Sunday, January 14, 2024
नातं एका अनोख्या विणीचं..
Thursday, December 7, 2023
२०२३ मावळताना..
२०२३ तसं माझ्यासाठी खासंच.. एकतर माझं अर्ध-जन्मशताब्दी वर्ष.. ऋचाचं हायस्कूल ग्रॅज्युएशन, कॉलेज ऍडमिशन, कॉलेज नामक तिच्या नव्या आयुष्याची नवी सुरुवात थोडक्यात proud mom moment हे ही ह्याच वर्षात.. आणि त्यानंतर सुरु होणारी माझी सेकेंड इंनिंग.. ऋचा लांब जाण्यानं, जरी माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण होणार असली, तरी ह्या 'सेकेंड इंनिंग' बद्दल खूप कुतूहल, उत्सुकता होती.. आयुष्याला नवा आकार देण्याचं स्वप्न ही होतंच.. कदाचित ह्यामुळं ऋचाचं नसणं थोडं सुसह्य झालं..
"ही वाट दूर जाते" ह्या कार्यक्रमासाठी निवेदन, कविता वाचन केले.. एका फॅशन शो मध्ये पण भाग घेतला.. 'साडीची बदलत जाणारी रूपं' ही ह्या फॅशन शो ची थिम.. माझं नऊवारी प्रेम जगजाहीर (पोर्टलॅंड जाहीर) असल्यानं मला विचारलं.. नऊवारी पण हटके स्टाईल म्हणून मी 'देवसेना ड्रेप' ठरवला.. ड्रेप थोडा कॉम्प्लिकेटेड असला तरी शिकायला मज्जा आली..
"छूमंतर" मराठी नाटक.. लेखन, दिग्दर्शन, कलाकार सगळं पोर्टलॅंडकर्स.. ह्या नाटकाचं सहाय्यक दिग्दर्शन करायची संधी मला मिळाली.. माझ्या कवितेला पण ह्या नाटकाचा भाग होता आलं.. हा अनुभव समृद्ध करणारा होता.. नाटक, नाटकाचं लिखाण हे कलाकार, प्रेक्षक आणि दिग्दर्शक ह्या तिघांच्या नजरेतून पाहता आलं.. ह्या आधी बॅकस्टेज केलं होतं पण दिग्दर्शकाला मदत करणं म्हणजे सगळ्या आघाड्यावर लढण्यासारखं होतं.. कलाकारांना डायलॉग साठी मदत, अबसेन्ट कलाकारांचे डायलॉग म्हणणं, क्लू देणं.. आणि सगळ्यांत महत्वाचं टाईम कंमिटमेन्ट सगळ्यांआधी यायचं आणि सगळे गेल्यावर जायचं.. ते दोन तीन महिने मंतरलेले होते..
इतक्या सगळ्या चांगल्या अनुभवांना एक गालगोट लागलंच.. आयुष्याला नवा आकार देण्याचं स्वप्न तर पाहिलं पण चॉईस पॉईंट ला थोडी गडबड झाली.. स्वप्न पाहताना नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी लक्षातच आल्या नाहीत.. हे अपूर्ण स्वप्न एक दिवस नक्की सत्यात उतरेल कारण ह्या स्वप्नाचा हात मी अजुनी सोडलेला नाही.. ह्या स्वप्नाबद्दल नंतर परत कधी..
Thursday, September 28, 2023
ही वाट दूर जाते..
| शांता शेळके जन्मशताब्दी वर्ष |
हृदयाच्या बंद कप्प्यात
कधी आठवण लपलेली असते
वसंतातल्या गुलमोहोरात
कधी ती लपलेली असते
सागराच्या अथांग निळाईत
तर कधी ती लपलेली असते
बहरलेल्या चैत्रपालवीत
या साऱ्यांभोवती फिरत असतो
श्वास आपला मंद धुंद
आणि यातूनच मग दरवळतो
तो आठवणींचा बकुळगंध
तो आठवणींचा बकुळगंध
आणि आज शांताबाई शेळक्यांच्या अनंत आठवणींचा बकुळगंध घेऊन आम्ही येत आहोत.
नमस्कार मंडळी! मी मधुरा..
ब्लॉगपोस्टची अशी सुरुवात पाहून आश्चर्य वाटलं असेल ना?
आणि ह्या प्रोग्रॅमचं निवेदन करायची संधी मला मिळाली..
मराठी साहित्य समृद्ध करण्यात शांताबाईंचा खूप मोठ्ठा वाटा आहे हे आपण जाणतोच.. त्यांची विविध बाजाची गाणी, त्यांच्या कविता, त्यांचं लेखन ह्या साऱ्यांची चव नुसती चाखायची म्हंटली तरी सुद्धा तीन साडे तीन तास नक्कीच पुरणार नव्हते..
| सुप्रिया, मी, शुभांगी आणि शंतनू |
इतक्या मोठ्ठ्या कार्यक्रमाचं अभ्यासपूर्वक निवेदन करणं कोण्या एकाच काम नव्हे.. आमचा चार जणांचा चमू त्यासाठी अखंड कार्यरत होता.. त्यांच्या बद्दल किती बोलू किती नको असं प्रत्येकाला झालं होतं.. गाणी तर आधीच ठरली होती.. आम्हाला त्या गाण्यांच्या अनुषंगानं बोलायचं होतं.. आणि त्यातूनच शांताबाईंच्या व्यक्तिमत्वाची, जीवन प्रवासाची ओझरती ओळख करून द्यायची होती.. निवेदनाचा वेळ कमी करून गायकांना अजुनी एखादं गाणं बसवता आलं तर हवं होतं आणि आम्हाला एखादं गाणं कमी करून निवेदनाची वेळ वाढवून हवी होती.. कविता वाचनासाठी सुद्धा असंच.. ८ कवितांपासून झालेली सुरुवात वेळे अभावी फक्त ५ कवितांवर येऊन थांबली.. ह्या साऱ्या प्रवासांत शांताबाई घरच्याच होऊन गेल्या..
कार्यक्रमाची सुरुवात "ही वाट दूर जाते" संतूर वादन.. घनरानी साजणा, असता समीप दोघे सारखी रोमँटिक गाणी.. किलबिल किलबिल सारखं बालगीत, लहान मुलींचा नाच.. वल्हव रे नाखवा, माझ्या सारंगा वर कोळी नृत्य.. रेशमाच्या रेघांनी सारखं लावणी नृत्य.. काटा रुते कुणाला सारखं नाट्यगीत, शालू हिरवा पाचूंनी मढवा सारखं लग्नगीत.. शूर आम्ही सरदार सारखं स्फुर्तीगीत.. आले रे गणपती, मागे उभा मंगेश सारखी भक्तिगीतं.. चांदण्या रात्रीतले स्वप्न.. ही चाल तुरुतुरु सारखं उडते गीत.. कविता वाचन आणि शेवटी असे मी नसेन मी.. अशी साधारण कार्यक्रमाची रूपरेखा..
आमच्या ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सहभागी कलाकारांचा वयोगट.. वयवर्षे सहा ते पासष्ट.. सगळ्यांनी आपल्या लाडक्या शांताबाईंसाठी जीव तोडून मेहनत केली.. अमेरिकेत जन्मलेल्या,वाढलेल्या बालचमूंची तर त्या शांताआजी होऊन गेल्या.. ही सगळी गाणी गायकांनी गायली आणि वादकांनी त्यांना साथ दिली..
मी केलेल्या निवेदनाच्या काही क्लिप्स..
कविता वाचन..
'पैठणी' ही कविता वाचणं माझ्यासाठी एक भावनिक आव्हानच होतं.. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा ही कविता मी वाचलीय, ऐकलीय तेव्हा तेव्हा माझे डोळे भरून आलेत.. ह्या पैठणीत, नेहमी मला माझी आजी दिसते.. अशीच तिची ही एक खास साडी होती.. आणि एक खास नथ ही! जी तिच्या आजेसासूबाईंनी तिला दिली होती.. (ह्या नथीची ही एक ब्लॉगपोस्ट आहे.. वाचली नसेल तर अवश्य वाचा..)
माझ्याकडं माझ्या आजीच्या मऊ नऊवारी साडीची गोधडी आहे.. तिच्या स्पर्शातून मला आजी भेटते.. ती अंगावर घेतली कि आजीच्या मायेची छान उब मिळते..
आम्ही हा कार्यक्रम पोर्टलॅंड बरोबरच सिएटलला पण केला.. कार्यक्रमाचं बरंच कौतुक ही होतंय.. BMM च्या ऑडिशनसाठी पण व्हीडिओ पाठवलाय.. बघू काय होतंय ते..🤞