Sunday, August 25, 2024

नवीन उपक्रम: गीता पठण- अध्याय १२ 'भक्तियोग'

ॐ

श्रीपरमात्माने नमः 
अध्याय १२ 'भक्तियोग' 
( प्रेममयी सेवा )



घरामध्ये बाबा गीता अध्यायांचं नियमित पठण करत असल्यानं येता जाता कानावर श्लोक पडत असत.. तेवढीच काय ती माझी 'गीतेशी' असलेली ओळख.. पण खरी ओळख व्हायला २०१७ साल उजाडावं लागलं.. ते ही सातासमुद्रापलीकडं.. इकडं अमेरिकेत.. निमित्य योगा टीचर्स ट्रेनिंग.. 

The Musical Saga.. Beloved Lord’s Secret Love Songs.. The Hindu Bible अश्या अनेक नावांनी ओळखली जाणारी, संस्कृत श्लोक इंग्रजी लिपीत लिहिलेली आपली भगवतगीता, गीताई.. तिचं विवेचन करणारी अमेरिकन आणि ऐकणारे आम्ही विविधदेशातून आलेले, वेगवेगळी भाषा बोलणारे साधक योगी.. ह्या क्लासमध्ये गीता चर्चा स्वरूपात शिकवली जायची.. आठवड्यातून एकदा असणाऱ्या ह्या क्लास मध्ये आदल्या आठवड्यात पुढच्या आठवड्याचा अभ्यास दिला जायचा.. साधक तो वाचून यायचे मग त्यावर चर्चा व्हायची.. बायबल, रोमन, ग्रीक साहित्य ह्यांचे संदर्भ देऊन चर्चा होत.. खूप वेगळ्या दृष्टिकोनातून गीतेकडं पाहता आलं.. विविध धर्माच्या, पंथांच्या लोकांचे विचार ऐकता आले.. त्याचवेळी ठरवलं कि सगळ्यां धर्मांचं, पंथांचं सार असणारी आपली गीताई आपल्या पद्धतीनं व्यवस्थित शिकायची.. समजून आचरणात आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी शिकायची.. परीक्षेच्या साच्यात बसणारी गीता शिकायची नसल्यानं बाकी पर्याय सापडत नव्हते.. शेवटी कंटाळून आपणच आपले प्रयत्न करायचं ठरवलं..
 
पॅनडॅमिक मध्ये एकदाचा मुहूर्त लागला.. इंग्लिश गीता, ज्ञानेश्वरी आणि युट्यूब व्हीडिओ ह्यावरून गीता शिकायला सुरुवात केली.. प्रत्येक अध्यायाचा अभ्यास करून त्यावर स्वतःच्या नोट्स काढायच्या.. हे अभ्यासाचं स्वरूप.. दीड वर्षात गीता एकदा वाचून झाली.. पण त्यावेळी अधिकृत (अर्थासहित) संस्कृत गीता वाचली नाही ह्याची खंत मनात राहिली..

कट टू.. जुलै २०२४.. एका व्हाट्स अँप गृप मध्ये गीता परिवाराचं 'Learn Geeta' हे फ्लायर मिळालं आणि कोण आनंद झाला.. अगदी अभ्यासपूर्ण, पद्धतशीर असलेलं स्वरूप, स्वयंसेवकांचे त्या मागचे कष्ट, सेवाभावी भाव ह्याच खूप आश्चर्य वाटलं.. अश्या संस्थेशी जोडल्या गेल्याच्या समाधाना बरोबरच आता माझी सुप्त इच्छा पूर्ण होणार होती.. 

श्लोक पठण शिकत असताना परत गीताचा नव्यानं अभ्यास करायचं ठरवलं.. मग रोजचे शिकवलेले श्लोक, त्यातील शब्दांच्या संधी सोडवून त्यांचा अर्थ लावायचा प्रयत्न सुरु केला.. माझ्या आधीच्या नोट्स आणि “भगवतगीता जशी आहे तशी” संदर्भासाठी होतेच.. श्लोकांचा अर्थ आपल्या अभ्यासाच्या श्लोकांच्या बाजूला लिहून ठेवायला लागले.. श्लोक म्हणताना त्याचा अर्थ माहिती असेल तर म्हणायला अजुनी मजा येते.. भावना आपोआपच श्लोकात उतरतात.. 
नुसतं गीता पठणच नाही तर अध्यायांचं विवेचन, संस्कृत व्याकरण अश्या सर्वांगानं परिपूर्ण रूपात गीता शिकायला मिळतीय..
 
भक्तियोगात जे काही माझ्या अल्प मतीनं शिकले ते कृष्णकृपेनं काव्यांत मांडायचा प्रयत्न केलाय..  

सगुण भक्ती की निर्गुण भक्ती 

गोंधळ पार्था मनी वसे 

सर्वाहूनी श्रेष्ठ असा 'भक्तियोग' 

श्रीकृष्ण सखा सांगत असे ।।१।।


साकार रूप की निराकार रुप 

श्रद्धा ज्याच्या मनी वसे

सर्वांठायी हितार्थ हा समबुद्धी

प्राणप्रिय मज असे ।।२।।   


अनन्य भावे अर्पून कर्मे 

हृदयी ज्या मी स्थिर वसे

जन्म-मृत्यू संसारसागरा 

उद्धार करण्या मी असे ।।३।।


समर्पून तन मन बुद्धी 

माझ्या कार्यात जो वसे 

निःसंदेह ह्या पूर्णसिध्दीचा   

माझ्यामध्येच वास असे ।।४।।


असमर्थ अश्या मनी 

इच्छा प्राप्ती माझी वसे 

ज्ञान-ध्यान, कर्मफल त्यागे

ठायी त्या आत्मशांती असे ।।५।।


सहृदयी, निरहंकारी ज्या मनी

मैत्री अन् करूणा वसे   

संतुष्ट, संयमी, दृढनिश्चयी 

मज अत्यंत प्रिय असे ।।६।।

   

सुख-दुःख, हर्ष-उद्विग्न, भय-चिंता 

क्षणी समभाव वसे

तटस्थ, पवित्र, कुशल, परित्यागी 

मज अत्यंत प्रिय असे ।।७।। 


शीत-उष्ण, शत्रू-मित्र, मान-अपमान

यासव समभाव वसे 

इच्छा-आकांक्षा, शुभाशुभ त्यागी 

अनिकेत मज प्रिय असे ।।८।।


जाणूनी हा 'भक्तियोग' प्रभुमुखातून

करू अविनाशी भक्तिमार्गाचे अनुकरण   

श्रद्धेने हे परमलक्ष्य साधून,

होऊ कृष्णप्रेमी करूनी संपूर्ण समर्पण.. ।।९।।     


हरी ॐ तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

********************


माझी नुकतीच L1 लेव्हल पूर्ण झाली.. ज्यात अध्याय १२ 'भक्तियोग' आणि अध्याय १५ 'पुरुषोत्तमयोग' यांचा समावेश होता..

एकूण चार लेव्हल मध्ये गीतापठण शिकवले जाते.. ते ही मोफत..  


खाली गीतापरिवाराची लिंक देतीय..

www.learngeeta.com 



-मी मधुरा.. 

************************************************


Tuesday, August 13, 2024

वाढतं वजन - समस्यापूर्ती.. (भाग ३)

सौजन्य:गूगल

..नकारात्मक विचार बाजूला सारून, नव्या उमेदीनं, पूर्ण अभ्यास करून, तयारीनं आठ आठवड्यात ५ किलो वजन कमी करायचं आणि HbA1C ६ वर आणायचं आव्हान मी स्वीकारलं खरं.. पण,
डेस्टिनेशन, कुठं पोचायचं माहिती असलं तरी तिथं पोचायचा मार्ग अंधारातून जाणारा.. आणि हातात फक्त आठ आठवडे.. 
मुदत तारीख २० जून.. आज २७ एप्रिल..
माहितीपूर्ण अभ्यास करून 'वजन घटावो' मोहिमेचा अचूक आराखडा तयार करायचा असेल तर निदान चार पाच दिवस तरी द्यायचे आणि १ मे पासून त्यावर काम करायाला सुरु करायचं ठरवलं.. 
७५ किलो 

एक नवीन वही आणली.. पुढच्या आठ आठवड्याची प्रत्येक नोंद करण्यासाठी.. आराखडा तयार करण्यापासून अंमलबजावणी करण्यापर्यंत.. व्यायाम, आहार, मूड, झोप अगदी सगळं.. वेट लॉस जरनलच..

इतकी वर्ष 'नियमित व्यायाम आणि योग्य आहार' ह्या सूत्रानं मी वाढत्या वजनाशी लढा देतीय.. अधूनमधून वेगवेगळे डाएट प्रकार केलेत.. थोडं वजन कमी झाल्याची हुलकावणी देत नंतर ते फ्लॉप ही झालेत.. त्यामुळं आता कोणतंही डाएट गूगल करायचं नाही किंवा इंस्टारिल्सवर शोधायचं नाही हे नक्की
.... 

'८०% आहार २०% व्यायाम' हा वजन कमी करण्यासाठीचा नियम.. 
ठरलं!!.. सध्या करते तो व्यायाम तसाच ठेवून आत्ता फक्त आहारावर काम करायचं आणि ते ही शरीर आणि आहारशास्त्राचा अभ्यास करून.. 

स्टेप १.. शरीरात फॅट साठवणारी आणि फॅट वितळवणारी प्रक्रिया समजून घेणं..
अभ्यास करता करता अनेक साक्षात्कार झाले.. उदाहरणार्थ डाएट बद्दल डाएटिशियन्सनी दिलेली माहिती शास्त्रीयदृष्ट्या चुकीची असणं, वजन कमी करण्यासाठी व्यायामाला दिलेलं अतिमहत्व.. 
  • खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोज शरीराच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम पॅनक्रिया (स्वादुपिंड) ह्या ग्रंथी करतात.. अल्फा, बीटा, डेल्टा, गामा आणि इप्सिलॉन नामक पेशी खाल्लेल्या अन्नाप्रमाणं वेगवेगळी संप्रेरकं सोडतात.. यातील दोन महत्वाची संप्रेरकं इन्सुलिन आणि ग्लुकागॉन..
  • इन्सुलिन रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवतं आणि अतिरिक्त ग्लुकोज लिव्हरला ग्लायकोजेन आणि फॅट रूपात साठवायला सांगतं.. आणि ग्लुकागॉन जेव्हा रक्तातील ग्लुकोज कमी होतं तेव्हा लिव्हरनं साठवलेल्या ग्लायकोजेनचं ग्लुकोज मध्ये रूपांतर करतं आणि फॅटचं किटोसिसनी केटोन मध्ये.. ग्लुकोज आणि केटोन या इंधनांवर आपलं शरीर चालतं..
  • इन्सुलिन हे मेजवानीचं संप्रेरक आहे तर ग्लुकागॉन हे उपासमारीचं.. कार्बोहाड्रेट्सनं इन्सुलिन वाढतं तेव्हा ग्लुकागॉन सिक्रीट होत नाही आणि परिणामी साठवलेलं ग्लायकोजेन, फॅट वापरलं जात नाही.. अन्न पचल्यावर इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं आणि पोटात अन्न नसेल तेव्हाच ग्लुकागॉन त्याचं काम करून फॅट वापरू शकतं.. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी इन्सुलिन वाढवणारे पदार्थ टाळायचे.. किंवा दिवसातील काही भाग उपाशी (इंटरमिटन्ट फास्टिंग) राहायचं.. 
आपल्यासारख्या सुखवस्तू लोकांसाठी भूक बरीचशी मनातच असते.. खूपदा आपलं मन भूक आणि तहान ह्यात गल्लत करतं..

स्टेप २.. Food Choices.. अन्नाची निवड करायला शिकणं..  
प्रोटीन, कार्बोहाड्रेट आणि फॅट ह्या तीन भागात अन्नाची विभागणी केली जाते आणि दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, फळं, डाळी, धान्यं, कडधान्यं, तृणधान्यं, मांसाहार ह्यातून अन्ननिर्मिती होते हे आपण जाणतोच.. पण ह्यासगळ्यांतून नेमकं काय निवडायचं कि शरीरात इन्सुलिन वाढणार नाही?.. 
  • प्रोटीन.. फर्स्ट क्लास प्रोटीन जे चिकन, फिश, अंडी ह्यातून मिळतं आणि सेकंडरी प्रोटीन (प्रोटीन+कार्बोहाड्रेट) जे डाळी, कडधान्यं ह्यातून मिळतं.. डेअरी प्रोटीन (प्रोटीन +फॅट) दूध, दही, पनीर..                       
    • व्हेजिटेरिअन असल्यानं फर्स्ट क्लास प्रोटीनचा पर्याय माझ्यासाठी बाद.. 
  • कार्बोहाड्रेट.. इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद कार्बोहाड्रेटना मिळतो.. उदा. गहू, तांदूळ, साखर, साबुदाणा.. कार्बोहाड्रेट बहुतेक सर्वच अन्नपदार्थातून कमी जास्त प्रमाणात मिळतात.. तृणधान्यांत त्यांचं प्रमाण बरंच कमी दिसून येतं.. उदा. बाजरी, नाचणी.. 
  • कार्बफ्री भाज्या.. कोबी, फ्लावर, भेंडी, वांग, बीन्स, गवार, कारलं, पालेभाज्या, काकडी, टोमॅटो.. 
    • वर्ज्य भाज्या.. बटाटा, मटार, बीट, गाजर 
  • फॅट.. गुड फॅट कॅनोला ऑइल, ऑलिव्ह ऑइल, तूप.. बॅड फॅट मांसाहार, बटर.. शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी फॅटची आवश्यक्ता असते.. 
    • काजू, पिस्ता, बदाम, शेंगदाणे, नारळ एरव्ही जरी चांगले असले तरी वजन कमी करताना शक्यतो वर्ज्य करावे.. 
  • फळं.. फळं खाणं चांगलं असलं तरी अतिसेवन वाईटच.. फळांतील फ्रुक्टोजमुळं इन्सुलिन वाढू शकतं..
    • खाण्यास योग्य फळं.. अँपल, पीच, प्लम (१ माध्यम आकाराचं).. मोसंब, संत्र (अर्ध).. कलींगड (१ कप).. बेरी गटातील फळं (मूठभर).. 
  • ग्रेट ग्लुकोज कंट्रोलर.. हळद, दालचिनी, मेथी दाणे.. 

स्टेप ३.. पोर्शन साईज.. नेमकं किती आणि कधी खायचं?
  • जेवणाच्या ताटाचा नियम.. ५०% फायबर (कोशिंबीर, सॅलेड) २५% प्रोटीन (डाळ, उसळ,पनीर) आणि २५% कार्ब्स
  • तडस लागेपर्यंत खाऊ नये.. जेवणानंतर ही पोटाचा काही भाग रिकामा असावा..
  • अधेमधे खाणं, स्नॅकिंग पूर्णपणे थांबवावं.. अधेमधे लागणारी भूक खूपदा भूक नसून तहान असते.. अश्यावेळी ग्लासभर पाणी प्यावं.. 
  • ब्रेकफास्ट चुकवू नये.. प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट असावा..
  • डिनर आणि ब्रेकफास्ट मध्ये कमीतकमी १०-१२ तासाचं अंतर असावं..
  • कोणतंही मिल स्किप करू नये.. जेवणाचा पर्याय फळं, स्मूदी, मिल्कशेक नाही..
  • जेवणाची सुरुवात सॅलड्स/कोशिंबीरीनं करावी.. त्यात फायबर आणि पाण्याचं प्रमाण जास्त असल्यानं पोट तर लवकर भरतंच शिवाय ग्लुकोज नियंत्रण व्हायला मदत होते..
  • जेवणाआधी अर्धातास फायबराईझर घेतल्यानं पचनशक्ती वाढते, कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते, भूक कमी लागते आणि रक्तातील साखरेचं नियंत्रण सुधारतं..  
हे अभ्यासताना मी करत असलेल्या आहारातल्या चुका लक्षात आल्या.. ब्रेकफास्ट न करणे.. फळांचं अतिसेवन.. ड्राय फ्रुटस, दाणे, फुटाणे ह्यावर स्नॅकिंग.. जेवणाच्या ऐवजी स्मूदी, कॉफी+दोन मारी बिस्कीट/वाटीभर चिवडा-भडंग..

अजुनी काही बदल करायचं ठरवलं..
जेवणाचा कॅलरी काउन्ट न ठेवता कपाच्या प्रमाणात आहार घ्यायचा..
डिश, बाउल, कप तेच ठेवायचे.. 
एकदाच ताट वाढून घ्यायचं.. 
पोहे, उपमा, चाट, साबुदाणा खिचडी, इडली, डोसा वर्ज्य..       
पॅकेट फूड पूर्णपणे बंद.. 
बाहेरचं खाणं मग ते हॉटेलिंग असेल किंवा बाहेर कोणाकडं ते ही बंद.. 

स्टेप ४.. डाएट चार्ट तयार करणं.. 
इतकी सगळी माहिती मिळाल्यावर डाएट चार्ट करणं सोपं होतं.. 
  • ब्रेकफास्ट.. ग्रीक योगर्ट, १/२ अँपल/मूठभर ब्लूबेरी+१-२ स्ट्राबेरी.. 
  • लंच.. २ वाट्या सॅलड/कोशिंबीर (ड्रेसिंग,फोडणी, दाण्याचं कूट शिवाय), १ नाचणी/बाजरी भाकरी (तळहाताचा साईझ) किंवा १ नाचणी डोसा, १ वाटी भाजी, १ वाटी ताक.. 
  • डिनर.. मोठ्ठा बाउलभर उसळ वर कांदा कोथिंबीर लिंबू/ बेसन चिला, धिरडं आणि लेट्युस सॅलड (ड्रेसिंग शिवाय)

डाएट आणि एक्सरसाईज प्लॅन.. 
सकाळी ६:३० उठणे.. शांभवी महामुद्रा क्रिया.. 
सकाळी ७:४५ ब्रेकफास्ट.. 
सकाळी ९:०० जिम..  
दुपारी १२:०० जेवण.. 
२० मिनिट शतपावली.. 
दुपारी ५:०० ब्लॅक कॉफी.. साखरेशिवाय 
संध्याकाळी ६:३०-७:०० डिनर..
२० मिनिट शतपावली..
झोपण्यापूर्वी ईश क्रिया..  
रात्री १०:३०.. गुड नाईट.. 

एक्सरसाईज रुटीन.. upper body/lower body, abs, ट्रेडमिल.. साधारण ७० मिनिटांचं रुटीन.. ५ दिवस.. 
शनिवार.. deep stretching.. रविवार.. रेस्ट.. 

👉 मी प्रोफेशनल डाएटिशिअन ही नाही आणि डॉक्टर ही.. माझ्या डाएट साठी केलेल्या अभ्यासातून मिळालेली ही माहिती आहे.. 

**********************

जिम तर रेगुलर सुरूच होतं.. १ मे पासून डाएट प्लॅन सुरु केला.. 
२ मे ला वाढदिवस असला तरी चिट डे नव्हता.. नो केक.. नो फॅन्सी डिनर.. नो गोडधोड.. ऋचानं Parfait केलं.. ग्रीक योगर्ट+ ग्रॅनोला+ बेरीज टॉल ग्लास मध्ये सेट करायचं..

डाएट रुटीन बसायला एक आठवडा लागलाच.. सुरुवातीला दाणे, फुटाणे न खाणं जड गेलं.. पण नंतर लक्षात आलं कि हे खाणं भुकेसाठी नाहीय तर खावंसं वाटतंय म्हणून आहे.. म्हणजे माझ्या मनाचा खेळाय.. 
कमी खाण्यानं उपासमार होतीय असं नाही वाटलं.. पोट जरी थोडं रिकामं असलं तरी जेवून समाधान व्हायचं..

वजन आणि माप घेणं आठवड्यातून एकदाच.. 

१ मे २०२४.. वजन १६५ पौंड (७५ किलो)..

८ मे २०२४.. वजन १६३ पौंड (७४ किलो).. 
७४ आकडा पाहून खूप आनंद ही झालाय आणि विश्वास ही बसत नाहीय अशी परिस्थिती झाली.. गेल्या कित्त्येक वर्षात पहिल्यांदाच मी वजन कमी झालेलं पहात होते आणि ते ही २ पौंड.. दोनदोनदा वजन करून पाहिलं.. पण वजन वाचता येईना.. तेव्हा लक्षात आलं कि डोळे भरून आलेत.. 
३-४ दिवसाच्या अभ्यासाच्या मेहनतीच चीज झालं.. दिवस रात्र एक करून अधाश्यासारखी माहिती गोळा करत होते.. आर्टिकल्स वाचत होते.. youtube व्हीडिओ पहात होते.. नोट्स काढत होते.. पाटी लख्ख पुसून, कोरी करकरीत करून नव्यानं अभ्यास केल्याचा फायदा होताना पाहून खूप छान वाटत होतं.. accomplished, अटकेपार झेंडा वाटायला अजुनी बराच पल्ला गाठायचा असला तरी ही छोटी मजल ही काही कमी नाही..

१५ मे २०२४.. वजन १५९ पौंड (७२.२७ किलो).. १ इंच वेस्ट कमी.. 
ह्या आठवड्यात ४ पौंड वजन कमी आणि १ इंच वेस्ट.. another feather in Hat!.. 

.. प्रत्येक आठवड्याला साधारण अडीच ते तीन पौंड वजन कमी होऊ लागलं.. आणि वेस्ट, हीप्स ची मापं पण.. 
आता प्रतीक्षा होती ती २० जून ची!.. 
वजन जवळ जवळ आठ - साडे आठ किलोनं कमी झाल्यानं १३ जूनलाच म्हणजे ७व्या आठवड्यात HbA1C टेस्ट केली..
..आणि मी फर्स्ट क्लास डिस्टिंगशन मिळून पास झाले.. HbA1C ६.. 

'वजन उतरवणं' हा सिंगल ट्रॅकच आयुष्यात नव्हता तर बाकी ट्रॅक्स पण होते.. आणि त्या ट्रॅक्स वरचे चढंउतार होते, त्यामुळं निर्माण होणारी मानसिक भावनिक आंदोलन होती.. तरीही त्यावेळी इमोशनल इटिंग पासून लांब राहू शकले केवळ नियमित कमी होणाऱ्या वजनामुळं आणि 'मानसरोवर' मोटिवेशनमुळं..

२० जून २०२४.. वजन १४३ पौंड (६५ किलो).. वेस्ट ३ इंच कमी, हीप्स २.५ इंच कमी..
... WOW!!.. पोचले टार्गेट लाईन पर्यंत.. 👏👏
ज्यासाठी केला अट्टाहास.. 
खरं तर ज्यांनी केला असा हट्ट त्यांना, ईशा फौंडेशनला ई-मेल केली कि तुम्ही दिलेलं HbA1C ६ हे टार्गेट आणि दिलेल्या टार्गेट वजनाच्या (५ किलो) दुप्पट वजन (१०किलो) कमी करण्यात मी यशस्वी झालीय.. ☺️


#ChallengeAccomplished 
#FeelingProud 
**********************  

ही achievement हा success खरं तर सेलीब्रेट करायला हवा होता.. पण मला आता थांबायचं नव्हतं.. पाठीवर कौतुकाची थाप मारून पुढं जायचं होतं..
थोडं हावरटपणाचं वाटेल.. पण काय हरकताय..
मिशन HbA1C ५.७ किंवा कमी.. वजन ६०-६२ किलो.. मुदत तारीख.. ३१ जुलै/७ ऑगस्ट..

'कैलास-मानसरोवर'चे ट्रेकिंग डेज कमी असले तरी अल्टीट्युड ट्रेक ट्रेनिंगसाठी एक्सरसाईझ रुटीन मध्ये थोडा बदल केला..
सोमवार- Personal Training, मंगळवार- Trademill, बुधवार-Personal Training, 
गुरुवार- Stairs, शुक्रवार- Yoga, शनिवार-Long Walks, Deep Stretching, रविवार- Rest 

आता लक्ष होतं ते ६३ किलोवर.. 
साधारण विशीचा शेवटचा टप्पा ते पस्तिशी पर्यंतचं वजन 
१० जुलै २०२४.. वजन ६३.२ किलो.. १३९.१ पौंड 
हे दोन किलो वजन कमी व्हायला तब्बल तीन आठवडे लागले.. 
सुरुवातीला आठवड्याला दीड किलो कमी होणारं वजन, नंतर १ किलोनं आणि आता त्यापेक्षा ही कमीनं कमी होतंय.. लवकरचं plataeu येईल..

वेस्ट ५.५ इंच कमी, हीप्स ५ इंच कमी

२४ जुलै २०२४.. वजन ६१.६ किलो.. १३६ पौंड  

मुदत तारीख.. ३१ जुलै २०२४.. वजन ६०.६ किलो.. १३३ पौंड    
टार्गेट वजन ६०-६२ किलो.. ✔️

७ ऑगस्ट २०२४..
HbA1C ५.७..✔️ ..म्हणजे डायबेटिसपासून मुक्ती!! 💃



७५ किलो             ६० किलो
  

                           १ मे २०२४                            ८ ऑगस्ट २०२४
          वजन            ७५ किलो (१६५ पौंड)           ५९ किलो (१३०पौंड)
          वेस्ट           ३४ इंच                                २८.५ इंच
          हीप्स             ४३ इंच                                 ३८ इंच 
          BMI             ३०                                      २४
          Body Fat      ३६.६                               २८.९




पुन्हा योगाभ्यास सुरु..

ॐ तत् सत्


गेल्या तीन महिन्यात पोटाला बऱ्यापैकी विश्रांती होती.. इतक्या मोठ्ठ्या प्रवासापूर्वी परत सगळं खाण्याची सवय व्हायला हवी.. सगळं म्हणजे गहू, तांदूळ, काही भाज्या असं.. बाकी जे मेजर नो नो आहे ते आहेच..

वजन स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा आता नवीन डाएट प्लॅन करावा लागणार.. 🤔
टिकावू आणि (जिभेला) आनंद देणारा..😂


                                                                                             
-मी मधुरा.. 

👉 मी प्रोफेशनल डाएटिशिअन ही नाही आणि डॉक्टर ही.. माझ्या डाएट साठी केलेल्या अभ्यासातून मिळालेली ही माहिती आहे.. आणि ह्या डाएटचा मला उपयोग झाला म्हणून तो सगळ्यांना होईल असं नाही.. असे प्रयोग करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.. 

************************************************

Monday, August 12, 2024

वाढतं वजन - एक समस्या.. (भाग २)


सौजन्य:गूगल

सलग दोन वर्ष हिमालयात मोहीम केल्यानं "आता ह्यावर्षी कुठं?" असा प्रश्न अनेकांनी विचारला.. पण अडीच महिने भारतात राहून, चांगलं चुंगलं खाऊन, दोन दोन लग्नात मिरवून, पूर्णपणे आऊट ऑफ शेप असणारी मी काय उत्तर देणार?.. 'अजुनी ठरतंय' असं मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेत होते..
 
आधीची मोहीम झाली कि लगेच पुढच्या मोहिमेचे विचार माझ्या डोक्यात घोळायला लागतात.. दोनदा हिमालय ट्रेक झाल्यानं आता काही तरी वेगळं करावं असं मनात होतं.. वेगळ्या देशात ट्रेकिंग, युरोप मध्ये सायकलिंग का अजुनी काही? अनेक पर्याय शोधणं, त्यांचा अभ्यास करणं सुरु होतं.. 

माझं हिमालयाशी एक नातं, एक कनेक्ट आहे.. तो सतत बोलावत असतो.. हे कदाचित माझ्या 'मानसरोवर'च्या आकर्षणामुळं ही असेल.. खरं तर मला कैलास मानसरोवरनं सोलो ट्रीपची सुरुवात करायची होती.. पण २०२० पासून चीननं कैलास मानसरोवर यात्रेवर बंदी आणल्यानं, सुरुवात EBC नं झाली.. आता चीननं बंदी उठवल्यानं ही यात्रा पुन्हा सुरु झालीय.. काय सांगावं चीनच्या मनाचं?.. मन पालटलं आणि परत बंदी आणली तर? त्याआधी 'मानसरोवर' करणं शहाणपणाचं..  

फेब्रुवारी २०२४: 
तर, मिडफेबच्या आसपास भारतातून परत आल्यावर, कैलास-मानसरोवरला जायचं पक्कं झालं.. लगेचच, माझी हिमालय ट्रेक आयोजक नीतीला संपर्क केला.. कैलास-मानसरोवर ही अध्यात्मिक, पवित्र जागा असल्यानं असा अनुभव मला ह्या ट्रेककडून अपेक्षित होता.. पण तिच्या itineraryतून मला तो मिळेल असं वाटलं नाही.. 
ईशा फौंडेशन कैलास-मानसरोवर यात्रा आयोजित करतात हे इनर इंजिनीरिंग कोर्सच्या वेळी कळालं होतं.. पण त्यांच्याकडं एक वर्ष आधीपासून रेजिस्ट्रेशन सुरु होतं.. जरा शाशंक मनानंच त्यांच्या साईट वर गेले आणि आहो आश्चर्यम.. 
ह्यावर्षीच्या शेवटच्या बॅचमध्ये माझं रेजिस्ट्रेशन झालं सुद्धा!.. १ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर.. 
रेजिस्ट्रेशन तर झालं पण त्यांच्याकडून पुढं १-२ आठवडे काहीच उत्तर आलं नाही..

मार्च २०२४:
१८ मार्च.. ई-मेल आली.. एका पोर्टल पेजवर जाऊन पुढच्या स्टेप्स पूर्ण करा.. 
पोर्टलवर ठळक अक्षरात पहिलंच वाक्य 'मेडिकल क्लीअरन्स' मिळाल्यावरच तुमची सीट कन्फर्म होईल.. आणि खाली भली मोठ्ठी लिस्ट.. ती पाहूनच गरगरायला लागलं.. गेल्या दोन ट्रेक्सना असलं काहीच करावं लागलं नव्हतं.. पैसे भरले आणि झालं.. इतकं सारं मेडिकल पेपर वर्क.. मेडिकल वेवर, पर्सनल मेडिकल इन्फॉर्मशन फॉर्म्स, फॅमिली मेडिकल हिस्टरी, डॉक्टरनं सही केलेलं फिटनेस सर्टिफिकेट, सगळ्या ब्लड टेस्ट्स, EKG, TMT (exercise EKG Test).. हे रिपोर्ट्स त्या पोर्टल वर अपलोड करायचे, त्यांचं डॉक्टर पॅनल ते टेस्ट्स रिपोर्ट्स पाहून क्लीअरन्स देणार.. आणि त्यावर तुम्ही जाणार का नाही ठरणार..

एप्रिल २०२४: 
१४ एप्रिल.. ब्लड वर्क झालं.. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले पण.. पण HbA1C ६.७.. भारतात जाताना ६.३ होतं ते आता ६.७.. 😭
पर्सनल चेकप.. @डॉक्टर्स ऑफिस.. गेल्या गेल्या वजन घेतलं.. १६६ पाउंड.. ७५ किलो पेक्षा ही जास्त..😳  
भारतात जाऊन आल्यावर वाढलेल्या ग्लुकोज लेव्हल्स आणि वाढलेलं हे ३ किलो वजन.. डोळ्यांत टचकन पाणी आलं.. माझ्या हातात जे काही होतं ते सगळं करून सुद्धा वजनाचा आलेख चढताच होता.. त्यात आता डायबिटीस..
ह्यावर डॉक्टरचं म्हणणं "इतकी निराश नको होऊ.. HbA1C ६.७ कडं धोक्याचा इशारा म्हणून पाहू.. लगेच गोळीची गरज नाही.. आपण तीन महिन्याचा डायबेटिस प्रोग्राम करून टेस्ट रिपीट करू आणि ठरवू पुढं काय करायचं.." तिच्या ह्या आशावादी बोलण्यानं थोडं हायस वाटलं.. 

२०१३ मध्ये थायरॉईड डिटेक्ट झालं तेव्हाच वजन ६५ किलो आणि आता २०२४ मध्ये ७५.५.. गेल्या ११ वर्षात साधारण ११ किलो.. ज्यामुळं मी आता ओबीस कॅटॅगरीत आले.. थायरॉईड + ओबीस + डायबिटीस = जीवघेणं समीकरण.. नशिबानं EKG नॉर्मल होता.. 

२५ एप्रिल: ईशा फौंडेशन कडून ई-मेल.. त्यांच्या डॉक्टर्स पॅनलनं पुढच्या आठ आठवड्यात किमान ५ किलो वजन कमी करायचं, HbA1C ६ वर आणायचं आणि TMT आवश्यक असल्याचं सांगितलं.. ही ई-मेल वाचून पूर्णपणे निराश झाले.. इतकी वर्ष इतके प्रयत्न करून पण एक औन्स वजन कमी झालं नाही, आता आठ आठवड्यात कसं कमी होणार??.. त्यांना ह्यापूर्वी अश्याच वजनावर EBC, अन्नपूर्णा ट्रेक केल्याचं आणि हे ही मी करू शकेन असं सांगून पटवायचा प्रयत्न ही केला.. पण त्यांचे उत्तर 'नथिंग डूइंग.. रेडूस द वेट'.. 

असं म्हणतात की कैलास मानसरोवर यात्रा प्रत्येकाला वेगळा अनुभव, वेगळी शिकवण देते.. माझ्यासाठी ही सुरुवात यात्रेच्या प्रयोजनापासूनच झालीय.. अध्यात्मिक अनुभव, शिकवण घेण्याआधी स्वतःला सिद्ध कर, जिद्दीनं चिकाटीनं वजन कमी कर आणि मग ये..    

आत्तापर्यंत वाढत्या वजनामुळं योगाभ्यासावर पाणी सोडलं असलं तरी ट्रेकिंग, हायकिंग,मॅरेथॉन, रेसेस अश्या ऍक्टिव्हिटीज करू शकत होते.. पण आज वजनामुळं जर ह्या ऍक्टिव्हिटीज करण्यात अडथळा निर्माण करणार असेल तर.. छे.. छे.. डोकं सुन्न झालं.. नो होप्स.. नुसता अंधार.. 
थायरॉईड + ओबीस + डायबिटीस = जीवघेणं समीकरण आहेच.. 
ब्लेम करायला आज ही खूप काही आहे.. ब्लेम करून तेवढ्यापुरतं बरं वाटेल.. पण माझी भीती, जबाबदारी कशी कमी होईल?.. पूर्वी वजनाचा संबंध 'माझं दिसणं', 'माझं व्यक्तिमत्व' ह्या बाह्यांगापुरता होता, आता तो चांगलं आयुष्य जगण्याशी आलाय.. तब्बेतीशी आलाय.. 

दोन दिवस खूप चिडचिड झाली, हेल्पलेस वाटलं, स्वतःवर राग राग केला, रडून झालं.. 
डॉक्टरनं सांगितलेला डायबेटिस प्रोग्राम जून शिवाय सुरु होणार नव्हता..
आता?..  पुढं काय करायचं?..  काय करू शकते?.. माझ्या नियंत्रणात आणि नियंत्रणाबाहेर काय आहे?..
समोर दोनच ऑपशन्स होते..  
एकतर हे सगळं स्वीकारून आयुष्य जगायचं.. 'मानसरोवर'चं स्वप्न सोडून द्यायचं.. 
नाहीतर त्यांनी दिलेलं आठ आठवड्याचं आव्हान स्वीकारायचं.. होऊन होऊन काय होईल? वजन कमी नाही होणार.. मानसरोवर नाही होणार.. पण प्रयत्न केल्याचं समाधान तरी असेल.. आणि वजन कमी झालंच तर.. unlimited possibilities.. हा विचार सुखावणारा आहे..                    

आता नकारात्मक विचार बाजूला सारून, नव्या उमेदीनं, पूर्ण अभ्यास करून, तयारीनं हे आव्हान मी स्विकारायचं ठरवलंय..


(to be continued...)
-मी मधुरा.. 

************************************************

वाढतं वजन - एक समस्या.. (भाग १)

सौजन्य:गूगल

गुटगुटीत, खात्यापीत्या घरची, हेल्दी, आडव्या हाडाची अश्या कितीही गोंडस, नानाविध उपमा दिल्या तरी लहानपणापासूनच मी वजनाच्या झुकत्या मापातलीच.. 'वाढत्या चणीची' ह्या वयात वजन नामक भूताशी माझी तोंड ओळख झाली.. 

शाळा कॉलेजच्या दिवसांत 'श्रीदेवी', 'जुही', 'माधुरी' यांचा बोलबाला असल्यानं ह्या भुताच्या अ-'करिश्मा' पासून मी लांबच होते.. पंजाबी सूट, चुदीदार फार फार तर लाँग स्कर्ट आणि क्वचित कधी तरी जीन्स आणि बॅगी टॉप्स अश्या कॅज्युअल वेअर मध्ये ‘फिगर’ हा प्रॉब्लेम ही नव्हता.. आजूबाजूला थोडफार फरकानं सगळे असेच.. त्यामुळं आयुष्य एकदम साधं सरळ सोप होतं.. 

सांगली (मोठ्ठं खेडं) शहर ते पुणे मोठ्ठं शहर (अजुनी ते मेट्रो व्हायचं होतं) ते अमेरिका एकदम परदेश ह्या प्रवासांत माझी वजन ह्या भूताशी नव्यानं ओळख झाली.. आणि त्यानं माझी मानगुट पकडली.. वेस्टर्न कपड्यांत आपण बसणं खरंतर मावणं हा एक टास्क आणि ते घालून वावरणं, ते कॅरी करणं हा दुसरा.. ह्या
च भूतानं पुढं ‘डाएट’ मायानगरीच्या चक्रव्यूहात आणून सोडलं.. 

लग्न मानवणं, परदेशातील हवा, अमेरिकेचं लक्झरी लाइफ वजनाचा आकडा वाढवत राहिले.. जेवणापूर्वी एक दोन भांडी पाणी पिणं, भात न खाणं अश्या घरगुती टिप्सनी डाएटचा श्रीगणेशा झाला.. आणि रोज सकाळी ग्राउंड ला फेऱ्या आणि ११ सूर्यनमस्कार ह्यानं व्यायामचा.. मग हळूहळू जिम, नवनवीन डाएट रेसिपी बुक्स, रामदेवबाबांचा योग आणि इंटरनेट क्रांती नंतर एका क्लिक वर मिळणारी धोधो माहिती यांनी वजन किती ही वाढलं तरी ओबीस नाही होवू दिलं.. अमेरिकेत आल्यावर late 90s मध्ये ज्यूस डाएट केल्याचं पण आठवतंय.. तीन दिवस ज्यूस प्या आणि अमुक अमुक वजन कमी करा..

प्रेग्नंसी नंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मॅरेथॉन ट्रेंनिंगला सुरुवात केली.. वर्षाला एक हाफ मॅरेथॉन (२१ किमी) करणारी मी काही वर्षांतच वर्षाला तीन हाफ मॅरेथॉन करू लागले.. बरोबरीनं स्ट्रेंथ ट्रेंनिंग ही होतंच.. झिरो फिगरच्या ट्रेंड मध्ये बसत नसले तरी मी फिट होते.. 

हायपोथायरॉईड ची गिफ्ट घेऊन चाळीशी आली आणि सगळं ढासळायला लागलं.. अकस्मात वाढलेल्या वजनानं थायरॉईडच निदान झालं.. ते वाढलेलं वजन नंतर कमी झालंच नाही.. योग्य आहार, व्यायाम आणि औषधं घेऊन वजनाशी लढा सुरु होता.. दीक्षित, दिवेकर, प्रत्येक चौथ्या दिवशी फास्टिंग, आहारतज्ञाचा वैयक्तीक सल्ला असे अनेक डाएट प्रकार ही करून झाले.. पण वजन कश्यालाही बधायला तयार नव्हतं..   

मॅरेथॉन आणि बाकी ऍक्टिव्हिटीज पूर्वीसारख्या सुरु असल्यानं मी हे वाढलेलं वजन शेवटी कबूल केलं.. एकीकडं strength, flexibility, endurance ह्या तिन्ही पातळीवर मी फिट होते आणि दुसरीकडं वजन वाढत होतं.. त्याबरोबर डायबिटीसचा धोका ही.. HbA1C वाढत वाढत ६ च्या घरात ठाण मांडून बसलं.. योग्य ते सगळं करून सुद्धा वजन कमी होत नसलं तरी ब्लेम करायला माझ्याकडं थायरॉईड, हार्मोन्स, प्रीमोनोपॉज ही कारणं होती.. strength training (weights), running मुळं muscle mass वाढण्याची गोड शक्यता 
ही.. इतक्या वर्षांत Annual check up म्हणजे रडारडी हे समीकरण माझ्या आणि डॉक्टरच्या ओळखीच झालं.. डॉक्टरकडं माझ्या समस्येचं उत्तर नव्हतं.. माझं वजन इतकं हट्टी होतं कि एव्हरेस्ट बेस कॅम्प, अन्नपूर्णा सर्किट ट्रेक्स केले तरी १ औन्स पण कमी झालं नाही..

वाढलेल्या वजनाचा थेट प्रभाव माझ्या आवडीवर, योगावर होणं हे खूप हृदयद्रावी होतं.. चरबीमुळं लवचिकता, डौल कमी झाल्यानं काही काही आसनं करणं आव्हानात्मक झालं.. त्यामुळं योगाभ्यास करणं आणि शिकवणं दोन्ही सोडून दिलं.. प्राणायाम आणि मेडिशन मात्र सुरु ठेवलं.. 

वाढत्या वजनाचा 'स्वः'वर होणारा नकारात्मक प्रभाव, शरीरा बरोबरच मानसिक आणि भावनिक पातळीवर असणारा ताण, समाजात वावरतानाचा तणाव हा लढा तर रोजचाच.. त्यात थायरॉईड आणि आता हे वाढलेलं वजन, बाकी व्याधींना आमंत्रण तर देणार नाही ना ही भीती, टाईप २ डायबिटीसची फॅमिली हिस्टरी असल्यानं ती टांगती तलवार ह्या सगळ्यांमुळं येणारा ताण तर आहेच.. स्पेशल ओकेजन्स, व्हेकेशनला ठिकाय पण रोज सकाळी उठल्यावर सुद्धा काय कपडे घालू? कश्यात फिट बसेन? हा विचार खूप त्रासदायक असतो.. वजन, डाएट हे विषय इतके सेंसेटिव्ह होतात कि त्याबद्दल कोणी बोललं तरी आपल्या बद्दलच आहे असं वाटतं.. दुकानातून खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन करणं सुखकर वाटतं.. कधी कधी कुठं जायचं, कोणांत मिक्स व्हायचं म्हटलं तरी रडायला येतं.. आपण बरं आणि आपलं लाईफ बरं.. 

पण योगाभ्यासामुळं ह्याकडं पहायची वेगळी दृष्टी मिळाली.. 'Being comfortable in your own skin' हे जरी शिकत असले तरी सगळे दिवस सारखे नसतात.. रोलर कोस्टर सुरूच असतं.. ह्यात स्टेबल, ग्राऊंडेड राहायला मॅरेथॉन, रेस ट्रेनिंग्स मदत करतात.. काहीतरी मिळवल्याचं, स्वतःला सिद्ध केल्याचं समाधान मिळतं.. 
 
Skin मध्ये कितीही comfortable झाले तरी वाढत्या वजनाचा धोका काही कमी होत नाही.. त्यामुळं वाढतं वजन, त्याचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक परिणाम आणि माझे अयशस्वी प्रयत्न ह्याला कंटाळून शेवटी येत्या भारतवारीत आयुर्वेदिक उपचार घेण्याचं ठरवलंय.. 
 
नोव्हेंबर २०२३: 
सगळे ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल असले तरी HbA1C ६.३ 😳.. 
नेहमीप्रमाणं ब्लेम करायला माझ्याकडं emotional stress, stress of empty nester ही कारणं असली तरी काळजी नव्हती.. कारण आता भिस्त होती ती आयुर्वेदिक उपचारांवर.. 
तीन महिन्यांनी परत टेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टरनं दिला.. आणि मी खुशीखुशी भारतवारीला निघाले.. 


(to be continued...)
-मी मधुरा.. 

************************************************


Sunday, March 17, 2024

तू नसताना..

तू नसताना, डोळे पाणवता 
धीर देऊ कसा मनाला?
उसासा घेऊन, शांत तरी 
किती करु श्वासाला?

निरोप न घेता जाणं तुझं  
मनी काहूर घेऊन आलं     
नजरेआड होताना पाहणं  
जीवन अर्थहीन करून गेलं  

हवालदिल होऊन मी 
सौजन्य:istock 
पाठमोऱ्या तुला पाहत राहिले  
पाहता पाहता परत
परत तुझ्यातच गुंतत गेले  

असं वेड लावलंस मला 
माझी मलाच हरवून बसले 
तू नेशील त्या वाटेवर 
मागं मागं चालत राहिले 

पाऊलखुणा पुसून साऱ्या
जरी गेलास तोडून स्वप्नं     
रममाण होऊन आठवणींत  
हृदयी तुला जपून ठेवीन.. 
हृदयी तुला जपून ठेवीन..  


-मी मधुरा.. 

************************************************

Sunday, January 14, 2024

नातं एका अनोख्या विणीचं..

( प्रहसन : वेळ १२-१५ मिनिटं)


ती: झोप लागलेली दिसतीय.. ह्याला असं शांत झोपलेलं पाहून (डोळे पुसते..)

(टेबल वर असलेला अल्बम हातात घेते.. सोफ्यावर बसते.. )

(अल्बम चाळता चाळता.. ) किती स्मार्ट दिसतोय.. अजुनी ही असाच दिसतो.. शरीर खंगलंय, डोळ्यांतली चमक कमी झालीय पण बोलण्यातला बाज अजुनी तसाच.. गाणं ऐकण्यांत दंगला की त्याच्याकडं पाहत राहावं असं वाटतं.. 

(फोटोकडं पहात त्याच्या आवडीचं गाणं गुणगुणते..)

(दरवाजाची बेल वाजते... )

तो: काय? कसे आहेत आमचे मित्रवर्य? 

ती: अरे आधी आत तरी ये.. 

तो: (आत येत..) आज गुणगुणतीयेस.. (ती गालातल्या गालात हसते..) आराम पडलेला दिसतोय नवीन औषधानं.. 

ती: हम्म.. आत्ताच झोप लागलीय.. तू बस ना.. (पाणी देता देता).. चहा करू कि कॉफी?.. 

तो: काही नको.. चहा घेतला आणि निघालो.. तू कशी आहेस? (शेजारी पडलेला अल्बम हातात घेऊन..) च्यायला काय दिवस होते ना ते.. तो, मी आणि तू.. आमच्या दोघांत तू होतीस का तुम्हा दोघांत मी..  

ती: हं.. तेच पहात होते.. वक्त को गुजरते.. पण काही गोष्टी बदलत नाहीत.. rather त्या बदलण्यासाठी नसतातच.. 

तो: (आपल्याच नादात..) हाच फोटो पाहून मगाशी गाणं गुणगुणत होतीस तर.. (मिश्किल हसतो) वेडाय तो.. चक्क वेडा.. शाळेच्या फेअरवेल ला काय गाणं म्हटलं होतं राव.. तुझ्यासाठी.. (ती: चल... ) सगळ्यांनी धरलेला टाळ्यांचा तो ताल आणि तुझं लाजणं.. त्यानं तुला स्टेजवर बोलावणं आणि तुमचा डांन्स.. (ऐसे ना मुझे तुम देखो, सीने से लागा लुंगा..) काय सही टाइमिंगला क्लिक केलाय हा फोटो.. किती एकमेकांत असायचात.. तुमचं एक वेगळं विश्व होतं.. आणि त्याचा अगदी छोटासा भाग मी.. निदान मला तसं वाटायचं.. 

ती: तो तर तू अजुनी आहेस.. आणि असणारच आहेस.. तुझ्याशिवाय आम्ही?? हे होणं नाही.. ए, तिसरीत होतो ना रे आपण? बाबांची बदली इथं झाली आणि आम्ही तुझ्या घरासमोरच्या बंगलीत राहायला आलो.. किती पटकन मैत्री झाली आपली!!.. तुमच्या जोडगोळीत मी कधी आणि कशी सामावले कळलंच नाही.. एकत्र शाळेला जाणं, अभ्यास करणं, खेळणं.. मैत्रिणी नव्हत्याच मला.. कधी तशी गरजच लागली नाही.. शाळा, कॉलेज, नोकरी, संसार, मुलंबाळं, आजारपणं सगळ्यांचा तूच तर साक्षी आहेस.. (उसासा सोडून)..आणि आता हे!.. त्यात ही तू त्याला सामील..

तो: अगं हो.. पण ऐकून तर घेशील? मी त्यात सामील आहे याचा अर्थ, मला शंभर टक्के पटलंय.. असा का घेतेस? 

ती: (त्याचं ऐकून न घेताच)... आणि मुलं काय?..

तो: आता त्यांचं काय?.. 

ती: त्यांचं एकचं पालुपद.. इकडं ये.. नातवंडांत जीव रमव.. त्यांना सांभाळ.. (तो: हम्म.. ).. पण इथून पाय नाही रे निघणार.. इतक्या वर्षाचा संसार, हे घर, इथल्या आठवणी, आपली माणसं, आपलं गांव, आणि मुख्य म्हणजे तू.. 
(मोठ्ठा pause)
.. म्हणतात सगळं विकून टाकू.. पण मला काय हवंय, हे कोणी विचारतच नाही.. मला नाही विकायचंय हे सगळं.. आणि मला कोणाच्याही सोबतीची गरज नाहीय.. त्याच्या आठवणी, आम्ही एकत्र जगलेले दिवस, हे घर हीच माझ्या जगण्याची ऊर्जाय.. 
मान्यय, व्यवहारातलं मला फारसं काही कळत नाही.. त्यात कधी लक्षच घातलं नाही.. तशी वेळच आली नाही.. केवळ तो नाही म्हणून,  हे सगळं विकून, मुलांपाशी जावून राहू? का?.. तरी तो म्हणायचा सगळं शिकून घे.. सगळं माहिती असावं.. 

तो: त्यावर तुझं ठरलेलं उत्तर.. तू आहेस ना.. मग झालं.. 

ती: ..कसं लक्षांत आलं नाही रे आपल्या?.. एकदम स्टेज फोर..  

तो: त्याच्या सारख्या जगण्यावर प्रेम असणाऱ्याच.. 

ती: (त्याला तोडत.. ) ..हे कळल्यावर डॉक्टरना म्हणतो कसा.. काय ट्रीटमेंट बिटमेंट असेल ते लवकर सुरु करा.. चार दिवसापूर्वी RV घेतलीय.. देशभर फिरायचंय हिच्या सोबत.. आणि काही ट्रीटमेंट नसेलच तर किती दिवस राहिलेत ते सांगा.. काय?.. समुद्र किनारी, मावळत्या सूर्याच्या साक्षीनं पुढच्या जन्माचं वचन घ्यायचंय हिच्याकडून.. ते तेवढं घेतो.. (लहान पॉज..) ते वचन खुशी खुशी दिलं रे.. पण हे?... त्याच्यासाठी त्यालाच..  

तो: अगं.. शांत हो.. 

ती: त्या दिवशी काय म्हणत होता माहितीयाय.. माझं जाणं आता अटळाय.. हे का झालं? मीच का? असा विचार करुन त्रास करुन घेण्यापेक्षा ही परिस्थिती स्वीकारून एकत्र ह्याचा सामना करूया.. ‘शोक मनाना’ म्हणतात ना, तसं करुन आपले दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करूया.. यात ही त्याचा विनोद!.. 
(पॉज..)
नाही बघवत रे त्याचे हाल.. माझ्या समोर मोठ्ठ्या लढवय्याचं बळ आणतो.. पण खचलाय तो.. स्वतःच्या तत्वावर स्वच्छंदी आयुष्य जगणारा.. सहा बाय अडीच च्या बेड वर.. (हुंदका/डोळे पुसते.. )

तो: ऐक आमचं.. असं काय करतेस.. अडकलाय गं तो तुझ्यात.. 

ती: सांग ना मग त्याला, मी आहे.. मुलं आहेत.. 

तो: मी सांगितलं नसेल का? आणि मुलांचं म्हणशील तर ती त्यांच्या त्यांच्या संसारात.. काही दुखलं खुपलं येतील, प्रेमानं करतील.. पण रोज? रोजचा दिवस कसा घालवशील? काय करशील?.. उगाच आयुष्य आहे म्हणून जगण्यापेक्षा ते आनंदानं, भरभरून जगावंस, असं वाटणं चुकीचं आहे का? 

ती: अरे ते मी जगेनच.. कोणा एकाच्या जाण्यानं दुसऱ्यानं जगणं सोडायचं नाही.. तसं वचन दिलंय आम्ही एकमेकांना..

तो: अगं, तो नुसतं जगणं म्हणत नाहीयाय.. आणि खरं सांगू, जिगर लागतं असं वागायला.. इतकं convictionaly, खात्रीपूर्वक, विचार करून, मुद्देसुद बोलत होता ना की मला माझ्या मित्राचा अभिमानच वाटला.. 

ती: हम्म.. त्याच्या असं वागण्यानंच तर मी परत परत त्याच्या प्रेमात पडत राहते.. त्याच्यासाठीच जगावं असं वाटतं.. (pause..) तुला काय वाटतं?.. त्याला काय म्हणायचंय हे मला कळत नसेल?.. त्याच्या जागी मी असते तर मी ही हेच केलं असतं.. आणि तो ही माझ्यासारखंच वागला असता.. 
पाच दशकांपेक्षा जास्त सहवास आहे रे आमचा.. कळत ही नव्हतं तेव्हा पासून.. एकमेकांच्या सोबतीनं सुरु केलेल्या प्रवासांत, तो माझा भक्कम आधार कधी झाला आणि त्याच्यावर सारं सोपवून, आमच्या संसाराची वेल कशी फुलंत गेली कळालंच नाही.. 'तो आहे..' ह्या विश्वासानं निर्धास्त आणि बिनधास्त आयुष्य जगले मी.. आणि आता.. 

तो: थांब.. थांब.. 'आता पुढचं आयुष्य' असंच म्हणायचंय ना तुला?.. (ती मानेनच होकार देते..) अगं त्यासाठीच तर.. तुझ्या ह्या आयुष्यात, तो स्वतः सुंदर, रंगीत रंग भरण्याचा प्रयत्न करतोय.. तो नाही म्हणून तू उदास बसू नयेस.. तो नाही म्हणून तू एकटी पडू नयेस.. तो नाही म्हणून तू रसरसून जगायचं सोडू नयेस.. तो नाही म्हणून तू स्वतःला विसरू नयेस म्हणून..
(तो तिच्याकडे पाहतो.. ती शांतपणे त्याचं ऐकून घेत आहे..) 
तू जगशील, आणि त्याच्या आठवणी तुझ्यासाठी पुरेशा असतील ही.. पण ती तडजोड असेल, तू आयुष्याशी केलेली.. आणि हेच त्याला नकोय.. आयुष्य सुंदर आहे आणि ते पूर्णपणे जगलं पाहिजे.. नवनवीन अनुभव घेत.. 
एक साथीदार मागं राहिला तर दुसऱ्या साथीदाराबरोबर आयुष्याचा प्रवास करायला काय हरकत आहे? 
(तो तिच्या शेजारी येवून बसतो, तिच्या खांद्यावर/पाठीवर थोपटतो..)
अगं, त्याला रिप्लेस कर असं तो सांगत नाहीय तर, फक्त दुसरी एखादी सोबत बघ, असं सांगतोय.. ज्याच्या सोबतीनं तू तुझी स्वप्नं, पर्यायानं तुमची स्वप्नं पूर्ण करू शकशील.. एक आनंदी आयुष्य जगू शकशील.. बघ विचार कर.. 

(ती डोळे मिटून बसते.. तो अल्बम पाहत बसतो)

उठला वाटत म्हणत तो आत जायला निघतो.. 

ती: (डोळे मिटूनच.. डोळ्यावर हात) ह्यापूर्वी ही आपण कित्तेकदा ह्या विषयावर चर्चा केलीयाय.. हो ना? (तो मानेनच होकार देतो).. 
(pause.. सावरून बसत..)
आता ऐक.. काल मला म्हणाला, तुला काय वाटत असेल हे मी समजू शकतो.. तू एकटी राहू शकणार नाहीस असं मला अजिबात म्हणायचं नाहीयाय.. तू कॉन्फिडेंट आहेस, तू आर्थिक दृष्ट्या सुद्धा स्वतंत्र आहेस.. तू एकटी आनंदात राहू शकतेस.. पण सोबत असेल तर तोच आनंद द्विगुणित होयील असं मला वाटतं.. आत्ता नाही पण अजुनी २-४ वर्षांनी कदाचित तुला सोबतीची, सहचाऱ्याची गरज जाणवू शकेल.. आणि मी असे पर्यंत जर का तुला कोणी भेटलं तर मी सुखानं डोळे मिटू शेकन.. इतकंच.. 
तो: हम्म 
तेव्हा पासून ह्यावर विचार करतीय.. 
मला सांग, त्याच्यासाठी, मनावर दगड ठेवून, जरी मी हे पाऊल उचललं, तरी मला माझ्या baggage सकट, दुसरं कोणी सोबत करायला तयार होयील? 

तो: असं का म्हणतेस?

ती: असो..
केवळ त्याच्या सुखासाठी, त्याच्या मन:शांती साठी मी नाईलाजानं हो म्हणायचं ठरवलंय.. 
सांग त्याला त्यानं सॉर्ट लिस्ट केलेल्यांना मी भेटायला तयार आहे.. पण अंतिम निर्णय माझाच असेल.. 

(तो अचंबित होवून तिच्याकडं पाहतोय.. ).. 

ती: जा तू.. भेट त्याला.. मी चहा घेवून येते..

*******************
 
थोडी पार्श्वभूमी.. 

ही "तो" आणि "ती" सिरीज नाही.. 

ही आहे एक सत्यघटना.. आमच्या पोर्टलॅंड टू कोस्ट रेस गृप मधल्या एका जोडप्याची!.. ह्या गोष्टीतली "ती" आणि "ती"च्या नवऱ्यानं "ती"च्या साठी शॉर्टलिस्ट केलेला "तो".. असं हे जोडपं.. कोणत्याही नात्यात न बांधलेलं.. ना लग्न, ना लीव्हईन, पण एकमेकांचा आधार असणारं.. एकमेकांची आवड जपणारं.. एकमेकांना सोबत करणारं.. "तो" गेली २०-२२ वर्ष अश्या रेसेस करतोय.. पण "ती" त्याला सोबत म्हणून रेस ट्रैनिंगला सुरुवात करते काय आणि रेस मध्ये भाग घेते काय.. ते ही वयाच्या पासष्ठीत! सगळंच अजब.. थक्क करणारं.. 

निमित्य शाळेच्या गेट टुगेदरचं.. त्यांत मी ही जगावेगळी, विचारांना उद्युक्त करणारी गोष्ट मांडायची ठरवलं.. माझ्यासाठी नवीन असणाऱ्या स्किट फॉरमॅट मध्ये.. आणि ते सादर ही केलं.. 

*कथानकात थोडाफार बदल केला आहे पण गाभा त्यांचीच गोष्ट आहे..



-मी मधुरा.. 

************************************************