Friday, December 19, 2025

पुणे - दिल्ली - हरिद्वार

 ..टूर बुक झाली.. विमानाचं तिकिट काढलं.. आणि माझं कॉउंट डाउन सुरु झालं.. 

चारधाम यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंचं रजिस्ट्रेशन उत्तराखंड सरकारकडं करावं लागतं.. प्रवासाची ठिकाणं, तारखा दिल्यावर एक युनिक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो.. प्रत्येक ठिकाणी हे रजिस्ट्रेशन दाखवावं लागतं.. 
'विश्वविहार'नं मधल्या काळात ही फॉर्मॅलिटी पूर्ण करून घेतली.. 

शास्त्राप्रमाणं व्हाट्स अँप ग्रुप तयार झाला.. रितीप्रमाणं टूर मॅनेजर बरोबर झूम कॉल झाला.. 
आता वेध लागले ते ४ ऑक्टोबरचे.. 

एक आठवडा आधी म्हणजे २७ सप्टेंबरला मी पोर्टलंडहून पुण्याला आले.. 

४ ऑक्टोबर : पुणे - दिल्ली - हरिद्वार
ग्रुप मीटिंग पॉईंट : दिल्ली एअरपोर्ट, सकाळी १० वाजता  

सकाळी साडे सहा वाजता दिल्लीची फ्लाईट असल्यानं पहाटे पावणे चारच्या सुमारास घर सोडलं.. आजचा दिवस बराच मोठ्ठा असणार होता.. दिल्ली पर्यंत विमानाचा प्रवास आणि तिथून पुढं २२० कि.मी. बसनं हरिद्वार.. हरिद्वारला गंगा आरती करून हॉटेलवर मुक्काम.. 

आम्ही सगळे सहप्रवासी आज पहिल्यांदाच भेटणार होतो.. ग्रुपचा झूम कॉल झाला असला तरी आमची ओळख किंवा बोलणं असं झालं नव्हतं.. 
२० जणांचे दोन ग्रुप.. असे आम्ही ४० जणं.. बीड-संभाजीनगर, नाशिक, पुणे, मुंबई, इंदूर अश्या वेगवेगळ्या भागातून आलेले.. वेगवेगळ्या प्रोफेशनचे.. वेगवेगळी बॅकग्राऊंड असलेले.. आमच्यात एक गोष्ट मात्र कॉमन होती ती म्हणजे आमचं 'मराठीभाषिक' असणं.. 
इतक्या मोठ्ठ्या ग्रुप मध्ये मला हवा असलेला एकांत, माझं माझ्याबरोबर राहणं, माझ्या बरोबरचा संवांद जो मला अपेक्षित आहे तो मिळेल का?.. कैलास-मानसरोवरला ग्रुप असला तरी 'सद्गुरू' आम्हाला जोडणारा धागा होता.. तिथं आम्हाला 'मौना'साठी खास वेळ दिला जायचा.. स्वतःला शोधणं, स्वतःपर्यंत पोचायचा प्रयत्न करणं हा ही त्या यात्रेचा भाग होता.. पण इथं? तशी मी एकटीच होते पण ग्रुप मध्ये हे एकटंपण जपलं जाईल का?.. कदाचित चारधाम परिक्रमेतून हे शिकायला मिळेल..  

पुणे एअरपोर्टला ग्रुप मधली आणखी तिघं भेटली.. पिंपरीहून आलेलं एक कपल आणि साताऱ्याची एक महिला.. सुरुवातीचं हाय हॅलो झालं.. पुढं काय?.. बोर्डिंग होईपर्यंत एकमेकांचा अंदाज घेत बसून राहिलो.. अर्धवट झोपेत, पेंगत दिल्लीला पोचलो.. 
बॅगेजक्लेम पाशी विश्वविहारचा निळा टी-शर्ट, निळी टोपी घालून उभ्या असलेल्या हसतमुख तृप्ती मॅडम नी आमचं स्वागत केलं.. 
बॅग्स घेऊन, फ्रेश होऊन एअरपोर्टच्या बाहेर आल्यावर दृष्टीस पडली ती निळ्या टोपीवाल्या माणसांची जत्रा.. मी पण निळी टोपी घालून ह्या जत्रेचा भाग झाले.. जशी विमानं येतील तशी निळी डोकी वाढू लागली.. 
'अभिषेक' आमचा ग्रुप लीडर.. हेडसेट घालून माईक वरून सूचना देत ग्रुपची मोट बांधायला सज्ज असलेला उत्साही म्होरक्या.. हातात विश्वविहारचा झेंडा आणि डोक्यावर निळी टोपी असणाऱ्या ह्या म्होरक्याच्या मागं आमची चाळीस जणांची टोळी लेफ्ट राईट करत पार्किंगला पोचली.. गळ्यांत झेंडूच्या माळा घालून आमच्या सारथ्यांनी आमचं स्वागत केलं..  


.. आणि विश्वविहारच्या दोन बस दिल्लीच्या हमरस्त्यांवरून हरिद्वारच्या दिशेनं धावू लागल्या.. 

हरिद्वार.. 
२४० कि.मी. लागणारा वेळ साधारण साडे चार तास..

पूर्वी मायापुरी, कपिला, गंगाद्वार नावांनी ओळखलं जाणारं हरिद्वार..
कुंभ मेळ्याचं पावित्र्य जपणारं हरिद्वार.. मोक्षाचा मार्ग असणारं हरिद्वार.. ब्रह्मा-विष्णू-महेश ह्या त्रियीचं हरिद्वार.. हरिंच्या पावलांना स्पर्श करणाऱ्या गंगेचं हरिद्वार.. 

संध्याकाळी सहाच्या सुमारास 'हर की पौड़ी' (ब्रह्मकुंड) घाटावर पोचलो.. 
'हर की पौड़ी' म्हणजे हरीचे पाय.. 
हा घाट राजा विक्रमादित्यानं इसवी सन पूर्व पहिल्या शतकात आपल्या भावाच्या भर्तृहरीच्या स्मरणार्थ बांधल्याची नोंद आहे.. 
असं मानलं जातं की, समुद्र मंथनानंतर गरुड अमृताचा कलश घेऊन जात असताना, अमृताचे काही थेंब या ठिकाणी पडले होते..      


भागीरथीची गंगा झाल्यावर तिच्या प्रवाह क्षेत्रात येणारं हरिद्वार हे दुसरं क्षेत्र.. आणि ह्या क्षेत्रावरच्या घाटावर, गंगा आरतीनं झालेली आमच्या चारधाम यात्रेची सुरुवात!.. 
गंगेचं दर्शन घेऊन, तिची पूजा-आरती करून, तिच्या उगमापर्यंतचा उलटा प्रवास करणं हे किती थ्रिल्लिंग, एक्सायटिंगाय!!..

गंगेकाठी आलो तेव्हा नुकतीच गंगेची पूजा होऊन आरतीला सुरुवात होत होती.. 
भाविक नदीत फुलं आणि दिवे सोडून गंगेची पूजा करतात.. त्यामागची श्रद्धा अशी कि जसा दिवा तरंगत जातो तसाच मुक्तीच्या मार्गावरचा प्रवास असुदे.. 

पडू लागलेला अंधार.. पाण्यांत तरंगणारे असंख्य दिवे.. घाटावर तेवणारे आरतीचे दिवे.. असं वाटतं होतं की रात्र साज श्रुंगार करून स्वागतास उभी आहे.. 

 
गंगा आरती हा एक अनुभव आहे.. हा एक अनुभव संपन्न सोहळा आहे.. इथं जमणाऱ्या भाविकांच्या भक्तीचा, श्रद्धेचा, ऊर्जेचा सोहळा.. त्यामुळं हरिद्वार, ऋषिकेश, बनारस घाटांवरील आरतीचा अनुभव एक सारखा नक्कीच नसेल असं मला वाटतं.. 


आरती संपते ना संपते तोच काहींनी नदीत चक्क उड्या मारल्या तर काहींनी नदीच्या काठावर बसून तांब्या तांब्या पाणी अंगावर घेण्यात समाधान मानलं.. काहींनी घाबरत घाबरतच पाण्यात पाय बुडवले.. तर काहींनी फोटो, सेल्फी काढून त्या क्षणाची डिजिटल नोंद घेतली.. 

हे पाहिल्यावर वाटलं, गारठ्यात गंगेकाठी आरतीची उब घेणारा भाविक खरा की बर्फासारख्या थंड पाण्यात डुबकी मारणारा श्रद्धाळू खरा? त्या ऊर्जेशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करणारा साधक खरा की तीर्थक्षेत्रांची यात्रा करणारा यात्रेकरू खरा? 
हेतू, दृष्टीकोन वेगळा असला तरी प्रत्येकाला ह्या मंत्रमुग्ध करणाऱ्या लहरींतून नक्कीच काहीतरी मिळालं असेल.. 



-मी मधुरा.. 

************************************************

6 comments:

  1. मंजुषा रेडगावकरDecember 19, 2025 at 6:58 PM

    मधुरा अग किती जिवंत वर्णन केलंस, तुझ्या लिखाणाने परत एकदा चारधाम यात्रेचा अनुभव घेता येतोय हे एकदम मस्त वाटतं आहे.👍👍

    ReplyDelete
  2. पुन्हा एकदा सगळे चित्र डोळ्यासमोर जश्यास तसे उभे केलेस तू. आपली एयरपोर्ट ची पहिली भेट पण आठवली.

    ReplyDelete
  3. तुझ्यामुळे पशुपती नाथ, हरिद्वार यांची कथा, माहिती मिळाली..
    दोन्ही ठिकाणे पहिली पण माहिती कोणी सांगितली नाही...

    ReplyDelete
  4. सुंदर वर्णन.

    ReplyDelete
  5. मस्त… खूप ओघवत लिखाण असल्यान अगदी आपलीही यात्रा होतेय वाटतेय … thank you…

    ReplyDelete
  6. शिवाच्या/ देवाच्या शोधात निघालेला प्रत्येक माणूस खरा. मग तो काठावर ऊब घेणारा असो वा पाण्यात डुबकी मारणारा. मौनात राहणारा असो वा दंगा करणारा. कारण शिवाची झालेली व्यक्ती स्वतःची उरते कुठे ? तिच्याकडून सारे तोच तर करून घेतो. सुंदर लेखन.

    ReplyDelete