Thursday, December 25, 2025

रुद्रप्रयाग - हरिद्वार - दिल्ली - पुणे

१४ ऑक्टोबर : रुद्रप्रयाग - हरिद्वार 
१६० कि.मी. लागणारा वेळ साधारण साडेचार तास  

सकाळी ८ वाजता ब्रेकफास्ट.. ९ च्या सुमारास हॉटेल सोडायचं.. लंच पर्यंत ऋषिकेश.. मुक्कामाला हरिद्वार.. असं आजच नियोजन.. 

चारधामांचं दर्शन झालं.. आता 'ऋषिकेश'.. 
'ऋषिकेश' - Yoga Capital of The World -  योगा टीचर झाल्यापासून माझ्या बकेट लिस्टवर असलेलं.. किमान दोन आठवड्याचा योगा रिट्रीट प्रोग्रॅम.. आणि बाजूचा एखादा ट्रेक.. पण कधी रिट्रीट प्रोग्रॅम फुल म्हणून तर कधी वेळ जमत नाही म्हणून येणं झालंच नाही..
हे होईल तेव्हा होईल.. पण आज 'मी ऋषिकेशमध्ये पाऊल ठेवणार' यानंच जाम खुश आहे..

बरोबर नऊ वाजता हॉटेल सोडलं.. आजचा पहिला स्टॉप 'देवप्रयाग'.. 
देवप्रयाग.. अलकनंदा नदीवरचा शेवटचा संगम.. ह्या संगमानंतर अलकनंदा गंगा म्हणून ओळखली जाते.. 
खळखणारी अलकनंदा आणि शांत भागीरथी यांचा संगम.. केवळ विलोभनीय!..  


डावीकडून येणारी भागीरथी - उजवीकडून येणारी अलकनंदा 

ऋषिकेश.. 
एकच्या सुमारास ऋषिकेशला पोचलो.. बस पार्किंगपासून टमटम करून 'मुनी की रेती'.. गंगा किनारी आलो.. 
पायऱ्या उतरून गंगेच्या घाटावर येताना समोर दिसलं ते प्रचंड गंगेचं पात्र.. आत्ता थोड्या वेळापूर्वी पाहिलेली छोटीशी गंगा काही किलोमीटर प्रवासांत किती बदलली!!.. 
नदीच्या तीरांना जोडणारा तो रामझुला.. नजरेत भरत नव्हता.. 



रामझुला वरून पैलतीरी असणाऱ्या गीता भवनकडं आम्हाला जायचं होतं..
घाटावरून नदीच्या बाजूनं झुल्यापर्यंत पोचलो.. 

झुल्यावर उभं राहून त्या विस्तीर्ण पात्राकडं पाहणं हा एक अनुभव आहे.. 
नदीकडं पाहत दोन्ही हात पसरून खोल श्वास घेताना काय वाटलं ते शब्दातीत आहे.. 



प्रसिद्ध 'चोटीवाला' मध्ये जेवण घेतलं.. सुग्रास, पारंपरिक चवीची थाळी.. 

ऋषिकेशमध्ये मांसाहारी जेवण मिळत नाही.. शहराचं पावित्र्य राखण्यासाठी अनेक दशकांपासून मांस, मासे, अंडी विक्रीवर बंदी आहे.. इथल्या रेस्टोरेंट्स मध्ये मुख्यत्वे शाकाहारी तसेच सात्विक - कांदा लसूण विरहित पदार्थ, व्हिगन - दुग्धजन्य विरहित पदार्थ मिळतात.. पारंपरिक भारतीय पदार्थांपासून (चाट, लस्सी, आलू पुरी) ते मोमोज थुक्पा सर्व काही मिळतं..


जेवण करून गीता भवन, स्फटिक फॅक्टरी पाहून महादेव मंदिर पहायला गेलो.. 
अतिशय सुंदर, प्रसन्न, अद्भुत ऊर्जा असणारं असं मंदिर.. परिसर जरी मोठ्ठा असला तरी मंदिर लहानसंच होतं.. 
फुलांनी सजवलेली पिंड अतिशय मोहक दिसत होती.. त्या फुलांच्या वासानं मंदिर भरून गेलं होतं.. अगदी हळू आवाजात ' नमः शिवाय' जप ऐकू येत होता..   
एका भिंतीला लागून तीनचार जणं कसला तरी पाठ करत बसली होती.. 
मी ही दुसऱ्या भिंती लगत बसले.. बाकी सगळे शॉपिंगला, इकडं तिकडं भटकायला जाणार होते.. मी तिथं बसलेलं पाहून अभिषेकनं सांगितलं की परत जाताना तुला सांगू.. 
मी डोळे मिटले आणि  नमः शिवाय जपात हरवून गेले.. 


मला बोलवायला आलेल्या ड्राईव्हर बरोबर तिथल्या गल्ल्यातून गंगेच्या काठावर गेले.. किती सुंदर घाट होता तो!.. गंगा आरतीची तयारी सुरु होती.. अनुराधा पौंडवालच्या आवाजात भजनं सुरु होती.. आणि शांत गंगा मैय्या समोरून हे सगळं पाहात होती.. 
मुनी की रेती - शत्रुघ्नघाट.. नावेतून जाणार होतो.. पाण्यात पाय घालून नावेची वाट पहात असताना 'गंगेच्या मनात आत्ता काय असेल?' हा विचार आला.. आणि निबंध स्पर्धेचा विषय म्हणून माझं मलाच हसू आलं.. 


नावेतून 'मुनी की रेती' ला परत आलो.. पंचवीस किलोमीटरवरच हरिद्वार असल्यानं सात वाजेपर्यंचा फ्री टाइम मिळाला.. 
रामानुज शत्रुघ्नचं शक्यतो कुठंही न आढळणारं मंदिर पाहिलं.. ऋषिकेशच्या गल्ली बोळातून चक्कर मारली.. 
सात वाजता टमटम करून बस स्टॅन्ड कडं निघालो.. 

नितळ, स्वच्छ निळीशार गंगा ऋषिकेशच्या हृदयातून वाहतीय आणि तिची खळखळ तिथल्या मंत्रोच्चारांना, योगसाधनेच्या लयबद्धतेला पार्श्वसंगीत देत असेल असं वाटलं..  

योग, साधना, भक्ती, ध्यान त्यामुळं इथं वेगळीच ऊर्जा जाणवते.. 
निघताना मी म्हटलं, इथं घेतलेल्या पहिल्या श्वासापासूनच मी तुझ्या प्रेमात आहे.. तुझ्याकडं इतकं भरभरून द्यायला आहे की एक आयुष्य कमी पडेल.. लवकरात लवकर मला बोलाव.. मी वाट पाहते आहे.. 

हरिद्वारला पोचायला आठ जाऊन गेले.. 
हॉटेलवर आमचं जंगी स्वागत झालं.. पायघड्या घालून, फुलं उधळून, औक्षण करून.. विश्वविहारच्या सर्वेसर्वांमधील संजय वझे सर खास आमच्या स्वागतासाठी उभे होते.. आवरून जेवायला आलो तर six course meal आमची वाट पहात होतं.. सर सगळ्यांना काय हवं काय नको, ट्रिप कशी झाली जातीनं विचारत होते.. फार मोठ्ठी कामगिरी करून आल्यानं विजयाचा सोहाळा असं काहीसं रूप होतं.. 
खडतर यात्रेचं श्रेय मी नाकारत नाहीय पण जरा जास्तीच कौतुक होतंय असं वाटलं.. 

आम्ही चाळीस वझे सरांबरोबर

अकराच्या सुमारास रूमवर परत आले.. 
यात्रा संपली.. उद्या परत जायचं.. 
सामानाची बांधाबांध.. वजनं करणं.. आणि ती मापात आणणं हा एक टास्कच.. नातेवाईक, मित्रमैत्रिणींना देण्यासाठी घेतलेलं गंगाजल आणि प्रसाद यामुळं सगळं गणित चुकत होतं.. जुगाड करून एकदाची बॅग भरली.. आणि बेडवर पाठ टेकली.. 


१५ ऑक्टोबर : हरिद्वार - दिल्ली  
२४० कि.मी. लागणारा वेळ साधारण साडे चार तास 

सकाळी ७ वाजता ब्रेकफास्ट.. ८ च्या सुमारास हॉटेल सोडायचं.. साधारण दोन वाजेपर्यंत दिल्ली एअरपोर्टला पोचायचं.. असं आजच नियोजन.. 

आठच्या सुमारास आमची एक बस दिल्ली एअरपोर्ट टर्मिनल १ तर दुसरी बस टर्मिनल २ च्या दिशेनं निघाली.. 
महाकाय पर्वत, डोंगर, दऱ्या, वळणावळणाचे मनमोहक पण प्रसंगी जीवघेणे रस्ते, खळखळणाऱ्या नद्या आता सगळं मागं पडलं.. 

खरं तर पोर्टलँडसारख्या निसर्गरम्य ठिकाणी राहत असल्यानं मी हे पहाडी सौंदर्य नेहमीच अनुभवत असते.. बर्फाच्छादित पर्वत, पाईन-देवदार वृक्षांची जंगलं, हिरव्यागार दऱ्या, सुंदर धबधबे.. पण हिमालय तो हिमालय.. त्याची सर कोणाला येणार? गेल्या तीन-चार वर्षात हिमालयाशी माझं एक वेगळंच नातं तयार झालंय.. 
हिमालय मला धीरगंभीर योग्यासारखा वाटतो.. जीवनाचं, जगण्याचं कुतूहल संपल्यानंतर शांतपणे उभा असलेला.. त्याच्या पुढं माझं अस्तित्व सूक्ष्म होताना मी स्वतःला त्याच्यात पाहायला लागते.. कधी कधी तो मला माझ्या गाभ्यापर्यंत घेऊन जातो.. म्हणून परत परत त्याच्याकडं यावंसं वाटतं.. 
आत्ताही, त्यानं चारधामांचं समृद्ध करणारं अनुभवांचं अक्षय पांथेय दिलंय बरोबर.. 

बस मध्ये आम्ही दिल्लीत मुक्काम करणारे आणि पुण्याला जाणारे इतकेच होतो.. रोजचे चेहरे दिसत नसल्यानं चुकल्या सारखं वाटत होतं खरं पण, फायनल बाय बाय म्हणण्यापूर्वी पुढच्या चहा ब्रेकला भेटणार होतो.. ह्या दहा दिवसांत ही मंडळी दिनचर्येचा भाग झाली होती.. 
वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी ही मंडळी.. त्यांचे अनुभव, आयुष्याकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन ह्यातून कितीतरी शिकता आलं.. दृष्टी व्यापक झाली.. हीच ग्रुप टूरची मिळकत असावी..

साधारण दोनच्या सुमारास आम्ही टर्मिनल २ ला पोचलो.. वैशाली-आनंद, विजयाताई, आळंदीचे गणेश-निकिता आणि मी.. 

दिल्ली - पुणे..
पुण्याला जाणारं दुपारी पाचचं फ्लाईट.. 
चेक इन, सेक्युरिटी करून गेटला येऊन बसले.. 
टेक्निकली दिल्ली ते दिल्ली चारधाम टूर संपली होती.. 

एकूणच, मला असं वाटतं, चारधाम यात्रा प्रत्येकाला काही ना काही देते.. मग तुम्ही अध्यात्मिक शांतीच्या शोधात आला असाल किंवा हिमालयाचं नैसर्गिक सौंदर्य पाहायला किंवा हिमालय अनुभवायला.. 

शेवटी इतकंच म्हणेन विश्वविहार, टूर मॅनेजर अभिषेक, असिस्टंट तृप्ती, आमचे ड्रायव्हर्स-क्लीनर्स आणि ह्या प्रवासात आपुलकीनं काळजी घेणाऱ्या त्या प्रत्येकाची मी कृतज्ञ आहे.. 
.. आणि माझे सगळे सहप्रवासी, 
तुमच्यामुळं ही चारधामयात्रा एक समृद्ध परिपूर्ण अनुभव झाली.. 
Thank you for everything.. 
भेटू लवकरच.. अश्याच एखाद्या टूरमध्ये.. तोवर व्हाट्स अँप आहेच.. 



-मी मधुरा.. 

************************************************

Wednesday, December 24, 2025

गुप्तकाशी - बद्रीनाथधाम - रुद्रप्रयाग

१२ ऑक्टोबर : गुप्तकाशी- बद्रीनाथधाम 
१९५ कि.मी. लागणारा वेळ साधारण ७ तास 

सकाळी ८ वाजता ब्रेकफास्ट.. ९ च्या सुमारास हॉटेल सोडायचं.. वाटेत ज्योतिर्मठ पाहून मुक्कामापर्यंत बद्रीनाथला पोचायचं.. असं आजच नियोजन.. 
नियोजन किती ही आशादायक असलं तरी तसं होईलच असं नाही.. हे आत्तापर्यंतच्या अनुभवानं चांगलंच कळालं होतं.. 

नऊ सव्वा नऊच्या दरम्यान हॉटेल सोडलं.. 
गुप्तकाशीचं विश्वनाथ मंदिर, अर्धनारीश्वर मंदिर, त्रियोगी नारायण मंदिर पाहण्यासारखं आहे.. खरं तर काल त्रियोगी नारायण मंदिर पाहता आलं असतं.. सोनप्रयागपासून अकरा किलोमीटरवर तर होतं.. सगळे जमून बस निघायला रात्रीचे नऊ वाजून जातील हे माहिती असतं तर नक्कीच गेले असते.. 

खडतर प्रवास, प्रतिकूल परिस्थिती असणार हे माहिती होतं पण धैर्याची ही परीक्षा घेतली जाईल हे माहिती नव्हतं..  
काल दुपारी चार वाजता सोनप्रयागला आल्यापासून ते रात्री नऊ वाजता सोनप्रयाग सोडेपर्यंत.. ते पाच तास.. तीस किलोमीटर पेक्षा जास्त चालून थकलेली मी.. दिवसभराच्या घामट कपड्यात कावलेली मी.. ब्रेकफास्ट नंतर पोटात अन्न न गेल्यानं भुकेलेली मी.. जवळचं पाणी संपल्यानं तहानलेली मी.. आंतरिक शांतीवर कुरघोडी करणाऱ्या शरीराला पाहाणारी मी.. पेशन्स - धैर्याची परिक्षा देणारी मी.. 
ह्या सगळ्याकडं त्रयस्थ होऊन पाहणं महाकठीण होतं.. हा ही एक अनुभवच!.. स्वतःला जोखण्याचा.. तोल ढळू न देता सांभाळण्याचा.. स्वीकारात्मक राहण्याचा.. 

रोजच्या मानानं आज बस मध्ये शांतता होती.. तृप्ती आणि मी, आमचीच काय ती अखंड बडबड.. आठ दिवसांच्या प्रवासानं बहुतेक सगळे थकून झोपले होते.. 

दुपारच्या जेवणानंतर अभिषेक-टूर लीडर आमच्या बस मध्ये आला आणि तृप्ती दुसऱ्या बस मध्ये.. जोतिर्मठ येईपर्यंत much needed झोप काढून घेतली.. 
चारच्या सुमारास ज्योतिर्मठला पोचलो.. 

ज्योतिर्मठ.. 
समुद्रसपाटीपासून ६००० फूट उंच, गंधमादन पर्वताच्या पायथाशी असणारं हे ठिकाणं जोशीमठ म्हणून ओळखलं जातं..  
विंटर स्पोर्ट्स साठी देशाविदेशात प्रसिद्ध असलं तरी अध्यात्मिक, धार्मिक दृष्टया ही तितकंच महत्वाचं.. 

नृसिंह मंदिर..
अशी मान्यता आहे कि, भक्त प्रल्हादानं विनंती केल्यावर आपलं उग्ररूप त्यागून भगवान नृसिंह सौम्य रूपात इथं प्रगट झाले.. 

हिवाळ्यांत बद्रीनाथधामचं कपाट बंद झालं की भगवान इथं निवासाला येतात.. 
बद्रिनाथधामला जाण्यापूर्वी भगवान नृसिंहांचं दर्शन घेतलं तर यात्रा सफल होते असं मानलं जातं..   



PC संतोष मामा
मंदिराचं प्रवेशद्वार: अतिशय सुंदर दगडांत कोरलेले दशावतार 

ह्याच मंदिराच्या आवारात, आदि गुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेला पहिला मठ पाहताना भारावून गेले.. काल तर त्याचं समाधीस्थळ पाहिलं आणि आज त्यांच्या महान कार्याची सुरुवात झालेला मठ.. 

श्री दंडधारा मंदिर




श्री दंडधारा - आदिगुरू शंकराचार्यांनी त्यांच्या दंडानी वार करून जमिनीतून पाण्याची धार काढली..








भगवान बद्रीनाथांचं हिवाळ्यातील निवासस्थान, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि औलीचं प्रवेशद्वार, भारत-चीन सीमेकडं जाणाऱ्या सैनिकांचं छावणी तळ म्हणून ओळखलं जाणारं जोशीमठ, इथल्या नयनरम्य टेकड्याचं अवतलन (land subsidence) झाल्यानं स्वतःच्याच वजनानं खचत चाललं आहे.. हे ऐकून खूप वाईट वाटलं.. 

साडे सहाच्या सुमारास जोतिर्मठहून निघालो.. 
संध्याकाळ झाल्यानं रोजच्या सारखीच परवचा म्हंटली.. आणि उद्या बद्रीनाथधामला 'विष्णू सहस्त्रनाम' म्हणायचं ह्या माधुरीताईंच्या इच्छेवर शिक्कामोर्तब ही झालं..
चाळीस किलोमीटरच अंतर असल्यानं साडे सात आठ पर्यंत हॉटेलवर पोचलो.. 

बद्रीनाथधाम: 
दिव्यत्व आणि भव्यता यांचा संगम असणारं धाम.. 
आदि गुरु शंकराचार्यांनी, हिंदू धर्माला प्रतिष्ठा देण्यासाठी, देशाला एका सूत्रात बांधण्यासाठी पुनर्स्थापित केलेलं धाम.. 
वैष्णवांसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असणारं हे विशालपुरी विष्णुधाम.. 

एका आख्यायिकेनुसार, भगवान विष्णू बद्रीनाथला येण्याआधी भगवान शिव आणि देवी पार्वती इथं रहात असत.. बद्रीनाथ हे त्यांचं आवडतं ठिकाणं.. एके दिवशी त्यांच्या दारासमोर घामानं पूर्णपणे भिजलेलं एक बाळ त्यांना दिसलं.. त्या गोंडस बाळाला पाहता क्षणीच पार्वतीचं हृदय द्रवलं आणि बाळाला सांभाळायचं ठरवलं.. बर्फात कोणतेही पावलांचे ठसे नसताना बाळ इथं असं आलं, यामागं काहीतरी छल-कपट आहे वाटून भगवान शिवांनी असहमती दर्शवली.. पण देवी पार्वतीचा हट्ट!!.. लाडाकोडानं बाळाला सांभाळायला सुरुवात केली.. एकदा शिव-पार्वती बाहेरून घरी परत आले तर घराचे सगळे दरवाजे खिडक्या आतून बंद.. किती कि आवाज दिला तरी बंद त्या बंदच.. आता त्यांच्या समोर दोन पर्याय होते.. घरात जाण्यासाठी शक्तीचा वापर करणं किंवा दुसऱ्या घरी जाणं.. त्यांनी दुसरा पर्याय निवडला कारण पार्वतीला प्रिय असलेल्या त्या मुलाला त्यांना दुखवायचं नव्हतं.. ते मूल दुसरं तिसरं कोणी नाही तर भगवान विष्णू होते.. त्यांना तापासाठी ही शांत एकांत जागा हवी होती.. त्यासाठी त्यांनी केलेली ही लीला.. 

ह्या पवित्र धामाला बद्रीनाथ नाव पाडण्यामागं एक कथा आहे.. 
पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू या ठिकाणी ध्यानस्थ बसले होते.. ध्यानावस्थेत असताना त्यांचं थंडीपासून, हिमवृष्टीपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्या पत्नीनं लक्ष्मीनं विशाल बद्री (बोर) वृक्षाचं रूप घेतलं.. लक्ष्मीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांनी या जागेला बद्रीकाश्रम असे नाव दिले.. बद्रिकाश्रमाचा नाथ म्हणून बद्रीनाथ.. 

बद्रीनाथ मंदिर : रात्रीची रोषणाई 

हॉटेल वर येऊन चेक इन केलं.. आजचा दिवस तसा निवांत आरामदायी होता.. आवरून खाली डिनरला आले तर गप्पा छान रंगात आल्या होत्या.. 
चारधामांपैकी तीन धाम सुखरूप पार पडले होते.. यात्रेचा खडतर भाग पूर्ण झाला होता.. उद्या सकाळी बद्रीनाथाचे  दर्शन.. आणि परतीचा प्रवास सुरु.. 
हॉटेल पासून मंदिर दोन अडीच किलोमीटरवर असल्यानं, आणि गरज पडल्यास पिट्टू मिळत असल्यानं फारश्या नियोजनाची गरज नव्हती.. 
आरामात जेवण करून अकरा साडे अकराला रूमवर गेलो..  
तृप्तीला लगेचच झोप लागली.. बेड वर पडल्यावर मनांत विचार आला.. लांबूनच आज मंदिराची रोषणाई पाहिली.. किती निरव शांतता जाणवत होती तिथं.. भगवान विष्णूंचं वास्तव्य तर आहेच, पण ऋषीमुनी जे आत्मज्ञान प्राप्तीसाठी ध्यान करायला इथं आले, राहिले त्यांची ही ऊर्जा इथल्या अवकाशात असेल.. शिवतत्वाच्या ऊर्जेसारखीच ही ऊर्जा असेल का वेगळी असेल? का वृंदावनच्या ऊर्जेसारखी असेल?  

१३ ऑक्टोबर : बद्रीनाथधाम - गुप्तकाशी 
८ वाजता ब्रेकफास्ट.. बद्रीनाथ पूजा.. माना व्हिलेज.. मुक्कामाला गुप्तकाशी.. असं आजच नियोजन..

आज आम्हाला सकाळी बऱ्यापैकी फ्री टाइम होता.. सकाळी ११ वाजता पूजेचं ग्रुप बुकिंग मिळालं होतं.. 
काही जण पिंडदानाचा विधी करणार होते.. त्यांना सकाळी लवकर घाटावर जायचं होतं.. 
इथल्या ब्रह्म कपाल घाटावर श्राद्ध पिंडदान केल्यानं पूर्वजांच्या आत्म्याला पूर्ण आणि अंतिम मुक्ती मिळते.. गया इथं केलेल्या श्राद्धापेक्षा ते आठ पटीनं अधिक फलदायी मानलं जातं.. यामुळं 'पितृदोष' कायमचा दूर होतो आणि दिवंगत आत्म्याला जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे.. 

ब्रेकफास्ट करून वैशाली, आनंद आणि मी बाहेर पडलो.. 
अलकनंदेच्या एका काठाला गांव आणि दुसऱ्या काठाला मंदिर.. आणि ह्या दोन्ही काठांना जोडण्यासाठी एक सुंदर लोखंडी पूल..


पुलावर उभं राहून खालून खळाळत जाणारी अलकनंदा पाहायला मजा वाटते..
पूल ओलांडून पलीकडं गेलो.. आणि एका वेगळ्याच दुनियेत आल्या सारखं वाटलं.. इतकी प्रचंड गर्दी कि पाय ठेवायला ही जागा नाही.. कसे तरी पुलाला लागून असलेल्या पायऱ्या उतरून खाली आलो.. अलकनंदा आणि तिला लागूनच असणारी तप्तकुंडं-गरम पाण्याची कुंडं पाहण्यासाठी आलो.. पण कुंडं माणसांनी इतकी खचाखच भरली होती कि नुसत्या वाफाचं दिसत होत्या.. नदीकाठी तर जाणं फारच मुश्किल होतं.. अश्यावेळी त्या गर्दीचाच भाग होऊन, स्वतःला त्यांत झोकून देणं अजुनी जमत नाही.. 
आल्या वाटेनं परत वर मंदिराकडं गेलो.. 


अकरा शिवाय मंदिराच्या आवारात प्रवेश नसल्यानं बाहेरच्या प्रांगणातच वाट पाहत थांबलो.. इतका गोंधळ गोंगाट गर्दी होती कि कुठं शांतपणे बसायला ही जागा नव्हती.. रुद्राक्ष विकणारे, विविधरंगी गळ्यातल्या माळा, जपमाळा विकणारे, प्रसाद विकणारे, फोटोग्राफर्स सतत मागंपुढं फिरत होते.. सगळं अंगावर येतंय असं वाटलं.. 

अकरा वाजता पूजेच्या रांगेत उभे राहिलो.. तिथं तर वेगळाच गोंधळ.. अर्धातास रांगेत उभं राहिल्यावर हळूहळू रांग पुढं सरकायला लागली.. मंदिराच्या प्रांगणातून मंदिराच्या आवारात आलो.. आता आत गेल्यावर दर्शनासाठी आणि पूजेसाठी अश्या दोन वेगळ्या रांगा.. ही दर्शनाची रांग VIP रांग होती म्हणे.. म्हणजे सभामंडपातून दर्शन घ्यायचं.. अजुनी एक रांग होती जी मंदिराबाहेरून होती.. ज्यांचं लांबूनच दर्शन होणार होतं.. 
आम्ही पूजेच्या रांगेत उभे राहिलो.. आणि रांगेतून सभामंडपात.. का तर म्हणे ही पूजा आत्ता नाही.. पण रिसिटवर तरी होती.. दर्शनाच्या रांगेतून कधी आत गेले आणि कधी बाहेर आले समजलंच नाही.. ना मूर्ती पुढं उभी राहिले ना मूर्ती कशी आहे ते पाहिलं.. 
आवारात बाकी बरीच छोटी छोटी मंदिरं होती.. तिथंच एके ठिकाणी पाच मिनिटं बुढ टेकवलं.. आणि exit गेट मधून बाहेर.. 
ह्या सगळ्या गदारोळांत भक्तीच्या व्यवहाराशिवाय काहीच जाणवलं नाही.. मंदिरात VIP दर्शन, पूजा हे माझ्या स्वभावाविरुद्ध आहे.. पण ग्रुप बरोबर असताना काही गोष्टी कराव्या लागतात म्हणून केल्या.. पूजा-दर्शन झालं नाही ह्यापेक्षा फसवलं गेल्याचं वाईट नक्कीच वाटलं..
मागं वळून मंदिराकडं पाहिलं.. 'जशी तुझी इच्छा' म्हणून नमस्कार केला.. 

पूल ओलांडून गावांत आलो.. इकडं बऱ्याच व्हरायटीजचे वुलन कपडे मिळतात.. हिल स्टेशन सारखी रस्ताच्या दोन्ही बाजूला असलेली छोटी छोटी दुकानं.. विंडो शॉपिंग करत हॉटेलवर आलो.. सगळे जमून बद्रीनाथ सोडायला तीन वाजले.. 

माना व्हिलेज: 
बद्रीनाथ पासून केवळ चार किलोमीटरवर असणारं हे गांव.. तिकडं जाणारं ट्रॅफिक बद्रीनाथ पर्यंत अडकलं होतं त्यामुळं तिकडं जाणं रद्द केलं आणि सरळ रुद्रप्रयागचा रस्ता पकडला..
माना व्हिलेज भारत-तिबेट हद्दीवरचं गांव.. पूर्वी 'माना भारतातलं शेवटचं गांव' असं म्हंटल जायचं.. पण आपल्या मोदींनी त्याचं नामकरण 'माना भारतातील पहिलं गांव' असं केलं.. 
माना हे महाभारताशी असलेल्या संबंधासाठी प्रसिद्ध आहे.. आख्यायिकांनुसार पांडव स्वर्गाच्या प्रवासाला इथून गेले.. व्यासांची 'व्यास गुंफा' जिथं महाभारत लिहिलं गेलं ती माना गावांत आहे.. 
सरस्वती नदी देखील येथूनच वाहते.. त्यामुळं या ठिकाणाला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे.. 
सतोपंथ ग्लेशिअर मधून उगम पावणारी अलकनंदा माना जवळ सरस्वती नदीला मिळते आणि पुढं बद्रीनाथकडं वहाते..  

आज चौथा धाम ही झाला.. 
'शुद्धता शुद्धीकरणापासून सुरु झालेला प्रवास त्यागातून भक्तीतून आत्मसाक्षात्काराकडं जातो'.. हा जरी चारधाम यात्रेचा गर्भितार्थ असला तरी त्यावर खरं उतरायला केवढी तपस्या हवी, साधना हवी.. अजुनी अपेक्षेचं ओझं वाहणारी मी.. कुठून आत्मसाक्षात्कार होणार.. ऊर्जा अनुभवण्याची अपेक्षा असणं आणि त्या ऊर्जेशी जोडण्यासाठी आत्मिक तयारी असणं वेगळं.. प्रत्येक तत्वाची, प्रत्येक क्षेत्राची ऊर्जा वेगळी असते, सगळीकडं तो कनेक्ट जाणवेलच असं नसतं.. 

मंदिर परिसरात नाही तरी बद्रीनाथगावांत प्रत्येक श्वासांत पवित्रता जाणवली.. तिथलं प्रत्येक दृश्य निसर्गाच्या भव्यतेची साक्ष देतं होतं.. पण मंदिर, मंदिराचा परिसर इथं ती शांतता, ती पवित्रता लुप्त होतीय, ऐश्वर्याचा पगडा जास्ती आहे असं मला वाटलं.. अर्थात हे माझं मत झालं.. कदाचित ज्या अनुभवाची मी अपेक्षा केली होती तसा तो नव्हता..  

तासाभरातच ड्राइवरनं बस रस्त्याच्या कडेला उभी केली.. आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला.. 
अलकनंदा नदीवर पंचप्रयाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच प्रमुख संगमांपैकी पहिला संगम विष्णुप्रयाग.. 


विष्णूप्रयाग इथं कामेत ग्लेशिअर मधून उगम पावणारी धौलीगंगा बद्रीनाथवरून येणाऱ्या अलकनंदाला मिळते..
पुराणानुसार विष्णुप्रयाग हे नांव भगवान विष्णूंच्या नावावरून पडलं.. विष्णूला प्रसन्न करण्यासाठी नारदमुनींनी अष्टाक्षरी मंत्राचा जप ह्या संगमावर केला.. प्रसन्न होऊन विष्णूंनी नारदमुनींना प्राणशक्ती प्रदान केली.. अष्टकोनी आकारातील विष्णुमंदिर इथं आहे.. 

प्रवासाच्या एकसूरीपणात चांगला ब्रेक मिळाला.. 
बद्रीनाथ - हरिद्वार नॅशनल हायवे NH-7 वर हे पंचप्रयाग पाहायला मिळतात.. परंतु आम्हाला बऱ्यापैकी उशीर झाल्यानं, अंधार पडू लागल्यानं नंदप्रयाग आणि कर्णप्रयाग पाहता आले नाहीत.. 

त्यानंतरचा परतीचा प्रवास मात्र बराच कंटाळवाणा झाला.. साधारण दहाच्या सुमारास हॉटेलवर पोचलो.. 



-मी मधुरा.. 

************************************************

Tuesday, December 23, 2025

गुप्तकाशी - केदारनाथधाम - गुप्तकाशी

१० ऑक्टोबर : गुप्तकाशी - सोनप्रयाग - केदारनाथधाम 
गुप्तकाशी - सोनप्रयाग ३० किमी.. लागणारा वेळ १ तास
सोनप्रयाग ट्रॅक्स स्टॅन्ड - गौरीकुंड ५ किमी.. लागणारा वेळ २० मिनिटं..  

सकाळी सहा वाजता बस सुटेल.. सातच्या सुमारास सोनप्रयाग.. यात्री रेजिस्ट्रेशन करून साधारण आठच्या सुमारास सोनप्रयाग ट्रॅक्स स्टॅन्डला पोचायचं.. असं आजचं नियोजन.. 


बरोबर सहा वाजता पॅक्ड ब्रेकफास्ट बरोबर घेऊन आम्ही सोनप्रयागच्या दिशेनं निघालो.. 
आमच्यापैकी बरेच जणं चॉपरनं केदारनाथधामला जाणार असल्यानं आज एकच बस होती.. बस मधले बहुतेक सगळे घोडा किंवा डोलीनं जाणारे.. आणि मी एकटीच ट्रेक करणारी..

ट्रेकिंगमुळं कमी कपड्यात जास्ती दिवस कसं राहायचं हे मला माहिती असल्यानं तशी मी लाईट ट्रॅव्हल पॅकर आहे.. इथं तर एकच रात्रीचा प्रश्न होता.. पण केदारनाथला रात्री उणे सेल्सिअस मध्ये जाणारं तापमान, दोन दिवसापूर्वीच झालेली हिमवृष्टी यामुळं भरपूर गरम कपडे.. कमीतकमी आठ तास तरी पोचायला लागत असल्यानं पाणी, बार्स, स्नॅक्स बरोबर होते.. ट्रेलवर बरीच दुकानं, रेस्टारेंटस आहेत पण ट्रेक मध्ये मी असं खाणं टाळते.. पूजेसाठी सलवार कमीझ.. नऊ किलो वजन असंच झालं.. 

ठरल्याप्रमाणं सात वाजता सोनप्रयागला पोचलो.. बसला गावांत यायला परवानगी नसल्यानं गावाबाहेरच आम्ही उतरलो.. सकाळी सातवाजता सुद्धा धोधो गर्दी.. यात्रेकरू तर होतेच पण विक्रेते ही.. काही ठेला घेऊन बसलेले तर काही हातात सामान घेऊन फिरणारे.. वॉटरप्रूफ मोबाईल कव्हर्स, शू कव्हर्स, ग्लोव्हस, कानटोप्या, पॉन्चो आणि असं बरंच काही.. मी शू कव्हर्स आणि बांबूची काठी विकत घेतली.. 
तिथून साधारण किलोमीटर अंतरावर यात्री रेजिस्ट्रेशन ऑफिस.. बरीच मोठ्ठी रांग असल्यानं अर्धातास लागलाच.. पावणेआठच्या सुमारास ट्रॅक्स स्टॅंडकडं जायला निघालो.. 

सोनप्रयाग ते गौरीकुंड शासनाच्या ट्रॅक्सनंच जावं लागतं.. ही शटल सर्विस असल्यानं येणाऱ्या ट्रॅक्सची वाट पाहावी लागते.. एका ट्रॅक्स मध्ये दहा सीट्स घेतात.. यात्री रेजिस्ट्रेशन ऑफिसपासून ट्रॅक्स स्टॅंड साधारण दीड-दोन किलोमीटर अंतरावर आहे.. बाकी ग्रुप घोडा, पिट्टू करणार असल्यानं रेजिस्ट्रेशन झाल्यावर माझी मी एकटी.. मग काय मी त्या दिशेनं चालायला सुरुवात केली.. 
ट्रॅक्स स्टॅंडवर प्रचंड गोंधळ सुरु होता.. पाच दहा मिनिटं वाट पाहिली.. आणि ट्रॅक्सचा नाद सोडून गौरीकुंडकडं चालत निघाले.. सकाळपासून साधारण अडीच-तीन किलोमीटर चालून झालेलंच होतं.. अजुनी पाचसहा किलोमीटर.. सुरवातीला बरं वाटलं पण नंतर मी आणि माझ्यासारखे काही वेडे च रोडवर होतो.. ठिकठिकाणी 'बच के रहीए लँडस्लाईड एरिया' असे बोर्ड्स दिसायला लागले.. रोड तर खड्यांतूनच.. आम्ही तीनचार जणं एकमेकांना दृष्टीक्षेपात ठेवून चालत होतो.. 
गौरीकुंडहून येणारी एक ट्रॅक्स आम्हाला पाहून थांबली.. "और ढायी किलोमीटर बचा हैं.. आपको दो किलोमीटर ले जाऊंगा.. अंदर नही आ सकता.. लेकिन पुरे पैसे देने होंगे".. आम्ही चार जणं लगेच ट्रॅक्स मध्ये.. गांवाबाहेर त्यानं आम्हाला सोडलं.. त्यातल्या एकानं दोनशेची नोट काढून दिली.. मी माझा शेअर द्यायला लागले तर म्हणाला.. नही दीदी, आपसे पैसे नही ले सकते.. त्यांच्याशी गप्पा मारत गौरीकुंडला पोचले तेव्हा नऊ वाजून गेले होते.. 

गौरीकुंड.. 
समुद्रसपाटीपासून ६५०० फुटावर असलेलं हे गौरीकुंड.. स्थानिक कथेनुसार, शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हिमालयची पुत्री गौरीनं अनेक तपश्चर्या आणि योगिक साधना ह्या ठिकाणी केल्या.. आणि याच ठिकाणी शिवानं आपलं प्रेम व्यक्त केलं.. इथून जवळच असलेल्या त्रियुगी नारायण इथं त्यांचा विवाह सोहळा पार पडला.. 



गरम पाण्याच्या कुंडाबरोबरच गार पाण्याचं असलेलं कुंड हे इथलं खास वैशिष्ठ्य.. वैद्यकीय उपचाराचे गुणधर्म असलेल्या गरमपाण्याच्या कुंडात अंघोळ करून भाविक केदारनाथच्या दर्शनाला जातात.. गार पाण्याच्या कुंडाचं पाणी जवळच वाहणाऱ्या मंदाकीनीत जातं.. 

गौरीकुंडापासून साधारण तीस पस्तीस पायऱ्या वर चढून गल्ली वजा बोळात आले.. हीच गल्ली गौरीकुंड गावातून होत केदारनाथ ट्रेलकडं जाते.. प्रचंड गजबजाट असलेली ही गल्ली.. राहण्याची, खाण्याची सोय असलेल्या दाटीवाटीनं खेटलेली घरं, दुकानं यांच्यामधून जाणारी.. यात्रेकरू.. सामान वाहणारे कुली.. कुत्री, गायी.. पाऊल ठेवायला ही जागा नव्हती.. मुंगीच्या पावलानं दहाच्या सुमारास ट्रेल हेड पाशी पोचले.. 

केदारनाथधाम..
समुद्रसपाटीपासून ११८०० फुटावर असलेलं हे केदारनाथधाम बारा ज्योतिर्लिंग आणि पंच केदार पैकी एक आहे.. 
असं मानलं जातं की भगवान विष्णूंनी भगवान शिवाच्या सहस्रनामाचा जप केदारनाथ इथं केला होता.. 

केदारनाथ मंदिर महालय पर्वताच्या पायथ्याशी असून पाच गंगांनी वेढलेलं आहे.. वासुकी गंगा, मधू गंगा, सरस्वती गंगा, मंदाकिनी आणि स्वर्गारोहिणी..  


'जय केदारनाथ बाबा' म्हणून ट्रेल ला नमस्कार केला.. आणि साधारण २० कि.मी. अंतर आणि ५३०० फूट चढाई करण्यासाठी सज्ज झाले.. 

ट्रेलवर पाऊल टाकताच, इथं येई पर्यंतचा फ्लॅशबॅक डोळ्यासमोरून गेला.. इथवर आणलं आहेसच, आता दर्शनाची आस पूर्ण करण्यासाठी ताकद दे असं म्हणून शिवतत्वाला समर्प्रित होऊन चढायला सुरुवात केली.. 


२० किलोमीटर आणि केवळ चढाई.. ट्रेकिंगच्या नियमाप्रमाणं प्रत्येक ५० मिनिटानंतर ५ मिनिटांची विश्रांती घ्यायची असं ठरवलं..

कैलासाच्या वेळी सद्गुरू एका सत्संगात म्हणले होते.. संपूर्ण कैलास परिसर शिव आहे.. ट्रेक करताना तुम्ही त्याच्या अंगाखांद्यावर खेळत आहात, बागडत आहात.. ही जाणीव नेहमी मनात असुद्या.. हा विचार मनात आला आणि मी डोळे मिटले.. खोल श्वास घेतला.. हा सगळा परिसरच केदारनाथ आहे.. मी मनात केदारनाथ म्हणत होते डोळ्यांसमोर  आदियोगींची काळीशार मूर्ती.. केदारनाथ काय आणि आदियोगी काय.. फक्त दोन रूपं.. शंभो.. शंभो.. 

सोलो ट्रेक हा आत्मपरीक्षणासाठी, स्वतःशी संवाद साधण्यासाठी मला खूप आवडतो.. निसर्ग तुम्हाला तुमच्या मुळापाशी नेतो..  
शिवाच्या सानिध्यात आहेच तर कैलासला केलेला संकल्प डिटॅचमेंट, अलिप्तता पडताळून पाहायचं मी ठरवलं.. 
अलिप्त व्हायचं म्हणजे काय तर त्रयस्थ बनून आपलंच आयुष्य आपण जगायचं.. त्रयस्थ होण्यासाठी आपल्या कर्मांशी असलेली बांधिलकी सोडायची.. कर्मांची बांधिलकी सोडायची असेल तर केलेल्या चुकांसाठी क्षमा मागायची, ज्यांनी दुखावलं आहे त्यांना माफ करायचं आणि घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञ असायचं.. 
आज ट्रेक करताना आयुष्यांत केलेल्या चुकांचं परीक्षण करायचं.. कोणाला दुखावलं असेल तर शिवाच्या साक्षीनं मनातल्या मनात का होईना त्या व्यक्तीची क्षमा मागायची.. बघू तरी काय काय आठवतंय.. 
 
ह्याच विचारात असताना, अचानक एका मोठ्ठ्या धबधब्याचं पाणी ट्रेलवरून जाऊन खाली दरीत कोसळताना दिसलं.. क्षणभर थबकले.. त्या घोटाभर पाण्यातून चालताना मात्र ऍक्चुअल ट्रेकचं फीलिंग आलं.. नाहीतर जवळ जवळ सगळा ट्रेल दगडांनीच बांधलेला..
केदारनाथचा ट्रेल यमुनोत्रीपेक्षा बराच रुंद आहे.. आणि यमुनोत्रीप्रमाणंच घोडे, पिट्टू, डोली सगळेच त्या ट्रेलवर असतात.. यमुनोत्रीचा ट्रेल स्टिफ असला तरी चालायला चांगला होता.. इथं मात्र जागोजागी उखडलेले दगड, साठलेलं पाणी, घोड्यांची लिद यामुळं चालायला कठीण जात होतं.. 

विचारांच्या नादात, निसर्गाशी तिथल्या वातावरणाशी तादात्म्य साधण्याचा प्रयत्नांत 'केदारनाथ १०' पाशी पोचले पण..
फोटो काढण्यासाठी फोन पहिला तर १२ वाजून १० मिनिटं झाली होती.. 
२ तास १० मिनिटं.. बापरे! इतक्या वेळात ब्रेकच घेतला नव्हता.. घोडे जाण्यासाठी थांबले असताना घोटभर पाणी प्यायले होते तेवढंच..
बसलं कि चालण्याची गती मंदावते.. म्हणून शांतपणे उभ्याउभ्याच बरोबर आणलेला बार खाल्ला.. पाणी प्यायले.. 
ग्रुपवर फोटो टाकला.. अजुनी तरी कोणी पास झालेलं दिसलं नव्हतं.. 


'जय केदारनाथ' म्हणून पुन्हा चालायला सुरुवात केली.. 
 
हळूहळू वरून खाली येणारे पण दिसायला लागले.. चेहऱ्यावर प्रसन्न भाव आणि हातात प्रसादाच्या पिशव्या घेऊन.. त्यांना पाहून मी ही जोशात पावलं टाकू लागले.. यमुनोत्री सारखा अजुनी तरी खडा चढ आलेला नव्हता.. खुपसा चढ काही ठिकाणी सपाट.. 

एक मोठ्ठा लोखंडी पूल आणि त्या खालून जाणारी मंदाकिनी.. 

पुलावरून पाण्याकडं पहाताना जाणवलं, निसर्गात इतकी रममाण झाले कि मी काही तरी विचार करत होते तेच विसरले.. मला माझं इथं असणं जास्ती भावतंय..   

इतक्यात,
फोटो काढू का? ह्या प्रश्नानं माझी तंद्री भंग झाली..






ह्या नंतर बऱ्यापैकी चढ जाणवायला लागला.. बर्फाच्छादित पर्वत दिसायला सुरुवात झाली.. 


साधारण दोनच्या सुमारास लंचसाठी थांबले.. सॅक काढून खाली ठेवली.. स्ट्रेच केलं.. 
ब्रेकफास्टसाठी दिलेलं सँडविच, नट्स खाल्ले.. 
ग्रुप मधली काही मंडळी घोड्यावरून वर जाताना दिसली.. 
वॉशरूम ब्रेक झाला.. चारधामयात्रेत ही सोय मात्र चांगली आहे.. १० रुपये देऊन एकदम स्वच्छ वॉशरूम वापरायला मिळते..  

१५ मिनिटाच्या ब्रेक नंतर चालायला सुरुवात केली.. लगेचच पुढच्या वळणावर केदारधाम ४ कि.मी. बोर्ड दिसला.. 
शेवटचा टप्पा बराच चढाचा.. खाल्ल्यावर असं ही चढायला जड जातंच.. 



साडे तीनच्या सुमारास हा बोर्ड दिसला.. 
अल्मोस्ट डन.. 


जसा घोडा पडाव जवळ आला तशी प्रचंड गर्दी.. अर्धा किलोमीटर जायला वीस पंचवीस मिनिटं लागली..   



 
घोडा पडाव प्रचंड मोठठं मैदान.. घोड्यांची पागा असलेलं.. जिकडं पहावं तिकडे घोडेच घोडे.. 
मंदिराकडं जाणारा रस्ता इथूनच जातो.. मी मंदिराकडं जायला लागले.. 
'मधुरा मॅडम' आवाज आला.. एका चहाच्या टपरीत आमचा एक ग्रुप गप्पा मारत बसला होता.. 'बसा.. सगळे एकत्रच मंदिराकडं जाऊ..'  
मला लगेचच मंदिराकडं जायचं होतं.. बाहेरून तरी मंदिर पहायचं होतं.. 
.. पण थांबले.. तोंडावर पाणी मारलं.. तिथं कॉफी नसल्यानं बळेच मला 'निंबुझ' पाजलं.. खरं सांगू 'निंबुझ' मी पहिल्यांदाच पीत होते.. पण प्यायल्यावर हुशारी आली.. 
साधारण सहा तासात मी हे अंतर चढून वर आले होते.. 

थोड्यावेळ थांबून मी मंदिराकडं जायला निघाले.. वाटेत वैशाली आणि आनंद ही भेटले..
मंदिरासमोर असलेला भला मोठ्ठा  पाहून मला इतका आनंद झाला कि मी स्वतःभोवती दोन गिरक्या घेतल्या..  
खाली बसून जमिनीवर डोकं ठेवून तिथल्या पवित्र भूमीला, भोवतालाला नमस्कार केला.. 
थोडं पुढं गेल्यावर मंदिर स्पष्ट दिसू लागलं.. मंदिराचं झालेलं ते पहिलं दर्शन!.. 




विस्मयानं कितीतरी वेळ लांबवर दिसणाऱ्या त्या मंदिराकडं पहात होते.. 

तिथल्या भवतालात, वातावरणात मी इतकी खुश होते कि ते सगळं कवेत घ्यावं.. स्वतःत सामावून घ्यावं.. स्वतः त्याचा भाग व्हावं.. असं वाटत होतं.. 

म्हातारीच्या फुलासारखं हलकं हलकं होऊन त्याच्या मर्जीनं तो नेईल तिकडं तरंगत जावं..


आमची राहण्याची सोय मंदिराजवळच्या धर्मशाळा सदृश्य लॉज मध्ये केली होती.. ऍटॅच्ड बाथरूम असलेल्या सलग रूम्स.. दोनभिंतींच्या मध्ये एकाला एक लावून ठेवलेले चार-पाच बेड्स.. आणि जागा उरलीच तर अजुनी एक दोन बेड्स.. प्रत्येक बेडला एक गादी आणि एक जाड पांघरूण.. रूमच्या बाहेरच्या पडवीत टेन्ट्स ही टाकलेले.. ह्या पडवीतून मंदिर आणि हॉटेलच्या शेजारून वाहणारी मंदाकिनी दिसत होती.. एक छोटंसं किचन होतं.. एकावेळी सात-आठ जण बसतील इतकंच मोठ्ठ.. 
दोन दिवसापूर्वी हिमवृष्टी झाल्यानं अजुनी बर्फ होताच.. त्यामुळं गाद्या पांघरुणं खूपच गार पडली होती.. तृप्ती, तिचा नवरा महेश, वैशाली-आनंद आणि मी एका रूम मध्ये होतो.. 
जसजशी रात्र व्हायला लागली तशी थंडी ही वाढायला लागली.. सातच्या सुमारास शून्य डिग्री सेल्सिअस तापमान होतं.. आम्हाला मिळलेल्या पूजेची वेळ रात्री अकरा वाजताची.. त्यावेळी उणे तीन तापमान जाण्याचा अंदाज होता.. 
सातच्या सुमारास जेवणकरूनच रूमवर आले.. रूमवर हिटर वैगरे ची सोय नसल्यानं पांघरूण घेऊन बेडवर पडून राहिले.. आम्ही पाच जणं एकत्र होतो पण रूममध्ये एकदम शांतता.. बोलायला लागलं कि जीभच वळायची नाही.. 
दहा वाजता तयार होऊन - आतून थर्मल वर सलवार-कमीझ, जॅकेट, कानटोपी - मंदिराकडं निघालो..
बाहेर मस्त वातावरण होतं.. जागोजागी शेकोट्या पेटवलेल्या.. मंदिराला छान रोषणाई केलेली.. दुकानांतून बारीक लुकलुकणारे दिवे.. त्यामुळं उबदारपणा आला होता..

जवळच्याच एका दुकानातून पूजेसाठी सामान विकत घेतलं.. आणि पूजेसाठीच्या रांगेत उभे राहिलो.. शूज काढून.. पण ह्यावेळी जाड सॉक्स पायात होते.. उणे तीन तापमानात सॉक्स कितीही जाड असले तरी कितीवेळ तग धरणार.. पायांची बोटांची हालचाल करून गोठण्यापासून बचाव सुरु होता..   
खरं तर, मंदिरांत गेलं की मनोभावे देवाला नमस्कार करणं इतकंच मी करते.. क्वचितच अशी मी हातात पूजेचं सामान घेऊन रांगेत वगैरे उभी असते.. 
ह्या भवतालात उडत राहावं ह्या सुरुवातीच्या वाटण्याला आता स्थिरता आली होती.. मन दर्शनासाठी ओढ घेत होतं.. रांगेतून मंदिराच्या पायऱ्या चढून सभामंडपात आल्यावर जाणवला तो मस्त मंत्रमुग्ध करणारा सुवास.. गर्भगृहात अभिषेक सुरु होता.. विग्रहाच्या भोवती तीन ठिकाणी तीन गुरुजी आणि त्यांच्या समोर पूजा करणारे तीन-चार जणं.. आणि एका बाजूला दोन गुरुजी कसला तरी पाठ करत बसले होते.. त्यामुळं विग्रह दिसतंच नव्हता.. 
गर्भगृहात गेल्यावर काळाभोर दगडी उंचवटा नजरेस पडला.. आणि हात जोडले गेले.. त्या तुकतुकीत उंचवट्यावरून नजरच हलत नव्हती.. डोळे-मन भरून आलं.. कंठ दाटून आला.. पूजेसाठी आमच्या चार जणांच्या ग्रुपला बोलावलं.. गुरुजी काय सांगत होते ते माझ्या पर्यंत पोचत नव्हतं.. पूजेच्या सामानातलं जे काही हाताला लागेल ते वाहिलं.. आणि नंतर विग्रहावर हात ठेवून बसून राहिले.. विग्रहाचा तो स्पर्शच माझ्यासाठी खूप मौल्यवान होता..  
पूजा करायची म्हणजे आपल्या समोर असणाऱ्या उंचवट्याच्या त्या छोट्या भागाची पूजा करायची.. त्यावर तूप, भस्म, हळद लावायची.. हा उंचवटा बराच पसरलेला आणि मोठ्ठा आहे.. एकवेळेला साधारण १२-१५ जणं पूजा करत असतात.. 
पूजा झाल्यावर विग्रहावर डोकं ठेवून नमस्कार केला.. बाहेर पडताना गर्भगृहातच लक्ष्मीमातेचं छोटंसं मंदिर आहे.. बाकीच्यांनी पूजेच्या सामानातून सौभाग्य वाण काढून देवी पुढं ठेवलं तसंच मी ही केलं.. आणि बाहेर आले.. 
आजपर्यंत कोणत्याही मंदिरात मी विग्रहाला स्पर्श केला नव्हता.. त्या स्पर्शाच्या ऊर्जेची स्पंदन कितीतरी वेळ जाणवत होती.. अजुनी त्या प्रभावाखाली असणारी मी मंदिराबाहेर अंथरलेल्या सतरंजीवर जाऊन बसले.. डोळे मिटून.. माझ्या शेजारी एक कुत्रं येऊन बसलं.. त्याच डोकं जवळजवळ माझ्या मांडीवर होतं.. त्याच्या गळ्यांत बऱ्यापैकी जड लोखंडी पट्टा होता.. त्याच्याकडं पाहून डोळे भरून आले.. त्याच्या पाठीवर मी थोपटलं.. त्यानं ही त्याचं डोकं माझ्या मांडीला घासून प्रतिसाद दिला..

मला आणि वैशालीला तिथं बसलेलं पाहून तृप्ती पण आली.. माझं बरंच उरलेलं पूजेचं सामान पाहून म्हणाली, अगं हे सगळं वहायचं होतं.. 
पूजेचे त्यांचे अनुभव ऐकताना, अरे मी काहीच केलं नाही.. ह्या अनुभवाला मी मुकले.. हे खूप मनाला लागलं.. आधी सगळं सामान बघून घेऊन ते कसं वापरायचं हे विचारलं असतं तर बरं झालं असतं.. ह्या विचारानं अजुनीच वाईट वाटलं.. 
ह्याच अस्वस्थतेत रात्री कधी तरी झोप लागली..  

११ ऑक्टोबर: केदारनाथ - गुप्तकाशी

पहाटे साधनेच्या वेळी पण ती रुखरुख होतीच.. डोळे मिटले.. केदारनाथांचा विग्रह डोळ्यांसमोर आणला.. आणि श्वासावर लक्ष देत शांतपणे बसून राहिले.. 'तुझा मूर्तिपूजेवर विश्वास नाही ना मग का वाईट वाटून घेतेस.. तुला जो हवा तो कनेक्ट जाणवला ना.. मग..' .. मनावरचं मळभ दूर झालं.. आणि डोळ्यांतून पाणी वाहायला लागलं.. हा आवाज, हा विचार कोणाचा का असेना पण वेगळा दृष्टीकोन मिळाला..  

आज परत गुप्तकाशीला जायचं असल्यानं सामानाची आवराआवर केली.. सामान रूमवरच ठेवून बाहेर पडलो.. मंदिराच्या आजूबाजूची ठिकाणं अजुनी पाहिलीच नव्हती.. 
मंदिर सकाळी एकदम वेगळं दिसत होतं.. बाहेरूनच नमस्कार केला.. मंदिराच्या एकदम मागच्या बाजूला असलेली भीमशिळा पाहायला गेलो.. मागच्या बाजूला मंदिराला लागूनच पाण्याचे झरे असलेलं 'उदक कुंड' आहे.. ह्यातील पाणी तीर्थ म्हणून प्यायलं जातं..  


मागून ही मंदिर तितकंच लोभसवाणं दिसत होतं..  
भीमशिळा पासून वर चालत गेल्यावर आदि गुरु शंकराचार्यांचं निर्वाण-समाधी स्थळ आहे.. खूप सुंदर वास्तू आहे ही..  


केदारनाथ मंदिर पांडवांनी जरी बांधलं असलं तरी त्याची पुनर्बांधणी आदि शंकराचार्यांनी केली.. 
कर्मकांडं आणि बाह्य प्रभावांमुळं सनातन धर्माची, हिंदू धर्माची अधोगती होत असताना, अद्वैत वेदान्ताचं एकत्रीकरण करून त्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रवास केला.. आणि सनातन धर्माची निव ठेवून सर्व मंदिरांना एका सूत्रात बांधलं..
उत्तरेकडंच्या मंदिरांमध्ये दक्षिणेकडंचे पुजारी - रावल आणि दक्षिणेकडं उत्तरेकडंचे पुजारी आणून दक्षिण-उत्तर भेद संपवला..  

आध्यात्मिक परंपरेनुसार, आदि शंकराचार्यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी केदारनाथ इथं महासमाधी घेतली.. 
त्यांच्या त्या भव्य मूर्तीपुढं नतमस्तक होताना वाटलं.. 'तुमच्यामुळं हा केदारखंड आहे.. केदारनाथ मंदिर आहे.. हा सनातन धर्म आहे आणि असंख्य अनुयायांपैकी मी एक आज इथं आहे.. 

ब्रेकफास्ट करून दहाच्या सुमारास हॉटेल सोडलं.. वैशाली-आनंद बरोबर रमत गमत घोडा पडाव पर्यंत आले.. 
तिथूनच हात जोडून नमस्कार केला आणि उतरायला सुरुवात केली.. 
समाधानानं तृप्तीनं मन काठोकाठ भरलं होतं.. त्यामुळं मागं काही ठेवून जातीय असं अजिबातच वाटत नव्हतं.. जसा कैलासपती सदैव माझ्या बरोबर असतो तसाच केदारनाथ ही असेल.. तिथली ऊर्जा, तिथली शक्ती अनुभवल्यानंतर मी आणखीनच शिवाच्या प्रेमात पडले.. 
ब्रह्मानंद स्वरूपा ईशा जगदिशा 
अखिलानंद स्वरूपा ईशा महेशा.. 

आज बऱ्यापैकी ऊन लागत होतं.. काल ढगाळ असल्यानं ट्रेल वर झाडी नसल्याचं लक्षातच आलं नाही.. दर एक दीड तासानं ब्रेक घेऊन पाणी पीत होते, एनर्जी बार्स खात होते..

जातानाची मी आणि परत येतानाची मी.. निश्चितच फरक होता.. 
आता ना कसले विचार होते.. ना कश्याची ओढ.. ना कसली तगमग.. 
अनुभवलेल्या ह्या आंतरिक शांतीसाठी नेहमीच कृतज्ञ असेन.. 

अडीच-पावणेतीनच्या सुमारास गौरीकुंड ला पोचले पण.. साधारण चार तास.. 
सोनप्रयागला जायला लगेचच ट्रॅक्स ही मिळाली.. पावणेचार पर्यंत सोनप्रयाग ट्रॅक्स स्टेशन.. तिथून चालत सोनप्रयाग गांव.. 
गावांत पोचल्यावर बऱ्यापैकी रेस्टोरेंट पाहून पहिली खांद्यावरची बॅग काढून ठेवली.. गार पाण्यानं तोंड धुतलं.. आणि कॉफी सांगून हुश्श्श करून बसले.. 



-मी मधुरा.. 

************************************************

Monday, December 22, 2025

उत्तरकाशी - गुप्तकाशी

 ९ ऑक्टोबर : उत्तरकाशी - गुप्तकाशी 
२०० कि.मी. लागणारा वेळ साधारण ७ तास 

सकाळी ८ वाजता ब्रेकफास्ट.. ९ च्या सुमारास हॉटेल सोडायचं.. असं आजच नियोजन.. 
सात तासाचा मोठ्ठा प्रवास तरी आज ९ चा कॉल टाइम.. कदाचित गुप्तकाशीला मुक्काम हाच आजचा अजेन्डा असावा..

काल हॉटेलवर पोचायला नऊ वाजून गेले.. आज उशिरा निघायचं असल्यानं निवांतपणे गप्पा मारत जेवणं झाली.. चारपाच दिवस आम्ही सगळे बरोबर असलो तरी अजुनी सगळ्यांच्या ओळखी झाल्या नव्हत्या.. चेहरे ओळखीचे होते इतकंच.. प्रत्येक जण आपापल्या बस ग्रुपमध्ये सेटल झाला होता.. 
इथं ही माझी रूम पार्टनर होती तृप्ती.. आता आम्हाला एकमेकींच्या असण्याची, एकमेकींच्या रुटीनची सवय झाली होती.. 
वैशालीशी ही छान मैत्री झाली होती.. काही काहींच्या स्वभावातच आईपण असतं.. त्यातलीच ही.. जेवायला थांबणारी.. खाल्लंस का म्हणून विचारणारी.. कानाला काही तरी बांध.. धाडसीपणा करू नको.. असं हक्कानं सांगणारी.. साधना, वाचन, अध्यात्माचा पाया असणारी..      

आज उत्तरकाशीहून गुप्तकाशी.. आणि उद्या केदारनाथ.. चारधामातलं वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं.. 
उत्तरकाशी समुद्रसपाटीपासून ४००० फुटावर आहे तर गुप्तकाशी ४३०० फुटावर.. साधारण समुद्रसपाटीपासून तेवढ्याच उंचीवर.. ही दोन्ही शहरं गढवाल हिमालयात वसलेली.. भागीरथी नदीवर उत्तरकाशी तर मंदाकिनी नदीवर गुप्तकाशी.. 
उत्तरकाशीवरून भागीरथीच्या उगमापर्यंत जाता येतं तसंच गुप्तकाशीवरून मंदाकिनीच्या उगमाकडं म्हणजेच केदारनाथकडं जाता येतं..  
 
उत्तरकाशी, गुप्तकाशी, काशी वाराणसी.. ही शिवाची ठिकाणं.. शिवा बरोबरच त्यांच्या नावातला समान शब्द 'काशी'.. ह्या काशी शब्दाचा अर्थ काय असेल? का शिवाचं ठिकाण म्हणून काशी? तर शोधता शोधता समजलं कि 'काशी' हा संस्कृत शब्द 'कास' धातूपासून बनला आहे.. आणि काशी चा अर्थ चमकणारा, तेजस्वी किंवा प्रकाशाचं शहर असा आहे.. 
उत्तरेकडंच प्रकाशाचं गांव, वाराणसी प्रकाशाचं गांव.. पण गुप्त प्रकाशाचं गांव?
तर.. पौराणिक कथेनुसार, धर्मयुद्धातील मनुष्यहत्येचं प्रायश्चित करण्यासाठी पांडव शिवाला भेटायला जातात.. वाराणसीत त्यांना शिव भेटत नाही म्हणून ते शिवाला शोधत हिमालयाच्या दिशेनं जातात.. एके ठिकाणी त्यांना बैल चरताना दिसतो.. तो बैल म्हणजेच शिव हे पांडव ओळखतात.. भीम बैलाची शेपूट आणि मागचे पाय पकडतो.. पण शिव जमिनीत गुप्त होतो.. ते हे ठिकाण म्हणून गुप्तकाशी..
ह्या कथेनुसार, शिव जमिनीत गुप्त होऊ नये म्हणून भीम जमिनीवर पाय आपटतो.. त्यामुळं बैलाच्या शरीराचे पाच तुकडे होतात आणि ते ह्या गढवाल प्रदेशात विखुरतात.. हात तुंगनाथ.. चेहरा रुद्रनाथ.. नाभी मध्यमहेश्वर.. केस कल्पेश्वर आणि पाठ केदारनाथ इथं.. ही पाच ठिकाणं 'पंच केदार' म्हणून ओळखली जातात.. शिवाचा कंठ केदारकांठ पर्वतावर पडल्याचं ही मानलं जातं..  

आजचा २०० किलोमीटरचा हा प्रवास डोंगराळ प्रदेश, दऱ्याखोऱ्या, कधी नद्यांच्या बाजूनं तर कधी नद्या ओलांडून, कधी धरणक्षेत्रातून असा..
सुरुवातीलाच भागीरथी नदीवरचं टिहरी धरण लागलं.. भारतातील सर्वात उंचीवरचा हा एक भव्य जलविद्युत प्रकल्प.. सुंदर अफाट जलाशय, विहंगम विलोभनीय दृश्यं असलेला त्याचा टिहरी लेक वॉटर स्पोर्ट्स साठी प्रसिद्ध आहे.. 
ह्या धारणक्षेत्रानंतर भागीरथीच्या भूप्रदेशातून बाहेर पडून अलकनंदेच्या भूप्रदेशातून प्रवास सुरु झाला.. तिच्या तीरावर वसलेलं श्रीनगर आणि कालीमातेचं प्रसिद्ध धारादेवी मंदिर.. पुढं रुद्रप्रयागला थांबायचं असल्यानं धारादेवीला मुद्दाम वाकडी वाट करून गेलो नाही..

रुद्रप्रयाग.. 
उत्तराखंडमधील पंच प्रयागांपैकी एक.. जिथं बद्रीनाथहून येणारी अलकनंदा केदारनाथहून येणाऱ्या मंदाकिनीला मिळते..
पंच प्रयाग.. अलकनंदा नदीला येऊन मिळणाऱ्या पाच नद्यांची ही पाच पवित्र संगम स्थानं..
बद्रीनाथहून येणाऱ्या अलकनंदेला प्रथम 'विष्णुप्रयाग' इथं 'धौलीगंगा' येऊन मिळते.. पुढं नंदाकिनी' 'नंदप्रयाग' इथं तर 'कर्णप्रयाग' इथं 'पिंडारगंगा'.. 'रुद्रप्रयाग' इथं केदारनाथहून येणारी 'मंदाकिनी' मिळते.. आणि 'देवप्रयाग' इथं भागीरथी.. देवप्रयाग नंतर अलकनंदा 'गंगा' नावानं ओळखली जाते..  


डावीकडून येणारी मंदाकिनी - उजवीकडून येणारी अलकनंदा 

रुद्रप्रयाग पासून मंदाकिनीच्या भूप्रदेशातून प्रवास करू केला.. तिलवाडा मंदाकिनीच्या काठावर वसलेलं एक सुंदर गांव.. तसेच डोंगर, तश्याच दऱ्या, तश्याच नद्या पण बदलता लँडस्केप.. तेवढाच खिळवून ठेवणारा.. 

निसर्गाचं सौंदर्य बघून बघून बघणार तरी किती वेळ?.. शेवटी ते असण्याची ही सवय होऊन जाते.. 
मग काय डुलक्या काढणं सुरु झालं.. 
अभिषेक, टूर लीडरनं बसचा माईक हातात घेतला.. आणि सगळ्यांना आपापली ओळख करून द्यायला सांगितली.. नाव, गाव, प्रोफेशन, हॉबी इत्यादी इत्यादी.. 
हळूहळू माईक बसभर फिरू लागला.. निम्मी लोक तर बीड-संभाजीनगरची.. अभिषेक सुद्धा.. व्यवसायानं MR असलेला अभिषेक आवड म्हणून टूर्स कंडक्ट करतो.. डॉक्टरांचा ग्रुप तर होताच.. SBI मधून निवृत्त झालेल्या इंदूरच्या चार मैत्रिणींचा ग्रुप.. निवृत्त झाल्यावर कोणी ट्रान्स्लेटर म्हणून पुस्तकं अनुवादित करतं तर कोणी शास्त्रीय संगीताचा अभ्यास तर कोणी महिला सक्षमीकरणाचं काम करतं तर कोणी आवड म्हणून कापडाच्या पर्सेस बॅग्स बनवतं.. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला आनंद मुलीचं लग्न झाल्यावर निवृत्त होऊन ट्रॅव्हलिंगची आवड जपतोय.. कोणी वयाच्या पासष्ठी नंतर मानसशास्त्रात मुंबई विद्यापीठातून BA करतंय तर कोणी सप्तशृंगी मठात जाऊन गीतापठण करणार आहे.. जीवनाकडं पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन किती वेगळा.. त्यांचे विचार, त्यांचे अनुभव ऐकायला मजा येईल.. 
अंताक्षरी, सोलो गाणी, चुटकुले सांगणं.. माईक फिरतंच राहिला.. 

मजा-मस्ती, गप्पा-टप्पा ह्यांत दिवस कसा गेला कळलंच नाही.. पण जशी संध्याकाळ व्हायला लागली तसं 'अजुनी किती वेळ?' 'कित्ती वेळ प्रवासच करतोय' हे विचार यायला लागले.. सकाळी नऊ वाजता निघालो.. ७ तासाचा प्रवास आणि चहा, जेवणं ह्यासाठी दोन अडीच तास.. म्हणजे पोचायला साडे सहा-सात.. सहा वाजता अजुनी ४५ कि.मी. अंतर बाकी होतं.. 
अंधार पडायला सुरुवात झाली होती.. 
चला 'परवचा' म्हणूया.. मागून आवाज आला.. दोन-चार आवजांत 'शुभंकरोती' सुरु झाली.. भीमरूपी, रामरक्षा पर्यंत त्यांत बऱ्याच आवाजांची भर पडली.. गीतेचा नववा पंधरावा अध्याय ही म्हणून झाला.. सात वाजून गेले तरी प्रवास सुरूच..  मग 'श्री राम जय राम जय जय राम' जप सुरु झाला.. 

थोड्यावेळानं बस थांबली ती थांबलीच.. ट्राफिक जॅम.. यमुनोत्रीचा ट्राफिक जॅमचा अनुभव अगदीच ताजा होता.. त्यावेळी जॅम लवकर लक्षात आल्यानं काही तरी सोय झाली.. पण आत्ता मागं-पुढं गाड्यांची भली मोठ्ठी रांग.. समोरूनही गाड्या येत नव्हत्या.. स्टॅच्यू दिल्याप्रमाणं सगळं स्तब्ध..
मध्येच कधीतरी समोरून गाड्या यायच्या.. ट्राफिक सुटलं असं वाटायचं.. पण आम्ही आहे तिथंच.. 
सातचे आठ, आठचे नऊ झाले.. अजुनी दहा किलोमीटर अंतर बाकी होतं.. आमच्यापासून पाचशे मीटर अंतरावर घाटात एक बस अडकली होती.. खोदलेल्या डोंगराची वरची कड बसला घासत होती.. अगदी अरुंद रस्ता, एकीकडं हा डोंगर, दुसरीकडं खोल दरी, पाऊसामुळं झालेला चिखल.. ड्राइव्हरचं इंच इंच मागं पुढं करून बस काढणं सुरु होतं.. हिमालयात ड्राईव्ह करणाऱ्या ड्राइव्हर्सची कमाल वाटते.. त्यांचा गाडीवरचा कंट्रोल, त्यांचा पेशन्स कौतुकास्पद आहे.. 
आमची ही बस इथं थोडी अडकली पण आधीच्या बससाठी झाड-झुडपं काढून जागा मोठ्ठी केल्यानं, दोन चार फांद्या कापून आम्ही पुढं गेलो.. हॉटेलवर पोचायला साडे दहा वाजून गेले.. 

मला उद्याचा दिवस दिसायला लागला.. सकाळी सहा वाजता निघायचं.. बावीस तेवीस किलोमीटरचा ट्रेक.. तिकडं राहायचं असल्यानं सामानाचं पॅकिंग.. जे माझं मलाच उचलून न्यायचं असल्यानं विचारपूर्वक पॅक करावं लागणार होतं.. 

इतक्या रात्री जेवल्यानं त्रास होईल म्हणून मी न जेवता बरोबर आणलेला प्रोटीन बार खाल्ला.. तसं ही बस मध्ये थोडंफार खाणं झालेलं होतंच.. तृप्तीकडून रूमची किल्ली घेऊन उद्याची तयारी करण्यासाठी रूमवर गेले.. 



-मी मधुरा.. 

************************************************

Sunday, December 21, 2025

बारकोट - उत्तरकाशी - गंगोत्रीधाम - उत्तरकाशी

७ ऑक्टोबर : बारकोट - उत्तरकाशी 
८२ कि.मी. लागणारा वेळ २ तास 

.. आपण नियोजन करायचं पण त्याप्रमाणं घडणार का नाही ते त्या विधात्याच्या हातात.. त्याच्या मर्जी शिवाय पान सुद्धा हालत नाही तर आमची बस काय.. विषयच नाही.. 
यमुनोत्रीचं दर्शन घेऊन दुपारी चार वाजता पार्किंग मध्ये भेटायचं.. चहा घेऊन साडे चार - पाच वाजेपर्यंत बारकोटसाठी निघायचं.. हे कालचं नियोजन.. चार चे सहा वाजले तरी अजुनी सगळी मंडळी परत आलीच नव्हती.. न आलेल्या मंडळींची साडे सहा वाजेपर्यंत वाट पाहायची नाहीतर एक बस बारकोटला निघेल असं सर्वानुमते ठरलं.. साडे सहाच्या सुमारास कळालं कि पुढं रस्ता जॅम झालाय.. पाच वाजता निघालेल्या गाड्या १५ किलोमीटर पण पुढं गेल्या नाहीत.. मग पुढं जाऊन अडकण्यापेक्षा सगळे येई पर्यंत तिथंच थांबायचं ठरलं.. सातच्या सुमारास सगळी मंडळी आली.. दिवसभरच्या दमणुकीनं कधी एकदा बस सुटते आणि मुक्कामाच्या ठिकाणी जातो असं झालं होतं.. पाऊसाचा जोर कमी झाला असला तरी अजुनी पाऊस होताच..

साडे सातला एकदाचं पार्किंग सोडलं.. वैतागलेल्या कावलेल्या आम्हाला हुश्श झालं.. सुटकेचा निःश्वास टाकेपर्यंत अचानक बस थांबली.. ड्राइवर खाली उतरला.. काही वेळातच तृप्ती पण उतरली.. पुढं काय वाढून ठेवलंय याला अनभिज्ञ आम्ही, बरोबर आणलेला खाऊ खाऊन घेऊ, पोचायला उशीर होईल ह्या विचारांत.. बराच वेळ झाला तरी तृप्ती आली नाही म्हटल्यावर शंकेची पाल चुकचुकली.. 
तृप्ती आली आणि म्हणाली, "पुढं अडीच तीन किलोमीटरवर जाणाऱ्या गाड्यांची रांग दिसती आहे.. घाट बंद झालाय.. दरडीमुळं का गाडी अडकल्यानं नक्की माहिती नाही.."  
ह्यावर काय बोलणार?? बस मध्ये एकदम चिंतेचं वातावरण.. सगळे दमलेले, भुकेलेले, वैतागलेले.. तृप्तीचा ह्यातून मार्ग काढायचा तिच्या परीनं प्रयत्न सुरु होता.. दुसरी बस तर अजुनी पार्किंग मध्येच होती.. आमच्यातले जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेले अनुभवी शूरवीर लढायला सज्ज झाले.. आजूबाजूला काही हॉटेल्स, रेस्टोरेंट्स अगदी टपरी तरी दिसती आहे का? असेल तर बायकांची सोय होईल.. पावसापाण्याचं कुठं जाणार?.. असं म्हणून तृप्तीबरोबर मोहीम हातात घेतली..
बाजूलाच ५०० मीटरवर एक हॉटेलसारखी बिल्डिंग दिसत होती.. तिकडं जाऊन चौकशी करून चहा आणि वॉशरूमचा जुगाड करण्यात ते यशस्वी झाले.... 

PC दया मॅडम
जुगाड अश्यासाठी की, ती बिल्डिंग म्हणजे भावी हॉटेल.. ज्याचं अजुनी बांधकाम सुरु होतं.. थोडाफार स्वयंपाक करण्या इतपत किचन, आणि एक वापरण्याजोगी वॉशरूम.. काही रूमचं फ्लोरिंग सुरु होतं तर काहींचं इंटिरियर..

तिथून कोजागिरीचा चंद्र खूप सुंदर दिसत होता..
बारकोटला हॉटेलवर कोजागिरी जागवायची.. मसाला दूध, एकमेकांच्या ओळखी, खेळ, गप्पा-गाणी.. नुसते प्लॅन्स.. 


एकूणच परिस्थिती पाहता पुढं न जाणं चांगलं.. असा विचार गरम चहाच्या घोटाबरोबर अनेकांच्या डोळ्यांत दिसला.. चहा बिस्किटं खाऊन होईपर्यंत तो तृप्तीकडं आणि तृप्तीकडून अभिषेकपर्यंत पोचला पण.. 
ह्या बिकट परिस्थितीत, फारशी साधन सामुग्री नसताना, आमची राहायची सोय करायला ते तयार झाले.. प्रेमानं गरम गरम रस्सा पोळी भात खाऊ घातला.. गरम पाणी, उबदार पांघरुणं.. काय केलं नाही त्यांनी.. 
कोणतीही कल्पना नसताना एकदम वीस जणांची सोय करणं सोपं नव्हतं.. प्रेम, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती, अतिथी देवो भव, जी काही त्यांची भावना असेल त्या भावनेला सलाम.. सगळ्यांनाच हे जमत नाही.. 

दुसऱ्या बसची पण राहण्याची सोय तिकडं जवळंच झाली..

एकेका खोलीत चार-पाच जण.. अंथरूण पांघरुणं, कोणी कुठं झोपायचं ह्याचं नियोजन होऊन झोपायला बारा वाजून गेले.. 
जमिनीवर अंथरलेल्या चादरीवर पाठ टेकल्यावर छताकडं पाहताना वाटलं, कोणाची तरी माझ्यावर इतकी कृपा आहे कि पाठ टेकायला जमीन आणि थंडी-पावसापासून रक्षण करायला डोक्यावर छत आहे.. दिवसभराचे घामट कपडे जरी अंगावर असले तरी पोटात गरम गरम अन्न आहे.. कोणतीही परिस्थिती आली तरी मार्ग दाखवणारा सोबत आहे.. अजुनी काय हवं?.. 


सकाळी नेहमीच्या वेळी जाग आली.. आजची साधना यमुनामैय्याच्या अंगणात होती तर!.. मैय्याच ती.. काळजी घेणारंच.. 
सहा वाजता दारावर ठकठक झाली.. पहाटे चार वाजता घाट सुरु झालाय आणि आपण आवरून लगेचच निघत आहोत.. फटाफट सगळ्यांनी आवरायला घेतलं.. अर्धा तासांत सगळे तयार.. चहाची ही वाट न पाहता बस मध्ये जाऊन बसले पण.. 
बारकोटला पोचायला नऊ वाजून गेले.. 
हॉटेलची साईट पाहिल्यावर अरे यार.. कसली धम्माल आली असती.. कशाला मुकलो ह्या विचारानं वाईट वाटलं पण कशातून तरलो हे आठवून हायसं वाटलं.. 
गेल्या गेल्या चहा कॉफी तयारच होती.. ब्रेकफास्ट न करता अकरा वाजता ब्रंच.. आणि नंतर उत्तरकाशीकडं प्रयाण.. 

उत्तरकाशी:
उत्तरकाशी म्हणजेच उत्तरेकडील काशी.. एक समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेलं प्राचीन स्थान.. मैदानी प्रदेशातील काशी वाराणसी इतकंच महत्वाचं.. 
उत्तरकाशी आणि काशी वाराणसी गंगा नदीच्या काठावर वसलेली, वरुण आणि असी नद्यांच्या भूभागाचा प्रदेश असलेली, इतकंच काय मणिकर्णिका नावाचा घाट असलेली, विश्वनाथांना -शिवाला समर्पित अशी ठिकाणं..
असं म्हटलं जातं, कलियुगाच्या शेवटी काशी वाराणसी प्रलयात लुप्त झाल्यावर उत्तरकाशी शिव विश्वनाथांचं निवासस्थान असेल..  


काशी विश्वनाथ मंदिर..
पुराणानुसार, मार्कंडेय ऋषी.. भगवान शिवाचे असीम भक्त.. यमराज जेव्हा मार्कंडेय ऋषींचे प्राण घेण्यासाठी आले तेव्हा आपल्या ह्या लाडक्या भक्ताचे प्राण घेऊन जाणाऱ्या यमाला शिवानं अडवलं.. ज्या ठिकाणी हे घडलं तिथं विश्वनाथांचं मंदिर उभारण्यात आलं..
ह्या मंदिराची स्थापना भगवान परशुरामांनी केली.. नंतर मंदिराचा जीर्णोद्धार राणी खानेती देवींनी केला.. 
त्यामुळं काशी विश्वनाथाच्या मंदिरात भगवान परशुराम आणि ध्यानस्थ मार्केंडेय ऋषी यांची मंदिरं आहेत.. 

काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात थोडंसं डावीकडं कलंडलेलं शिवलिंग, पार्वतीमाता आणि गणपती आहेत.. आणि गाभाऱ्याबाहेर सुंदर असा नंदी.. 
ध्यानात मग्न भगवान भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करतात असं म्हणतात.. तिथं असणाऱ्या ह्या ऊर्जेचा मी अनुभव घेतला आहे.. 




मंदिराच्या समोरच आदिशक्तीला समर्प्रित शक्ती मंदिर आहे.. या मंदिरातून बाहेर डोकावणाऱ्या भव्य पितळी त्रिशूळावर विश्वनाथ मंदिर कसं बांधलं गेलं हे सांगणारा एक शिलालेख आहे.. २६ फूट उंच असलेल्या या त्रिशूळाच्या तळाचा घेर साधारण ९ फूट तर वरच्या भागाचा घेर साधारण २ फूट आहे..  





काशी विश्वनाथ मंदिराबरोबरच अनेक मंदिरं उत्तरकाशीत काशीत आहेत.. 

साधारण चारच्या सुमारास आम्ही मंदिराच्या आवारात पोचलो..  
भव्य प्रांगण.. एकदम स्वच्छ नीटनेटकं.. गर्दी असली तरी शिस्तीत वागणारी.. 
गेल्यावर चप्पल स्टॅन्ड वर शूज ठेवून दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो.. प्रसन्न वातावरणात एक वेगळीच पवित्रता जाणवत होती.. 
गाभाऱ्याच्या समोरच्या नंदीचं दर्शन घेतलं आणि आत काही तरी हललं.. दाटून आल्यासारखं.. 
यंत्रवत गाभाऱ्यात प्रवेश केला, दर्शन घेतलं, बाहेर आले.. मला काहीही कळत नव्हतं.. वैशालीच्या मागून बाकी मंदिरात जाऊन आले.. 
दर्शन झाल्यावर फ्री टाईम होता.. बाकी मंडळी मार्केट पाहायला गेली.. 
पण मला ही जागा सोडून बाहेर जाण्याची इच्छाच होईना.. मंदिराच्या समोरच्या आवारात डोळे मिटून बसले.. तिथली ऊर्जा हवीहवीशी वाटत होती.. डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहतंय कळत होत.. पण पुसण्यासाठी सुद्धा हालचाल करावी असं वाटत नव्हतं.. मंदिरातला घंटानाद हळूहळू धूसर होत गेला.. 
खोलवर काहीतरी मलाच माझ्यात सापडलं होतं.. सापडल्याची जाणीव झाली.. आणि त्या ट्रान्स मधून बाहेर आले.. तिथंच मंदिराकडं पाहात कितीतरी वेळ बसून राहिले.. 

निघायची वेळ झाली.. कोणाशीही काहीही बोलावंसं वाटत नव्हतं.. माझ्याच बरोबर मला राहायचं होतं.. 
हॉटेलवर आले.. चेक इन झालं.. आवरून जेवण करून बेड वर जाऊन पडले.. 

८ ऑक्टोबर : उत्तरकाशी - गंगोत्रीधाम - उत्तरकाशी 
१०० कि.मी. लागणारा वेळ ३.५ तास 

सकाळी सातचा कॉल टाईम.. साडे सहापासून चहा-कॉफीची सोय.. आणि पिकनिक स्टाईल ब्रेकफास्ट.. 

सात सव्वा सातच्या सुमारास बस गंगोत्रीच्या दिशेनं निघाली.. आज ट्रेक, घोडा, पिट्टू कसलीच गरज नव्हती.. बस थेट गंगोत्री पर्यंत जाणार.. पार्किंग पासून मग काय तो दीड-दोन कि.मी. चालणं.. मंदिरात जायचं गंगेची पूजा करायची म्हणून आज महिला वर्ग छान तयार होऊन आला होता.. कोणी साड्या, कोणी सूट्स तर कोणी कुडता.. काही गंगास्नान पण करणार होते.. एकंदरीत बस मध्ये उत्साही वातावरण होतं.. 

उत्तरकाशी ते गंगोत्रीधाम चारधामयात्रेतील सर्वात सुंदर, विलोभनीय, नैसर्गिक सौंदर्याची मुक्तहस्तानं उधळण करणारा मार्ग.. 
गंगेच्या उगमाकडं भागीरथीच्या किनाऱ्यानं थेट उंच उंच हिमालयाकडं जाणारा.. कधी भागीरथीला समांतर तर कधी थेट कड्याच्या बाजूनं कोरलेला.. 
आकर्षक गढवाली गावांतून जाणारा.. मोठ्ठाल्या सफरचंदांच्या बागा, देवदार पाइनची जंगलं असणाऱ्या हर्षिल व्हॅलीतून जाणारा.. डोंगर-दऱ्यांचं विहंगम दृश्य असणारा सुखी टॉप.. विल्सन कॉटेजसारख्या ऐतिहासिक स्थळामुळं इतिहासाशी नाळ जोडून असणारा.. तरी अतिशय शांत निसर्गरम्य मार्ग.. स्वित्झर्लंड मध्ये तर नाही ना असं क्षणभर वाटून गेलं.. 
फोटो ही काढायचं भान राहिलं नाही.. निसर्गाशी तादात्म्य.. 

 


इथंच एका ठिकाणी ब्रेकफास्ट साठी थांबलो.. आजूबाजूला हिरवेगार डोंगर.. काही बर्फाची टोपी घातलेले.. बाजूला खळखळ वाहणारं पाणी.. एकदम पिक्चर परफेक्ट लोकेशन.. 
आणि खोल श्वास घेऊन निसर्गाला स्वतःत झिरपून घेण्यासाठी ही एकदम परफेक्ट .. 
 
उत्तरकाशीपासून बऱ्याच उंचीवर आल्यानं हवेत गारवा चांगलाच वाढला होता.. हवा विरळ ही झाली होती.. 
    
गरम गरम उपमा काही औरच लागत होता..



ह्याच मार्गावरचं 'मुखवा' गावं हे गंगामातेचं हिवाळ्यातील निवासस्थान.. 
ऑगस्टमध्ये झालेल्या ढगफुटीत वाहून गेलेलं धराली गावं ही ह्याच मार्गावरचं.. पाहून कससंच झालं.. मागं राहिल्या होत्या त्या पूर्वी गांव असल्याच्या पुसटश्या खुणा.. निसर्गाची दोन्ही रूप - निर्मिती आणि ऱ्हास - अगदी काही कोसांच्या अंतरावर पाहायला मिळाली..  

अकराच्या सुमारास गंगोत्रीधामला पोचलो.. 

गंगोत्रीधाम:
गंगोत्रीधाम हे चारधामयात्रेतील दुसरं धाम.. समुद्रसपाटीपासून १०२०० फुटावर देवदार आणि पाइन वृक्षांच्या नयनरम्य परिसरात वसलेलं धाम.. 
पौराणिक कथेनुसार, राजा भगीरथाच्या अथक प्रयत्नांनंतर, भगवान शिवाच्या जटांतील एका केसातून निर्माण झालेली गंगा स्वर्गातून धरतीवर अवतरली.. म्हणून ही भागीरथी.. देवप्रयागला अलकनंदाशी संगम झाल्यावर भागीरथीची गंगा होते.. 
भगीरथ शिळा जिथं भगीरथानं भगवान शिवाची आराधना केली होती तिथं गंगोत्रीमातेचं मंदिर आहे.. मंदिराजवळ भागीरथीचा प्रवाह तीन भागात विभागलेला दिसतो.. आणि पुढं जाऊन त्यांचा परत एक प्रवाह होतो.. हे तीन प्रवाह ब्रह्मा, विष्णू आणि शिवाला समर्पित आहेत.. 

एका आख्यायिकेनुसार, धर्मयुद्धानंतर मृत्युमुखी पडलेल्या सर्व जीवांच्या मुक्तीसाठी पांडवांनी इथं महान 'देवयज्ञ' केला होता.. 
असं म्हणतात कि भागीरथीच्या काठावर पूर्वजांचे विधी केल्यानं त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळते.. आणि तिच्या पाण्यात स्नान केल्यानं वर्तमान तसेच पूर्वजन्मांतील पापांचा नाश होतो.. 

यमुनोत्री प्रमाणेच गंगेचं मूळ उगमस्थान गंगोत्री ग्लेशिअर मधलं 'गोमुख'.. समुद्रसपाटीपासून १३२०० फूट उंचीवर.. आणि मंदिरापासून १९ कि.मी. अंतरावर.. हर्षिल व्हॅली - गोमुख ट्रेक करून जाता येतं..

पार्किंगपासून सरळ एक रस्ता मंदिराकडं जातो.. दुतर्फा कोणत्या ही मंदिराच्या बाहेर दिसतील अशी दुकानं.. प्रसाद, पूजेचं सामान, गंडे-दोरे, गंगेच्या पाण्यासाठी मोठमोठ्या कॅन्स पासून ते अगदी छोटे छोटे कॅन्स.. वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या मटेरिअल्सचे.. सुवेनिअर्स.. सुरुवातीला मोठ्ठा वाटणारा रस्ता हळूहळू अरुंद होत जातो.. 
धक्काबुक्की करत एकदाची सगळी निळी डोकी मंदिराच्या प्रांगणात पोचली.. सगळ्यांची पादत्राणं एका पोत्यात गोळा करून ठेवायला दिली.. आणि पात्राकडं जाण्यासाठी पायऱ्यांच्या दिशेनं निघालो.. 

प्रचंड थंडी.. जमिनीवर ठिकठिकाणी साठलेलं पाणी.. अनवाणी पावलं.. पायातून सर्वांगात शिरू पाहणारी थंडी.. आणि तिचं पहिलं दर्शन झालं.. खळाळून वाहताना.. स्तब्ध होऊन पहातच राहिले.. तिचं ते खळखळणं आकर्षक, मंत्रमुग्ध करणारं.. नुसतं पहात राहावं सं.. 


एक छोटासा घाट.. अगदी गजबजलेला.. गुरुजींच्या चाललेल्या पूजा, लोकांच्या अंघोळी, गंगा भरून घेणं, फोटो-व्हीडिओ काढणं.. 
आम्ही ही गंगा पूजा करणार होतो.. गंगेची पूजा म्हणजे पात्रात भरून आणलेल्या गंगेच्या पाण्याची पूजा.. थोडक्यात घरी घेऊन जायच्या गंगेची पूजा.. 
पूजेपूर्वी गृप मधल्या काही जणांनी त्या थंडीत, बोचणाऱ्या वाऱ्यात गार पाण्यात अंघोळ केली.. मी मात्र पाण्यात उभी राहून बराच वेळ गंगेकडं पहात, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते.. 

अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानं पूजेसाठी आम्ही एका खोलीत जमलो.. काचेची भिंत असलेली खोली.. जिथून खाली वाहणारी गंगा स्पष्ट दिसत होती.. 
गंगेकडं पाहताना यमुनोत्रीपासूनचा 'सोडून देणं' हा विचार वर आला.. 
लोक येतात.. पापनाशनासाठी डुबकी मारतात.. आणि कृतज्ञतेसाठी काहीतरी द्यायचं, सोडायचं म्हणून अंगवस्त्र, वस्तू तुमच्यांच पाण्यांत सोडतात.. पापनाशन करायला तुम्ही आहातच म्हणून तुम्हाला किती गृहीत धरलं गेलंय.. त्यामुळं ना पापं करणं कमी झालंय ना तुमच्यांत गोष्टी सोडणं ना तुम्हाला घाण करणं.. 
सोडून असं काही तरी द्यायला हवं ना ज्यानं स्वतःची, आत्म्याची प्रगती होईल.. प्रगती नाही झाली तरी निदान अधोगती होणार नाही.. फार काही नाही पण एखादी सवय.. तिरुपतीला जाऊन दारू सिगारेट सोडल्याची कितीतरी उदाहरणं आहेत.. भगवद गीतेत सांगितली 'फलाची अपेक्षा सोडणं'.. संतांनी सांगितलेला 'देहाचा मोह, षडरिपु सोडणं'.. मान्य आहे कि हे महाकठीण आहे.. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.. एकदम नाही होणार.. हा पण एक प्रवास आहे.. हळूहळू तिथंवर पोचू.. 
'डिटॅचमेंट'- 'अलिप्तता'.. मोह-माया वस्तूंची, माणसांची, नात्यांची हळूहळू कमी करणं.. हा कैलासला साक्षी ठेवून केलेला माझा संकल्प.. संसारांत राहून, सगळी कर्म करत हे करणं खूप अवघड आहे.. दरवेळी हे भान राहिलंच असं नसतं.. काही कार्मिक ऋणानुबंध असतात.. पण शिकणं सुरु आहे..  

आम्ही सगळ्यांनी एकत्रच गंगा पूजा केली.. नंतर गंगोत्रीमातेचं मंदिर पहायला गेलो.. 



अतिशय साधं, सुंदर, पांढऱ्या शुभ्र संगमरवरातलं गंगोत्रीमातेचं हे मंदिर.. 
बाकी मंदिरांत असते तशी कसली कलाकुसर नाही कि शिल्पकला नाही.. 
नागर स्थापत्यशैलीतलं हे मंदिर १८ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातलं.. नेपाळी सेनापती अमर सिंह थापा यांनी बांधलेलं.. नंतर जयपूरच्या महाराजांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली..  




बाहेरच्या सारखीच मंदिरातील रचना ही साधी सरळ.. मुख्य गर्भगृह एका उंच चौथऱ्यावर.. गर्भगृहाच्या समोर पूजा-प्रार्थनेसाठी बसता येईल असा एक छोटा मंडप.. गर्भगृहात गंगामातेच्या मूर्ती बरोबरच यमुना, अन्नपूर्णा, सरस्वती, लक्ष्मी यांच्या मूर्ती.. आणि बाजूला भागीरथ आणि आदि शंकराचार्यांची मूर्ती..  

भगीरथ शिळा 
गंगोत्रीमातेची पालखी



मंदिराच्या परिसरात भगवान शिव, गणपती, हनुमान आणि भागीरथ यांची छोटी मंदिरं आहेत.. 

 




अडीचच्या सुमारास गंगोत्रीधाम सोडलं.. समृद्ध करणारा अनुभव बरोबर घेऊन..

यमुनोत्री आणि गंगोत्री दोन्ही पवित्र नद्यांची उगमस्थानं.. दोन्हीकडं ही त्यांची तितक्याच भक्तिभावानं पूजा होते.. पण गंगेचं पाणी जसं घरी मुद्दाम आणलं जातं तसं यमुनेचं पाणी आणताना मी कोणाला पाहिलं नाही.. दोन्ही नद्यांमध्ये पापनाशनासाठी डुबकी मारताना श्रद्धा तीच असेल ना? मग असं का? यमुनेपेक्षा गंगेभोवती असलेलं पौराणिक कथांचं वलय हे कारण असू शकेल का?

मूळ जरी हिमालय असलं तरी ग्लेसिअर्स वेगळी असल्यानं दोन्ही नद्यांचा रंगात, त्यांच्या खळखळण्यांत जाणवण्या इतका फरक होता.. यमुनेचा रंग गडद निळा थोडीशी हिरवट छटा असणारा तर गंगेचा थोडा फिकट निळा.. यमुनेपेक्षा गंगेच्या पाण्याला खळखळाट जास्त होता.. 
दोन्ही नद्यांचं पाणी हातात घेतलं तेव्हा त्या पाण्यांत जिवंतपणाची एक ऊर्जा जाणवली.. 'पाण्याला आठवण असते' असं विज्ञान ही सांगतंच की.. कदाचित जाणीवपूर्णक झालेल्या पाण्याच्या स्पर्शामुळं ही ऊर्जा जाणवली असेल..

सव्वा तीनच्या दरम्यान जेवणासाठी थांबलो.. हर्षिल व्हॅली किंवा थोडं आधी असेल.. अतिशय सुंदर ठिकाण.. पर्वताच्या टोकावर.. नजर जाईल तिकडं पर्वत आणि दऱ्या.. शेजारीच सफरचंदाची बाग.. त्यामुळं साफरचंदांचा आंबट गोड वास.. खाली उतरून आलेले ढग.. हवेत किंतितसा गारवा.. आणि वाफाळलेला जीरा राईस-दालतडका.. आहाहा.. स्वर्ग यहाँ हैं.. यहाँ हैं.. यहाँ हैं.. 
कोणालाही इथून जाववत नव्हतं.. पुढं ट्रॅफिक मध्ये अडकायचं नसेल तर चला असं ड्राइव्हरनं सांगितल्यावर शेवटी पाच वाजता हॉटेलवर जायला निघालो..    



-मी मधुरा.. 

************************************************