Sunday, December 21, 2025

बारकोट - उत्तरकाशी - गंगोत्रीधाम - उत्तरकाशी

७ ऑक्टोबर : बारकोट - उत्तरकाशी 
८२ कि.मी. लागणारा वेळ २ तास 

.. आपण नियोजन करायचं पण त्याप्रमाणं घडणार का नाही ते त्या विधात्याच्या हातात.. त्याच्या मर्जी शिवाय पान सुद्धा हालत नाही तर आमची बस काय.. विषयच नाही.. 
यमुनोत्रीचं दर्शन घेऊन दुपारी चार वाजता पार्किंग मध्ये भेटायचं.. चहा घेऊन साडे चार - पाच वाजेपर्यंत बारकोटसाठी निघायचं.. हे कालचं नियोजन.. चार चे सहा वाजले तरी अजुनी सगळी मंडळी परत आलीच नव्हती.. न आलेल्या मंडळींची साडे सहा वाजेपर्यंत वाट पाहायची नाहीतर एक बस बारकोटला निघेल असं सर्वानुमते ठरलं.. साडे सहाच्या सुमारास कळालं कि पुढं रस्ता जॅम झालाय.. पाच वाजता निघालेल्या गाड्या १५ किलोमीटर पण पुढं गेल्या नाहीत.. मग पुढं जाऊन अडकण्यापेक्षा सगळे येई पर्यंत तिथंच थांबायचं ठरलं.. सातच्या सुमारास सगळी मंडळी आली.. दिवसभरच्या दमणुकीनं कधी एकदा बस सुटते आणि मुक्कामाच्या ठिकाणी जातो असं झालं होतं.. पाऊसाचा जोर कमी झाला असला तरी अजुनी पाऊस होताच..

साडे सातला एकदाचं पार्किंग सोडलं.. वैतागलेल्या कावलेल्या आम्हाला हुश्श झालं.. सुटकेचा निःश्वास टाकेपर्यंत अचानक बस थांबली.. ड्राइवर खाली उतरला.. काही वेळातच तृप्ती पण उतरली.. पुढं काय वाढून ठेवलंय याला अनभिज्ञ आम्ही, बरोबर आणलेला खाऊ खाऊन घेऊ, पोचायला उशीर होईल ह्या विचारांत.. बराच वेळ झाला तरी तृप्ती आली नाही म्हटल्यावर शंकेची पाल चुकचुकली.. 
तृप्ती आली आणि म्हणाली, "पुढं अडीच तीन किलोमीटरवर जाणाऱ्या गाड्यांची रांग दिसती आहे.. घाट बंद झालाय.. दरडीमुळं का गाडी अडकल्यानं नक्की माहिती नाही.."  
ह्यावर काय बोलणार?? बस मध्ये एकदम चिंतेचं वातावरण.. सगळे दमलेले, भुकेलेले, वैतागलेले.. तृप्तीचा ह्यातून मार्ग काढायचा तिच्या परीनं प्रयत्न सुरु होता.. दुसरी बस तर अजुनी पार्किंग मध्येच होती.. आमच्यातले जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेले अनुभवी शूरवीर लढायला सज्ज झाले.. आजूबाजूला काही हॉटेल्स, रेस्टोरेंट्स अगदी टपरी तरी दिसती आहे का? असेल तर बायकांची सोय होईल.. पावसापाण्याचं कुठं जाणार?.. असं म्हणून तृप्तीबरोबर मोहीम हातात घेतली..
बाजूलाच ५०० मीटरवर एक हॉटेलसारखी बिल्डिंग दिसत होती.. तिकडं जाऊन चौकशी करून चहा आणि वॉशरूमचा जुगाड करण्यात ते यशस्वी झाले.... 

PC दया मॅडम
जुगाड अश्यासाठी की, ती बिल्डिंग म्हणजे भावी हॉटेल.. ज्याचं अजुनी बांधकाम सुरु होतं.. थोडाफार स्वयंपाक करण्या इतपत किचन, आणि एक वापरण्याजोगी वॉशरूम.. काही रूमचं फ्लोरिंग सुरु होतं तर काहींचं इंटिरियर..

तिथून कोजागिरीचा चंद्र खूप सुंदर दिसत होता..
बारकोटला हॉटेलवर कोजागिरी जागवायची.. मसाला दूध, एकमेकांच्या ओळखी, खेळ, गप्पा-गाणी.. नुसते प्लॅन्स.. 


एकूणच परिस्थिती पाहता पुढं न जाणं चांगलं.. असा विचार गरम चहाच्या घोटाबरोबर अनेकांच्या डोळ्यांत दिसला.. चहा बिस्किटं खाऊन होईपर्यंत तो तृप्तीकडं आणि तृप्तीकडून अभिषेकपर्यंत पोचला पण.. 
ह्या बिकट परिस्थितीत, फारशी साधन सामुग्री नसताना, आमची राहायची सोय करायला ते तयार झाले.. प्रेमानं गरम गरम रस्सा पोळी भात खाऊ घातला.. गरम पाणी, उबदार पांघरुणं.. काय केलं नाही त्यांनी.. 
कोणतीही कल्पना नसताना एकदम वीस जणांची सोय करणं सोपं नव्हतं.. प्रेम, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती, अतिथी देवो भव, जी काही त्यांची भावना असेल त्या भावनेला सलाम.. सगळ्यांनाच हे जमत नाही.. 

दुसऱ्या बसची पण राहण्याची सोय तिकडं जवळंच झाली..

एकेका खोलीत चार-पाच जण.. अंथरूण पांघरुणं, कोणी कुठं झोपायचं ह्याचं नियोजन होऊन झोपायला बारा वाजून गेले.. 
जमिनीवर अंथरलेल्या चादरीवर पाठ टेकल्यावर छताकडं पाहताना वाटलं, कोणाची तरी माझ्यावर इतकी कृपा आहे कि पाठ टेकायला जमीन आणि थंडी-पावसापासून रक्षण करायला डोक्यावर छत आहे.. दिवसभराचे घामट कपडे जरी अंगावर असले तरी पोटात गरम गरम अन्न आहे.. कोणतीही परिस्थिती आली तरी मार्ग दाखवणारा सोबत आहे.. अजुनी काय हवं?.. 


सकाळी नेहमीच्या वेळी जाग आली.. आजची साधना यमुनामैय्याच्या अंगणात होती तर!.. मैय्याच ती.. काळजी घेणारंच.. 
सहा वाजता दारावर ठकठक झाली.. पहाटे चार वाजता घाट सुरु झालाय आणि आपण आवरून लगेचच निघत आहोत.. फटाफट सगळ्यांनी आवरायला घेतलं.. अर्धा तासांत सगळे तयार.. चहाची ही वाट न पाहता बस मध्ये जाऊन बसले पण.. 
बारकोटला पोचायला नऊ वाजून गेले.. 
हॉटेलची साईट पाहिल्यावर अरे यार.. कसली धम्माल आली असती.. कशाला मुकलो ह्या विचारानं वाईट वाटलं पण कशातून तरलो हे आठवून हायसं वाटलं.. 
गेल्या गेल्या चहा कॉफी तयारच होती.. ब्रेकफास्ट न करता अकरा वाजता ब्रंच.. आणि नंतर उत्तरकाशीकडं प्रयाण.. 

उत्तरकाशी:
उत्तरकाशी म्हणजेच उत्तरेकडील काशी.. एक समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेलं प्राचीन स्थान.. मैदानी प्रदेशातील काशी वाराणसी इतकंच महत्वाचं.. 
उत्तरकाशी आणि काशी वाराणसी गंगा नदीच्या काठावर वसलेली, वरुण आणि असी नद्यांच्या भूभागाचा प्रदेश असलेली, इतकंच काय मणिकर्णिका नावाचा घाट असलेली, विश्वनाथांना -शिवाला समर्पित अशी ठिकाणं..
असं म्हटलं जातं, कलियुगाच्या शेवटी काशी वाराणसी प्रलयात लुप्त झाल्यावर उत्तरकाशी शिव विश्वनाथांचं निवासस्थान असेल..  


काशी विश्वनाथ मंदिर..
पुराणानुसार, मार्कंडेय ऋषी.. भगवान शिवाचे असीम भक्त.. यमराज जेव्हा मार्कंडेय ऋषींचे प्राण घेण्यासाठी आले तेव्हा आपल्या ह्या लाडक्या भक्ताचे प्राण घेऊन जाणाऱ्या यमाला शिवानं अडवलं.. ज्या ठिकाणी हे घडलं तिथं विश्वनाथांचं मंदिर उभारण्यात आलं..
ह्या मंदिराची स्थापना भगवान परशुरामांनी केली.. नंतर मंदिराचा जीर्णोद्धार राणी खानेती देवींनी केला.. 
त्यामुळं काशी विश्वनाथाच्या मंदिरात भगवान परशुराम आणि ध्यानस्थ मार्केंडेय ऋषी यांची मंदिरं आहेत.. 

काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात थोडंसं डावीकडं कलंडलेलं शिवलिंग, पार्वतीमाता आणि गणपती आहेत.. आणि गाभाऱ्याबाहेर सुंदर असा नंदी.. 
ध्यानात मग्न भगवान भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करतात असं म्हणतात.. तिथं असणाऱ्या ह्या ऊर्जेचा मी अनुभव घेतला आहे.. 




मंदिराच्या समोरच आदिशक्तीला समर्प्रित शक्ती मंदिर आहे.. या मंदिरातून बाहेर डोकावणाऱ्या भव्य पितळी त्रिशूळावर विश्वनाथ मंदिर कसं बांधलं गेलं हे सांगणारा एक शिलालेख आहे.. २६ फूट उंच असलेल्या या त्रिशूळाच्या तळाचा घेर साधारण ९ फूट तर वरच्या भागाचा घेर साधारण २ फूट आहे..  





काशी विश्वनाथ मंदिराबरोबरच अनेक मंदिरं उत्तरकाशीत काशीत आहेत.. 

साधारण चारच्या सुमारास आम्ही मंदिराच्या आवारात पोचलो..  
भव्य प्रांगण.. एकदम स्वच्छ नीटनेटकं.. गर्दी असली तरी शिस्तीत वागणारी.. 
गेल्यावर चप्पल स्टॅन्ड वर शूज ठेवून दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो.. प्रसन्न वातावरणात एक वेगळीच पवित्रता जाणवत होती.. 
गाभाऱ्याच्या समोरच्या नंदीचं दर्शन घेतलं आणि आत काही तरी हललं.. दाटून आल्यासारखं.. 
यंत्रवत गाभाऱ्यात प्रवेश केला, दर्शन घेतलं, बाहेर आले.. मला काहीही कळत नव्हतं.. वैशालीच्या मागून बाकी मंदिरात जाऊन आले.. 
दर्शन झाल्यावर फ्री टाईम होता.. बाकी मंडळी मार्केट पाहायला गेली.. 
पण मला ही जागा सोडून बाहेर जाण्याची इच्छाच होईना.. मंदिराच्या समोरच्या आवारात डोळे मिटून बसले.. तिथली ऊर्जा हवीहवीशी वाटत होती.. डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहतंय कळत होत.. पण पुसण्यासाठी सुद्धा हालचाल करावी असं वाटत नव्हतं.. मंदिरातला घंटानाद हळूहळू धूसर होत गेला.. 
खोलवर काहीतरी मलाच माझ्यात सापडलं होतं.. सापडल्याची जाणीव झाली.. आणि त्या ट्रान्स मधून बाहेर आले.. तिथंच मंदिराकडं पाहात कितीतरी वेळ बसून राहिले.. 

निघायची वेळ झाली.. कोणाशीही काहीही बोलावंसं वाटत नव्हतं.. माझ्याच बरोबर मला राहायचं होतं.. 
हॉटेलवर आले.. चेक इन झालं.. आवरून जेवण करून बेड वर जाऊन पडले.. 

८ ऑक्टोबर : उत्तरकाशी - गंगोत्रीधाम - उत्तरकाशी 
१०० कि.मी. लागणारा वेळ ३.५ तास 

सकाळी सातचा कॉल टाईम.. साडे सहापासून चहा-कॉफीची सोय.. आणि पिकनिक स्टाईल ब्रेकफास्ट.. 

सात सव्वा सातच्या सुमारास बस गंगोत्रीच्या दिशेनं निघाली.. आज ट्रेक, घोडा, पिट्टू कसलीच गरज नव्हती.. बस थेट गंगोत्री पर्यंत जाणार.. पार्किंग पासून मग काय तो दीड-दोन कि.मी. चालणं.. मंदिरात जायचं गंगेची पूजा करायची म्हणून आज महिला वर्ग छान तयार होऊन आला होता.. कोणी साड्या, कोणी सूट्स तर कोणी कुडता.. काही गंगास्नान पण करणार होते.. एकंदरीत बस मध्ये उत्साही वातावरण होतं.. 

उत्तरकाशी ते गंगोत्रीधाम चारधामयात्रेतील सर्वात सुंदर, विलोभनीय, नैसर्गिक सौंदर्याची मुक्तहस्तानं उधळण करणारा मार्ग.. 
गंगेच्या उगमाकडं भागीरथीच्या किनाऱ्यानं थेट उंच उंच हिमालयाकडं जाणारा.. कधी भागीरथीला समांतर तर कधी थेट कड्याच्या बाजूनं कोरलेला.. 
आकर्षक गढवाली गावांतून जाणारा.. मोठ्ठाल्या सफरचंदांच्या बागा, देवदार पाइनची जंगलं असणाऱ्या हर्षिल व्हॅलीतून जाणारा.. डोंगर-दऱ्यांचं विहंगम दृश्य असणारा सुखी टॉप.. विल्सन कॉटेजसारख्या ऐतिहासिक स्थळामुळं इतिहासाशी नाळ जोडून असणारा.. तरी अतिशय शांत निसर्गरम्य मार्ग.. स्वित्झर्लंड मध्ये तर नाही ना असं क्षणभर वाटून गेलं.. 
फोटो ही काढायचं भान राहिलं नाही.. निसर्गाशी तादात्म्य.. 

 


इथंच एका ठिकाणी ब्रेकफास्ट साठी थांबलो.. आजूबाजूला हिरवेगार डोंगर.. काही बर्फाची टोपी घातलेले.. बाजूला खळखळ वाहणारं पाणी.. एकदम पिक्चर परफेक्ट लोकेशन.. 
आणि खोल श्वास घेऊन निसर्गाला स्वतःत झिरपून घेण्यासाठी ही एकदम परफेक्ट .. 
 
उत्तरकाशीपासून बऱ्याच उंचीवर आल्यानं हवेत गारवा चांगलाच वाढला होता.. हवा विरळ ही झाली होती.. 
    
गरम गरम उपमा काही औरच लागत होता..



ह्याच मार्गावरचं 'मुखवा' गावं हे गंगामातेचं हिवाळ्यातील निवासस्थान.. 
ऑगस्टमध्ये झालेल्या ढगफुटीत वाहून गेलेलं धराली गावं ही ह्याच मार्गावरचं.. पाहून कससंच झालं.. मागं राहिल्या होत्या त्या पूर्वी गांव असल्याच्या पुसटश्या खुणा.. निसर्गाची दोन्ही रूप - निर्मिती आणि ऱ्हास - अगदी काही कोसांच्या अंतरावर पाहायला मिळाली..  

अकराच्या सुमारास गंगोत्रीधामला पोचलो.. 

गंगोत्रीधाम:
गंगोत्रीधाम हे चारधामयात्रेतील दुसरं धाम.. समुद्रसपाटीपासून १०२०० फुटावर देवदार आणि पाइन वृक्षांच्या नयनरम्य परिसरात वसलेलं धाम.. 
पौराणिक कथेनुसार, राजा भगीरथाच्या अथक प्रयत्नांनंतर, भगवान शिवाच्या जटांतील एका केसातून निर्माण झालेली गंगा स्वर्गातून धरतीवर अवतरली.. म्हणून ही भागीरथी.. देवप्रयागला अलकनंदाशी संगम झाल्यावर भागीरथीची गंगा होते.. 
भगीरथ शिळा जिथं भगीरथानं भगवान शिवाची आराधना केली होती तिथं गंगोत्रीमातेचं मंदिर आहे.. मंदिराजवळ भागीरथीचा प्रवाह तीन भागात विभागलेला दिसतो.. आणि पुढं जाऊन त्यांचा परत एक प्रवाह होतो.. हे तीन प्रवाह ब्रह्मा, विष्णू आणि शिवाला समर्पित आहेत.. 

एका आख्यायिकेनुसार, धर्मयुद्धानंतर मृत्युमुखी पडलेल्या सर्व जीवांच्या मुक्तीसाठी पांडवांनी इथं महान 'देवयज्ञ' केला होता.. 
असं म्हणतात कि भागीरथीच्या काठावर पूर्वजांचे विधी केल्यानं त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळते.. आणि तिच्या पाण्यात स्नान केल्यानं वर्तमान तसेच पूर्वजन्मांतील पापांचा नाश होतो.. 

यमुनोत्री प्रमाणेच गंगेचं मूळ उगमस्थान गंगोत्री ग्लेशिअर मधलं 'गोमुख'.. समुद्रसपाटीपासून १३२०० फूट उंचीवर.. आणि मंदिरापासून १९ कि.मी. अंतरावर.. हर्षिल व्हॅली - गोमुख ट्रेक करून जाता येतं..

पार्किंगपासून सरळ एक रस्ता मंदिराकडं जातो.. दुतर्फा कोणत्या ही मंदिराच्या बाहेर दिसतील अशी दुकानं.. प्रसाद, पूजेचं सामान, गंडे-दोरे, गंगेच्या पाण्यासाठी मोठमोठ्या कॅन्स पासून ते अगदी छोटे छोटे कॅन्स.. वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या मटेरिअल्सचे.. सुवेनिअर्स.. सुरुवातीला मोठ्ठा वाटणारा रस्ता हळूहळू अरुंद होत जातो.. 
धक्काबुक्की करत एकदाची सगळी निळी डोकी मंदिराच्या प्रांगणात पोचली.. सगळ्यांची पादत्राणं एका पोत्यात गोळा करून ठेवायला दिली.. आणि पात्राकडं जाण्यासाठी पायऱ्यांच्या दिशेनं निघालो.. 

प्रचंड थंडी.. जमिनीवर ठिकठिकाणी साठलेलं पाणी.. अनवाणी पावलं.. पायातून सर्वांगात शिरू पाहणारी थंडी.. आणि तिचं पहिलं दर्शन झालं.. खळाळून वाहताना.. स्तब्ध होऊन पहातच राहिले.. तिचं ते खळखळणं आकर्षक, मंत्रमुग्ध करणारं.. नुसतं पहात राहावं सं.. 


एक छोटासा घाट.. अगदी गजबजलेला.. गुरुजींच्या चाललेल्या पूजा, लोकांच्या अंघोळी, गंगा भरून घेणं, फोटो-व्हीडिओ काढणं.. 
आम्ही ही गंगा पूजा करणार होतो.. गंगेची पूजा म्हणजे पात्रात भरून आणलेल्या गंगेच्या पाण्याची पूजा.. थोडक्यात घरी घेऊन जायच्या गंगेची पूजा.. 
पूजेपूर्वी गृप मधल्या काही जणांनी त्या थंडीत, बोचणाऱ्या वाऱ्यात गार पाण्यात अंघोळ केली.. मी मात्र पाण्यात उभी राहून बराच वेळ गंगेकडं पहात, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते.. 

अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानं पूजेसाठी आम्ही एका खोलीत जमलो.. काचेची भिंत असलेली खोली.. जिथून खाली वाहणारी गंगा स्पष्ट दिसत होती.. 
गंगेकडं पाहताना यमुनोत्रीपासूनचा 'सोडून देणं' हा विचार वर आला.. 
लोक येतात.. पापनाशनासाठी डुबकी मारतात.. आणि कृतज्ञतेसाठी काहीतरी द्यायचं, सोडायचं म्हणून अंगवस्त्र, वस्तू तुमच्यांच पाण्यांत सोडतात.. पापनाशन करायला तुम्ही आहातच म्हणून तुम्हाला किती गृहीत धरलं गेलंय.. त्यामुळं ना पापं करणं कमी झालंय ना तुमच्यांत गोष्टी सोडणं ना तुम्हाला घाण करणं.. 
सोडून असं काही तरी द्यायला हवं ना ज्यानं स्वतःची, आत्म्याची प्रगती होईल.. प्रगती नाही झाली तरी निदान अधोगती होणार नाही.. फार काही नाही पण एखादी सवय.. तिरुपतीला जाऊन दारू सिगारेट सोडल्याची कितीतरी उदाहरणं आहेत.. भगवद गीतेत सांगितली 'फलाची अपेक्षा सोडणं'.. संतांनी सांगितलेला 'देहाचा मोह, षडरिपु सोडणं'.. मान्य आहे कि हे महाकठीण आहे.. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.. एकदम नाही होणार.. हा पण एक प्रवास आहे.. हळूहळू तिथंवर पोचू.. 
'डिटॅचमेंट'- 'अलिप्तता'.. मोह-माया वस्तूंची, माणसांची, नात्यांची हळूहळू कमी करणं.. हा कैलासला साक्षी ठेवून केलेला माझा संकल्प.. संसारांत राहून, सगळी कर्म करत हे करणं खूप अवघड आहे.. दरवेळी हे भान राहिलंच असं नसतं.. काही कार्मिक ऋणानुबंध असतात.. पण शिकणं सुरु आहे..  

आम्ही सगळ्यांनी एकत्रच गंगा पूजा केली.. नंतर गंगोत्रीमातेचं मंदिर पहायला गेलो.. 



अतिशय साधं, सुंदर, पांढऱ्या शुभ्र संगमरवरातलं गंगोत्रीमातेचं हे मंदिर.. 
बाकी मंदिरांत असते तशी कसली कलाकुसर नाही कि शिल्पकला नाही.. 
नागर स्थापत्यशैलीतलं हे मंदिर १८ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातलं.. नेपाळी सेनापती अमर सिंह थापा यांनी बांधलेलं.. नंतर जयपूरच्या महाराजांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली..  




बाहेरच्या सारखीच मंदिरातील रचना ही साधी सरळ.. मुख्य गर्भगृह एका उंच चौथऱ्यावर.. गर्भगृहाच्या समोर पूजा-प्रार्थनेसाठी बसता येईल असा एक छोटा मंडप.. गर्भगृहात गंगामातेच्या मूर्ती बरोबरच यमुना, अन्नपूर्णा, सरस्वती, लक्ष्मी यांच्या मूर्ती.. आणि बाजूला भागीरथ आणि आदि शंकराचार्यांची मूर्ती..  

भगीरथ शिळा 
गंगोत्रीमातेची पालखी



मंदिराच्या परिसरात भगवान शिव, गणपती, हनुमान आणि भागीरथ यांची छोटी मंदिरं आहेत.. 

 




अडीचच्या सुमारास गंगोत्रीधाम सोडलं.. समृद्ध करणारा अनुभव बरोबर घेऊन..

यमुनोत्री आणि गंगोत्री दोन्ही पवित्र नद्यांची उगमस्थानं.. दोन्हीकडं ही त्यांची तितक्याच भक्तिभावानं पूजा होते.. पण गंगेचं पाणी जसं घरी मुद्दाम आणलं जातं तसं यमुनेचं पाणी आणताना मी कोणाला पाहिलं नाही.. दोन्ही नद्यांमध्ये पापनाशनासाठी डुबकी मारताना श्रद्धा तीच असेल ना? मग असं का? यमुनेपेक्षा गंगेभोवती असलेलं पौराणिक कथांचं वलय हे कारण असू शकेल का?

मूळ जरी हिमालय असलं तरी ग्लेसिअर्स वेगळी असल्यानं दोन्ही नद्यांचा रंगात, त्यांच्या खळखळण्यांत जाणवण्या इतका फरक होता.. यमुनेचा रंग गडद निळा थोडीशी हिरवट छटा असणारा तर गंगेचा थोडा फिकट निळा.. यमुनेपेक्षा गंगेच्या पाण्याला खळखळाट जास्त होता.. 
दोन्ही नद्यांचं पाणी हातात घेतलं तेव्हा त्या पाण्यांत जिवंतपणाची एक ऊर्जा जाणवली.. 'पाण्याला आठवण असते' असं विज्ञान ही सांगतंच की.. कदाचित जाणीवपूर्णक झालेल्या पाण्याच्या स्पर्शामुळं ही ऊर्जा जाणवली असेल..

सव्वा तीनच्या दरम्यान जेवणासाठी थांबलो.. हर्षिल व्हॅली किंवा थोडं आधी असेल.. अतिशय सुंदर ठिकाण.. पर्वताच्या टोकावर.. नजर जाईल तिकडं पर्वत आणि दऱ्या.. शेजारीच सफरचंदाची बाग.. त्यामुळं साफरचंदांचा आंबट गोड वास.. खाली उतरून आलेले ढग.. हवेत किंतितसा गारवा.. आणि वाफाळलेला जीरा राईस-दालतडका.. आहाहा.. स्वर्ग यहाँ हैं.. यहाँ हैं.. यहाँ हैं.. 
कोणालाही इथून जाववत नव्हतं.. पुढं ट्रॅफिक मध्ये अडकायचं नसेल तर चला असं ड्राइव्हरनं सांगितल्यावर शेवटी पाच वाजता हॉटेलवर जायला निघालो..    



-मी मधुरा.. 

************************************************

4 comments:

  1. अतिशय सुंदर प्रवासवर्णन !

    ReplyDelete
  2. खूप सुंदर

    ReplyDelete
  3. ओघवत्या भाषेत प्रवास वर्णन

    ReplyDelete
  4. अप्रतिम.. प्रॅक्टिकल logistics च्या माहितीबरोबरच तुझे आंतरिक अनुभव छान गुंफले आहेस.

    ReplyDelete