एका तापानंतर तुझी माझी अशी प्रत्यक्ष भेट होणार आहे. ह्या भेटीची मी कितीतरी स्वप्ने पहिली आहेत, त्यासाठी माझी जोरदार तयारी ही सुरू आहे. इतकी वर्षे झाली पण आपले नाते आहे तसेच आहे.. वर्षागणिक अधिकच दाट होते आहे.. तुझ्या वरचा विश्वास तूसभर ही कमी झाला नाही आहे.. तुझे दरवर्षी होणारे ओझरते दर्शन उर्वरित वर्षासाठी खूप काही देऊन जाते..
कित्तेक तास आपल्यात झालेला मूक संवाद, तुझे ते शांत प्रसन्न हसणे, तुझे आश्वासक पाहणे सगळं सगळं आज आठवते आहे.. सोंडेतून ही तू कसा प्रसन्न हसू शकतोस हे मला अजूनही कळाले नाही आहे. त्या हसण्याच्या प्रेमात मी परत परत पडत राहते.
मला आठवते, दरवर्षी आम्ही एकाच प्रकारची, एकाच रंगसंगतीची तुझी मूर्ती आणायचो. त्यामुळे दरवर्षी तू मला त्याच रूपात दिसायचास. माझं तुझ्यावरचं प्रेम त्या मूर्तीत शतपटीने दुणावत जायचे. माझ्या दृष्टीने, तुझी मूर्ती ही काही चॉइस करण्याची गोष्ट असू शकत नाही, त्यात तुझे असणे हे महत्वाचे! अजुनी ही मी तुला त्याच रूपात प्रत्येक मूर्तीत पाहते.
दीड दिवसाच्या तुझ्या ह्या सोहळ्याची तयारी आधीपासून सुरु व्हायची. देवघराची साफसफाई रंगरंगोटी चातुर्मास सुरु होण्याआधी झालेली असायची. झाडावरचे नारळ उतरवण्यापासून ते तांदुळाची पिठी करण्यापर्यंत सगळे आजीच्या देखरेखीखाली सुरु असायचे. घरचे वातावरण मोरयामय होऊन जायचे. घरातील प्रत्येक सदस्याचा हातभार लागायचा. प्रत्येकाने एक तरी दुर्वांची जुडी निवडून तयार करावी असा आजीचा आग्रह असायचा.
तुझे आगमन अगदी शाही थाटात व्हायचे. मोठ्या ऐटीत अप्पूच्या (ज्याच्या अंगाखांद्यावर खेळून माझे आबा मोठ्ठे झाले तो, घरातील एक वयस्क सदस्य) हातातील ताम्हणात विसाऊन टाळ आणि मोरयाच्या गजरात मिरवत मिरवत यायचास. डौलदार फेटा बांधून तुझ्या सेवेसाठी तत्पर असलेला अप्पू आणि त्याच्या हातात मोठ्ठ्या विश्वासाने विराजलेला तू! दोघेही नेमस्त!! आजी, आई, काकू यांच्या कडून तुकडा-पाण्याची ओवाळणी स्वीकारून तू स्थानापन्न व्हायचास. तुझे वक्राकार कानातील सोनेरी डूल, खांद्यावरचा मऊशार रेशमी शेला, छातीवर रुळणारी कंठी, बाजूबंद, लंबोदर आवरायला कसलेले पितांबर, पायातील तोडे हे पाहाताना मन मोहुन जायचे.
तुझ्या पूजेसाठी तयार केलेल्या ताटातील गर्द जास्वंदीचं फुल, केवडा, पत्री, दुर्वांची जुडी, शमीपत्र, धुपकांडी, चंदन, मोगरा, गुलाब, केवडा नाना प्रकारच्या अगरबत्या, धूप-कापुराचा दरवळणारा सुगंध, बाजूला शांतपणे तेवणारी समई, तुपाचा दिवा, मंत्रमुग्ध करणारी आरती हे सारे परत अनुभवायचे आहे.. त्यात हरवून जायचे आहे..
No comments:
Post a Comment