवासी विकास केंद्रात दाखल होतो तोच मनात आदिवासींबद्दल पूर्वग्रह घेऊन.. दगडाला देव मानणारे, नर्मदा नदीला देवी मानणारे हे अडाणी आदिवासी.. ज्यांच्याशी त्याचा काहीच संबंध नाही.. जायचं, राहायचं, संशोधन करायचं आणि उपकाराखातर एक शाळा सुरु करून त्यांना थोडं शहाणं करायचा प्रयत्न करायचा आणि अमेरिकेला परतायचं.. पण जेव्हा त्याचा आदिवासी जीवनाशी जवळून संबंध येतो तेव्हा त्याचं  आयुष्य ठवळून निघतं.. मी कोण? माझं भोवतालचं जग आणि माझी त्याच्याशी असलेली बांधिलकी कोणती? श्रद्धा असावी का नसावी? भारतीय संस्कृती म्हणजे काय? मुक्ती, पुण्य म्हणजे काय?.. असे पूर्वी न पडलेले प्रश्न त्याला पडतात.. 

एकमेकांसाठी जगणारी, तडजोड करणारी, वेळ प्रसंगी परक्यांना ही आयुष्यभरासाठी आश्रय देणारी माणसं.. उच्चशिक्षित पण केवळ आपल्या आईबाबांचा वारसा चालवण्यासाठी आदिवासी लोकांची निस्वार्थपणे सेवा करणारी सुप्रिया.. एका दुर्गम खेड्यातील शाळा बंद होऊ नये म्हणून प्रयत्न करणारे विष्णू गुरुजी आणि शाळेत येणाऱ्या उपाशी पोरांना जेवू घालणारी त्यांची पत्नी विद्या.. निराधार स्त्रियांचे रक्षण आणि पोषण करणारी कालेवाली माँ.. निःशुल्क तत्वावर लोकांचा उपचार करणारे वैद्य.. संस्कृती, धर्म आणि मानवता ह्याचे रहस्य उलगडून सांगणारे शास्त्रीजी.. तारण ठेवायला ज्यांच्याकडं काहीच नाही अश्या आदिवासीना कर्ज देणारे गुप्ताजी आणि त्याचं कर्ज फेडायला येणारे आदिवासी.. असे अनेक असामान्य लोक.. निबिड अरण्यात राहताना ह्या आदिवासींमध्ये असणाऱ्या श्रद्धा-अंधश्रद्धाच बळ देतात.. विश्वास ठेवणं, श्रद्धा असणं म्हणजे अडाणी नाही.. एकेमेकांना साथ देणारे, प्रामाणिक, परंपरेनं आखून दिलेल्या मार्गावर निष्ठेनं चालणारे आदिवासी किती खरे आहेत ह्याचा अनुभव त्याला येतो.. 

'नर्मदा परिक्रमा'.. नर्मदा परिक्रमावासी.. आणि त्यांची सेवा करणारे खोऱ्यातील आश्रम.. आणि ही संस्कृती जपून ठेवायला मदत करणारे आदिवासी.. हे सगळं पाहताना कथानायक गोंधळून जातो.. परिक्रमेमध्ये कधीतरी होणारे नर्मदेचे प्रत्यक्ष दर्शन ही त्याला अंधश्रद्धा वाटते.. 'श्रद्धा अंधश्रद्धेपेक्षा संस्कृती जपणं महत्वाचं' ह्या सुप्रियानं दिलेल्या उत्तरानं तो अजूनच भांभावून जातो आणि स्वतः अनुभव घ्यायचं ठरवतो आणि त्याला नर्मदेचं असणं जाणवतं.. नर्मदेची परिक्रमा करता करता आपणच नर्मदा होणं किंवा सगळीकडं नर्मदाच दिसणं.. म्हणजे नर्मदा ह्या तत्वाशी समर्पण.. म्हणजेच तत्वमसि.. 

'तत्वमसि' कादंबरीवरील 'रेवा' ह्या गुजराती चित्रपटाला २०१८ मध्ये राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलं आहे..


-मी मधुरा.. 

************************************************