Wednesday, October 10, 2018

गांधारी: शापित राजकन्या


नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!! Happy Navaratri Everyone!!

नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये मी मला भावलेल्या काही स्त्रियांबद्दल लिहिणार आहे.. आपल्या पुराणात, महाकाव्यात, इतिहासात अश्या अनेक शक्तिशाली प्रभावी स्त्रिया आहेत ज्या त्याच्यातील शक्तीचे, स्त्रियांच्या मनोभावनाचे प्रतिनिधित्व करतात, परंतु ज्या काळाआड हरवल्या आहेत किंवा त्यांना इतके प्राधान्य दिले गेले नाही.. ज्यांच्या बद्दल ह्यापूर्वी खूप काही लिहिले गेले आहे त्यांना मी यातून जाणीवपूर्वक वगळले आहे..

ह्या कथा रोमांचकारी आणि विस्मयजनक आहेत.. शापित अप्सरा, असहाय्य राजकन्या, ध्येयाने वेड्या झालेल्या माता... त्यांचे लहानपण, त्यांच्या लहानपणात घडलेल्या घटना आणि त्याचे तारुण्यात उमटलेले प्रतिसाद... नैतिकता-अनैतिकता, इच्छा-सूड, प्रेम-मत्सर, स्वार्थ-समर्पण… यामध्ये अडकलेल्या ह्या स्त्रिया ज्या शक्तिशाली आहेत, पण इतरांच्या तुलनेत त्यांच्या शक्तीचा वेगळ्या मार्गाने वापर करतात... प्रत्येकीची लढाई वेगळी आणि त्यावरची त्यांची युद्धनीती ही वेगळी.. काळाने काहींना भले खलनायिका म्हटले असेल पण मला ही सारी स्त्री शक्तीचीच रूपे वाटतात..

अश्या ह्या स्त्री शक्तींना यथाशक्ती यथामती नवरात्रीत अर्पिलेली ही काही शब्दपुष्पे… 


गांधारी: शापित राजकन्या



गांधारी म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती एक पतिव्रता, जिने आपल्या अंध पतीसाठी अंधत्व स्वीकारले...  जिला पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे अलौकिक शक्ती प्राप्त झाली... आणि यामुळेच जिच्या वाणीतून उमटणारा शब्द दुर्योधनासाठी वरदान किंवा श्रीकृष्णासाठी शाप ठरला..

गांधारी म्हटले कि शंभर पुत्रांची माता डोळ्यासमोर येते. पण खरंच तिची झालेली ही ओळख पुरेशी आहे? न्याय, नीती आणि धर्म ह्यावर अढळ श्रद्धा असणारी गांधारी फक्त एक पतिव्रता आणि शंभर पुत्रांची आई ह्या चौकटीत बसू शकेल? कुरु परिवारात असणारी कोणतीही स्त्री सामान्य कशी असेल? मग ती नेमकी कोण होती?...

गांधार देशाची म्हणून गांधारी असलेली ही "नंदिनी"... सुबल राजाची लाडकी कन्या "नंदिनी"... शापित सौंदर्याचं लेणं घेऊन आलेली "नंदिनी"... विनम्रता, बुद्धीचातुर्य, न्याय, नीती-धर्म यांचा अभ्यास असणारी "नंदिनी".... तेजाचे प्रतीक असणारी "नंदिनी"... शंकराकडून पतिव्रता आणि शतपुत्रवती चा आशीर्वाद मिळालेली "नंदिनी"... स्वतःवर, नियतीवर आणि वडिलांवर विश्वास असणारी “नंदिनी”.... केवळ वडिलांनी दिलेले वचन पाळण्यासाठी एका अंध राजाशी विवाह करून क्षत्रिय धर्माचे पालन करणारी “नंदिनी”... कुरुपरिवारातील गांधारीपेक्षा ही नंदिनी नक्कीच वेगळी होती... मग हस्तिनापुरात आल्यावर तिचे असे का व्हावे?  

डोळ्यात लाखो स्वप्ने घेऊन येणारी ही गांधारी नवथर नववधू तर नक्कीच नव्हती.. आपल्या सर्व स्वप्नांचा, इच्छा-भावनांचा, अंध पतीच्या जीवनाशी एकरूप होण्यासाठी त्याग करणारी स्त्री नवथर कशी असेल? डोळ्यावर पट्टी बांधून, स्वतःच्या स्वप्नांवर, सुखावर पट्टी बांधून अंध नवऱ्याच्या सुखात सुख मानणारी ही असामान्य स्त्री म्हणजे गांधारी!

डोळ्यावर पट्टी बांधून जेव्हा तिने हस्तिनापुरी प्रवेश केला असेल तेव्हा तिच्या काय भावना असतील???.... विवाहाच्या वेदीवर चढताना खरंच तिचे मन शांत असेल का? हृदयात चलबिचल नसेल का? एक स्त्री म्हणून भविष्याबद्दल रेखाटलेली स्वप्ने विवाहाच्या होमात भस्म होताना, आयुष्यातल्या अपेक्षांना आहुती देताना, साऱ्या सुखाला तिलांजली देताना ती स्वतःच्या अस्तित्वाला तर दूर करत नसेल?  विवाह संपन्न होत असताना ऐकू येणारा आईवडिलांचा हुंदका जो सुखाचा नव्हता, जो अंध पतीसाठी नव्हता तर डोळे असून अंध झालेल्या मुलींसाठी होता हे अनुभवणे किती कठीण आहे... हा नुसता डोळ्यांचा त्याग नव्हता तर सर्वस्वाचा त्याग होता आणि ह्या त्यागात ती धन्यता मनात होती. यापुढे फक्त लोकांची सहानुभूती, आणि त्यांचे शब्द, प्रसंगी कुत्सित टीका हे आयुष्य ती केवळ त्यागाच्या बळावर काढणार होती...

स्त्रीचा पुत्रप्राप्तीचा आनंद हा अवर्णनीय असतो.. त्यातून शतपुत्रांना जन्म देणारी एक माता मग तो गौरव काय वर्णावा.. पण दुर्योधनाच्या जन्मानंतर घडलेल्या अशुभ घटनांमुळे जेव्हा त्या तान्ह्याला कुलसंहारक संबोधून त्याचा त्याग करायचा सल्ला दिला जातो तेव्हा त्या माउलीला काय वाटले असेल? भविष्यात हा कुलसंहारक होईल म्हणून आत्ताच ममत्वाचा त्याग करायचा? नियतीच्या मनात जे असेल ते होईल पण पुत्राचा त्याग नाही करणार हे सांगण्या इतकी ती विद्रोही नक्कीच होती.

डोळ्यांवर पट्टी बांधून एखादया तपस्विनी प्रमाणे पतिधर्माची तपस्या करणाऱ्या गांधारीला, त्याच डोळ्यांनी  कुरुकुलाचा विनाश झालेला पाहायचा होता.. आणि तो विनाश तिच्या ज्येष्ठ पुत्राच्या हट्टामुळे होणार होता.. आणि हे विदारक सत्य तिला टाळता पण येणार नव्हते. सत्य, न्याय, नीती, दया, क्षमा जरी धर्माची रूपे असली तरी कर्तव्य हा सर्वश्रेष्ठ धर्म असतो. मातृत्व ह्या कर्तव्यात ती कमी तर पडत नव्हती ना??... बिचारी एक असहाय्य माता...

धृतराष्ट्र हस्तिनापुरचा कारभार पाहायला लागल्या नंतर राज्ञी असलेल्या गांधारीने कधी ही स्वतःला राज्ञी असे संबोधले नाही.. नीती धर्मावर श्रद्धा असणाऱ्या तिला हे राज्ञी पद कधी पटलेच नाही. विशाल अंत:करणाच्या गांधारीने पांडवांचा पक्ष प्रत्यक्ष कधीच स्वीकारला नसला तरी पांडवांच्या ठिकाणी असलेल्या धर्माचा विजय व्हावा अशी तिची अंतरीची साक्ष चकित करणारी आहे.

गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधून काय मिळवले? थोर पतिव्रता तर ती झाली पण कुरुवंशाचा आणि यादववंशाचा विनाश करण्याचे पातक तिच्या माथी आले.

गांधारीने जर केवळ पती अंध आहे म्हणून अंधत्व स्वीकारलं नसतं तर? अंध पतीचे डोळे बनून त्याच्या विचारांवर अंकुश ठेवला असता तर? दुर्योधनाच्या खलवृत्तीला वेळीच डोळसपणे योग्य ते संस्कार करून न्याय नीती आणि धर्म मनात रुजवला असता तर? .... कदाचित वेगळे महाभारत रचले गेले असते...



-मी मधुरा...
१० ऑक्टोबर २०१८

#शक्तिरूपेण १/९

No comments:

Post a Comment