हो पुन्हा एकदा हिमालय.. पण ह्यावेळी भारतातून.. भारतातील देवभूमी उत्तराखंडातून..
..असं म्हणतात कि श्रीपशुपतिनाथांची यात्रा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा श्रीकेदारनाथांचं ही दर्शन घेतलं जातं.. मान्यतेनुसार श्रीपशुपतिनाथ शिवाच्या डोक्याचं प्रतीक आहेत तर श्रीकेदारनाथ त्यांच्या पाठीचं!!..
पौराणिक कथेनुसार, कुरुक्षेत्र युद्धानंतर मानव हत्येच्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी, शिवाचा आशीर्वाद घेण्याचा सल्ला कृष्णानं पांडवांना दिला.. शिवाला भेटायला ते वाराणसीला गेले.. युद्धातील मृत्यू आणि अप्रामाणिकपणा ह्यानं पांडवांवर नाराज शिव बैलाचं रूप घेऊन हिमालयातील गढवाल भागात लपून राहिले.. वाराणसीत शिवाची भेट न झाल्यानं ते हिमालयाच्या दिशेनं शिवाच्या शोधात निघाले.. गुप्तकाशी पाशी त्यांना एक बैल चरताना दिसला.. तो बैल म्हणजेच शिव आहे त्यांनी ओळखलं.. पांडवांनी ओळखलं हे लक्षात आल्यावर शिवानं स्वतःला जमिनीत गाढून घ्यायला सुरुवात केली.. त्यांना पकडण्यासाठी भीमानं आपलं विशालकाय शरीर धारण केलं आणि त्यांच्या कंबरेला मिठी मारली.. पण तोवर त्यांचा कंबरेखालचा भाग जमिनीत गाढला गेला होता.. त्यांना दर्शन द्यायचं नाही ह्या उद्देशानं शिवानं आपलं डोकं जमिनीत घातलं आणि ते पशुपतिनाथला बाहेर आलं.. म्हणून पशुपतीनाथला शिवाची पंचमुखी रूपात पूजा केली जाते तर केदारनाथला बैलाच्या पाठीची..
अर्थातच पांडवांच्या ईच्छाशक्तीवर प्रसन्न होऊन शिवानं त्यांना पापांतून मुक्त केलं.. असो..
तर, सप्टेंबर २०२४ कैलास-मानसरोवर यात्रा.. यात्रेची सुरुवात श्रीपशुपतिनाथाचं दर्शन..
सलग गेली दोन वर्ष दर्शनाला येऊन सुद्धा श्रीपशुपतिनाथाचं दर्शन झालं नव्हतं.. २०२२ मध्ये (EBC ट्रेक) प्रचंड गर्दीमुळं दर्शन न घेताच मंदिराच्या प्रांगणातून परतावं लागलं.. आणि २०२३ मध्ये (ACT ट्रेक) मंदिर बंद व्हायच्या वेळेला पोचल्यानं दर्शन झालं नाही.. त्यामुळं आत्ताही दर्शन होईल का नाही ह्याची थोडी धाकधूक मनात होतीच.. पण ह्यावेळी डोळे आणि मन भरेपर्यंत दर्शन झालं.. पंचामृती अभिषेक, चारी दरवाज्यातून दर्शन तर झालंच पण अभूतपूर्ण ऊर्जेचा अनुभव ही आला..
इतकं छान श्रीपशुपतिनाथाचं दर्शन झाल्यावर सुद्धा ह्या दर्शनाची परिपूर्णता जर श्रीकेदारनाथच्या दर्शनानं होणार असेल तर पुढचं ट्रॅव्हल डेस्टिनेशन नक्कीच 'केदारनाथ'.. तिथंच ठरवलं २०२५ च लक्ष्य चारधाम यात्रा..
चारधाम यात्रा करायची ठीक आहे.. पण 'यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ हे चारधाम आहेत' ह्या व्यतिरिक्त मला काहीच माहिती नव्हतं.. मग काय वही पेन्सिल घेऊन शिस्तीत अभ्यासाला सुरुवात केली.. गूगल, youtube सेवेसी हजर होतेच.. प्रत्यक्ष जाऊन आलेल्या मैत्रिणींना नातेवाईकांना फोन केले.. त्यांचे चांगले वाईट अनुभव ऐकले..
माहिती काढताना असं लक्षात आलं की, जे चारधाम माझ्या डोक्यांत आहेत ते उत्तराखंडातील चारधाम-'छोटा चारधाम' आहेत.. आणि खरे चारधाम-'बडा चारधाम' हे भारताच्या चार दिशांना आहेत.. उत्तरेला बद्रीनाथ, पश्चिमेला द्वारका, पूर्वेला जगन्नाथ पुरी आणि दक्षिणेला रामेश्वर..
'छोटा चारधाम' यात्रा हेलिकॉप्टरनं किंवा बाय रोड करता येते.. हेलिकॉप्टरनं ४-५ दिवसात तर बाय रोड १०-१२ दिवसात.. हेलिकॉप्टरनं गेलं तरी यमुनोत्रीला चढून जावं लागतं मग तुम्ही घोड्यानं जा, डोलीतून जा, पिट्टूनं जा किंवा ट्रेक करून.. बाकी ठिकाणी सुद्धा २-४ कि.मी. अंतर चालावं लागतंच..
शांतपणे, निसर्गाला जवळून पाहात मला हिमालय अनुभवायचा असल्यानं मी बाय रोड जाण्याचं ठरवलं.. इथली भौगोलिक परिस्थिती, अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गीक आपत्ती, पर्यटनाच्या सोई सुविधांचा अभाव पाहता सोलो ट्रिप करणं तसं धोक्याचं वाटलं.. प्रतिकूल परिस्थितीत जबाबदार असं कोणीतरी हवं हा विचार करून ग्रुप बरोबर जाण्याचं निश्चित केलं..
छोटा चारधाम पैकी यमुनोत्री आणि केदारनाथ ही दोनच ट्रेकची ठिकाणं.. यमुनोत्रीचा ट्रेक अवघड असला तरी एका दिवसात चढून उतरणं शक्य आहे.. पण केदारनाथला एक दिवस चढण्यासाठी आणि एक दिवस उतरण्यासाठी ठेवावा लागतो.. म्हणजे केदारनाथला मुक्काम आला.. राहण्याच्या सोयी मर्यादित असल्यानं बहुतेक टूर्स कंपनींना हा ट्रेक नको असतो.. घोडी, डोली, पिट्टू असे पर्याय ते देतात.. त्यामुळं माझ्यासाठी केदारनाथला मुक्काम असणारी, ट्रेकिंगची मुभा देणारी ग्रुप टूर शोधणं हा मोठ्ठा टास्क होता..
कधी जायचं??
ह्या चार पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा साधारणपणे एप्रिल/मे (अक्षयतृतीया) ते ऑक्टोबर/नोव्हेंबर (भाऊबीज) ह्या कालावधीत केली जाते.. अक्षयतृतीयेला केदारनाथ-बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडतात.. 'कपाट उघडणं' हा शब्दप्रयोग खास करून वापरला जातो.. आणि ही कपाटं भाऊबीजेदिवशी बंद होतात.. मंदिर बंद असताना भगवान केदारनाथांची उत्सव मूर्ती एका विशेष पालखीतून खाली उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात आणली जाते तर भगवान बद्रीनाथांची उत्सवमूर्ती ज्योतिर्मठ/जोशीमठ येथील नरसिंह मंदिरात.. गंगोत्रीमाँ मुखबा गावात तर यमुनोत्रीमाँ खर्साली गावात आणली जाते..
गेल्यावर्षीपासून उत्तराखंड सरकारनं हिवाळी चारधाम म्हणजेच 'उखीमठ-ज्योतिर्मठ-मुखबा-खर्साली' यात्रा सुरु केली आहे..
ह्यावर्षी श्रीकेदारनाथ मंदिर २ मे ते २० ऑक्टोबर तर श्रीबद्रीनाथ मंदिर ४ मे ते २ नोव्हेंबर ह्याकाळात दर्शनासाठी खुलं असणार होतं.. शेवटी शेवटी म्हणजे साधारण ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात यात्रा केली तर दिवाळी पण साधता येणार होती.. तब्बल २० वर्षांनी भारतात दिवाळी साजरी करायची संधी मला सोडायची नव्हती.. त्यामुळं ऑक्टोबरचा पहिला दुसरा आठवडा निश्चित केला..
कोणाबरोबर जायचं??
काय हवंय, काय करायचंय, कधी जायचंय हे जरी माहिती असलं तरी कोणाबरोबर जायचं हे कळत नव्हतं.. गूगल केलं तर हजारोंनी टूर ऑर्गनायझर्स सापडले.. त्यातले किती विश्वसनीय होते काय माहिती.. केसरी, वीणा वर्ल्ड सारख्या मोठ्ठ्या कंपनीकडून मिळणाऱ्या यथाकथित 'प्रवासाचा अनुभव' ह्यापलीकडं जाऊन थोडं अध्यात्मिक, जमिनीशी रूट्सशी जोडलेलं असं काही तरी हवं होतं.. सरधोपट ट्रॅव्हलर्स, टूर कंपन्या आणि त्यांचे ठरलेले प्लॅन्स हे तर नक्कीच नको होतं.. सोलो ट्रॅव्हलिंगची सवय असल्यानं त्याच्याशी थोडं मिळतं जुळतं असणारं, मातीशी-संस्कृतीशी जवळीक असणारं असं काही तरी मी पहात होते..
चारधाम बद्दल मी जसं वाचत गेले, माहिती काढत गेले तसं कुतूहल वाढत गेलं.. प्रामुख्यानं केदारनाथधाम.. खडतर प्रवास, प्रतिकूल परिस्थिती हे तर झालंच पण त्याच बरोबर असणारं पौराणिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक वलय, सनातन धर्माची निव, आदी शंकराचार्य, भीमशिळा, भैरव मंदिर.. सगळंच विस्मयजनक..
खरं तर 'पशुपतिनाथाच्या दर्शनानंतर केदारनाथाचं दर्शन' ह्या मागचा साधा सरळ विचार.. पण ह्या विचाराचं एका अनामिक ओढीत कधी रूपांतर झालं कळालंच नाही.. कैलास मधील ऊर्जा अनुभवल्यानंतर आता इथंली ऊर्जा अनुभवण्याची आस लागली.. परत 'शिवतत्व', परत हिमालय, परत ते 'असल्यातलं नसलेपण' आणि 'नसल्यातलं असलेपण' अनुभवणं.. त्यावेळी जशी मी कैलासमय होऊन गेले होते तशी आता केदारनाथमय होऊन गेले..
कैलास यात्रेच्या वेळी एका सत्संगात सदगुरु म्हणाले होते Set your mind on Kailas, your body will follow.. तसंच काहीसं Set your mind on Kedarnath, universe will follow.. त्यामुळं माझा विश्वास होता, किती ही अडचणी आल्या तरी चारधाम होणार.. आणि झालं ही तसंच.. निघायच्या दिवसापर्यंत असंख्य अडचणी, नन्हाचा पाढा सुरु होता पण प्रचंड इच्छाशक्ती, कॉस्मिक एनर्जी यामुळं ही अडथळ्यांची शर्यत मी पार करू शकले..
जुलै महिना आला तरी कोणा बरोबर जायचं हे कोड काही सुटत नव्हतं..
.. आणि एक दिवस.. अचानक.. स्क्रोल करताना 'चित्तपावन फौंडेशन'च्या पेज वर 'विश्वविहार' ची पोस्ट पहिली.. ही पोस्ट पाहते काय.. त्यांच्या व्हाट्स अँप नंबरला मेसेज करते काय.. आणि टsssडाsss.. कोड्याचा मिसिंग पीस सापडतो काय.. सगळंच एकदम स्मूथ..
मेसेज केल्यावर विश्वविहार कडून सेजलचा लगेच आलेला पर्सनल रिप्लाय.. टिपिकल ऑटो रिप्लाय नाही तर खरंच मदत करण्याची जाणीव असलेला रिप्लाय.. मेसेज, चाट न करता डायरेक्ट फोनवर बोलून माझ्या प्रश्नांचं, शंकांचं केलेलं निरसन.. तिच्याशी बोलताना आलेल्या पॉसिटीव्ह वाइब्स.. आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे ४ ऑक्टोबरला असणारी चारधामची ग्रुप टूर..
दुसऱ्याच दिवशी डिटेल ई-मेल आली.. टूर बद्दलची इतंभूत माहिती असलेली.. पॅकेज मध्ये काय इन्क्लुड आहे काय नाही.. डिस्काउंट, ऍडव्हान्स, पेमेंट ऑपशन्स.. अगदी बारीकसारीक गोष्टींची माहिती असलेली पारदर्शक ई-मेल..
.. आणि इटिनेररी मध्ये 'केदारनाथला मुक्काम' पाहिल्यावर माझ्यासाठी 'विश्वविहार' नो ब्रेनेर चॉईस होता..
चारधामांची ही परिक्रमा आत्म्याच्या शुद्धीसाठी, अंतरात्माच्या उन्नतीसाठी केली जाते असं म्हणतात.. मंदिरात प्रदक्षणा जशी डावीकडून उजवीकडं म्हणजेच क्लॉकवाईज घातली जाते तशीच ही परिक्रमा यमुनोत्री पासून सुरु होऊन गंगोत्री, केदारनाथ करत बद्रीनाथला संपते..
वेळेच्या बंधनांमुळं आजच्या धावपळीच्या जगात काही भाविक 'दो धाम' यात्रा देखील करतात.. चारपैकी दोन धामांची तीर्थयात्रा.. केदारनाथ आणि बद्रीनाथ किंवा यमुनोत्री आणि गंगोत्री..
चारधाम यात्रा एकूण १६०० ~ किलोमीटरची आहे..
साधारण इटिनेररी:
५ ऑक्टोबर : हरिद्वार - बारकोट
६ ऑक्टोबर : बारकोट - जानकी चट्टी - यमुनोत्री - बारकोट
७ ऑक्टोबर : बारकोट - उत्तरकाशी
८ ऑक्टोबर : उत्तरकाशी - गंगोत्री - उत्तरकाशी
९ ऑक्टोबर : उत्तरकाशी - गुप्तकाशी
१० ऑक्टोबर : गुप्तकाशी - सोनप्रयाग - केदारनाथ
११ ऑक्टोबर : केदारनाथ - सोनप्रयाग - गुप्तकाशी
१२ ऑक्टोबर : गुप्तकाशी - बद्रीनाथ
१३ ऑक्टोबर : बद्रीनाथ - रुद्रप्रयाग
१४ ऑक्टोबर : रुद्रप्रयाग - ऋषिकेश - हरिद्वार
१५ ऑक्टोबर : हरिद्वार - दिल्ली
फिटनेस??
सेंट हेलन्स ट्रेकसाठी मी ट्रेन करत असल्यानं चारधामसाठी वेगळं काही करायची आवश्यक्ता नव्हती.. रेग्युलर जिम रुटीन आणि वीकएंड ट्रेक्स इतकं पुरेसं होतं..
खरंतर चारधामयात्रेसाठी वय, फिटनेस लेवल याची कसलीच अट नाही.. घोडा, डोली, पिट्टू मिळत असल्यानं ही यात्रा कोणीही करू शकतं.. फक्त इच्छा पाहिजे.. थोडा फिटनेस असेल तर जास्ती मजा येईल..
टूर बुक करून झाली.. विमानाचं तिकिट काढून झालं..
आता I'm all set for Chardham Yatra असं म्हणायला हरकत नाही..
-मी मधुरा..
************************************************
सुंदर वर्णन.
ReplyDeleteसुरुवात ter जोरात झाली आहे. पुढे वाचायला उत्सुक आहे. तुझ्या बरोबर मी ha अनुभव घेतला आहे पण प्रत्येकाचा पर्सनल एक कनेक्ट होतो te वाचण्यास mi उत्सुक आहे
ReplyDeleteट्रम्प शुभ प्रभात
ReplyDeleteखुप थंडी असून सुद्धा तू लिहिलेला पहिला भाग वाचून पुनः एकदा ही यात्रा करावी आणी देवभूमीला जावे वाटणे ही भावना होणे हे केवळ तुझ्या जादुई लिखाणाने प्रेरित होऊन व्यक्त होत आहे.
तू चौकोनी घडीव संगमरवरी मानवी रूपातील जादुई करिश्मा आहेस
जास्ती काय लिहू
खुप छान 👍🌹🌹🌹
Very nicely described
ReplyDeleteमधुरा अतिशय सुंदर वर्णन केले आहेस, चारधाम यात्रेला जाण्याचं स्वप्न अनेक वर्षे मी पण बघत होते पण कदाचित तुझी सोबत मिळावी हा दैवयोग होता. मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा👌👌👍👍
ReplyDeleteखूपच छान वर्णन केलं आहेस मधुरा , मनःपूर्वक शुभेच्छा 👏
ReplyDeleteBackground is all set आता खऱ्या यात्रेच वर्णन वाचायला उत्सुक आहे.
ReplyDeleteखूप सुंदरच गं .. माझीही इच्छा आहे कधीतरी … तुझ्या ब्लॉग ची पुष्कळच हेल्प होईल. तुला चित्पावन टूर्स कडून फ़ोन आल्याचे वाचताना का कोणास ठावूक आनंदाने एकदम डोळ्यात पाणी तरळले! पुढचा भाग पटकन वाचते आता ….
ReplyDeleteHi..
ReplyDeleteखूप सुंदर प्रवास वर्णन... आई-बाबाच्या तोंडून वर्णन ऐकलंच होतं.. तुम्ही ते शब्दात खूप सुंदर मांडलय.... नमस्कार मी श्री व सौ. सुरेखा भुजंगराव पाटील यांची मुलगी आहे. खूप सुंदर लेखण....