तारा, चंद्रा बरोबर दिसणारी तारिका .. जिचा चंद्राबरोबर उदय ही होतो आणि अस्त ही!...जी त्याच्या कले बरोबर खुलत राहते.. जसे आकंठ प्रेमात बुडालेले युगल..
वास्तविक तारा, देवांचे गुरु बृहस्पती यांची पत्नी.. अर्धांगिनी.. प्रत्येक धार्मिक विधीत साथ देणारी सहचारिणी.. पण हे नाते इतकेच मर्यादित होते... द्वापार युगात धार्मिक विधी हा जीवनातील लक्षणीय पैलू होता.. पत्नी शिवाय धार्मिक विधी नाही... पत्नी शिवाय आशीर्वाद नाही.. पत्नी शिवाय स्वर्ग नाही आणि मुक्ती हि नाही.. त्यामुळे स्त्रीचे स्थान पुरुषाच्या जीवनात अढळ होते... आणि केवळ ह्याच कारणांसाठी तारा बृहस्पतींच्या आयुष्याचा भाग होती..
पौर्णिमेच्या चंद्राला पाहून आकर्षित झालेली तारा चंद्र नगरीत त्याला भेटायला जाते.. चंद्र हि तिच्या सौंदर्यावर मोहित होतो... प्रणयी भावनेने त्यांचा सहवास सुरु होतो.. आपली पत्नी खूप दिवस परत न आलेली पाहून बृहस्पती चंद्राकडे तिला आणण्यासाठी जातात. पण तारा त्यांच्या बरोबर जाण्यास स्पष्ट नकार देते. चंद्राचे गुरु असलेले बृहस्पती त्याला सांगतात कि "गुरु पत्नी ही आई समान असते आणि तिच्या बरोबर पत्नी सारखे राहणे हा व्यभिचार आहे"... "तारा तिच्या मर्जीने माझ्याकडे राहते त्यामुळे ती व्यभिचारी नाही. मी तिला परत पाठवणार नाही"... असे सांगून चंद्र त्यांना परत पाठवतो.
पत्नीला गमावण्या बरोबरच, पत्नी नाही म्हणून पणाला लागलेली दैनंदिन धार्मिक विधीतील सिद्धता, प्रतिष्ठा ह्याने संतप्त झालेले बृहस्पती, आपल्या पत्नीच्या सुटकेसाठी इंद्राकडे मदत मागतात. पण तारा इंद्राला ही जुमानत नाही.. 'मी कैद नाही तर मी माझ्या मर्जीने चंद्राकडे रहात आहे'... असे ती बृहस्पतीच्या मदतीसाठी आलेल्या इंद्राला सांगते.. चंद्र सुद्धा 'तारा बृहस्पतीकडे खुश नाही... तिला जायचे नसेल तर मी पाठवणार नाही..' असे सांगून युद्धाला ही तयार होतो..
तारा चंद्राची प्रेयसी म्हणून मानाने जीवन जगते.. कोठेही तारा दंडित किंवा दोषी ठरत नाही किंवा तिने पती सोडून दुसर्याशी संबंध ठेवले म्हणून व्यभिचारी ही ठरत नाही.. कारण त्या काळात, धर्माच्या अनुषंगाने, सामाजिक नियमानुसार स्त्री ही वापरली जाऊ शकत नव्हती, कोणी तिच्या बरोबर दुर्व्यवहार करू शकत नव्हता, तिला तिच्या मनाप्रमाणे जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार होता आणि हे सुनिश्चित होते.
आजकाल मात्र आपण अश्या स्त्रियांना, त्यांची बाजू जाणून न घेता व्यभिचारी म्हणून मोकळे होतो...
या टप्यावर चंद्राने विचारलेले दोन प्रश्न महत्वाचे वाटतात.. एक: जर एखाद्या स्त्रीने आपल्या मर्जीने घर सोडले आणि ती दुसऱ्या पुरुषा बरोबर राहू लागली तर त्यात त्या दुसऱ्या पुरुषाचा काय दोष? आणि दुसरा: कौटुंबिक आनंद हा पती आणि पत्नी दोघांच्या आनंदावर अवलंबून असतो.. जर पत्नी सुखी नसेल तर मग कुटुंब आनंदी कसे होईल?
स्त्रीला एवढी मनाची आणि स्वातंत्र्याची मुभा देणारी समाज व्यवस्था आज निर्माण होऊ शकेल का?
-मी मधुरा..
१५ ऑक्टोबर २०१८
#शक्तिरूपेण ६/९
No comments:
Post a Comment