Sunday, October 25, 2020

नवरात्र नात्यांचे: विजयादशमी!!..

🌿🌼🌿 विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!!🌿🌼🌿



दत्तमहाराज सीमोल्लंघन सोहळा, कुरुंदवाड 


'नवरात्र नात्यांचे' साजरं करताना, रोज एक नातं तुमच्या बरोबर जगताना, काही पडद्याआड गेलेल्या नात्यांना आठवणींच्या रूपाने परत पाहताना, असलेली नाती परत अनुभताना हे नऊ दिवस कसे संपले कळालंच नाही.. 

एकत्र कुटुंबामुळं असेल किंवा माणसांच्या गोतावळ्यामुळं असेल, मी ही सगळी नाती अगदी जवळून, मनापासून आणि भरभरून जगले.. जगते आहे.. 

Thank you all for enriching my life ❤️

जरी मी नवरात्रात, नात्यांमधील देवींबद्दल, शक्तींबद्दल लिहिलं असलं तरी, ह्या सर्व 'शक्तीं'ना नात्यातील 'शिवां'ची जोड असते असं मला वाटतं.. प्रत्येकवेळी ह्या 'शक्तीं'बद्दल लिहिताना त्यांतील 'शिवा'च्या आठवणी तरळून जायच्या.. आजी-आबा, आई-बाबा, काका-काकू, आत्या-काका, मावशी-काका, मामा-मामी, भाऊ-भावजय, बहीण-मेव्हणा, मित्र-मैत्रिणी, मुलगा-मुलगी-सून-जावई, सासू-सासरे, नणंद-दीर.. हे कधी मला एकटे दिसलेच नाहीत.. ह्या जोड्यांमधील प्रत्येक नातं दुसऱ्या नात्याचा भक्कम आधार आहे.. 

नात्यांतील देवींबद्दल लिहिताना.. 
आबा आले तिकडून 
विसरू नकोस बाळा मला 
म्हणाले काहीसं खाकरून 
कोडकौतुक करता तुझं 
आनंदात चिंबचिंब भिजलो.. 
बालपण तुझ्यात पाहताना 
मनोमन नितांत सुखावलो.. 

नात्यांतील देवींबद्दल लिहिताना.. 
दिसला बाबा, काहीसा दमलेला थकलेला
भविष्याचा विचार करत, वर्तमानाच्या गणितात अडकलेला..
म्हणाला, पोरी हे सारं करतोय तुझ्यासाठी, आपल्यासाठी 
काढशील का माझी आठवण, एकदातरी दिवसाकाठी... 
 
नात्यांतील देवींबद्दल लिहिताना.. 
दिसला काका, त्या कोपऱ्यात, मिश्कीलपणे माझ्याकडे पाहताना
म्हणाला, बब्बू, नाव नको देऊ तुझ्या माझ्या नात्याला.. 
माझी परी, माझी परी म्हणून, फिरलो जगभर, घेऊन तुला खांद्यावर
गोड छबी तुझी, टिपत राहिलो कधी कॅमेरावर तर कधी खोल मनावर.. 

नात्यांतील देवींबद्दल लिहिताना.. 
उभा होता मामा, मांडवा बाहेर 
डोळ्यातील पाणी लपवत, कृतार्थपणे मला न्याहाळत...  
नजरेनंच म्हणाला मला, 
छानसा संसार कर, सासर-माहेर जपताना आजोळची ही आस धर.. 
घेऊन ये पोराबाळांना परत तुझ्या आजोळी 
करून पाठीचा घोडा, जगेन साऱ्या आठवणी.. 

नात्यातील देवींबद्दल लिहिताना... 
होता भाऊ बाजूलाच बसलेला, 
थोडासा खोडकर पण तितकाच जबाबदार
हलकेच हातात हात घेऊन म्हणाला, 
असशील तू माझी ताई किंवा असेन मी दादा 
दिसेन मी तुला, तुझ्याच बाजूला सदासर्वदा  
घे तू झेप, मार तू भरारी, घे कवेत ते उत्तुंग शिखर 
अन ये परत माघारी, तुझ्या हक्काच्या घरी, तुझ्या माहेरी.. 

'शक्तीं'च्या मागे खंबीरपणे उभे असणाऱ्या नात्यांतील सर्व 'शिवां'ना शतशः प्रणाम!! 🙏
  
आज ह्या 'शिव-शक्तीं'बरोबर विजयादशमी साजरी करूया.. 

नात्यातील नकारात्मकता, हेवेदावे, द्वेष-मत्सर, गैरसमजुती ह्यांचं रावणाबरोबर दहन करून नात्यांतील राम जपूया.. 

पुन्हा एकदा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!! 

-मी मधुरा.. 
२५ ऑक्टोबर २०२० 

ऑडिओ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿  

Saturday, October 24, 2020

नवरात्र नात्यांचे: नववी माळ - लाडक्या 'लेकी'ची!!..

 🌺नववी माळ - आपल्या लाडक्या 'लेकी'ची!!.. 🌺



फोटो सौजन्य: पूजा आणि रसिका 
 ( माझ्या भाचींच्या घरचे नवरात्र )


जिच्या जन्मामुळे आपल्याला झालेल्या मातृत्वाच्या अनुभूतीची.. मग ती मुलगी असेल, पुतणी असेल वा भाची.. अगदी लहान बहीण सुद्धा!

रागावणारी, रुसणारी पण वेळप्रसंगी, कधी आपली आई, तर कधी मैत्रीण होऊन आपल्याला समजून घेणारी.. अशी आपली लेक.. 

सुख म्हणजे नक्की काय असतं हे जिच्या हास्यातून कळतं.. चैतन्य म्हणजे काय हे जिच्या अखंड बडबडीतून समजतं.. असा हा आपला अमूल्य ठेवा, आपला श्वास, आपली छोटी बाहुली.. आपली लाडकी लेक.. 

जसं वय वाढत जातं तसं हे माय-लेकीचं नातं छान मुरत जातं.. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, वयानुसार नात्यात बदल होत जातो पण मूळ गाभा तोच राहतो.. लेकीची आई होण्यापासून सुरु झालेला हा नात्याचा प्रवास, लेक आपली आई होण्यापर्यँत सुरूच असतो.. 

लेक लहान असताना, आई तिचं सर्वस्व असणं.. आई कशी बोलते, कशी चालते ह्याचं लेकीनं अनुकरण करणं.. आई सारखे कपडे घालावेत, आई सारखे केस असावेत असं लेकीला वाटणं.. लेकीसाठी आई शिवाय जगात सुंदर कोणी ही नसणं.. खरं तर लेकीचं अख्ख विश्व आईत सामावलेलं असतं आणि तसंच आईचं ही.. जगात कोठे ही गेलं, किती ही फॅन्सी फूड खाल्लं तरी 'आईच्या हातचं ते आईच्या' असं लेक म्हणाली कि आईला मेडल मिळाल्यासारखं वाटतं.. "I want to marry you Mommy" असं माझी लेक म्हणायची.. 😂..  त्यावेळी सुखावलेलं माझं मन आयुष्यभर तिच्या साथीचं स्वप्न रंगवायचं.. 

आईच्या मागं मागं शेपटासारखी असणारी लेक, अचानक एक दिवस शाळेत जाऊ लागते.. अन तिचे अवकाश विस्तारू लागते.. तिची बडबड, तिच्या मैत्रिणी ह्यात आई ही हळूहळू सामावू लागते.. नवनवीन गोष्टी लेकीबरोबर explore करताना, अनुभवताना आईला तिचे बालपण परत मिळते.. राहिलेल्या इच्छा, अकांक्षा लेकीच्या रूपात पूर्ण करत राहते.. आणि तिची जीवनाकडे पाहण्याची परिभाषाच बदलून जाते..

लेकीबरोबर खरेदीला जाणं, पार्लरला जाणं, सिनेमाला जाणं, एखाद्या पुस्तकावर चर्चा करणं.. एक हक्काची मैत्रिणीच आईला लेकीच्या रूपात मिळते.. लेकी पुढं मोकळं करणं, सल्ला विचारणं, लेक मोठ्ठी झाल्याची अंतर्मनाला पटलेली खूण असते..  

जिव्हाळ्याचं मैत्रीचं हे नातं, वयाच्या एका टप्यावर, कधी आणि कसं 'frienemy' (friend but enemy) मध्ये बदलतं हे दोघीना पण कळत नाही.. लहान सहान गोष्टींवरून वादावादी, मतभेद होत राहतात.. त्यावेळी शांत राहणं, धीराने घेणं हे महाकठीण काम आईला करावच लागतं.. 'वळचणीचं पाणी परत वळचणीलाच येणार'.. ह्यावर विश्वास ठेवून.. 

उतारवयात, आईची काळजी घेताना, लेक तिची आईच बनून जाते.. आणि माय-लेकीचं हे नातं आपसूकच हळुवार व्हायला लागतं.. पण तरीही, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आईसाठी तिची लेक अजुनी लहानच असते!!.. आणि लेकीसाठी तिची आई हा भक्कम आधार!!.. आईचं एखाद्या वटवृक्षाप्रमाणे कायम लेकीला आधार देणं, सावली देणं आणि लेकीचं त्या वटवृक्षाच्या शीतल छायेत पारंबी होऊन बागडताना एके दिवशी स्वतःच वटवृक्ष होणं.. ही ह्या नात्याची खरी शक्ती आहे, ऊर्जा आहे.. 

खरचं का,
ही फक्त माझी लेक आहे?
नाही, ही तर माझा श्वास आहे 
सर्वांच्या मनावर राज्य करेल 
हे स्वप्नं नाही तर माझा विश्वास आहे..
 
आनंदाचे अगणित क्षण तिच्या
मनमोकळ्या हास्यात दडले आहेत 
जॅकपॉट ज्याला म्हणतात तो 
माझ्या लेकीतच मला गवसला आहे.. 

आभाळा एवढं सुख काय ते
लेक झाल्यावर कळलं आहे 
एक वेगळच आपलेपण तिच्या
प्रत्येक मिठीत मी अनुभवत आहे..

जगण्याची नवीन परिभाषा शिकवणाऱ्या ह्या नात्याला, लेकीला शतशः प्रणाम!! 🙏

-मी मधुरा.. 
२५ ऑक्टोबर २०२०

ऑडिओ ऐकायचा असेल तर येथे क्लिक करा

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺



Friday, October 23, 2020

नवरात्र नात्यांचे: आठवी माळ - जिवलग 'मैत्रिणीची'!!..

 🌸आठवी माळ - जीवाला जीव देणाऱ्या जिवलग 'मैत्रिणीची'!!..🌸


फोटो सौजन्य: लता प्रभुणे 
( माझ्या मैत्रिणीच्या घरचे नवरात्र ) 


आपलं सारं भावविश्व जिच्यात सामावलं आहे अशी ती.. 
रुसवे-फुगवे सहन करणारी.. गोड गुपितं सांभाळणारी.. 
सडेतोडपणे सल्ले देऊन सावरून घेणारी.. आपल्या यशात स्वतःचे यश मानणारी.. 
चांगल्या-वाईट सवयींकडे दुर्लक्ष करून खरी मैत्री जोपासणारी.. अशी जिवलग 'मैत्रिण'.. 

अशी एखादी मैत्रीण असावी .....
        कधी हसवणारी, कधी रागवणारी
        पण अचूक मार्ग दाखविणारी.                        
अशी एखादी मैत्रीण असावी…
        कधी समजाविणारी, कधी समजून घेणारी
        पण गोड शब्दात आपली चूक सांगणारी
अशी एखादी मैत्रीण असावी…
        कधी काळजी घेणारी, कधी अश्रू पुसणारी
        अश्रू पुसता पुसता लढण्याची हिम्मत देणारी
अशी एखादी मैत्रीण असावी…
        कधी भावना जाणणारी, कधी मोकळीक देणारी 
        नजरेत नजर मिळवून अतूट विश्वास दाखविणारी
अशी एखादी मैत्रीण असावी…
        साद घातल्यावर धावत येणारी
        हात हातात घेऊन मैत्रीचे नाते जपणारी

मैत्रीण हे नातं असं आहे कि ते प्रत्येकाला वेगळं भावतं.. ‘जसा भाव तसं नातं’.. खूपदा अनेक मैत्रिणी आयुष्याच्या ठराविक टप्प्यावर भेटतात आणि त्या टप्प्यावर आपलं नाव कोरून जातात.. तो टप्पा त्यांच्या अस्तित्वाने पुरेपूर भरून जातो.. 

अगदी लहानपणापणी एकत्र खेळलेली भातुकली, लावलेलं बाहुला बाहुलीचं लग्न, चिमणीच्या दातांनी वाटून घेतलेला खाऊ ते त्यांच्या बरोबरची लटकी भांडणं, रुसवे फुगवे.. पुढं कॉलेज मध्ये एकत्र बंक केलेले क्लासेस, कॅन्टीन मध्ये मारलेल्या गप्पा, एकत्र केलेला अभ्यास, पावसाळी सहली.. मैत्रिणी बदलतात पण ‘मैत्रीची भावना’ तीच राहते.. ऑफिस, सोसायटी, भिशी, हॉबी ग्रुप सगळ्या मैत्रिणी वेगळ्या पण त्यांच्यातील भावबंध एकच.. मैत्रीचा.. 

ह्या प्रत्येक टप्प्यावरची मैत्री आपल्यात, आपल्या व्यक्तिमत्वात बदल घडवत असते.. आपल्याला एक व्यक्ती म्हणून enrich करत असते.. 

माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर, आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर मी ही अनेक मैत्रिणी जोडल्या.. ह्या मैत्रिणींनी मला नात्यातील unconditional acceptance शिकवला..

इथल्या, अमेरिकेतल्या माझ्या मैत्रिणी, माझ्या कुटुंबाचा एक घटक झाल्या आहेत.. माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत.. पण तरीही, मैत्रिणी म्हटलं कि आठवतो तो शाळेचा ग्रुप आणि आठवते ती "ती".. आमची लाडकी मैत्रीण.. आमची जिवलग मैत्रीण.. प्रज्ञा.. 
आज मी तुला कसं विसरेन??.. तुझ्या बरोबर 'मैत्री'च हे सुंदर नातं, कसं छान उलघडत गेलं.. 
आज आम्ही सगळ्या एकत्र आहोत पण.. पण तू नाहीस.. 
इतकी लांब, कधीच परत न येण्यासाठी, का गेलीस? तू किती ही लांब गेलीस तरी आपल्या मैत्रीचे धागे इथेच आहेत..

अशी अचानक तू निघूनच गेलीस
अन अस्तित्वाने मला दूर केलस..              
रडले, कोलमडले, सैरभर ही झाले 
नकळत संसारात मी गुरफटून गेले  
पण तुझ्या मैत्रीची ओढ इतकी की
त्या आठवणींचीच मी मैत्रीण झाले.
खरं सांगू, 
आयुष्याच्या ह्या वळणावर, मन तुला शोधत असतं 
मैत्रिणींच्या घोळक्यात तुला मिस करत असतं  
समजलेल्या आयुष्याचे बरेच अर्थ तुला सांगायचेत
जगण्याच्या धावपळीत राहिलेले बरेच क्षण
तुझ्या मैत्रीत जगायचेत...   
ये ना ग परत... 
हवी तर झूम मीटिंगच ठेवू.. 
गुजगोष्टी करत घटकाभर विसावू.. 

मैत्रीचे भावबंध जपणाऱ्या सर्व मैत्रिणींना शतशः प्रणाम!! 🙏

-मी मधुरा..
२४ ऑक्टोबर २०२०

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

Thursday, October 22, 2020

नवरात्र नात्यांचे: सातवी माळ - 'नणंदा-भावजयां'ची!!

 🌸सातवी माळ - दोन घराच्या दोन लेकींची 'नणंदा-भावजयां'ची!!... 🌸



फोटो सौजन्य: डॉ. सौ. अंजली गुप्ते 
( माझ्या नणंदेकडचे नवरात्र )


नणंदा भावजया दोघी जणी 
घरांत नव्हतं तिसरं कुणी.. 
शिंक्यावरच लोणी खाल्लं कोणी?
नणंद:- आता माझा दादा येईल गं.. वहिनीचं गाऱ्हाणं सांगीन गं...  ‘दादा तुझी बायको चोरटी'... 
दादा:- घे काठी लगाव पाठी
नणंद:- घरादाराची लक्ष्मी मोठ्ठी.. 

हे भोंडला, हादगा मध्ये म्हटलं जाणार गाणं, ‘नणंद-भावजय’ नात्याबद्दल बरचं काही सांगून जातं.. 

एकमेकींवर, अगदी अधिकारानं केलेल्या रुसव्या फुगव्यात, चुगल्यात, कधीही टोकाचा वाईटपणा येणार नाही हा विश्वास असलेलं, नणंद-भावजयीचं असं मैत्रीचं पण खट्याळ नातं.. 
वहिनीचं गाऱ्हाणं दादाशी करताना, दादानं वहिनीला सजा सुनावली तर लगेच वहिनीच्या लक्ष्मीपणाची आठवण, दादालाच करून देणारी त्याची लाडकी बहीण, घराचं चैतन्य.. 
वहिनीची कायम कठोर समीक्षक आणि समर्थक असणारी अशी ही नणंद.. 

नणंद आपल्या आयुष्यात येते तो क्षण किती मार्मिक असतो ना?..  बोहल्यावर चढलेली नववधू, डबडबलेल्या डोळ्यांनी वरमाला घालते.. आणि वराच्या मागे करवली म्हणून उभी असलेली नणंद तिला दिसते.. पुढे येऊन आश्वासक नजरेनं कलाशातल्या पाण्याची दोन बोट नववधूच्या डोळ्याला ती लावते.. जणू काही वहिनीच्या डोळ्यातलं पाणी पाण्यानच पुसून, या नात्यातला ओलावा प्रस्थापित करते.. दिव्यानं ओवाळून तिचं नवीन घरात स्वागत करते.. आणि नवसंवादाचं, अधिक अधिकाराचं, नवऱ्याच्या खास लाडाचं नणंदेचं नातं, आपला बाज दाखवत नववधूच्या आयुष्यात येतं.. 

कधी भरजरी तर कधी रंगीबेरंगी, कधी टोचणारे तर कधी रेशमी, कधी मखमली, कधी कडक तर कधी मायेनं चिंब भिजवणारे, कधी टचकन डोळ्यात पाणी आणणारे तर कधी भरलेले डोळे टिपणारे.. असे नणंदपणाचे अनेक पदर आपल्या दैनंदिन जीवनात आपसूक गुंततात.. आणि भावबंधांची रेशमी वीण गुंफत जाते.. 

सुखदु:खात धावून येणारी.. सणासमारंभात, कार्यात आपलं अस्तित्व ठळकपणे जाणवून देणारी.. आली नाही तर कमी जाणवणारी.. कायम भावजयीला अप्रत्यक्षपणे धाकांत ठेवणारी.. आणि टाळू म्हटलं तरी मनापासून टाळता येणं शक्य नसणारी.. रागावली तर मनांला हुरहूर अन् सुखावली तर धन्यता वाटेल.. अशी विदूषी म्हणजे नणंद.. या विदूषीचं मन सांभाळणं फारसं कठीण ही नसतं.. नणंदच्या मनातलं माहेर भावजयीनं जपलं की हे नातं कसं छान बहरतं जातं..  

भाऊ तो आपला, भावजय का लोकाची?
माहेरी जाऊन मनं राखावी दोघांची... 
अशी नणंद असेल तर त्याच्यातील नातं नणंद, मैत्रीण, बहीण ह्या चौकटी बाहेर फुलतं.. मग ह्या नात्याला वय नसतं.. तिचा प्रेमळ हवाहवासा वाटणारा दरारा नात्याबरोबर सुरू होतो आणि आपल्याबरोबरच संपतो.. 

अर्थात नणंदेनं सुद्धा भावजयीला तो मान देणं आवश्यक असतंच.. तिच्या आईवडिलांची काळजी घेणारी, माहेर समृद्ध करणारी, भावाची सहचारिणी म्हणून.. एकानं प्रेम दिलं अन् दुसऱ्यानं प्रतिसादच नाही दिला तर.. प्रेम म्हणजे प्रतिसाद.. नणंद भावजय जेव्हा एकमेकींना प्रतिसाद देतात, तेव्हाच या नात्याचे सुरेल पडसाद उमटतात..

नणंद-भावजय-भाऊ या त्रयीतील गोडवा, माधुर्य, स्निग्घता 'शिक्यातलं लोणी अगदी राजरोसपणे खाऊन' जपूया.. 

नातं प्रेमाचं, नातं मैत्रीचं 
नातं आपुलकीचं, नातं विश्वासाचं 
नातं साऱ्या बंधना पलीकडचं 
        .... असं नातं असतं नणंद-भावजयीचं.. 
थोडं हसरं, थोडं रूसवं 
थोडं बोलकं, थोडं रडकं 
असतं मात्र खेळीमेळीचं 
       .... असं नातं असतं नणंद-भावजयीचं.. 
दोन घरच्या दोन लेकी 
होऊन जातात एकरूपी
जगता हे बंधन प्रेमाचं 
        .... असं नातं असतं नणंद-भावजयीचं.. 

ह्या नणंद-भावजयीच्या चिरंतर नात्याला शतशः प्रणाम! 🙏

-मी मधुरा..
२३ ॲाक्टोबर २०२०

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

Wednesday, October 21, 2020

नवरात्र नात्यांचे: सहावी माळ - मायेच्या सावलीची 'बहिणी'ची!!

 🌺सहावी माळ - मायेच्या सावलीची 'बहिणीची'..🌺



फोटो सौजन्य: सौ. ऋतुजा कुलकर्णी 
(माझी आत्येबहीण) 

आपली सुख-दुःखं वाटून घेणारी.. गुपितं पोटात लपविणारी.. पार्टनर इन क्राईम.. आपली बहीण.. 

कधी आई.. कधी बहीण.. कधी मैत्रीण.. तर कधी लेक.. अश्या नानाविध नात्यांची नटलेलं हे अनोखं नातं.. बहीण.. 

मोठ्या बहिणीत आपसूकच अधिकाराने ताईगिरी येते.. तो अधिकार ही लहानग्यांनी तिला प्रेमाने दिलेला असतो.. 
तिच्या काळजीला, तिच्या धाकाला, तिच्या रागावण्याला एक आईपणाची झालर असते.. 'उगाचच आई बनू नको'.. ह्यावर ताईबाईंचं म्हणणं असतं.. 'आई नसताना मीच तुमची आई..' आणि ह्याला ती आयुष्यभर जागते.. मायेची, ममतेची सावली बनून.. चुकलं तर कान धरून.. 

बहिणींचे हे नातं मायलेकीचं नातं बनून जातं.. लहान बहिणीचं लेकी प्रमाणं हट्ट करणं, रुसून बसणं, जीवापाड प्रेम करणं.. आणि मोठ्या बहिणीने ते तितक्यचा ताकतीनं पेलणं.. हे नात्यातील विश्वासनेच शक्य आहे.. 

गुजगोष्टी करायला, मन मोकळं करायला, हिंडायला-फिरायला, जगावरचा राग व्यक्त करायला.. एक हक्काची मैत्रीण बहिणीच्या रूपात असते.. ती एक सायलेंट सपोर्टर ही असते.. 

बहीण ही एक भावना आहे.. सख्खी बहीण, चुलत बहीण, आत्ये बहीण, मावस बहीण, मामे बहीण, अगदी मैत्रीणीत सुद्धा ही भावना असते.. त्यासाठी 'बहीण' हे रक्ताचं नातं असायची गरज नाही.. 'बंधुत्व' सारखा इंग्रजीत ह्या नात्याला 'Sisterhood' असा शब्द आहे.. 

"A sister is a gift to the heart, a friend to the spirit, a golden thread to the meaning of life." Isadora James .. हे मला खूप भावलं.. 

"Sisterhood means loving and accepting someone where they are, but consistently inspiring them to their highest potential" किती सुंदर अर्थ आहे ना, बहीण ह्या नात्याचा?.. जसं आहे तसं स्वीकारून, प्रेम देऊन ध्येयाप्रत पोचण्यासाठी सतत प्रेरणा देणं.. असं हे नातं.. 

आपली सगळीच नाती मग ह्या sisterhood मध्ये जोडली जातात.. नाही का? 

लग्नानंतर जोडलेलं 'जाऊ' हे नातं सुद्धा!.. खरं तर तिखट, आंबट, गोड, खारट सगळ्याच चवींनी परिपूर्ण असणारं हे नातं.. 

जी 'co-sister' असते.. जी sisterhood नातं नावातही जपते 😊..  

जिच्या बरोबरच्या नात्यानं आपण एक घर समृद्ध करत असतो.. आणि सासू, सासरे, दीर, नणंद ही नाती जपत असतो.. 

जी आपल्या सुख-दुःखात, यश-अपयशात आपल्या मागे खंबीरपणे उभी असते.. 

( माझ्या वाचनात आलेल्या काही ओळींवर आधारित.. )

म्हंटलं जावेला बहीण तरी,
असते माया तिची नारळ-फणसा परी 
आतून गोड रसाळ बाहेरून कडक काटेरी.. 

झालं भांडण तरी,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना 
त्यांच्या नवरोबांना मात्र हे कोडे उलगडेना.. 

असली मतं भिन्न तरी,
दोघी बनतात एकमेकींचा आधार 
सासू समोर लागते उंदराला मांजर साक्षीदार.. 

किती ही भेद असले तरी, 
आजारपणात उशाशी येऊन बसते 
तू आराम कर, बाकी सारं मी पाहीन म्हणते.. 

कशी असली तरी,
जावेला नाही कशाची ही तोड
वरणभाताबरोबर जशी लोणच्याची फोड....

ह्या मायेच्या सावलीला, Sisterhood भावनेला शतशः प्रणाम!! 🙏

-मी मधुरा..
२२ ऑक्टोबर २०२०

ऑडिओ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Tuesday, October 20, 2020

नवरात्र नात्यांचे: पाचवी माळ - 'आजोळ समृद्ध करणाऱ्या नात्यां'ची!!

 🌼पाचवी माळ - 'मावशी' आणि 'मामी' ह्या आजोळ समृद्ध करणाऱ्या नात्यांची.. 🌼


फोटो सौजन्य: अरुण लागू 
(मावशीकडचे नवरात्र)
 
झुक झुक झुक करत आपल्या नात्यांची गाडी आता आजोळी येऊन थांबली.. आईच्या बरोबरीने आपल्यावर मायेची पाखरण करणारे कोणीतरी या जगात आहे, याची जाण देणारे हे ठिकाण.. शक्यतो आईच्या बाजूच्या नात्यांकडे म्हणजे काकापेक्षा मामा, आत्यापेक्षा मावशी, आजोळचे आजी-आबां यांच्याकडे आपला ओढा जास्ती असतो. ‘माय मरो मावशी उरो’ सारखी म्हण याची साक्ष देते. याचा अर्थ असा नाही की आईची काही किंमत नाही.. आईची जागा कोणीच भरून काढू शकत नाही.. पण तिच्यासारखे प्रेम देणारी, काळजी घेणारी एक व्यक्ती असते ती म्हणजे आपली 'मावशी'! 

मावशी, जिच्यात आईचा भास असतो.. 'माँ के जैसी, ती मा-सी'!... जिच्याशी एक सुंदर भावनिक नाते असते.. बरेचदा आईला एखादी गोष्ट पटवायला मावशीच मदतीला येते.. “तू सांग ना तिला! ती आमचे नाही पण तुझे ऐकते” ही मस्केबाजी हमखास कामी येते.

मावशी या नात्याला वय नसतं.. 'काकू' म्हटलं तर “माझे काय वय झालेय का” किंवा न आवडल्याचा कटाक्ष असतो.. पण 'मावशी' म्हटलं तर चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतं.. आपण सहजपणे आईच्या मैत्रिणीला 'मावशी' तर मैत्रिणीच्या आईला 'काकू' म्हणतो..

खूपदा, दोन बहिणींच्या शिस्तीच्या कल्पना परस्परविरोधी पाहायला मिळतात.. त्यामुळे मावशीच्या घरी भाचरे कायमच खुश.. मावशी जर लहान असेल तर ती आईपेक्षा मॉडर्न किंवा मोकळ्या विचारांची वाटते तर आईपेक्षा मोठी असणारी जास्त शांत आणि प्रगल्भ.. काहीही असो पण हे नातं मात्र खास असतं.. 
 
नकळतपणे ती भाचरांची रोल मॉडेल बनते.. तिची फॅशन, कपड्याची स्टाईल, केसांची ठेवण असो वा तिच्या हातचा एखादा पदार्थ.. मनात कुठेतरी घर करून जातो.. 

अशी काही नाती असतात, जिथे आपण 'असे का वागतोय' याचा खुलासा करायची गरज पडत नाही.. त्या नात्यात एक नाते नक्की असते.. ते 'मावशी'चे!! 

तगडग तगडग घोडोबा.. 
घोड्यावर बसले लाडोबा.. 
लाडोबाचे लाड करतंय कोण?
आजी-आबा अन मावश्या दोन.. 

हे झालं मावशीचे कौतुक पण.. आजोळी आपले लाड करणारी, अजुनी एक व्यक्ती असते ती म्हणजे आपल्या लाडक्या मामाची मामी.. 

आपल्या बडबडगीतातील 'शिकरण खाऊ घालणारी', 'भाच्यांना पोरटी म्हणणारी'.. अशी ती, एका बंगाली बडबडगीतात तर चक्क मारकुटी आहे.. माझ्या एका बंगाली मैत्रिणीने माझ्या मुलीला ते गीत शिकवलं होतं.. 

ताय ताय ताय मामा र बारी जाय.. (टाळ्या टाळ्या टाळ्या मामाच्या गावाला जाउया)
मामा दिलो दूधो भातो, दुयरे बोशे खाय.. (मामा देईल दूध भात, अंगणात बसून खाउया)
मामी आयी दंडिया निये, (मामी आली काठी घेऊन)
पलाय पलाय पलाय...  (पळा पळा पळा) 

पण खरंच मामी अशी असते का?.. तिला असे व्हिलन का बरं केलं असेल? आई आणि आजी यांचं तिच्याशी असलेलं नातं? का त्यांची मामाबद्दलची असुरक्षितता?.. 

आईला माहेरपण देणारी, वन्स-ताई म्हणत मागंमागं असणारी, अडीअडचणीला लगेच धावून येणारी, कार्यात बॅकस्टेज सांभाळणारी.. मामी..  

वर्षभर भाचरांची वाट पाहणारी.. तुम्ही आलात कि घर कसं गोकुळ होतं म्हणणारी.. न्हाऊ माखू घालणारी, आवडीचा खाऊ करणारी... मामी.. 

ठेवणीतले पैसे काढून भाचरांचे लाड पुरवणारी, कौतुक करणारी, सुट्टीतल्या सिनेमा-नाटकांचा, छोट्या छोट्या सहलींचा हक्काचा सोबती... मामी.. 

एकीकडे उच्छाद मांडलाय नुसता म्हणणारी पण शांतता होताच कावरी बावरी होणारी, आंब्याच्या दोन कोयी भाचरासाठी बाजूला काढून ठेवणारी.. मामी..  

भाची मोठ्ठी होत असताना नकळत दागिना देणारी, लग्नात 'मुलीला आणा' म्हणता क्षणी मामाच्या मागे उभी राहून डोळ्याला पदर लावणारी... मामी.. 

प्रेमाच्या विविध छटा असणारी मामी.. तुसी ग्रेट हो... 

आजोळ समृद्ध करणाऱ्या मावशी आणि मामी तुम्हाला शतशः प्रणाम!!🙏

-मी मधुरा..
२१ ऑक्टोबर २०२०

ऑडिओ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Monday, October 19, 2020

नवरात्र नात्यांचे: चौथी माळ - 'काकू'ची!!

 🌸चौथी माळ - 'काकू'ची!!.. एका गोड नात्याची.. 🌸




फोटो सौजन्य : सौ सुषमा काकू

'काकू' एक आई समान असणारं गोड नातं.. आपल्या लाडक्या काकाच्या सहचरणीचं.. काका मोठ्ठा असेल तर थोडं धाकाचं आणि लहान असेल तर थोडं मस्तीचं.. काकाच्या प्रेमात वाटेकरी आली म्हणून, खट्टू झालेलं मन काकूच्या प्रेमानं ओसंडून वाहू लागतं आणि काका पेक्षा 'काकू'चं नातं घट्ट होऊन जातं..

काकूच्या रूपात कधी आई भेटते, कधी मैत्रीण तर कधी मोठ्ठी बहीण.. चर्चा करायला, हट्ट करायला, रुसवा काढायला, अगदी चिडचिड व्यक्त करायला मिळालेलं हक्काचं आपलं माणूस असते 'काकू'.. माझ्या जडणघडणीत 'काकू' ह्या नात्याचा खूप मोठ्ठा वाटा आहे.. एकत्र कुटुंबामुळे 'काकू' कधी नाही असे झालेच नाही.. 'काकू' शिवाय मी माझे बालपण इमॅजिनच करू शकत नाही.. आजी-आबा, आई-बाबा, काका-काकू, आत्या ह्या सगळ्या नात्यांनी समृद्ध झालेलं बालपण आठवतं आणि भाग्यवान असल्याचं शिक्कामोर्तब होतं!

'काकू' हे नातं 'काकाची बायको काकू' ह्या पुरतं मर्यादित बिलकुल नाही.. आईच्या मैत्रिणी, बाबांच्या मित्रांच्या बायका, मित्र-मैत्रीणींच्या आया, एखादी मध्यमवयीन अनोळखी बाई सुद्धा 'काकू' ह्या नात्यात सामावून जाते.. ह्या 'काकू' जाणता अजाणता आपल्या मनावर, आपल्या विचारांवर छाप सोडून जातात.. नवनवीन गोष्टी करायला उद्युक्त करतात.. आपल्या प्रेरणास्रोत बनतात.. 

मावशी-आत्या ही नाती जितक्या सहजतेने आपण स्वीकारतो तितक्या सहजतेने 'काकू' हे नातं स्वीकारलं जात नाही.. कदाचित 'काकू' म्हटलं कि उगीचंच मोठठं झाल्या सारखं वाटतं.. लग्न झाल्यानंतर चिकटलेलं हे नातं जबाबदारीची जाणीव ही करून देतं.. कालची 'ताई' आज लग्न झाल्यावर एकदम 'काकू'च होऊन जाते.. शेजारची कॉलेजमध्ये जाणारी मुलगी, जेव्हा नवीन लग्न झालेल्या मुलीला, 'काकू' म्हणून संबोधते, तेव्हा तो काय हृदयद्रावक प्रसंग असेल, हे त्यातून गेल्याशिवाय नाही कळायचं..  
   
त्याचबरोबर 'काकू' ह्या शब्दाशी असलेलं 'काकूबाई' हे जीवघेणं शब्दवलय... त्या मागचं हे कारण असू शकेल का?.. काकूबाई म्हटलं कि एक बावळट्ट ध्यान डोळ्यासमोर उभं राहतं.. आणि ह्या शब्दाबद्दल नकारात्मक भाव निर्माण होतो.. नात्याव्यतिरिक्त कोणी काकू म्हटलं कि "ऑंटी मत कहो ना.." हे बॅकग्राऊंड स्कोर सारखं वाजू लागतं.. "काकू नको ना म्हणू.. हवं तर मावशी म्हणं, आत्या म्हणं नाहीतर चक्क नावाने हाक मार.." असं म्हणावंसं वाटतं.. (डिस्क्लेमर: मला काकू म्हटलेलं आवडतं 😁)

कोण म्हणे काकू तर कोण म्हणे काकी 
मी तर आहे तुमच्या काकाची लाडकी
  
कोण म्हणे मोठ्ठी आई तर कोण म्हणे धाकटी 
तुम्हा सगळ्या पुतण्यांशिवाय पडते मी एकटी 

होते जशी थट्टा, म्हणतात मला काकूबाई 
सांगावे वाटते ओरडून, माझ्यात ही वसते आई
 
माहिती आहे, आई आणि मी नाही सख्या बहिणी 
भावकी निभावत निभावत बनतो मात्र पक्या मैत्रिणी
 
हवा आहे थोडा वेळ, थोडी मशागत आणि थोडं प्रेम 
निभावून सारी नाती जिंकूया नात्यांचा बिगबॉस गेम

अश्या 'काकू' ह्या गोड नात्याला शतशः प्रणाम!! 🙏

-मी मधुरा.. 
२० ऑक्टोबर २०२०

ऑडिओ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

Sunday, October 18, 2020

नवरात्र नात्यांचे: तिसरी माळ - 'आत्या'ची!!

 🌺तिसरी माळ - प्रेमळ, लाघवी 'आत्याची'!!🌺



फोटो सौजन्य : सौ. विजू आत्या.. 


माझं लाडकं नातं.. ज्यानं मला भरभरून प्रेम दिलं.. निर्व्याज प्रेम..

'आत्या'बद्दल लहानपणापासून आपल्या मनात हळवा कप्पा असतो, नाही का?.. आजी-आबांनी आपल्याला सांगितलेले न संपणारे आत्या-बाबांचे किस्से, त्यांना आत्या भाचरात दिसलेले साम्य.. त्यामुळे 'आत्या' तर सतत आपल्या बरोबरच असते.. कधी त्यांना तुमच्यात आत्याची झलक दिसते.. कधी तुमचे हसू तिच्या सारखे असते, तर कधी तिच्या गालावरची खळी तुमच्या गालावर खुलते.. नाहीतरी असे म्हणतातच ना, 'खाण तशी माती आणि आत्या तशी भाची'.. भाची असो वा भाचा आत्यासारखं वागतात-बोलतात असं त्यांना वाटत असतंच.. आणि हाच दुवा ह्या दोन मनात, ह्या नात्यात दिसतो..

आत्याबाई ते आत्या, आत्या ते आत्ती, आत्ती ते आत्तू.. हा ह्या नात्याचा प्रवास फार गोजिरवाणा आहे.. आहो आत्याबाई मधला दरारा आत्तू म्हणताना होणाऱ्या क्यूटश्या चंबूने केव्हाच हद्दपार केला आहे..

आत्या हे नातं एका मुलीसाठी सासर-माहेर बांधणारं आहे.. आत्या-भाचीचे (भाचरांचे) हे नाते अनोखे आहे.. नाजूक भावनांच्या धाग्याने जोडलेले.. एकाच घरातील एक अनुभवी भूतकाळ तर एक आशादायी भविष्य!! 

खूपदा 'आत्या' ह्या नात्याची तुलना 'मावशी' ह्या नात्याशी करून 'आत्या'ला थोडेसे लांब ठेवले जाते.. ह्या गोड नात्याला असं लांब का ठेवलं असेल? बाबांकडंच नातं म्हणून??.. आई आणि बाबा यापैकी आईला मिळालेलं जास्तीचं भावनिक महत्व.. आणि पर्यायानं आईकडच्या नात्यांची झालेली जपणूक.. की आत्या आणि आईचं  एकाचवेळी माहेरी जाणं.. आणि त्यामुळे नकळत आलेला दुरावा?.. की आई आत्याचं असणारं नातं?.. हे नातं जपायला, जोपासायला आईचं मोठ्ठ योगदान लागत असावं.. जेव्हा आजूबाजूला असं दुरावलेलं आत्याचं नातं पाहिलं जातं, तेव्हा मनात हे विचार येऊन जातात..  

असे तर नसेल?... आत्या ह्या व्यक्तिमत्वाचा एक दबदबा निर्माण केल्याने, ती धीरगंभीर, सागराप्रमाणे, वटवृक्षासारखी भासत असावी.. पायांना वाकून नमस्कार करावा तर आत्याला आणि खांद्यावर हात ठेवावा तर तो मावशीच्या.. हिरवागार निसर्ग पाहिला की मावशी आठवावी आणि धीरगंभीर निळं आकाश पाहिलं की आत्या.. मैत्रीचा हात पुढे करावा तो मावशीने आणि आशीर्वादासाठी हात उंचवावा तो आत्याने.. 

पण तरीही, प्रत्येक भाचीच्या हृदयामध्ये, तिच्या आत्याची खास अशी एक जागा असते.. कारण तिच्या आत्याची छबी तिच्यात असतेच असते.

स्त्रीच्या अनेक रूपातील, एक ह्या आत्याबाई 
पण ह्यांच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही

माहेरच्या घरी-दारी म्हणतात ह्यांना खमक्या               
ताई, वन्स, आत्या रूपाने आहेत पाठीराख्या 

नामकरण सोहळ्यात असते ह्यांची खूपच घाई 
ठेवून पाळण्यात बाळाला आनंदाने गाणं गाई 

भाचरांसाठी असतो हळवा कप्पा ह्यांच्या मनात  
अन असतो सदैव आशीर्वादासाठी डोक्यावर हात 

अश्या ह्या निर्व्याज प्रेम करणाऱ्या 'आत्या' ला शतशः प्रणाम!! 🙏

-मी मधुरा.. 
१९ ऑक्टोबर २०२०

ऑडिओसाठी येथे क्लिक करा

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Saturday, October 17, 2020

नवरात्र नात्यांचे: दुसरी माळ - ‘आजी’ची!!

🌼दुसरी माळ - मायेच्या अथांग सागराची, ‘आजी’ची!! 🌼


फोटो सौजन्य: बाबा (मळ्यातील देवीचे नवरात्र)


'आजी'.. आपल्याला मिळालेलं एक वरदान.. प्रेम, माया, ममता, आशीर्वाद यांचा न संपणारा जादूई खजिनाच!!.. 

'आई हे एक गांव असतं' तसं 'आजी हे एक जग असतं'... तीन पिढयांना सामावून घेतलेलं, अनुभवसंपन्न, प्रेमाने व्यापलेलं असं एक अदभूत जग.. 

'आई'ची 'आजी' होताना पाहणं म्हणजे एक 'परकाया प्रवेश' पाहण्यासारखे आहे.. आईचे आपल्यासाठी असलेले कायदे कानून, बंधने, ती आजी झाली कि साफ मोडीत निघतात.. खरचं गेली अमुक एक वर्षे आपण ओळखत असलेली ही 'स्त्री' आपली 'आई'च आहे का अशी शंका येण्या इतके.. कर्तव्यपूर्ती नंतर विसावा घेताना, नातवंडांबरोबर गवसलेलं बालपण परत जगताना, हा बदल होत असेल का?.. कदाचित ह्या बदलाचे, ‘आजी' ह्या नात्याचा तिला झालेला परिसस्पर्श, हेच गमक असेल..

आजी म्हटलं कि अजुनी ही नऊवारी साडीतील, अंबाडा घातलेली मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते.. आजी होण्यासाठी ह्याची गरज नाही हे आजकालच्या पाचवारी साडी, सलवारकमीझ, वेस्टर्न ड्रेससेस घालणाऱ्या, केसांचा छानसा बॉब ठेवणाऱ्या, स्वतंत्र विचारणाच्या आजींनी दाखवून दिले आहे.. आजी होण्यासाठी जाव्या लागतात त्या फक्त २ पिढ्या.. आणि त्या दोन पिढ्यांच्या प्रवासातून तयार झालेलं हळवं मन.. 

'आजी' हे नातं फक्त बाबांची आई, आईची आई इथवर सीमित न राहता ते आजीच्या मैत्रिणी, तिच्या बहिणी, मित्र-मैत्रिणींच्या आजी सर्वत्र पसरलेलं असतं.. एकादी अनोळखी स्त्री सुद्धा आजी बनून काळजाला स्पर्शून जाते..

( कवी ग.ह.पाटील यांच्या ‘देवा तुझे किती सुंदर आकाश' ह्या कवितेवर आधारित.. )

आजी तुझे किती सुंदर हे रूप 
सुंदर ते हात, बोल ही सुंदर  
सुंदर डोळे लाघवी प्रेमळ
कुशीची गोडी अवीटच.. 

सुंदर तुझी गोष्ट, खाऊ ही सुंदर 
कडू पण, सुंदर तो बटवा तुझा..  
सुंदर वडाच्या सुंदर पारंब्या 
तशी आम्ही नातवंडं आजी तुझी.. 

आठव तुझा डोळा आणे पाणी 
पांघरता तव गोधडी येई सय.. 

अश्या ह्या न अटणाऱ्या मायेच्या अथांग सागराला, 'आजी'ला शतशः प्रणाम!! 🙏

-मी मधुरा.. 
१८ ऑक्टोबर २०२० 

ऑडिओ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Friday, October 16, 2020

नवरात्र नात्यांचे: पहिली माळ - 'मातृदेवते'ची!!

 🌸पहिली माळ - मातृदेवतेला!! 🌸



फोटो सौजन्य: देवांग पटवर्धन 
(आईकडचे नवरात्र)

नक्कीच!! पहिली माळ ही आईलाच, आपल्या जन्मदात्रीलाच.. नाही का?.. जिच्यामुळं हा जन्म मिळाला आणि ह्या सुंदर जगाशी आपलं नातं जोडलं गेलं.. 

नेहमीच मला आई बद्दल लिहिताना शब्द तोटके वाटतात.. कोणाला तिच्यात अख्ख विश्व सामावलेलं दिसतं तर कोणी तिला देवत्व बहाल करतं तर कोणी आणखी काही.. पण शेवटी आई ही आईच असते.. तिला कोणत्याही एका साच्यात बसवता येत नाही.. प्रेमळ, महान, कर्तृत्ववान अशी विशेषणं ही आईला लावणं मला स्वतःला पटत नाही.. ही विशेषणं तिच्यातील एका स्त्रीसाठी असू शकतात पण आईसाठी नाहीत.. 

करुणा, माया, ममता, वात्सल्य ह्या भावना ज्याच्याठायी तो 'आईस्वरूप' जाणावा.. म्हणूच गुरु, विठोबा, ज्ञानोबा ह्यांना आपण 'माऊली' म्हणतो, आईस्वरूप मानतो..  

खरं तर मी 'Daddy's little Princess', 'पपा की परी'.. -आई काय असतेच- हे attitude.. पण आई ह्या नात्याची नजाकत मी आई झाल्यावरच मला कळाली.. जिला आयुष्यभर गृहीत धरले जाते, ती आई, असे गृहीत धरण्यात सुद्धा तिचे आईपण निभावत असते.. अश्यावेळी म्हणावसं वाटतं "किस मिट्टीकी बनी हो तुम माँ?"

मुलीला वाढवताना जेव्हा आईचेच शब्द तोंडातून बाहेर पडतात तेव्हा करेक्ट रस्त्यावर आहोत ही पावती मिळते 😊 
 "Why are you annoying?" ह्या प्रश्नाला  ".. Beacuse I'm your Mom.." असे उत्तर देताना वेगळेच समाधान मिळते.. लहानपणी मी जेव्हा वैतागायचे, तेव्हा वाटायचं, एक दिवस 'आईची आई' व्हायला मिळायला पाहिजे.. 
ग.दि.मा. च्या भाषेत सांगायचे तर.. 
"आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई
नको बोलणी खारट आंबट, विटले मी विटले बाई"... 
आईची आई झाले नाही पण आईसारखीच आई मात्र नक्कीच होते आहे.. 😁

अजुनी एका नात्याला ह्या माळेत मला गुंफायचय..  

'अहों'ची मातृदेवता.. 'सासुबाईं'.. 'अहो आई' 'आमच्या आई'.. लग्नानंतरचं खास पण नाजूक असं नातं.. 
सासरच्या पद्धती, रिती-रिवाज, आवडी-निवडी शिकविणारी.. ते सारं अंगवळणी पडेपर्य॔त सांभाळून घेणारी.. अशी ही आई.. 
पण ह्या आईला वेगळीच भावनिक झालर आपसूक लागते.. कसं का होतं? सासूबाई 'अहो आई' असल्या तरी त्यांच्यात ही आई आहेच ना? त्या आई मागच्या 'अहो' ची 'अगं' करण्याचा हट्टाहास सोडला तर हे नातं, घट्ट नातं होऊ शकेल का?.. विचार करायला काय हरकत आहे?..
    
ज्या मनात वसते माया, त्या मनात असते आई!
ज्या उरास फुटतो पान्हा, त्या उरात असते आई!
अखंड वात्सल्याच्या पाझरात असते आई!
कावरा-बावरा होतो त्या जिवात असते आई!
त्या अंगाई गुणगुणणार्‍या स्वरात असते आई!
ते घर होते नंदनवन, ज्या घरात असते आई! 
लहान पुन्हा मी व्हावे, आईच्या कुशीत शिरावे,
प्रेमाने चिंब भिजावे, जीवनी कृतकृत्य व्हावे.. 

खरंच, काही मोजक्याच जागा अशा असतात कि जिथं आपण कायम लहानच असतो! 

आई, आमच्यासाठी केलेल्या सर्व कष्टांना, आमच्या कल्याणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांना प्रणाम!

आई, तुला कोटी कोटी प्रणाम!! 🙏

-मी मधुरा.. 
१७ ऑक्टोबर २०२०

ऑडिओ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

Thursday, October 15, 2020

नवरात्र नात्यांचे..

उद्या पासून सुरु होणाऱ्या नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा!!





 प्रचि: गुगल साभार


मग, झाली का तयारी? ह्यावर्षी काय पॅनडॅमिक आणि पावसामुळं भेटीगाठी, गरबा, दांडिया असे प्लॅन्स तर पाण्यातच गेलेत.. पण ह्यातून ही काहीतरी मार्ग निघेल अशी अशा करूया.. 


आत्तापर्यंत जसजशी आपली जीवनपद्धती बदलत गेली तसतशी सणवार साजरे करण्याची पद्धत पण बदलत गेली.. पूर्वी घरातील समया, दिवे लखलखयाला लागले कि समजायचे नवरात्र जवळ आले.. पण आता ते काम सोशल मीडिया करते.. नवरात्रीच्या नऊ रंगांची उधळण करत, गरबा दांडियांनी पर्सनल, फॅमिली कॅलेंडर्स भरू लागतात.. नऊ दिवसांचे उपवास करून वजन कसे कमी करता येईल ह्यावर चर्चा रंगतात.. परमार्थात थोडा स्वार्थ साधायचा प्रयत्न!!.. 😉.. आता नवरात्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन ही बदलतोय.. मंदिरात पाहिलेल्या, कथा पुराणात ऐकलेल्या देवींना खऱ्या आयुष्यात शोधण्याचा प्रयत्न सुखावणारा आहे.. जीवन समृद्ध करण्याऱ्या नात्यात ह्या शक्ती जोपासण्याचा दृष्टीकोन हे ह्या पॅनडॅमिकसाठी उत्तम उदाहरण.. 


प्रत्येकाच्या आयुष्यात उलथापालथ करणाऱ्या २०२० चा मी जेव्हा विचार करते, तेव्हा वाटतं, खरचं ह्या वर्षाने आपल्याला काय दिलं?... भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या २०२० ने खरचं काय शिकवलं? ह्यावर बऱ्याच लोकांची बरीच मते, बरेच विचार असतील ही.. पण 'उन्नीस-बीस' मधला फरक ह्या वर्षाने दाखवून दिला हे मात्र नक्की! 😁 


माझ्यासाठी सांगायचे झाले तर, सोशल डिस्टंसिन्ग शिकवत याने जशी माझीच माझ्याशी ओळख करून दिली तशीच नात्यांची वीण पण घट्ट विणून दिली.. बिझी रुटीनमुळे, जिओग्राफिकल डिस्टन्समुळे धूसर झालेली नाती 'zoom' मुळे चमकायला लागली.. 'छोड आये हम वो गलिया...' हे खोटे ठरवत 'वो गलिया' परत नव्यानं  उजळू लागल्या.. मित्र मैत्रिणीबरोबर, नातेवाईकांबरोबर तेथं फेरफटका होऊ लागला.. त्यांच्या बरोबरच्या मीटिंग्सनी कॅलेंडर्स भरू लागली.. मावसभावाचा लग्नाचा २५वा वाढदिवस, मावशीचा ८०वा वाढदिवस ते भाचीचा साखरपुडा, शाळा कॉलेजच्या मैत्रिणींबरोबर मासिक गाठीभेटी, गेट टुगेदर्स.. इतक्या वर्षात मागे पडलेलली नाती नव्याने बहरू लागली.. 'ह्या pandemic मध्ये आपण एकटे नाही'.. 'बहारे फिर भी आयेगी'... 'this shall pass'.. हा कॉन्फिडन्स ह्या नात्यांकडून नक्कीच मिळाला, मिळतो आहे..  


म्हणूनच ह्या नात्यांचा, रोजच्या जीवनातील देवींच्या ह्या रूपाचा उत्सव नवरात्रीत साजरा करूया.. रोज एका नात्याची माळ नव्याने गुंफूया.. 


तर मग भेटूया पुढचे नऊ दिवस रोज एका नात्याबरोबर.. 


-मी मधुरा.. 

१६ ऑक्टोबर २०२०


ऑडिओ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा