Saturday, October 13, 2018

अंजना : एक तपस्विनी




अंजना.. रामभक्त हनुमानाची माता.. या शिवाय तिची ओळख आपल्याला अशी नाहीच..

अंजना... एक योगिनी.. एक तपस्वीनी... जिचे मनावर, शरीरावर आणि भावनांवर नियंत्रण आणि स्वामित्व होते...

अशी ही अंजना नेमकी कोण होती? तिच्या जन्माच्या अनेक आख्यायिका प्रचलित आहेत.. काहींप्रमाणे, ती महर्षी गौतम आणि अहिल्येची मुलगी होती.. तर काहींप्रमाणे ती अप्सरा ''पूंजिकस्तला'' जी दुर्वास ऋषीच्या शापामुळे वानरकन्या अंजना म्हणून जन्म घेते...

थाई रामायणानुसार एक दिवस महर्षी गौतम, अहिल्या आणि त्यांची तीन मुले वाली, सुग्रीव आणि अंजना… तुंगभद्रा नदी किनारी चालत होते. आपली मुले सावत्र आहेत, हे गौतमांना माहिती न्हवते. दोन्ही मुले वडिलांसोबत होती तर अंजना अहिल्ये बरोबर चालत होती.. उन्हामुळे छोट्या अंजनेचे पाय भाजत होते.. आपल्या भावांना वडिलांनी उचलून घेतलेले पाहून तिला राग आला आणि ती त्यांना म्हणाली कि तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी नाही पण सावत्र मुलांची आहे.. तिच्या बोलण्याने क्रोधीत झालेल्या गौतमांनी आपल्या मुलांना नदीत फेकून दिले..आणि म्हणाले, "जर का ती माझी मुले असतील तर ती नदीतून सुखरूप परत येतील.. अन्यथा वानर बनून राहतील.." वाली हा इंद्राचा तर सुग्रीव हा सूर्याचा मुलगा.. अहिल्या फक्त त्यांचा सांभाळ करत असते.. मुलांचे वानरात रूपांतर झालेले पाहून व्यथित झालेली अहिल्या अंजनाला शाप देते कि तिचा मुलगा पण वानर होऊन जन्माला येईल..

दुसरी कथा अशी सांगितली जाते कि.. त्रेतायुगामध्ये, ''पूंजिकस्तला'' नावाची एक अप्सरा होती... एकदा ऋषी दुर्वास इंद्राला भेटायला गेले असताना, इंद्रांने त्यांना त्याच्या सेवेसाठी कोणती अप्सरा हवी असे विचारले... स्वतःच्या सौंदर्याचा गर्व असणाऱ्या 'पूंजिकस्तला'ने दुर्वासांची टिंगल केली.. संतप्त दुर्वासांनी 'ज्या सौंदर्याचा तुला अभिमान आहे ते सौंदर्य क्षणभंगुर आहे.. तू पृथ्वीतलावर वानर म्हणून जन्माला येशील..' असा शाप दिला... नंतर तिच्या सेवेने, तिला झालेल्या पश्चातापाने प्रसन्न होऊन ते तिला आशीर्वाद हि देतात, 'तू एका महान पुत्राची आई होशील.. जो चिरंजीवी असेल..'

अशी ही शापित पूंजिकस्तला वानरराज कुंजर ची मुलगी म्हणून जन्म घेते... आभूषण, वस्त्रालंकार ह्या स्त्री सुलभ आवडी बरोबरच शस्त्रास्त्र, अध्यात्म, राजकारण ह्यात ही तिची रुची वाखाण्याजोगी होती.. धनुर्विद्येत तिचा हात धरणारे पंचक्रोशीत कोणीही नव्हते.. राक्षसांच्या रोजच्या होणाऱ्या उपद्रवापासून संरक्षण करण्यासाठी ऋषी पलभ इतर महारथीं बरोबर ह्या पराक्रमी अंजनाला हि आमंत्रित करतात.. तिथे अंजनाचे युद्ध नीती, युद्ध नैपुण्य,पाहून वानरराज केसरी तिच्या प्रेमात पडतो..

मातृत्वासाठी व्याकुळ झालेली अंजना, ऊन-वारा-पाऊस कशाचीही पर्वा न करता सात वर्षे शंकराची तपश्चर्या करते... तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शंकर तिला मातृत्वाचे वरदान देतो. पौराणिक कथेनुसार वायुदेवाकडून शंकर-पार्वतीनी पाठवून दिलेला त्यांचा अंश धारण करून अंजना गर्भवती राहते.. आणि हनुमानाचा जन्म होतो..

''पूंजिकस्तला''ला मिळालेला शाप, अंजना झाल्या नंतरची तिची जडण घडण, मातृत्वासाठी केलेली तपश्चर्या हे नाट्य विधिलिहित तर नसेल? हनुमानासारख्या महान पुत्राला जन्म देणारी माता हि तितक्याच ताकदीची असावी म्हणून.. अंजनाचा जीवन प्रवास पाहता ती नेहमी स्वतःची प्रगती करताना दिसते मग ती धार्मिक असुदे किंवा अध्यात्मिक.. हनुमानाबरोबर पण ती त्याच्या बालपणातच दिसते.. आईची गरज आहे तिथवरच.. हनुमानाला सूर्याकडे शिष्य म्हणून सुपूर्द करून ती मातृ कर्तव्यातून मुक्त होते.. काहींच्या मते ती अप्सरा बनून स्वर्गात जाते... तर काहीच्या मते तपश्चर्या करण्यासाठी...

अश्या ह्या स्वयंप्रेरित अंजनाची ओळख केवळ "हनुमानाची माता" अशी असण्यापेक्षा एक योद्धा, एक तपस्विनी अशी हि असावी...

 -मी मधुरा..
 १३ ऑक्टोबर २०१८

 #शक्तिरूपेण ४/९

No comments:

Post a Comment