Sunday, April 27, 2025

अध्याय ४ 'ज्ञानकर्मसंन्यासयोग'

ॐ

श्रीपरमात्माने नमः 
अध्याय ४ 'ज्ञानकर्मसंन्यासयोग' 
( दिव्य ज्ञान )


तिसऱ्या अध्यायात श्रीभगवान कर्मयोगाबरोबरच कर्मामागं असणारी यज्ञभावना -कर्मयज्ञ- म्हणजे काय? ज्ञानी व्यक्तींचं लोक कल्याणार्थ कर्तव्य कसं असावं, कर्मसमर्पण म्हणजे काय? हे विस्तारानं सांगतात.. बुद्धीच्या पलीकडं असणाऱ्या परमात्म्याला जाणून स्थिरबुद्धीनं कामरूपी शत्रूस जिंकून, कर्म कर म्हणजेच युद्ध कर.. असा उपदेश अर्जुनाला करतात.. तरी ही युद्धाबद्दल, त्याच्या धर्म कर्तव्याबद्दल साशंक असणाऱ्या अर्जुनाला कर्मयोगाची थोरवी सांगत श्रीभगवान 'ज्ञानकर्मसंन्यासयोग' ह्या अध्यायाची सुरुवात करतात.. 

'ज्ञानकर्मसंन्यास' ह्या शब्दाच्या अर्थाची फोड दोन प्रकारे करता येईल.. 
१. संन्यस्तवृत्तीनं कर्म करण्याचं ज्ञान  
२. कर्म करता करता संन्यस्तवृत्ती प्राप्त होऊन आत्मज्ञान मिळवणं.. 
पहिली फोड ज्ञानयोगी तर दुसरी कर्मयोगी.. सांख्ययोग (ज्ञानयोग) आणि कर्मयोग ह्या अध्यायांत सांगितलेले विचार ह्या अध्यायात विस्तारानं मांडले आहेत..
हा अध्याय चार भागात विभागला गेला आहे.. पहिल्या भागात श्रीभगवान आपल्या अवतारावर भाष्य करून कर्मयोग सांगतात.. तर तोच कर्मयोग योगी, संतमाहात्मे कसा आचरणात आणतात हे दुसऱ्या भागात सांगतात.. तिसऱ्या भागात यज्ञ तर चौथ्या भागात ज्ञानाचं महत्व अधोरेखित करतात..
'कर्मयोग' ह्या अत्यंत जिव्हाळ्याच्या योगाची महती सांगून श्रीभगवान, जेव्हा जेव्हा धर्मस्थापनेसाठी, विश्वकल्याणासाठी ह्या ज्ञानाची गरज पडेल तेव्हा तेव्हा ते जन्म घेतील असं सांगतात.. कोणते ही कर्तव्य, 'कर्म समर्पण' भावनेनं केलं कि ते परमात्म्यास पोचते तसंच 'ज्ञानरूप तपानं' सुद्धा ते कसं साध्य करता येईल हे सांगतात.. थोडक्यात, कर्मातून ज्ञान, ज्ञानापासून इंद्रियांच्या आसक्तीवर नियंत्रण आणि त्यामुळे निर्माण झालेला कर्मसंन्यास म्हणजेच हा अध्याय होय..  
      
'श्रीभगवान उवाच' नं अध्यायाची सुरुवात होते.. श्रीभगवान सांगतात.. मी ह्या अव्ययी, अविनाशी ज्ञानाचा उपदेश सर्वप्रथम सूर्यदेव विवस्वनाला केला, सूर्यदेवानं तो मानवजातीचा जनक वैवस्वत मनूला केला आणि मनूनं तो इक्ष्वाकूला (श्रीरामाचे पूर्वज) केला.. ह्याप्रमाणं हे दिव्यज्ञान गुरुशिष्य परंपरेनं राजऋषींनी ही प्राप्त केलं.. पण पुढं काळाच्या ओघात ही परंपरा खंडित होऊन हे ज्ञान लुप्त झालं.. देहावर प्रेम, विषयसुखांची आसक्ती ह्यामुळं आत्मबोधाचा विसर पडत गेला.. विषयसुख म्हणजेच इतिकर्तव्यता वाटून, आत्म्याचा विसर पडला, इंद्रियप्रेम वाढलं आणि हा ज्ञानयोग लुप्त होत गेला.. 
पुढं श्रीभगवान म्हणतात, "पुरातन, गूढ, अलौकिक असा हा योग, जो माझ्या जिव्हाळ्याचा आहे, तो मी तत्वतः तुला सांगत आहे कारण तू प्रेमाचं, भक्तीचं, मित्रत्वाचं आणि माझ्या विश्वासाचं मूर्तिमंत रूप आहेस.."

अर्जुनापुढं उभा असणारा कृष्ण हा सूर्याच्या आधी जन्मणं शक्य नाही.. म्हणून आश्चर्यचकित झालेला अर्जुन 'ह्या योगाचा प्रथम जाणकार सूर्यदेव कसा?' असा प्रश्न विचारतो.. तेव्हा श्रीभगवान म्हणतात, "परंतप अर्जुना, तुझे माझे अनंत जन्म झाले आहेत.. ते जन्म मला आठवतात पण तुला नाही.. म्हणून तू गोंधळून गेला आहेस, साशंक आहेस.. मी अजन्मा - जन्म न घेणारा, अविनाशी - नाश न पावणारा आणि निराकार आहे.. आणि जगत्कार्यासाठी योगमायेनं मी अवतार घेतो...
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे।।
ज्या ज्या वेळी अधर्मानं धर्माचा ऱ्हास होतो त्या त्या वेळी मी अवतार घेतो.. भक्तांच्या कैवारासाठी, दुष्टांचा समूळ नाश करण्यासाठी, धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी मी परत परत जन्म घेतो.. आणि हे जे जाणतो तो खरा ज्ञानी होय.."

अजन्मा असून ही भगवंताचं जन्म घेणं, अवतार घेणं, निष्कर्म असून ही कर्म करणं, हे स्वरूप जो निःशंक जाणतो, तो देहत्याग केल्यावर ही ह्या भौतिक जगात परत जन्म घेत नाही.. तर भगवंताच्या शाश्वत रूपात विलीन होतो, परममुक्त होतो.. तसंच जे आसक्ती म्हणजेच काम, क्रोध, भय, मत्सर ह्यातून मुक्त होऊन, समर्पण भावनेनं कर्म, ज्ञानार्जन करतात, ते ही त्या शाश्वत रूपात विलीन होतात.. जे ज्या भावनेनं भगवंताला-परमात्म्याला शरण जातात त्या भावनानुरूप फळ त्यांना मिळतं..
 
मनात अनेक हेतू, इच्छा ठेवून नानाविध मार्गांनी उपासना केली जाते.. अनेक शास्त्रांचा अभ्यास केला जातो.. नाना देवतांचं पूजन केलं जातं.. 
भगवंत, परमशक्ती परमेश्वर हा एकच आहे आणि तो ह्या भौतिक सृष्टीच्या अतीत आहे.. ह्या नानाविध देवता म्हणजे भगवतांनी दिलेल्या भौतिक शक्तींनी युक्त असे जीव.. त्यामुळं जशी ज्या देवतेची आराधना, पूजा तसं त्याचं फलं.. अश्या सकाम कर्मांची फलप्राप्ती ही त्वरित आणि क्षणिक असते..  
सकाम कर्म म्हणजे काय हे सांगताना भगवान कर्मांचं वर्गीकरण करतात.. भौतिक प्रकृतीचे तीन गुण - सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण- आणि त्यांना अनुरूप अश्या कर्माला अनुसरून मानवी समाजाचे चार विभाग - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र - असं हे वर्गीकरण.. जे सत्वगुणांत स्थित ते ब्राह्मण ज्यांना ज्ञानाची आस आहे, रजोगुणांत स्थित ते क्षत्रिय जे प्रशासन करतात, रजोगुण-तमोगुण ह्यात स्थित असे वैश्य-व्यापारी आणि तमोगुणांत स्थित असा कामगार वर्ग-शूद्र.. 
वर्ण कोणताही असो आत्मज्ञान मिळालं की मोक्षसिद्धी प्राप्त होते.. 'वाल्याचा वाल्मिकी' होतो.. 

सृष्टीचं सृजन असो किंवा गुणकर्मानुसार वर्णांची निर्मिती, भगवंत कर्ता असून सुद्धा अव्ययी-अपरिवर्तनीय असल्यानं अकर्ताच असतात.. भगवंत त्यांच्या सगुण साकार अवतारात, सर्व विहित कर्मे करतात.. पण कर्मफलांची आसक्ती नसल्यानं ती कर्मे त्यांना बद्ध करत नाहीत.. आणि जे कोणी हे परमात्म्याच्या अनासक्त कर्माचं तत्व जाणतो तो ही कर्म बंधनातून मुक्त होतो.. 
"मुमुक्षु म्हणजे मोक्षाची अपेक्षा करणाऱ्या तुझ्या पूर्वजांनी माझं हे स्वरूप जाणून त्याचं अनुकरण केलं.. म्हणून हे अर्जुना, तू ही ह्याच मार्गाचं अनुकरण कर".. असं सांगून श्रीभगवान दुसऱ्या भागाकडं वळतात.. आणि सृष्टीचा कर्ता परमात्म्यासारखं निरपेक्ष कर्म कसं असावं हे सांगतात..    
 
निरपेक्ष कर्म करायचं असेल तर कर्म, अकर्म आणि विकर्म ह्यातील भेद जाणणं आवश्यक आहे.. हा भेद जाणणाराच कर्माचं तात्विक स्वरूप समजू शकतो.. हे स्वरूप ज्याला कळतं तो कर्म करून ही अलिप्त राहतो.. कर्म, अकर्म, विकर्म ही वेगवेगळी कर्मं नाहीत.. श्रीभगवान म्हणतात कर्मातच कर्म आणि विकर्म दडलेलं असतं.. कर्माकडं आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो ते महत्वाचं..

जो अल्पसंतुष्ट आहे, जो द्वंद्वातीत आहे, जो यशापयशामध्ये सुद्धा स्थिर आहे तो कर्मं करत असला तरी कधीच कर्म बद्ध होत नाही.. असं निस्पृहपणे केलेलं कर्म इंद्रियांपर्यंतच मर्यादित राहतं, ते आत्म्याला बद्ध करत नाही.. असं भासमान कर्म म्हणजे अकर्म.. माऊली म्हणतात, "जैसा कां जळापाशीं उभा ठाके । तो जरी आपणपें जळामाजिं देखे ।तरी तो निभ्रांत वोळखे । म्हणे मी वेगळा आहें ".. म्हणजेच, पाण्यात दिसणारं प्रतिबिंब आपलं असलं तरी ते आपण नाही.. तसंच कर्म हा शरीराचा धर्म असला तरी तो आत्म्यापासून वेगळा आहे.. अश्या निस्पृहवृत्तीनं केलेलं कर्म हे अकर्म.. कारण शरीर कर्म करत असतं पण आत्मा त्यापासून मुक्त असतो..
 
'जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म' तो खरा ज्ञानी.. असा हा ज्ञानी सर्व कामात मग्न असला तरी तो परमात्मापाशी स्थिरबुद्धी असतो.. तो मनावर नियंत्रण ठेवून बुद्धीनं कर्म करत असतो.. स्वामित्वच्या भावनेचा त्याग करून फक्त जीवनावश्यक गोष्टींसाठीच कर्म करतो.. त्यामुळं त्याच्याकडून पापकर्म घडत नाही.. 
असा हा कर्मयोगी कर्म करत असला तरी कर्मरहित असतो.. सत्व-रज-तम गुण असले तरी गुणातीत असतो.. प्राकृतिक गुणांपासून अनासक्त झाल्यानं आणि धर्म-कर्म बंधनातून बाहेर पडून ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाल्यानं त्याचं कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करतं..
हे दिव्यत्व प्राप्त कर्म म्हणजेच विकर्म-विशेष कर्म.. म्हणजेच अकर्माचं स्वरूप जाणणं किंवा आत्म्याचं स्वरूप जाणणं.. विकर्म हे कर्म नसून ज्ञान आहे.. असा ज्ञानी कर्म करून ही कर्मबद्ध असतो, उपभोग घेऊन ही भोगमुक्त असतो.. नित्य कर्म करून ही निष्कर्मी असतो.. ही कर्मातील विकर्माची भावना म्हणजे यज्ञ असं सांगून श्रीभगवान तिसऱ्या भागाकडं वळतात..  

यज्ञ हे एक निरपेक्ष कर्म आहे.. ही एक अध्यात्मिक भावना आहे.. ह्या यज्ञात हवी अर्पण करणारा (कर्मयोगी), हवी(आहुती-कर्म), हवन (अग्नी), यज्ञाचा अधिष्ठाता (परब्रह्म) आणि अंती प्राप्त होणारं फल सर्व काही परब्रह्ममध्ये एकरूप होतं.. थोडक्यात, 'सर्व खलू एवं ब्रह्म'- सर्व काही ब्रह्मच आहे अशी ही भावना.. 

प्रत्येक कर्म हे यज्ञवतच असतं.. ते अर्पण भावनेनंच केलं पाहिजे.. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या धर्म आणि कर्त्यव्यानुसार ते करत असतो.. काही देवदेवतांना विविधप्रकाराचे यज्ञ अर्पण करून त्यांची उपासना करतात तर काही परब्रह्म अग्निमध्ये स्वधर्मानं आत्म्याचं हवन करतात.. कोणी आत्मसंयमरूप अग्निमध्ये कायिक, वाचिक, मानसिक युक्ती मंत्रांनी इंद्रियरूप द्रव्याचं हवन करतात.. तर कोणी इंद्रियरूपी अग्नी ज्ञानानं पेटवून ह्या वैराग्यरूपी अग्नीत विषयसुखांची आहुती देतात.. आणि इतर काही मन आणि इंद्रियांच्या संयमानं आत्मसाक्षात्कारासाठी इंद्रियांच्या सर्व क्रिया/कर्म मनरूपी अग्नीत अर्पण करतात.. 
ह्या निरनिराळ्या यज्ञांच्या माध्यमातून आत्मसंयम आणि इंद्रियनियमन करून, कर्मबंधनातून मुक्त होऊन आत्मज्ञान प्राप्त करणं हे मूळ उद्दिष्ट..  

श्रीभगवान म्हणतात, काही जण कठोर व्रत-तपस्या करतात तर काही आपल्याकडील द्रव्याचा यज्ञ (दान) -द्रव्ययज्ञ- करतात.. काहीजण जीवनातील भौतिक सुखांचं हवन -तपोयज्ञ- करतात.. काहीजण अष्टांग योग -योगयज्ञ- पद्धतीचं आचरण करतात तर काही दिव्यज्ञानात प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन -ज्ञानयज्ञ- करून प्रबुद्ध होतात.. काही शब्दानं  शब्दांचं हवन- शास्त्रोक्त चर्चा -वाग्यज्ञ- करतात.. आणि जीवनातील उन्नतावस्थेचा शोध घेतात.. 
योग समृद्धीनं सुसंपन्न आपल्या प्राणाचं आत्माच्या ठिकाणी हवन करतात.. काही समाधिस्थ राहण्याकरता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात.. प्राणवायूचं  अपानवायूमध्ये आणि अपानवायूचं प्राणवायूमध्ये हवन करतात.. शेवटी संपूर्ण श्वासोच्छवास थांबवून असे 'प्राणायामपरायण योगी' समाधी अवस्थेत राहतात.. तर काही आहार नियमन करून प्राणवायूचंच प्राणवायूमध्ये हवन करतात.. अश्याप्रकारे यज्ञाचं प्रयोजन उत्तमरितीनं जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते मोक्ष प्राप्त करतात.. सनातन ब्रह्मस्थानाची प्राप्ती करतात.. ब्रह्मरूप होतात.. 
 
हे विविध कर्मातून निर्माण झालेले वेदसंमत यज्ञ शरीर, मन किंवा बुद्धीद्वारे करता येतात.. ज्ञानाशिवाय यज्ञ म्हणजे केवळ भौतिक कर्मच.. यज्ञामागची श्रद्धा, उद्देश फक्त द्रव्यसंचय, प्रतिष्ठा, भौतिक सुख मिळवणं असेल तर ते नक्कीच कर्मबद्ध करतात.. पण जेव्हा हे यज्ञ दिव्य ज्ञानाच्या उन्नतभावनेनं केले जातात तेव्हा ह्या यज्ञकर्मांना अध्यात्मिक स्वरूप प्राप्त होतं.. यज्ञाच्या कर्मकांडापेक्षा ज्या यज्ञाचं फलित ज्ञानप्राप्तीत होतं तोच श्रेष्ठ यज्ञ होय.. 
सर्व कर्मयज्ञांचं पर्यवसन दिव्य ज्ञानात 'अहं ब्रह्मासि' - ब्रह्म म्हणजेच मी, मी म्हणजेच ब्रह्म - अश्या अद्वैतात होते. हा आत्मसाक्षात्काराचा मार्ग निःसंशय कठीण आहे पण आत्मसाक्षात्कारी, अध्यात्मिक गुरुंकडं जाऊन हे तत्त्व जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.. जिज्ञासा, नम्रता, सेवाभाव, समर्पण हेच अध्यात्मिक प्रगतीचं रहस्य आहे..    ज्ञानाच्या प्रकाशानं मिथ्या अहंकार, मोहरूपी अंधार नाहीसा झाला कि सर्व प्राणीमात्रात परमात्माचा अंश दिसेल.. सर्व रूपात निरंतर तो परमेश्वर परमात्मा दिसेल.. 

ज्ञानयज्ञ म्हणजे काय सांगून झाल्यावर, श्रीभगवान ज्ञानयज्ञाची महिती सांगून अध्यायाची सांगता करतात..  
कितीही पापी असला तरी ज्ञानामध्ये त्याला सुधारण्याचं प्रचंड सामर्थ्य आहे.. ज्याप्रमाणं प्रज्वलित अग्नी सरपण भस्मसात करतो त्याचप्रमाणं ज्ञानाग्नी सर्व प्राकृत कर्मबंधनं भस्मसात करतो.. केवळ पापकर्मांचीच नाहीत तर पुण्यकर्मांची संचित आणि क्रियमाण फलं, बंधनं सुद्धा भस्मसात होतात.. ज्ञानासारखं पवित्र, विशुद्ध आणि उदात्त असं दुसरं काहीही नाही.. असं ज्ञान म्हणजे सर्वसिद्धीचं परिपक्व फळ आहे.. जो भक्तिमार्गाचं आचरण करतो त्याला आत्मज्ञानाची अवीट गोडी लागते.. आत्मसुखाच्या गोडीनं तो इंद्रियं आणि विषयसुखांवर नियंत्रण करू शकतो.. श्रद्धेच्या भावनेनं आत्म्यापाशी बुद्धी स्थिर ठेवून आत्मज्ञान मिळवू शकतो..  

स्वार्थानं अधर्माची बाजू घेणं जितकं अयोग्य आहे तितकंच केवळ युद्धोत्तर प्रतिष्ठेसाठी धर्माच्या बाजूनं युद्ध करणं ही.. कारण ह्यात असणारी कर्मफलांची आसक्ती.. ह्या आसक्ती पासून संन्यास घेऊन म्हणजेच अनासक्त होऊन कर्म कर असा उपदेश भगवान अर्जुनाला करतात.. श्रीभगवान म्हणतात, "अज्ञानामुळं तुझ्या मनात जे संशय निर्माण झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्रानं छाटून टाक आणि कर्मयोगाचं अवलंबन कर आणि युद्ध कर.."

ऐक परंतपा, दिव्य रहस्य असे जे अविनाशी योगाचे 

सांगतो तुज पुरातन विज्ञान जाणून नाते भक्त सख्याचे.. 

दिला हा दिव्य उपदेश, प्रथम मान सूर्यदेव विवत्सनाचा 

जाणिला हा योग मनू-राजर्षीने स्रोत गुरुशिष्य परंपरेचा ।।१।।


होऊ नको अचंबित, जाणून प्रथमश्रोता अलौकिक योगाचा

जन्म जन्मुनी आलो आपण, पण तुज विसर साऱ्या जन्मांचा..   

अजन्मा असुन ही जन्मतो मी, करण्या पुनर्स्थापना धर्माची 

विनाश करण्या अधर्माचा, अवतरतो पुनःपुनः, माया ही योगमायेची ।।२।। 


जाणतो जो हे स्वरूप माझे, न परत जन्मे भौतिक जगतात 

अनासक्ती संपर्पणभावे करी जो कर्म, विलीन शाश्वत रूपात..  

भौतिक शक्तींनी युक्त असा जीव, देवता म्हणती त्यास

जशी ज्याची आराधना तसे त्याचे फल, तत्वर मिळे हमखास ।।३।।  


सकाम कर्मे करी उपासना ठेवून इच्छा मनी

चातुर्वर्ण्य कर्मे असती विभागे प्रकृती त्रिगुणी 

सत्वगुणी असे ब्राह्मण तर रजोगुणी क्षत्रिय 

रजो-तमोगुण स्थित वैश्य तर शूद्र तमोगुणाय ।।४।।


कर निरपेक्ष कर्म जाणून कर्म-अकर्म-विकर्म भेद 

जाणता हे कर्म स्वरूप होशील कर्मबंधने अलिप्त

'कर्मात अकर्म अन अकर्मात कर्म' नसे वेगळा भेद 

जाणता हे ज्ञान घडे विकर्म होऊन दिव्यत्व प्राप्त ।।५।। 


अर्पिता निरपेक्ष कर्मे अन कर्तव्ये, होतील ती यज्ञवत तू जाण

होता कर्मयोगी, असे समिधा कर्म अन अधिष्ठाता परब्रह्म 

करता आत्मसंयम सेवाभाव समर्पण, होईल प्राप्त तुज आत्मज्ञान

होता ज्ञाने दूर अहंकार अन मोह, जाणसी सर्व काही आहे स्वरूप ब्रह्म ।।६।।


जाणूनी हा 'ज्ञानकर्मसंन्यासयोग' प्रभुमुखातून

होऊ सनातनी आत्मज्ञानी विशुद्ध अध्यात्मिक कर्मातून  

योगयुक्त तू, टाक छाटून, संशय-अज्ञान, ज्ञानरूपीशस्त्राने    

होतील भस्मसात पाप-पुण्य, संचित अन क्रियमान कर्मबंधने।।७।।


हरी ॐ तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

********************  




-मी मधुरा.. 

************************************************

Wednesday, April 9, 2025

अध्याय १ 'अर्जुनविषादयोग'

ॐ

श्रीपरमात्माने नमः 
अध्याय १ 'अर्जुनविषादयोग'



अध्यायाची सुरुवात होते महाराज धृतराष्ट्राच्या प्रश्नानं.. कुरुक्षेत्रावर होणाऱ्या युद्धाच्या उत्सुकतेपोटी महाराज संजयला प्रश्न विचारतात.. संजय- महाराज धृतराष्ट्राचा सारथी- ज्याला वेदव्यासांकडून दिव्यदृष्टीचं वरदान मिळलं आहे.. ह्या दिव्यशक्तीचा उपयोग संजय फक्त आणि फक्त युद्धभूमी कुरुक्षेत्रावर काय घडतं हे सांगण्यासाठीच करणार आहे.. 

४७ श्लोक संख्या असलेला हा अध्याय दोन भागात विभागलेला आहे.. पहिल्या भागात संजयच्या तोंडी युद्धभूमीचं वर्णन, कौरव-पांडव दोन्ही पक्षातील शूरवीरांची नावं, शंखध्वनी, दुर्योधन-अर्जुन यांनी केलेलं सैन्याचं निरीक्षण तर दुसऱ्या भागात फक्त अर्जुनविषाद.. दोन्ही बाजूचं अफाट सैन्य पाहून, युध्दामुळं होणाऱ्या भयानक संहाराची कल्पना आल्यावर, अर्जुनाच्या मनातील भावकल्लोळ म्हणजेच अर्जुनविषाद.. अशी ह्या अध्यायाची थोडक्यात मांडणी..

तर महाराज धृतराष्ट्र संजयला विचारतात,
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥१।। 
युद्धाला उत्सुक असणारी माझी आणि पांडूची मुलं धर्मक्षेत्र (सरस्वती यमुना संगम क्षेत्र) असणाऱ्या कुरुक्षेत्रावर काय करत आहेत? 
जन्मांध असलेला धृतराष्ट्र, दुर्दैवानं पुत्रप्रेमानं ही आंधळा झाला असला तरी बुद्धीनं, मनानं आंधळा नक्कीच नाही.. त्याला पूर्णपणे माहिती आहे की दुर्योधन अधर्मी आहे.. आणि शेवटी धर्माचाच विजय होणार आहे.. तरीही पुत्रहट्टापोटी 'शांती' ऐवजी 'युद्धा'चा निर्णय घेतल्यानं ह्या धर्मयुद्धाबद्दलची थोडी भीती, थोडी उत्सुकता, थोडी विवशता त्यांच्या वागण्यातून जाणवते.. म्हणूनच महाराज धृतराष्ट्र संजयला, दुर्योधन आणि पांडव काय करत आहेत? अशी हेतुपूर्वक विचारणा करतात.. 

विषण्ण आणि उद्विग्न झालेल्या आपल्या महाराजांना संजय सांगतो, "पांडवांच्या सैन्याची पाहणी करून, युवराज दुर्योधन, गुरुवर्य द्रोणाचार्यांकडं युद्धभूमीवरील परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेले आहेत.. आज पहिल्या दिवशी पांडवांनी, द्रुपदकुमार 'द्रुष्टद्युम्न'च्या नेतृत्वाखाली युद्धाची व्युहरचना केली आहे..".. युद्धात व्युहरचनेला खूप महत्व आहे. व्युहरचना म्हणजे सैन्याची अशी रचना की ज्यात शत्रूला घुसणं असंभव आणि घुसता आलंच तर बाहेर पडणं केवळ अशक्य! 

पुढं संजय सांगतो, "युवराज दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांना सांगत आहेत की पांडवांच्या सैन्यात भीमार्जुनासारखेच पराक्रमी आणि महान शूरवीर, *युयुधान, *विराट आणि *द्रुपद ह्यासारखे महारथी आणि *चेतिकान, *धृष्टकेतू, *काशीराज असे पराक्रमी राजे आहेत.. तसेच सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू आणि पाच *द्रौपदीपुत्र जे पराक्रमी आहेत".. 

युद्धभूमीवर काय घडतं आहे हे सांगताना संजय म्हणतो...  

पांडवांच्या सैन्याचा आढावा घेऊन झाल्यावर, दुर्योधन त्याच्या सैन्यातील पराक्रमी, रथी, महारथींवर नजर टाकतो.. शत्रूपक्षाचं जसं परीक्षण केलं तसंच तटस्थपणे स्वतःच्या सैन्याचं परीक्षण करताना तो गुरु द्रोणाचार्यांना म्हणतो, "आपल्या सैन्यात तुम्ही स्वतः, पितामह भीष्म, कर्ण, सदाविजयी कृपाचार्य, अश्वथामा, *विकर्ण, *भूरिश्रवा असे युद्धात नेहमी विजयी होणारे महारथी आहेत.. तसेच ह्या सगळ्या शूरवीर, रथी-महारथी बरोबरच, माझ्यासाठी जीवाची पर्वा न करणारे अनेक राजे, महाराजे सैन्यात आहेत.. " असं म्हणून गर्वानं दुर्योधन आपल्या अवाढव्य सैन्येवर नजर टाकतो.. 

दुर्योधन दोन्ही पक्षाच्या शक्तीचा तुलनात्मक अंदाज घेत अहंकारानं म्हणतो की, कुरुसैन्याचं नेतृत्व पितामह भीष्म करत आहेत तर त्या पांडव सैन्याचं नेतृत्व भीम.. पितामह भीष्मांसारखा महानुभवी महायोद्धा रक्षक असल्यानं कौरवसैन्याची शक्ती अपरिमित आहे.. पितामहांच्या उपस्थितीत भीम नगण्यच असल्यानं पांडव सैन्याला अगदी सहज हरवू शकू.. जोवर पितामह भीष्म आहेत तोवर कुरुसैना अजय आहे.. त्यामुळं पितामहांच्या सुरक्षिततेची सूचना देत त्यांना पूर्ण सहाय्य करा असं सांगतो..

दुर्योधनाच्या वक्तव्यानं आनंदीत पितामहांनी सिंहगर्जनेसमान आपला शंख वाजवून युद्धाची घोषणा केली.. 
सर्वात जेष्ठ असणाऱ्या पितामहांनी कौरवांकडून युद्धघोषणा केल्यावर आता पांडवांकडून ही युद्धघोषणा झाली.. पांढऱ्या शुभ्र घोडांच्या रथावर असलेल्या श्रीकृष्णानं प्रथम आणि नंतर अर्जुनानं आपले अलौकिक शंख वाजवून उत्घोषणा केली.. श्रीकृष्णानं पांचजन्य, अर्जुनानं देवदत्त, भीमानं पौंड्र, युधिष्टीरानं अनंतविजय, आणि नकुल सहदेवानी सुघोष आणि मणिपुष्प नामक शंख वाजवले.. महाधनुर्धर काशीनरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद, द्रुपदीचे पुत्र, सुभद्रेचा महाबाहू पुत्र यांनी आपापले शंख वाजवले.. प्रत्येक शंखाचा वेगळा नाद, प्रत्येकाची उपस्थिती दाखवत होता..

नंतर इतर योद्ध्यांची शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या, रणशिंगे अशी रणवाद्य एकत्र वाजू लागली.. ह्या भयावह आवाजानं धरणी आकाश कंपायमान झालं.. पांडवपक्षाच्या बाजूनं करण्यांत आलेल्या शंखध्वनीमुळं धृतराष्ट्रपुत्रांची हृदयं विदीर्ण झाली..   

हनुमानाचं चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ अर्जुन धनुष्यबाण हाती घेऊन लढावयास सिद्ध होतो.. आणि युद्धासाठी सुसज्ज असलेली कुरुसैना पाहून, श्रीकृष्णाला त्यांचा रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध घेऊन जाण्यास सांगतो.. जेणेकरून तो संपूर्ण कुरुसैन्याचं निरीक्षण करू शकेल.. कोणाकोणाशी त्याला युद्ध करायचं आहे याचा अंदाज घेऊ शकेल.. दुर्बुद्धी दुर्योधनाच्या हट्टापायी सुरु झालेल्या युद्धात त्याला साथ देण्यासाठी आलेल्या शूरवीर, महारथींना तो पाहू शकेल.. 

अर्जुनाच्या सांगण्यानुसार श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा करतात.. कौरवांच्या सैन्यात पितामह भीष्म, सोमदत्त-भूरिश्रवा सारखे पितातुल्य व्यक्ती, द्रोणाचार्य-कृपाचार्य सारखे गुरु, शल्य-शकुनी सारखे मामा, दुर्योधन-विकर्ण सारखे भाऊ, लक्ष्मणा सारखे पुत्र, अश्वत्थामा सारखा मित्र, कृतवर्मा सारखे हितचिंतक आणि बाकी सगळे सगेसोयरे पाहून अर्जुन करुणेनं व्याकुळ होतो.. ह्या धर्मयुद्धात एक मोठ्ठा परिवार दुभागाला गेला होता.. काही आप्तस्वकीय एकीकडं तर उरलेले दुसरीकडं.. प्रत्येकाला निर्णय घ्यायचा होता.. कोणाकडून युद्ध करायचं?? काहींनी तो निर्णय स्वखुशीनं घेतला, तर काहींनी भीतीपोटी तर काहींनी इतर काही कारणास्तव.. पण हे सगळे ह्या युद्धात ओढले गेले होते.. हे सगेसोयरे, हितचिंतक, मित्रपरिवार काही त्याचे शत्रू नव्हते, मग ह्या सगळ्यांबरोबर युद्ध का करायचं? ह्या विचाराबरोबरच अर्जुनाचा विषाद सुरु होतो..

सगळ्या आप्तस्वकीयांना युद्धासाठी सज्ज पाहून अर्जुनाची गात्रं क्षीण झाली, तोंड कोरडं पडलं, शरीराला कंप सुटला आणि गांडीव धनुष्य हातातून गळून पडलं.. त्याच्या सर्वांगाचा दाह झाला, मन भरकटू लागलं आणि त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं.. 
हे युद्ध कशासाठी लढलं जातंय?... इतका संहार खरोखर अपरिहार्य आहे का?.. राज्य मिळवण्यासाठी आपल्याच बांधवांना मारणं हा धर्म आहे का?.. जर असेल तर अधर्म म्हणजे काय?.. हिंसा टाळणं धर्म कि अधर्म?.. नेमका कोणता धर्म पाळायचा?.. ह्या संहारानं राज्यसुख मिळेल पण बांधवांच्या मृत्यूचं दुःखही.. तर मग सुख-दुःख म्हणजे नक्की काय?.. संहार करणं हे पाप असेल तर मग हे धर्मयुद्ध कसं?... माझ्या हातून पाप होतंय हे कळतंय, ह्यामुळं माझ्या संपूर्ण कुळाचा नाश होणार हे दिसतंय मग मी हे युद्ध का करू?

.. आणि शेवटी "हे युद्ध करण्यापेक्षा, दुर्योधनाकडून असा मी निहत्ता असतानाच मारला गेलो तर मला जास्ती आनंद होईल.." असे म्हणून अर्जुन त्याच्या रथाच्या मागील बाजूस हताश होऊन बसतो...

हे हताश होणं अर्जुनाच्या दुर्बलतेमुळं लक्षण नाही तर त्याच्यातील सहृदयतेचं लक्षण आहे..  कितीही हताश झाला तरी त्याला त्याच्या सामर्थ्यावर विश्वास आहे.. त्यानं जर युद्ध केलं तर तो ते जिंकेलच हा आत्मविश्वास पण आहे.. पण त्या युद्धासाठी द्यावी लागणारी आप्तस्वकीयांची आहुती त्याला मान्य नाही आणि हाच त्याचा विषाद आहे.. आणि इथचं अध्यायाची सांगता होते.. 

तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं ह्या अध्यायात विशेष काहीच नाही.. युद्धभूमी आणि भयानं ग्रासलेल्या अर्जुनाचे प्रश्न इतकंच काय ते.. मग केवळ गीतेचा पहिला अध्याय म्हणून, भगवद् गीतेचं कथानक म्हणून हा महत्वाचा आहे का?.. तर नक्कीच नाही.. ह्या अध्यायात सातत्यानं अर्जुनाचा विलाप मांडला असल्यानं हा अध्याय एक रडगाणं आणि अर्जुन एक भावनिकमूर्ख असं वाटू शकतं.. पण दृष्टीकोन बदलला तर अर्जुनाचा विवेक दिसून येतो.. त्याच्याकडं असणारी योग्य-अयोग्य जाणण्याची बुद्धी, चांगल्या वाईट परिणामांचा पुरेसा विचार करण्यासाठी असणारा संयम दिसून येतो.. 

रथी-महारथी, योद्धे अपरिमित शक्ती आणि दिव्यास्त्रांनी सज्ज होते.. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्वार्थानं, सूडानं पेटलेला होता.. पण ह्या युध्दामुळं होणाऱ्या संहाराचं भान ह्यांतील किती जणांना होतं? फक्त एकटा अर्जुनच युद्धाची आणि संहाराची परिहार्यता पडताळून पहात होता.. तो दुबळा किंवा कमकुवत मनाचा आहे म्हणून नाही तर त्याला त्याच्या संहारक क्षमतेवर दृढ विश्वास होता म्हणून.. संहाराच्या विपरीत परिणामांची त्याला जाणीव होती म्हणून.. त्यामुळंच फक्त सर्वशक्तिशाली योद्धा म्हणूनच नव्हे तर परिपक्व, प्रगल्भ, विवेकी अर्जुन ह्या अध्यायात दिसून येतो..

केवळ आपला सखा केशव 'युद्ध कर' म्हणतो म्हणून त्यानं युद्ध केलं नाही.. कारण त्याला युद्धाच्या नैतिक उत्तरदायित्वाची जाणीव होती.. त्यामुळं प्रत्येक दृष्टिकोनातून समाधानकारक उत्तरं मिळाल्याशिवाय त्याला शस्त्र उचलायची भीती वाटत होती.. त्याच्या या विषादाच्या समाधानासाठी श्रीकृष्णासारख्या परमावताराला सुद्धा १७ अध्याय विस्तृतपणे मांडावे लागले.. ते केवळ अर्जुनासारखा जिज्ञासू, ज्ञानाचा उपासक होता म्हणूनच.. कारण जितकी जिज्ञासा मोठी तितका ज्ञानाचा आवाका ही!..
थोडक्यात, भगवद् गीता ही अर्जुनाच्या विषादाचं, जिज्ञासेचं फलित आहे..  

कुरुक्षेत्री धर्मयुद्ध होतसे

संजय सांगितो धृतराष्ट्रासी

आप्तेष्टा पाहूनी विषाद होई

अर्जुन टाकीतो धनुष्यासी ।।१।। 


हरी ॐ तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

********************  

    

*अध्यायांत उल्लेखलेले शूरवीर..
  • युयुधान : यादव सैन्यातील एक प्रमुख सेनापती व कृष्णाचा परम भक्त/सारथी (सात्यकी).. जो संपूर्ण युद्धकाळ (१८ दिवस) युद्धभूमीवर होता.. 
  • विराट : मत्स्य नरेश.. पांडव अज्ञातवासात तिथंच होते.. विराट कन्या उत्तराचा विवाह अर्जुन पुत्र अभिमन्यूशी झाला होता.. 
  • धृष्टकेतू : चेदी नरेश.. शिशुपालचा पुत्र.. १४ दिवशी द्रोणाचार्यांकडून मारला गेला..
  • चेकीतान : धृष्टकेतूचा पुत्र.. शेवटच्या दिवशी दुर्योधनाकडून मारला गेला.. 
  • पुरुजित : कुंतिभोजचा पुत्र, कुंतीचा भाऊ.. द्रोणाचार्यांकडून मारला गेला..
  • शैब्य : शिबी नरेश पुत्र.. कृष्ण भार्या मित्रविंद्या चं घराणं 
  • युधामन्यू आणि उत्तमौजा : पांचलातील वीरबंधू 
  • सौभद्र : सुभद्राचा पुत्र अभिमन्यू 
  • द्रौपदेय : द्रौपदी पुत्र.. प्रतिविंध्य, सुतसोमा, श्रुतकर्म, शतानिका, श्रुतसेन.. अश्वत्थामाकडून मारले गेले.. 
  • विकर्ण : १०० कौरवांतील एक.. 
  • सोमदत्ति : बहालीक नरेश सोमदत्ताचा पुत्र.. भूरिश्रवा 
  • अर्थातच द्रोणाचार्य, भीष्म, द्रुपद, भीम, अर्जुन, काशी नरेश, कुंतीभोज, कर्ण, अश्वत्थामा यांचा ही उल्लेख आहे..   



-मी मधुरा.. 

************************************************


Thursday, March 20, 2025

अध्याय ३ 'कर्मयोग'

ॐ

श्रीपरमात्माने नमः 
अध्याय ३ 'कर्मयोग'



दुसऱ्या अध्यायात भगवान अर्जुनाला 'कर्मफलाकडं समत्व दृष्टीनं बघ आणि युद्ध कर' असं सांगतात.. कर्म तर करावंच लागतं, पण कर्मामागील विचार (ज्ञान) हे कर्मापेक्षा श्रेष्ठ आहेत, तेव्हा निश्चयात्मक बुद्धी (ज्ञान) प्राप्त करून आत्मशांती मिळव असा उपदेश ही करतात.. हे ऐकल्यावर आपण ही मानवी जीवनाचं परमश्रेय, आत्मशांती प्राप्त करण्यासाठी ज्ञानयोगाचा अवलंब करावा असं कोणालाही वाटेल.. असं वाटणाऱ्या सर्व मानवांचा अर्जुन हा जणू प्रतिनिधीच आहे.. 'ज्ञानप्राप्ती हीच जर सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे, तर कर्माची आवश्यक्ता काय?' ह्या अर्जुनाच्या प्रश्नानं 'कर्मयोग' ह्या अध्यायाची सुरुवात होते.. सर्वप्रथम, कर्म हे आवश्यक आणि अपरिहार्य का आहे हे सांगितलं आहे.. कर्मामागची यज्ञभावना आणि कर्मक्षेत्रातील देवता, समाज आणि प्रकृती (सृष्टी) यांच्याशी जोडणारा कर्मयज्ञ कसा असावा, ज्ञानी व्यक्तींचं लोक कल्याणार्थ कर्तव्य कसं असावं, कर्मसमर्पण म्हणजे काय?, माणसाच्या अंतःकरणातील ज्ञानविरोधी प्रवृत्ती कश्या असतात, त्यावर उपाय काय?..  हे ह्या अध्यायांत सांगितलं आहे.. 'बुद्धीनं तत्वस्पर्शी व्हायला हवं' हे सांगून अध्यायाची सांगता होते.. 

'ज्ञानात एव तु कैवल्यम्' - कैवल्य म्हणजे परमात्म्याशी एकरूप अवस्था- म्हणजेच ज्ञान प्राप्त केल्याने मोक्ष मिळतो.. ज्ञानमार्गाचा अवलंब केला तर युद्ध कर्म करावं  लागणार नाही.. पितामह, गुरु द्रोण, आप्तस्वकिय ह्यांच्याशी लढावं लागणार नसेल तर कर्मापेक्षा ज्ञानमार्ग बरा.. असा विचार अर्जुन करतो.. पण लगेचच भगवान त्याला त्याच्या कर्माची आठवण करून देतात.. एकीकडं ते त्याला 'आत्मवान हो', 'ज्ञानाचा अधिकारी हो' असं सांगतात तर दुसरीकडं 'कर्मण्येवाधिकारस्ते' - 'कर्मणि एव अधिकार: ते'- म्हणजेच 'कर्माचा अधिकारी हो' असं ही सांगतात.. ह्या बोलण्यानं गोंधळून गेलेल्या अर्जुनाच्या परखड प्रश्नानं अध्यायाची सुरुवात होते.. "हे जनार्दना, तुम्ही मला युद्ध करणं हे माझं कर्तव्य आहे असं सांगितलंत पण नंतर कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानामुळं मन:शांती मिळते असंही म्हणालात.. त्यामुळे मी आता पुरता गोंधळून गेलो आहे.. तेव्हा तुम्ही मला निश्चितपणे सांगा कि ज्ञान श्रेष्ठ आहे तर त्यामार्गे न जाता युद्धासारखं घोर कर्म मी का करू?.."

अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान म्हणतात, "अरे अर्जुना, *आत्मसाक्षात्काराचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी मी यापूर्वीच दोन मार्ग सांगितले आहेत.. ज्ञानयोगेन संख्यानाम्, कर्मयोगेन योगिनाम्.. म्हणजेच, एक ज्ञानाचा आणि दुसरा कर्माचा!..  ज्ञानाचा मार्ग हा तत्त्वज्ञानी, ज्ञानी लोकांसाठी आहे तर कर्माचा मार्ग हा बाकी साधकांसाठी.." हे दोन्ही मार्ग एकाच ध्येयाप्रत म्हणजेच परमात्म्याला जाऊन मिळतात.. कोणत्या मार्गानं जायचं ते साधकाच्या जीवनशैलीवर, त्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे.. 
ज्ञानयोगी बुद्धीनं, तत्वज्ञानानं इंद्रियनिग्रह करून *परमसत्याचा शोध घेतात तर कर्मयोगी आपल्या सकाम कर्मातून, समर्पणातून परमतत्वाच्या जवळ जातात.. 
अर्जुनाची जीवनशैली कर्मयोगीची आहे.. क्षत्रिय असल्यानं युद्ध करणं हे त्याचं कर्म आहे.. पण केवळ आप्तेष्ठांशी युद्ध करायला लागू नये म्हणून तो ज्ञानमार्गाचा, तत्वज्ञानी होण्याचा विचार करतो आहे.. गोधळलेल्या अर्जुनाला माऊली म्हणतात, "देखे उत्प्लवनासरिसा। पक्षी फळाशी झोंबे जैसा। सांग नरु केवि तैसा। पावे वेगा?।।".. म्हणजेच, पक्ष्यासारखं एका झेपेत झाडावरच्या फळापर्यंत पोचणं आपल्याला शक्य आहे का?.. हळूहळू फांदीवरून जात जात आपल्याला फळापर्यंत पोचावं लागतं.. पण ह्या पक्षाप्रमाणंच उंच भरारी घेऊन ज्ञानमार्गानं परमात्म्यापर्यंत पोचायची अपेक्षा अर्जुन करतो आहे.. उंच उडण्यापूर्वी पक्षाच्या ही पंखात बळ येणं आवश्यक असतं.. त्याला एकाच विशिष्ट दिशेनं सातत्यानं उडण्याचा सराव करावा लागतो.. पंखाचा योग्य वापर करण्याचं कर्म सातत्यानं केलं तर उंचीवर पोचायची क्षमता विकसित होते.. ही क्षमता विकसित करणं म्हणजेच कर्मयोग.. पंख सक्षम झाल्यावर, त्यात उडण्याची ताकद आल्यावर, भरारी मारून परमात्म्यापर्यंत पोचणं म्हणजे ज्ञानयोग..

केवळ कर्म केल्यानं कर्मयोगी होत नाही किंवा कर्म सन्यास घेतल्यानं सिद्धयोगी.. प्रत्येक देहधारी जीव हा क्षणभरही कर्म केल्यावाचून राहू शकत नाही.. कर्म करणं का प्रकृतीचा स्वाभाविक धर्म आहे.. शरीराच्या किमान गरजा भागविण्याइतकं तरी कर्म करणं आलंच.. अगदी नैष्कर्म स्थितीला पोचलेला ज्ञानयोगी, ध्यानाला जरी बसला असला तरी त्याचा श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण इत्यादी कार्य चालूच असतं.. कारण प्रकृति गुणांपासून उत्पन्न झालेल्या देहाचे व्यवहार चालूच असतात.. यावरून हे निश्चित की कर्म माणसाला सुटत नाही.. कर्माचा त्याग करून, विषयसुखांचा नाश करून जे कर्मातीत होऊ इच्छितात त्यांना भगवान दांभिक, दुराचारी म्हणतात कारण त्यांच्यात वासना जागृत असते, ते विषयासक्त असतात.. परंतु मनानं इंद्रियांचं नियमन करून, आसक्ती न ठेवता कर्मयोगाचं आचरण करतो तो खरा कर्मयोगी.. असा कर्मयोगी कर्मबंधनातून मुक्त असतो..  

प्रत्येक कर्म हे मनांतून निर्माण झालेल्या इच्छेमुळं घडतं, तेव्हा अनावश्यक गोष्टीं विषयीचे आकर्षण वाटणारे विचार मनांतून काढून टाकणं हे उत्तम.. मनाला व इंद्रियांना ताब्यात ठेवून स्वधर्माप्रमाणं आचरण करणं हाच 'अखंड यज्ञ'-'नित्य यज्ञ'.. आणि जो हा यज्ञ करतो तो कोणत्याही बंधनात अडकत नाही कारण तो ध्येयानं, कर्मानं  प्रेरित झालेला असतो.. यज्ञ म्हणजे समाजाच्या भल्यासाठी केलेलं निस्सीम काम, ज्यामुळं समाज एकत्र जोडला जाईल.. शिवरायानं पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न असो वा लोकमान्य, सावरकर, गांधीजी यांनी दिलेला स्वातंत्र्याचा लढा, हा सुद्धा एक यज्ञच!.. स्वातंत्र्यासाठी, सुराज्यासाठी केलेला यज्ञ.. देशाला गुलामगिरीतून मुक्त करणं ह्या ध्येयानं प्रेरित असा यज्ञ.. स्वातंत्र्य मिळवणं हाच धर्म आणि कर्म सुद्धा.. 
जेव्हा ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली तेव्हा सृष्टी बरोबरच त्यातील जीव-सजीवांचं धर्म आणि कर्म ही निश्चित केलं आणि धर्माचरण केलं असता जीवनाचं उद्दिष्ट पूर्ण होईल असं ही सांगितलं.. जीवन उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी उपासतापास, व्रतवैकल्यं, तीर्थयात्रा, अनुष्ठानं असं करण्याची काहीच गरज नसते.. 'स्वधर्माचं निष्काम बुद्धीनं केलेलं आचरण'- हाच खरा जीवनमंत्र होय.. 

'इदम् न मम'-हे माझं नाही- ह्या भावनेनं केलेलं विहित कर्म, नि:स्वार्थ भावनेनं समाज कल्याणासाठी केलेलं काम परमात्म्याला अर्पून निश्चिन्त राहावं.. एकनिष्ठेनं स्वधर्माचं आचरण केलं असता विषयासक्ती राहत नाही.. कर्म न करता त्याच्या फळाची अपेक्षा करणं किंवा दुसऱ्याच्या कामात स्वतःचा स्वार्थ पाहणं हे चोरी केल्यासारखंच.. विहित कर्माचं निष्काम बुद्धीनं आचरण करून मिळालेल्या संपत्तीचा योग्य विनियोग केला पाहिजे.. सर्व संपत्ती स्वतःकडं ठेवणं ही सुद्धा बेइमानीच.. म्हणजेच स्वधर्मानं  संपादन केलेलं द्रव्य, संपत्ती स्वधर्मानं खर्चावी आणि बाकी राहील त्याचा आनंदानं उपभोग घ्यावा.. स्वधर्मनं खर्च करणं म्हणजे समाजातील इतर घटकांचा, परस्परांचा उद्धार करण्यासाठी खर्च करणं.. अश्यासाठी मिळवलेली संपत्ती विषयसुखात अडकवत नाही.. जे शरीरास आत्मा मानतात, विषयसुखाशिवाय दुसरं काही जाणत नाहीत त्यांनी केलेलं यज्ञकर्म हे नुसतं थोथांड असतं.. समाजाला दाखवण्यासाठी, समाजात आपली पत ठेवण्यासाठी केलेलं एक काम..
 
अन्नाला आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे.. अन्नामुळंच आपला देह पोसला जातो आणि ह्या देहाच्याच मदतीनं आपण धर्म आणि कर्म करू शकतो.. अन्नाचं महत्व सांगताना भगवान म्हणतात, "अन्नापासून प्राणीमात्राची उत्पत्ती होते आणि पर्जन्यापासून अन्नाची.. पर्जन्याची उत्पत्ती यज्ञापासून तर यज्ञाची कर्मापासून.. कर्माची उत्पत्ती वेदांपासून तर वेदाची अविनाशी ब्रह्मापासून.. म्हणूनच हे सारं विश्व ब्रह्मापासून उत्पन्न झालं आहे.. आणि सर्वव्यापी ब्रह्मतत्त्व ज्ञानकर्मात स्थित आहे.."
जो सृष्टीचक्राचं पालन करत नाही, ह्या स्वधर्मरूप यज्ञाचं आचरण करत नाही त्याचं जगणं व्यर्थच.. इंद्रियलंपट होऊन तो आयुष्य वाया घालवतो.. परंतू जो आत्म्याठायी स्थिरबुद्धी आहे, आत्मसुखानं तृप्त झाला आहे, आत्मानंदानं संतुष्ट आहे त्याला काहीच कर्तव्य उरत नाही.. इच्छा, आकांक्षा, वासना, कमी झाल्यानं त्यांच्या गरजा ही कमी असतात आणि गरजा कमी म्हणून कर्म ही कमी!.. समाजातले अधिकतर लोक हे कर्माचरण करीत सर्वसामान्य जीवन जगणारे असतात.. त्यांच्या मनांत सतत उठत असणाऱ्या वृत्ती, इच्छा, वासना यांची पूर्ती करण्यासाठी ते अविरत कार्यमग्न असतात.. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत कर्तव्यं, कर्म ह्यांचं आचरण करावं लागतं.. थोडक्यात, कर्मफलाची आसक्ती न ठेवता केवळ कर्तव्य म्हणून कर्म केल्यानं जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाप्रत पोचू शकतो..

"म्हंणूनच निष्काम बुद्धीनं आचरण करून समाजासमोर एक आदर्श ठेव.. ह्या जगात खरोखर ज्यांनी स्वधर्माचं निष्काम बुद्धीनं आचरण केलं ते मोक्षपदास गेले. त्यामुळं कर्माच्या ठिकाणी आस्था हवी.. तुझ्यासारखंच कर्माचं निष्ठेनं आचरण त्यांनी केल्यास त्यांची ही दुःखं कमी होतील कारण श्रेष्ठ आणि ज्ञानी लोकांचं समाज अनुकरण करतच असतो." असा उपदेश भगवान करतात..
म्हणजेच श्रेष्ठ पुरुष जे कर्म करतात त्याचंच अनुकरण इतर लोक करतात.. ते जे प्रमाण ठरवतात, तेच प्रमाण ग्राह्य धरतात.. आणि त्यातून निर्माण होतो तो धर्म.. मग तो गांधीजींनी केलेला मिठाचा सत्याग्रह असो वा गरजेपुरते कपडे परिधान करणं असो, सूतकताई असो वा स्वदेशी मालाचा वापर असो.. वेळोवेळी जनसमुदायानं  त्यांचं अनुकरण केलं.. हळूहळू अश्या आचरणाचा धर्म बनला आणि नाव मिळालं गांधीगिरी.. इतकंच काय तर त्रैलोक्याचा स्वामी असणाऱ्या भगवानांना सुद्धा कर्म चुकलं नाही.. लहानपणी गवळ्याचं पोर बनून गायी चरायला नेल्या तर द्वारकाधिश असताना सुद्धा अर्जुनाचा सारथी बनून घोड्यांचा खराडा ही तितक्याच निष्काम बुद्धीनं केला.. परिस्थितीमुळं मिळालेलं कोणतेही कर्म धर्मरूपच असतं आणि ते केलं पाहिजे हा तो आदर्श.. 
म्हणून जो समर्थ आहे, सर्वज्ञान संपन्न आहे, त्यानं कर्माचा त्याग कधीही करू नये.. कर्मफलांची अपेक्षा न करता, लोकसमुदायासाठी कर्म करत राहावं.. निष्काम बुद्धीचं आचरण करून इतरांना कर्म करण्यासाठी सतत प्रेरित करावं..

प्रकृते: क्रियमाणानि, गुणै: कर्माणि सर्वश:।... म्हणजेच सर्व कर्मं प्रकृतीच्या गुणांनी होतात.. प्रकृती ही एक शक्ती आहे जिच्यामुळं ह्या विश्वाचं रहाटगाडगं सुरु आहे.. परंतु सामान्य माणूस, जो देहबुद्धी आहे - 'मी देह आहे' असं म्हणणारा आहे - तो अहंकारापोटी 'कर्म मी केलं' असं म्हणत असतो.. हा विकार ज्ञानी म्हणजे जे आत्मबुद्धी आहेत - 'मी आत्मा आहे' असं म्हणणारा- ठिकाणी मुळीच नसतो.. हे ज्ञानी देहाभिमान सोडून, आत्मबुद्धी होऊन, देहात फक्त *साक्षित्वानं वागतात.. देहाचा उपयोग फक्त कर्म करण्यासाठी करतात..  
प्रत्येक माणूस हा स्वतःच्या प्रकृती गुणांप्रमाणं वागत असतो.. सात्विक, राजस आणि तामसी अश्या तीन प्रकृती गुणांमध्ये त्याचं वर्तन म्हणजेच कर्मं दिसून येतात.. जसं तामसी आळशी निद्राप्रिय असतो.. सुस्ती, जडत्व, मोह ह्यात गुरफटलेला असतो तर राजसी धडपड्या, लढाऊ वृत्तीचा पण मोह आणि इच्छा ह्यात अडकलेला असतो.. सात्विक गुण असलेला ज्ञानी, शांतीप्रिय, निस्वार्थ प्रेम करणारा, भक्तीच्या मार्गावर चालणारा असतो.. सामान्य माणूस व्यवहारानुसार कधी तामसी तर कधी राजस ह्या गुणांमध्ये वर्तन करताना दिसतो.. ज्ञानी लोकांना प्रकृतीच्या ह्या गुणांची, त्याच्या शक्तीची जाणीव असते.. थोडक्यात, प्रकृतीच्या अधीन होऊन जो वागतो तो गुणांच्या मोहमायेत अडकवून राहतो.. त्यामुळं 'कर्मफलाची अपेक्षा न करता माझ्याठायी तुझी सर्व कर्मं अर्पण कर, स्वामित्व सोडून वीरवृत्तीचा स्वीकार कर आणि युद्ध कर' असा उपदेश भगवान अर्जुनाला करतात..

त्रिगुणांच्या मोहमायेत न अडकता, कर्मफलांची अपेक्षा न करता श्रद्धापूर्वक, आदरानं परमात्मयाठायी जे आपली कर्मं अर्पण करतात ते कर्मबंधनातून मुक्त होतात.. पण ज्ञानानं उन्मत्त होऊन जे कर्म करतात ते कपाळ करंटेच.. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावाला, प्रकृती गुणाला अनुसरूनच वागत असतो.. विषयसुखाच्या आसक्तीनं तो सुद्धा वासनांच्या, इच्छांच्या मोहापश्यात भरकटू शकतो.. 
पंचतत्वात विलीन होणारं शरीर फक्त 'आत्मविकास' करण्याचं, 'आत्मशांती' मिळवण्याचं माध्यम आहे इतकंच.. मग परिश्रम करून, पुष्कळ संपत्ती मिळवून, प्रसंगी स्वधर्माचा त्याग करून केवळ देहाचं पोषण का करायचं? जर शरीर हे पराधीन, गुणहीन आहे तर मग विषयसुखांसाठी इतकी खटपट का करायची?.. चित्ताला मिळणाऱ्या क्षणिक समाधानासाठी?.. ही कामवासना सुरुवातीला सुखावह असली तरी परिणामी तीच दुःखाचं कारण होते.. 
इंद्रियांमध्ये प्रत्येक प्रकारचा भाव लपलेला असतो, मग तो चांगला असो वा वाईट.. आपण ह्या गुणांच्या मोहपाशात आपसूकच अडकून कर्तव्यापासून भरकटत जातो.. म्हणूनच इंद्रियं आणि विषयसुख हे आत्मसाक्षात्काराच्या मार्गातले शत्रू आहेत.. 
आपला धर्म, आपलं कर्म(काम) आचरणास जरी कठीण असलं तरी त्याचंच आचरण करावं.. दुसऱ्याचं कर्म(काम) कितीही चांगलं, सोपं असलं तरी स्वधर्म, स्वकर्म सोडू नये.. स्वधर्म आचरण करताना मरण जरी आलं तरी ते कल्याणकारीच असेल, परमात्माकडं नेणारं असेल.. 
हे सगळं जाणणारा ज्ञानी सुद्धा मग अधर्मानं का वागतो? सर्वज्ञ असून सुद्धा परधर्म का आचारतो? असं काय आहे कि जे त्याला प्रेरित, उद्युक्त करतं? हे जाणण्यास उत्सुक अर्जुन विचारतो, "अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुष:।.. म्हणजे कोणत्या प्रेरणेनं मनुष्य पापाचरण करतो?".. 

भगवान म्हणतात, जेव्हा एखादा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा रजोगुणांच्या संगामुळं कामविकार उत्पन्न होतात.. जेव्हा कामाची तृप्ती होत नाही तेव्हा क्रोध निर्माण होतो.. क्रोधातून मोह.. आणि मोहामुळं भौतिक अस्तित्वासाठी धडपड सुरूच राहते.. यांचा अतिरेक झाला की ह्यातून अविद्या, अज्ञान म्हणजेच तमोगुण निर्माण होतात.. काम क्रोधाचा पडदा ज्ञानचक्षूवर आल्यानं ज्ञानी पण अज्ञानी बनून पाप करण्यास प्रवृत्त होतात.. जसा धुरामुळं अग्नी, धुळीमुळं आरसा झाकला जातो तसंच काम क्रोधामुळं शुद्ध ज्ञान झाकलं जातं.. चांगल्या वाईटाचा विचार करण्याची सारासार शक्ती नाहीशी होते आणि ज्ञानी सुद्धा अविद्येनं प्रेरित होऊन पाप करतो..  
विषयसुखांनी कोणीच तृप्त होत नाही.. श्रीमंतांना अजुनी श्रीमंत व्हायचं असतं, खाणाऱ्याला अजुनी चवीनं खायचं असतं.. ह्या कामविकारांना, इंद्रियसुखांच्या आसक्तीला भगवान 'अग्नी'ची उपमा देतात.. जसं इंधनांच्या निरंतर पुरवठ्यानं अग्नी विझला जात नाही तसंच ह्या विषयसुखांचं आहे, अमर्यादित इंद्रियतृप्ती केली तरी 'काम' तृप्त होऊ शकत नाही.. त्यांचा कोठेच अंत नाही.. ह्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर 'विषयासक्ती सोडून देऊन आत्म्याच्या ठिकाणी स्थिरबुद्धी होणं' हे होय.. 

थोडक्यात, इंद्रियं मन आणि बुद्धी हे विषयसुखांचं वास्तव्य स्थान आहेत.. इंद्रियांच्या मदतीनं बुद्धीवर, ज्ञानावर पडदा टाकून विषयसुखं मनाला वश करतात.. काही चांगलं पाहिलं तर त्याची लालसा निर्माण होते आणि नाही मिळालं तर त्यातून क्रोध,मत्सर उत्पन्न होतात आणि हाच क्रोध, मत्सर बुद्धीवर नियंत्रण करायला लागतो.. आणि विशुद्ध जीवाला भौतिक जगतात गुरफटून राहण्यास प्रेरित करतो.. 
"म्हणून हे अर्जुना, विषयसुखांची आसक्ती सोडून देऊन, इंद्रियांवर नियंत्रण ठेवून काम, क्रोध यांना मारून टाक.. देहापेक्षा इंद्रियं श्रेष्ठ आणि इंद्रियांपेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षा परमात्मा हे तू जाण.. म्हणून हे महाबाहो, बुद्धीच्या पलीकडं  असणाऱ्या परमात्म्याला जाणून स्थिरबुद्धीनं ह्या कामरूपी शत्रूस जिंक.." असा उपदेश करून भगवान ह्या अध्यायाची सांगता करतात..


कर्मफलाशा सोडुनी पार्था आचर तू युद्धधर्म 

मिळवण्या आत्मशांती कर्माहून श्रेष्ठ ज्ञान तू जाण

ऐकून हा ज्ञानयोग उपदेश पुसता झाला अर्जुन 

असे सर्वश्रेष्ठ ज्ञान तर का करावे मी युध्दकर्म? ।।१।।


ऐक *अनघा परत सांगतो उत्तरले भगवान 

दोन मार्गी प्रयत्न करतो घडण्या *आत्मसाक्षात्कार

तत्वज्ञानी चालतो ज्ञानमार्ग तर योगी साधक कर्ममार्ग 

ज्ञानमार्ग वा कर्ममार्ग ध्येय एकच मिळवणे परमधाम ।।२।।


कर्म करणे असे हा प्रकृती स्वभाव धर्म 

न होतसे कर्मयोगी केवळ करता विहित कर्म

घेऊनी कर्मसंन्यास न कोणी होतसे सिद्धयोगी 

अनासक्ती इंद्रियनियम आचारे तो खरा कर्मयोगी ।।३।।


आत्म्याठायी स्थिरबुद्धी ज्याची पावे आत्मसुखाची तृप्ती 

आत्मानंदी निष्कामबुद्धी असा ज्ञानी मिळावे मोक्षप्राप्ती

कर्माठायी ठेवून आस्था कर जनलोका प्रेरित कर्म 

आचरण करून स्वधर्माचं लोककल्याणा हो आदर्श ।।४।।


ठेव साक्षीभाव हो आत्मबुद्धी सोडून देहाभिमान 

कर्म तू न करशी करे प्रकृती गुण माया हे जाण

सोड स्वामित्व अर्पून कर्मे मंत्र हा अनासक्तीचा              

हो तयार युद्धासी करून स्वीकार वीरवृत्तीचा ।।५।।


इंद्रिय-मन-बुद्धी विषयसुखांचे वास्तव्य स्थान 

रजोगुण संगे जीव येता उत्पन्न कामविकार

अतुप्त कामविकारे निर्माण क्रोध-मोह-अज्ञान

तमोगुणी विशुद्ध जीव रममाण भौतिक जगतात ।।६।।   


जाणूनी हा 'कर्मयोग' प्रभुमुखातून

होऊ कार्यरत कर्तव्य अन् विहित कर्मातून  

जाणता देह इंद्रिय मन पर बुद्धी अन् बुद्धी पर परमात्मा   

होउनी स्थिरबुद्धी जिंकेल कामक्रोध हा अनासक्त जीवात्मा ।।७।।  


हरी ॐ तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

********************  



*आत्मसाक्षात्कार: अर्जित ज्ञान (अभ्यासातून मिळवलेलं ज्ञान) आणि अनुभवातून, विशुद्ध भक्तीतून मिळवलेलं ज्ञान ह्यामुळं येणारी समदृष्टी.. थोडक्यात आत्मा, परमात्मा आणि चराचर ह्याकडं समबुद्धीनं पाहणं म्हणजे आत्मसाक्षात्कार..  
* परमसत्याचा शोध: परमात्म्याच्या संबंधात असणारी आत्म्याची मूळ स्वरुपस्थिती जाणणे..
*साक्षित्व: कर्मं हा प्रकृतीचा, मायेचा खेळ आहे आणि आपण त्या खेळाचे फक्त साक्षी आहोत ही भावना..
*अनघ: निष्पाप अर्जुन..



-मी मधुरा.. 

************************************************