यशोधरा... गौतम बुद्धाची पत्नी.. खरं तर बुद्धाच्या पत्नीचे नाव यशोधरा हे किती जणांना माहिती आहे?... फक्त इतके माहिती आहे कि राजकुमार सिद्धार्थ आपल्या पत्नीला आणि नवजात बालकाला सोडून सत्याच्या शोधासाठी बाहेर पडला.. नंतर पुढे ह्या यशोधरेचे काय झाले? काय वाटले असेल तिला? त्याच्या शिवाय ती कशी राहिली असेल?... पुत्रप्राप्तीचा आनंद असतानाही पतीने घर सोडल्याचे कळले असेल तेव्हा ती उध्वस्त झाली नसेल का?..
यशोधरा.. कोलिया साम्राज्याचा राजा सुपुबुद्ध आणि राणी पामिता यांची कन्या... सौंदर्य आणि करुणा यांचे प्रतीक.. नावाप्रमाणेच 'वैभव प्राप्त' करून देणारी..
अश्या ह्या यशोधरेचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी तिचा मामेभाऊ शल्य देशाचा राजकुमार सिद्धार्थशी होतो.. विवाहापूर्वीच तिला माहिती होते कि सिद्धार्थ सांसारिक सुख सोडून सत्याच्या शोधार्थ बाहेर पडेल.. लहानपणापासून ती त्याला ओळखत असल्याने त्याचे विचार, त्याची मानसिक जडण घडण तिला माहिती होती.. पुढे राज्यकारभारात, जनतेच्या दुःखाची काळजी घेताना, जगाच्या चिंतांबद्दल विचार विनिमय करताना ती त्याच्या बरोबर होतीच..
'राहुल' च्या जन्मानंतर सिद्धार्थने बायको-मुलगा-संसारिक सुख ह्यात न अडकता खऱ्या सुखाच्या शोधात घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला.. जेव्हा हे यशोधरेला कळले तेव्हा तिने न डगमगता ह्या परिस्थितीला तोंड दिले.. कदाचित ही वेळ कधीतरी येणार आहे हे तिला माहिती होते.. ना तिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, ना कोणता युक्तिवाद.. कदाचित सिद्धार्थच्या मनाविरुद्ध त्याला संसारात गुरफटून ठेवणे तिला मान्य नसेल.. ना त्याने ती सुखी होणार, ना तो.. त्याच्या मार्गात अडथळा बनण्यापेक्षा तिने त्याच्या निर्णयाला धैर्याने सामोरे जाण्याचे ठरवले.. संसारात राहून, राजवाड्यात राहून त्याला साथ द्यायचे ठरवले..
'मोठ्या गोष्टी मिळवण्याकरता लहान लहान गोष्टींचा त्याग करावा लागतो... ' असे ती तिच्यावर दया दाखवणाऱ्यांना सांगे.. सिद्धार्थ परत येणार नाही हे माहिती असताना दुसरा विवाह करायला तिने ठामपणे नकार दिला.. तो नक्कीच अंतिम सुखाचे ज्ञान प्राप्त करून, बुद्ध बनेल हा विश्वास तिला होता.. बुद्ध झाल्यावर तो आपला पती किंवा आपल्या मुलाचा पिता म्हणून नक्कीच परत येणार नाही.. पण तो परत येईल हा ही विश्वास होता..
सिद्धार्थ बाहेर पडल्यावर त्याच्या प्रत्येक हालचालीवर ती लक्ष ठेवून होती.. दागदागिने, वस्त्रालंकार त्यागून तिनेही त्याच्या सारखी संन्यासी वस्त्रे धारण केली.. राजवाडा सोडून राजवाड्याच्या बागेत पर्णकुटी बांधून राहू लागली.. चटईवर झोपणे, एक वेळचे जेवणे असा दिनक्रम अवलंबला.. थोडक्यात ती राजवाड्यात राहून संन्यासी जीवन जगू लागली.. सिद्धार्थ बाहेर राहून अंतिम सुख शोधत होता तर यशोधरा चार भिंतीत राहून स्वतःला घडवत तेच सुख शोधायचा प्रयत्न करत होती. सासू सासऱ्यांच्या मदतीने राज्यकारभार पण चालवत होती.. राहुलला सुद्धा त्याच्या पित्याच्या उच्च कामाबद्दल सांगून, तशीच शिकवण देऊन, पित्याबद्दल आपुलकी, प्रेम निर्माण करत होती ...
सहा वर्षानंतर सिद्धार्थ, गौतम बुद्ध बनून.. हातात कटोरा घेऊन.. आपल्या अनुयायांसह परत आला... साधू वस्त्र परिधान करून भिक्षा मागणाऱ्या आपल्या तरुण राजकुमाराला पाहून सगळे थक्क झाले.. जेव्हा गौतम बुद्ध साध्वी झालेल्या यशोधरेला भेटायला येतात तेव्हा ती नम्रपणे 'मला आपल्या छत्रछायेत घ्या' अशी विनंती करते.. नंतर ती गौतम बुद्धांबरोबर आत्मिक सुखाच्या शोधात आणि सत्याच्या प्रचारात भिक्षुणी बनून मार्गस्थ झाली..
पहिली स्त्री भिक्षुणी महाप्रजापती गौतमी हिने यशोधराची पाचशे स्त्री भिक्षुणींच्या नेतृत्वपदी नेमणूक केली...
आणि पुढे याच मार्गाने आपल्या तपस्येने यशोधरा अरिहंत झाली...
-मी मधुरा..
१४ ऑक्टोबर २०१८
#शक्तिरूपेण ५/९
No comments:
Post a Comment