काल जेष्ठा कनिष्ठांचे आगमन झाले.. त्यांना सजवण्यात, अरास करण्यात कालचा दिवस कसा गेला तेच कळले नाही.. ह्यावेळी प्रथमच गौरींसाठी इंडीयात असल्यामुळे ऋचा, माझी लेक, खूप उत्साहाने सगळ्यात सहभागी होती. गौरींचे मुखवटे बॉक्स मधून काढण्यापासून ते साड्यांचे स्टॅन्ड लावण्यापर्यंत सगळे कौतुकाने पाहत होती. गौरींना साडी नेसवत असताना सतत प्रश्न विचारणे सुरू होते.. एकदमच तिचे डोळे चमकले आणि म्हणाली, आई तू पाहिल्यांदा कधी साडी नेसलीस? तुला पण आजी अशीच साडी नेसवायची का?
मला आठवत नाही कि मी पहिल्यांदा कधी साडी नेसले. मला माझी कमल साडी (शिवलेली साडी) मात्र आठवते.. भातुकली खेळताना नेहमी मी साडी नेसून खेळायचे असे आई सांगते.. मग साडी म्हणून काहीही चालायचे.. आईची साडी, धोतराचे पान, अगदी उपरणे सुद्धा!! थोडे फार फोटो सोडले तर माझ्या आठवणीत असे फारसे काही नाही. मला जसे आठवते त्याप्रमाणे मला साडी फारशी कधी आवडलीच नाही.. साडी नेहमी बोजड आणि कंटाळवाणा प्रकार वाटायचा. कामे करताना त्या वर खोचलेल्या निऱ्या, कंबरेभोवती बांधलेला पदर, त्यातून दिसणारे ते पोट.. यक फीलिंग यायचे.. त्या ओंगळवाण्या चित्रात मी स्वतःला इमॅजिन करू शकायचे नाही.. एक साडी नेसण्यासाठी त्याचा मॅचिंगचा ब्लॉउज, मॅचिंग पेटीकोट इतका प्रयास का करायचा? त्यापेक्षा सुटसुटीत पंजाबी सूट्स का नाही वापरत?
माझे हे साडी न आवडणे इतके टोकाचे होते कि आठवी नववीत असताना माझ्या मावस भावंडांबरोबर 'मी माझ्या लग्नात जीन्स घालून बोहल्यावर चढेन' असे लेखी कॉन्ट्रॅक्ट केले होते.. लग्नाळू मुलगी म्हणून मुलाकडच्यांना भेटायला जाताना तरी मी साडी नेसेन का ही चिंता आई काकू ला होती.. कॉलेज मधील साडी डे च्या दिवशी मी चक्क कॉलेज चुकवून घरी थांबायचे. याला अपवाद मात्र नऊवारी साडीचा होता.. आजीच्या मऊ मुलायम नऊवारी साडीचे नेहमीच कौतुक वाटायचे. ती नेसून आजीची नथ घालायला मिळणे ही अपूर्वाई होती.. स्वतःची अशी पहिली साडी घेतली ती आत्येभावाच्या लग्नात! अगदी नाईलाजाने... (हम आपके हैं कौन मधली जांभळी साडी, अगदी सेम टू सेम)... माझ्या लग्नाच्या वेळी माझ्याकडे मोजून ७ साड्या होत्या.. लग्नात द्यायच्या पाच साड्या, आत्येभावाच्या लग्नातली साडी आणि वाढदिवसाला सासूबाईंनी दिलेली साडी.. माझ्या लग्नातील साडी खरेदी मी अर्धा तासात आवरली होती.. पिवळ्या आणि हिरव्या रंगाची साडी मस्ट असते म्हणून ते रंग, मरून रंग आवडतो म्हणून त्या रंगाचा शालू.. आता कोणते रंग उरले, चला ते घेऊन टाकू... झाले शॉपिंग.. आहे काय अन नाही काय? लग्नाच्या खरेदीचा इतका बाऊ का केला जातो तेच कळत नाही..
सासरी आल्यावर, मी सासूबाईंना साडी नेसताना पाहायचे.. घरी नेसायची साडी असो किंवा बाहेर जाण्याची त्या खूप कलात्मकतेने साडी नेसायच्या.. प्रत्येक निरी एक सारखी असायची! पदराला पिन न लावता चापून चोपून पदर घेतलेला असायचा. त्यांचे साड्यांवर प्रेम करणे, साड्यांची काळजी घेणे हे पाहता पाहता मला कधी साडी बद्दल आपुलकी वाटू लागली कळलेच नाही. प्रत्येक साडी मागे त्यांची एक आठवण असायची आणि ती त्या खूप अभिमानाने शेअर करायाच्या.. त्यांचे ते भारावून बोलणे मला आवडायचे.. ही साडी पहिल्या पगारातून, ही लग्नातली, ही भिशीतून, ही मुलांच्या डोहाळे जेवणाची, ही मुलांच्या मुंजीतली.. वाटायचे ह्या साड्यां पण किती नशीबवान आहेत की त्यांना इतकी काळजी घेणारी मालकीण मिळाली आहे.. वाटायचे त्या साड्यांनी पण ते क्षण एन्जॉय केले असतील... 'मी ना सोडमुंजीच्या वेळी महेशच्या मुंजीतील साडी नेसले होते' हे सांगताना त्याच्या डोळ्यातील ते भाव मी कधीच विसरू शकत नाही. अश्या आठवणीं साठी तरी मी साडी नेसली पाहिजे असे मला वाटू लागले. साडी कशी पाहायची, त्याचा पोत कसा पाहायचा पासून ते साडी कशी नेसायची हे मी त्यांच्या कडून शिकले. 'साडी हेटर ते साडी लव्हर' हे ट्रानझिशन केवळ त्यांच्यामुळेच होऊ शकले.
माझी जाऊ साड्यांचा बिझनेस (silk and cotton treads ) करते. तिच्यामुळे साऊथच्या साड्यांची ओळख झाली. तिथल्या सिल्क च्या तर मी प्रेमातच आहे. कांजीवरम, नारायणपेठ, गढवाल, पैठणी, संबळपूर, कूर्तकोटा, उफाडा अश्या नाना प्रकारच्या विविध रंगसंगतीच्या साड्या बघून मन हरकून जाते. नवीन आलेल्या साड्यांचा लॉट पाहणे हा एक अनुभवच आहे.. घरातील सगळेच सासूबाई, नणंद, जाऊ 'साडी गुरु' आहेत. त्यामुळे जेव्हा आम्ही सगळे भेटतो तेव्हा जेवताना, खाताना, पिताना साड्यांबद्दल, नवीन ट्रेंड्स, नवीन फॅशन बद्दल चर्चा रंगतात..
आज माझ्याकडे साड्यांचे माझे असे खास कलेक्शन आहे.. फॅन्सी साड्यांपेक्षा माला ट्रॅडिशनल काठापदराच्या सिल्कच्या साड्या खुप आवडतात.. प्रत्येक इंडिया ट्रिपला मी एक तरी साडी घेतेच.. साड्यांची खूप काळजी ही घेते.. वेळ मिळेल तेव्हा साड्याना बाहेर काढून त्यांना हवा देते, त्यांच्या वरून प्रेमाचा हात फिरवते.. ऋचा सुद्धा ह्यात आनंदाने सहभागी होते.. आई तू ही साडी कधी घेतलीस? असे जेव्हा ती विचारते तेव्हा माझे ही डोळे कदाचित आनंदाने लुकलुकत असतील कारण माझ्याकडे पण सांगण्यासारखे बरेच काही असते..
कोणत्याही भारतीय स्त्रीचे सौंदर्य साडीतच जास्ती खुलून दिसते असे माझे ठाम मत आहे.. मग ती स्त्री जाड असो वा बारीक, उंच असो वा ठेंगणी, काळी असो वा गोरी, साडी साधी असो वा भारी, ट्रॅडिशनल असो वा फॅन्सी.. फक्त एकच अट... साडी व्यवस्थित नेसली गेली पाहिजे..
-मी मधुरा..
No comments:
Post a Comment