Thursday, March 20, 2025

अध्याय ३ 'कर्मयोग'

ॐ

श्रीपरमात्माने नमः 
अध्याय ३ 'कर्मयोग'



दुसऱ्या अध्यायात भगवान अर्जुनाला 'कर्मफलाकडं समत्व दृष्टीनं बघ आणि युद्ध कर' असं सांगतात.. कर्म तर करावंच लागतं, पण कर्मामागील विचार (ज्ञान) हे कर्मापेक्षा श्रेष्ठ आहेत, तेव्हा निश्चयात्मक बुद्धी (ज्ञान) प्राप्त करून आत्मशांती मिळव असा उपदेश ही करतात.. हे ऐकल्यावर आपण ही मानवी जीवनाचं परमश्रेय, आत्मशांती प्राप्त करण्यासाठी ज्ञानयोगाचा अवलंब करावा असं कोणालाही वाटेल.. असं वाटणाऱ्या सर्व मानवांचा अर्जुन हा जणू प्रतिनिधीच आहे.. 'ज्ञानप्राप्ती हीच जर सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे, तर कर्माची आवश्यक्ता काय?' ह्या अर्जुनाच्या प्रश्नानं 'कर्मयोग' ह्या अध्यायाची सुरुवात होते.. सर्वप्रथम, कर्म हे आवश्यक आणि अपरिहार्य का आहे हे सांगितलं आहे.. कर्मामागची यज्ञभावना आणि कर्मक्षेत्रातील देवता, समाज आणि प्रकृती (सृष्टी) यांच्याशी जोडणारा कर्मयज्ञ कसा असावा, ज्ञानी व्यक्तींचं लोक कल्याणार्थ कर्तव्य कसं असावं, कर्मसमर्पण म्हणजे काय?, माणसाच्या अंतःकरणातील ज्ञानविरोधी प्रवृत्ती कश्या असतात, त्यावर उपाय काय?..  हे ह्या अध्यायांत सांगितलं आहे.. 'बुद्धीनं तत्वस्पर्शी व्हायला हवं' हे सांगून अध्यायाची सांगता होते.. 

'ज्ञानात एव तु कैवल्यम्' - कैवल्य म्हणजे परमात्म्याशी एकरूप अवस्था- म्हणजेच ज्ञान प्राप्त केल्याने मोक्ष मिळतो.. ज्ञानमार्गाचा अवलंब केला तर युद्ध कर्म करावं  लागणार नाही.. पितामह, गुरु द्रोण, आप्तस्वकिय ह्यांच्याशी लढावं लागणार नसेल तर कर्मापेक्षा ज्ञानमार्ग बरा.. असा विचार अर्जुन करतो.. पण लगेचच भगवान त्याला त्याच्या कर्माची आठवण करून देतात.. एकीकडं ते त्याला 'आत्मवान हो', 'ज्ञानाचा अधिकारी हो' असं सांगतात तर दुसरीकडं 'कर्मण्येवाधिकारस्ते' - 'कर्मणि एव अधिकार: ते'- म्हणजेच 'कर्माचा अधिकारी हो' असं ही सांगतात.. ह्या बोलण्यानं गोंधळून गेलेल्या अर्जुनाच्या परखड प्रश्नानं अध्यायाची सुरुवात होते.. "हे जनार्दना, तुम्ही मला युद्ध करणं हे माझं कर्तव्य आहे असं सांगितलंत पण नंतर कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानामुळं मन:शांती मिळते असंही म्हणालात.. त्यामुळे मी आता पुरता गोंधळून गेलो आहे.. तेव्हा तुम्ही मला निश्चितपणे सांगा कि ज्ञान श्रेष्ठ आहे तर त्यामार्गे न जाता युद्धासारखं घोर कर्म मी का करू?.."

अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान म्हणतात, "अरे अर्जुना, *आत्मसाक्षात्काराचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी मी यापूर्वीच दोन मार्ग सांगितले आहेत.. ज्ञानयोगेन संख्यानाम्, कर्मयोगेन योगिनाम्.. म्हणजेच, एक ज्ञानाचा आणि दुसरा कर्माचा!..  ज्ञानाचा मार्ग हा तत्त्वज्ञानी, ज्ञानी लोकांसाठी आहे तर कर्माचा मार्ग हा बाकी साधकांसाठी.." हे दोन्ही मार्ग एकाच ध्येयाप्रत म्हणजेच परमात्म्याला जाऊन मिळतात.. कोणत्या मार्गानं जायचं ते साधकाच्या जीवनशैलीवर, त्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे.. 
ज्ञानयोगी बुद्धीनं, तत्वज्ञानानं इंद्रियनिग्रह करून *परमसत्याचा शोध घेतात तर कर्मयोगी आपल्या सकाम कर्मातून, समर्पणातून परमतत्वाच्या जवळ जातात.. 
अर्जुनाची जीवनशैली कर्मयोगीची आहे.. क्षत्रिय असल्यानं युद्ध करणं हे त्याचं कर्म आहे.. पण केवळ आप्तेष्ठांशी युद्ध करायला लागू नये म्हणून तो ज्ञानमार्गाचा, तत्वज्ञानी होण्याचा विचार करतो आहे.. गोधळलेल्या अर्जुनाला माऊली म्हणतात, "देखे उत्प्लवनासरिसा। पक्षी फळाशी झोंबे जैसा। सांग नरु केवि तैसा। पावे वेगा?।।".. म्हणजेच, पक्ष्यासारखं एका झेपेत झाडावरच्या फळापर्यंत पोचणं आपल्याला शक्य आहे का?.. हळूहळू फांदीवरून जात जात आपल्याला फळापर्यंत पोचावं लागतं.. पण ह्या पक्षाप्रमाणंच उंच भरारी घेऊन ज्ञानमार्गानं परमात्म्यापर्यंत पोचायची अपेक्षा अर्जुन करतो आहे.. उंच उडण्यापूर्वी पक्षाच्या ही पंखात बळ येणं आवश्यक असतं.. त्याला एकाच विशिष्ट दिशेनं सातत्यानं उडण्याचा सराव करावा लागतो.. पंखाचा योग्य वापर करण्याचं कर्म सातत्यानं केलं तर उंचीवर पोचायची क्षमता विकसित होते.. ही क्षमता विकसित करणं म्हणजेच कर्मयोग.. पंख सक्षम झाल्यावर, त्यात उडण्याची ताकद आल्यावर, भरारी मारून परमात्म्यापर्यंत पोचणं म्हणजे ज्ञानयोग..

केवळ कर्म केल्यानं कर्मयोगी होत नाही किंवा कर्म सन्यास घेतल्यानं सिद्धयोगी.. प्रत्येक देहधारी जीव हा क्षणभरही कर्म केल्यावाचून राहू शकत नाही.. कर्म करणं का प्रकृतीचा स्वाभाविक धर्म आहे.. शरीराच्या किमान गरजा भागविण्याइतकं तरी कर्म करणं आलंच.. अगदी नैष्कर्म स्थितीला पोचलेला ज्ञानयोगी, ध्यानाला जरी बसला असला तरी त्याचा श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण इत्यादी कार्य चालूच असतं.. कारण प्रकृति गुणांपासून उत्पन्न झालेल्या देहाचे व्यवहार चालूच असतात.. यावरून हे निश्चित की कर्म माणसाला सुटत नाही.. कर्माचा त्याग करून, विषयसुखांचा नाश करून जे कर्मातीत होऊ इच्छितात त्यांना भगवान दांभिक, दुराचारी म्हणतात कारण त्यांच्यात वासना जागृत असते, ते विषयासक्त असतात.. परंतु मनानं इंद्रियांचं नियमन करून, आसक्ती न ठेवता कर्मयोगाचं आचरण करतो तो खरा कर्मयोगी.. असा कर्मयोगी कर्मबंधनातून मुक्त असतो..  

प्रत्येक कर्म हे मनांतून निर्माण झालेल्या इच्छेमुळं घडतं, तेव्हा अनावश्यक गोष्टीं विषयीचे आकर्षण वाटणारे विचार मनांतून काढून टाकणं हे उत्तम.. मनाला व इंद्रियांना ताब्यात ठेवून स्वधर्माप्रमाणं आचरण करणं हाच 'अखंड यज्ञ'-'नित्य यज्ञ'.. आणि जो हा यज्ञ करतो तो कोणत्याही बंधनात अडकत नाही कारण तो ध्येयानं, कर्मानं  प्रेरित झालेला असतो.. यज्ञ म्हणजे समाजाच्या भल्यासाठी केलेलं निस्सीम काम, ज्यामुळं समाज एकत्र जोडला जाईल.. शिवरायानं पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न असो वा लोकमान्य, सावरकर, गांधीजी यांनी दिलेला स्वातंत्र्याचा लढा, हा सुद्धा एक यज्ञच!.. स्वातंत्र्यासाठी, सुराज्यासाठी केलेला यज्ञ.. देशाला गुलामगिरीतून मुक्त करणं ह्या ध्येयानं प्रेरित असा यज्ञ.. स्वातंत्र्य मिळवणं हाच धर्म आणि कर्म सुद्धा.. 
जेव्हा ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली तेव्हा सृष्टी बरोबरच त्यातील जीव-सजीवांचं धर्म आणि कर्म ही निश्चित केलं आणि धर्माचरण केलं असता जीवनाचं उद्दिष्ट पूर्ण होईल असं ही सांगितलं.. जीवन उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी उपासतापास, व्रतवैकल्यं, तीर्थयात्रा, अनुष्ठानं असं करण्याची काहीच गरज नसते.. 'स्वधर्माचं निष्काम बुद्धीनं केलेलं आचरण'- हाच खरा जीवनमंत्र होय.. 

'इदम् न मम'-हे माझं नाही- ह्या भावनेनं केलेलं विहित कर्म, नि:स्वार्थ भावनेनं समाज कल्याणासाठी केलेलं काम परमात्म्याला अर्पून निश्चिन्त राहावं.. एकनिष्ठेनं स्वधर्माचं आचरण केलं असता विषयासक्ती राहत नाही.. कर्म न करता त्याच्या फळाची अपेक्षा करणं किंवा दुसऱ्याच्या कामात स्वतःचा स्वार्थ पाहणं हे चोरी केल्यासारखंच.. विहित कर्माचं निष्काम बुद्धीनं आचरण करून मिळालेल्या संपत्तीचा योग्य विनियोग केला पाहिजे.. सर्व संपत्ती स्वतःकडं ठेवणं ही सुद्धा बेइमानीच.. म्हणजेच स्वधर्मानं  संपादन केलेलं द्रव्य, संपत्ती स्वधर्मानं खर्चावी आणि बाकी राहील त्याचा आनंदानं उपभोग घ्यावा.. स्वधर्मनं खर्च करणं म्हणजे समाजातील इतर घटकांचा, परस्परांचा उद्धार करण्यासाठी खर्च करणं.. अश्यासाठी मिळवलेली संपत्ती विषयसुखात अडकवत नाही.. जे शरीरास आत्मा मानतात, विषयसुखाशिवाय दुसरं काही जाणत नाहीत त्यांनी केलेलं यज्ञकर्म हे नुसतं थोथांड असतं.. समाजाला दाखवण्यासाठी, समाजात आपली पत ठेवण्यासाठी केलेलं एक काम..
 
अन्नाला आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे.. अन्नामुळंच आपला देह पोसला जातो आणि ह्या देहाच्याच मदतीनं आपण धर्म आणि कर्म करू शकतो.. अन्नाचं महत्व सांगताना भगवान म्हणतात, "अन्नापासून प्राणीमात्राची उत्पत्ती होते आणि पर्जन्यापासून अन्नाची.. पर्जन्याची उत्पत्ती यज्ञापासून तर यज्ञाची कर्मापासून.. कर्माची उत्पत्ती वेदांपासून तर वेदाची अविनाशी ब्रह्मापासून.. म्हणूनच हे सारं विश्व ब्रह्मापासून उत्पन्न झालं आहे.. आणि सर्वव्यापी ब्रह्मतत्त्व ज्ञानकर्मात स्थित आहे.."
जो सृष्टीचक्राचं पालन करत नाही, ह्या स्वधर्मरूप यज्ञाचं आचरण करत नाही त्याचं जगणं व्यर्थच.. इंद्रियलंपट होऊन तो आयुष्य वाया घालवतो.. परंतू जो आत्म्याठायी स्थिरबुद्धी आहे, आत्मसुखानं तृप्त झाला आहे, आत्मानंदानं संतुष्ट आहे त्याला काहीच कर्तव्य उरत नाही.. इच्छा, आकांक्षा, वासना, कमी झाल्यानं त्यांच्या गरजा ही कमी असतात आणि गरजा कमी म्हणून कर्म ही कमी!.. समाजातले अधिकतर लोक हे कर्माचरण करीत सर्वसामान्य जीवन जगणारे असतात.. त्यांच्या मनांत सतत उठत असणाऱ्या वृत्ती, इच्छा, वासना यांची पूर्ती करण्यासाठी ते अविरत कार्यमग्न असतात.. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत कर्तव्यं, कर्म ह्यांचं आचरण करावं लागतं.. थोडक्यात, कर्मफलाची आसक्ती न ठेवता केवळ कर्तव्य म्हणून कर्म केल्यानं जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाप्रत पोचू शकतो..

"म्हंणूनच निष्काम बुद्धीनं आचरण करून समाजासमोर एक आदर्श ठेव.. ह्या जगात खरोखर ज्यांनी स्वधर्माचं निष्काम बुद्धीनं आचरण केलं ते मोक्षपदास गेले. त्यामुळं कर्माच्या ठिकाणी आस्था हवी.. तुझ्यासारखंच कर्माचं निष्ठेनं आचरण त्यांनी केल्यास त्यांची ही दुःखं कमी होतील कारण श्रेष्ठ आणि ज्ञानी लोकांचं समाज अनुकरण करतच असतो." असा उपदेश भगवान करतात..
म्हणजेच श्रेष्ठ पुरुष जे कर्म करतात त्याचंच अनुकरण इतर लोक करतात.. ते जे प्रमाण ठरवतात, तेच प्रमाण ग्राह्य धरतात.. आणि त्यातून निर्माण होतो तो धर्म.. मग तो गांधीजींनी केलेला मिठाचा सत्याग्रह असो वा गरजेपुरते कपडे परिधान करणं असो, सूतकताई असो वा स्वदेशी मालाचा वापर असो.. वेळोवेळी जनसमुदायानं  त्यांचं अनुकरण केलं.. हळूहळू अश्या आचरणाचा धर्म बनला आणि नाव मिळालं गांधीगिरी.. इतकंच काय तर त्रैलोक्याचा स्वामी असणाऱ्या भगवानांना सुद्धा कर्म चुकलं नाही.. लहानपणी गवळ्याचं पोर बनून गायी चरायला नेल्या तर द्वारकाधिश असताना सुद्धा अर्जुनाचा सारथी बनून घोड्यांचा खराडा ही तितक्याच निष्काम बुद्धीनं केला.. परिस्थितीमुळं मिळालेलं कोणतेही कर्म धर्मरूपच असतं आणि ते केलं पाहिजे हा तो आदर्श.. 
म्हणून जो समर्थ आहे, सर्वज्ञान संपन्न आहे, त्यानं कर्माचा त्याग कधीही करू नये.. कर्मफलांची अपेक्षा न करता, लोकसमुदायासाठी कर्म करत राहावं.. निष्काम बुद्धीचं आचरण करून इतरांना कर्म करण्यासाठी सतत प्रेरित करावं..

प्रकृते: क्रियमाणानि, गुणै: कर्माणि सर्वश:।... म्हणजेच सर्व कर्मं प्रकृतीच्या गुणांनी होतात.. प्रकृती ही एक शक्ती आहे जिच्यामुळं ह्या विश्वाचं रहाटगाडगं सुरु आहे.. परंतु सामान्य माणूस, जो देहबुद्धी आहे - 'मी देह आहे' असं म्हणणारा आहे - तो अहंकारापोटी 'कर्म मी केलं' असं म्हणत असतो.. हा विकार ज्ञानी म्हणजे जे आत्मबुद्धी आहेत - 'मी आत्मा आहे' असं म्हणणारा- ठिकाणी मुळीच नसतो.. हे ज्ञानी देहाभिमान सोडून, आत्मबुद्धी होऊन, देहात फक्त *साक्षित्वानं वागतात.. देहाचा उपयोग फक्त कर्म करण्यासाठी करतात..  
प्रत्येक माणूस हा स्वतःच्या प्रकृती गुणांप्रमाणं वागत असतो.. सात्विक, राजस आणि तामसी अश्या तीन प्रकृती गुणांमध्ये त्याचं वर्तन म्हणजेच कर्मं दिसून येतात.. जसं तामसी आळशी निद्राप्रिय असतो.. सुस्ती, जडत्व, मोह ह्यात गुरफटलेला असतो तर राजसी धडपड्या, लढाऊ वृत्तीचा पण मोह आणि इच्छा ह्यात अडकलेला असतो.. सात्विक गुण असलेला ज्ञानी, शांतीप्रिय, निस्वार्थ प्रेम करणारा, भक्तीच्या मार्गावर चालणारा असतो.. सामान्य माणूस व्यवहारानुसार कधी तामसी तर कधी राजस ह्या गुणांमध्ये वर्तन करताना दिसतो.. ज्ञानी लोकांना प्रकृतीच्या ह्या गुणांची, त्याच्या शक्तीची जाणीव असते.. थोडक्यात, प्रकृतीच्या अधीन होऊन जो वागतो तो गुणांच्या मोहमायेत अडकवून राहतो.. त्यामुळं 'कर्मफलाची अपेक्षा न करता माझ्याठायी तुझी सर्व कर्मं अर्पण कर, स्वामित्व सोडून वीरवृत्तीचा स्वीकार कर आणि युद्ध कर' असा उपदेश भगवान अर्जुनाला करतात..

त्रिगुणांच्या मोहमायेत न अडकता, कर्मफलांची अपेक्षा न करता श्रद्धापूर्वक, आदरानं परमात्मयाठायी जे आपली कर्मं अर्पण करतात ते कर्मबंधनातून मुक्त होतात.. पण ज्ञानानं उन्मत्त होऊन जे कर्म करतात ते कपाळ करंटेच.. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावाला, प्रकृती गुणाला अनुसरूनच वागत असतो.. विषयसुखाच्या आसक्तीनं तो सुद्धा वासनांच्या, इच्छांच्या मोहापश्यात भरकटू शकतो.. 
पंचतत्वात विलीन होणारं शरीर फक्त 'आत्मविकास' करण्याचं, 'आत्मशांती' मिळवण्याचं माध्यम आहे इतकंच.. मग परिश्रम करून, पुष्कळ संपत्ती मिळवून, प्रसंगी स्वधर्माचा त्याग करून केवळ देहाचं पोषण का करायचं? जर शरीर हे पराधीन, गुणहीन आहे तर मग विषयसुखांसाठी इतकी खटपट का करायची?.. चित्ताला मिळणाऱ्या क्षणिक समाधानासाठी?.. ही कामवासना सुरुवातीला सुखावह असली तरी परिणामी तीच दुःखाचं कारण होते.. 
इंद्रियांमध्ये प्रत्येक प्रकारचा भाव लपलेला असतो, मग तो चांगला असो वा वाईट.. आपण ह्या गुणांच्या मोहपाशात आपसूकच अडकून कर्तव्यापासून भरकटत जातो.. म्हणूनच इंद्रियं आणि विषयसुख हे आत्मसाक्षात्काराच्या मार्गातले शत्रू आहेत.. 
आपला धर्म, आपलं कर्म(काम) आचरणास जरी कठीण असलं तरी त्याचंच आचरण करावं.. दुसऱ्याचं कर्म(काम) कितीही चांगलं, सोपं असलं तरी स्वधर्म, स्वकर्म सोडू नये.. स्वधर्म आचरण करताना मरण जरी आलं तरी ते कल्याणकारीच असेल, परमात्माकडं नेणारं असेल.. 
हे सगळं जाणणारा ज्ञानी सुद्धा मग अधर्मानं का वागतो? सर्वज्ञ असून सुद्धा परधर्म का आचारतो? असं काय आहे कि जे त्याला प्रेरित, उद्युक्त करतं? हे जाणण्यास उत्सुक अर्जुन विचारतो, "अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुष:।.. म्हणजे कोणत्या प्रेरणेनं मनुष्य पापाचरण करतो?".. 

भगवान म्हणतात, जेव्हा एखादा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा रजोगुणांच्या संगामुळं कामविकार उत्पन्न होतात.. जेव्हा कामाची तृप्ती होत नाही तेव्हा क्रोध निर्माण होतो.. क्रोधातून मोह.. आणि मोहामुळं भौतिक अस्तित्वासाठी धडपड सुरूच राहते.. यांचा अतिरेक झाला की ह्यातून अविद्या, अज्ञान म्हणजेच तमोगुण निर्माण होतात.. काम क्रोधाचा पडदा ज्ञानचक्षूवर आल्यानं ज्ञानी पण अज्ञानी बनून पाप करण्यास प्रवृत्त होतात.. जसा धुरामुळं अग्नी, धुळीमुळं आरसा झाकला जातो तसंच काम क्रोधामुळं शुद्ध ज्ञान झाकलं जातं.. चांगल्या वाईटाचा विचार करण्याची सारासार शक्ती नाहीशी होते आणि ज्ञानी सुद्धा अविद्येनं प्रेरित होऊन पाप करतो..  
विषयसुखांनी कोणीच तृप्त होत नाही.. श्रीमंतांना अजुनी श्रीमंत व्हायचं असतं, खाणाऱ्याला अजुनी चवीनं खायचं असतं.. ह्या कामविकारांना, इंद्रियसुखांच्या आसक्तीला भगवान 'अग्नी'ची उपमा देतात.. जसं इंधनांच्या निरंतर पुरवठ्यानं अग्नी विझला जात नाही तसंच ह्या विषयसुखांचं आहे, अमर्यादित इंद्रियतृप्ती केली तरी 'काम' तृप्त होऊ शकत नाही.. त्यांचा कोठेच अंत नाही.. ह्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर 'विषयासक्ती सोडून देऊन आत्म्याच्या ठिकाणी स्थिरबुद्धी होणं' हे होय.. 

थोडक्यात, इंद्रियं मन आणि बुद्धी हे विषयसुखांचं वास्तव्य स्थान आहेत.. इंद्रियांच्या मदतीनं बुद्धीवर, ज्ञानावर पडदा टाकून विषयसुखं मनाला वश करतात.. काही चांगलं पाहिलं तर त्याची लालसा निर्माण होते आणि नाही मिळालं तर त्यातून क्रोध,मत्सर उत्पन्न होतात आणि हाच क्रोध, मत्सर बुद्धीवर नियंत्रण करायला लागतो.. आणि विशुद्ध जीवाला भौतिक जगतात गुरफटून राहण्यास प्रेरित करतो.. 
"म्हणून हे अर्जुना, विषयसुखांची आसक्ती सोडून देऊन, इंद्रियांवर नियंत्रण ठेवून काम, क्रोध यांना मारून टाक.. देहापेक्षा इंद्रियं श्रेष्ठ आणि इंद्रियांपेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षा परमात्मा हे तू जाण.. म्हणून हे महाबाहो, बुद्धीच्या पलीकडं  असणाऱ्या परमात्म्याला जाणून स्थिरबुद्धीनं ह्या कामरूपी शत्रूस जिंक.." असा उपदेश करून भगवान ह्या अध्यायाची सांगता करतात..


कर्मफलाशा सोडुनी पार्था आचर तू युद्धधर्म 

मिळवण्या आत्मशांती कर्माहून श्रेष्ठ ज्ञान तू जाण

ऐकून हा ज्ञानयोग उपदेश पुसता झाला अर्जुन 

असे सर्वश्रेष्ठ ज्ञान तर का करावे मी युध्दकर्म? ।।१।।


ऐक *अनघा परत सांगतो उत्तरले भगवान 

दोन मार्गी प्रयत्न करतो घडण्या *आत्मसाक्षात्कार

तत्वज्ञानी चालतो ज्ञानमार्ग तर योगी साधक कर्ममार्ग 

ज्ञानमार्ग वा कर्ममार्ग ध्येय एकच मिळवणे परमधाम ।।२।।


कर्म करणे असे हा प्रकृती स्वभाव धर्म 

न होतसे कर्मयोगी केवळ करता विहित कर्म

घेऊनी कर्मसंन्यास न कोणी होतसे सिद्धयोगी 

अनासक्ती इंद्रियनियम आचारे तो खरा कर्मयोगी ।।३।।


आत्म्याठायी स्थिरबुद्धी ज्याची पावे आत्मसुखाची तृप्ती 

आत्मानंदी निष्कामबुद्धी असा ज्ञानी मिळावे मोक्षप्राप्ती

कर्माठायी ठेवून आस्था कर जनलोका प्रेरित कर्म 

आचरण करून स्वधर्माचं लोककल्याणा हो आदर्श ।।४।।


ठेव साक्षीभाव हो आत्मबुद्धी सोडून देहाभिमान 

कर्म तू न करशी करे प्रकृती गुण माया हे जाण

सोड स्वामित्व अर्पून कर्मे मंत्र हा अनासक्तीचा              

हो तयार युद्धासी करून स्वीकार वीरवृत्तीचा ।।५।।


इंद्रिय-मन-बुद्धी विषयसुखांचे वास्तव्य स्थान 

रजोगुण संगे जीव येता उत्पन्न कामविकार

अतुप्त कामविकारे निर्माण क्रोध-मोह-अज्ञान

तमोगुणी विशुद्ध जीव रममाण भौतिक जगतात ।।६।।   


जाणूनी हा 'कर्मयोग' प्रभुमुखातून

होऊ कार्यरत कर्तव्य अन् विहित कर्मातून  

जाणता देह इंद्रिय मन पर बुद्धी अन् बुद्धी पर परमात्मा   

होउनी स्थिरबुद्धी जिंकेल कामक्रोध हा अनासक्त जीवात्मा ।।७।।  


हरी ॐ तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

********************  



*आत्मसाक्षात्कार: अर्जित ज्ञान (अभ्यासातून मिळवलेलं ज्ञान) आणि अनुभवातून, विशुद्ध भक्तीतून मिळवलेलं ज्ञान ह्यामुळं येणारी समदृष्टी.. थोडक्यात आत्मा, परमात्मा आणि चराचर ह्याकडं समबुद्धीनं पाहणं म्हणजे आत्मसाक्षात्कार..  
* परमसत्याचा शोध: परमात्म्याच्या संबंधात असणारी आत्म्याची मूळ स्वरुपस्थिती जाणणे..
*साक्षित्व: कर्मं हा प्रकृतीचा, मायेचा खेळ आहे आणि आपण त्या खेळाचे फक्त साक्षी आहोत ही भावना..
*अनघ: निष्पाप अर्जुन..



-मी मधुरा.. 

************************************************

Friday, March 7, 2025

जाता जाता मी त्याला विचारलं..

जाता जाता मी त्याला विचारलं,

आपण एक होणारच नव्हतो तर

कायनात ने हमें मिलाया ही क्यूँ? 


तो म्हणाला,

कदाचित कयानात को यही मंजूर होगा..

पुढच्या जन्मी भेटण्यासाठी 

ह्या जन्मी बिछड़ना ही होगा.. 


मी म्हणाले,

असेल ही, तू म्हणतोस म्हणून.. 

पण, तुला न भेटण्यासाठी 

मला माझ्याशीच हर रोज झगड़ना होगा.. 

तुझ्या शिवाय मला पाहण्यासाठी 

‘स्व’ चा शोध लेना होगा.. 

खुदको पेहचानना होगा.. 

तसं ही,

आपण वेगळं झालो म्हणून 
आपलं प्रेम तर कम नहीं होगा.. 

क्योंकी,

प्रेमात विदा होती हैं अलविदा नहीं.. 
प्रेम जन्मोजन्मीसाठी असतं पलभर के लिये नहीं.. 

प्रेम स्वच्छंदी असतं रिश्तोंका कैदी नहीं.. 

प्रेम…


बस.. बस.. बस.. 

तो म्हणाला, 

म्हणूनच म्हणतो पगली, 

प्रेम आहे तर फिर मिलेंगे!..

कायनात पर विश्वास हैं तो फिर मिलाये जाऐंगे!.. 




-मी मधुरा.. 

************************************************


Tuesday, February 18, 2025

अध्याय ६ 'आत्मसंयमयोग'

ॐ

श्रीपरमात्माने नमः 
अध्याय ६ 'आत्मसंयमयोग' 
( ध्यानयोग )



'आत्मसंयमयोग' हा अध्याय मुख्यत्वे योगशास्त्र ह्या विषयावर भाष्य करतो.. ह्या अध्यायात भगवंतांनी, मन आणि इंद्रिये संयमित करण्याचं माध्यम म्हणून अष्टांगयोगाचं वर्णन केलं आहे.. योगाच्या प्रशिक्षणानं विकसित झालेलं मन, इंद्रिय-विषयसुखांवर नियंत्रण ठेवू शकतं.. शरीर-मन-आत्मा जेव्हा एकत्र येऊन कर्म करतात तेव्हा 'योग' घडतो.. म्हणजेच आत्म्यापाशी बुद्धी स्थिर होऊन आत्मानंद मिळतो.. परमसुखाचा अनुभव मिळतो.. ब्रह्मत्व प्राप्त होते.. 
ज्ञानेश्वर माऊली ह्या अध्यायाबद्दल बोलताना म्हणतात..
तैसे गीतार्थाचे सार। जे विवेकसिंधूचे पार। नाना योगविभवभंडार। उघडले कां।।
जे आदिप्रकृतीचे विसवणे। जे शब्दब्रह्मासि न बोलणे। जेथूनि गीतावल्लीचे ठाणे। प्ररोहो पावे।। 
तो अध्यावो सहावा।वरि साहित्याचिया बरवा। सांगिजैल म्हणौनि परिसावा। चित्त देउनी।। 
म्हणजेच हा अध्याय गीतेचे सार आहे.. जणू आत्मानंदाचा शोध घेण्यासाठी योगसंपत्तीचं भांडार खुलं केलंय.. जे आदिमायेचं विश्रांतीस्थान आहे, जिथं वेदांनाही मौन धारण करावं लागतं- असा तो अध्याय सहावा.. 

योगशास्त्रात योगासनांबरोबरच प्राणायाम आणि साधना (ध्यान) यांचा ही समावेश होतो.. योगासनांमुळं शरीर तंदुरुस्त राहतं, प्राणायामामुळं मन स्थिर होतं आणि साधनेमुळं आत्मबुद्धी (आत्म्यावर संयम).. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग सारखाच हा आत्मसंयमयोग.. जो आपल्याला परमात्म्यापर्यंत पोचवतो.. 

'योगी आणि संन्यासी' ह्यावरच्या भाष्यान 'आत्मसंयमयोग' अध्यायाची सुरुवात होते.. पुढं स्वचिंतन, आत्मविकासासाठी 'साधना' म्हणजेच ध्यानाचं महत्व सांगून, साधना म्हणजे काय, त्यासाठी बैठक कशी असावी, साधकानं कोणते नियम पाळावेत हे सविस्तर सांगितलं आहे. साधना, ध्यान धारणा करून आत्म्यावर संयम मिळवून ब्रह्मत्व प्राप्त करता येत असलं तरी 'कर्मयोग' श्रेष्ठ आहे.. म्हणून 'तू कर्मयोगी हो' असा अर्जुनाला उपदेश करत ह्या अध्यायाची सांगता होते..   

''कर्मसंन्यासयोग' ह्या अध्यायात भगवानांनी 'कर्मयोगी हा कर्मसंन्यासी असतो' असं सांगितलं.. कर्मफळाची आसक्ती न ठेवता कर्मयोगी कर्मे करत असतो म्हणून तो कर्मसंन्यासी.. 'एके संन्यासी तोचि योगी' म्हणजेच संन्यासी आणि योगी एकच.. जो कर्मफळाची इच्छा न करता विहित कर्मे- कर्तव्य कर्मे करतो तोच खरा संन्यासी व योगी होय.. गृहस्थाश्रमाचा त्याग करून विहित कर्मे न करणारा संन्यासी ही नव्हे आणि योगी ही नव्हे.. 
संन्यास म्हणजे स्वतृप्तीचा त्याग.. इंद्रियतृप्तीच्या इच्छेचा त्याग.. संन्यास म्हणजे जीवात्मा ही आपली स्वरुपस्थिती आहे- हे जाणून त्याप्रमाणं कर्म करणं.. जीवाला, जीवात्म्याला आपलं स्वतंत्र असं अस्तित्व नसतं, जेव्हा तो भौतिक शक्तींना वश होतो तेव्हा तो बद्ध होतो आणि त्याला स्वतःच्या स्वरुपस्थितीचा विसर पडतो.. आणि जेव्हा त्याला आपल्या अध्यात्मिक शक्तींची जाणीव होते तेव्हा तो आपल्या स्वरुपस्थिती मध्ये स्थित होऊन इंद्रियतृप्ती करणाऱ्या कर्मांना थांबवतो.. याचाच अभ्यास (योगशास्त्र) भौतिक आसक्ती रोखण्यासाठी योगिजन करत असतात.. 

थोडक्यात जीवात्माचा ब्रह्मत्वाशी युक्त (मोक्ष) होण्याचा प्रवास म्हणजे योग.. 
कर्म मार्गानं ह्या ध्येयाप्रत पोचण्यासाठी योगशास्त्रात अष्टांगयोग सांगितला आहे.. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही त्याची आठ अंगं..
'यम'- साधकासाठी असलेली नैतिक आणि सामाजिक मार्गदर्शक तत्त्व.. 
'नियम'- स्वतःचं निरीक्षण करून स्वतःबद्दल अधिकाधिक जागृत होण्यासाठी घालून घेतलेले नियम.. 
'आसने'- शरीर लवचिक, तंदुरुस्त आणि कणखर होण्यासाठी मदत करणाऱ्या शारीरिक स्थिती.. 
'प्राणायाम'- श्वासांच्या स्थिर हालचालींचा सराव.. 
'प्रत्याहार'- सर्व गोष्टीतून संवेदना काढून घेण्याची पद्धत थोडक्यात आसक्ती सोडून देणे, बाह्य विषयांच्या व आपल्या इंद्रियांच्या प्रभावापासून मनाला मुक्त करणे..  'धारणा'- अविचलित एकाग्रता.. 
'ध्यान'- कोणत्याही प्रक्रियेचा विचार न करता संपूर्ण लक्ष मनावर केंद्रित करणे.. 
'समाधी'- अत्यानंदाच्या अवस्था- ब्रह्मरूप- मोक्ष..
अश्या ह्या अष्टांगयोगाच्या नवसाधकास निष्काम कर्म हे साधन सांगितलं आहे तर ही सिद्धी प्राप्त असणाऱ्या साधकास कर्मनिवृत्ती- सर्व भौतिक क्रियांचे शमन- हे साधन सांगितलं आहे..  

जो साधक इंद्रियभोगाच्या व कर्माच्या ठिकाणी आसक्त होत नाही आणि जो सर्व वासनांचा त्याग करतो त्याला 'योगरूढ' असं म्हणतात.. आणि जो योगारूढ होतो तो निःसंशय परिपूर्ण योगी होतो.. कारण त्याचं त्याच्या मनावर नियंत्रण असल्यानं तो स्वतःची अधोगती होऊ देत नाही.. असा 'योगरूढ' स्वतःच स्वतःचा उद्धार करतो..  त्याला चांगलेच माहिती असते कि आपण स्वतःच (मन) स्वतःचे मित्र आणि स्वतःचे शत्रू आहोत.. 
ज्यानं मनाला जिंकलंय त्याच्यासाठी 'मन' सर्वोत्तम मित्र आहे.. परंतु ज्यानं मनाला जिंकलेलं नाही त्याच्यासाठी त्याचं तेच मन परमशत्रु होतं.. 
ज्यानं मनाला जिंकलंय, ज्याच्या सर्व वासना शांत झाल्या आहेत असा योगी शीत-उष्ण, सुख-दुःख, मानापमान ह्याकडं अत्यंत समदृष्टीनं पाहतो.. ह्या भौतिक अस्तित्वाच्या द्वंद्वाचा त्याच्यावर मुळीच परिणाम होत नाही.. ही अवस्था म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी तल्लीनता होय.. आत्मज्ञान आणि अर्जित ज्ञान (मिळवलेलं विविध ज्ञान) ह्यांनी ज्याच अंतःकरण तृप्त झालंय, जो निर्विकार आहे, जो जितेंद्रिय आहे तो परमात्म्यात स्थित (मुक्त) झालाय असं समजावं.. हितचिंतक, वैरी, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, मित्र, शत्रू, सज्जन, दुर्जन ह्या विषयी समबुद्धी ठेवणारा योगी विशेष योग्यतेचा असतो.. 

मनाला संयमित करणं हा अष्टांगयोगाच्या अभ्यासाचा उद्देश आहे.. जोपर्यंत मन संयमित होत नाही तोपर्यंत योग म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय.. कोणत्याही भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास नसून तो भौतिक अस्तित्वाचा नाश करण्यासाठी असतो.. जो आपलं शरीरस्वास्थ सुधारण्यासाठी योगाभ्यास करतो तो योगी नव्हे.. अष्टांगयोगाचं अनुकरण करणाऱ्या योग्यानं सर्वप्रथम आपलं शरीर, मन आणि आत्मा परमात्म्यापाशी स्थिर ठेवून सतत आत्मचिंतन (आत्मध्यान) करावं.. परमेश्वरावर मन एकाग्र करावं.. बाह्य गोष्टींपासून होणारा व्यत्यय टाळण्यासाठी एकांतात राहावं.. जाणीवपूर्वक आकांक्षा, संग्रह किंवा स्वामित्व ह्या भावनांपासून अलिप्त असावं.. जे काही आहे ते सर्व त्या परमात्म्याचं आहे अशी भावना असावी.. 
ज्या ठिकाणी ध्यानाला बसायचं आहे ती जागा पवित्र व शुद्ध हवी.. फार सखल ही नाही आणि फार उंच ही नाही अश्या जागेवर आधी दर्भ, त्यावर हरिणाचं कातडं, त्यावर वस्त्र अंथरावं.. ह्या आसनावर निश्चलपणे दृढतापूर्वक बसावं.. पाठ, मान, डोकं उभ्या सरळ रेषेत आणून, नाकाच्या शेंड्यावर दृष्टी लावून मन एकाग्र करावं..
अविचलित आणि संयमित मनानं, भयरहित होऊन परमात्म्याचं चिंतन करत ध्यानमग्न व्हावं.. ह्याप्रमाणं आपला योगाभ्यास - ध्यानधारणा- यांचा निरंतर सराव करून मन संयमित झालेला योगी मोक्षरूप परमधामाची प्राप्ती करतो.. 

मोक्ष देणाऱ्या ह्या योगाभ्यासासाठी यम, नियम, प्रत्याहार यांचं तंतोतंत पालन केलं पाहिजे..  उदाहरण दाखल, गरजेपेक्षा अत्याधिक किंवा अत्यल्प खाणाऱ्याला, अति झोपाळू किंवा अति जागरण करणाऱ्याला हा योग साध्य होत नाही.. परंतु आहारविहार, कर्माचरण, निद्रा, जागृती यांचं यथायोग्य पालन करून, चित्त आत्म्याच्या ठिकाणी स्थिर ठेवून जो अध्यात्मामध्ये स्थित होतो, तेव्हा तो 'योगयुक्त' योगी होतो.. अश्या योग्याचं वर्णन करताना माऊली म्हणतात.. तयाते योगयुक्त तू म्हण। हे ही प्रसंगे जाण। ते दीपाचे उपलक्षण। निर्वातिचिया।।.. आडोश्याला ठेवलेल्या दिव्याची ज्योत जशी निश्चल असते त्याप्रमाणं संयमित मनाचा योगी निश्चल असतो, आत्मध्यानात सदैव स्थिर असतो..    

सांसारिक, मानसिक, भौतिक इच्छांपासून पूर्णपणे संयमित झालेल्या मनानं, परमात्म्याला आपल्यात पाहून योगी जेव्हा संतुष्ट होतो, त्या अवस्थेला 'परिपूर्ण समाधी' असं म्हणतात..  ह्या अवस्थेत विशुद्ध मनानं आत्म्याचं अवलोकन करण्यात, आपल्या आत्म्याच्या ठिकाणी परमात्म्याच्या स्वरूपाला पाहण्यात तो दंग होतो.. जे सुख इंद्रियांनी जाणणं अशक्य आहे पण जे आत्मबुद्धीनं ग्रहण करणं शक्य आहे, असे निरतिशय सुख ह्या स्थितीत योगी अनुभवतो.. अश्या प्रकारे स्थित झालेला योगी ब्रह्मस्वरूपापासून कधीच ढळत नाही.. ही स्थिती प्राप्त झाल्यावर ह्याहून अधिक काही श्रेष्ठ असेल असं त्याला वाटत नाही.. कितीही मोठठं दुःख आलं तरी त्याचं चित्त परमात्म्यापासून विचलित होत नाही.. भौतिक संसर्गामुळं निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ मुक्ती आहे..  

मन संयमित करून मनाला समाधीस्थ करावं.. परमात्म्याशिवाय इतर कशाचंही चिंतन करू नये.. भडकलेल्या मनाला निग्रहानं परत परत खेचून आत्मस्वरूपी लावावं.. अश्याप्रकारे योगाभ्यासात लीन योगी सर्व भौतिक सुखांतून, दोषांतून मुक्त होतो आणि ब्रह्मप्राप्तीरूप निरतिशय सुखाची प्राप्ती करतो.. असा योगयुक्त योगी सर्व प्राणिमात्रांमध्ये स्वतःला व स्वतःच्या ठिकाणी सर्व प्राणिमात्रांना पाहतो -सोहम्- तो मी आहे आणि मी ही तोच आहे- ही अवस्था.. जो योगी सर्वत्र ब्रह्म पाहतो आणि ब्रह्मामध्येच सर्व पाहतो त्याला परमात्मा कधीही दृष्टीआड होऊ देत नाही.. जो योगी सर्व प्राणिमात्रात असणाऱ्या परमात्म्याला समबुद्धीनं भजतो, तो सर्व परिस्थितीत परमात्म्यामध्ये वास करतो.. असा योगी 'परिपूर्ण योगी' होय..

हे सर्व ऐकून अर्जुन म्हणतो, "हे मधुसूदना, साम्यबुद्धीनं प्राप्त होणारी ही जी योगपद्धती तुम्ही सांगितलीत, ती मनाच्या अस्थिरतेमुळं, चंचलतेमुळं साध्य होईल असं मला वाटत नाही.. कारण मन हे अतिचंचल, बलवान, दुराग्रही, उतशृंखल असल्यानं त्याला आवरणं हे वाऱ्याची मोट बांधण्यापेक्षाही कठीण आहे.." खरंच ह्या चंचल मनाला लगाम कसा घालायचा? जे मन बुद्धीला हरवतं, निश्चय मोडतं, विचारला चकवतं, संतोषाला नादी लावतं, दाही दिशा हिंडवतं, असं हे मन स्थिर राहिल का? आपला स्वभाव सोडेल का?.. ह्यावर भगवान म्हणतात, "हे महाबाहो कौंतेया, चंचल मनाला संयमित करणं निःसंशय अत्यंत कठीण पण योग्य अभ्यासानं, अनासक्तीनं  मनाला वश करणं शक्य आहे. तसंच ज्याचं मन उतशृंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणं कठीण आहे परंतु ज्याचं मन संयमित आहे, त्याला योग्य साधनांनी (यम, नियम, प्राणायाम) आणि प्रयत्नांनी हा योग साधणं शक्य आहे.." 

पुढं अर्जुन विचारतो, "हे कृष्णा, एखादा योगी ज्यानं आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा स्वीकार केलाय, अत्यंत कठीण अश्या अष्टांगयोगाचा मार्ग अनुसरतोय, पण निरंतर प्रयत्न करूनही सांसारिक आसक्तीमुळं विचलित झालाय, मार्गभ्रष्ट झालाय अश्या अयशस्वी योगीचं पुढं काय होतं? मोहामुळं ब्रह्मप्राप्तीच्या मार्गात स्थिर न झालेला, ना प्रपंच ना परमार्थ असा भरकटलेला, फुटक्या ढगाप्रमाणं नाश तर पावत नाही ना? हे कृष्णा, माझा हा संशय तू पूर्णपणे दूर कर कारण तुझ्याशिवाय दुसरा कोणीही हा दूर करण्यास समर्थ नाही.." अर्जुनाच्या ह्या प्रश्नांना उत्तर देताना भगवान म्हणतात, "हे पार्था, सत्कर्म करणारा योगी कधीही अधोगतीला जात नाही.. इहलोकांत किंवा परलोकांत ही त्याचा विनाश होत नाही.. असा 'योगभ्रष्ट' योगी पुण्यवंताना मिळणाऱ्या स्वर्गादि लोकाला जाऊन तिथं दीर्घ काळापर्यंत राहून नंतर शुद्धाचरण करण्यासाठी श्रीमंतांच्या घराण्यांत जन्माला येतो किंवा ज्ञानी लोकांच्या कुळात जन्माला येतो.. अश्या प्रकारचा जन्म मिळणं या लोकी अतिशय दुर्लभ आहे.. त्याला त्या नव्या देहात पूर्वजन्मीच्या बुद्धिसंस्काराचा लाभ होतो आणि तो पुन्हा परिपूर्ण सिद्धीसाठी पुन्हा प्रयत्न करतो.. नव्या जन्मात सुरुवातीला आवड नसली तरी पूर्वजन्मीच्या अभ्यासाच्या बळानं योगाकडं आकर्षिला जातो.. आणि योगाविषयी जो जिज्ञासू आहे त्याला वेदाचरणाच्या फळापेक्षा विशेष फळ मिळते.. प्रयत्नपूर्वक अभ्यास करता करता, पूर्ण पापांपासून शुद्ध झालेला आणि अनेक जन्मांनी पूर्ण सिद्धीप्रत पोचलेला असा योगी अखेर परमगती (मोक्ष) प्राप्त करतो.. योगी हा तपस्वी, ज्ञानी, आणि सकाम कर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुना, तू सर्व परिस्थितीत योगी हो.. "


म्हणे माऊली, हा अध्याय असे गीतार्थाचे सार 

संयमिण्या मन-इंद्रिये उघडले अष्टांगयोगाचे द्वार 

स्थिर बुद्धी आत्म्याठायी घडतो आत्मसंयमयोग 

जसा असतो कर्मयोग, भक्तियोग अन ज्ञानयोग ।।१।।


करुनी विहित कर्मे इच्छा नसे फलांची  

त्यागून इंद्रियतृप्ती होशील कर्मसंन्यासी 

होता जाणीव तुज अध्यात्मिक शक्तींची 

पाशिल स्थित आपल्या स्वरुपस्थितीशी ।।२।।


होण्या परिपूर्ण योगी कर त्याग वासनांचा 

होऊनी योगारूढ उद्धार कर स्वतःचा 

हो समबुद्धी, आत्मज्ञानी जिंकुनी या मनाला 

लाभेल योगसिद्धी अष्टांगयोग साधकाला ।।३।।


यम नियम आसने प्राणायाम प्रत्याहार 

ध्यान धारणा समाधी असा हा अष्टांग 

चढता कठीण सोपान हा योगशास्त्राचा

*आत्मसाक्षात्कारी योग शरीर-मन-बुद्धीचा ।।४।। 


राहावं एकांती, सोडावं स्वामित्व, करावं एकाग्र चिंतन  

नसावं भय अन विचलित मन, असावं संयमित ध्यानमग्न 

करावा अभ्यास, अखंड सराव, होण्या स्थिर परमात्म्यासव 

'नाही काही माझं असे सर्व त्याचं' भावना अशी मनी ठेव ।।५।।


असे समाधिस्थ मन, निरंतर करी परमात्मा चिंतन    

होता ते आसक्त, प्रयत्ने खेचूनी तू आण आत्म्याठायी 

असा योगयुक्त, जाणुनी ब्रह्मतत्त्व भजे समबुद्धी 

होता *आत्मसाक्षात्कार, परमात्म्याचा वास चराचरी ।।६।।


मन संसार आसक्त, ना प्रपंच ना परमार्थ

पुसतसे पार्थ, असा मार्गभ्रष्ट काय करी         

जरी योगभ्रष्टी, नाही विनाश दोन्ही लोकी 

जाईल पुण्यलोकी, जन्मेल उच्चकुळी हे तू जाण ।।७।।


जाणूनी हा 'आत्मसंयमयोग' प्रभुमुखातून

होऊ आत्मानंदी प्रयत्ने अष्टांगयोग साधनेतून     

पोचतो सिद्धीप्रत घडता हा योग शरीर-मन-आत्त्म्याचा 

निष्पाप, अनासक्त, परंतप श्रेष्ठ योगी परमधामाचा ।।८।। 


हरी ॐ तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

********************  



*आत्मसाक्षात्कार: अर्जित ज्ञान (अभ्यासातून मिळवलेलं ज्ञान) आणि अनुभवातून, विशुद्ध भक्तीतून मिळवलेलं ज्ञान ह्यामुळं येणारी समदृष्टी.. थोडक्यात आत्मा, परमात्मा आणि चराचर ह्याकडं समबुद्धीनं पाहणं म्हणजे आत्मसाक्षात्कार.. 

*आत्मसाक्षात्कारी: आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित असा योगी.. 


*शरीर मन आत्मा एकत्र येणं म्हणजे योग.. 

*सकाम कर्माशी संबंधित योगपद्धती म्हणजे कर्मयोग.. 

*ज्ञानशी संबंधित योगपद्धती म्हणजे ज्ञानयोग..  

*भगवंताच्या प्रेममयी सेवेशी संबंधित योगपद्धती म्हणजे भक्तियोग..  


*वैराग्य: भौतिक सुखांपासून अनासक्ती आणि अध्यात्मामध्ये मन युक्त होणं 


निष्काम कर्मयोग हा आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा आरंभ आहे.. जेव्हा कर्मयोगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची वृद्धी होते तेव्हा त्या अवस्थेला ज्ञानयोग म्हणतात.. जेव्हा ज्ञानयोगामध्ये विविध आसनं, प्राणायाम यामुळं ध्यानाची वृद्धी होते आणि मन परमात्म्यावर स्थिर होते तेव्हा त्याला अष्टांगयोग म्हणतात.. आणि जेव्हा साधक अष्टांगयोगाच्या पलीकडं जाऊन परमात्म्याप्रत पोचतो तेव्हा त्याला भक्तियोगयुक्त असे म्हटले जाते आणि हीच संपूर्ण योगाची परमावधी असते.. 




-मी मधुरा.. 

************************************************