Tuesday, September 4, 2018

कृष्णसखी राधा

कृष्णसखी राधा

एकदा तो मला म्हणाला
होशील का माझी राधा?
तू कृष्ण झालास तर..
का नाही होणार मी राधा?

म्हटलं, कृष्ण होईल तो असाही तसाही
पण मला राधा व्हावं लागेल..
सुख त्यागून, संचित अर्पून
अनेक दिव्यातून जावं लागेल...

बाहेरचं जग, आतलं मन,
दृश्य देह, अदृश्य आकर्षण
समाजाची बंधनं, स्वत:ची नीतीमत्ता
सगळं झुगारून, उत्कटतेन रितं व्हावं लागेल..

खरंच, जमेल हे मला?
तो कृष्ण झाला तरी होऊ शकेन मी राधा?
सर्वस्व उधळले तरच होईल ही निरागस बाधा
रंगून रंगात त्याच्या होईन कृष्ण सखी राधा!


-मी मधुरा.. 

************************************************

Wednesday, August 29, 2018

अरुणोदय : रोजचीच सकाळ

नुकतीच भारतवारीहून परत आले... दोन महिन्याच्या आरामानंतर आज पासून हि रुटीन सुरु झाले... जेटलॅग, इमोशनल स्ट्रेस बरोबर रुटीन सेट करताना जरा जडच जाते... सकाळी उठल्यानंतरची शांतता आज प्रकर्षाने जाणवली.. आईकडची सकाळ, सासरची सकाळ आणि इकडची सकाळ.. सकाळ एकच पण किती विविधता..

मला सकाळ म्हटले कि 'गावातील सकाळ' आठवते.. गावातील प्रसन्न सकाळ... सडा रांगोळी, देवपूजा, आरती ह्याच्याशी सांगड घातलेली सकाळ... 'घनश्याम सुंदरा' गाण्यातील सकाळ.. केरवारा, सडा-रांगोळी, दळणकांडण, देवपूजा, धारा झाल्यावर चारण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या गाई.. सगळे कसे लयीत... कसली गडबड नाही कि कसला गोंधळ नाही... अशी सकाळ मला अजुनी आकर्षित करते... लहानपण गावात गेल्याने असेल कदाचित... आता गावात हि अशी सकाळ पाहायला मिळणे कदाचित स्वप्नवत असेल...

प्रत्येक देशाची, प्रत्येक गावाची त्या त्या ऋतूची, प्रत्येक घराची एक सकाळ असते. ती तेथे राहूनच अनुभवावी लागते.

आई कडची सकाळ होते ती मोराच्या आवाजाने, पक्षांच्या किलबिलाटाने आकाशवाणीच्या साक्षीने.. सकाळी ५:५० पासून सुरु होणारे आकाशवाणी केंद्र रात्री झोपे पर्यंत सुरूच असते. अधून मधून प्रसारण केंद्रे बदलत राहतात इतकेच. आईकडच्या देवाच्या दिवसाची सुरुवात ही चहा पिऊन होते. चहाचा हा नैवेद्य पारोशाने दाखवला तरी चालतो. पूजेसाठी लागणारी फुले काढणे, नैवेद्यसाठी, चहासाठी ताजे दूध तापवणे, पहिला चहा करणे, त्याच्या नैवेद्य दाखवणे हे काम बाबांचे असते. चहा झाला कि बाबा घरातील श्वानाला बरोबर घेऊन चालायला जातात. बाबांनी दार उघडले कि सकाळ कशी घरात येते. बाबा घरातून बाहेर पाडण्यापूवी सडा घालून जातात मग रांगोळी काढायचे काम मात्र आईचे असते. गुरुजी पूजेला येण्याआधी म्हणजे सकाळी ६च्या आधी सडा रांगोळी झालेली असते. मग आईची पूजेची तयारी सुरु असते, वाहिनीबाईची धावपळ तर विचारायलाच नको.. एकाबाजूला चहाचे आधण असते तर एका बाजूला सकाळच्या नाश्त्याची, डब्याची तयारी सुरू असते . त्यात कचरेवला, पेपरवाला दूधवाला यांची ये जा सुरूच असते. शाळेची तयारी सुरु झाली कि घर खडबडून जागे होते. आजूबाजूची वर्दळ हि तोवर वाढलेली असते.. शाळेच्या रिक्षा, बस याचे आवाज, मुलांचा आरडाओरडा, त्यांच्या तालावर नाचणारे पालक, चालायला जाणारे आजी आजोबा सगळे कसे वातावरणात भरून राहते. ह्यात माझी मात्र बघ्याची भूमिका असते. जर का लुडबुड केली तर त्यांचे रुटीन बदलेल हि भीती असते.

त्या मानाने सासूबाईंकडची सकाळ अगदी शांत! दोघेच दोघे असल्याने असेल कदाचित... ब्रह्मविद्या, प्राणायाम याने त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. बिल्डिंग मध्ये असणारी वर्दळ, वेगवेगळ्या वेळेला येणाऱ्या अनेक शाळांच्या बस, सकाळी फिरायला-चालायला जाणारे लोक, गेटमधून ऑफिस साठी बाहेर पडणाऱ्या गाड्या अशा एक ना अनेक गोष्टी चालू असतात. पण बाहेरच्या ह्या गडबडीचा त्यांच्या सकाळ वर काहीच फरक पडत नाही. वर्तमानपत्रा बरोबर सकाळचा चहा होतो. सगळे एकत्र असू तर गप्पाचा पहिला अड्डा पहिल्या चहालाच सुरु होतो. पोळ्या करायला येणाऱ्या, भांडी केर फरशी करायला येणाऱ्या मावशी यांची ये-जा चालू होते.

येथे पोर्टलंड मध्ये रोजची सकाळ खूपदा पक्षांच्या किलबिलाटाने होते. पण बिछान्यातून उठल्यावर पहिल्यांदा पडदा बाजूला करून आज कमी पाऊस का जास्ती पाऊस, आज किती आभाळ आहे हे पाहिले जाते. खरे तर इकडे म्हणायला चार ऋतू आहेत पण ह्यातील तीन ऋतूत कमी जास्ती प्रमाणात पाऊसच असतो. रोजचे डबे करणे, ब्रेकफास्ट करणे, सकाळचे आवरणे, ऋचाला शाळेत सोडणे, दिवसभराच्या कामांचा पाढा वाचणे हे सर्व इथल्या दिनचर्येचा भाग आहे. इथली सकाळ हि आमच्या तिघांपुरती मर्यादित आहे. कितीही गडगड असली तरी ती आमच्या तिघांची असते... आरडाओरडा चिडचिड झाली तरी ती आमच्या तिघांची असते.. सकाळ कशी हि असली तरी ती एकदा घर बाहेर पडले कि ती गुड मॉर्निंग मध्ये बदलते.

सूर्य तर सगळीकडेच उगवतो पण ह्या वेगवेगळ्या गोष्टी, एकमेकांशी जोडली गेलेली माणसे ह्या सगळ्यामुळेच प्रत्येक घराची सकाळ खास असते... नाही का?


-मी मधुरा.. 

************************************************

Sunday, August 5, 2018

Happy FRIENDSHIP Day!!!

प्रिय मैत्री,

तुला प्रिय म्हणायलाच पाहिजे असे आजिबातच नाही. हो ना? जिथं तू आहेस तिथं प्रेम हे आलेच.. मैत्रीचा भावार्थच प्रेम आहे.. पण तुला पत्र लिहीते आहे म्हणून ओघाने प्रिय लिहीले गेले..

सर्व प्रथम तुला तुझ्या अस्तित्व दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!! Happy FRIENDSHIP Day!!!     

मैत्री, खरचं तू कोण आहेस? जेव्हा पासून मला आठवते तेव्हा पासून तू माझ्याबरोबर सतत वेगवेगळ्या रूपात वावरत असतेस.. अगदी सहज सावली सारखी... आई-बाबा, आजी-आबा, काका-काकू, आत्या-मामा, ताई-दादा पासून तुझी झालेली ओळख पूढे मित्र मैत्रिणींनी जपली... अगदी शेजारी-पाजारी सुद्धा ह्याला अपवाद नाहीत. 

मैत्री, आपले नाते खुप सुंदर आणि शाश्वत आहे.. तू जशी अलगद खांद्यावर हात ठेवून मी तुझी असल्याचा हक्क सांगतेस तितक्याच सहजतेने अश्रू आणि आनंद ही न सांगता टिपतेस.. तुझ्या समोर कोणत्याच भावना अव्यक्त राहत नाहीत कारण, तुझ्याशी बोलायला ना शब्दांची गरज आहे ना आनंद दाखवायला हास्याची आणि ना दुःख्ख सांगायला अश्रूंची!! एकमेकांचे वेगळेपण जपत इथवर मिळालेली तुझी साथ खूप मोलाची आहे..

मैत्री, तू माझ्यासाठी काय आहेस हे शब्दांत सांगणे केवळ अशक्य आहे..तू माझी आस आहेस.. तू माझा ध्यास आहेस... तू माझं सर्वस्व आहेस.. 

आणि काय लिहु?  तुला तर सगळेच माहिती आहे 😊


-मी मधुरा.. 

************************************************

Wednesday, August 1, 2018

खेळ दिवस रातीचा



रोज नव्याने उमलणारी कोवळी आल्हाददायक सकाळ
आणि काही काळानंतर मावळणारी ती धूसर संध्याकाळ
दिवसाच्या ह्या दोन्ही प्रहरीं अतिशय शीतल मोहक
शुभ्र मेघमयी पुंजक्यातून डोकावणाऱ्या या निळ्याभोर आकाशी
लाल गुलाबी केशरी नानाविध रंगानी साकारलेली ही नक्षी







रंगछटांचा हा विलोभिय खेळ आसमंती रंगतो
अदृश्य चित्रकाराच्या कुंचल्याची किमया सांगतो
दृश्य जरी सारखे तरी अंतर पळाचे दोहोंमधी 
आयुष्य, आयुष्य म्हणजे आहे तरी काय?
ह्या दोन पळात रोज नवा खेळ मांडून
जरा विसावा घेणे नव्हे काय?




-मी मधुरा.. 

************************************************

Wednesday, July 11, 2018

एक तरी वारी अनुभवावी

अवघा रंग एक झाला... 
आनंदाचे डोही आनंद तरंग... 


"निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम", "ज्ञानोबा माऊली तुकाराम" "पुंडलीक वरदा हारी विठठल"चा जयघोषात आणि आसमंत व्यापून टाकणारा टाळ-मृदुंगांचा गजरात पावलं देवाचिया गावा, पंढरपुरास निघतात.. असं म्हणतात कि "एक तरी ओवी गुणगुणावी" आणि तसेच "एक तरी वारी अनुभवावी" ही!!!.. पण अगदीच वारी नाही तरी वारीचा एक टप्पा अनुभवावा अशी मनापासून इच्छा होती. दर वर्षी वारीचे फोटो, बातम्या पहिल्या, वाचल्या कि मन कासावीस व्हायचे.. ह्यावेळी पण नाही जमणार? मग हे मी कधी अनुभवणार?.. अजुनही मी तुकोबांच्या देहूला, ज्ञानोबांच्या अलकापुरीला आणि विठुरायाच्या वैकुंठनगरीला गेलेले नाही.. मग तरीही ही ओढ का? माझ्या सारख्या नास्तिक मुलीला असणारी हि अनामिक ओढ मलाही बुचकळ्यात टाकणारी होती..  

हेच ते वर्ष आणि हीच ती वेळ.. ९ जुलै २०१८.. वारीचा पुणे ते सासवड टप्पा करायचाच.. आता माघार नाही.. मी आणि बाबा वारीला गेलो आहोत हे स्वप्न मी गेली कित्त्येक वर्षे पहात होते..  ते आता मी प्रत्यक्षात जगणार होते.. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण करताना बाबांना अशी मी भेट देऊ शकणार हा आनंद बरोबरीने होताच.. येतील त्याना घेऊन नाहीतर आम्ही दोघे वारी चा हा टप्पा करायचा असे ठरले.. व्हाट्स अँप ग्रुप्स वर पोस्ट्स गेल्या.. दोनाचे तीन (मी, बाबा, चारुता), तीनचे पाच (मधुरा, निरंजन) जण झालो.. होताहोता १० जणांचा ग्रुप जमला.. पंचाहत्तर वर्षाच्या बाबांना हे जमणार आहे कि नाही ह्या बद्दल प्रत्येकजण शकांक होता.. बाबा हे आरामात करू शकतील ह्यावर माझा विश्वास होता आणि माऊली त्यांच्या कडून करून घेतील हा बाबांचा विश्वास होता.. 

माऊलीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी घरातून सकाळी ६ वाजता निघालो. पालखीला कधी, कोठे आणि कसे गाठायचे ह्याचे जोरदार प्लॅनिंग आधीपासून केले होते.. साडे सहा पर्यंत पुलगेट पाशी पोचायचे आणि पालखीची वाट पाहायची.. पुलगेट जसे जवळ येत होते तशी धडधड वाढत होती.. "ती बघ पालखी“ ह्या शब्दांनी शरीरात एक कंपन निर्माण झाले.. खरंच, खरंच का हे घडते आहे? क्षणभर काही सुचेना, पुढचे काही दिसेना.. जेव्हा समजले तेव्हा डोळ्यांच्या कडा ओलसर जाणवल्या.. आणि कळले कि ती पालखी माऊलींची नसून मुक्ताईची आहे.. माऊलीच्या रथाच्या पुढे मानाच्या दिंड्या, मुक्ताईची पालखी,  भालदार चोपदार असतात आणि अश्याच असंख्य दिंड्या मागे हि असतात.. रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी ओसंडुन वाहत होती.. त्यात आमच्या सारखी अनेक हौशी, नवखी लोक ही होती.. जणु काही वैष्णवांचा महापूर लोटलेला आहे.. 

जसजशी पालखी जवळ येत होती तसतशी मनातली घालमेल वाढत होती.. हे विहंगम दृश्य परत दिसेल न दिसेल म्हणून रेकॉर्डिंग करण्यात गुंतलेले हात नमस्कारासाठी कधी जोडले गेले कळालेच नाही.. थोड्यावेळात पालखी अगदी नजरेसमोर आली आणि माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यास गर्दीतून वाट काढत पुढे गेले.. "पाया पडू गेले तव पाउलचि न दिसे..".. हे नक्की काय होतंय?.. माऊलींच्या पादुका दर्शनाने मनावर कसलं संमोहन केलं?.. टाळ मृदंगाच्या ध्वनीने आणि वैष्णवांच्या या अफाट जनसागराच्या दर्शनाने शरीराला आणि मनाला अचानक टवटवी कशी आली?... फारशी गर्दी, गडबड गोंधळ न आवडणारी मी खरंच ती मी होते का?.. सारी स्पर्शेंद्रिये जशी गोठून गेली होती.. एका जागी थिजून मी हा सारा सोहळा एकटक पाहत होते.. म्हटलं तर मनाला काहीतरी जाणवत होतं, म्हटंल तर मन जाणीवांच्या पलीकडे गेलं होतं.. क्षणभर वाटलं आपणही माऊलींच्या पादुकांवर वाहिलेलं एखादं फुल व्हाव, मग भलेही दुसर्‍या दिवशी निर्माल्य झाले तरी चालेल.. वारकरीच्या डोक्यावरची तुळस होऊन अशीच पूर्ण वारी अनुभवावी.. आणि त्यात गैर काय आहे? हे ही एक प्रकारचे समर्पणच नाही का?.. अंतर्मनाचा शोध घेण्याची हि एक संधी तर नाही ना? 



पालखीचे दर्शन घेऊन, पालखी बरोबर हडपसर पर्यंत चालून आम्ही सासवडची वाट धरली.. एकाच ध्येयाने, एकाच ओढीने सगळा वारकरी, माळकरी, वैष्णव समुदाय चालत होता.. त्यात ना गरीब-श्रीमंत भेदभाव होता ना बाई-पुरुष, त्यात कोणी लहान होता ना कोणी मोठ्ठा, ना कोणती जात होती ना कोणता पंथ.. सगळे विठ्ठलाच्या ओढीने विठ्ठलमय होऊन गेले होते.. प्रत्येकजण एकमेकात माऊलीला बघत होता.. "अवघा रंग एक झाला, अंगी रंगला श्रीरंग".. ह्याची प्रचिती क्षणोक्षणी येत होती.. 

प्रतिकूल परिस्थितीत केवळ अफाट इच्छा शक्ती आणि समर्पणाच्या भावनेने सतत पुढे पुढे चालत राहून विठ्ठलाला भेटणे.. हाच एक ध्यास..

जाऊ देवाचिया गावा, घेऊ तेथेचि विसावा
देवा सांगु सुख दुःख, देव निवारील भूक

ह्या एक दिवसाच्या वारीच्या अनुभवामुळे मला काय मिळाले? पुढे ह्या अनुभवाने माझ्यात काय बदल होणार? मी माझ्या कामक्रोधीं विकारांवर विजय मिळवणार का? मी हि प्रतिकूल परिस्थितीत अशीच वागेन का? हे सगळे विचार सध्या तरी अनुत्तरित आहेत.. आजच हे असे विचार का यावेत?..  हा या वारी सोहळ्याचा तर चमत्कार नसेल ना?.. दिंडी आणि यातील वारकर्‍यांची निर्मळता तर मनाला खजील करत नसेल ना?.. अंतर्मुख होऊन विचार करायला प्रवृत्त करत नसेल ना? वैष्णवांच्या संगतीत, टाळ-मृदंगाच्या गजरात, माऊलीच्या पालखीसोबत मनाचा कमकुवतपणा जाणवायला लागलाय.. आत काही तरी हललंय हे नक्की.. 


-मी मधुरा.. 

************************************************

Monday, June 11, 2018

बकुळ सडा

परसातला बकुळ, नक्षत्रांचा सडा टाकून रिकामा होतो 
रितेपणातील समृद्धपण मंद सुवासाने दाखवून देतो

इवलीशी, नाजूक, नक्षत्रांसारखी ही फुले त्यांचा भार असा कितीसा असणार? आपल्या फुलांचा सडा टाकून बकुळ रिकामा झाला असला तरी रिता नक्कीच नाही होत... रित होण्यासाठी रिकामपण अंगी असावं लागत... हे रिकामपणं त्याच्याकडे नक्कीच नाही. त्याला उद्यासाठी तेवढ्याच कळ्यांना खुलवायचंय.... फुलांना फुलवायचंय.... प्रत्येक फुलात सुगंधाची कुपी लपवायचीये...


मला हा बकुळ तटस्थ योगी सारखा वाटतो. ज्या क्षणी त्याची फुलं फांदीपासून सुटतात, त्या क्षणी तो त्या फुलांवरचे सारे हक्कही सोडतो... आजची फुललेली सारी फुलं, वर्तमानाच्या त्या क्षणाला वाहून तो मोकळा होतो... त्या फुलांमध्ये तो गुंतून नाही पडत.... म्हणून त्याला विरहाच दुःखच नाही... आणि रितेपणाची भावना ही नाही... तेथे असते ती फक्त बहरण्यातली परिपूर्णता आणि 'देण्या'तलं समाधान.

आपल्याला ही आयुष्य असंच जगता आलं तर? प्रत्येक क्षण पूर्णपणे जागून, वर्तमानाला अर्पण करता आला तर?! जगलेल्या प्रत्येक क्षणातून मोकळ होता आल तर?! गेलेल्या क्षणात गुंतून न राहता पुढचा नवा क्षण खुलवायला, फुलवायला, नव्याने सज्ज होता आले तर?! फक्त आपलंच नाही तर इतरांचही आयुष्य सुगंधी करता आले तर?!

जमेल का आपल्याला असं 'बकुळ' व्हायला?


-मी मधुरा.. 

************************************************


Sunday, May 6, 2018

कधी कधी

कधी कधी,
उगाचच एकटं वाटायला लागतं... भोवताली वर्दळ असूनही एकटंच मन कुढत राहतं.... आणि अगदी, अगदी त्याचवेळी मैत्रिणीचा व्हॅट्स अँप येतो..  कशी आहेस? missing you... आणि मग, मन फुलपाखरू होऊन बालपणात फिरून येतं...

कधी कधी,
वाटतं..  आपली कदरच नाही कोणाला.. हाऊस वाइफचा शिक्का मारून गृहीतच धरलं जातं आपल्याला... आणि अगदी, अगदी त्याचवेळी फोन येतो..  आज भाजी मस्त झाली होती... आणि मग, दिवसच नाही तर मन पण उजळून जातं...

कधी कधी,
स्वतःचच अस्तित्व संपल्या सारखं वाटतं... नानाविविध मुखवट्यात हरवायला होतं... आणि अगदी, अगदी त्याचवेळी लेक  गळ्यात पडून म्हणते... you are the most beautiful person on the earth... आणि मग, आळणी जगणं जाबराक बनून जातं....

कधी कधी
एकदम असुरक्षित वाटायला लागतं... शेजारचा माणूस ही आतंकवादी वाटतो... आणि अगदी, अगदी त्याचवेळी अनोळखी माणूस मदतीचा हात पुढे करतो.... आणि मग, माणुसकीवर विश्वास बसतो... जगणं सुंदर होऊन जातं ....

कधी कधी,
वाटतं... आयुष्य हे क्षणभंगुर आहे... खूप काही करायचे आहे.... आणि अगदी, अगदी त्याचवेळी 'बाबू मोशाय जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए' ऐकू येतं.... आणि मग, वाटतं आधी मनसोक्त जगून घ्यावं...


-मी मधुरा.. 

************************************************