९ ऑक्टोबर : उत्तरकाशी - गुप्तकाशी
२०० कि.मी. लागणारा वेळ साधारण ७ तास
सकाळी ८ वाजता ब्रेकफास्ट.. ९ च्या सुमारास हॉटेल सोडायचं.. असं आजच नियोजन..
सात तासाचा मोठ्ठा प्रवास तरी आज ९ चा कॉल टाइम.. कदाचित गुप्तकाशीला मुक्काम हाच आजचा अजेन्डा असावा..
काल हॉटेलवर पोचायला नऊ वाजून गेले.. आज उशिरा निघायचं असल्यानं निवांतपणे गप्पा मारत जेवणं झाली.. चारपाच दिवस आम्ही सगळे बरोबर असलो तरी अजुनी सगळ्यांच्या ओळखी झाल्या नव्हत्या.. चेहरे ओळखीचे होते इतकंच.. प्रत्येक जण आपापल्या बस ग्रुपमध्ये सेटल झाला होता..
इथं ही माझी रूम पार्टनर होती तृप्ती.. आता आम्हाला एकमेकींच्या असण्याची, एकमेकींच्या रुटीनची सवय झाली होती..
वैशालीशी ही छान मैत्री झाली होती.. काही काहींच्या स्वभावातच आईपण असतं.. त्यातलीच ही.. जेवायला थांबणारी.. खाल्लंस का म्हणून विचारणारी.. कानाला काही तरी बांध.. धाडसीपणा करू नको.. असं हक्कानं सांगणारी.. साधना, वाचन, अध्यात्माचा पाया असणारी..
आज उत्तरकाशीहून गुप्तकाशी.. आणि उद्या केदारनाथ.. चारधामातलं वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं..
उत्तरकाशी समुद्रसपाटीपासून ४००० फुटावर आहे तर गुप्तकाशी ४३०० फुटावर.. साधारण समुद्रसपाटीपासून तेवढ्याच उंचीवर.. ही दोन्ही शहरं गढवाल हिमालयात वसलेली.. भागीरथी नदीवर उत्तरकाशी तर मंदाकिनी नदीवर गुप्तकाशी..
उत्तरकाशीवरून भागीरथीच्या उगमापर्यंत जाता येतं तसंच गुप्तकाशीवरून मंदाकिनीच्या उगमाकडं म्हणजेच केदारनाथकडं जाता येतं..
उत्तरकाशी, गुप्तकाशी, काशी वाराणसी.. ही शिवाची ठिकाणं.. शिवा बरोबरच त्यांच्या नावातला समान शब्द 'काशी'.. ह्या काशी शब्दाचा अर्थ काय असेल? का शिवाचं ठिकाण म्हणून काशी? तर शोधता शोधता समजलं कि 'काशी' हा संस्कृत शब्द 'कास' धातूपासून बनला आहे.. आणि काशी चा अर्थ चमकणारा, तेजस्वी किंवा प्रकाशाचं शहर असा आहे..
उत्तरेकडंच प्रकाशाचं गांव, वाराणसी प्रकाशाचं गांव.. पण गुप्त प्रकाशाचं गांव?
तर.. पौराणिक कथेनुसार, धर्मयुद्धातील मनुष्यहत्येचं प्रायश्चित करण्यासाठी पांडव शिवाला भेटायला जातात.. वाराणसीत त्यांना शिव भेटत नाही म्हणून ते शिवाला शोधत हिमालयाच्या दिशेनं जातात.. एके ठिकाणी त्यांना बैल चरताना दिसतो.. तो बैल म्हणजेच शिव हे पांडव ओळखतात.. भीम बैलाची शेपूट आणि मागचे पाय पकडतो.. पण शिव जमिनीत गुप्त होतो.. ते हे ठिकाण म्हणून गुप्तकाशी..
ह्या कथेनुसार, शिव जमिनीत गुप्त होऊ नये म्हणून भीम जमिनीवर पाय आपटतो.. त्यामुळं बैलाच्या शरीराचे पाच तुकडे होतात आणि ते ह्या गढवाल प्रदेशात विखुरतात.. हात तुंगनाथ.. चेहरा रुद्रनाथ.. नाभी मध्यमहेश्वर.. केस कल्पेश्वर आणि पाठ केदारनाथ इथं.. ही पाच ठिकाणं 'पंच केदार' म्हणून ओळखली जातात.. शिवाचा कंठ केदारकांठ पर्वतावर पडल्याचं ही मानलं जातं..
आजचा २०० किलोमीटरचा हा प्रवास डोंगराळ प्रदेश, दऱ्याखोऱ्या, कधी नद्यांच्या बाजूनं तर कधी नद्या ओलांडून, कधी धरणक्षेत्रातून असा..
सुरुवातीलाच भागीरथी नदीवरचं टिहरी धरण लागलं.. भारतातील सर्वात उंचीवरचा हा एक भव्य जलविद्युत प्रकल्प.. सुंदर अफाट जलाशय, विहंगम विलोभनीय दृश्यं असलेला त्याचा टिहरी लेक वॉटर स्पोर्ट्स साठी प्रसिद्ध आहे..
ह्या धारणक्षेत्रानंतर भागीरथीच्या भूप्रदेशातून बाहेर पडून अलकनंदेच्या भूप्रदेशातून प्रवास सुरु झाला.. तिच्या तीरावर वसलेलं श्रीनगर आणि कालीमातेचं प्रसिद्ध धारादेवी मंदिर.. पुढं रुद्रप्रयागला थांबायचं असल्यानं धारादेवीला मुद्दाम वाकडी वाट करून गेलो नाही..
रुद्रप्रयाग..
उत्तराखंडमधील पंच प्रयागांपैकी एक.. जिथं बद्रीनाथहून येणारी अलकनंदा केदारनाथहून येणाऱ्या मंदाकिनीला मिळते..
पंच प्रयाग.. अलकनंदा नदीला येऊन मिळणाऱ्या पाच नद्यांची ही पाच पवित्र संगम स्थानं..
बद्रीनाथहून येणाऱ्या अलकनंदेला प्रथम 'विष्णुप्रयाग' इथं 'धौलीगंगा' येऊन मिळते.. पुढं नंदाकिनी' 'नंदप्रयाग' इथं तर 'कर्णप्रयाग' इथं 'पिंडारगंगा'.. 'रुद्रप्रयाग' इथं केदारनाथहून येणारी 'मंदाकिनी' मिळते.. आणि 'देवप्रयाग' इथं भागीरथी.. देवप्रयाग नंतर अलकनंदा 'गंगा' नावानं ओळखली जाते..
डावीकडून येणारी मंदाकिनी - उजवीकडून येणारी अलकनंदा
रुद्रप्रयाग पासून मंदाकिनीच्या भूप्रदेशातून प्रवास करू केला.. तिलवाडा मंदाकिनीच्या काठावर वसलेलं एक सुंदर गांव.. तसेच डोंगर, तश्याच दऱ्या, तश्याच नद्या पण बदलता लँडस्केप.. तेवढाच खिळवून ठेवणारा..
निसर्गाचं सौंदर्य बघून बघून बघणार तरी किती वेळ?.. शेवटी ते असण्याची ही सवय होऊन जाते..
मग काय डुलक्या काढणं सुरु झालं..
अभिषेक, टूर लीडरनं बसचा माईक हातात घेतला.. आणि सगळ्यांना आपापली ओळख करून द्यायला सांगितली.. नाव, गाव, प्रोफेशन, हॉबी इत्यादी इत्यादी..
हळूहळू माईक बसभर फिरू लागला.. निम्मी लोक तर बीड-संभाजीनगरची.. अभिषेक सुद्धा.. व्यवसायानं MR असलेला अभिषेक आवड म्हणून टूर्स कंडक्ट करतो.. डॉक्टरांचा ग्रुप तर होताच.. SBI मधून निवृत्त झालेल्या इंदूरच्या चार मैत्रिणींचा ग्रुप.. निवृत्त झाल्यावर कोणी ट्रान्स्लेटर म्हणून पुस्तकं अनुवादित करतं तर कोणी शास्त्रीय संगीताचा अभ्यास तर कोणी महिला सक्षमीकरणाचं काम करतं तर कोणी आवड म्हणून कापडाच्या पर्सेस बॅग्स बनवतं.. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला आनंद मुलीचं लग्न झाल्यावर निवृत्त होऊन ट्रॅव्हलिंगची आवड जपतोय.. कोणी वयाच्या पासष्ठी नंतर मानसशास्त्रात मुंबई विद्यापीठातून BA करतंय तर कोणी सप्तशृंगी मठात जाऊन गीतापठण करणार आहे.. जीवनाकडं पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन किती वेगळा.. त्यांचे विचार, त्यांचे अनुभव ऐकायला मजा येईल..
अंताक्षरी, सोलो गाणी, चुटकुले सांगणं.. माईक फिरतंच राहिला..
मजा-मस्ती, गप्पा-टप्पा ह्यांत दिवस कसा गेला कळलंच नाही.. पण जशी संध्याकाळ व्हायला लागली तसं 'अजुनी किती वेळ?' 'कित्ती वेळ प्रवासच करतोय' हे विचार यायला लागले.. सकाळी नऊ वाजता निघालो.. ७ तासाचा प्रवास आणि चहा, जेवणं ह्यासाठी दोन अडीच तास.. म्हणजे पोचायला साडे सहा-सात.. सहा वाजता अजुनी ४५ कि.मी. अंतर बाकी होतं..
अंधार पडायला सुरुवात झाली होती..
चला 'परवचा' म्हणूया.. मागून आवाज आला.. दोन-चार आवजांत 'शुभंकरोती' सुरु झाली.. भीमरूपी, रामरक्षा पर्यंत त्यांत बऱ्याच आवाजांची भर पडली.. गीतेचा नववा पंधरावा अध्याय ही म्हणून झाला.. सात वाजून गेले तरी प्रवास सुरूच.. मग 'श्री राम जय राम जय जय राम' जप सुरु झाला..
थोड्यावेळानं बस थांबली ती थांबलीच.. ट्राफिक जॅम.. यमुनोत्रीचा ट्राफिक जॅमचा अनुभव अगदीच ताजा होता.. त्यावेळी जॅम लवकर लक्षात आल्यानं काही तरी सोय झाली.. पण आत्ता मागं-पुढं गाड्यांची भली मोठ्ठी रांग.. समोरूनही गाड्या येत नव्हत्या.. स्टॅच्यू दिल्याप्रमाणं सगळं स्तब्ध..
मध्येच कधीतरी समोरून गाड्या यायच्या.. ट्राफिक सुटलं असं वाटायचं.. पण आम्ही आहे तिथंच..
सातचे आठ, आठचे नऊ झाले.. अजुनी दहा किलोमीटर अंतर बाकी होतं.. आमच्यापासून पाचशे मीटर अंतरावर घाटात एक बस अडकली होती.. खोदलेल्या डोंगराची वरची कड बसला घासत होती.. अगदी अरुंद रस्ता, एकीकडं हा डोंगर, दुसरीकडं खोल दरी, पाऊसामुळं झालेला चिखल.. ड्राइव्हरचं इंच इंच मागं पुढं करून बस काढणं सुरु होतं.. हिमालयात ड्राईव्ह करणाऱ्या ड्राइव्हर्सची कमाल वाटते.. त्यांचा गाडीवरचा कंट्रोल, त्यांचा पेशन्स कौतुकास्पद आहे..
आमची ही बस इथं थोडी अडकली पण आधीच्या बससाठी झाड-झुडपं काढून जागा मोठ्ठी केल्यानं, दोन चार फांद्या कापून आम्ही पुढं गेलो.. हॉटेलवर पोचायला साडे दहा वाजून गेले..
मला उद्याचा दिवस दिसायला लागला.. सकाळी सहा वाजता निघायचं.. बावीस तेवीस किलोमीटरचा ट्रेक.. तिकडं राहायचं असल्यानं सामानाचं पॅकिंग.. जे माझं मलाच उचलून न्यायचं असल्यानं विचारपूर्वक पॅक करावं लागणार होतं..
इतक्या रात्री जेवल्यानं त्रास होईल म्हणून मी न जेवता बरोबर आणलेला प्रोटीन बार खाल्ला.. तसं ही बस मध्ये थोडंफार खाणं झालेलं होतंच.. तृप्तीकडून रूमची किल्ली घेऊन उद्याची तयारी करण्यासाठी रूमवर गेले..
-मी मधुरा..
************************************************
तिकडचे रस्ते अगदी आठवले तरी पोटात गोळा येतो पण ड्राइवर la खरच साष्टांग दंडवत घालावा असे कौशल्य आणी धाडसी पणा. रोजचे रूटीन आपल्या दोघींचे छान सेट झाले होते madhura. रात्रीचे रोज दुसर्या दिवसाची तयारी करायची आणी मग गप्पा मारता मारता झोपायचे. तुझ्या मुळे सगळ्या प्रवासात छान मज्जा आली
ReplyDeleteमस्तच!
ReplyDelete