उर्मिला.. अयोध्येचा राजकुमार लक्ष्मणाची पत्नी.. सीतेची लहान बहीण..
उर्मिला.. स्वतःच्या सुखाची आहुती देऊन सुद्धा रामायणात उपेक्षित राहिलेले पात्र..
उर्मिला.. मिथिलेचा राजा जनक आणि राणी सुनयना यांची मुलगी.. सीतेपेक्षा दहा एक वर्षाने लहान.. रूपवती असली तरी थोडीशी अशक्त.. त्यामुळे थोडीशी लाडात वाढलेली.. लहानपणीच आईची छत्रछाया हरवल्याने सीता तिचे सर्वस्व.. उर्मिला जशी सीतेची सावलीच..
सीतेच्या स्वयंवरासाठी, राजकुमार रामासोबत आलेल्या लक्ष्मणाला पाहता क्षणी उर्मिला त्याच्या प्रेमात पडते.. लक्ष्मणाची स्थिती उर्मिलेपेक्षा काही वेगळी नव्हती.. रामाने शिवधनुष्य मोडून स्वयंवराचा पण जिंकल्यानंतर, राम सीतेच्या विवाहासाठी अयोध्येहून आलेले राजा दशरथ उर्मिलेला लक्ष्मणासाठी मागणी घालतात.. दोघी बहिणींचा विवाह एकाच दिवशी संपन्न होतो.. आणि उर्मिला सावली सारखी सीतेबरोबर अयोध्येत ही वावरू लागते..
राजकुमार रामाच्या राज्याभिषेकाच्या बातमीने अस्वस्थ झालेली कैकेयी, राजा दशरथाने दिलेल्या वराचा उपयोग करून 'रामाला चौदा वर्षे वनवास आणि तिचा मुलगा भरत याचा राज्याभिषेक' असे मागते.. आपल्या सावत्र आईची आज्ञा मानून राम आणि सीता, आणि त्यांची सेवा करण्यासाठी लक्ष्मण वनवासाला जाण्याचे ठरवतात.. वनवासाचे ऐकून उर्मिला पण त्यांच्या बरोबर जाण्यास तयार होते.. अशक्त उर्मिलेला वनवासी जीवन झेपायचे नाही असे वाटून सीता तिला येण्यास नकार देते.. पती वनवासात असताना मी कशी राजवाड्यात राहू? असे विचारून सीतेचे मन वळवायचा प्रयत्न करते..
उर्मिला आपल्या बरोबर वनवासाला येणार हे जेव्हा लक्ष्मणाला समजते तेव्हा तो तिला, तिच्या सुनेच्या कर्तव्याची जाणीव करून देतो.. तिने अयोध्येत राहून राजा दशरथ, माता कौसल्या आणि माता सुमित्रा ह्यांची काळजी घ्यावी, त्यांची सेवा करावी... असे ही सांगतो... कदाचित, उर्मिला बरोबर असेल तर तो राम सीतेची सेवा चांगल्या प्रकारे करू शकणार नाही.. उर्मिलेमुळे त्यांचे मन चंचल होईल ही भीती तर त्याला वाटली नसेल?.. पतीकडून असे ऐकल्यावर, त्या नवविवाहित तरुणीला काय वाटले असेल? चौदा वर्षे पतीशिवाय राहणे, त्याची काळजी करत दिवस काढणे, ... पण उर्मिलेने हे खूप संयमाने घेतले.. लक्ष्मणाचा राम-सीते साठी असलेला सेवाभाव पाहून उर्मिला त्याच्याकडून राम-सीतेला आई वडिलांसमान मानून सेवा करण्याचे आणि चौदा वर्षात तिच्या बद्दल विचार न करण्याचे वचन घेतले.. आणि पतीच्या इच्छेचे पालन करण्यासाठी मागे अयोध्येत राहायचे ठरवले...
वनवासाला निघताना, निरोप घेण्यासाठी लक्ष्मण जेव्हा उर्मिलेच्या महालात जातो तेव्हा तिला राजवत्र नेसून साजशृंगार केलेला पाहून थक्क होतो... सगळी अयोध्या, सगळा परिवार दुःखात असताना, साजशृंगार करून तू, कैकयी मातेला ही मागे टाकलेस.. अशी विषयाची आसक्ती असणारी माझी पत्नी असूच शकत नाही.. आज पासून तुझा माझा काहीही संबंध नाही असे सांगून निघून जातो.. उर्मिलेला आपल्या पतीची ही प्रतिक्रिया माहिती असते.. तिच्यावरचे त्याचे प्रेम ती जाणत असते.. जरी तो कर्तव्यापोटी एकटीला सोडून गेला तरी पती धर्म न पाळल्याने तो चिंतीत राहील.. त्याच्या कर्तव्यात तो कमी पडेल.. म्हणून ती जाणीवपूर्वक त्याच्या मनात स्वतःबद्दल वाईट भाव निर्माण करते.. जेणे करून तो तिचा विचार करणार नाही..
राम सीता लक्ष्मण वनवासात गेल्यानंतर निद्रादेवी उर्मिलेला लक्ष्मणाची १४ वर्षे न झोप घेता राम सीतेची सेवा करण्याची इच्छा सांगते... ही इच्छा जर उर्मिलाने त्याची झोप अर्धांगिनी म्हणून स्विकारली तरच पूर्ण होणार होती... पतीच्या सेवेमध्ये, त्याच्या कर्तव्यामध्ये बाधा येऊ नये म्हणून ती ही अट सहज स्वीकारते.. आयुष्याचा सोनेरी काळ एखाद्या कलेवराप्रमाणे जगणे... एवढा मोठ्ठा हा त्याग!!!... रावणाचा पराक्रमी आणि शक्तिशाली पुत्र इंद्रजीतचा वध 'जो चौदा वर्षे झोपला नाही आणि ज्याने स्त्रीचे मुख पहिले नाही' अश्या योद्ध्यांकडून होणार असतो.. नियती हे कठीण काम उर्मिलेच्या योगदानाशिवाय हे घडवून आणू शकत नव्हती...
नियतीच्या ह्या नाट्यात ती, आई समान बहीण सीता, पिता समान राम आणि प्रिय पतीसाठी स्वतःच्या सुखाची आहुती देऊन चौदा वर्षे निश्चेष्ट आयुष्य जगली.. अयोध्येमध्ये उर्मिलेने कधी ही राजसुख उपभोगले नाही.. आणि त्या बद्दल कधीच नाराजी पण व्यक्त केली नाही.. जे तिला योग्य वाटले ते ती करत राहिली... मूकपणे पतीला साथ देत राहिली..
दुःख आणि वेदना सहन करून कर्तव्य पूर्तीसाठी तिने केलेले समर्पण खूप मोठ्ठे आहे.. त्रेतायुगाचे राम आणि सीता जरी नायक असले तरी उर्मिलेचे योगदान विसरून चालणार नाही.
-मी मधुरा...
१७ ऑक्टोबर २०१८
#शक्तिरूपेण ८/९
No comments:
Post a Comment