Wednesday, March 29, 2023

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं ४६ ते ४८)


४६. रावण राजा राक्षसांचा.. शरद तांदळे..  




अनार्य दासीपुत्र दशग्रीव ते त्रिलोकीचा राजा, राक्षसांचा राजा रावण हा प्रवास अद्भुत करणारा आहे.. 

लेखकाच्या लेखणीतून रावण जेव्हा त्याच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडतो तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वाचे ज्ञात असलेले सर्व गडद रंग हळूहळू फिकट होत जातात आणि समोर उभा राहतो तो "महानायक".. दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना एकत्र करून राक्षस संस्कृतीची निव ठेवणारा महानायक... "रक्ष: इति राक्षस:".. रक्षण करणारा रक्षक म्हणजेच राक्षस ही विचारधारा जपणारा महानायक.. स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत भेदभाव नसलेली संस्कृती उभी करणारा राक्षस संस्कृतीचा जनक असणारा महानायक.. 

अनार्य दासीपुत्र असल्याने जन्मदात्यानं नाकारलेलं त्याचं आर्यपण.. आर्य का अनार्य हा "स्व"चा शोध घेण्यात भरकटलेलं बालपण.. धर्माला महत्व देणाऱ्या धर्मनितीमुळं बिथरलेल्या बालपणात शापित आयुष्य संपवण्याचा निर्णय.. कर्तृत्वावर नाही तर कुळावर श्रेष्ठत्व ठरवणाऱ्या दांभिकांकडून झालेली उपेक्षा, अवहेलना, अपमान आणि ह्यातून तयार झालेला बंडखोर.. ज्या बंडखोरीला अफाट ज्ञानाची बैठक ही आहे.. 

हे सगळं वाचताना मनात एक कल्लोळ उठतो.. त्याच्यामुळं आयुष्य उध्वस्त झालं अश्या बंदिवान कुबेराला गुरुदक्षिणा म्हणून सोडून देणं, इंद्रादी देव, शनी ह्यांना बंदिस्त करणारा रावण संपूर्ण कादंबरीत कुतूहल निर्माण करतो.. 

असुर आणि भटक्या जमातीवर अंकुश ठेवण्यासाठी सुमाली आजोबांनी दिलेलं दशानन हे नाव.. दहा डोकी आणि २० हात असणारं ते रूप.. खरंच किती सार्थ होतं.. बुद्धिबळ, रुद्रवीणा, रावणसंहिता, कुमारतंत्र, शिवतांडव स्त्रोत्रा बरोबरच दर्शन शास्त्र, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद ह्या सारख्या अनेक विषयातील असलेलं पांडित्य.. सगळं अचंबित करणारं आहे.. हे एक मेंदू असलेल्या एका डोक्याचं काम नव्हे.. 

माता कैकसीनं दिलेलं ध्येय.. सुमाली, पौलत्स्य आजोबांनी दाखवलेली प्रकाशवाट.. प्रहस्त मामानं दिलेली लढायची उर्मी.. भावांचे वैचारिक संभाषण.. स्वसंवादातून झालेलं बौद्धिक द्वंद्व.. ब्रह्मदेवाचं मार्गदर्शन.. नारदमुनींचा सल्ला.. महादेवांनी दिलेली संघर्ष करायची प्रेरणा.. असे उल्हसित करणारे, रोमहर्षक प्रसंग यामुळं उपेक्षित राहिलेल्या रावणाच्या व्यक्तिमत्वाला न्याय दिला गेला आहे.. 

आईच्या अपमानाचा प्रतिशोध घेणारा मुलगा, सख्खे सावत्र बहीण भाऊ सगळ्यांना बांधून ठेवणारा कुटुंबवात्सल्य पुरुष, जनतेची कुटूंबाप्रमाणे काळजी घेणारा आदर्श राजा.. शिव आराधना करणारा निस्सीम भक्त.. हे ही व्यक्तिमत्वातील पैलू प्रभावीपणे दाखवले आहेत.. 

स्त्री वर शस्त्र उचलणं हा अधर्म.. ह्यातून शूर्पणखावर झालेल्या अत्याचाराच्या सूडाच्या भावनेतून सीतेचं केलेलं अपहरण.. अधर्म, अनीती ह्यावर त्याचं स्वतःशीच सुरु असलेलं द्वंद्व.. हे वाचताना अंगावर काटा येतो.. आप्तस्वकीयांच्या मृत्यूचे कारण, मेघनाद च्या मृत्यूनंतर झालेली हळहळ वाचून हृदयाला पीळ पडतो.. "लंकेत प्रत्येकाला जगण्याचं, धर्माचं, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे तर मला माझ्या पतीसोबत सती जायचं स्वातंत्र्य हवं आहे" हे सुलोचनाच वाक्य हादरून टाकतं.. 
 
रावणाचा पराजय समोर दिसत असताना मंदोदरीनं त्याच्याशी केलेला संवाद विशेष उल्लेखनीय आहे..  

मृत्यूशैय्येवर असताना, आपल्या मुलाच्याच वध करणाऱ्या लक्ष्मणाला शिष्य म्हणून स्वीकारायचं अलौकिक धाडस, औदार्य रावणाकडं होतं.. शेवटी न राहून रावण म्हणतो "लक्ष्मणा तुझ्या भावाला सांग, दोन बुद्धिमान पुरुषांनी संवाद न करता लढलं तर त्यात धूर्त आणि लबाड लोकांचा फायदा होतो.. जसा सुग्रीव आणि बिभीषणाचा होणार आहे.. कपटी लोकांचा आधार घेऊन मिळालेला विजय निराशेचा गर्तेत नेत असतो.. " 
रावणाचं हे वाक्य रामायणाचे आयाम बदलून टाकतं..


-मी मधुरा.. 

************************************************

४७. परिपूर्ती.. इरावती कर्वे.. 


परिपूर्ती.. इरावती कर्वे यांचा ललित लेख संग्रह.. 'युगांत' हे महाभारतावर भाष्य करणारं त्यांचं पुस्तक ह्यापूर्वी वाचलं होतं.. ह्या पन्नास पुस्तकांच्या संकल्पात त्यांचं एखादं तरी पुस्तक वाचावं असं वाटत होतं.. 'संस्कृती', 'भोवरा', 'गंगाजल' ही पुस्तकं त्यावेळी उपलब्ध नव्हती.. म्हणून हा पर्याय.. अठरा छोटे छोटे लेख असलेलं १४० पानांचं पुस्तकं.. मलपृष्ठ वाचल्यावर थोडेसे स्त्रीवादाकडं जाणारे लेख असतील असं वाटलं.. पहिली आवृत्ती १९४९ ची असल्यानं त्या काळात जाऊन ते लेख वाचावे लागणार हा अंदाज ही होता.. काही लेख मनाला भावून गेले.. तर काही डोक्यावरून गेले.. 

पहिलाच 'प्रेमाची रीत' हा जर्मनीत असताना आलेल्या स्पर्शाच्या अनुभवांवरचा लेख.. इरावतीबाई जर्मनीत असताना त्यांना जाणवलेल्या स्पर्शाच्या, प्रेमाच्या रीती आणि नंतर भारतात परतल्यावर घडणाऱ्या मजा, निरीक्षणं, किस्से, वस्तुस्थिती यावरील सुंदर लेख.. असांकेतिक अनुभव त्या मोठ्ठ्या खुबीनं मांडतात.. हे सगळं लिहिताना विनोदाचा पदर त्यांनी कोठंच सोडला नाही.. 

एका लेखात त्यांनी एका मिशनरी ननचं व्यक्तिचित्र रेखाटलंय.. त्या ननबाई व इरावतीबाई फॅमिली कोर्ट चालवत असताना एका तरुण वेश्येची केस त्यांच्यापुढे येते.. पोलीस तिला जामिनावर सोडायला तयार नसतात.. तेव्हा ननबाई तिला आपल्या घरी पोलीस संरक्षणाखाली घेऊन जातात.. अश्या परिस्थतीत सुद्धा ढाराढूर झोपलेली ती वेश्या आणि त्या वेश्येकडं बघत रात्र जागून काढणारी ती नन.. हे ऐकल्यावर त्या बाईंना उद्देशून त्या म्हणतात, ‘बाई गं, पुढच्या जन्मी पाच पांडवांची राणी नि शंभर कौरवांची आई हो!’.. वैषयिक स्पर्शाचंच समाजकारण, राजकारण, धर्मकारण – असं सारंच त्या विनोदात किती ऐटीत, सहजगत्या गुंफलंय.. 

कधी दोन पुरुषांमधली शारीरिक हाणामारी, कधी नवऱ्यानं बायकोला मारणं, कधी अतोनात वात्सल्यानं भरलेले असे हे लेख.. त्यांच्यातलं बाईपण ह्या सगळ्या लेखात प्रामुख्यानं दिसून येतो.. मन मोकळ्या, काळाच्यापुढे चार पावलं चालणाऱ्या, नवऱ्याला ‘दिनू’ म्हणणाऱ्या आणि मुलांची ‘इरु’ ही हाक रोज ऐकणाऱ्या एक फेमिनिस्ट  पण त्याच वेळी समाजाच्या रीती जाणणाऱ्या आणि पाळणाऱ्या, समाजाशी बांधल्या गेलेल्याही एक समाजशास्त्रज्ञ.. एका लेखात, पंढरीच्या वाटेवर अडाणी बायांसोबत पायी पायी चालताना, त्यांच्यातीलच एक होऊन त्यांच्या संसारातील व्यथा जाणून घेताना ही विदुषी लेखिका दिसते.. ज्या सहजतेनं त्यांनी ह्या अडाणी बायकांना आपलंस केलं त्याच सहजतेनं त्यांनी जर्मन आजीचा मुका स्वीकारला होता.. 

...आणि शेवटचा लेख 'परिपूर्ती'.. स्वतःची सामाजिक ओळख.. महर्षींची सून.. सुप्रसिद्ध प्राध्यापकांची पत्नी.. सुविद्य स्त्री ते कॉलेज मध्ये जाणाऱ्या कर्व्यांनी आई.. अशी परिपूर्ण ओळख म्हणजे जीवनाची परिपूर्ती.. असं त्या लिहितात.. 


-मी मधुरा.. 

************************************************

४८. विश्वस्त.. वसंत वसंत लिमये.. 



विश्वस्त.. वसंत वसंत लिमये यांची चित्तथरारक ऐतिहासिक रहस्यमय कादंबरी.. मुखपृष्ठावरील मोरपीस पाहिल्यावर हा विश्वस्त कृष्ण तर नसेल ना? हा विचार मनात आला पण त्याही पेक्षा जास्त लक्ष वेधून घेतलं ते लेखकाच्या नावानं!.. 'वसंत लिमये' म्हणजे मराठीतील 'डॅन ब्राउन' इति गुगल.. आणि म्हणे पुस्तकाचा ट्रेलर असणारं मराठीतील हे पाहिलंच पुस्तक.. ट्रेलर पाहून ह्या विश्वस्ताबद्दलची उत्सुकता जास्तचं वाढली.. हे पुस्तक लिहायला म्हणे साडेचार वर्ष लागली.. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग करणारा, मुंबई आय.आय.टी. तुन बी.टेक. झालेला हा अवलया पक्का भटक्या आहे.. पुस्तक लिहिण्यापूर्वी तो त्या भागात जाऊन भटकून येतो.. असो.. तर इतिहासात घडलेल्या घटना, काही ऐतिहासिक पुरावे, आजूबाजूचं साध्याच वास्तव ह्या सत्यांवर आधारित लिहिलेलं हे काल्पनिक कथानक.. द्वापार युगापासून सुरु झालेलं हे कथानक चाणक्य, मेहमूद गझनी, सरदार पटेल असा प्रवास करत वर्तमानात म्हणजे २०१७ सालात पुण्याच्या कॅफेत येतं.. प्रत्येक युगातील थरारक प्रवास वाचकाला नक्कीच खिळवून ठेवतो..  

कथानाकाचा पाया आहे श्रीकृष्णाची बुडालेली द्वारका!.. द्वारका बुडाली तर तिच्या वैभवाचं काय झालं? जर ते बुडालं असेल तर ते कुठं असेल? ते कुणाला खरंच मिळू शकेल का? द्वारकेचा 'विश्वस्त' श्रीकृष्णाची त्या विषयी काही योजना होती का?.. असेल तर तर ती पूर्ण झाली का?.. विश्वस्त आला कि वारसदार आलेच.. मग कृष्णाचा वारस कोण असेल? उद्धव?.. यादवांचा संपूर्ण संहार शक्य असेल का? कृष्ण तो होऊ देईल का? यादव ह्या संहारून वाचले असतील तर ते सध्या कुठं असतील? काय करत असतील?.. अशा अनेक गूढ अर्थातच काल्पनिक शंकांवर हे कथानक गुंफलं आहे.. 

पाचशे वीस पानांची ही मोठ्ठी कादंबरी वाचकाला नक्कीच खिळवून ठेवते.. टेबलाच्या, भिंतीच्या रंगापासून ते सजावट पर्यंतचे डिटेल्स कधी कधी कंटाळवाणे होऊ शकतात.. तसेच काही संदर्भ नसते तरी चालले असते असं वाटलं.. स्कॉटलंड मधील प्रसंग वाचताना प्रवासवर्णन वाचतो आहोत कि काय असं वाटून गेलं.. काही पात्रांची ओळख करून देण्यासाठी अख्ख प्रकरण खर्ची घातलंय.. वाचताना खटकत नाही पण खरंच ह्याची गरज होती का हा विचार नक्कीच मनात येतो.. 

सध्याचा एक प्रबळ राजकीय पक्ष, त्या पक्षाला पूरक असलेली संघटना, त्या संघटने मागचे विचार, आणि त्या पक्षाचा प्रबळ असा नेता 'वाघा'..  त्या नेत्याची राजकारणाची समज, त्याचे प्रचार तंत्र, आणि इतर पात्रांच्या तोंडून त्याचं होत असलेलं कौतुक.. आणि नंतर हा 'वाघा' कादंबरीचं एक पात्रच बनून जातो.. इतकं कि 'वाघा'च श्रीकृष्णाचा 'निर्मोही' आणि 'सत्प्तात्र' वारसदार बनतो.. 

मला 'विश्वस्त' कादंबरी वाचताना मजा आली.. पण 'खजिन्याचा शोध' कथानक असणारी 'मुरलीधर खैरनार' यांची 'शोध' ही कादंबरी नक्कीच उच्च दर्जाची आहे असं मला वाटतं.. 


-मी मधुरा.. 

************************************************

Monday, February 27, 2023

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं ४२ ते ४५)

 ४२. लेखक आणि लेखने.. शांता शेळके.. 



शांता शेळके.. बापरे!.. साहित्यसृष्टीतलं एक थोर व्यक्तिमत्व!.. कथा, कादंबऱ्या, समीक्षात्मक लेखन, ललितलेख, व्यक्तिचित्रणं, अनुवाद, कविता असे अनेक लेखनप्रकार हाताळणाऱ्या साहित्यिका.. परंतु कविता आणि गीतलेखन माझ्या जास्त आवडचं आणि जवळचं.. 'पैठणी' कविता तर मी जगते माझ्या आजीच्या गोधडीत.. 'गजानना श्री गणराया’ ऐकलं कि दिवस कसा मंगलमय होऊन जातो.. ‘वल्हव रे नाखवा' ऐकलं कि मन कसं आनंदानं भरून जातं.. ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?' असं म्हणत कुठल्याही संकटाला भिडायला तयार.. 'ऋतू हिरवा ऋतू बरवा' ऐकलं कि कसं मोहरून जायला होतं.. 

'शांता शेळके' माझ्या पन्नास पुस्तकांच्या वाचनात नाहीत असं कसं शक्यय.. त्यांचं 'लेखक आणि लेखने' वाचून बघ हा पुस्तकपेठच्या अनघा काकूंचा सल्ला.. मराठी साहित्यात वेळोवेळी ज्या लक्षणीय कलाकृती निर्माण झाल्या त्या संबंधीचं त्याचं हे लेखन.. स्वातंत्रपूर्व काळ ते १९८० पर्यंतच्या काळातील कथा, कादंबरी, ललितलेख, संकलन, कविता अश्या विविध साहित्याचा ह्यात समावेश आहे.. वेगवेगळ्या वैशिष्ठपूर्ण पुस्तकांविषयी त्या इथं वाचकांशी रसाळ गप्पा मारतात..  पुस्तकाच्या प्रास्ताविकात त्या म्हणतात, "पुस्तकाने दिलेला कलात्मक आनंद कुणाबरोबर तरी वाटून घेतल्याखेरीज तो आपण स्वतःही पुरतेपणी उपभोगला आहे असं मला वाटत नाही".. आणि हे मला तंतोतंत पटलं.. मला ही पुस्तक वाचून झालं कि त्या पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केल्याशिवाय चैन पडत नाही.. ह्या लेखनांना त्या 'आस्वादक समीक्षा' असं संबोधतात.. 

'लेखक आणि लेखने' मधील पहिलं पुस्तक 'दत्तो अप्पाजी तुळजापूरकर' यांचं 'माझे रामायण'.. १९२७ साली प्रकाशित झालेलं हे एक आत्मकथन.. आत्मकथन ह्या लेखनप्रकारात अजुनी एका पुस्तकाचा समावेश आहे - 'दया पवार' यांचं 'बलुतं'- वयाच्या चाळीसाव्या वर्षी केलेलं हे आत्मकथन.. 'फकिरा' ही 'अण्णाभाऊ साठे' यांची दलित जमातीचं वास्तव्य दाखवणारी कादंबरी.. 'मनोहर शहाणे' यांची 'धाकटे आकाश' ही विकलांग मधुची कथा..  'बाळकृष्ण प्रभुदेसाई' यांची कोकण पार्श्वभूमी असलेली 'जहाज' ही कथा.. 'पाचोळा' 'बोराडे' यांची शिंप्याच्या आयुष्यावरील कथा.. 'वसंत आबाजी डहाके' यांचा 'योगभ्रष्ट' कथासंग्रह.. अश्या विविध कथा-पुस्तकांचं समीक्षण आहे.. 

त्याचबरोबर 'निशब्द शारदा' हे मराठी रंगभूमी आणि मराठी संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या पत्रांचं 'हरिभाऊ मोटे'नी केलेलं संकलनात्मक पुस्तक.. 'आठवणीतल्या कविता' स्वातंत्र्यपूर्व काळातील कवितांचं संकलन.. तसेच 'नरहर कुरुंदकर' यांचा 'पायवाट' समीक्षात्मक लेखांचा संग्रह.. तर 'मुदगंध' 'इंदिरा संत' आणि 'आदिकाळोख' 'गुरुनाथ धुरी'यांचे  ललितलेख संग्रह यांचे समीक्षण आहे.. 'आदिमाया' 'विं दा करंदीकर', 'पंखपल्लवी' 'कवी निकुम्ब' यांच्या कविता संग्रहावर भाष्य आहे.. हे वाचून कविता कशी वाचायची ह्याचा थोडाफार अंदाज आला.. 'कवितारती' ही 'विजया राजाध्यक्ष' याची काव्यसमीक्षा.. 'गीतयात्री' 'माधव मोहोळकर' यांनी हिंदी चित्रपट गीतांचा अनेक अंगानी घेतलेला वेध.. अशी विविधांगी, विविधरंगी पुस्तकांबद्दल वाचायला मिळालं.. 

ह्यातील चटका लावून गेलं ते 'चोरलकाठ'.. 'भालचंद्र राजाराम लोवलेकर' उणेपुरे ३४ वर्षाचं आयुष्य लाभलेला स्वातंत्रपूर्व काळातील कवी.. आणि त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला त्यांचा कथासंग्रह 'चोरलकाठ'.. त्यांचा जीवनपट, त्यांच्या तारुण्यसुलभ कविता यांचा समावेश ह्या पुस्तकांत आहे.. 

शांताबाईंचं असं जरी हे पुस्तक नसलं तरी त्यांची लेखनवैशिष्ठ्य इथंही जाणवतात.. 


-मी मधुरा.. 

************************************************

४३. व्यासपर्व.. दुर्गा भागवत.. 



'व्यासपर्व'.. 'महाभारत' महाकाव्यातील व्यक्तिरेखा लिहिण्यामागचा व्यासांचा विचार म्हणजे 'व्यासपर्व'.. महाभारतातील व्यक्तिरेखांची असणारी पारंपारिक ओळख पुसून टाकणारा वेध म्हणजे व्यासपर्व.. महाभारत महाकाव्याचा असा आढावा घ्यावा तर तो दुर्गाबाईंसारख्या विदुषींच!.. सत्प्रवृत्तीच्या युधिष्ठिर-कृष्णापासून ते खलप्रवृत्तीच्या दुर्योधन-अश्वत्थाम्यापर्यंत, वैरागी प्रवृत्तीच्या भीष्म-विदुर पासून ते कुलवधू कुंती-द्रौपदीपर्यंत सर्व व्यक्तिरेखा आणि त्यांच्याद्वारे मानवी भावविश्वाचा रचलेला हा महापट व्यासांनी काय कौशल्यानं लिहिलाय हे दुर्गाबाई लिलया दाखवून देतात..

महाभारत म्हटलं कि कौरव-पांडव, त्यांच्यातील भाऊबंदकी, द्रौपदीचं वस्त्रहरण, पांडवांचा वनवास, युद्ध, श्रीकृष्णानं सांगितलेली गीता थोड्याफार फरकानं असं चित्र उभं राहतं.. यातील ज्ञानावर तत्वज्ञानावर बरीच पुस्तकं लिहिली गेली.. मृत्युंजय, युगंधर सारख्या पुस्तकांतून त्या व्यक्तिरेखेच्या नजरेतून संपूर्ण महाभारत विषद केलं गेलं.. पण 'व्यासपर्व' हे त्या सर्वांपेक्षा वेगळं ठरतं.. ह्या महापटातील दहा व्यक्तिरेखांवर दुर्गाबाई त्यांच्या दृष्टीकोनातून परिक्षण करत व्यासांच्या मनातील व्यक्तिरेखेपर्यंत पोचायचा प्रयत्न करतात..  

तसंच, महाभारत म्हटलं की समोर येतं ते समाजशास्त्र.. आणि मानवी व्यवहार.. प्राचीन इतिहास, भारतीय संस्कृती याचा वेध महाभारतातून अभ्यासकांनी घेतलाय.. किंबहुना अशा प्रत्येक अभ्यासाचा महाभारत हा आधार राहिलाय.. कुणाला गीतेच्या अनुषंगानं तो धर्मग्रंथ वाटतो तर कुणाला त्यातलं नाट्य भावतं.. कुणाला राजकारण तर कुणाला नीतीशास्त्र.. प्रस्तावनेची सुरुवात 'त्या भारतीय विचार-विमर्षाच्या विश्वात महाभारताचा स्वीकार किंवा अ-स्वीकार का झाला असावा?' हे सांगत करतात..  त्या म्हणतात, “काव्यसमीक्षेचे प्रतिकूल अंग डावलून, अन्य यशोदायी धोरणांनी महाभारताचा अर्थ धोरणी तत्त्वज्ञांनी, पंडितांनी व राजकारणपटूंनी स्वतःच्या आवडीच्या जीवनक्षेत्राच्या समर्थनासाठी विविध प्रकारे लावला. त्यामुळे इतर अनेक क्षेत्रे उजळली. विचारांचे क्षितिज रुंदावले. संस्कृतीच्या कक्षा वाढल्या. परंतु त्यातले काव्यमय भाव मात्र झाकोळून गेले.”.. आणि म्हणूनच त्यांना महाभारतातील काव्य, व्यासांची लेखनशैली ह्यावर भाष्य करावंसं वाटलं असेल.. ११० पानी पुस्तकं, त्यातील पहिली २० पानं प्रस्थावना त्यात खूप अवघड अलंकारित मराठी..  

‘व्यासपर्व’मध्ये दुर्गाबाईंनी टिपलंय ते महाभारताचं हे काव्यमय आणि तत्सम भावांचं, रंगांचं वैशिष्ट्य.. एकेका व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवत.. कृष्णापासून सुरू होणारा हा प्रवास द्रौपदी या एकमेव स्त्री व्यक्तिरेखेपाशी येऊन थांबतो.. एकेका व्यक्तिरेखेसाठी योजलेले शीर्षकच मुळी वाचकाशी बोलू लागते – 'पूर्णपुरूष' अर्थात कृष्ण, 'मोहरीतली ठिणगी' द्रोण.. यात एकलव्य प्रामुख्यानं येतो.. 'कोंडलेले क्षितीज' अश्वत्थामा, 'व्यक्तिरेखा हरवलेला माणूस' दुर्योधन, 'एकाकी' कर्ण, 'परीकथेतून वास्तवाकडे' अर्जुन, 'मुक्त पथिक' युधिष्ठीर, 'अश्रू हरवल्यावर' भीष्म, 'माणसात विरलेला माणूस' विदुर आणि 'कामिनी' द्रौपदी.. कृष्ण ते कृष्णा ह्या प्रवासात धृतराष्ट्र, नकुल, सहदेव, भीम, कुंती भेटत राहतात.. 

थोडक्यात 'व्यासपर्व' म्हणजे एक मुक्त चिंतन म्हणायला हरकत नाही.. 


-मी मधुरा.. 

************************************************

४४. प्रेमातून प्रेमाकडे.. डॉ. अरुणा ढेरे.. 


'प्रेमातून प्रेमाकडे'.. दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या, वयाच्या त्या त्या टप्प्यावरच्या मैत्रीचा ज्येष्ठ कवयित्री-लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांनी घेतलेला वेध.. स्त्री-पुरुषांमधील मैत्र  अलगदपणे उलघडत त्यांच्यातील माणूसपणाचा तळ शोधण्याचा त्यांनी केलेला प्रामाणिक प्रयत्न.. स्वामी विवेकानंद-भगिनी निवेदिता, गोपाळ कृष्ण गोखले-सरोजिनी नायडू, गांधीजी-सरलादेवी चौधुराणी-मेडेलिन स्लेड(मीरा बेन), रविंद्रनाथ टागोर-अन्नपूर्णादेवी-कादंबरीदेवी, सुभाषचंद्र बोस-एमिली, सेनापती बापट-अॅना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-फॅनी, अॅनी बेझंट, श्रीधर व्यंकटेश केतकर-नागूताई, हरी नारायण आपटे-काशीबाई कानिटकर, बाबुराव गोखले या दिग्गजांच्या आयुष्यातील उत्कट मैत्रीच्या भावबंधांचे नाजूक पदर हळूवारपणे डॉ. ढेरे यांनी उलगडून दाखविले आहेत.. 

‘प्रेमातून प्रेमाकडे’ हा पहिला लेख समर्पित आहे तो गुरु-शिष्याच्या एका जोडीला.. स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांना.. गुरू-शिष्यांमधला निखळ, निर्मळ, परस्परांविषयीच्या अतीव आदर आणि विशुद्ध स्नेहभाव यांनी जोडलं गेलेलं हे नातं.. लंडनमध्ये स्वामीजींचं व्याख्यान ऐकून प्रभावित झालेली मार्गारेट १८९८ मध्ये ब्रह्मचारिणी व्रताची दीक्षा घेऊन आपला देश, धर्म, संस्कृती मागं सोडून 'निवेदिता' या नावानं या देशात आली, इथेच रमली आणि आपल्या गुरुचं चिरंतन स्मारक आपल्या कार्यातून उभं केलं.. 

भारतसेवक समाजाची संकल्पना मनाशी बाळगून राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीचे स्वप्न पाहणारे, समाजाच्या उत्कर्षाची साधना करणारे थोर लोकसेवक गोपाळ कृष्ण गोखले यांच्या कार्याला बंगालमध्ये, तिथल्या विद्वानांच्या वर्तुळात मानाचे स्थान होते.. इथेच त्यांना भगिनी निवेदिता, सरोजिनी नायडू आणि सरला रॉय भेटल्या.. 'मैत्र जीवांचे' ह्या लेखात ह्या सौहार्दाच्या मित्रत्वाबद्दल लिहिले आहे.. भगिनी निवेदितांच्या निधनानंतर श्रद्धांजलीच्या भाषणात आपल्या भावना व्यक्त करताना गोखले म्हणाले  कि ‘सृष्टीतल्या एखाद्या शक्तीचा साक्षात्कार व्हावा तशी त्यांची भेट असे’.. तर ‘स्नेहस्निग्ध आश्वासन’ या लेखात गोखले व सरोजिनी नायडू यांच्यातल्या  स्नेहभावाविषयी वाचायला मिळते.. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशसेवेसाठी सर्वस्व पणाला लावलेल्या उभयतांना कसोटीच्या काळात रक्ताच्या नात्यापलीकडच्या स्नेहसंबंधातून कसं बळ मिळालं याचा प्रत्यय येतो.. 

‘एका आध्यात्मिक प्रेरणेचा उदयास्त’ या लेखात महात्मा गांधी आणि त्यांची आध्यात्मिक पत्नी सरलादेवी चौधुराणी यांच्या मैत्रीतल्या नात्यावर डॉ. ढेरेंनी प्रकाश टाकला आहे.. परस्परविरोधी स्वभावामुळं नि राजकीय मत भिन्नतेमुळं त्यांच्या एकत्र येण्यातच दुराव्याची नांदी होती.. त्या क्रांतिकारी विचारांच्या, स्वयंभू तेजानं  तळपणाऱ्या तर गांधीजी सत्य-अहिंसेचा मार्ग चोखाळणारे.. एवढा विरोधाभास असूनही या मैत्रीची उत्कटता एवढी होती की ते आध्यात्मिक पतिपत्नीच्या नात्यापर्यंत पोचले.. ‘उत्कट प्रेमभक्ती’ या लेखात गांधीजी आणि मेडेलिन स्लेड (मीरा बेन) यांच्यातल्या नात्याविषयी वाचायला मिळतं.. ब्रिटनमधल्या गर्भश्रीमंत घरात जन्माला आलेली ही मुलगी गांधीजींचं चरित्र वाचून भारावली.. ती भारतात आली त्यावेळी ती तेहतीस वर्षांची तर गांधीजींनी वयाची साठी पार केली होती.. दांडीयात्रेत सामील होण्याचं भाग्य लाभलेल्या आणि गांधीजी या व्यक्तीमध्ये गुंतलेल्या मेडेलिनाचे मानसिक गुंते उलगडून दाखवत तिच्या आणि गांधीजींच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंचं दर्शन लेखिकेनं घडविलं आहे.. 

‘नलिनी- द लोटस फ्लॉवर’, ‘मानसलक्ष्मी’ आणि ‘मावळतीची रानभूल’ या तीन लेखांमधून विश्वकवी रविंद्रनाथ टागोर यांना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेल्या अन्नपूर्णा तर्खड, त्यांची भावजय कादंबरीदेवी आणि व्हिक्टोरिया ओकॅम्पो यांच्याबरोबरच्या तरल आणि उत्कट मैत्रीच्या नात्याविषयी अरुणा ढेरेंनी लिहिले आहे.. या मैत्रीच्या प्रवासात त्यांच्या मैत्रिणींचे आणि पत्नीचे आयुष्य कोणत्या वळणावर येऊन उभे राहिले, याचे दर्शन घडविताना त्यांच्या प्रतिभेतील आणि व्यावहारिक आयुष्यातील अनेक पापुद्रे डॉ. ढेरेंनी सूक्ष्मपणे उलगडून दाखविले आहेत.. 

‘वादळी रणातलं नाजूक नातं’ ही सुभाषचंद्र बोस आणि एमिली शेकेल यांच्या मैत्रीची कथा.. स्वातंत्र्यलढ्यातील वादळांनी लटेपून गेलेल्या आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयानं झपाटलेल्या सुभाषबाबूंच्या जीवनात या मैत्रीचं नेमकं स्थान काय होतं याविषयी या लेखात वाचायला मिळतं.. ‘एका हरीण पाडसाची गोष्ट’ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना लंडनमध्ये भेटलेली फॅनी यांच्या मैत्रीची कथा.. विचारांशी आणि जीवनध्येयांशी जोडल्या गेलेल्या या मैत्रीचं स्वरूप किती वेगळं, समृद्ध, संपन्न आणि प्रगल्भ होतं हे वाचताना जाणवतं.. ‘माझा की जीव भाजला’ या लेखात सेनापती बापट आणि त्यांच्या वीरवृत्तीवर, साहसावर प्रेम करणारी त्यांची रशियन मैत्रीण अना खोस यांच्यात निर्माण झालेल्या भावबंधांचे दर्शन घडतं.. चार्ल्स ब्रॅडलॉ आणि अॅनी बेझंट यांच्या मृत्युंजयी मैत्रीविषयीही या पुस्तकात वाचायला मिळतं.. 

‘उजेड आणि अंधार’ या लेखात ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर आणि नागूताई जोशी यांच्या न जुळलेल्या मैत्राविषयी लेखिकेनं लिहिलं आहे.. नागूताईंचा नकार जड अंतःकरणानं पचविलेल्या केतकरांनी इंग्लंडमध्ये भेटलेल्या एडिथ कोहन यांच्याशी लग्नाचा निर्णय घेतला.. ‘घरगुती वासाचा’ हा लेख ह.ना. आपटे व काशीबाई कानिटकर यांच्यातल्या निरभ्र हृदयसंवादा विषयी खूप काही सांगणारा आहे.. 

अश्या या थोर स्त्री-पुरुषांच्या नाजूक व अवघड अशा आंतरिक भावसंबंधांचा मागोवा घेणं ही एक जोखीमच होती.. आपल्या मनावर, विचारांवर ठसा उमटवणारे हे सारे  थोर पुरुष.. त्यांच्याकडं अश्या दृष्टीनं पाहणं, वाचणं, लिहिणं ही सोपी गोष्ट नाही.. डॉ. अरुणा ढेरेंनी आपल्या संशोधन-अभ्यासातून यशस्वीपणे हे  पार पाडले आहे.. 


-मी मधुरा.. 

************************************************

४५. "शाळा".. मिलिंद बोकील..


शाळा.. मिलिंद बोकील यांची अतिशय गाजलेली कादंबरी.. ह्या कथानकावर आधारित 'शाळा' ह्या मराठी चित्रपटातील गाणी सोडली तर आवडावं असं काहीच नव्हतं.. त्यामुळं पुस्तकाकडून फारश्या अपेक्षा नव्हत्याच.. शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील हळवा कोपरा असतो असं म्हणतात.. तसं मला शाळेबद्दल अतीव प्रेम, हळवा कोपरा वैगरे असं काही नव्हतं.. शाळेच्या शेवटच्या दिवशी सुद्धा शाळा संपणार पेक्षा मैत्रिणी बरोबर नसणार ह्याची खंत जास्त होती.. त्यामुळं कोणत्या भावनिक ओढीसाठी हे पुस्तक आवर्जून वाचावं असं ही नव्हतं.. पण वाचून पहायला काय हरकत आहे म्हणून 'शाळा' हातात घेतलं.. 
 
मलपृष्ठावरील एका वाक्यानं मात्र माझा लगेच ताबा घेतला.. "शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.." .... अगदी अगदी.. माझ्या ही मनात रोज एक वेगळीच शाळा भरायची.. त्यात गणित नसायचं.. सन सनावळी नसायच्या.. ना भाषेचे नियम असायचे ना नियमात गुरफटलेलं शास्त्र.. ना PT ची परेड ना सामाजिक शिक्षणाचं भान.. मुक्त संचार असलेलं एक प्रांगण मनात असायचं.. अशी शाळा एक दिवस तरी असावी असं वाटायचं.. 

पहिली ३०-४० पान वाचायला खूप जड गेली.. कदाचित भाषेमुळं असेल.. पण त्या नंतर एका दमात पुस्तक वाचून काढलं.. कधी मी माझ्या शाळेतल्या बाकावर जाऊन बसले माझं मलाच कळालं नाही.. माझ्या वर्गात मला गोष्टीतली सगळी पात्र ही दिसायला लागली.. चिवचिवणाऱ्या चिमण्या.. स्टायलिश आंबेकर.. आपल्या हिरोची धडकन शिरोडकर.. पासून ते जोशी, चित्रे, बॅक बेंचर्स मुलं.. सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडत होतं.. हेड मास्तर अप्पा, मांजरेकर सर, बेंद्रे मॅडम, गणोबा शिपाई सगळे अवती भोवती वावरत होते.. 

मिलिंद बोकीलांच्या शाळेतील विद्यार्थी कधी झाले माझं मलाच कळलं नाही.. अख्ख ९ ब चे वर्ष मी परत जगले.. काही जगलेले.. आणि काही जगायचे राहिलेले... 


-मी मधुरा.. 

************************************************


Sunday, January 29, 2023

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं ३७ ते ४१)

 ३७. स्मृतिचित्रे.. लक्ष्मीबाई टिळक.. 


रेव्हरंड टिळक अर्थात नारायण वामन टिळक.. एकोणिसाव्या शतकातील मराठीतील प्रसिद्ध कवी.. त्यांच्या पत्नीनं लक्ष्मीबाईनी लिहिलेलं अविस्मरणीय आत्मकथन म्हणजे स्मृतिचित्रे.. हिंदू संस्कारांमध्ये वाढलेली एक स्त्री विक्षिप्त पतीला साथ देताना कशी बदलत जाते आणि स्वतःचा कसा विकास करत जाते याचा उत्तम आलेख म्हणजे स्मृतिचित्रे.. 

१८५७चा बंडाचा काळ.. एका महाराचं पाणी अंगावर उडाल्यानं विटाळ झाला म्हणून कडक सोवळं पाळणारे वडील.. ह्या सोवळ्याच्या जाचात अडकलेलं लक्ष्मीबाईंचं बालपण.. कोणाचीही घुसमट व्हावी, विकृती निर्माण व्हावी असं वातावरण.. पण लक्ष्मीबाईनी ते सर्व सहजतेनं स्वीकारलं ते केवळ त्यांच्या खेळकर आणि आनंदी स्वभावामुळं.. त्या स्वतःच्या स्वभावाचं वर्णन मनानं व शरीरानं चिवट असं करतात.. जातीभेदाच्या भक्कम भिंती, त्यात वडिलांचं कडक सोवळं, जबाबदारीपासून भरकटलेलं त्यांच वागणं.. त्यामुळं लक्षमीबाईंना त्यांच्या आत्यानं सांभाळलं.. आणि पुढं एक गोत्री असणाऱ्या टिळकांशी विवाह करण्यासाठी आत्यानं त्यांना दत्तक ही घेतलं.. लग्न झाल्यावर त्यांच्या परिस्थितीत काहीच फरक पडला नाही.. 'सासुरवास' ह्या प्रकरणात त्यांनी सासऱ्यांचा लहरीपणा आणि झालेला जाच ह्याचं चित्रण केलंय.. त्यांच्या सासूबाई कविता करायच्या, बायबल वाचायच्या, शिवण टिपण करायच्या.. हे सासऱ्यांना आवडत नसल्यानं त्यांनी त्यांचा खूप छळ केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू ही झाला.. लक्ष्मीबाईंचे कधी सासरी कोड कौतुक झालं नाही.. ‘मोलाची दळणी करा नि लुगडी घ्या, बांगड्या भरा’ इति सासरे.. नवऱ्यानं कामात केलेली थोडी मदत हाच काय तो ओलावा.. असं त्या लिहितात.. लाडू लपवून ठेवून सुनेवर केलेला चोरीचा आरोप, मुलात आणि सुनेत भांडण लावण्याचा केलेला प्रयत्न.. असे बरेच कटू प्रसंग त्या लिहितात.. पण कुठंच सासऱ्यांबद्दल अपशब्द वापरत नाहीत.. 

कविता करणारे, कवितेत स्वतःला विसरणारे, पटकन दुसऱ्यावर विश्वास टाकणारे, भोळे मालमनाचे टिळक.. त्यामुळं येणाऱ्या अनेक अडचणींना लक्ष्मीबाईंना तोंड द्यावे लागे.. टिळकांच्या स्वभावाचे अनेक पैलू पुस्तकात दिसतात.. बोलता बोलता कविता करणारे टिळक, रागात-चिडल्यावर कविता करणारे टिळक उत्तम कीर्तनकार ही होते.. पैसा जोडावा, साठवावा हा स्वभाव नसल्यानं कायमच गरिबीच्या छायेत असणारा संसार संभाळताना होणारी दमछाक, होणारी भांडणं यांचं खुमासदार वर्णन त्यांनी केलं आहे.. लक्ष्मीबाईंनी संसारात न गुरफटता शिकावं, मोठठं व्हावं असं टिळकांना वाटे.. टिळक फक्त दोनच गोष्टीना घाबरत.. एक देव आणि दुसरे लक्ष्मीबाई.. 

टिळकांचं धर्मांतर.. लक्ष्मीबाईंच्या जीवनातील खडतर काळ.. निर्जीव ओंडक्यासमान झालेलं त्यांचं आयुष्य.. त्यांचा कशावरच ताबा नसल्यानं त्या वेड्या होतील की काय अशी त्यांच्या बहिणीला वाटणारी भीती.. पण त्या काळात त्यांना तारलं ते त्यांच्या माहेरच्या माणसांनी आणि त्यांच्या  दुःखाला वाट मिळाली ती त्यांच्या कवितानं.. कालांतरानं नवराबायकोत पत्रव्यवहार सुरू झाला.. धर्मांतरानंतरची त्यांची झालेली भेट त्यांनी भावस्पर्शी शब्दात मांडलीय.. ह्या आत्मचरित्रात अनेक लोकांची गर्दी दिसून येते.. अनेक नावं अधून मधून डोकावत राहतात.. सुरुवातीला मी नावांचा संबंध लावायचा प्रयत्न केला पण तो नंतर सोडून दिला.. 

लक्ष्मीबाईंचं धर्मांतर.. टिळकांच्या बरोबर वावरताना अगदी टप्प्याटप्पानं, सहजपणे त्यांनी धर्मांतर केलं असं जाणवलं.. त्यांनी स्वतःमध्ये घडवलेला बदल, त्यांची विचारप्रक्रिया  ‘दोघांचा एक संवाद’ या प्रकरणात वाचायला मिळतो.. पक्षी, प्राणी ह्यामध्ये जसा भेद नाही तास माणसांत पण नसावा.. ह्या विचारानं त्यांनी सगळ्या समाजाच्या हातचं खायला प्यायला हरकत घेतली नाही.. बदलत्या विचाराबरोबर बदलत जाणारा संसार आणि बदलत जाणारा समाजीक विचार याचं समर्पक चित्रण पहायला मिळतं.. त्याच्या उभयतांच्या स्वभावाबद्दल ‘फिकिरीची माळ माझ्या गळ्यात घातली व बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली’ असं त्या लिहितात.. सेवाभाव, दुसऱ्यांना मदत करणं, येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी सदैव घर खुलं असणं, मानापमान-कीर्ती ह्याची पर्वा नसणं असे अनेक पैलू दिसून येतात..

'स्मृतिचित्रे'ची खासियत म्हणजे टिळकांच्या कवितांची, त्यांनी रचलेल्या अभंगांची लयलूट.. त्याचं ख्रिस्त धर्माचं लिखाण वाचताना त्या लिखाणावर हिंदू धर्माची पकड जाणवते.. त्यांनी सांगितलेला ख्रिस्त धर्म का हिंदी ख्रिस्त धर्म असल्यानं टिळक ख्रिस्त धर्मच्या मुख्य प्रवाहापासून लांब राहिले.. ‘ख्रिस्तायन’ हा ग्रंथ पूर्ण करण्याचा ध्यास टिळकांनी घेतला होता.. पण त्यांच्या मृत्यूनंतर तो अपुरा ग्रंथ लक्ष्मीबाईंनी पूर्ण केला.. टिळकांनी ‘ख्रिस्तायन’चे साडेदहा अध्याय लिहिले तर लक्ष्मीबाईनी तो ग्रंथ पुढे चौसष्ठ अध्याय लिहून पूर्ण केला.. एका अशिक्षित बाईनं हे काम अशा प्रकारे पूर्ण करावं.. ही केवढी मोठ्ठी विद्वत्ता!!

स्वतंत्र बाण्याच्या लक्ष्मीबाईंनी ठामपणे निर्णय घेत, कलंदर पतीशी, गरिबीशी झगडत स्वतःची बौद्धिक, अध्यात्मिक प्रगती केली ह्याला तोड नाही.. ‘स्मृतिचित्रे’ म्हणजे  प्रांजळपणे व पारदर्शकपणे लिहिलेल्या आठवणी..  


-मी मधुरा.. 

************************************************

३८. दास डोंगरी राहातो.. गो. नी. दांडेकर.. 



दास डोंगरी राहातो.. एका लोकोत्तर व्यक्तीमत्वाचा शोध घेणारं 'गो. नी. दांडेकर' यांचं हे अनोखं पुस्तक!.. श्रीसमर्थांचं लीळाचरित्र!!.. रामदासाचं चरित्र सांगणारी एक  रसाळ कादंबरी.. 

पुस्तकाची सुरुवात होते ती अजुनी अंगाची हळद न निघालेल्या आणि नाशिकच्या रामाला भेटण्याची आस असणाऱ्या नारायणाच्या प्रवासानं!.. बोहल्यावर चढेपर्यंत तुझं सगळं ऐकेन हे नारायणानं आईला दिलेलं वचन आणि पुढं 'सावध रे सावध' या शब्दांनी त्याचं बदललेलं आयुष्य.. मनात वसणारा राम मंदिरातल्या मूर्तीत न दिसल्यानं कासावीस झालेला नारायण रामाचा शोध घेत नाशिकात राहतो.. हनुमानाच्या प्रेरणेनं नारायणाचा रामदास होतो.. मग धर्मशाळेत राहून, माधुकरी मागून, प्राचीन ग्रंथांचं वाचन अभ्यास करत त्याच वेगळं जीवन सुरु होतं.. यतींसमवेत शास्त्रचर्चा, मुनींशी परमार्थचिंतन, एकांतात रघुवीरस्मरण, प्रसंगी लहानमुलांबरोबर हास्यविनोद आणि त्यातून समाज प्रबोधन असा दिनक्रम.. नारायण ते रामदास ते रामदासस्वामी ते समर्थ असा हा त्यांचा प्रवास त्यांच्याच श्लोकातून, ओव्यांतून, काव्यांतून उलगडत जातो.. 

संसारात राहून परमार्थ कसा करावा हे सांगणारे समर्थ, स्वराज्याच्या पायाबांधणीत तितक्याच ताकतीने उभे होते.. निश्चयाचा महामेरू। बहुजनास आधारु। अखंड स्थितीचा निर्धारु। श्रीमंत योगी।।.. असे राजांबद्दल काढलेले उद्गार असतील किंवा मराठा तितुका मिळवावा।आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा।.. महाराष्ट्रधर्म, त्याचा कुलाचार सांगणं असो.. शिवाजी महाराज आणि रामदासस्वामी यांच्यातील प्रसंग गोनीदांनी खूप छान रेखाटले आहेत..  

.. पण.. हे चरित्र अपूर्ण वाटते.. त्यांचा दासबोध लिहिण्यापर्यंतचाच प्रवास ह्यात आहे.. सज्जनगड आणि आणि त्यांचे शेवटचे दिवस नसल्याची रुखरुख वाटते.. 


-मी मधुरा.. 

************************************************

३९. अपूर्वरंग ४ जपान.. मीना प्रभू.. 


'पन्नास पुस्तकं' वाचन संकल्प.. पस्तीस पुस्तकं वाचून झाली तरी अजुनी प्रवासवर्णन वाचायचं राहिलंच.. पु.लं. नंतर फारशी प्रवासवर्णनं वाचलीच नाहीत.. कधीतरी एखादं दुसरं वाचलं असेल पण फारसं आवडलं नाही.. मी जसा प्रवास करायला लागले, वेगवेगळे देश फिरायला लागले तसं सुरुवातीला प्रवासाच्या टिपण्या, नोंदी नंतर प्रवासवर्णन लिहू लागले.. प्रवासवर्णन हे माहितीप्रत वर्णन असावं त्याचा शोऑफ होणार नाही ह्याची खबरदारी लिहिताना घेतली गेली पाहिजे.. आणि तेच कोठेतरी सोशल मीडियामुळं हरवताना दिसतंय.. असो.. तर डिसेंबर मधल्या भारतवारीत माझ्या गोड मैत्रिणीनं लतानं मला हे 'अपूर्वरंग ४ जपान' पुस्तक भेट म्हणून दिलं.. आणि माझी मीना प्रभूंशी ओळख झाली..   

'अपूर्वरंग' या मालिकेतील हे शेवटचं पुस्तक!.. जपान.. पूर्व आशियाचा मुकुटमणी असणारा, शून्यातून उभा राहिलेला, अध्यात्म पासून ते तंत्रज्ञानापर्यंत वावर असणारा देश म्हणजे जपान.. जपानच काय पण इतर हि पूर्वेकडील देश मी अजुनी पाहिलेले नाहीत.. त्यामुळं ह्या देशाबद्दल, आपल्या भारतीय संस्कृतीच्या जवळ जाणाऱ्या संस्कृतीबद्दल वाचण्याची उत्सुकता होतीच.. आणि मीनाताईंच्या लेखणीनं ती पुरी पण झाली.. जपलेल्या श्रद्धाळू परंपरे बरोबरच वेगानं वाढणारं तंत्रज्ञान-आधुनिकीकरण यांची सांगड घालताना जपानी माणसाची होणारी धालमेल उदाहरण देऊन त्या सहज दाखवतात.. 'साकारा'च वर्णन तर केवळ अप्रतिम.. इकडं ही चेरी ब्लॉसम पाहिला आहे पण 'साकारा' पाहायला तरी जपानला जायलाचं हवं.. काही वेळा पाल्हाळ वाटलं तरी आपण त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष फिरतोय असं ही वाटलं..

आता अपूर्वरंग मधली बाकी तीन पुस्तकं ही सवडीनं नक्की वाचेन..


-मी मधुरा.. 

************************************************

४०. वंशवृक्ष.. डॉ. एस. एल. भैरप्पा.. 
अनुवाद.. सौ. उमा कुलकर्णी.. 



डॉ. एस. एल. भैरप्पा.. जेष्ठ कन्नड साहित्यिक.. आणि 'वंशवृक्ष' ही त्यांची 'कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार (१९६६)' विजेती कांदबरी!.. सनातन धर्मपरंपरा आणि आधुनिक काळातील बदलती जीवन-मूल्ये यांतील संघर्ष आणि त्यांचे कौटुंबिक पातळीवर उमटणारे भावकल्लोळ प्रभावीपणे चित्रित करणारी अशी ही कलाकृती.. साहित्य अकादमीचा पहिला अनुवाद पुरस्कार (१९८९) आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळणारी अशी ही कलाकृती!.. मराठीतील ह्या सन्मानांसाठी 'एस.एल.भैरप्पा'नी रेखाटलेल्या भक्कम व्यक्तीरेखा आणि मूळ कादंबरीतील रसोत्कटता अनुवादातही जशीच्या तशी ठेवण्याचं कौशल्य सौ. उमा कुलकर्णींचं! 

वंशवृक्ष.. सनातन धर्म आणि परंपरेवर भाष्य करणारी तसेच आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अंतर्दृष्टी असणारी संवेदनशील कादंबरी.. बहुपत्नीत्व, विधवा पुनर्विवाह, विवाह संस्कार, वंशवृद्धी असे बहुस्तरीय कथानक असणारी १९६५ सालातील ही कादंबरी त्या काळाच्या बराच पुढचा विचार मांडणारी.. अपत्त्यावर पहिला अधिकार कोणाचा?.. पित्याचा की मातेचा? बीजाचा की क्षेत्राचा?.. महाभारतापासून उद्भवलेला हा प्रश्न डॉ. भैरप्पानी आधुनिक काळाची पार्श्वभूमी घेऊन चर्चिला आहे.. वेदविद्यापारंगत श्रीनिवास श्रोत्री-त्यांची पत्नी भागीरथम्मा-बालमैत्रीण लक्ष्मी, इतिहास संशोधक सदाशिव-नागलक्ष्मी करुणारत्ने आणि साहित्याचा प्राध्यापक राज-कत्त्यायनी नंजुंड यांच्या नातेसंबंधांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा हा प्रश्न कसाला लागतो तेव्हा भैरप्पांच्या प्रतिभेची उंची या कादंबरीत पानोपानी जाणवते.. 

वेदविद्यापारंगत श्रीनिवास श्रोत्री, इतिहास संशोधक सदाशिव आणि आधुनिक विचारमूल्ये असणारी कत्त्यायनी असे तीन जीवनप्रवाह आणि ह्या जीवन प्रवाहातील अनेक पात्रं, आणि त्या पात्रांचा असणारा स्वतःचा दृष्टीकोन, त्यांची स्वतःची मूल्ये आणि सामाजिक मूल्ये ह्यांचा हा संघर्ष.. वैयक्तिक सुखाच्या पूर्ततेसाठी परंपरेनं प्रस्थापित सामाजिक मूल्यांना आव्हान केल्यानं होणारी नैतिक कोंडी याचं हे चित्रण.. वेदविद्यापारंगत श्रीनिवास श्रोत्रीची विधवा सून कात्यायनीनं स्वतःच्या सुखासाठी आपल्या तीन  वर्षाच्या मुलाला मागं ठेवून पुनर्विवाह करणं.. इतिहास संशोधनाला मदत होईल म्हणून श्रीलंकन मुलीला सदाशिवनं द्वितीय भार्या म्हणून आणणं.. आणि श्रीनिवास श्रोत्रींची सनातन जीवनपद्धती आणि त्यांचं संन्यास घेणं.. आपल्या सुखांसाठी, महत्वाकांक्षेसाठी प्रत्येक पात्रांनी घेतलेले निर्णय त्या पात्रांना रंजक बनवतात.. 

३२२ पानांचं हे पुस्तक अक्षरशः दोन दिवसांत वाचून काढलं.. मूळ कन्नड भाषेतील हा 'वंशवृक्ष' संस्कृत, हिंदी, मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.. 


-मी मधुरा.. 

************************************************

४१. तत्वमसि.. ध्रुव भट्ट.. 
अनुवाद.. अंजनी नरवणे.. 



'तत्वमसि'.. आशयघन कविता आणि गूढ-रहस्यमयी कादंबऱ्या लिहिणारे ध्रुव भट्ट यांची 'साहित्यिक अकादमी पुरस्कार' मिळालेली अजुनी एक कादंबरी!.. ह्या शृंखलेतील त्यांची तिसरी कादंबरी.. प्रत्येक कादंबरीचा विषय वेगळा, कथानक वेगळं.. तिथं स्वतः जाऊन, राहून, अनुभव घेऊन लिहिल्यानं सत्याच्या जवळ जाणारं कथानक.. कधी गीरचं अभयारण्य तर कधी गुजरात कच्छ भागातील पाड्या.. आता तत्वमसि मध्ये काय?.. नर्मदा नदी, नर्मदेच्या खोऱ्यात राहणारे आदिवासी, परिक्रमावासी, आश्रम.. आणि गूढ रहस्य.. 

ध्रुव भट्टांच्या शिरस्तेप्रमाणे कथानायकाला ह्या ही कादंबरीत नाव नाही.. तर, विदेशात राहणारा, जन्मानं भारतीय असणारा, 'मानव संसाधन विकास' (human resource development ) ह्या विषयाचा अभ्यास करणारा असा हा तत्वमसीचा कथानायक जो आपल्या अमेरिकन प्रोफेसरांच्या सांगण्यावरून आदिवासींबद्दल संशोधन करायला भारतात येतो.. काहीसा अनिच्छेनेच.. भावनांमध्ये वाहवत न जाणारा, तर्कसंगत विचार करणारा, देव आणि धर्म ह्या भ्रामक कल्पना मानणारा, विज्ञानवादी कथानायक माँ नर्मदेच्या सानिध्यात येतो आणि सुरु होतो त्याचा त्याला अंतर्बाह्य बदलणारा रहस्यमयी अद्भुत प्रवास..  

अठरा वर्षांनी भारतात आलेला कथानायक नर्मदेच्या खोऱ्यात असणऱ्या जंगलातील आदिवासी विकास केंद्रात दाखल होतो तोच मनात आदिवासींबद्दल पूर्वग्रह घेऊन.. दगडाला देव मानणारे, नर्मदा नदीला देवी मानणारे हे अडाणी आदिवासी.. ज्यांच्याशी त्याचा काहीच संबंध नाही.. जायचं, राहायचं, संशोधन करायचं आणि उपकाराखातर एक शाळा सुरु करून त्यांना थोडं शहाणं करायचा प्रयत्न करायचा आणि अमेरिकेला परतायचं.. पण जेव्हा त्याचा आदिवासी जीवनाशी जवळून संबंध येतो तेव्हा त्याचं  आयुष्य ठवळून निघतं.. मी कोण? माझं भोवतालचं जग आणि माझी त्याच्याशी असलेली बांधिलकी कोणती? श्रद्धा असावी का नसावी? भारतीय संस्कृती म्हणजे काय? मुक्ती, पुण्य म्हणजे काय?.. असे पूर्वी न पडलेले प्रश्न त्याला पडतात.. 

एकमेकांसाठी जगणारी, तडजोड करणारी, वेळ प्रसंगी परक्यांना ही आयुष्यभरासाठी आश्रय देणारी माणसं.. उच्चशिक्षित पण केवळ आपल्या आईबाबांचा वारसा चालवण्यासाठी आदिवासी लोकांची निस्वार्थपणे सेवा करणारी सुप्रिया.. एका दुर्गम खेड्यातील शाळा बंद होऊ नये म्हणून प्रयत्न करणारे विष्णू गुरुजी आणि शाळेत येणाऱ्या उपाशी पोरांना जेवू घालणारी त्यांची पत्नी विद्या.. निराधार स्त्रियांचे रक्षण आणि पोषण करणारी कालेवाली माँ.. निःशुल्क तत्वावर लोकांचा उपचार करणारे वैद्य.. संस्कृती, धर्म आणि मानवता ह्याचे रहस्य उलगडून सांगणारे शास्त्रीजी.. तारण ठेवायला ज्यांच्याकडं काहीच नाही अश्या आदिवासीना कर्ज देणारे गुप्ताजी आणि त्याचं कर्ज फेडायला येणारे आदिवासी.. असे अनेक असामान्य लोक.. निबिड अरण्यात राहताना ह्या आदिवासींमध्ये असणाऱ्या श्रद्धा-अंधश्रद्धाच बळ देतात.. विश्वास ठेवणं, श्रद्धा असणं म्हणजे अडाणी नाही.. एकेमेकांना साथ देणारे, प्रामाणिक, परंपरेनं आखून दिलेल्या मार्गावर निष्ठेनं चालणारे आदिवासी किती खरे आहेत ह्याचा अनुभव त्याला येतो.. 

'नर्मदा परिक्रमा'.. नर्मदा परिक्रमावासी.. आणि त्यांची सेवा करणारे खोऱ्यातील आश्रम.. आणि ही संस्कृती जपून ठेवायला मदत करणारे आदिवासी.. हे सगळं पाहताना कथानायक गोंधळून जातो.. परिक्रमेमध्ये कधीतरी होणारे नर्मदेचे प्रत्यक्ष दर्शन ही त्याला अंधश्रद्धा वाटते.. 'श्रद्धा अंधश्रद्धेपेक्षा संस्कृती जपणं महत्वाचं' ह्या सुप्रियानं दिलेल्या उत्तरानं तो अजूनच भांभावून जातो आणि स्वतः अनुभव घ्यायचं ठरवतो आणि त्याला नर्मदेचं असणं जाणवतं.. नर्मदेची परिक्रमा करता करता आपणच नर्मदा होणं किंवा सगळीकडं नर्मदाच दिसणं.. म्हणजे नर्मदा ह्या तत्वाशी समर्पण.. म्हणजेच तत्वमसि.. 

'तत्वमसि' कादंबरीवरील 'रेवा' ह्या गुजराती चित्रपटाला २०१८ मध्ये राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलं आहे..


-मी मधुरा.. 

************************************************

Friday, December 30, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं ३३ ते ३६)

 ३३. अकूपार.. ध्रुव भट्ट.. 
अनुवाद.. अंजनी नरवणे.. 



आशयघन कविता आणि गूढ-रहस्यमयी कादंबऱ्या लिहिणारे गुजराती साहित्यिक 'ध्रुव भट्ट'.. 'वाचायलाच हवेत असे लेखक' ह्यात अग्रक्रमांकावर असणारे, साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळवणारे, ज्यांच्या कथानकांवर चित्रपट बनतो असे हे 'ध्रुव भट्ट'.. ह्या लेखकाचं अजुनी एक वैशिष्टय म्हणजे ज्या प्रदेशातील कथा ते सांगतात तिथं स्वतः जाऊन, राहून, अनुभव घेऊन मगच लिहितात.. त्यामुळं त्यांच्या कथा प्रामाणिक आणि सत्याच्या जवळ जाणाऱ्या असतात.. ह्यापूर्वी त्यांची 'तिमिरपंथी' ही कादंबरी वाचली असल्यानं 'अकूपार' बद्दल खूप उत्सुकता होती.. 'अकूपार' ही ध्रुव भट्ट या सिद्धहस्त गुजराती लेखिकाची चौथी कादंबरी.. आपल्या सहज सुंदर लेखन शैलीतून अतिशय उत्कटतेनं चितारली एका चित्रकाराच्या आत्मशोधाची, त्याला सापडलेल्या 'गीर'ची विलक्षण कांदबरी!!..  

ध्रुव भट्टांच्या शिरस्तेप्रमाणे कथानायकाला ह्या ही कादंबरीत नाव नाही.. तर चित्रकार कथानायक पंचमहातत्त्वांपैकी एक असणार्‍या पृथ्वी या महातत्त्वाचं चित्र काढण्यासाठी मुंबईहून गीरच्या अभयारण्यात जातो.. आणि 'गीर'चाच होऊन जातो.. ह्या प्रवासात त्याचा मार्गदर्शक असतो तो त्याचा 'अंतर्मनाचा आवाज'.. हा प्रवास अतिशय तरल, भावोत्कट आणि प्रसंगी भाबडा वाटावा असा आहे.. 

"खमा गीर तुला" (दुःखी नगं होऊ गीर).. हे कादंबरीतील पाहिलं वाक्य.. आईमा नावाच्या एका 'गीर'वर प्रेम करणाऱ्या वृद्धेच्या तोंडचं.. पण आईमा असं एका जंगलाला का म्हणाली? हा कथानायकाला पडलेला प्रश्न आणि ह्या प्रश्नातून निर्माण होणारे असंख्य प्रश्न हा कादंबरीचा प्रवास.. पण जसजसा हा प्रवास पूर्णत्वास येत जातो तसतसं  त्याच्या मनातील प्रश्न, शंका, द्वंद्व यांचं शमन होत जातं.. आणि एका समृद्ध जाणिवेचा त्याला साक्षात्कार होतो.. 

गीर, गीरची जादू, माणूस आणि प्राणी यांचं नातं, माणूस आणि निसर्ग यांचं नातं "खमा गीर तुला" ह्या भावनेतून हळू हळू उलगडत जातं.. सगळं जग सोडून हा चित्रकार नेमका 'गीर'लाच का येतो..'सांसाई', 'आईमा', 'डोरोथी', 'धानू' यांसारखी माणसंच का भेटतात.. त्यानं काढलेल्या 'पृथ्वी'च्या चित्रांमधून मानवी जीवनाच्या विविधरंगी छटाच का रेखाटल्या जातात.. अश्या अनेक सुखद योगायोगांनी ध्रुव भट्ट वाचकांना खिळवून ठेवतात.. संसाई, मुस्तफा, आईमा, अहमद, विक्रम ही पात्रं शेवटपर्यंत वाचकांसोबत राहतात.. 

आईमानं सांगितलेली पृथ्वीतत्वाच्या कासवाची गोष्ट विचार करायला लावणारी आहे.. असा समज आहे कि शेषनागाच्या डोक्यावर पृथ्वी उभी आहे आणि शेषनाग अकुपार नावाच्या कासवावर.. आणि ह्या दोघांनी मिळून पृथ्वीला तोलून धरलंय.. माणूस, प्राणी, जंगल, नद्या, समुद्र ह्या सगळ्यांचं एक संतुलित प्रमाण असतं.. आणि हे प्रमाण हाताबाहेर गेलं, अकुपार आणि शेषनाग ह्यांना सहन होईनास झालं कि ते पृथ्वीला सांगतात, कि मा, आता हे ओझं सहन होत नाही काही तरी मार्ग काढ.. मग पृथ्वी परमेश्वराकडं धाव घेते आणि मग कोणत्या ना कोणत्या रूपानं तो अवतार घेतो.. कधी मासा, कधी वराह, कधी नरसिंह.. आणि आत्ता ही आपण हेच संतुलन राखण्याच्या प्रयत्नात आहोत.. असो.. 

पृथ्वीतत्त्वाची चित्र काढणाऱ्या चित्रकाराचा प्रवास म्हणून हे 'अकुपार' ज्याच्यावर हे पृथ्वीतत्त्व उभं आहे.. 


-मी मधुरा.. 

************************************************

३४. एकेक पान गळावया.. गौरी देशपांडे.. 


'गौरी देशपांडे' आत्मभान जागवणारी, विसाव्या शतकातील आधुनिक स्त्रीवादी साहित्यिका.. जीवनातील वास्तवता व सत्यावर आधारित असणारी, वाचकास अंतर्मुख करणारी अशी त्यांची लेखनशैली.. व्यक्तिस्वातंत्र्य, माणूसपणा, स्त्रीजाणिवा हा त्यांच्या लेखनाचा गाभा.. 'गोफ' वाचल्या नंतर तर मी त्यांच्या लेखनच्या प्रेमातच पडले..  त्यांच्या स्त्रीवादी लेखनातून, स्त्री मनाची स्पंदने टिपताना स्त्री स्वातंत्र्यापेक्षा वैचारिक व्यक्तिस्वातंत्र्यावर त्यांचा असणारा भर मला जास्ती भावतो.. स्त्रीवादी रोमॅंटिझिम, इंटेलेक्चुअल रोमॅंटिझिम किंवा रोमॅंटिक लीगसी यांसारख्या संकल्पना मराठी साहित्यात आणण्याचं धाडस गौरी देशपांडे यांनी केलं.. 'एकेक पान गळावया' हा त्यांचा तीन कथांचा कथा संग्रह.. त्यातील स्त्रीव्यक्तिरेखा काय सांगतील? कश्या अश्या असतील? ह्या बद्दल मोठ्ठी उत्सुकता होती.. 

एकेक पान गळावया' या पुस्तकातील कथा १९८० च्या दशकातील भारतीय स्त्रीच्या भावविश्वाचा आढावा घेतात.. ह्या कथांमधील नायिका स्वतंत्र आहे, तिला स्वतःचे विचार, स्वतःची मतं आहेत जी ती आत्मविश्वासानं मांडते.. चुकीच्या वागण्याची, चुकीच्या निर्णयांची कबुलीही ती तितक्याच प्रांजळपणे देते.. आणि त्या वागण्याचं, विचारांचं विश्लेषणही करते.. ह्या कथेंतील सगळ्यांचं स्त्री व्यक्तिरेखा 'आदर्श स्त्री' च्या चौकटीबाहेर पडून आयुष्य जगताना दिसतात..

गौरी देशपांडे याचं लिखाण सहज, सोप्प असं नक्कीच नाहीये.. ते पचनी पडायला वेळ लागतोच..  
कथा १: 'कारावासातून पत्रे'- निम्म्याहून अधिक गोष्ट वाचेपर्यंत सगळं 'डोक्यावरून'च गेलं.. पण नंतर त्या लेखनातील मेख लक्षात आल्यावर वाचायला मजा आली.. सुरुवातीला कथेच्या नावावरून वाटलं की पत्ररूपी संवाद असेल.. पण ही पत्रं आहेत एकतर्फी लिहिलेली.. नायिकेनं, अमेरिकेतल्या मित्राला मनू ला लिहिलेली.. ही नायिका तिच्या जीवनात घडणाऱ्या इतंभूत बातम्या मनूला पत्रातून लिहीत असते.. मनूनं तिला कधी पत्र लिहिलं का नाही ह्याचा अंदाज मात्र शेवट पर्यंत येत नाही.. तिची त्या बाबत काही हरकत किंवा तक्रार हि दिसत नाही.. त्यामुळं कदाचित हे डायरी लेखन असेल का असं ही वाटतं.. नायिकेच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येकांची नावं कळतात पण नायिकेचं नाव गूढच राहतं.. कदाचित ती अश्या अनेक स्त्रियांचं प्रतिनिधीत्व करत असेल.. तर ही घटस्फोटित नायिका मनू नावाच्या विवाहित माणसाच्या प्रेमात पडते.. आणि त्याच्या बरोबर livein मध्ये राहू लागते.. काही वर्षानंतर मनू नोकरीसाठी परदेशी जातो.. तो गेल्या नंतर तिच्या आयुष्याबद्दल, तिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक पुरुषाबद्दल ती त्याला पत्रानं कळवत राहते.. तिच्या लैगिक सुखाबद्दल सुद्धा ती त्याच्याशी मोकळेपणानं बोलते.. त्याच्या विरहाबद्दल बोलते.. कथेच्या शेवटी  ताजा कलम मध्ये 'कारावासातून पत्रे' ह्या शीर्षकाचा उलगडा होतो..  
कथा २: 'मध्य लटपटीत'- सुशिक्षित, नोकरी करणारी, आपल्या संसारात सुखी असणारी मध्यम वयीन नायिका.. आपला नवरा जयंत बरोबर कामानिमित्य परदेशी जाते.. सुरुवातीचे नाविन्यपूर्ण दिवस संपतात आणि वास्तवाची जाणीव होते.. सगळं सुख असून सुद्धा आयुष्यात पोकळी जाणवू लागते.. बोर्डिंग मध्ये असणारी मुलं, मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि परदेशातील एकाकीपणा.. नेमकं आयुष्यात काय हरवलंय याचा शोध घेत भारतात परत येते.. हा शोध घेता घेता कथेच्या शेवटी तीच तिला  गवसते आणि तिच्या मनात तरळतो एक चिरंतन आनंद.. ह्या ही कथेत ही नायिका अनामिक च आहे.. 
कथा ३: 'एकेक पान गळावया'- 'राधा' कथा नायिका.. पेशानं लेखिका.. भरपूर शिकलेली, विचारी.. तिचा प्रियकर, सहचारी, पती माधव, भारतीय दूतावासात नोकरी करणारा.. माधवच्या नोकरीमुळं भरपूर फिरलेली अनुभव संपन्न राधा.. आणि ह्या अनुभवाच्या बैठकीतून तिचं आसणारं लेखन.. उतारवयातील माधवच्या आकस्मित मृत्यूनंतरचं राधाचं आयुष्य, आधीच्या आयुष्याचे उतारवयावर होणारे पडसाद म्हणजे 'एकेक पान गळताना..' फिरतीच्या नोकरीमुळं बोर्डिंग मध्ये, एकाकी वाढलेली मुलं, परदेशातील त्याचे मित्र मैत्रिणी, तिथलं आयुष्य, भारत आणि परदेश ह्या दोन स्तरावरील असलेले आयुष्यातील बंध.. म्हटले तर सोपे म्हटले तर क्लिष्ट.. नवरा बायको, आई-वडील-मुलं, मित्र यांच्यातील भावबंधपण लेखिकेनं अगदी सहजतेनं उलगडलेले आहेत.. ही कथा वाचताना त्या-त्या जागी उभं राहून विचार करायला लावते. 


-मी मधुरा.. 

************************************************

३५. मैत्रेयी.. डॉ अरुणा ढेरे..


मैत्रेयी.. पौराणिक कथांमधली विदुषी.. खरं तर ह्या खेरीज मैत्रेयी बद्दल मला फारशी अशी माहिती नव्हतीच.. 'मैत्रेयी' हे पुस्तक वाचंच असा आग्रह ही झालेला.. इतकी मोठ्ठी विदुषी आणि ८८ पानांचं पिटुकलं पुस्तक.. नेमकं काय लिहिलं असेल ह्या पुस्तकात?ही उत्सुकता पण होतीच.. पुस्तकाच्या पहिल्या पानावर 'उपनिषदांनो-- मैत्रेयी तुमच्यातून आली' इतकंच.. आणि दुसऱ्या पानावर 'माझ्या मनातील मैत्रेयी' ही अरुणाताईंनी स्वतः लिहिलेली पुस्तकाची प्रस्थावना.. सुरुवातीलाच त्या लिहितात हि काही कथा, कादंबरी नाही.. जे काही मैत्रेयीबद्दल वाचलं, ऐकलं त्यातून जशी ती भावली तशी ती लिहिली.. ह्या लिखाणाला ऐतिहासिक तसंच उपनिषदांचा संदर्भ नक्कीच आहे.. 

याज्ञवल्क ऋषींच्या दोन भार्या एक कात्यायनी आणि दुसरी मैत्रेयी.. मैत्रेयी, जनक राजाचा प्रधान 'मित्र'ची कन्या.. जनक दरबारात सीतेसह सहभागी असणारी युवती.. दरबारात ब्रह्मज्ञानच्या चर्चेसाठी आलेला 'याज्ञवल्क', त्याला मैत्रेयीनं पाहिलं, ऐकलं आणि प्रभावित होऊन वरलं सुद्धा!.. ऐहिक ऐश्वर्य मागे ठेवून ती त्याच्या आश्रमात प्रवेशली.. आणि त्याच्या जीवनाशी समर्प्रित झाली.. वेदांपासून उपनिषदापर्यंतचा तिचा याज्ञवल्क बरोबरचा विचार प्रवास, याज्ञवल्क बरोबरचा तिचा वैवाहिक जीवन प्रवास, त्यांच्या जगण्यातील जाणिवांचे रंग ह्यातून याज्ञवल्कच्या आयुष्यातील मैत्रेयी आकार घेते..

याज्ञवल्क आणि मैत्रेयी यांच्या तात्त्विक, वैचारिक चर्चेतून त्यांच्या सहजीवनाचं सुंदर काल्पनिक विश्व अरुणाताईंनी निर्माण केलं आहे.. अगदी आठवणीत रममाण होण्यापासून ते रतिक्रीडा, सौंदर्य आणि सौंदर्याच्या कल्पना मग त्या देहाच्या असोत मनाच्या, अनुभवानं विचारात होणारे बदल, आत्मज्ञान ते यज्ञसंस्था.. असे कितीतरी विषय.. 'सौंदर्य म्हणजे काय तर पाहणाऱ्याच्या मनाचाच खेळ..' किती बरोबर आहे ना?.. कोणी कोणाला सुंदर दिसते किंवा दिसत नाही.. सौंदर्य म्हणजे व्यक्तिसापेक्ष कल्पना.. रतिक्रीडेला तर यज्ञकर्म म्हटलं आहे.. पण ती विवेकानं व्हायला हवी.. ही चर्चा वाचण्याजोगी आहे.. 

मला आवडलेलं.. 'विसंवादातून नवा संवाद उभा राहतो.. फक्त हा विसंवाद दुबळा नको.. सुंदर संवादाची ओळख व्हायची असेल तर सबळ विसंवादाचं स्वागत व्हायला हवं.. आज आपण सुंदर आयुष्य जगत असू तर ते मागे अनेक विसंवादाला तोंड दिल्यामुळेच.. किती प्रगल्भ विचार आहे हा.. 
आणि दुसरं आवडलेलं.. याज्ञवल्कला सूर्य आवडतो तर मैत्रेयीला चंद्र.. याज्ञवल्क म्हणतो सूर्य आवडावा कारण त्यात तेज आहे.. सूर्य जीवनदायी आहे.. सूर्य जागवतो.. त्यामुळं सूर्य आवडायला हवा.. त्यावर मैत्रेयी म्हणते आवड वेगळी आणि गरज वेगळी.. सूर्य तर विकासाच्या सलगतेत आधीच थांबतो.. एकदा जी वाढ झाली ती झाली.. विकासाच्या बिंदूवर तो कायमचा स्थिरावला आहे.. पण चंद्राचं असं नाही.. उत्पत्ती-स्थिती-लय हा विकास त्यात आहे.. लय म्हणजे संपणं नव्हे.. त्यापुढं उत्पत्ती आहे.. त्यामुळं हे दुष्टचक्र नाही.. जन्म-जीवन-मृत्यू हे जीवनाचं सत्य म्हणजे चंद्र.. 

ह्या सगळ्या चर्चा, तर्क-वितर्क वाचताना अरुणाताईंच्या विचारांची कमाल वाटते.. याज्ञवल्क आणि मैत्रेयी हे दोन वेगळ्या विचारधारांची व्यक्तिमत्व.. ह्या दोन्ही बाजूंचे विचार तितकेच स्वच्छ असायला हवेत.. लिहिण्याआधी ते स्वतःत रुजवायला ही हवेत.. ह्या विचारांत स्थैर्य ही हवं.. आणि ही विचारांची बीज वाचकांत रुजायला ही हवीत.. खरंच हे पुस्तक म्हणजे छोट्या पाकिटात मोठ्ठा धमाका असं आहे.. कधी ही कोणतं ही पान उघडावं आणि वाचावं..

माझ्यासाठी आत्ता ह्या आयुष्याच्या टप्प्यावर महत्वाचं.. जीवनाला काळाचं कसलं बंधन.. व त्याच्या गतीनं अखंड ऋतुचक्र फिरवतच राहणार.. आपण कसे वाढतो आहोत, उमलतो आहोत हे आपलं आपल्याला कळायला हवं.. कणाकणातून अनुभावगंधाच्या वादळानं तेजाचे कळे धुमारायला हवेत.. प्रसन्नतेचा दीप्तिगोल अंतर्बाह्य फुलायला हवा.. असं स्वतःच मनोमन उमलण अनुभवलं की आपोआप काळाचं भान विसरायला होतं.. थोडक्यात age is just a number.. भरभरून जगणं महत्वाचं..    


-मी मधुरा.. 

************************************************

३६. अमलताश.. डॉ. सुप्रिया दीक्षित.. 


'अमलताश'.. बहावा.. पिवळ्या धमक झुंबरांनी फुलणारं सुंदर झाड.. प्रसिद्ध लेखक प्रकाश संत आणि डॉ. सुप्रिया दीक्षित यांचं खास आवडतं.. म्हणून त्यांच्या ह्या जीवन कथेचं नाव ही 'अमलताश'.. एक साधंसुधं, सौम्य आणि निर्मळ आत्मकथन.. खुप सकारात्मक आणि समाधान देणारं.. व्यवसायानं डॉक्टर असणाऱ्या सुप्रिया दीक्षित, लेखिका नाहीत हे कोठेही जाणवत ही नाही.. जाणवत राहतं ते फक्त उत्कट प्रेम आणि जीवन जगण्याचा उत्साह..   

'लंपट'च वेड लावणारे प्रकाश संत.. त्यांच्या 'वनवास', 'चांदण्यांचा रस्ता' ह्या पुस्तकाची झालेली पारायणं.. अश्या लेखकाबद्दल त्यांच्या सहचारिणीनं काय लिहिलं असेल?    प्रकाश संत आणि इंदिराबाई संत ह्याचं असलेलं मायलेकाचं नातं.. त्यांचे असलेले एकत्रित भावबंध.. हे जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता आणि त्याच बरोबर मनात असलेल्या  त्यांच्या प्रतिमेला तडा तर जाणार नाही ना ही धाकधूक.. फक्त दोन अपवाद वगळता लेखकांच्या बायकांच्या मनोगतांचा मी धसकाच घेतलाय.. आपल्याला भावलेला लेखक हा त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो.. तो माणूस म्हणून नवरा म्हणून त्या लेखकाच्या कोनाशी सुसंगत असेलच असं नाही.. परत ते कथानक कसं मांडलय, कथानकाला काय सांगायचंय ह्यावर त्या माणसाकडं पाहायचा दृष्टीकोन बदलतो.. आणि प्रकाश संतांच्या बाबतीत मला ही रिस्क नको होती.. 
  
डॉ. सुप्रिया दीक्षितांच्या मनातले संत एकदम लख्ख आणि उजळ आहेत.. त्यामुळं काही सायास न करता 'जसं घडलं तसं सांगितलं' इतक्या सहजतेनं प्रवाहीपणे हे आत्मकथन लिहिलंय.. स्वतःचं बालपण, बालमित्र संत आणि संतांसोबतचं सहजीवन, कौटुंबिक भावविश्व, मित्र परिवार, मुलांचं कौतुक या सर्वांबद्दल कोणताही आविर्भाव न ठेवता त्या आपल्याशी बोलतात.. आयुष्यात आलेल्या असंख्य कटू प्रसंगांचं भांडवल न करता त्यांना पानाच्या डाव्या बाजूइतकंच महत्व आहे असं त्या म्हणतात.. माणसं माणसांसारखीच वागतात.. म्हणून त्यांची वैगुण्ये अधोरेखित करू नयेत.. हे त्याचं मला भावलेलं वाक्य.. 

'अमलताश'.. म्हणजे संतांच्या सोबतीनं जगलेल्या आयुष्याबद्दलची कृतज्ञता.. संतांच्या अभिव्यक्तीला डॉ. सुप्रियांच्या सशक्त सहकार्यामुळं, त्यांच्यातील ऋजुतेमुळं आणि संतांवरच्या निर्व्याज प्रेमामुळं प्रवाहीपण आलं असं मला वाटतं.. 


-मी मधुरा.. 

************************************************ 
 



   


Tuesday, November 29, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं २८ ते ३२)

 २८. ते चौदा तास.. अंकुर चावला..
अनुवाद: मृणालिनी नानिवडेकर



मुंबई ताज हॉटेल हल्यावर बरीच पुस्तकं लिहिली गेली.. वेगवेगळ्या अँगलनं.. 'Black Tornado' कमांडोंच्या अँगलनं तर 'The Siege' हल्ल्याचा संपूर्ण दस्तऐवज..  अजमल कसाबच्या भारतातील खटल्यातील अप्रकाशित कागदपत्रांपासून ते ताज मधील २६/११ पूर्वीचे आणि नंतरचे दैनंदिन व्यवहार ते तिथले ग्राहक, त्यांनी अनुभवलेलं २६/११ ह्या सगळ्यांचा समावेश.. हे पुस्तक मी पूर्वी वाचायला घेतलं होतं पण ते वाचवलं नाही.. नंतर कधीतरी भारतवारीत 'ते चौदा तास' हे पुस्तक वाचून तरी बघू  म्हणून घेऊन ठेवलं.. आणि आता हल्ल्याच्या १४ वर्षांनंतर हा थरार वाचला..  

'14 Hours An Insider's Account of the 26/11 Taj Attack' हे पुस्तक म्हणजे 'अंकुर चावला' यांचा 'Taj Attack Surviver' ह्या भूमिकेतून लिहिलेला अनुभव.. आणि सकाळ वृत्तपत्राच्या पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी त्याचा केलेला अनुवाद म्हणजे 'ताज हल्ला आतून अनुभवताना.. ते चौदा तास'.. ताज मध्ये ऑपरेशन्स मॅनेजमेंट ट्रेनी असणाऱ्या अंकुरच्या अनुभवांची रोलर कोस्टर राईड म्हणजे हे पुस्तक.. लेखनात परिपक्वता नसली तरी त्यावेळचा प्रसंग, त्या भावना वाचकांपर्यंत पोचवण्यात अंकुर चावला यशस्वी झाला आहे.. १३० पानांचं डायरी स्वरूपात लिहिलेलं हे पुस्तक वाचताना कंटाळा येत नाही.. 

प्रस्तावनेमध्ये 'अंकुर चावला' चा थोडक्यात परिचय होतो.. मूळचा दिल्लीचा रहिवासी असणारा अंकुर हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी सिमल्याला जातो.. तेथून मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून ताजमहाल पॅलेस हॉटेल मुंबई येतो.. ताजच्या वैभवाचा, खानदानी ऐटीचा, शाही इतमामाचा तो एक भाग बनतो.. दिल्ली आणि मुंबई ह्या दोन शहराच्या राहणीमानातील तफावत अनुभवत, ताज मधले काम, तिथली शिस्त ह्याचे धडे घेत, नवीन मित्रांबरोबर मजा करत ट्रैनिंग चे चार महिने पूर्ण होतात.. आणि उजाडतो २६ नोव्हेंबर २००८.. तो काळा दिवस.. बार मध्ये आज त्याच लेबलिंगचं काम.. कस्टमर बरोबर 'माल्ट' विषयी बोलत असताना एक मोठ्ठा धमाका होतो.. वेळ रात्री ९ वाजून २४ मिनिटे.. काय झालं हे पहायला तो बाहेर जातो.. आणि पाहतो अस्ताव्यस्त रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं एक शरीर आणि राखाडी रंगाची बॅकपॅक घेतलेला रायफलधारी माणूस.. पाठोपाठ गोळ्यांचे आवाज.. आणि सुरु होतं एक थरारक नाट्य.. 

सुरुवातीचा काही भाग खूपच कंटाळवाणा वाटतो.. पहिल्या २०-२५ पानांनंतर पकड वाढते, वेग वाढतो आणि वाचकाला पूर्णपणे भावनिक उच्च पातळीवर घेऊन जातो.. मृत्यूचे भय, डोळ्यासमोर आयुष्याचा दिसणारा सरलेला सारीपाट, रक्तपात, निपचित पडलेले निरपराध लोकं, मानसिक शारीरिक त्रासातून जाणारी जीव मुठीत धरून असणारी माणसं यांचं शक्तिशाली आणि मार्मिक केलेलं चित्रण.. ह्या सर्व त्रासदायक वावटळीत थरारात हॉटेलच्या स्टाफचं कर्त्यव्यापासून कधीही परावृत्त न होणं.. ह्यात आपण गुंतत जातो..  

-मी मधुरा.. 

************************************************

२९. कॉलनी.. सिद्धार्थ पारधे.. 


पुन्हा एकदा आत्मकथा!.. एका व्यासंगीक कॉलनीच्या अपत्याची.. कॉलनीनं पाहिलेल्या, कॉलनीनं घडवलेल्या, कॉलनीच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या एका व्यक्तिमत्वाची!!.. साहित्यिकांनी एकत्र नांदावं म्हणून आचार्य अत्रे आणि अनंत काणेकर साकारलेल्या साहित्य सहवासातील एका कष्टकऱ्याची.. 'सिद्धार्थ पारधे' नामक एका वाचमनच्या मुलाची!!!... ज्या कॉलनीत साक्षात सरस्वती नांदते, त्या कॉलनीच्या परिसस्पर्शानं एका पारधी जमातीच्या मुलाचं कसं सोनं झालं याची ही कथा.. 

पारधी समाज.. बाकी समाजाच्या दृष्टीनं बदनाम झालेली भटकी जमात.. गांवाबाहेर राहणारी, भीक मागून, चोऱ्यामाऱ्या करून पोटाची खळगी भरणारी जमात.. एका  गांवचा शेर संपला कि पुढचं गांव.. सतत भटकत राहणारी.. पुलिसांच्या रडारवर असणारी.. अश्याच पुलिसांच्या, सावकाराच्या त्रासाला कंटाळून लक्ष्मण भिकाजी पारधे आपली पत्नी  कोंडाबाई आणि मुलांना घेऊन मुंबई गाठतात.. आणि साहित्य सहवास कॉलनीच्या बांधकामावर बिगारी मजूर म्हणून काम करू लागतात.. खाडी बुजवणं ते बिल्डिंगची पायाभरणी ते बांधकाम ते स्लॅब टाकणं ते मिस्त्री/प्लम्बर अशी काम करत तिथंच तयार होणाऱ्या बिल्डिंगपाशी झोपडी टाकून राहू लागतात.. बायको मुलंबाळं ही इथंच काम करू लागतात.. जसजश्या बिल्डींग्स तयार होत गेल्या, माणसांनी गजबजू लागल्या तसं त्यांच्या कामाचं स्वरूप पण बदलू लागलं.. लक्ष्मण आता ह्या कॉलनीचा वाचमन म्हणून काम करू लागला तर कोंडाबाई कॉलनीच्या घराची धुणीभांडी तर सिद्धार्थ दूध-वर्तनामपत्रं लाईन, गाड्या पुसणं अशी काम.. सगळं कुटुंब साहित्य सहवास मध्ये दिवसभर राबू लागलं.. आपलं काम संपल्यावर सिद्धार्थ तिथल्या मुलांबरोबर खेळात असे.. त्यांच्या बरोबर खेळण्या बोलण्यातून तो घडत गेला.. शिकत सावरत गेला..  

बिगारी मजुराचा मुलगा ते एक उच्चशिक्षित नोकरदार हा सिद्धार्थचा प्रवास थक्क करणारा आहे.. ह्या प्रवासात जे काही अनुभवलं, भोगलं, सहन केलं आणि अपार दारिद्र्यावर मात करून स्वतःला कसं घडवलं हे प्रांजलपणानं, मनमोकळेपणानं कथन केलंय, सांगितलंय.. त्याच्या वडिलांचं लक्ष्मणचं कॉलनीत येणं ते त्यांचा मृत्यू असा ह्या आत्मकथनाचा प्रवास.. त्यामुळं ही गोष्ट 'लक्ष्मण पराधे'ची पण आहे..

सिद्धार्थ पराधेंच हे कथन वाचकाच्या मनाशी संधान बांधत.. हे सगळं आपल्या भोवतीच घडतंय असं वाटतं.. सचिन तेंडुलकर, वि.वा. करंदीकर, व.पु.काळे ही नावं ह्या खडतर प्रवासात गार वाऱ्याची झुळूक बनून येतात.. 


-मी मधुरा.. 

************************************************

३०. बहुरूपी.. नारायण धारप.. 


'बहुरूपी'.. खरं तर मला 'प्रशांत दामलें'च 'बहुरूपी' वाचायचं होतं.. मराठी 'स्टींफन किंग', नारायण धारप यांचं नाही.. कॉलेज जीवनात 'नारायण धारप' भरपूर वाचलं.. उगाचंच इंग्लिश कादंबरी वाचल्याचा फील येऊन भारी वाटायचं.. आणि नुकत्यातच 'ग्रहण' वाचलं.. बहुतेक मालिकेचा परिणाम असावा.. त्यामुळं आत्ता ह्या पन्नास पुस्तकांच्या लिस्टमध्ये नारायण धारप नव्हतेच.. बहुतेक सारख्याच नावानं घोळ झाला.. ('एक बहुरूपी' नावाचं अशोक मामांचं आत्मचरित्र पण आहे..)    

नारायण धारपांच्या 'बहुरूपी'नं खूपच निराश केलं.. अतिशय सुमार कथानक आणि लेखन पण.. नुसतीच म्हणायला रहस्य कथा.. कोणताही ट्विस्ट नाही.. कोणतेही थ्रिल नाही.. अगदी अपेक्षेप्रमाणं सगळं घडत जातं.. 'अजय' ह्या कथेचा नायक.. जो पेशानं नट आहे.. एक संस्थान वाचवण्यासाठी तो त्या राणीसाहेबांचा मुलगा म्हणून नाटक करायला तयार होतो.. आणि ह्या प्रवासात तो कशी वेगवेगळी रूपं घेतो आणि ते संस्थान वाचवतो अशी हि कथा.. 

कोणतेही पुस्तक मध्यात सोडायचं नाही म्हणून कसंतरी वाचून पूर्ण केलं.. चेटकीण, ४४० चंदनवाडी, ग्रहण, स्वाहा लिहिणारे नारायण धारप हेच का इतकी शंका निर्माण व्हावी इतपत हे पुस्तक टुकार आहे..  


 -मी मधुरा.. 

************************************************

३१. पडघवली.. गो. नी. दांडेकर.. 


'पडघवली'.. गो.नी.दांच्या भाषेतून रेखाटलेलं कोकणातील एका समृद्ध खेड्याचं शब्दचित्र!!.. १९५०चं दशक.. आठ वर्षाची अंबा लग्न होऊन खोतांची सून अंबावाहिनी म्हणून पडघवलीत प्रवेशते.. आणि तिच्याच जीवनपटातून उलगडत जाते ही 'पडघवली'.. निसर्गानं आपलं वैभव अनंत हस्ते जिच्यावर उधळलंय अशी ही 'पडघवली'.. 

सुरुवातीलाच आत्येसासूबाईनी अंबावहिनीला सांगितलेल्या गोष्टींतून या गावाचा रंजक इतिहास वाचकाला समजतो.. समृद्ध वारसा असणारी, जीवाला जीव देणारी माणसं  असणारी, शेजारधर्म पाळणारी, पाप-पुण्याला अनन्यसाधारण महत्त्व असणारी 'पडघवली'.. 'पडघवली'चं रक्षण करण्यासाठी इथं गिऱ्होबा आहे आणि भरभरून आशीर्वाद देणारा गेंगण्याचा मारुतीराया सुद्धा आहे.. ह्या गोष्टी ऐकत ऐकत, माडा-पोफ़ळीच्या बागेतून फिरत फिरत, गावातील प्रत्येक व्यक्तीशी नातं जोडत आपसूकच आपण पडघवलीकर होऊन जातो.. ही गोनीदांच्या लेखन शैलीची कमाल.. ब्राह्मणी भाषा, कुलवाड्यांची भाषा एवढी अफलातून सादर केलीय की आपल्या समोरच संभाषण घडतंय, आपण गावातून फेरफटका मारतोय असं वाटावं.. सगळ्या व्यक्तिरेखा आजूबाजूला जिवंतपणे वावरत असतात.. जशी पडघवलीची लाडकी खोतीण 'अंबावहिनी'.. मनमिळावू, प्रेमळ, गावाविषयी आत्मीयता असणारी.. झाडपाल्याच्या औषधांनी गाववाल्यांना बरं करणारी अनेक बाळंतिणींना सोडवणारी.. आडल्या नडल्यांना मदत करणारी.. गावाचा भक्कम आधार असणारी.. तिच्यात आपल्याला आई आजी दिसू लागते..

जसजशी कथा पुढं सरकत जाते, पिढी बदलत जाते तसतसा गावातला आपुलकीचा झरा आटत जातो.. व्यंकूभावोजींसारख्या लोभी, हव्यासी आणि गावात दबदबा असण्याऱ्या माणसांमुळं आणि इतरांच्या हतबलतेमुळं पडघवलीला लागलेली उतरती कळा मनाला चटका लावून जाते.. अंबूवहिनीचा नवरा महादेव, गावाचा खोत असूनही त्याच्या नाकर्तेपणामुळं, व्यंकूवरच्या आंधळ्या विश्वासामुळं तो ही काही करू शकत नाही.. ह्यातच हाय खाऊन महादेवाचा अंत होतो.. रया गेलेली, माणुसकी हरवलेली  पडघवली सोडून मुलाकडे मुंबईला जाण्याचा निर्णय अंबावाहिनी घेते.. 

'पडघवली' ही फक्त कथा नाही तर आपल्या देशातल्या गावांची प्रातिनिधिक स्वरूपात मांडलेली शोकांतिकाच म्हणावी लागेल.. आपल्या देशातल्या गावाचं चित्र आजही पडघवलीपेक्षा वेगळं नाही.. 

विजय देव, वीणा देव, रुचिर कुलकर्णी आणि मधुरा देव यांनी साकारलेलं 'पडघवली'चं अभिवाचन storytell वर उपलब्ध आहे.. 


-मी मधुरा.. 

************************************************

३२. सो कुल.. सोनाली कुलकर्णी.. 



'सो कुल..' ह्या हटके नावानं आणि पुस्तकाच्या मुखपृष्ठानं माझं लक्ष वेधलं.. २००५ ते २००७ ह्या दोन वर्षात लोकसत्ताच्या पुरवणीत तिनं केलेल्या स्तंभलेखनाचं हे संकलन.. ह्या संवेदनशील अभिनेत्रीनं नेमकं काय लिहिलंय ह्याची उत्सुकता तर होतीच.. मृणाल कुलकर्णी नंतर आता सोनाली कुलकर्णी काय म्हणतीय म्हणून पुस्तक लगेच चाळायला घेतलं.. पहिल्या 'हस्तांदोलन' ह्या लेखानं झालेली सुरुवात मस्तंच.. मग फावल्या वेळेत जेव्हा मोठ्ठी मोठी पुस्तकं वाचण्याइतका वेळ नसेल तेव्हा हे लेख वाचत राहिले.. एकूण १०२ लेखांचं हे संकलन आज वाचून पूर्ण झालं.. 

ललित लेखनाकडं झुकणारी लेखनशैली.. चित्रपट क्षेत्रातील अनुभव, आसपासच्या व्यक्ती, प्रसंग, घटना, दैनंदिन आयुष्यातील स्ट्रेस पासून ते मैत्री, स्त्रीचं स्त्री असणं, ते  निसर्ग, संगीत, वाढदिवस, फॅशन अश्या अनेक विषयांवर केलेलं हे लेखन.. घेतलेला वैचारिक वेध.. बरेच लेख अंतर्मुख करतात.. एक अभिनेत्री अशी असलेली तिची  इमेज गळून जाणवते ती संवेदनशील व्यक्ती.. जाणवतो तो अभिनयाबरोबरच आयुष्याकडं ही गांभीर्यानं पाहणाऱ्या सुसंस्कृत अभिनेत्रीचा हा मनमोकळा संवाद.. स्वत:शी आणि वाचकांशीही!!..


-मी मधुरा.. 

************************************************

Sunday, October 30, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं २४ ते २७)

 २४. हृदयस्थ.. डॉ. अलका मांडके..


'हृदयस्थ' ही कहाणी आहे सुप्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितू मांडके यांची.. त्यांचं शल्यकौशल्य, कामाचा झपाटा, संवेदनशीलता आणि त्यांनी पाहिलेलं कार्डियाक हॉस्पिटलचं भव्य स्वप्न हे सारं यथार्थपणे उभं केलंय त्यांची सहचारिणी डॉ. अलका मांडके यांनी!.. एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबरोबर तीन दशकांपेक्षा जास्त काळ अनुभवलेल्या सहजीवनाचा हा आलेख.. दृश्य-अदृश्य, मुलायम-काटेरी, विनम्र-करारी असे कितीतरी परस्पर विरोधी कंगोरे असलेला हा सहजीवनाचा पट मनाला भिडला नाही तर नवलच!..  

'हृदयस्थ'ची भाषा साधी, सरळ, प्रवाही असणं हे ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य.. डॉ. अलकाताई, डॉ. नीतू मांडके यांच्या आयुष्यात सहाध्यायी, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, गृहिणी, समव्यवसायी अश्या विविध नात्यांनी वावरल्या.. त्यांच्या निवेदनात पतीविषयी नितांत विश्वसनीयता तर आहेच पण पारदर्शकताही दिसून येते.. डॉ. नीतू बरोबर स्वतःच्या व अन्य व्यक्तींच्या गुणदोषांची मोकळेपणानं केलेली चर्चा.. कोठेही आत्मप्रौढी नाही कि दोष मांडताना कचरणं नाही.. गरुडझेप, गगनभरारी यासारख्या शब्दांचा अर्थ हे पुस्तक वाचताना नक्कीच कळतो.. 'हृदयस्थ' हे नाव सर्वार्थाने सार्थ वाटतं..  

सुरुवातीला दोघांकडची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगत बी. जे. मेडिकल कॉलेजला नीतू बरोबर घालवलेले मोहवून टाकणारे क्षण, त्याचं चिडणं, प्रेमानं पत्रं लिहिणं, सडेतोड पण फटकळ स्वभावामुळं घडलेले किस्से यातून नीतू मांडके यांचं महत्वाकांक्षी पण प्रेमळ व्यक्तिमत्त्व समोर येतं.. अभ्यासाव्यतिरिक्त फुटबॉल आणि बॉक्सिंगसारख्या अनेक क्रीडाप्रकारांमध्ये त्यांचा सहभाग, त्यांची तीक्ष्ण ग्रहणशक्ती, आत्मविश्वास, निर्भीडपणा, कष्टप्रवृत्ती, सहनशक्ती, आध्यात्मिकता, सकारात्मकवृत्ती, नेतृत्व, कला, वाचनाची आवड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामुळं घडलेलं त्यांचं अष्टपैलु व्यक्तिमत्व दिसून येतं.. 

एम.बी.बी.एस. नंतर डॉ नीतू यांनी हृदयविकार आणि हृदयशस्त्रक्रियांसंबंधीचं शिक्षण घेतलं तर डॉ अलका मांडके यांनी अ‍ॅनेस्थेशीयाचं.. हृदयविकारासंबंधी सखोल माहिती घेण्यासाठी, अद्यावत तंत्रज्ञान शिकण्यासाठी प्रथम ते ब्रिटनला गेले.. काही वर्षे तिकडे राहून नंतर अमेरिकेला गेले.. जगविख्यात डॉक्टर पिकासीओ आणि मागधी याकुब यांचे पुर्ण मार्गदर्शन त्यांना मिळाले.. परदेशात राहून जास्त पैसे कमावण्याचा पर्याय न स्वीकारता आपल्या देशाची सेवा करण्यासाठी ते परत भारतात आले.. ज्ञान मिळवण्यासाठी त्या दोघांनी केलेला स्ट्रगल वाचून अंगावर काटा येतो.. 
 
त्यांच्या कामाचा वेग, चपळाई, व कामातील सफाई बघून बाकीचे सर्जन लोकं अवाक होत.. अतिशय कार्यक्षम, सेवातत्पर, प्गाअनेक प्रसिध्द खेळाडुंच्या, नेते व अभिनेत्यांच्या वधानी, रूग्णांबद्दल आत्मीयता व तळमळ असलेले डॉक्टर म्हणून त्यांची किर्ती सगळीकडे पसरु लागली.. काही महिन्यांच्या बालकांपासून ते वृध्दांपर्यंत अनेक अवघड शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी करून दाखविल्या.. बाळासाहेब ठाकरे ते अनेक प्रसिध्द खेळाडू, नेते-अभिनेते ते सामान्य नागरिक असे अनेक रुग्ण मृत्युच्या दाढेतुन बाहेर काढले.. त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता.. ह्याकाळात अलकाताईंमधील स्त्री प्रतिभेचं दर्शन घडतं.. 

डॉ नीतू मांडके यांची स्वप्न पाहण्याची, महत्वाकांक्षीपणाची कक्षा खुपच भव्य दिव्य होती.. हृदयविकारांशी व हृदयशस्त्रक्रियांशी संबंधित आधुनिक व अद्ययावत सोयी सुविधांनी, आपत्कालीन यंत्रणांनी सुसज्ज असलेलं सुपर स्पेशॅलिटी रूग्णालय बांधणं हे ते स्वप्न.. आणि हे स्वप्न पूर्ण करण्याचा या जिद्दीने पेटून उठलेले डॉ नीतू.. हृदयविकारावरील उपचाराची किंमत पाहता शिक्षक, कलाकार आणि गरीब जनता ह्याकडून ते फी घेत नसत.. गरिबांवर आणि सर्वसामन्यांवर उपचार करण्यासाठी बांधत असलेलं २०० कोटीची गुंतवणूक असलेलं १८ मजली हॉस्पिटल.. बऱ्याच राजकीय सामाजिक व्यत्ययानंतर, बरेच चढउतार अनुभवून एकदाचं बांधकाम सुरु झालं.. पण त्याचं काम अर्ध्याहून अधिक पुर्ण होत असतानाच त्यांना देवाज्ञा झाली.. लाखो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचा हृदयाच्या झटक्यामुळं अवघ्या ५२ व्या वर्षी मृत्यू व्हावा हे दुर्दैव!.. त्यांच्या पश्चात डॉ. अलका मांडके यांनी त्यांचं स्वप्न रिलायन्स ग्रुपच्या मदतीनं साकारलं.. कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल या नावानं.. 'कोणाच्या मदतीनं का असेना पण नीतूचं स्वप्न सत्यात उतरलं' हे वाचताना खूप वाईट वाटतं.. पण तिथल्या कॉन्फरन्स रूम ला डॉ. नीतू मांडकेंचं नाव हे योग्य वाटतं..  

काळाच्या प्रवाहात पुढं वाहत जाण्याशिवाय पर्याय नसतो.. पण अशी काही माणसं असतात की जी स्वच्छेनं असं वाहणं डावलून आपल्या प्रवाहाची दिशा ठरवतात आणि पोहत राहतात.. असंच डॉ. नीतू मांडके हे एक व्यक्तिमत्व.. 'हृदयस्थ' हातात पडल्यापासून एका विलक्षण अवस्थेत दिवस गेले.. कधी गंभीर, कधी कणखर तर कधी डोळ्यांच्या कडा पाणावल्या.. 'माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला' हे जरी कितीही खरं असलं तरी डॉ. नीतू मांडकेंचा शेवट चुटपुट लावून जातो.. एका हृदयरोगतज्ज्ञांचा शेवट हृदयक्रिया बंद पडून व्हावा हे वाचून मन हेलावून गेलं.. 

अलौकिक जीवन गुणांचा ठसा उमटविणाऱ्या डॉक्टर नीतू मांडके यांच्या पवित्र स्मृतीला शतश: प्रणाम!! 


-मी मधुरा.. 

************************************************

२५. हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तमराव.. श्याम मनोहर.. 


श्याम मनोहर आफळे.. मराठी कथा-कादंबरीकार व नाटककार.. कादंबरीचे रूढ आकृतिबंध झुगारणारा, कादंबरीच्या नावातही वेगळेपणा जपणारा अवलिया लेखक.. माझ्या लिस्ट मधलं 'शंभर मी' हे त्यांचं पुस्तक.. पण उपलब्धतेअभावी 'हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तमराव..' ह्याची वर्णी लागली.. त्यांचा लेखनप्रकार समजायला क्लिस्ट असतो अश्या अभिप्रायामुळं जरा घाबरतच हे पुस्तक वाचायला घेतलं.. मलपृष्ठावरून पुस्तकाचा अंदाज बांधता येईना.. पहिलं पान उलटलं आणि "तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो, तू माझ्याशी वाईट वागलास की मी तुझ्याशी वाईट वागतो, मग माझं म्हणून काय असतं?" हे वाचून 'मानवी वर्तन' किंवा 'तत्वज्ञान' हा तर विषय नाही ना?.. अशी शंका आली.. चंद्रशेखर जहागीरदार ह्यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचल्यावर तर अधिकच गोंधळून गेले.. १५ पानी प्रस्तावना वाचायला आणि ती समजून घ्यायला मला दोन दिवस लागले.. 

सतत वावरणारी १५-२० पात्रं आणि त्याचा एकमेकांशी होणारा संवाद हे कादंबरीचं एकंदरीत स्वरुप.. कधी ही कथानायक विरहित कादंबरी वाटते तर कधी 'घडलेली घटना' हेच कथानायक वाटते तर कधी सगळी पात्रं कथानायक म्हणून आलटून पालटून समोर येत राहतात.. समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून आलेली ही पात्रं, त्यांचे एकमेकांशी येणारे संबंध, परस्परक्रिया, त्यांतील विसंगती, गुंतागुंत हे सगळं माणसां संबंधीची आस्था न सोडता आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्घतीनं लेखकानं व्यक्त केलंय.. पात्रांचे त्यांच्या जगण्यातून अनुभवास येणारे नैतिक प्रश्न, एखाद्या घटनेनंतर त्यांना होणारी अस्वस्थतेची तीव्र जाणीव त्याच्यातील संवादातून समोर येते.. पुस्तक जसजसं वाचत गेले तसतसं कथेचा, लेखनशैलीचा, 'बिटवीन द लाईन्स' वाचण्याचा अंदाज येत गेला आणि कथेत छान रमत गेले.. 

श्याम मनोहरांची ही कथा प्रामुख्यानं दोन पात्रांमधील एका घटनेभोवती फिरत राहते.. आणि संवादरूपानं पुढं पुढं सरकत राहते.. 
तर, साल-१९८३.. घटना स्थळ- तालुका स्तर बी-बियाणं ऑफिस.. ईश्वरराव आणि पुरुषोत्तमराव उच्चपदस्थ अधिकारी आणि मित्र.. सुखदेव, आत्माराम, काणे, यार्दी, खामकर, भोसले, जालिंदर, जोशी हे इतर कर्मचारी.. कथेच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांमधील संवाद.. 'एखादी गोष्ट केली किंवा झाली कि संपलं असं का होत नाही??..' ह्या बोलण्यातून ऑफिसमध्ये एक खळबळजनक घटना घडलेली आहे हे कळतं.. मध्येच एकजण 'ईश्वरराव थोबाडीत मरणाऱ्यातील नाहीत' असं म्हणतो.. तर लगेच दुसरा '...आणि पुरुषोत्तमराव खोटं बोलणाऱ्यातील नाहीत'.. मग तिसरा उत्स्पुर्तपणे म्हणतो 'ईश्वररावांनी खरोखर पुरुषोत्तमरावांच्या थोबाडीत दिली?'.. ह्या घटनेचा प्रत्येकाच्या विचारांवर, आयुष्यावर, परस्पर संबंधावर झालेला परिणाम हा पुस्तकाचा आशय.. ह्या बरोबरच प्रत्येकाच्या खाजगी आयुष्यातील घटना घडताना दिसतात.. यार्दीच्या नवजात बालकाच्या मृत्यूनं सगळ्यांच्या मनावर विचारांवर घेतलेला ताबा आणि त्यामुळं आलेली आयुष्याच्या लघुतेबद्दलची समजूतदार चमक कथेच्या शेवटी पाहायला मिळते.. साधं सरळ कथानक सवांदातून ज्या पद्धतीनं खुलवलंय ते वाचायला मजा येते.. 


-मी मधुरा.. 

***********************************************************

२६. साद देती हिमशिखरे.. कै. जी. के. प्रधान.. 
अनुवाद.. डॉ. रामचंद्र जोशी.. 


'साद देती हिमशिखरे'- कै. जी. के. प्रधान यांच्या Towards the Silver Crest of Himalayas' ह्या इंग्रजी कादंबरीचा डॉ रामचंद्र जोशी यांनी केलेला हा अनुवाद..  Towards the Silver Crest of Himalayas.. काहीतरी भन्नाट प्रवास वर्णन असणार.. मी केलेल्या ट्रेक शी मिळतंजुळतं वाचायला मिळणार म्हणून पुस्तक हातात घेतलं.. मलपुष्ठ वाचलं आणि गोंधळून गेले.. मलपृष्ठ न वाचताच एखादं पुस्तक घेतलं कि असंच होतं.. 'संसार टाकून परमार्थाची कास धरावी आणि अखेरीस हिमालयातील गुहेत, जेथे नियतीने आपली जागा राखून ठेवली आहे आणि जी आपणास स्वप्नात दिसली होती, तेथे जाऊन परमात्म्यासी अनुसंधान साधावे अशी ओढ एका अत्यंत बुध्दिमान आणि दर्जेदार खेळाडू असलेल्या तरुणाला लागते.'.. हे वाचल्यावर पुढं काय वाढून ठेवलं आहे ह्याची जाणीव झाली.. तत्वज्ञान, परमार्थ-अध्यात्म ह्याचं वावडं आहे असं नाही.. दासबोध, भगवद्गीता, भागवत हे मी वाचून समजून घेण्याचा प्रयत्न ही करते आहे.. आत्ता अश्या प्रकारचं पुस्तक वाचावं असं अजिबात वाटत नव्हतं.. पण पुस्तक आणलंच आहे तर वाचायचं म्हणून वाचायला सुरुवात केली.. तत्वज्ञानाचा काही भाग दोन-तीनदा वाचून सुद्धा डोक्यावरून गेला.. 

'माधव' हा ह्या कादंबरीचा नायक.. कथेची सुरुवात होते ती माधवला पडलेल्या एका स्वप्नानं.. स्वप्नांत तो एका हिमशिखरावर फिरत असतो.. तिथलं सौंदर्य डोळ्यांत भरून घेत असतो.. अचानक अंदाज चुकून दरीत पडणार इतक्यात एक साधूपुरुष त्याला सावध करतो.. घाबरलेला माधव त्यांच्या बरोबर एका गुहेत जातो.. गरम गरम दूध पिऊन हुशारी आल्यावर माधव जेव्हा जायला निघतो तेव्हा साधूपुरुष त्याला म्हणतो ही गुहा तुझीच आहे.. तुझ्या येण्याची आम्ही वाट पाहू.. आणि माधवला जाग येते.. ह्या विलक्षण स्वप्नानंतर त्याला सुखद अनुभूतीची जाणीव होते.. अभ्यासात खेळात अग्रेसर माधव ह्या घटनेचा साधुपुरुषाचा सतत विचार करू लागतो.. एक दिवस मित्राला सोबत म्हणून तत्वज्ञानावरील व्याख्यानाला गेलेला माधव व्याख्याता स्वामीजी आणि स्वप्नातील साधुपुरुष ह्यांच्यातील साम्य भेद शोधायचा प्रयत्न करतो.. स्वामीजींच्या बोलण्यानं भारावलेला माधव तत्वज्ञानाची पुस्तकं वाचायला सुरुवात करतो.. ह्यातून तो अध्यात्माकडं ओढला जातो.. गूढतत्वज्ञान आणि अध्यात्म ह्यांच्या मूलतत्वाचा शोध घ्यावा असं त्याला वाटू लागतं.. त्यामुळं तो त्याचा अधिकतर वेळ स्वामीजींच्या सानिध्यात घालवायला सुरुवात करतो..  

पुढं स्वामीजींचे गुरुदेव आणि माधव यांची भेट होते.. गुरुजींच्या विचारांनी प्रभावित माधव त्याच्या सानिध्यात राहू लागतो.. गुरुदेवांच्या तत्वज्ञानातून त्याला चिरंतर सुखाचा मार्ग सापडतो.. सांसारिक भौतिक सुखं सोडून अध्यात्माचा ध्यास घेऊन अखेरीस 'हिमालयातील त्या गुहेत' जिथं नियतीनं जागा राखून ठेवली होती, जी जागा स्वप्नात दिसली होती, तिथं जाऊन माधवच परमात्म्याशी अनुसंधान होतं.. 

सुख-समाधान-शांती, तंत्र-मंत्र-साधना, गुरुचं महत्व, श्रद्धा-भक्ती-समर्पण, सत्य-असत्य, ईश्वरचं असणं-नसणं, ऐहिक-अध्यात्मिक-पारमार्थिक सुख ह्यावर गुरुदेवांनी वेळोवेळी केलेली प्रवचनं, चर्चा ह्यातून माधवाचा अध्यात्मिक प्रवास घडत जातो.. ही प्रवचनं, ह्या चर्चा ह्याचा सविस्तरपणे पुस्तकांत उल्लेख केला आहे.. एकंदरीत अध्यात्मिक मार्गातील साधकांना, अध्यात्म मार्गाचा शोध घेणाऱ्या शोधकाला हे पुस्तक म्हणजे समृद्ध करणारा अनुभव आहे..   


-मी मधुरा.. 

************************************************

२७. रामनगरी.. राम नगरकर.. 



'रामनगरी' ह्या पुस्तकाचा उल्लेख जेव्हा 'must read' पुस्तकांत आला तेव्हा हे नेमके कोण राम नगरकर म्हणून मी गूगल केलं.. पण 'रामनगरी' वगळता त्यांच्या बद्दल फारशी माहिती मिळाली नाही.. निळू फुलें बरोबरच्या काही चित्रपटात त्यांचं नाव दिसलं तर 'विच्छा माझी पुरी करा' ह्यात दादा कोंडकें बरोबर.. 'रामनगरी' पुस्तक - 'रामनगरी' चित्रपट - 'रामनगरी' एकपात्री प्रयोग ते ही फक्त मराठीत नाहीत तर इंग्रजीत ही!.. आणि त्यामुळं 'रामनगरी'ला आत्मचरित्रांतला एक मानदंड समजलं जातं.. हे वाचून माझी 'राम नगरकर' ह्या व्यक्तिमत्वाबद्दलची उत्सुकता वाढली..   

'रामनगरी' हे पुस्तक वाचायला घेतलं.. रामची रामनगरी - पु.ल.देशपांडे.. अशी प्रस्तावना वाचल्यावर 'राम नगरकर' ह्या माणसाच्या उंचीचा अंदाज घेणं अवघड झालं.. केवळ २०० पानाच्या ह्या आत्मकथेला पु.लं.ची ५ पानी प्रस्तावना.. अजब आहे सगळं.. असं म्हणत मी पुस्तक वाचायला सुरुवात केली.. (दिवाळी असल्यानं) एका बैठकीत नाही पण दोन दिवसात वाचून काढलं.. विनोदी ढंगानं लिहिलेली ही आत्मकथा मनाला चटका लावून गेली.. 

राम नगरकरांचे वडील पेशानं न्हावी तर आई तमाशाची पार्श्वभूमी असलेली.. संगीत तसं त्यांच्या रक्तातच.. तमाशा-कलापथक-लोकनाट्य-नाटक-सिनेमा हा प्रवास घडतो तो ह्या 'रामनगरी'त.. ह्या नगरीतील रामाचं जगणं, ते जगणं जगताना आलेले नानाविध अनुभव, अपमानाचे प्रसंग, आलेली कटुता, झालेली फजिती हे वाचताना पोट धरून हसू ही येते तर माणसाच्या स्वभावातील विसंगती, अहंकार, उपेक्षा, समाजातील जातींच्या उतरंडीनं आलेले मानहानीचे प्रसंग वाचताना चिमटे ही बसतात.. 

एका सोंगाड्यानं, एका विनोदी माणसानं स्वतःच्या आयुष्याची गुणदोषांनीयुक्त अशी सांगितलेली ही गोष्ट.. ह्या जीवनकहाणीचा कालावधी फार मोठ्ठा नसल्यानं ह्याला आत्मचरित्र न म्हणता आत्मकथा म्हणणं योग्य होईल असं मला वाटतं.. ह्या कथेत आज्जा मारुती, वडील विठोबा, आई गोदा, बायको राधा यांचा उल्लेख वारंवार येतो..  स्वतःचा जन्म आणि शेजाऱ्याच्या घराला लागलेली आग, बापाचं हा जन्मताच पळून जाणं त्यामुळं मिळालेलं पांढऱ्यापायाचं हे बिरुद.. आजोळी मामाच्या तमाशातलं त्याच सोंगाड्यापण.. रेडिओवर गाण्यासाठी घरातून पळून जाणं.. तिथं अपयश आल्यावर परत येऊन पोष्ट खात्यात नोकरी करणं.. गाणं-नाटकामुळं राष्ट्रसेवादलाशी झालेली ओळख.. आणि नंतर बदलत गेलेलं आयुष्य म्हणजे रामनगरी..

रामनगरीतील काही प्रसंग जसं त्यांचं रेडिओमधील नोकरीसाठी घरातून पळून जाणं, स्वतःच्या लग्नाला जाताना त्यांनी घेतलेली थडग्यावरची विश्रांती असं काही लेख रूपात पूर्वी वाचलं होतं.. 

चांगभलं! ऋणनिर्देशला दिलेलं नाव.. स्वतःच्या आयुष्याचा देवतेसमोर, जोतिबासमोर नाचणारी काठी असा केलेला हा उल्लेख.. 'सुजाण वाचकांच्या रंगशिळेसमोर माझी काठी नाचवायला मी उभा आहे '.. असं त्यांचं म्हणणं किती सार्थ आहे हे पुस्तक वाचल्यावर कळतं..    

'राम नगरकर यांची रामनगरी' हा एकपात्री प्रयोग ऑडिओ रूपात youtube वर आहे.. त्यांच्याच आवाजात त्यांचा हा प्रवास नक्कीच ऐकायला आवडेल.. 

-मी मधुरा.. 

************************************************