कैकेयी.... एक खलनायिका... जिच्यामुळे रामायण घडले.. जिच्या हट्टामुळे राम चौदा वर्षे वनवासाला गेला..
कैकेयी .. दुर्दैवाने हे नाव फक्त रामायणातच पाहायला मिळते.. रामाच्या प्रेमापोटी कैकयीचा इतका तिरस्कार केला जातो कि कोणी आपल्या मुलीचे नाव कैकेयी ठेवत नाही.. रामाने कितीही कैकेयीचा आदर केला, तिला दोषी न ठरवता जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तिची सुटका केली.. तरी ही राम भक्तां मध्ये कैकेयीला दोषी ठरवले जाते.. तिचा तिरस्कारच केला जातो.. जरी तुलसीदासानी सांगितले असले कि रामाचा वनवास हा रावणाचा नाश करण्यासाठी विधात्याने रचला होता.. कैकेयी निमित्तमात्र होती तरी ही कैकेयीचा दुस्वास केला जातो.. तिला कायमचा खलनायिकेचा किताब दिला गेला..
आपल्याला कैकेयी जरी नेहमी नकारात्मक व्यक्तिमत्व म्हणून दिसत असली तरी रामाला तिचे विश्वकल्याणातील योगदान माहिती होते. तिने आपल्या रामावरील प्रेमाची, ममतेची आहुती देऊन कायमचा अप्रामाणिकपणाचा शिक्का माथी मारून घेतला..
कैकेयी.. कैकेय देशाचा राजा अश्रवती याची कन्या.. सात भावांची एकुलती एक बहीण.. सात भावंडांमध्ये वाढल्याने असेल कदाचित पण सारे मर्दानी खेळ उत्तम खेळत असे.. घोडेस्वारी, भालाफेक, नेमबाजी, तलवार चालवणे ह्यात विशेष रुची... ह्याच बरोबर नृत्य, वादन पण करत असे... आणि ह्या कलांना सुंदरतेचे कोंदण तर होतेच.. अशी ही बहादूर धाडसी कैकेयी भावांबरोबर युद्धात ही सहभागी असायची.. रथाचे सारथ्य हे कसब सुद्धा तिच्याकडे होते....
काश्मीर मध्ये शिकारीच्या मोहिमेवर असताना राजा दशरथ आणि कैकेयीची भेट होते.. पाहता क्षणीच तो तिच्या प्रेमात पडतो आणि लग्नाची मागणी घालतो.. राजा अश्रवती एका अटीवर लग्नाला तयार होतो कि कैकेयीचा मुलगा अयोध्येच्या सिंहासनावर बसेल.. कौसल्येपासून अपत्य नसल्याने दशरथ हि अट मान्य करतो.. पुढे कैकेयीला पण अपत्य न झाल्याने तो सुमित्रेशी विवाह करतो.. पण दुर्दैवाने तिन्ही राण्यांना अपत्य न झाल्याने दशरथ अपत्य प्राप्तीसाठी यज्ञ करतो.. कौसल्येला राम, कैकेयीला भरत आणि शत्रुघ्न तर सुमित्रेला लक्ष्मण अशी मुले होतात.. कैकेयीचे रामावर इतर मुलांपेक्षा जरा जास्तीच प्रेम असते... मग असे असताना केवळ मंथरा सांगते म्हणून ती रामाला १४ वर्षे वनवासाला पाठवेल हे पटत नाही..
जसा रामाचा जन्म विश्वकल्याणासाठी झाला होता तसेच रामाच्या आयुष्यात कैकेयीच्या असल्याचे एक विशिष्ठ ध्येय होते.. 'रामाला राज्य न मिळणे आणि तो वनवासात जाणे' हे नाट्य कैकेयीच्या भोवती फिरताना दिसते.. ह्याची पायांमुळे कैकेयीच्या लहानपणापासून रोवली गेली आहेत.. लहानपणी कैकेयी एका ध्यानस्त बसलेल्या ऋषीच्या चेहऱ्याला काळे फासते.. संतापून तो ऋषी तिला शाप देतो कि जसे तू मला काळे फसले आहेस तसे तुझ्या नावाला ही काळे फसले जाईल... दशरथाने अश्रवतीला दिलेले वचन कि कैकेयीचा मुलगा सिंहासनावर बसेल... 'प्राण जाए पार वचन न जाए' ह्या रघुकुल ब्रीदानुसार ह्या वचनाचं पालन आवश्यक होते.. आणि राम जन्माचे मूळ 'रावण वध' होता.. जर राम सिंहासनावर बसून राज्यकारभारात गुंतला असता तर ते कसे शक्य होते.. त्याला कोणीतरी राज्याबाहेर काढणे आवश्यक होते.. आणि हे काम मुत्सद्दी कैकेयी शिवाय कोणीच करू शकत नव्हते..
रामकथेचे प्रवक्ते मुरारी बापू कैकेयीच्या वागण्याचे चौथे कारण देतात.. कैकेयीचे गुरु 'ऋषी रत्न' हे मोठे ज्योतिषी होते.. त्यांनी तिला सांगितले होते कि तिचे लग्न रघुकुलात राजा दशरथाशी होईल, त्याचा मृत्यू पुत्र वियोगामुळे होईल... आणि त्याचे कारण तू असशील.. पिता पुत्र एकत्र राहिले तर वंशाचा नाश होईल.. रघुवंश वाचवण्यासाठी १४ वर्षे ते सिंहासन रिकामे असणे आवश्यक आहे.. पुढे गुरु वशिठ्याच्या सल्यानुसार कैकेयी तिचे वर मागते कि रामाला १४ वर्ष वनवास आणि भरताला राज्य.. कैकेयीला खात्री असते की भरत सिंहासनावर बसणार नाही.. मग आपोआपच सिंहासन रिकामे राहील..
सामसूर राक्षसाबरोबर लढाईच्यावेळी देवराज इंद्र दशरथाला मदतीसाठी बोलावतो. तेव्हा कैकेयी दशरथाच्या रथाचे सारथ्य करते.. लढाईच्यावेळी रथाचे चाक निखळल्याचा आवाज तिला येतो.. सतर्क राहून ती रथ सुरक्षित ठिकाणी घेऊन जाते.. रथाचे चाक दुरुस्त करते.. जखमी नवऱ्याची काळजी घेऊन परत रणांगणात येते.. तिच्या ह्या गुणांवर खुश होऊन दशरथ तिला २ वर देतो.. ह्या वराची आठवण वशिष्ठ आणि मंथरा कैकेयीला ह्यावेळी करून देतात.. पण दोघांचे कारण वेगळे असते..
मंथरा... हे ही असेच नकारात्मक व्यक्तिमत्व.. मंथरेने कैकेयीचे कान भरले म्हणून कैकेयी अशी स्वार्थी वागली.. मंथरा, कैकेयीची दाई.. आईविना असलेल्या कैकेयीला ममतेची कूस दिली.. राजमातेची दाई व्हायचे स्वप्न उराशी बाळगून ती कैकेयीचे कान भरते असे एक कारण सांगितले जाते.. परंतु मंथरा हे सुद्धा कैकेयी सारखे विशिष्ट उद्देश्यासाठी योजलेले पात्र मानले जाते.. रामाच्या ममतेने उद्दिष्ट भ्रष्ट झालेल्या कैकेयीला तिच्या जीवनाच्या उद्देश्यापर्यंत पोचवणे हे मंथरेचे काम होते.. म्हंणून मंथरेने रावणाला मारले असे ही मानले जाते.. अनुराधा पौंडवालांच्या एका आरतीत.. देवी शरण जो आए, उनका उद्धार किया | पैठि मंथरा दासी, रावण संहार किया || ... असे ऐकले.
हे सगळे माहिती असून सुद्धा कैकेयी ह्या दैवलीलेत, नाटकात सहभागी झाली आणि कायमची खलनायिका झाली. खरचं ही खलनायिका होती? हिचा आपण खलनायिका म्हणून दुःस्वास केला पाहिजे की एक धुरंधर राजकारणी, शूर योद्धा, आदर्श पत्नी, आदर्श माता म्हणून गौरव केला पाहिजे?..
-मी मधुरा..
१६ ऑक्टोबर २०१८
#शक्तिरूपेण ७/९
No comments:
Post a Comment