Thursday, October 18, 2018

शुभद्रांगी




शुभद्रांगी... चक्रवर्ती सम्राट अशोकाची माता.. मौर्य साम्राज्याची राजमाता..

शुभद्रांगी... धोरणी आणि निश्चयी स्त्री जिने घराण्याचा वंशज वाचवण्यासाठी स्वतःचा प्राण गमावला.. 

शुभद्रांगी.. ब्राह्मण पंडित ब्रह्मानंद आणि जानकी यांची कन्या... सालस, शालीन, शास्त्रनिपुण आणि सुसंस्कृत ...

महात्मान पिंगलक यांनी 'शुभद्रांगी राजाची राणी होणार आणि तिच्या पोटी चक्रवर्ती जन्म घेणार' ही भविष्यवाणी केली खरी.... पण एक ब्राह्मण कन्या चक्रवर्तीला जन्म देणार.. हे किती पटण्यासारखे आहे?.. तरी शुभद्रांगी तेव्हा पासून तेच स्वप्न जगत होती.. एकेदिवशी तिची आणि मगधसम्राट बिंदुसागर यांची भेट दैवयोगाने झालीच.. सम्राट तिच्या सौंदर्यावर मोहित झाले आणि ती त्यांच्या  पुरुषत्वावर!! तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराची जागा आता बिंदुसागरनी घेतली.. महात्मान पिंगलक शुभद्रांगीच्या दैवाला बोट धरून वाट दाखवत होते.. त्यांच्या सांगण्यानुसार शुभद्रांगी चंपानगरी सोडून पाटलीपुत्राला आली.. डोळ्यात एक स्वप्न घेऊन.. बिंदुसागरांची पत्नी होण्याचे स्वप्न .. चक्रवर्तीला जन्म देण्याचे स्वप्न.. वास्तविक पाहता बिंदुसागराना चौदा राण्या आणि नव्याणव राजकुमार असा मोठ्ठा परिवार होता.. शुभद्रांगीला जरी विवाहाच्या उद्देशाने बोलावून घेतले असले तरी कोणीही कोणालाही कोणतेही वचन दिलेले नव्हते..

पिंगलकांच्या सांगण्यावरून अंतःपुरात वास्तव्यासाठी आलेल्या शुभद्रांगीच्या सौंदर्याने साशंक होऊन महाराणी पट्टमहिषीने तिला आपली दासी करून घेतले.. एक वेदाभ्यास असलेली, शास्त्रनिपुण विदुषी राण्यांचे केस विंचरणे, नखे कापणे, साजशृंगार करणे, उटणी लावणे अशी दासींची कामे करत अपमानित जीवन जगत राहिली.. पण ह्या ध्येयवेड्या स्त्रीने आपली जिद्द सोडली नाही.. तिची नजर बिंदुसागराना शोधत होती.. ते भेटल्यावर सगळी परिस्थिती बदलेल ह्यावर तिचा विश्वास होता.. महाराणीच्या आजारावर रोगनिदान करून औषधपाणी करणारी ही दासी कोण? ह्या उत्सुकतेपोटी बिंदुसागरांची आणि तिची भेट होते.. ओळख पटते.. आणि अगदी साध्या पद्धतीने ते विवाहबद्ध होतात.. एक दरिद्री ब्राह्मणकन्या, एक दासी, राणी म्हणून अंतःपुरात राहणार..  हे बाकी राण्यांना न पटल्याने अंतःपुरात छुप्या राजकारणाला ऊत आला.. एवढ्या मोठ्ट्या राजवाड्यात एकाकी एकट्या झालेल्या शुभद्रांगीने वेदाभ्यास, कौटिल्य अर्थशास्त्र, तत्वज्ञान यांचा अभ्यास सुरु केला.. अशोकाच्या जन्माने तिच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण झाले.. पण हा आनंद फारकाळ टिकला नाही.. अशोकाच्या चक्रवर्ती होण्याच्या भाकिताने बिंदुसागर आणि राणीपरिवार क्रोधीत झाला.. क्षुद्र दरिद्री पर्णकुटीतून आलेली राजमाता होणार.. तिचा पुत्र, जेष्ठ पुत्र 'सुसीम' ला डावलून चक्रवर्ती होणार... ह्याने खळबळ माजली... बिंदुसागराने तर तिचे नावच टाकले..

अशोक पिता असून पोरका झाला.. अशोकाला वाढवण्याची जबाबदारी आता सर्वस्वी तिची एकटीची होती.. राजवाड्यातल्या राजकारणाच्या जीवघेण्या चालींपासून संरक्षण देऊन आपल्या मुलाला वाढवणं हेच एकमेव ध्येय उरलं होतं.. पिंगलकांच्या भविष्यावर विश्वास ठेवून तिला आपल्या मुलाला घडवायचं होतं.. कितीही यातना, कष्ट सहन करावे लागले तरी, राजवाड्यात तिच्या वाटेला आलेल्या तिरस्कृत जीवनाची सावली हि त्याच्यावर पडू न देता त्याच्यात स्वाभिमान व आत्मविश्वास जागृत ठेवायचा होता.. इतर राजपुत्रांबरोबर अशोकाचे शिक्षण सुरु झाले.. हेवेदावे, कुटील कारस्थाने ह्यांना तोंड देत अशोक मोठ्ठा होत होता.. राज्यशात्र, अर्थशात्र, राजकारण ह्याचे धडे शुभद्रांगी स्वतः देत होती.. रामायण महाभारत यांचे पठण करून घेत होती.. धनुर्विद्या, मुष्टीयुद्ध, गदायुद्ध, मल्लयुद्ध ह्यात तो अग्रेसर असावा म्हणून प्रयत्न करत होती.. वेगवेगळ्या गुरूंकडे शिक्षण देत होती.. त्याच्या मनातील स्वतःच्या कुरुपतेविषयीची असलेली भावना, पित्याकडून नाकारले गेल्याची भावना योग्य पद्धतीने हाताळून सम्राट बनण्याच्या गुणाचं महत्व सांगून ते रुजवत होती..

सगळ्याच बाबतीत अशोक सुसीम पेक्षा उजवा असून सुद्धा तो युवराज नव्हता.. ही सल आणि अंतर्गत राजकारणापासून अशोकाचे रक्षण करण्यासाठी, शुभद्रांगीने त्याला पाटलीपुत्रातून बाहेर पडून मगध राज्याच्या प्रत्येक प्रांताचा दौरा करून तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करायला सांगितले.. आणि अशोकाचे विश्व अनेक अंगानी विस्तारित केलं.. पाटलीपुत्रातून जाताना तो ध्येयासक्त राजकुमार होता पण परतताना चाणाक्ष कर्तबगार राज्यशासक म्हणून आला.. साऱ्या मगध साम्राज्याचे आदर आणि प्रेम त्याने संपादन केले होते.. शुभद्रांगीच्या ह्या दूरदृष्टीमुळे मगध साम्राज्याचे उत्तरदायित्व कणखरपणे स्वीकारू शकणारा एक राजकुमार म्हणून सारे त्याच्याकडे पाहू लागले.. सम्राट बिंदुसागरांचे आजारपण आणि अंतर्गत राजकारण ह्यामुळे अजूनही युवराजपदाचा प्रस्ताव तसाच पडून होता.. बिंदुसागरांच्या निधनानंतर सुसीम युवराज होण्यासाठी जोरदार खेळी सुरु असताना मोठ्या चतुराईने शुभद्रांगीने ती खेळी उलटवून लावून अशोकाला गादीवर बसवून पाटलीपुत्राला त्याचा योग्य तो उत्तराधिकारी दिला..

युवराजपद, राजगादी न मिळाल्याने क्रोधीत झालेल्या सुसीमने सूडाच्या भावनेने गर्भवती असलेल्या अशोकच्या पत्नीला जीवे मारायचा कट रचला... शुभद्रांगीला ह्या कटाचा सुगावा लागल्यावर तिने स्थान बदल करून तो आघात स्वतःवर घेऊन वंश रक्षणासाठी आत्मबलिदान केले..  शुभद्रांगीशी नियतीने खेळलेली ही शेवटची दुष्ट खेळी... बालवयात चौदा विश्वे दारिद्र्य.. तरुण वयात पिंगलकानी दिलेले आकांक्षांचे पंख लावून राजमहालात येणे पण दासी होऊन वावरणे.. राणी होणे पण राजाने पाठ फिरवणे.. दैवानं अपेक्षांच्या, अपमानाच्या, तिरस्काराच्या भोवऱ्यात आयुष्यभर अडकवून ठेवणे.. राजमातेचे  सुख उपभोगण्या आधीच हृदयद्रावक मृत्यू होणे... ह्या सगळ्यावर मात करून शुभद्रांगीने अशोकाच्या रूपाने चक्रवर्ती सम्राट दिला... 

-मी मधुरा...
१८ ऑक्टोबर २०१८

#शक्तिरूपेण ९/९

Wednesday, October 17, 2018

उर्मिला




उर्मिला.. अयोध्येचा राजकुमार लक्ष्मणाची पत्नी.. सीतेची लहान बहीण..

उर्मिला.. स्वतःच्या सुखाची आहुती देऊन सुद्धा रामायणात उपेक्षित राहिलेले पात्र..

उर्मिला.. मिथिलेचा राजा जनक आणि राणी सुनयना यांची मुलगी.. सीतेपेक्षा दहा एक वर्षाने लहान.. रूपवती असली तरी थोडीशी अशक्त.. त्यामुळे थोडीशी लाडात वाढलेली.. लहानपणीच आईची छत्रछाया हरवल्याने सीता तिचे सर्वस्व.. उर्मिला जशी सीतेची सावलीच..

सीतेच्या स्वयंवरासाठी, राजकुमार रामासोबत आलेल्या लक्ष्मणाला पाहता क्षणी उर्मिला त्याच्या प्रेमात पडते.. लक्ष्मणाची स्थिती उर्मिलेपेक्षा काही वेगळी नव्हती.. रामाने शिवधनुष्य मोडून स्वयंवराचा पण जिंकल्यानंतर, राम सीतेच्या विवाहासाठी अयोध्येहून आलेले राजा दशरथ उर्मिलेला लक्ष्मणासाठी मागणी घालतात.. दोघी बहिणींचा विवाह एकाच दिवशी संपन्न होतो.. आणि उर्मिला सावली सारखी सीतेबरोबर अयोध्येत ही वावरू लागते..

राजकुमार रामाच्या राज्याभिषेकाच्या बातमीने अस्वस्थ झालेली कैकेयी, राजा दशरथाने दिलेल्या वराचा उपयोग करून 'रामाला चौदा वर्षे वनवास आणि तिचा मुलगा भरत याचा राज्याभिषेक' असे मागते.. आपल्या सावत्र आईची आज्ञा मानून राम आणि सीता, आणि त्यांची सेवा करण्यासाठी लक्ष्मण वनवासाला जाण्याचे ठरवतात..  वनवासाचे ऐकून उर्मिला पण त्यांच्या बरोबर जाण्यास तयार होते.. अशक्त उर्मिलेला वनवासी जीवन झेपायचे नाही असे वाटून सीता तिला येण्यास नकार देते.. पती वनवासात असताना मी कशी राजवाड्यात राहू? असे विचारून सीतेचे मन वळवायचा प्रयत्न करते..

उर्मिला आपल्या बरोबर वनवासाला येणार हे जेव्हा लक्ष्मणाला समजते तेव्हा तो तिला, तिच्या सुनेच्या कर्तव्याची जाणीव करून देतो.. तिने अयोध्येत राहून राजा दशरथ, माता कौसल्या आणि माता सुमित्रा ह्यांची काळजी घ्यावी, त्यांची सेवा करावी... असे ही सांगतो... कदाचित, उर्मिला बरोबर असेल तर तो राम सीतेची सेवा चांगल्या प्रकारे करू शकणार नाही.. उर्मिलेमुळे त्यांचे मन चंचल होईल ही भीती तर त्याला वाटली नसेल?.. पतीकडून असे ऐकल्यावर, त्या नवविवाहित तरुणीला काय वाटले असेल? चौदा वर्षे पतीशिवाय राहणे, त्याची काळजी करत दिवस काढणे, ... पण उर्मिलेने हे खूप संयमाने घेतले.. लक्ष्मणाचा राम-सीते साठी असलेला सेवाभाव पाहून उर्मिला त्याच्याकडून राम-सीतेला आई वडिलांसमान मानून सेवा करण्याचे आणि चौदा वर्षात तिच्या बद्दल विचार न करण्याचे वचन घेतले.. आणि पतीच्या इच्छेचे पालन करण्यासाठी मागे अयोध्येत राहायचे ठरवले...

वनवासाला निघताना, निरोप घेण्यासाठी लक्ष्मण जेव्हा उर्मिलेच्या महालात जातो तेव्हा तिला राजवत्र नेसून साजशृंगार केलेला पाहून थक्क होतो... सगळी अयोध्या, सगळा परिवार दुःखात असताना, साजशृंगार करून तू, कैकयी मातेला ही मागे टाकलेस.. अशी विषयाची आसक्ती असणारी माझी पत्नी असूच शकत नाही.. आज पासून तुझा माझा काहीही संबंध नाही असे सांगून निघून जातो.. उर्मिलेला आपल्या पतीची ही प्रतिक्रिया माहिती असते.. तिच्यावरचे त्याचे प्रेम ती जाणत असते.. जरी तो कर्तव्यापोटी एकटीला सोडून गेला तरी पती धर्म न पाळल्याने तो चिंतीत राहील.. त्याच्या कर्तव्यात तो कमी पडेल.. म्हणून ती जाणीवपूर्वक त्याच्या मनात स्वतःबद्दल वाईट भाव निर्माण करते.. जेणे करून तो तिचा विचार करणार नाही..

राम सीता लक्ष्मण वनवासात गेल्यानंतर निद्रादेवी उर्मिलेला लक्ष्मणाची  १४ वर्षे न झोप घेता राम सीतेची सेवा करण्याची इच्छा सांगते... ही इच्छा जर उर्मिलाने  त्याची  झोप अर्धांगिनी म्हणून स्विकारली तरच पूर्ण होणार होती... पतीच्या सेवेमध्ये, त्याच्या कर्तव्यामध्ये बाधा येऊ नये म्हणून ती ही अट सहज स्वीकारते.. आयुष्याचा सोनेरी काळ एखाद्या कलेवराप्रमाणे जगणे... एवढा मोठ्ठा हा त्याग!!!... रावणाचा पराक्रमी आणि शक्तिशाली पुत्र इंद्रजीतचा वध 'जो चौदा वर्षे झोपला नाही आणि ज्याने स्त्रीचे मुख पहिले नाही' अश्या योद्ध्यांकडून होणार असतो.. नियती हे कठीण काम उर्मिलेच्या योगदानाशिवाय हे घडवून आणू शकत नव्हती...

नियतीच्या ह्या नाट्यात ती, आई समान बहीण सीता, पिता समान राम आणि प्रिय पतीसाठी स्वतःच्या सुखाची आहुती देऊन चौदा वर्षे निश्चेष्ट आयुष्य जगली.. अयोध्येमध्ये उर्मिलेने कधी ही राजसुख उपभोगले नाही.. आणि त्या बद्दल कधीच नाराजी पण व्यक्त केली नाही.. जे तिला योग्य वाटले ते ती करत राहिली... मूकपणे पतीला साथ देत राहिली..

दुःख आणि वेदना सहन करून कर्तव्य पूर्तीसाठी तिने केलेले समर्पण खूप मोठ्ठे आहे.. त्रेतायुगाचे राम आणि सीता जरी नायक असले तरी उर्मिलेचे योगदान विसरून चालणार नाही.

-मी मधुरा...
१७ ऑक्टोबर २०१८

#शक्तिरूपेण ८/९

Tuesday, October 16, 2018

तारा: चंद्राची तारिका



तारा, चंद्रा बरोबर दिसणारी तारिका .. जिचा चंद्राबरोबर उदय ही होतो आणि अस्त ही!...जी त्याच्या कले बरोबर खुलत राहते.. जसे आकंठ प्रेमात बुडालेले युगल..

वास्तविक तारा, देवांचे गुरु बृहस्पती यांची पत्नी.. अर्धांगिनी.. प्रत्येक धार्मिक विधीत साथ देणारी सहचारिणी.. पण हे नाते इतकेच मर्यादित होते... द्वापार युगात धार्मिक विधी हा जीवनातील लक्षणीय पैलू होता.. पत्नी शिवाय धार्मिक विधी नाही... पत्नी शिवाय आशीर्वाद नाही.. पत्नी शिवाय स्वर्ग नाही आणि मुक्ती हि नाही.. त्यामुळे स्त्रीचे स्थान पुरुषाच्या जीवनात अढळ होते... आणि केवळ ह्याच कारणांसाठी तारा बृहस्पतींच्या आयुष्याचा भाग होती..

पौर्णिमेच्या चंद्राला पाहून आकर्षित झालेली तारा चंद्र नगरीत त्याला भेटायला जाते.. चंद्र हि तिच्या सौंदर्यावर मोहित होतो... प्रणयी भावनेने त्यांचा सहवास सुरु होतो.. आपली पत्नी खूप दिवस परत न आलेली पाहून बृहस्पती चंद्राकडे तिला आणण्यासाठी जातात. पण तारा त्यांच्या बरोबर जाण्यास स्पष्ट नकार देते. चंद्राचे गुरु असलेले बृहस्पती त्याला सांगतात कि "गुरु पत्नी ही आई समान असते आणि तिच्या बरोबर पत्नी सारखे राहणे हा व्यभिचार आहे"... "तारा तिच्या मर्जीने माझ्याकडे राहते त्यामुळे ती व्यभिचारी नाही. मी तिला परत पाठवणार नाही"... असे सांगून चंद्र त्यांना परत पाठवतो.

पत्नीला गमावण्या बरोबरच, पत्नी नाही म्हणून पणाला लागलेली दैनंदिन धार्मिक विधीतील सिद्धता, प्रतिष्ठा ह्याने संतप्त झालेले बृहस्पती, आपल्या पत्नीच्या सुटकेसाठी इंद्राकडे मदत मागतात. पण तारा इंद्राला ही जुमानत नाही.. 'मी कैद नाही तर मी माझ्या मर्जीने चंद्राकडे रहात आहे'... असे ती बृहस्पतीच्या मदतीसाठी आलेल्या इंद्राला सांगते.. चंद्र सुद्धा 'तारा बृहस्पतीकडे खुश नाही... तिला जायचे नसेल तर मी पाठवणार नाही..' असे सांगून युद्धाला ही तयार होतो..

तारा चंद्राची प्रेयसी म्हणून मानाने जीवन जगते.. कोठेही तारा दंडित किंवा दोषी ठरत नाही किंवा तिने पती सोडून दुसर्याशी संबंध ठेवले म्हणून व्यभिचारी ही ठरत नाही.. कारण त्या काळात, धर्माच्या अनुषंगाने, सामाजिक नियमानुसार स्त्री ही वापरली जाऊ शकत नव्हती, कोणी तिच्या बरोबर दुर्व्यवहार करू शकत नव्हता, तिला तिच्या मनाप्रमाणे जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार होता आणि हे सुनिश्चित होते.

आजकाल मात्र आपण अश्या स्त्रियांना, त्यांची बाजू जाणून न घेता व्यभिचारी म्हणून मोकळे होतो...

या टप्यावर चंद्राने विचारलेले दोन प्रश्न महत्वाचे वाटतात.. एक: जर एखाद्या स्त्रीने आपल्या मर्जीने घर सोडले आणि ती दुसऱ्या पुरुषा बरोबर राहू लागली तर त्यात त्या दुसऱ्या पुरुषाचा काय दोष? आणि दुसरा: कौटुंबिक आनंद हा पती आणि पत्नी दोघांच्या आनंदावर अवलंबून असतो.. जर पत्नी सुखी नसेल तर मग कुटुंब आनंदी कसे होईल?

स्त्रीला एवढी मनाची आणि स्वातंत्र्याची मुभा देणारी समाज व्यवस्था आज निर्माण होऊ शकेल का?

-मी मधुरा..
१५ ऑक्टोबर २०१८

#शक्तिरूपेण ६/९


कैकेयी: खलनायिका की वीर क्षेत्राणी




कैकेयी.... एक खलनायिका... जिच्यामुळे रामायण घडले.. जिच्या हट्टामुळे राम चौदा वर्षे वनवासाला गेला..

कैकेयी .. दुर्दैवाने हे नाव फक्त रामायणातच पाहायला मिळते.. रामाच्या प्रेमापोटी कैकयीचा इतका तिरस्कार केला जातो कि कोणी आपल्या मुलीचे नाव कैकेयी ठेवत नाही.. रामाने कितीही कैकेयीचा आदर केला, तिला दोषी न ठरवता जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तिची सुटका केली..  तरी ही राम भक्तां मध्ये कैकेयीला दोषी ठरवले जाते.. तिचा तिरस्कारच केला जातो.. जरी तुलसीदासानी सांगितले असले कि रामाचा वनवास हा रावणाचा नाश करण्यासाठी विधात्याने रचला होता.. कैकेयी निमित्तमात्र होती तरी ही कैकेयीचा दुस्वास केला जातो.. तिला कायमचा खलनायिकेचा किताब दिला गेला..

आपल्याला कैकेयी जरी नेहमी नकारात्मक व्यक्तिमत्व म्हणून दिसत असली तरी रामाला तिचे विश्वकल्याणातील योगदान माहिती होते.  तिने आपल्या रामावरील प्रेमाची, ममतेची आहुती देऊन कायमचा अप्रामाणिकपणाचा शिक्का माथी मारून घेतला..

कैकेयी.. कैकेय देशाचा राजा अश्रवती याची कन्या.. सात भावांची एकुलती एक बहीण.. सात भावंडांमध्ये वाढल्याने असेल कदाचित पण सारे मर्दानी खेळ उत्तम खेळत असे.. घोडेस्वारी, भालाफेक, नेमबाजी, तलवार चालवणे ह्यात विशेष रुची... ह्याच बरोबर नृत्य, वादन पण करत असे... आणि ह्या कलांना सुंदरतेचे कोंदण तर होतेच.. अशी ही बहादूर धाडसी कैकेयी भावांबरोबर युद्धात ही सहभागी असायची.. रथाचे सारथ्य हे कसब सुद्धा तिच्याकडे होते....

काश्मीर मध्ये शिकारीच्या मोहिमेवर असताना राजा दशरथ आणि कैकेयीची भेट होते.. पाहता क्षणीच तो तिच्या प्रेमात पडतो आणि लग्नाची मागणी घालतो.. राजा अश्रवती एका अटीवर लग्नाला तयार होतो कि कैकेयीचा मुलगा अयोध्येच्या सिंहासनावर बसेल.. कौसल्येपासून अपत्य नसल्याने दशरथ हि अट मान्य करतो.. पुढे कैकेयीला पण अपत्य न झाल्याने तो सुमित्रेशी विवाह करतो.. पण दुर्दैवाने तिन्ही राण्यांना अपत्य न झाल्याने दशरथ अपत्य प्राप्तीसाठी यज्ञ करतो.. कौसल्येला राम, कैकेयीला भरत आणि शत्रुघ्न तर सुमित्रेला लक्ष्मण अशी मुले होतात.. कैकेयीचे रामावर इतर मुलांपेक्षा जरा जास्तीच प्रेम असते... मग असे असताना केवळ मंथरा सांगते म्हणून ती रामाला १४ वर्षे वनवासाला पाठवेल हे पटत नाही..

जसा रामाचा जन्म विश्वकल्याणासाठी झाला होता तसेच रामाच्या आयुष्यात कैकेयीच्या असल्याचे एक विशिष्ठ ध्येय होते.. 'रामाला राज्य न मिळणे आणि तो वनवासात जाणे' हे नाट्य कैकेयीच्या भोवती फिरताना दिसते.. ह्याची पायांमुळे कैकेयीच्या लहानपणापासून रोवली गेली आहेत.. लहानपणी कैकेयी एका ध्यानस्त बसलेल्या ऋषीच्या चेहऱ्याला काळे फासते.. संतापून तो ऋषी तिला शाप देतो कि जसे तू मला काळे फसले आहेस तसे तुझ्या नावाला ही काळे फसले जाईल... दशरथाने अश्रवतीला दिलेले वचन कि कैकेयीचा मुलगा सिंहासनावर बसेल... 'प्राण जाए पार वचन न जाए' ह्या रघुकुल ब्रीदानुसार ह्या वचनाचं पालन आवश्यक होते.. आणि राम जन्माचे मूळ 'रावण वध' होता.. जर राम सिंहासनावर बसून राज्यकारभारात गुंतला असता तर ते कसे शक्य होते.. त्याला कोणीतरी राज्याबाहेर काढणे आवश्यक होते.. आणि हे काम मुत्सद्दी कैकेयी शिवाय कोणीच करू शकत नव्हते..

रामकथेचे प्रवक्ते मुरारी बापू कैकेयीच्या वागण्याचे चौथे कारण देतात.. कैकेयीचे गुरु 'ऋषी रत्न' हे मोठे ज्योतिषी होते.. त्यांनी तिला सांगितले होते कि तिचे लग्न रघुकुलात राजा दशरथाशी होईल, त्याचा मृत्यू पुत्र वियोगामुळे होईल... आणि त्याचे कारण तू असशील.. पिता पुत्र एकत्र राहिले तर वंशाचा नाश होईल..  रघुवंश वाचवण्यासाठी १४ वर्षे ते सिंहासन रिकामे असणे आवश्यक आहे.. पुढे गुरु वशिठ्याच्या सल्यानुसार कैकेयी तिचे वर मागते कि रामाला १४ वर्ष वनवास आणि भरताला राज्य..  कैकेयीला खात्री असते की भरत सिंहासनावर बसणार नाही.. मग आपोआपच सिंहासन रिकामे राहील..

सामसूर राक्षसाबरोबर लढाईच्यावेळी देवराज इंद्र दशरथाला मदतीसाठी बोलावतो. तेव्हा कैकेयी दशरथाच्या रथाचे सारथ्य करते.. लढाईच्यावेळी रथाचे चाक निखळल्याचा आवाज तिला येतो.. सतर्क राहून ती रथ सुरक्षित ठिकाणी घेऊन जाते.. रथाचे चाक दुरुस्त करते.. जखमी नवऱ्याची काळजी घेऊन परत रणांगणात येते.. तिच्या ह्या गुणांवर खुश होऊन दशरथ तिला २ वर देतो.. ह्या वराची आठवण वशिष्ठ आणि मंथरा कैकेयीला ह्यावेळी करून देतात.. पण दोघांचे कारण वेगळे असते..

मंथरा... हे ही असेच नकारात्मक व्यक्तिमत्व.. मंथरेने कैकेयीचे कान भरले म्हणून कैकेयी अशी स्वार्थी वागली.. मंथरा, कैकेयीची दाई.. आईविना असलेल्या कैकेयीला ममतेची कूस दिली.. राजमातेची दाई व्हायचे स्वप्न उराशी बाळगून ती कैकेयीचे कान भरते असे एक कारण सांगितले जाते.. परंतु मंथरा हे सुद्धा कैकेयी सारखे विशिष्ट उद्देश्यासाठी योजलेले पात्र मानले जाते.. रामाच्या ममतेने उद्दिष्ट भ्रष्ट झालेल्या कैकेयीला तिच्या जीवनाच्या उद्देश्यापर्यंत पोचवणे हे मंथरेचे काम होते.. म्हंणून मंथरेने रावणाला मारले असे ही मानले जाते.. अनुराधा पौंडवालांच्या एका आरतीत.. देवी शरण जो आए, उनका उद्धार किया | पैठि मंथरा दासी, रावण संहार किया || ... असे ऐकले.

हे सगळे माहिती असून सुद्धा कैकेयी ह्या दैवलीलेत, नाटकात सहभागी झाली आणि कायमची खलनायिका झाली. खरचं ही खलनायिका होती? हिचा आपण खलनायिका म्हणून दुःस्वास केला पाहिजे की एक धुरंधर राजकारणी, शूर योद्धा, आदर्श पत्नी, आदर्श माता म्हणून गौरव केला पाहिजे?..

-मी मधुरा..
१६ ऑक्टोबर २०१८

#शक्तिरूपेण ७/९

Sunday, October 14, 2018

यशोधरा: एक भिक्षुणी




यशोधरा... गौतम बुद्धाची पत्नी.. खरं तर बुद्धाच्या पत्नीचे नाव यशोधरा हे किती जणांना माहिती आहे?... फक्त इतके माहिती आहे कि राजकुमार सिद्धार्थ  आपल्या पत्नीला आणि नवजात बालकाला सोडून सत्याच्या शोधासाठी बाहेर पडला.. नंतर पुढे ह्या यशोधरेचे काय झाले? काय वाटले असेल तिला? त्याच्या शिवाय ती कशी राहिली असेल?... पुत्रप्राप्तीचा आनंद असतानाही पतीने घर सोडल्याचे कळले असेल तेव्हा ती उध्वस्त झाली नसेल का?..

यशोधरा.. कोलिया साम्राज्याचा राजा सुपुबुद्ध आणि राणी पामिता यांची कन्या... सौंदर्य आणि करुणा यांचे प्रतीक.. नावाप्रमाणेच 'वैभव प्राप्त' करून देणारी..

अश्या ह्या यशोधरेचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी तिचा मामेभाऊ शल्य देशाचा राजकुमार सिद्धार्थशी होतो..  विवाहापूर्वीच तिला माहिती होते कि सिद्धार्थ सांसारिक सुख सोडून सत्याच्या शोधार्थ बाहेर पडेल.. लहानपणापासून ती त्याला ओळखत असल्याने त्याचे विचार, त्याची मानसिक जडण घडण तिला माहिती होती.. पुढे राज्यकारभारात, जनतेच्या दुःखाची काळजी घेताना, जगाच्या चिंतांबद्दल विचार विनिमय करताना ती त्याच्या बरोबर होतीच..

'राहुल' च्या जन्मानंतर सिद्धार्थने बायको-मुलगा-संसारिक सुख ह्यात न अडकता खऱ्या सुखाच्या शोधात घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला.. जेव्हा हे यशोधरेला कळले तेव्हा तिने न डगमगता ह्या परिस्थितीला तोंड दिले.. कदाचित ही वेळ कधीतरी येणार आहे हे तिला माहिती होते.. ना तिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, ना कोणता युक्तिवाद.. कदाचित सिद्धार्थच्या मनाविरुद्ध त्याला संसारात गुरफटून ठेवणे तिला मान्य नसेल.. ना त्याने ती सुखी होणार, ना तो.. त्याच्या मार्गात अडथळा बनण्यापेक्षा तिने त्याच्या निर्णयाला धैर्याने सामोरे जाण्याचे ठरवले.. संसारात राहून, राजवाड्यात राहून त्याला साथ द्यायचे ठरवले..

'मोठ्या गोष्टी मिळवण्याकरता लहान लहान गोष्टींचा त्याग करावा लागतो... ' असे ती तिच्यावर दया दाखवणाऱ्यांना सांगे.. सिद्धार्थ परत येणार नाही हे माहिती असताना दुसरा विवाह करायला तिने ठामपणे नकार दिला.. तो नक्कीच अंतिम सुखाचे ज्ञान प्राप्त करून, बुद्ध बनेल हा विश्वास तिला होता.. बुद्ध झाल्यावर तो आपला पती किंवा आपल्या मुलाचा पिता म्हणून नक्कीच परत येणार नाही.. पण तो परत येईल हा ही  विश्वास होता..

सिद्धार्थ बाहेर पडल्यावर त्याच्या प्रत्येक हालचालीवर ती लक्ष ठेवून होती..  दागदागिने, वस्त्रालंकार त्यागून तिनेही त्याच्या सारखी संन्यासी वस्त्रे धारण केली.. राजवाडा सोडून राजवाड्याच्या बागेत पर्णकुटी बांधून राहू लागली.. चटईवर झोपणे, एक वेळचे जेवणे असा दिनक्रम अवलंबला.. थोडक्यात ती राजवाड्यात राहून संन्यासी जीवन जगू लागली.. सिद्धार्थ बाहेर राहून अंतिम सुख शोधत होता तर यशोधरा चार भिंतीत राहून स्वतःला घडवत तेच सुख शोधायचा प्रयत्न करत होती. सासू सासऱ्यांच्या मदतीने राज्यकारभार पण चालवत होती.. राहुलला सुद्धा त्याच्या पित्याच्या उच्च कामाबद्दल सांगून, तशीच शिकवण देऊन, पित्याबद्दल आपुलकी, प्रेम निर्माण करत होती ...

सहा वर्षानंतर सिद्धार्थ, गौतम बुद्ध बनून.. हातात कटोरा घेऊन.. आपल्या अनुयायांसह परत आला... साधू वस्त्र परिधान करून भिक्षा मागणाऱ्या आपल्या तरुण राजकुमाराला पाहून सगळे थक्क झाले.. जेव्हा गौतम बुद्ध साध्वी झालेल्या यशोधरेला भेटायला येतात तेव्हा ती नम्रपणे 'मला आपल्या छत्रछायेत घ्या' अशी विनंती करते.. नंतर ती गौतम बुद्धांबरोबर आत्मिक सुखाच्या शोधात आणि सत्याच्या प्रचारात भिक्षुणी बनून मार्गस्थ  झाली..

पहिली स्त्री भिक्षुणी महाप्रजापती गौतमी हिने यशोधराची पाचशे स्त्री भिक्षुणींच्या नेतृत्वपदी नेमणूक केली...

आणि पुढे याच मार्गाने आपल्या तपस्येने यशोधरा अरिहंत झाली...


-मी मधुरा..
१४ ऑक्टोबर २०१८

#शक्तिरूपेण ५/९

Saturday, October 13, 2018

अंजना : एक तपस्विनी




अंजना.. रामभक्त हनुमानाची माता.. या शिवाय तिची ओळख आपल्याला अशी नाहीच..

अंजना... एक योगिनी.. एक तपस्वीनी... जिचे मनावर, शरीरावर आणि भावनांवर नियंत्रण आणि स्वामित्व होते...

अशी ही अंजना नेमकी कोण होती? तिच्या जन्माच्या अनेक आख्यायिका प्रचलित आहेत.. काहींप्रमाणे, ती महर्षी गौतम आणि अहिल्येची मुलगी होती.. तर काहींप्रमाणे ती अप्सरा ''पूंजिकस्तला'' जी दुर्वास ऋषीच्या शापामुळे वानरकन्या अंजना म्हणून जन्म घेते...

थाई रामायणानुसार एक दिवस महर्षी गौतम, अहिल्या आणि त्यांची तीन मुले वाली, सुग्रीव आणि अंजना… तुंगभद्रा नदी किनारी चालत होते. आपली मुले सावत्र आहेत, हे गौतमांना माहिती न्हवते. दोन्ही मुले वडिलांसोबत होती तर अंजना अहिल्ये बरोबर चालत होती.. उन्हामुळे छोट्या अंजनेचे पाय भाजत होते.. आपल्या भावांना वडिलांनी उचलून घेतलेले पाहून तिला राग आला आणि ती त्यांना म्हणाली कि तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी नाही पण सावत्र मुलांची आहे.. तिच्या बोलण्याने क्रोधीत झालेल्या गौतमांनी आपल्या मुलांना नदीत फेकून दिले..आणि म्हणाले, "जर का ती माझी मुले असतील तर ती नदीतून सुखरूप परत येतील.. अन्यथा वानर बनून राहतील.." वाली हा इंद्राचा तर सुग्रीव हा सूर्याचा मुलगा.. अहिल्या फक्त त्यांचा सांभाळ करत असते.. मुलांचे वानरात रूपांतर झालेले पाहून व्यथित झालेली अहिल्या अंजनाला शाप देते कि तिचा मुलगा पण वानर होऊन जन्माला येईल..

दुसरी कथा अशी सांगितली जाते कि.. त्रेतायुगामध्ये, ''पूंजिकस्तला'' नावाची एक अप्सरा होती... एकदा ऋषी दुर्वास इंद्राला भेटायला गेले असताना, इंद्रांने त्यांना त्याच्या सेवेसाठी कोणती अप्सरा हवी असे विचारले... स्वतःच्या सौंदर्याचा गर्व असणाऱ्या 'पूंजिकस्तला'ने दुर्वासांची टिंगल केली.. संतप्त दुर्वासांनी 'ज्या सौंदर्याचा तुला अभिमान आहे ते सौंदर्य क्षणभंगुर आहे.. तू पृथ्वीतलावर वानर म्हणून जन्माला येशील..' असा शाप दिला... नंतर तिच्या सेवेने, तिला झालेल्या पश्चातापाने प्रसन्न होऊन ते तिला आशीर्वाद हि देतात, 'तू एका महान पुत्राची आई होशील.. जो चिरंजीवी असेल..'

अशी ही शापित पूंजिकस्तला वानरराज कुंजर ची मुलगी म्हणून जन्म घेते... आभूषण, वस्त्रालंकार ह्या स्त्री सुलभ आवडी बरोबरच शस्त्रास्त्र, अध्यात्म, राजकारण ह्यात ही तिची रुची वाखाण्याजोगी होती.. धनुर्विद्येत तिचा हात धरणारे पंचक्रोशीत कोणीही नव्हते.. राक्षसांच्या रोजच्या होणाऱ्या उपद्रवापासून संरक्षण करण्यासाठी ऋषी पलभ इतर महारथीं बरोबर ह्या पराक्रमी अंजनाला हि आमंत्रित करतात.. तिथे अंजनाचे युद्ध नीती, युद्ध नैपुण्य,पाहून वानरराज केसरी तिच्या प्रेमात पडतो..

मातृत्वासाठी व्याकुळ झालेली अंजना, ऊन-वारा-पाऊस कशाचीही पर्वा न करता सात वर्षे शंकराची तपश्चर्या करते... तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शंकर तिला मातृत्वाचे वरदान देतो. पौराणिक कथेनुसार वायुदेवाकडून शंकर-पार्वतीनी पाठवून दिलेला त्यांचा अंश धारण करून अंजना गर्भवती राहते.. आणि हनुमानाचा जन्म होतो..

''पूंजिकस्तला''ला मिळालेला शाप, अंजना झाल्या नंतरची तिची जडण घडण, मातृत्वासाठी केलेली तपश्चर्या हे नाट्य विधिलिहित तर नसेल? हनुमानासारख्या महान पुत्राला जन्म देणारी माता हि तितक्याच ताकदीची असावी म्हणून.. अंजनाचा जीवन प्रवास पाहता ती नेहमी स्वतःची प्रगती करताना दिसते मग ती धार्मिक असुदे किंवा अध्यात्मिक.. हनुमानाबरोबर पण ती त्याच्या बालपणातच दिसते.. आईची गरज आहे तिथवरच.. हनुमानाला सूर्याकडे शिष्य म्हणून सुपूर्द करून ती मातृ कर्तव्यातून मुक्त होते.. काहींच्या मते ती अप्सरा बनून स्वर्गात जाते... तर काहीच्या मते तपश्चर्या करण्यासाठी...

अश्या ह्या स्वयंप्रेरित अंजनाची ओळख केवळ "हनुमानाची माता" अशी असण्यापेक्षा एक योद्धा, एक तपस्विनी अशी हि असावी...

 -मी मधुरा..
 १३ ऑक्टोबर २०१८

 #शक्तिरूपेण ४/९

Friday, October 12, 2018

मंदोदरी : लंकेची साम्राज्ञी




मंदोदरी.. लंकाधिपती रावणाची पत्नी, महापराक्रमी इंद्रजीतची माता ही तिची ओळख.. रामायणात ती आपल्याला रावणाला साथ देणारी, कधी कधी त्याला त्याच्या  चुका दाखवून योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणारी पत्नी.. अशी ती भेटते...

मंदोदरी.. एक महान पतिव्रता.. खरं तर रावण आणि रावणाच्या वधानंतर बिभीषण असे दोन पती असलेली मंदोदरी पतिव्रता कशी? हा प्रश्न नक्कीच पडतो.. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रात तर तिला वाली, रावण आणि बिभीषण असे तीन पती असल्याचा उल्लेख आहे.. त्यात असे म्हंटले आहे कि प्रत्येक लग्नानंतरची मंदोदरी वेगळी होती कारण प्रत्येकवेळी तिचे शरिराणू वेगळे होते.. तमोगुणी रावणाबरोबर त्याला अनुसरून तिने व्यवहार केला तर बिभीषणाबरोबर सत्वगुण परिधान करून वागली..  प्रत्येक लग्नात ती पतीशी एकनिष्ठ राहिली म्हणून ती महान पतिव्रता...

मंदोदरी.. पंचकन्या मधील एक व्यक्तिमत्व... अहिल्या, द्रौपदी, सीता, मंदोदरी आणि तारा ह्या पंचकन्या मानल्या आहेत.. त्यांच्या जीवनपटातून नारीवादाच्या भिन्न प्रतिमानांचे प्रदर्शन होते.. पुराणानुसार त्यांच्या नावाच्या उल्लेखाने सुद्धा पाप हरण होते.. 'असुर कन्या' ते 'स्त्री शक्तीचे अनोखे रूप' हा प्रवास कसा घडला असेल? अशी ही मंदोदरी नेमकी कोण होती?

मंदोदरी.. असुरराज मयासुराची मानसकन्या.. एक शापित अप्सरा... पार्वतीच्या शापामुळे ही अप्सरा बेडूक बनून एका तळ्यात बारा वर्षे राहते.. शंकराच्या उपासनेने तिचे बारा वर्षानंतर एका सुंदर तरुणीत रूपांतर होते... हीच ती असुरराज मयासुर आणि हेमा यांची मुलगी मंदोदरी...

मंदोदरी सुंदर तर होतीच पण त्या बरोबर ती दयाळू, धार्मिक आणि सदाचारिणी पण होती... युक्तिवादात ही ती पारंगत होती... प्रामाणिकपणे बोलण्याची क्षमता, हळुवार पण मुद्देसूद बोलणे हे तिचे अजुनी एक वैशिष्ठ... आपले मत स्पष्ट मांडले पाहिजे ह्या बद्दल आग्रही होती.. रावणाशी विवाह झाल्यावर तिला ह्या कौशल्याचा नक्कीच फायदा झाला..

मयासुराकडे आलेला रावण मंदोदरीला पाहतो आणि तिच्या प्रेमात पडतो.. आणि लग्न करायची इच्छा व्यक्त करतो.. मयासुराचा नकार ऐकून क्रोधीत झालेला रावण विद्रोह करतो.. आपल्या वडिलांना भयभीत झालेले पाहून, केवळ रावण हा शिवभक्त आहे ह्या विश्वासावर ती त्याच्याशी लग्न करायला तयार होते.. अत्यंत विश्वासू आणि पतिव्रता असलेली मंदोदरी रावणाच्या चुकीच्या आणि भ्रष्ट वागणुकीला कडकडून विरोध करत असे.. पण रावणाला धार्मिकतेच्या मार्गावर आणणे केवळ अशक्य होते.. 

सीतेचे अपहरण हे मोठ्ठे आव्हान तिने पेलले.. रावणाच्या वासनाना आवार घालणे शक्य नाही हे तिला माहिती होते… पण तरी लंकेच्या, कुळाच्या भल्यासाठी त्याने सीतेला सोडून द्यावे ह्यासाठी तिने खूप प्रयत्न केले.. सीताचे आयुष्य वाचवण्यासाठी मंदोदरीने आपली शक्ती पणाला लावली.. सीता लग्नाला तयार होत नाही हे सहन करू न शकलेला रावण जेव्हा सीतेवर तलवार उगारतो तेव्हा मंदोदरी त्याला असे करण्यापासून परावृत्त करते आणि सीतेला रामाकडे सुखरुप सोडून येण्यास सांगते... सौन्दर्यावर मोहित होऊन, लग्नासाठी अपहरण केलेल्या पर-स्त्री ला ती अभय देते... हा स्त्रीचा केलेला सन्मान नक्कीच प्रशंसनीय आहे.. युद्धाचा परिणाम माहिती असून सुद्धा, जेव्हा रावण युद्धासाठी निघतो तेव्हा त्याला तिलक लावून त्याच्या विजयाची कामना करते.. पतिव्रता स्त्री प्रमाणे ती सुखात दुःखात त्याच्या मागे उभी राहते...

युद्ध संपल्या नंतर मंदोदरी युद्धभूमीला जेव्हा भेट देते तेव्हा तिथला विनाश पाहून, धारातीर्थी पडलेला आपला पती, मुले, रावण सैना पाहून व्यथित होते.. लंकेचा झालेला विनाश टाळू न शकल्याच्या अपराधी भावनेने ती स्वत:ला महालात कोंडून घेते... मंदोदरीच्या सांत्वनासाठी आलेला राम तिला लंकेच्या साम्राज्ञीच्या कर्तव्याची जाणीव करून देतो.. रावणाची विधवा असली तरी ती एक विदुषी होती.. तिच्यातील असलेल्या कौशल्याचा, राजकारणातील ज्ञानाचा उपयोग लंकेचे राज्य सुराज्य करण्यासाठी करावा... तसेच लंकेच्या भवितव्यासाठी बिभीषणाशी लग्न करून लंकेची सम्राज्ञी म्हणून राज्य करावे... असा मानस ही राम व्यक्त करतो. 

अशी हि मंदोदरी..., लंकेच्या हितासाठी बिभीषणाशी लग्न करून लंकेला पुनर्जीवित करते...

-मी मधुरा..
१२ ऑक्टोबर २०१८

#शक्तिरूपेण ३/९


Thursday, October 11, 2018

अहिल्या





अहिल्या!!... रामायणातील एक उपेक्षित पात्र.. रामाची महती सांगण्यासाठी तर ह्या पात्राची निर्मिती झाली नाही ना असा प्रश्न पडावा इतपत उपेक्षित! शिळा होऊन पडलेल्या अहिल्येला रामाचा पाय लागतो आणि ती शापमुक्त होते.. एवढाच काय तो उल्लेख..

अहिल्या..  स्वर्गीय अप्सरा उर्वशीचा अभिमान तोडण्यासाठी ब्रह्माने स्वतः निर्मिलेले हे सुंदर शिल्प !!...

अश्या ह्या शिल्पाची देखभाल करण्यासाठी योग्य व्यक्ती म्हणजे महर्षी गौतम... गुणी, विवेकी आणि वेदातील गहन ज्ञानी.... ही रूपवती बालिका महर्षी गौतमांच्या आश्रमात राहू लागते... फक्त वयात येईपर्यंत... रुपगर्विता युवती अहिल्येला घेऊन जेव्हा महर्षी ब्रह्माकडे जातात, तेव्हा महर्षींचा संयम, ज्ञान आणि तपस्येने ब्रह्मा प्रभावित होतात.  

ब्रह्माच्या मनात आपल्या उपवर कन्येसाठी महर्षीं गौतम योग्य वर होते. पण अहिल्येच्या  सौंदर्याने देव, दानव, ऋषी, महर्षी सगळेच आकर्षित झाल्याने त्यांनी स्वयंवर करायचे ठरवले... सर्वप्रथम पृथ्वीप्रदक्षिणा करून परत येईल त्याच्याशी अहिल्येचा विवाह होईल... महर्षी गौतमावर प्रभावित होऊन ब्रह्मा त्यांना सांगतात कि एक गाय जिने नुकताच वासराला  जन्म दिला आहे तिला प्रदक्षिणा घातली तर ती पृथ्वीप्रदक्षिणे सामान आहे... आणि महर्षी गौतम आणि अहिल्येचा विवाह संपन्न होतो... अहिल्या न मिळाल्याने संतप्त झालेला इंद्र महर्षी गौतमांच्या आश्रमात येतो. महर्षी नाहीत ही खात्री करून त्यांचेच रूप घेऊन अहिल्ये बरोबर कामक्रीडा करतो... काहीतरी विपरीत घडते आहे ह्याची जाणीव झाल्याने लवकर परत आलेले ऋषी देवराज इंद्राला तेथे पाहून क्रोधीत होऊन शाप देतात... त्यांच्या क्रोधातून अहिल्या पण सुटत नाही... 'स्वतःच्या नवऱ्याचा स्पर्श न ओळखणारी तू ... पापी आहेस... तू ज्या रूपावर गर्व करतेस ते नाहीसे होऊन तू एक शिळा होशील… भगवान विष्णू जेव्हा ह्या आश्रमात येतील तेव्हाच तुझी ह्या शापातून मुक्तता होईल'... असे सांगून ते हिमालयात निघून जातात...

सर्वोच्च सृष्टीकाराने तयार केलेलं हे जिवंत शिल्प विष्णूची/रामाची वाट पाहत निर्जीव होऊन पडून राहतं.. सौंदर्याला मुकून, जगासाठी अदृश्य झालेली, अन्यायाने होरपळलेली अहिल्या विष्णूची अधीरतेने वाट पाहण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही..

ह्या पौराणिक कथेत, अहिल्येचे काय चुकले? का तिला असा शाप मिळाला? तिची बाजू का जाणून घेतली गेली नाही? ना विवाह प्रसंगी ना इंद्राकडून फसवणूक झाल्यावर... 'तुला कसा पती हवा?' हा प्रश्न ब्रह्माला तिला विचारावासा नाही वाटला?  जप-जाप्य, तपश्चर्या हेच जीवन असलेल्या, वडील वयाच्या माणसाशी लग्न करून ती खरंच सुखी होती का? आपल्या शास्त्रात सांगितल्या प्रमाणे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये माणसाची काही कर्तव्ये, काही जबाबदाऱ्या असतात... त्याचे कर्म त्याला करावेच लागते असे धर्म सांगतो.... मग ह्यातून महर्षी कसे सुटले? देवधर्म, तपश्चर्या आणि अध्यात्मा बरोबरच संसाराची जबाबदारी हे त्यांचे कर्तव्य नव्हते का? पत्नीला व्यभिचारी ठरवून, शाप देऊन हिमालयात निघून जाण्यात पुरुषार्थ होता का?

अहिल्येचे अनैतिक खरं-खोटं वर्तन ही कृती..  आणि शाप हा त्याचा परिणाम... असे असले तरी, शिळा होऊन पडलेल्या अहिल्येची मनस्थिती काय असेल? काय चालले असेल तिच्या मनात? काहीही चूक नसताना मिळालेली शिक्षा, झालेला अन्याय, झालेली फसवणूक आणि त्या बद्दलचा सात्विक संताप.. स्वाभिमानाला लागलेली ठेच आणि यातून आलेले नैराश्य… भावनांचा उद्रेक आणि शिळा होऊन पडल्यानंतरची असहाय्यता, घुसमट… आणि नंतर त्यातून आलेले परिस्थितीचे भान आणि त्याची स्वीकृती… की आणि काही? स्वतःची चूक नसताना झालेला अन्याय पचवून, तो स्वीकारून परिस्थितीशी एकरूप होणे.. ह्या दिव्यातून जाताना काय वाटले असेल तिला? राम येई पर्यंतचा अनिश्चित काळ सहनशीलतेने काढणे कसे जमले असेल तिला?  

इतकी युगे लोटली तरी अजूनही समाज बदलला नाही. आज ही आपल्याला अश्या अहिल्या पाहायला मिळतात.. समाज प्रबोधनासाठी, नवीन समाज रचनेसाठी रामायण लिहिले गेले... जर आपण रामायण, राम, सीता हा आदर्श मनात असू तर मग ह्या अहिल्या अजुनी का आहेत? असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही.

-मी मधुरा... ११ ऑक्टोबर २०१८

#शक्तिरूपेण २/९

Wednesday, October 10, 2018

गांधारी: शापित राजकन्या


नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!! Happy Navaratri Everyone!!

नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये मी मला भावलेल्या काही स्त्रियांबद्दल लिहिणार आहे.. आपल्या पुराणात, महाकाव्यात, इतिहासात अश्या अनेक शक्तिशाली प्रभावी स्त्रिया आहेत ज्या त्याच्यातील शक्तीचे, स्त्रियांच्या मनोभावनाचे प्रतिनिधित्व करतात, परंतु ज्या काळाआड हरवल्या आहेत किंवा त्यांना इतके प्राधान्य दिले गेले नाही.. ज्यांच्या बद्दल ह्यापूर्वी खूप काही लिहिले गेले आहे त्यांना मी यातून जाणीवपूर्वक वगळले आहे..

ह्या कथा रोमांचकारी आणि विस्मयजनक आहेत.. शापित अप्सरा, असहाय्य राजकन्या, ध्येयाने वेड्या झालेल्या माता... त्यांचे लहानपण, त्यांच्या लहानपणात घडलेल्या घटना आणि त्याचे तारुण्यात उमटलेले प्रतिसाद... नैतिकता-अनैतिकता, इच्छा-सूड, प्रेम-मत्सर, स्वार्थ-समर्पण… यामध्ये अडकलेल्या ह्या स्त्रिया ज्या शक्तिशाली आहेत, पण इतरांच्या तुलनेत त्यांच्या शक्तीचा वेगळ्या मार्गाने वापर करतात... प्रत्येकीची लढाई वेगळी आणि त्यावरची त्यांची युद्धनीती ही वेगळी.. काळाने काहींना भले खलनायिका म्हटले असेल पण मला ही सारी स्त्री शक्तीचीच रूपे वाटतात..

अश्या ह्या स्त्री शक्तींना यथाशक्ती यथामती नवरात्रीत अर्पिलेली ही काही शब्दपुष्पे… 


गांधारी: शापित राजकन्या



गांधारी म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती एक पतिव्रता, जिने आपल्या अंध पतीसाठी अंधत्व स्वीकारले...  जिला पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे अलौकिक शक्ती प्राप्त झाली... आणि यामुळेच जिच्या वाणीतून उमटणारा शब्द दुर्योधनासाठी वरदान किंवा श्रीकृष्णासाठी शाप ठरला..

गांधारी म्हटले कि शंभर पुत्रांची माता डोळ्यासमोर येते. पण खरंच तिची झालेली ही ओळख पुरेशी आहे? न्याय, नीती आणि धर्म ह्यावर अढळ श्रद्धा असणारी गांधारी फक्त एक पतिव्रता आणि शंभर पुत्रांची आई ह्या चौकटीत बसू शकेल? कुरु परिवारात असणारी कोणतीही स्त्री सामान्य कशी असेल? मग ती नेमकी कोण होती?...

गांधार देशाची म्हणून गांधारी असलेली ही "नंदिनी"... सुबल राजाची लाडकी कन्या "नंदिनी"... शापित सौंदर्याचं लेणं घेऊन आलेली "नंदिनी"... विनम्रता, बुद्धीचातुर्य, न्याय, नीती-धर्म यांचा अभ्यास असणारी "नंदिनी".... तेजाचे प्रतीक असणारी "नंदिनी"... शंकराकडून पतिव्रता आणि शतपुत्रवती चा आशीर्वाद मिळालेली "नंदिनी"... स्वतःवर, नियतीवर आणि वडिलांवर विश्वास असणारी “नंदिनी”.... केवळ वडिलांनी दिलेले वचन पाळण्यासाठी एका अंध राजाशी विवाह करून क्षत्रिय धर्माचे पालन करणारी “नंदिनी”... कुरुपरिवारातील गांधारीपेक्षा ही नंदिनी नक्कीच वेगळी होती... मग हस्तिनापुरात आल्यावर तिचे असे का व्हावे?  

डोळ्यात लाखो स्वप्ने घेऊन येणारी ही गांधारी नवथर नववधू तर नक्कीच नव्हती.. आपल्या सर्व स्वप्नांचा, इच्छा-भावनांचा, अंध पतीच्या जीवनाशी एकरूप होण्यासाठी त्याग करणारी स्त्री नवथर कशी असेल? डोळ्यावर पट्टी बांधून, स्वतःच्या स्वप्नांवर, सुखावर पट्टी बांधून अंध नवऱ्याच्या सुखात सुख मानणारी ही असामान्य स्त्री म्हणजे गांधारी!

डोळ्यावर पट्टी बांधून जेव्हा तिने हस्तिनापुरी प्रवेश केला असेल तेव्हा तिच्या काय भावना असतील???.... विवाहाच्या वेदीवर चढताना खरंच तिचे मन शांत असेल का? हृदयात चलबिचल नसेल का? एक स्त्री म्हणून भविष्याबद्दल रेखाटलेली स्वप्ने विवाहाच्या होमात भस्म होताना, आयुष्यातल्या अपेक्षांना आहुती देताना, साऱ्या सुखाला तिलांजली देताना ती स्वतःच्या अस्तित्वाला तर दूर करत नसेल?  विवाह संपन्न होत असताना ऐकू येणारा आईवडिलांचा हुंदका जो सुखाचा नव्हता, जो अंध पतीसाठी नव्हता तर डोळे असून अंध झालेल्या मुलींसाठी होता हे अनुभवणे किती कठीण आहे... हा नुसता डोळ्यांचा त्याग नव्हता तर सर्वस्वाचा त्याग होता आणि ह्या त्यागात ती धन्यता मनात होती. यापुढे फक्त लोकांची सहानुभूती, आणि त्यांचे शब्द, प्रसंगी कुत्सित टीका हे आयुष्य ती केवळ त्यागाच्या बळावर काढणार होती...

स्त्रीचा पुत्रप्राप्तीचा आनंद हा अवर्णनीय असतो.. त्यातून शतपुत्रांना जन्म देणारी एक माता मग तो गौरव काय वर्णावा.. पण दुर्योधनाच्या जन्मानंतर घडलेल्या अशुभ घटनांमुळे जेव्हा त्या तान्ह्याला कुलसंहारक संबोधून त्याचा त्याग करायचा सल्ला दिला जातो तेव्हा त्या माउलीला काय वाटले असेल? भविष्यात हा कुलसंहारक होईल म्हणून आत्ताच ममत्वाचा त्याग करायचा? नियतीच्या मनात जे असेल ते होईल पण पुत्राचा त्याग नाही करणार हे सांगण्या इतकी ती विद्रोही नक्कीच होती.

डोळ्यांवर पट्टी बांधून एखादया तपस्विनी प्रमाणे पतिधर्माची तपस्या करणाऱ्या गांधारीला, त्याच डोळ्यांनी  कुरुकुलाचा विनाश झालेला पाहायचा होता.. आणि तो विनाश तिच्या ज्येष्ठ पुत्राच्या हट्टामुळे होणार होता.. आणि हे विदारक सत्य तिला टाळता पण येणार नव्हते. सत्य, न्याय, नीती, दया, क्षमा जरी धर्माची रूपे असली तरी कर्तव्य हा सर्वश्रेष्ठ धर्म असतो. मातृत्व ह्या कर्तव्यात ती कमी तर पडत नव्हती ना??... बिचारी एक असहाय्य माता...

धृतराष्ट्र हस्तिनापुरचा कारभार पाहायला लागल्या नंतर राज्ञी असलेल्या गांधारीने कधी ही स्वतःला राज्ञी असे संबोधले नाही.. नीती धर्मावर श्रद्धा असणाऱ्या तिला हे राज्ञी पद कधी पटलेच नाही. विशाल अंत:करणाच्या गांधारीने पांडवांचा पक्ष प्रत्यक्ष कधीच स्वीकारला नसला तरी पांडवांच्या ठिकाणी असलेल्या धर्माचा विजय व्हावा अशी तिची अंतरीची साक्ष चकित करणारी आहे.

गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधून काय मिळवले? थोर पतिव्रता तर ती झाली पण कुरुवंशाचा आणि यादववंशाचा विनाश करण्याचे पातक तिच्या माथी आले.

गांधारीने जर केवळ पती अंध आहे म्हणून अंधत्व स्वीकारलं नसतं तर? अंध पतीचे डोळे बनून त्याच्या विचारांवर अंकुश ठेवला असता तर? दुर्योधनाच्या खलवृत्तीला वेळीच डोळसपणे योग्य ते संस्कार करून न्याय नीती आणि धर्म मनात रुजवला असता तर? .... कदाचित वेगळे महाभारत रचले गेले असते...



-मी मधुरा...
१० ऑक्टोबर २०१८

#शक्तिरूपेण १/९

Monday, October 1, 2018

Yoga in The Dark...

Yoga in The Dark... was blind for 90 mins.. 

Darkness… hesitancy… vulnerability… confusion... these were the feelings that overwhelmed me as I signed up for 'Yoga in The Dark' class at my yoga studio. Being blind for ninety minutes was quite enough challenging thought for me.. But when I positively looked at it, I felt that 'the dark is the place where anything is possible.. I might nail every pose.. no judgements.. everything will be perfect.."

It was quite unique and enriched experience for me.. Removing the sense of sight challenged my mind and body, allowing me to experience yoga in a whole new way..

Practicing yoga in the dark is a great way to free yourself from observation and judgment... Not only people won't be able to see what you’re doing or you will not be able to compare yourself with others or watch what you are doing in a mirror... This freedom will allow you to dive deeply into your practice, freed from comparisons and expectations.... You will find that in the dark, you have the freedom to look silly, tumble out of poses, and try new things without the hesitation that you may feel in a class setting... It also allows you the freedom to do what you want... In the dark, you can customize your practice, listen to your body, try new things, all while testing your balance and focus... 

I did practice 'Pratyahara' 5th limb of Yoga.. detaching from my senses (which connect us to the outside world) and focusing within.. By actually removing one of our senses... sight.. I challenged myself to look inward and quiet the mind and tried to find deep self-awareness... When we remove sight, our balance get shifted... You will not be able to steady yourself by focusing on dristi (point of focus) or through the awereness of your surroundings... It was so hard to do just a Tree Pose, keeping myself steady and balanced.. but when I started looking inward and really focusing on the body and the breath I could able to achieve the balance what I needed..  

This gets to the heart of what yoga is all about: a mind-body connection.. that is achieved by filtering out the world around you and finding peace and awareness within.

“If light is in your heart, you will find your way home.”

-मी मधुरा..
30th September 2018