शुभद्रांगी... चक्रवर्ती सम्राट अशोकाची माता.. मौर्य साम्राज्याची राजमाता..
शुभद्रांगी... धोरणी आणि निश्चयी स्त्री जिने घराण्याचा वंशज वाचवण्यासाठी स्वतःचा प्राण गमावला..
शुभद्रांगी.. ब्राह्मण पंडित ब्रह्मानंद आणि जानकी यांची कन्या... सालस, शालीन, शास्त्रनिपुण आणि सुसंस्कृत ...
महात्मान पिंगलक यांनी 'शुभद्रांगी राजाची राणी होणार आणि तिच्या पोटी चक्रवर्ती जन्म घेणार' ही भविष्यवाणी केली खरी.... पण एक ब्राह्मण कन्या चक्रवर्तीला जन्म देणार.. हे किती पटण्यासारखे आहे?.. तरी शुभद्रांगी तेव्हा पासून तेच स्वप्न जगत होती.. एकेदिवशी तिची आणि मगधसम्राट बिंदुसागर यांची भेट दैवयोगाने झालीच.. सम्राट तिच्या सौंदर्यावर मोहित झाले आणि ती त्यांच्या पुरुषत्वावर!! तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराची जागा आता बिंदुसागरनी घेतली.. महात्मान पिंगलक शुभद्रांगीच्या दैवाला बोट धरून वाट दाखवत होते.. त्यांच्या सांगण्यानुसार शुभद्रांगी चंपानगरी सोडून पाटलीपुत्राला आली.. डोळ्यात एक स्वप्न घेऊन.. बिंदुसागरांची पत्नी होण्याचे स्वप्न .. चक्रवर्तीला जन्म देण्याचे स्वप्न.. वास्तविक पाहता बिंदुसागराना चौदा राण्या आणि नव्याणव राजकुमार असा मोठ्ठा परिवार होता.. शुभद्रांगीला जरी विवाहाच्या उद्देशाने बोलावून घेतले असले तरी कोणीही कोणालाही कोणतेही वचन दिलेले नव्हते..
पिंगलकांच्या सांगण्यावरून अंतःपुरात वास्तव्यासाठी आलेल्या शुभद्रांगीच्या सौंदर्याने साशंक होऊन महाराणी पट्टमहिषीने तिला आपली दासी करून घेतले.. एक वेदाभ्यास असलेली, शास्त्रनिपुण विदुषी राण्यांचे केस विंचरणे, नखे कापणे, साजशृंगार करणे, उटणी लावणे अशी दासींची कामे करत अपमानित जीवन जगत राहिली.. पण ह्या ध्येयवेड्या स्त्रीने आपली जिद्द सोडली नाही.. तिची नजर बिंदुसागराना शोधत होती.. ते भेटल्यावर सगळी परिस्थिती बदलेल ह्यावर तिचा विश्वास होता.. महाराणीच्या आजारावर रोगनिदान करून औषधपाणी करणारी ही दासी कोण? ह्या उत्सुकतेपोटी बिंदुसागरांची आणि तिची भेट होते.. ओळख पटते.. आणि अगदी साध्या पद्धतीने ते विवाहबद्ध होतात.. एक दरिद्री ब्राह्मणकन्या, एक दासी, राणी म्हणून अंतःपुरात राहणार.. हे बाकी राण्यांना न पटल्याने अंतःपुरात छुप्या राजकारणाला ऊत आला.. एवढ्या मोठ्ट्या राजवाड्यात एकाकी एकट्या झालेल्या शुभद्रांगीने वेदाभ्यास, कौटिल्य अर्थशास्त्र, तत्वज्ञान यांचा अभ्यास सुरु केला.. अशोकाच्या जन्माने तिच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण झाले.. पण हा आनंद फारकाळ टिकला नाही.. अशोकाच्या चक्रवर्ती होण्याच्या भाकिताने बिंदुसागर आणि राणीपरिवार क्रोधीत झाला.. क्षुद्र दरिद्री पर्णकुटीतून आलेली राजमाता होणार.. तिचा पुत्र, जेष्ठ पुत्र 'सुसीम' ला डावलून चक्रवर्ती होणार... ह्याने खळबळ माजली... बिंदुसागराने तर तिचे नावच टाकले..
अशोक पिता असून पोरका झाला.. अशोकाला वाढवण्याची जबाबदारी आता सर्वस्वी तिची एकटीची होती.. राजवाड्यातल्या राजकारणाच्या जीवघेण्या चालींपासून संरक्षण देऊन आपल्या मुलाला वाढवणं हेच एकमेव ध्येय उरलं होतं.. पिंगलकांच्या भविष्यावर विश्वास ठेवून तिला आपल्या मुलाला घडवायचं होतं.. कितीही यातना, कष्ट सहन करावे लागले तरी, राजवाड्यात तिच्या वाटेला आलेल्या तिरस्कृत जीवनाची सावली हि त्याच्यावर पडू न देता त्याच्यात स्वाभिमान व आत्मविश्वास जागृत ठेवायचा होता.. इतर राजपुत्रांबरोबर अशोकाचे शिक्षण सुरु झाले.. हेवेदावे, कुटील कारस्थाने ह्यांना तोंड देत अशोक मोठ्ठा होत होता.. राज्यशात्र, अर्थशात्र, राजकारण ह्याचे धडे शुभद्रांगी स्वतः देत होती.. रामायण महाभारत यांचे पठण करून घेत होती.. धनुर्विद्या, मुष्टीयुद्ध, गदायुद्ध, मल्लयुद्ध ह्यात तो अग्रेसर असावा म्हणून प्रयत्न करत होती.. वेगवेगळ्या गुरूंकडे शिक्षण देत होती.. त्याच्या मनातील स्वतःच्या कुरुपतेविषयीची असलेली भावना, पित्याकडून नाकारले गेल्याची भावना योग्य पद्धतीने हाताळून सम्राट बनण्याच्या गुणाचं महत्व सांगून ते रुजवत होती..
सगळ्याच बाबतीत अशोक सुसीम पेक्षा उजवा असून सुद्धा तो युवराज नव्हता.. ही सल आणि अंतर्गत राजकारणापासून अशोकाचे रक्षण करण्यासाठी, शुभद्रांगीने त्याला पाटलीपुत्रातून बाहेर पडून मगध राज्याच्या प्रत्येक प्रांताचा दौरा करून तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करायला सांगितले.. आणि अशोकाचे विश्व अनेक अंगानी विस्तारित केलं.. पाटलीपुत्रातून जाताना तो ध्येयासक्त राजकुमार होता पण परतताना चाणाक्ष कर्तबगार राज्यशासक म्हणून आला.. साऱ्या मगध साम्राज्याचे आदर आणि प्रेम त्याने संपादन केले होते.. शुभद्रांगीच्या ह्या दूरदृष्टीमुळे मगध साम्राज्याचे उत्तरदायित्व कणखरपणे स्वीकारू शकणारा एक राजकुमार म्हणून सारे त्याच्याकडे पाहू लागले.. सम्राट बिंदुसागरांचे आजारपण आणि अंतर्गत राजकारण ह्यामुळे अजूनही युवराजपदाचा प्रस्ताव तसाच पडून होता.. बिंदुसागरांच्या निधनानंतर सुसीम युवराज होण्यासाठी जोरदार खेळी सुरु असताना मोठ्या चतुराईने शुभद्रांगीने ती खेळी उलटवून लावून अशोकाला गादीवर बसवून पाटलीपुत्राला त्याचा योग्य तो उत्तराधिकारी दिला..
युवराजपद, राजगादी न मिळाल्याने क्रोधीत झालेल्या सुसीमने सूडाच्या भावनेने गर्भवती असलेल्या अशोकच्या पत्नीला जीवे मारायचा कट रचला... शुभद्रांगीला ह्या कटाचा सुगावा लागल्यावर तिने स्थान बदल करून तो आघात स्वतःवर घेऊन वंश रक्षणासाठी आत्मबलिदान केले.. शुभद्रांगीशी नियतीने खेळलेली ही शेवटची दुष्ट खेळी... बालवयात चौदा विश्वे दारिद्र्य.. तरुण वयात पिंगलकानी दिलेले आकांक्षांचे पंख लावून राजमहालात येणे पण दासी होऊन वावरणे.. राणी होणे पण राजाने पाठ फिरवणे.. दैवानं अपेक्षांच्या, अपमानाच्या, तिरस्काराच्या भोवऱ्यात आयुष्यभर अडकवून ठेवणे.. राजमातेचे सुख उपभोगण्या आधीच हृदयद्रावक मृत्यू होणे... ह्या सगळ्यावर मात करून शुभद्रांगीने अशोकाच्या रूपाने चक्रवर्ती सम्राट दिला...
-मी मधुरा...
१८ ऑक्टोबर २०१८
#शक्तिरूपेण ९/९
सगळे भाग वाचले, अतिशय अभ्यासपूर्ण लेखन.
ReplyDeleteपात्रात एकरुप होऊन लिखाण केलय.
जणु काही तुमच्या लेखनीतुन त्यांचे रूप अनुभव अवतरीत झाले.