Saturday, September 23, 2017

नखरा नथीचा..

नथ, माझा अतिशय लाडका दागिना!! मी ह्या दागिन्यांच्या प्रेमात पडले ते आजीच्या नथीमुळे!! माझी आजी दिसायला तर सुंदर होतीच पण तिचे छान चाफेकळी नाक नथ घातल्यावर अजुनी उठून दिसायचे. नथीमुळे तिचे नाक खुलते का तिच्या नाकामुळे नथ हे अगम्य कोडे होते. नथीतले टप्पोरे मोती कधी तिच्या डोळ्यांशी तर कधी तिच्या दातांशी स्पर्धा करत. तिला नथ घालताना पाहण्यात वेगळीच मजा वाटायची... डोळे मिटून नथीचा आकडा हळुवारपणे नाकात घालायची जशी एखादी जादूगिरीणच!!.. डोळे मिटून ती हे कसे करू शकते ते माझ्या बालबुद्धीला काही उमगयाचे नाही. सणवार असेल कि मी तिच्या भोवती घुटमळत राहायचे, कपाटातून दागिने बाहेर काढायची वाट पाहत राहायचे. प्रत्येक सणाला ती नथ घालेलच असे नसायचे पण त्या निमित्याने मला नथ पहायला, हाताळायला मिळायची. 

मला आठवते, मी दुसरी तिसरीत असेन... मी आजीला विचारले होते.. "आजी, मी तुझ्या एवढी मोठ्ठी झाले कि तू मला तुझी नथ घालायला देशील?" त्यावर ती म्हणाली होती "त्यासाठी आधी नाक टोचावे लागते आणि त्या नाकात नथ पेलायची ताकत पण यावी लागते!" मस्तच!! नाक टोचले कि नथ घालायला मिळणार!! आजीने कोडे एकदम उलघडून सांगितले होते. किती सोपे आहे सोनाराकडे जायचे, नाक टोचायचे आणि घरी येऊन नथ घालायची!!

माझी आईच्या मागे 'मला नाक टोचायला घेऊन जा' अशी भुणभुण सुरु झाली. पण त्याकडे तिने सपशेल दुर्लक्ष केले... जेमतेम ८-९ वर्षाची मुलगी, तिच्या अश्या हट्टाकडे कोण लक्ष देणार? आईकडे डाळ शिजत नाही म्हंटल्यावर नाईलाजाने माझे दुसरे पर्यांय शोधणे सुरु झाले.. एका मैत्रीणीने सांगितले कि तिच्या आईने तिचे सुई दोऱ्याने घरीच नाक टोचले आणि ती माझे पण नाक टोचून देईल.. काय सांगू त्यावेळी ती मैत्रीण खूप भारी वाटली होती.. आपसूकच मोर्चा तिच्या घरी वळवला.. "तुझी आई नाही आली? नाक टोचायचे माहिती आहे ना तिला ?" असे विचारून दारातूनच माझी बोळवण  झाली. एवढेसे नाक टोचायला आई कश्याला बरोबर हवी? हेच कळत नव्हते. शेवटी माझे मीच नाक टोचायचे ठरवले. नथ घालायची तर हे धाडस करावेच लागणार होते.. आईच्या रिळांच्या डब्यातून सुई दोरा मिळवला.. दुपारी निजानीज झाल्यावर काम फत्ते करायचा बेत हि आखला.. पण.. पण.. ती नेमकी वेळ साधण्यात थोडी गडबड झाली आणि मी पकडली गेले.. झाले नथ घातल्याचे स्वप्न धुळीला मिळाले असे वाटत असतानाच आईने सांगितले कि उन्हाळ्याच्या सुट्टीत धारवाड ला गेलो कि तुझे नाक टोचू.. तोवर असले उद्योग नकोत... तिला वाटले असेल कदाचित मी हे सगळे विसरेन आणि नाक टोचणे ह्या प्रकरणावर पडदा पडेल. 

पण तसे झाले नाही.. धारवाडला गेल्यावर परत माझी भुणभुण सुरु झाली.. शेवटी कंटाळून आईने नाक टोचायला हमी भरली.. मग काय, मी, माझी मावस बहीण (तिला हि माझ्यामुळे नाक टोचायची लागण नुकत्यातच झाली होती), आई आणि मावशी अशी आमची वरात पोचली सोनाराच्या दुकानात! कधी एकदा नाक टोचेन असे झाले होते. चिकित्सा करून चमकीने नाक टोचायचे असे ठरले.. मला फक्त नाक टोचण्याशी मतलब होता..चमकी काय आणि तार काय हे अगदी नगण्य होते. चला, कोणाचे आधी नाक टोचायचे? असे विचारताच मी चटकन त्याच्या बाजूच्या स्टुलावर लावून बसले.. "बाळ, तू जरा थांब.. मी आधी ह्या ताईंचे नाक टोचतो" असे म्हणत त्याने रॉकेलचा भगभगता दिवा सुरु केला.. त्यावर चमकीचे टोक धरले, चांगले गरम झाले आहे ह्याची खात्री करून ते टोक खोबऱ्याच्या तुकड्यावर टोचले आणि एकदाची ती चमकी नाकावर खूण केलेल्या ठिकाणी टोचली.. टोचली कसली चांगली खुपसली.. आणि तिच्या ओरडण्याने दुकान दणाणून गेले.. ते पाहून, तेथून पळून जावे असे क्षणभर नक्कीच वाटले. पण त्या नथीसाठी मी ह्या दिव्यातून जायला तयार होते. जरा घाबरतच मी स्टुलावर जाऊन बसले.. आत्तापर्यंत रडणारी ओरडणारी माझी बहीण, छान स्वतःला आरशात निरखत बसली होती! म्हणजे हे जितके दिसले तितके भयानक नाही ह्याची खात्री झाली. नथीच्या भाव विश्वात रंगलेली मी एका टोचण्याने भानावर आले.. पाहते तर काय एक पिटुकला खडा माझ्या नाकावर चमचम करत होता..

हे सगळे अजुनी संपले नव्हते.. नाक टोचल्याची नवलाई पुढच्या दहा मिनिटातच संपली.. नाक खूप दुखत होते.. जड वाटत होते.. पण बोलते कोणाला? स्वतःहून हे सगळे ओढवून घेतले होते ना.. घरी आल्यावर, आईने त्यावर हळद आणि तेल लावून छान कापसाच्या वातीने शेकून दिले.. आणि तात्पुरता आराम मिळाला. दुसऱ्या दिवशी नाक अजुनी जास्त दुखायला लागले.. मोठ्ठ्या फोडामुळे चमकी हि दिसेनाशी झाली.. वाटले काढून टाकावी ती चमकी.. पण मन माघार घ्यायला तयार नव्हते.. चमकी काढायची असेल तरी तो फोड जाई पर्यंत वाट पाहावी लागणार होती.. शेकून, औषध लावून फोड गेला पण इन्फेक्शन तसेच राहिले.. आता ती चमकी काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.. नाक टोचताना रडले नाही पण ती कसर चमकी काढल्यावर भरून निघाली.. दुखण्यापेक्षा चमकी काढावी लागली ह्याचा राग, अपमान त्यात जास्ती होता... तेव्हाच ठरवले हार मानायची नाही पुढच्या सुट्टीत परत नाक टोचायचे.

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही.. I mean, मी माझा हट्ट सोडला नाही.. दरवर्षी नाक टोचायचे, काही कारणाने चमकी काढून टाकायची असे पुढची दोन वर्षे सुरु होते.. शेवटी नाकाने शरणागती पत्करली आणि मी अभिमानाने नाकावर चमकी मिरवू लागले. माझ्या आईने आणि त्या सोनाराने ही एकदाचा सुटकेचा निश्वास टाकला..



नाक टोचल्यापासून ते नथ घालेपर्यंत मला बरीच वाट पाहावी लागली. पण मी नथ घातलीच!!... आणि ह्या नथीसाठीच्या घेतलेल्या त्रासाची सांगता झाली. पुढे लग्न ठरल्यावर सासूबाईंनी जेव्हा मला विचारले तुला कोणता दागिना आवडेल? तुझ्यासाठी काय घेऊ? तेव्हा मी त्यांना "नथ" असे पटकन उत्तर दिले. आनंदाची गोष्ट म्हणजे, सासूबाईंनी दिलेली नथ घालून मिरवतानाची साक्षीदार आजी पण होती. आजीच्या नथीपासून सुरु झालेले हे वेडं अजुनी हि कायम आहे. आजीची ती नथ सध्या आईकडे आहे.. जेव्हा ती माझ्याकडे येईल तेव्हा हे वर्तुळ पूर्ण होईल कदाचित 😊







-मी मधुरा... 
२२ सप्टेंबर २०१७ 

1 comment: