स्वतःचा ब्लॉग असावा जिथे मी लिखाणातून व्यक्त होईन ही माझी खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण होते आहे. मध्यंतरीच्या काळात मी लिहिण्याचा प्रयत्न केला.. डायरीतच काही तरी लिहीत राहिले.. काही लिखाण पूर्ण झाले.. काही तसेच अर्धवट कागदावर राहिले.. काही विचार मनात विरून गेले..
चाळीसाव्या वाढदिवसाला मी स्वतःलाच एक पत्र लिहिले होते.. चाळीस ह्या माईल स्टोन वरून आयुष्याकडे पाहताना, स्वतःकडे पाहताना, स्वतःचे, आयुष्याचे एक चित्र रंगवायचा छोटासा प्रयत्न पत्र रूपातून केला होता.. स्वतःसाठी काय करायला आवडेल हे लिहिले होते.. काळानुरूप ह्या चित्रातील रंग बदलत जातील.. काही हलके होतील, काही गडद.. काही नव्याने आकार घेतील.. हीच तर मजा आहे ना?? ह्यात कोठे ही "should" नाही.. तेच पत्र पहिली ब्लॉगपोस्ट म्हणून टाकते आहे..
-मी मधुरा...
८ सप्टेंबर २०१७
प्रिय मला,
Happy Birthday!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
आज सकाळी आरशासमोर उभे राहून, मी मलाच शुभेच्छा दिल्या.. कसले भारी वाटले स्वतःच्याच डोळ्यात डोळे घालून, स्वतःशी प्रेमाने संवाद साधताना.. ह्यापूर्वी शाब्बास मधुरा, I am pround of you, गुड लक.. असे स्वतःशी पुटपुटणे व्हायचे पण संवाद कधीच नाही.. तर आज पासून आरश्या समोर उभे राहून स्वतःशी संवाद साधायचा हे नक्की!! ..
बघता बघता आयुष्यातली चार दशक सरली पण.. प्रत्येक दशकात परिपूर्ण जगले. शाळा कॉलेज मध्ये खूप दंगा मस्ती केली... बिनधास्त तारुण्य अनुभवले... घर संसार याची घडी बसवण्यात तिसरे चवथे दशक कधी सरले कळलेच नाही.. आता ह्या नवीन दशकात जाताना नवीन उमेद, नवीन उत्साहा बरोबर थोडी हुरहूर ही आहे... आज ह्या मैलाच्या आकड्यावर थोड्यावेळ विसावून गत आयुष्याबद्दल कृतग्नता व्यक्त करून पुढील दशकाची स्वप्ने रंगवायची आहेत... डोळे मिटून तारुण्यातून अलगद बाहेर पडताना पाहायचे आहे... ना तरुणी ना वयस्क ही फेज पुरेपूर एन्जॉय करायची आहे... जुन्या आवडीं बरोबर नवीन आवडी जोपासायच्या आहेत.. नवीन दिशा, नवीन वाटा शोधायच्या आहेत...
कॉलेज मध्ये असताना मला लिहायला, कविता करायला आवडायचे. कॉलेज संपले आणि ही आवड ही मागे पडली. आता मला परत लिहायचे आहे. लिहिण्यातून व्यक्त व्हायचे आहे. डायरीत लिहिण्यापेक्षा एखादा ब्लॉग करायचा आहे. "मी मधुरा".. कसे आहे ब्लॉगचे हे नाव?
योगाभ्यास करायचा आहे.. हिमालयात ट्रेक करायचा आहे.. मानसरोवरला जायचे आहे..
परत एकदा स्टेज वर परफॉर्म करायचे आहे.. मनात असलेली डान्स येत नसल्याची, ग्रेसफुल नसल्याची भीती कायमची घालावयाची आहे. खरं तर शाळेमध्ये असताना स्टेज वर डान्स केले आहेत. कॉलेज मध्ये नाटकात काम ही केले आहे. पण... मध्येच कधी तरी "सेल्फ कॉन्फिडन्स" ची जागा "सेल्फ कॉन्शिअसनेस"ने कधी घेतली कळालेच नाही..
अँकोरिंग, आवाजातील चढ उतार शिकायचे आहेत.. कॅलिग्राफी शिकायची आहे.. रॅम्पवॉक करायचा आहे..
RV तून नॅशनल पार्क्सना जायचे आहे.... Wow!!
टॅटू काढायचा आहे.. तो ही पर्मनंट!... केस "हाय लाईट" करायचे आहेत..
एकटीनेच कोठेतरी भटकायला जायचे आहे. नवीन पिढीच्या भाषेत सोलो ट्रिप.. पॉण्डेचारी???...
आयुष्य भरभरून जगायचे आहे...
आणि हे सगळे करत असताना आयुष्यातील जबाबदाऱ्या तितक्याच समर्थपणे पेलायच्या आहेत..
मग देणार ना माझी साथ?
-माझीच लाडकी मी..
२ मे २०१३
No comments:
Post a Comment