Thursday, October 11, 2018

अहिल्या





अहिल्या!!... रामायणातील एक उपेक्षित पात्र.. रामाची महती सांगण्यासाठी तर ह्या पात्राची निर्मिती झाली नाही ना असा प्रश्न पडावा इतपत उपेक्षित! शिळा होऊन पडलेल्या अहिल्येला रामाचा पाय लागतो आणि ती शापमुक्त होते.. एवढाच काय तो उल्लेख..

अहिल्या..  स्वर्गीय अप्सरा उर्वशीचा अभिमान तोडण्यासाठी ब्रह्माने स्वतः निर्मिलेले हे सुंदर शिल्प !!...

अश्या ह्या शिल्पाची देखभाल करण्यासाठी योग्य व्यक्ती म्हणजे महर्षी गौतम... गुणी, विवेकी आणि वेदातील गहन ज्ञानी.... ही रूपवती बालिका महर्षी गौतमांच्या आश्रमात राहू लागते... फक्त वयात येईपर्यंत... रुपगर्विता युवती अहिल्येला घेऊन जेव्हा महर्षी ब्रह्माकडे जातात, तेव्हा महर्षींचा संयम, ज्ञान आणि तपस्येने ब्रह्मा प्रभावित होतात.  

ब्रह्माच्या मनात आपल्या उपवर कन्येसाठी महर्षीं गौतम योग्य वर होते. पण अहिल्येच्या  सौंदर्याने देव, दानव, ऋषी, महर्षी सगळेच आकर्षित झाल्याने त्यांनी स्वयंवर करायचे ठरवले... सर्वप्रथम पृथ्वीप्रदक्षिणा करून परत येईल त्याच्याशी अहिल्येचा विवाह होईल... महर्षी गौतमावर प्रभावित होऊन ब्रह्मा त्यांना सांगतात कि एक गाय जिने नुकताच वासराला  जन्म दिला आहे तिला प्रदक्षिणा घातली तर ती पृथ्वीप्रदक्षिणे सामान आहे... आणि महर्षी गौतम आणि अहिल्येचा विवाह संपन्न होतो... अहिल्या न मिळाल्याने संतप्त झालेला इंद्र महर्षी गौतमांच्या आश्रमात येतो. महर्षी नाहीत ही खात्री करून त्यांचेच रूप घेऊन अहिल्ये बरोबर कामक्रीडा करतो... काहीतरी विपरीत घडते आहे ह्याची जाणीव झाल्याने लवकर परत आलेले ऋषी देवराज इंद्राला तेथे पाहून क्रोधीत होऊन शाप देतात... त्यांच्या क्रोधातून अहिल्या पण सुटत नाही... 'स्वतःच्या नवऱ्याचा स्पर्श न ओळखणारी तू ... पापी आहेस... तू ज्या रूपावर गर्व करतेस ते नाहीसे होऊन तू एक शिळा होशील… भगवान विष्णू जेव्हा ह्या आश्रमात येतील तेव्हाच तुझी ह्या शापातून मुक्तता होईल'... असे सांगून ते हिमालयात निघून जातात...

सर्वोच्च सृष्टीकाराने तयार केलेलं हे जिवंत शिल्प विष्णूची/रामाची वाट पाहत निर्जीव होऊन पडून राहतं.. सौंदर्याला मुकून, जगासाठी अदृश्य झालेली, अन्यायाने होरपळलेली अहिल्या विष्णूची अधीरतेने वाट पाहण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही..

ह्या पौराणिक कथेत, अहिल्येचे काय चुकले? का तिला असा शाप मिळाला? तिची बाजू का जाणून घेतली गेली नाही? ना विवाह प्रसंगी ना इंद्राकडून फसवणूक झाल्यावर... 'तुला कसा पती हवा?' हा प्रश्न ब्रह्माला तिला विचारावासा नाही वाटला?  जप-जाप्य, तपश्चर्या हेच जीवन असलेल्या, वडील वयाच्या माणसाशी लग्न करून ती खरंच सुखी होती का? आपल्या शास्त्रात सांगितल्या प्रमाणे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये माणसाची काही कर्तव्ये, काही जबाबदाऱ्या असतात... त्याचे कर्म त्याला करावेच लागते असे धर्म सांगतो.... मग ह्यातून महर्षी कसे सुटले? देवधर्म, तपश्चर्या आणि अध्यात्मा बरोबरच संसाराची जबाबदारी हे त्यांचे कर्तव्य नव्हते का? पत्नीला व्यभिचारी ठरवून, शाप देऊन हिमालयात निघून जाण्यात पुरुषार्थ होता का?

अहिल्येचे अनैतिक खरं-खोटं वर्तन ही कृती..  आणि शाप हा त्याचा परिणाम... असे असले तरी, शिळा होऊन पडलेल्या अहिल्येची मनस्थिती काय असेल? काय चालले असेल तिच्या मनात? काहीही चूक नसताना मिळालेली शिक्षा, झालेला अन्याय, झालेली फसवणूक आणि त्या बद्दलचा सात्विक संताप.. स्वाभिमानाला लागलेली ठेच आणि यातून आलेले नैराश्य… भावनांचा उद्रेक आणि शिळा होऊन पडल्यानंतरची असहाय्यता, घुसमट… आणि नंतर त्यातून आलेले परिस्थितीचे भान आणि त्याची स्वीकृती… की आणि काही? स्वतःची चूक नसताना झालेला अन्याय पचवून, तो स्वीकारून परिस्थितीशी एकरूप होणे.. ह्या दिव्यातून जाताना काय वाटले असेल तिला? राम येई पर्यंतचा अनिश्चित काळ सहनशीलतेने काढणे कसे जमले असेल तिला?  

इतकी युगे लोटली तरी अजूनही समाज बदलला नाही. आज ही आपल्याला अश्या अहिल्या पाहायला मिळतात.. समाज प्रबोधनासाठी, नवीन समाज रचनेसाठी रामायण लिहिले गेले... जर आपण रामायण, राम, सीता हा आदर्श मनात असू तर मग ह्या अहिल्या अजुनी का आहेत? असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही.

-मी मधुरा... ११ ऑक्टोबर २०१८

#शक्तिरूपेण २/९

No comments:

Post a Comment