३२ तासाच्या प्रवासानंतर कधी एकदा घरी पोचते असे झाले होते. पोर्टलंड ला लँड झाल्यावर झालेला आनंद घर पाहिल्यावर आणखी कितीतरी पटीने दुणावला. प्रवासाचा क्षीण कुठल्या कुठे पळाला. काय जादू आहे ना 'घरात'!? माहेरचे घर, सासरचे घर आणि माझे स्वतःचे घर.. तिन्ही घरे माझीच, पण प्रत्येक घरात असणारी 'मी' वेगळी.. आईच्या घरून भरल्या डोळ्यांनी आणि जड मनानी निघणारी 'मी', सासरी घरी गेल्यावर एकदम बदलून जाते. आईच्या घरातील मायेचा ओलावा जपणारी 'मी' आणि सासरच्या घरातील जबाबदारीची जाणीव असणारी तीच 'मी' त्यातली खरी 'मी' कोण? असा प्रश्न पडावा इतकी.. ह्या दोन्हीत असणारी तीच 'मी' पण किती वेगळ्या.. आणि ह्या दोन्ही 'मी' पेक्षा अमेरिकेतील 'मी' अजूनी ही वेगळी...
वर्षभर भारतवारीचे चे वेध लागणारी 'मी' आणि तिकडे गेल्यावर दोन तीन आठवड्यातच पोर्टलंड ला मिस करणारी 'मी' ह्यातील खरी 'मी' कोण?
इकडे अमेरिकेत जीन्स, शॉर्ट्स, मिडी मध्ये वावरणारी 'मी' आणि भारतात गेल्यावर चुडीदार सूट आणि साडी मध्ये असणारी 'मी' ह्यातील खरी 'मी' कोण?
नातेवाईक, मित्र मैत्रिणीं मध्ये रमणारी 'मी' खरी का आईच्या मांडीवर जगाला विसरून विसावलेली 'मी' खरी?
मुलीच्या, सुनेच्या, बायकोच्या, बहिणीच्या नात्यात गुंतलेली 'मी' आणि कधी कधी अलिप्त स्वताःला शोधणारी 'मी', ह्यातील खरी 'मी' कोण?
भारतातल्या लहानश्या गावात वाढलेली, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणारी 'मी' खरी का अमेरिकेतल्या शहरात राहून मोठ्ठी मोठ्ठी स्वप्ने साकारण्यासाठी धडपडणारी 'मी' खरी?
भारतात गेल्यावर तिकडच्या संस्कृतीत स्वतःला फिट बसवण्याचा प्रयत्न करणारी 'मी' खरी की इकडे अमेरिकेत आल्यावर स्वतःमध्ये भारतीयत्व शोधणारी 'मी' खरी?
लोकांच्या मनामध्ये असणारी मी 'खरी' का माझ्या मनामध्ये असणारी 'मी' खरी?
ह्या सगळ्या 'मी' एकमेकात इतक्या सहजतेने गुंफाल्या आहेत कि आता खरी 'मी' कोण हेच कळत नाही. कदाचित अशी गुंफलेली 'मी'च खरी 'मी' असेन..
-मी मधुरा..
३ सप्टेंबर २०१७
No comments:
Post a Comment