Saturday, December 20, 2025

हरिद्वार - बारकोट - जानकी चट्टी - यमुनोत्रीधाम

५ ऑक्टोबर : हरिद्वार - बारकोट 
१८५ कि.मी. लागणारा वेळ साधारण ७ तास..   

ब्रेकफास्ट करून ९ वाजता हॉटेल सोडायचं.. आणि आरामात प्रवास करत संध्याकाळ पर्यंत बारकोटला पोचायचं.. हे आजचं नियोजन.. 

कालच्या संध्याकाळचं गारुड अजुनी मनावर आहे..
कसली अल्हाददायक संध्याकाळ होती कालची!!.. वाटलं, काठावर बसून त्या हजारो तरंगणाऱ्या दिव्यांना कायमचं पाहात राहावं.. ते आरतीचे सूर.. ते वातावरण.. ह्या सारखी यात्रेची सुंदर सुरुवात असूच शकत नाही..

काल रूमवर आल्यावर आधी गरम गरम पाण्यानं अंघोळ केली.. प्रवासात असताना रात्री अंघोळ करणं मला आवडतं.. त्यामुळं दिवसभराचा शीण थकवा निघून जातो.. रात्री अंघोळ करणं - दुसऱ्या दिवशीचे कपडे बाहेर काढून ठेवणं - ही माझी सवय.. त्यामुळं दुसऱ्या दिवशी तयार व्हायला वेळ ही लागत नाही.. आणि रूम शेअर करत असू तर आवरायला ही सोपं जातं..   
तर, माझ्या रूममेट होत्या साताऱ्याच्या विजयाताई.. पुण्यापासूनच त्या बरोबर होत्या.. बस मध्ये पण शेजारच्या सीटवर.. त्यामुळं बऱ्यापैकी ओळख झाली होती.. एकेकट्या आलेल्या बहुतेक तिघीच जणी आहोत.. त्यामुळं आता आमची जोडी शेवटपर्यंत असेल असं वाटतंय.. बाकी नवरा बायकोच्या जोड्या नाहीतर मैत्रिणींच्या जोड्या.. 
जेवण करून आल्यावर विजयाताईंशी बोलता बोलता कधी झोप लागली ते कळालंच नाही.. 


बसला स्टार्टर मारेपर्यंत साडे नऊ वाजलेच.. कालचीच बस.. कालचाच ग्रुप.. त्यामुळं प्रत्येकाची नावं लक्षात नसली तरी चेहरे ओळखीचे झाले होते.. आज बारकोटला गेल्यावर सगळे आपापला परिचय करून देणार होते.. तसं ही चाळीस जणांशी ओळख एका दिवसात होणं शक्यच नव्हतं.. 

कसा तरी तासभराचा प्रवास झाला असेल, अचानक बस थांबली.. पुढं दुसरी ही बस थांबलेली दिसली.. अभिषेक बसचा दरवाजा उघडून आत आला आणि म्हणाला, "मधुरा मॅडम तुमची हरकत नसेल तर तुम्हाला दुसऱ्या बस मध्ये शिफ्ट करत आहोत.." .. तशीही मी सडीफटिंगच.. माझी काहीच हरकत नव्हती.. माझी सॅक घेऊन मी दुसऱ्या बस मध्ये गेले.. टूर लीडरच्या शेजारची सीट रिकामी दिसली.. तिथं बसले.. 

बस सुरु झाली.. 'ह्या मधुरा मॅडम, अमेरिकेहून आल्या आहेत' अभिषेकनं माझी ओळख करून दिली.. मी मागे वळून सगळ्यांना हॅलो केलं.. 'आहो ट्रम्प, असे एकटेच काय बसलाय.. या इकडं.. तेवढं टेरिफचं बोलून घेऊ..' एक आवाज ऐकायला आला.. 'म्हणजे बिझनेसचं डील करता येईल..' दुसरा आवाज.. इतकं बोलून थांबले नाहीत तर माझ्यासाठी एक सीट रिकामी पण झाली.. आठ जणांचा घट्ट ग्रुप.. चार कपल्स.. त्यातले एकदोन वगळता बाकी सगळे डॉक्टर्स.. काही बालवाडीपासूनचे सोबती तर काही कॉलेजचे तर काही प्रोफेशनमुळं.. हसा, दुसऱ्याला हसवा, आनंदी राहा.. ह्या प्रिस्क्रिप्शनचे चालते बोलते प्रसारक.. शब्दांच्या कोट्या करणं, मनसोक्त हसणं, दाद देणं अगदी अंगभूत.. काही तासापूर्वी सद्गुरूंचं 'मृत्यू' पुस्तक वाचत असणारी मी आत्ता जीवन कसं जगावं हे पहात होते..

साडे आकाराच्या सुमारास वॉशरूम आणि टी ब्रेकसाठी बस थांबली.. ओळखी व्हायला, मैत्री व्हायला वॉशरूमच्या रांगेसारखी जागा नाही हे मात्र नक्की 😂.. इथंच माझे आणि वैशालीचे मैत्रीचे सूर जमले.. पुणे एअरपोर्टवर जस्ट हाय हॅलो केलेल्या आम्ही आता एकाच बस मध्ये ही होतो.. 

सगळ्यांचा चहा झाला.. वॉशरूम ब्रेक झाला.. आजूबाजूला फिरून पाय मोकळे करून झाले.. पण तरी सगळं निवांतच चाललं होतं.. फोटो सेल्फी काढणारी मंडळी मात्र व्यस्थ दिसत होती.. 'ही जागा छान आहे आपण रील करूया' इति तृप्ती मॅडम.. दोन-चार रील झाले.. ग्रुप फोटो झाले तरी इथून निघण्याचं नावंच नाही.. परत वॉशरूमला जायचे विचार लोकांच्या मनात यायला लागले.. 
'चला चला बस आली.. '.. म्हणजे इतक्या वेळ बस नव्हती?.. टायरचं पंक्चर काढण्यासाठी बस गेल्याचं आम्हाला माहिती पण नव्हतं..

इथं चांगला दीड तास गेल्यानं, बस वेळेवरून घसरली ती घसरलीच.. पावसाची भुरभुर, ट्रॅफिक जॅम सगळ्याला तोंड देत बारकोटला पोचायला रात्रीचे दहा वाजले.. भूक, दमणूक त्यात थंडी.. 
पण ह्या ट्रॅफिक जॅम मध्ये एक गोष्ट मात्र चांगली झाली.. चहाबाजांच्या दुनियेत मला एक कॉफीवेडा भेटला.. माझा कॉफी पार्टनर.. संतोष मामा.. आठ मित्रांच्या कंपूतला एक अवलिया.. 

दुसरे दिवशी सकाळी सहा वाजता हॉटेल सोडायचं होतं.. यमुनोत्रीधामला जाऊन परत इथंच यायचं असल्यानं चेकऊट करायचं नव्हतं ही जमेची बाजू.. 

६ ऑक्टोबर: बारकोट - जानकी चट्टी - यमुनोत्री - बारकोट 
बारकोट ते जानकी चट्टी .. ४५ कि.मी. 
जानकी चट्टी ते यमुनोत्री .. ७ कि.मी. ट्रेक 

काल रात्री झोपायला १ वाजून गेला.. दहा वाजता आल्यावर जेवणं, रूम ओह्ह रूम नाही टेन्ट मिळणं, सामान येणं, अंघोळ, आणि थंडी, वारा, पाऊस लक्षात घेऊन ट्रेकसाठीच्या योग्य कपड्यांची निवड करणं.. आणि नवीन रूममेट 'तृप्ती मॅडम' बरोबरच्या गप्पा.. गप्पा इतक्या रंगल्या की एका रात्रीत टूर असिस्टंट 'तृप्ती मॅडम' ची मैत्रीण तृप्ती झाली.. 


बेडवर पडल्यावर जाणवलं, किती काय काय झालं आजच्या दिवसांत.. सुरुवातच बस बदलण्यानं झाली.. बस बदलणं किती सोपं होतं कसली ऍटॅचमेंटच नव्हती.. असं आयुष्य जगता यायला पाहिजे.. चल म्हंटलं कि निघालं.. कोणताही किंतू नाही.. तर बस बदलली.. नवीन ओळखी झाल्या.. सात तासाच्या प्रवासाला तेरा तास लागले.. जंक न खाता भुकेकडं जागृकतेनं पाहिलं.. गरम पाणी नसलं तरी थंडीत थंडगार पाण्यानं अंघोळ केली.. बरंच काही शिकायला मिळालं.. स्वतःला पारखता आलं.. 


सकाळी सहा वाजता स्वेटर, मफलर, कानटोप्या, जॅकेट्स घालून बंडलउप झालेली मंडळी, काही चहा बिस्कीट घेत गप्पा मारत होती तर काही फोटो काढण्यात मग्न.. बरोबर सव्वा सहा वाजता बसनं हॉटेल सोडलं.. अजुनी उजाडलं ही नव्हतं.. 
कैलास-मानसरोवर केल्यापासून मंदिरं-तीर्थक्षेत्र याकडं पाहायचा माझा दृष्टीकोनच बदलला आहे.. कोणत्याही तीर्थक्षेत्राचा प्रवास हा आधी आतून झाला पाहिजे.. मग बाहेरून.. बुद्धी आणि मनानं आधी तिथं पोचलं पाहिजे.. स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं पाहिजे.. ही सद्गुरूंची शिकवण मी नेहमी अवलंबते.. सकाळच्या शांभवी साधनेत मी मनानं यमुनोत्रीला जाऊन पोचले होते.. नंतर मला फक्त त्या झोन मध्ये राहायचं होतं.. गरज असेल तरच बोलणं, मनात जप सुरु ठेवणं इत्यादी इत्यादी.. 

फक्त ४५ कि.मी. अंतर असलं तरी ४६०० फुटाची चढाई, खराब अरुंद रस्ते यामुळं दीड-पावणे दोन तासाचा प्रवास.. आठच्या सुमारास आम्ही जानकी चट्टीला पोचलो.. उतरण्यापूर्वी सँडविच, केळं, फ्रुट जूस असा पॅक्ड ब्रेकफास्ट आमच्या बरोबर दिला.. 
जानकी चेट्टीचा पार्किंग एरिया खूप मोठ्ठा आहे.. आजूबाजूला ट्रेकिंगच्या सामानांची भरपूर दुकानं, रेस्टोरेंट्स, वॉशरूम्स आहेत.. पार्किंग ते ट्रेलहेड अंतर साधारण तीन कि.मी.चं आहे.. त्यामुळं पार्किंग ते मंदिर अंतर साधारण १० कि.मी.. 
माझ्या बस मधले मी, वैशाली-आनंद आणि दुसऱ्या बस मधले अजुनी चारपाच जण इतकेच ट्रेक करून जाणार होतो.. अधून मधून पाऊस पडत असल्यानं शु कव्हर्स, रेन पॉन्चो ची खरेदी झाली.. चालण्यासाठी बांबूची काठी रेंट केली.. फ्रेश होऊन ट्रेल हेड च्या दिशेनं चालायला सुरुवात केली.. 

यमुनोत्रीधाम.. 
समुद्रसपाटीपासून १०८०० फुटावर असलेलं यमुना नदीच्या उगमाचं क्षेत्र.. 
पौराणिक संदर्भानुसार यमुना ही सूर्यदेवाची कन्या आणि मृत्युदेवता यमाची बहीण.. तिला राधेचं स्वरूप ही मानलं जातं.. तिच्या पाण्यात स्नान केल्यानं मृत्यूचं भय जातं, आध्यात्मिक शुद्धी होते अशी मान्यता आहे.. म्हणूनच यमुनोत्रीला धाम-धार्मिक क्षेत्र असं म्हणतात.. 

उत्तराखंडातील चारधामपैकी यमुनोत्री हे पहिलं धाम.. 
डाव्या बाजूनं ही यात्रा करतात म्हणून यमुनोत्रीधाम हे पहिलं धाम.. इतकंच कारण असेल का? का ह्या क्रमानंच यात्रा कारण्यामागं अजुनी काही अर्थ असेल?.. 
आपल्या पुराणांत, धर्मशास्त्रांत गंगेबरोबरीनंच यमुनेचं ही महत्व आहे.. यमुनेला पोषक आणि भावनिक शुद्धतेचं प्रतिक मानलं जातं तर गंगेला मानसिक आणि कार्मिक शुद्धतेचं.. केदारनाथ (शिव) त्याग, अलिप्तता आणि भक्तीचं प्रतिक तर बद्रीनाथ (विष्णू) आत्मसाक्षात्कार आणि अंतिम मोक्षाचं.. म्हणजेच शुद्धता शुद्धीकरणापासून सुरु झालेला प्रवास त्यागातून भक्तीतून आत्मसाक्षात्काराकडं जातो.. किती गूढ गर्भीतार्थ आहे ह्या परिवर्तनकारी चारधामयात्रेचा! ह्यानंतर माझा चारधामयात्रेचा दृष्टीकोनच बदलला.. 
'मनाची, विचारांची, वागण्याची शुद्धता माझ्यात येवो' हाच विचार घेऊन यमुनोत्रीधामला जायचं.. 

सकाळी ८:२० : वैशाली, आनंद आणि मी पार्किंग पासून ट्रेल हेड च्या दिशेनं चालायला सुरुवात केली.. बसेस, यात्रेकरू, घोडे, बाईक्स यांच्या गर्दीतून मार्ग काढत पुढं जात होतो.. पार्किंग पासून ट्रेल हेड पर्यंत जायला बाईक्सची सोय आहे.. जे ट्रेक करणार आहेत, चालत जाणारच आहेत ते कश्याला तीन किलोमीटरसाठी बाईक करतील?.. 
गर्दी, चढ, चिंचोळी वाट, चालण्याचा वेग ह्यामुळं पहिल्या पाच दहा मिनिटांतच आम्ही वेगळं झालो.. 

काही मिनिटांतच मी ट्रेल हेड ला येऊन पोचले.. 

ट्रेलला नमस्कार करून 'जय यमुना मैय्या' म्हणून चालायला सुरुवात केली.. 
जी वाट मंदिरापर्यंत घेऊन जाते तिचं पावित्र्य ही जपायला हवं.. 

किती ऋषी-मुनी, किती महात्मे, किती साधू-संत ह्या वाटेवरून गेले असतील ह्या विचारानं अंगावर काटा आला..  
कृतज्ञ भावनेनं मी चालायला लागले.. 


आता पुढील सात किलोमीटर फक्त चढ आणि चढच.. २६०० फुटाची चढाई.. 
पावसाची भुरभुर, हवेत किंचित गारवा ट्रेकसाठी उत्तम हवामान.. 
इतर हिमालयातील ट्रेक सारखं 'middle of no where' असं अजिबातच नव्हतं.. ट्रेलच्या दोन्ही बाजूला दुकानं, खाण्यापिण्याची सोय.. अगदी माणसाळलेला ट्रेल.. आजूबाजूला सतत काही ना काही घडत होतं.. घोडयांच्या गळ्यातील घुंगरांचे आवाज, डोलीवाल्यांचे रेडिओ.. 
ह्या ऊर्जेच्या प्रवाहात मी चालत राहिले.. 


साधारण तीन किलोमीटर नंतर गर्दी, दुकानं विरळ होत गेली.. आणि चढ ही अवघड झाला.. तीव्र चढ आणि अरुंद वाट.. काही ठिकाणी तर धक्का लागला, पडलो तर कपाळमोक्षच.. 

ट्रेल म्हणजे फक्त पायवाटच नव्हती तर पायऱ्या पण होत्या.. असंख्य न संपणाऱ्या पायऱ्या.. 






मी माझ्या नादातच चालत होते.. 
कानावर आवाज पडला.. वो देखो माँ का मंदिर दिखाई दे रहा हैं... 
इतक्यात? कसं शक्य आहे? अजुनी दहा पण वाजले नाहीत.. पाहिलं तर लांब दूरवर काहीतरी मंदिरासारखं दिसत होतं.. 

दहा-बारा मिनिटांतच मंदिर स्पष्ट दिसू लागलं.. 

चढायला सुरु केल्यापासून दोन तास वीस मिनिटांत मी यमुनोत्रीच्या प्रांगणात होते.. यात्री रेजिस्ट्रेशन दाखवून मंदिराच्या दिशेनं निघाले.. दुतर्फा पूजा-प्रसादाची दुकानं.. चहा खानपानाची दुकानं.. कोणत्याही मंदिराच्या ठिकाणी असेल तसं वातावरण.. 
'पूजा?' एका गुरुजींनी विचारलं.. मी हो म्हणाले.. माझ्याकडं न बघताच ते पुढं चालत राहिले आणि त्यांच्या मागून मी.. 
'स्नान?'.. तप्तकुंडांकडं बोट दाखवत त्यांनी विचारलं..
पाण्यांत हात घालून, डोक्यावर थोडं पाणी शिंपडून घ्यावं असं वाटलं पण तिथली एकंदर परिस्थिती पाहता फक्त 'नही' उत्तर आलं.. 
तप्तकुंडच्या बाजूनं त्यांनी वर मंदिरात नेलं.. काठी, शूज, सॅक काढून बाजूला ठेवली.. एक हॉल वजा जागा होती.. कोपऱ्यात एक पूजा सुरु होती.. 'उनके बाद आपका'.. मी मान डोलावली.. 
माझा नंबर आला.. आणि गुरुजींनी विश्वास नाही बसणार अशी सुंदर पूजा माझ्याकडून करून घेतली.. मंदिराची माहिती सांगितली.. 
यमुनेची पूजा म्हणजे पाणी तत्वाची पूजा.. तिच्या गरम पाण्याच्या स्रोताची पूजा केली जाते.. ओटी भरली जाते.. पूजा करताना, हे पाणी हातात घेऊन डोक्यावर शिंपडताना माझ्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहत होत्या.. कोणताही विचार त्यावेळी मनात नव्हता.. फक्त तिथं मी होते.. 

नंतर यमुनामातेची मूर्ती असलेल्या मंदिरात गुरुजी मला घेऊन गेले..
 
डाव्या बाजूची उत्सवमूर्ती - मधली यमुना - उजव्या बाजूची गंगा

यमुनेच्या मंदिरात गंगा?.. तर, ऋषी असित इथं तपश्चर्या करण्यासाठी आले आणि इथंच राहिले.. रोज ते इथं यमुनेत आणि गंगोत्रीला जाऊन गंगेत स्नान करत.. वयोमानाप्रमाणं जेव्हा त्यांना हे शक्य होईना तेव्हा गंगा ह्या ठिकाणी प्रकट झाली.. 

सगळं झाल्यावर मी गुरुजींना त्यांच्या दक्षिणेविषयी विचारलं तर म्हणाले मला काहीही नको.. स्वखुशीनं जे द्यायचं असेल ते अन्नदानासाठी द्या.. दिलेल्या पैशाची अधिकृत पावती त्यांनी माझ्या हातात ठेवली.. (खरं तर मला हे सांगायला आवडत नाही पण गुरुजींच्या मोठ्ठेपणासाठी सांगितलं..).. गुरुजींना दक्षिणा देऊन नमस्कार केला.. 


मंदिराच्या आवारात बसले असताना तृप्ती आणि काही मंडळी आलेली दिसली.. अकरा वाजता माझं सगळं आवरून मी निवांत बसलेलं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं.. घोड्यावरून येणारी ही पहिली बॅच होती म्हणे.. तप्तकुंडात अंघोळ करून आता पूजेला निघाले होते.. 


यमुनोत्रीला तीन तप्तकुंड आहेत.. दोन मोठ्ठी एक पुरुषांसाठी आणि एक बायकांसाठी.. आणि एक सूर्यकुंड ज्यात तांदूळ आणि बटाटा उकडून देवीचा प्रसाद म्हणून खाल्ला जातो.. (ह्यातलं मी काहीही केलं नाही..)

चार वाजता पार्किंग मध्ये भेटायचं असल्यानं बराच वेळ हातात होता.. यमुनेच्या पात्राकडं पहात बसावं म्हणून पायऱ्या उतरून खाली आले.. 
यमुनेचं पात्र उगमाच्या मनानं बऱ्यापैकी मोठठं असलं तरी खळखळतं आहे.. 
यमुनोत्री.. यमुनेचं उगमस्थान असं म्हंटलं जात असलं तरी खरा उगम यमुनोत्री ग्लेशिअर सप्तर्षी कुंड इथं आहे.. मंदिरापासून आठ दहा किलोमीटर दूर आणि १४५०० फुटावर असणारं हे कुंड नेहमी बर्फाच्छदित असतं.. प्रोफेशनल ट्रेकर्स ट्रेक करून तिथपर्यंत जाऊ शकतात..
यमुनेकडं पाहत असताना विचार आला, संतुष्ट समाधानी असून सुद्धा हवंहवंसं वाटणारं हे रितेपण काय आहे?.. 
मधूनच येणारा गारवारा, पावसाचे शिंतोडे घेत पाण्याकडं पाहत बसले.. 

इकडं ही थंडगार पाण्यांत डुबकी मारणं सुरूच होतं.. इतक्यात एक साडी पाण्यातून वाहात येताना दिसली.. कोण बुडालं असेल? का काही बरं वाईट?.. मागून अजुनी एक साडी.. म्हणजे नदीत अंघोळ करून सोडून दिलेल्या साड्या होत्या.. हे काय सुरु आहे? किती हा अतिरेक? यमुनेच्या उगमालाच असं असेल तर दिल्लीतल्या यमुने बद्दल काय हळहळ व्यक्त करणार?..

पावसाचा जोर वाढायच्या आत खाली उतरायचं होतं.. त्यात निसरडी वाट.. किती वेळ लागेल काय माहिती..  
सकाळपासून काहीच खाल्लं नसल्यानं बरोबर आणलेला बार आणि केळं खाल्लं.. 
सव्वा बाराच्या दरम्यान उतरायला सुरुवात केली..   
यमुना, त्या सोडलेल्या साड्या.. माझ्या नजरेसमोरून जात नव्हत्या.. डिटॅचमेंट- अलिप्तता हे कारण असेल का? उतरताना गर्दी तशी कमी झाल्यानं उजव्या बाजूला असणारी यमुना अधून मधून दिसत होती.. पुढं आल्यावर अजुनी काही कपडे तरंगताना दिसले.. काही बाजूच्या झाडांना अडकले होते.. का करत असतील असं?.. ह्या 'सोडून देणं' मागचं शास्त्र काय असेल?.. 

मी खाली उतरत असताना दुसऱ्या बस मधला ग्रुप चढत होता.. म्हणजे 'चार वाजता पार्किंग मध्ये भेटणं' अशक्य.. 

दोन वाजता ट्रेलच्या प्रवेशद्वारापाशी पोचले.. पावसाला चांगलीच सुरुवात झाली होती.. सकाळचा रोड आत्ता ओळखू येत नव्हता.. 
पार्किंगला पोचले.. दुकानात काठी परत केली.. आणि एका रेस्टारेंट मध्ये गडगडाटासह होणाऱ्या मुसळधार पावसाकडं पहात कॉफी वर कॉफी घेत बसले.. 



-मी मधुरा.. 

************************************************

2 comments:

  1. खाली उतरत असताना एक मोठी वीज अगदी डोळ्यासमोर कडाडली. अगदी भितीदायक आवाज करत आणी मग जोरात पाऊस सुरू. घोड्यावर होतो तेव्हा, पावसाचा अगदी मार खात खाली उतरत होतो. आठवणी ताज्या झाल्या

    ReplyDelete
  2. मस्तच पुन्हा… एक बैठकीत सगळे भाग वाचतेय

    ReplyDelete