१० ऑक्टोबर : गुप्तकाशी - सोनप्रयाग - केदारनाथधाम
गुप्तकाशी - सोनप्रयाग ३० किमी.. लागणारा वेळ १ तास
सोनप्रयाग ट्रॅक्स स्टॅन्ड - गौरीकुंड ५ किमी.. लागणारा वेळ २० मिनिटं..
सकाळी सहा वाजता बस सुटेल.. सातच्या सुमारास सोनप्रयाग.. यात्री रेजिस्ट्रेशन करून साधारण आठच्या सुमारास सोनप्रयाग ट्रॅक्स स्टॅन्डला पोचायचं.. असं आजचं नियोजन..
बरोबर सहा वाजता पॅक्ड ब्रेकफास्ट बरोबर घेऊन आम्ही सोनप्रयागच्या दिशेनं निघालो..
आमच्यापैकी बरेच जणं चॉपरनं केदारनाथधामला जाणार असल्यानं आज एकच बस होती.. बस मधले बहुतेक सगळे घोडा किंवा डोलीनं जाणारे.. आणि मी एकटीच ट्रेक करणारी..
ट्रेकिंगमुळं कमी कपड्यात जास्ती दिवस कसं राहायचं हे मला माहिती असल्यानं तशी मी लाईट ट्रॅव्हल पॅकर आहे.. इथं तर एकच रात्रीचा प्रश्न होता.. पण केदारनाथला रात्री उणे सेल्सिअस मध्ये जाणारं तापमान, दोन दिवसापूर्वीच झालेली हिमवृष्टी यामुळं भरपूर गरम कपडे.. कमीतकमी आठ तास तरी पोचायला लागत असल्यानं पाणी, बार्स, स्नॅक्स बरोबर होते.. ट्रेलवर बरीच दुकानं, रेस्टारेंटस आहेत पण ट्रेक मध्ये मी असं खाणं टाळते.. पूजेसाठी सलवार कमीझ.. नऊ किलो वजन असंच झालं..
ठरल्याप्रमाणं सात वाजता सोनप्रयागला पोचलो.. बसला गावांत यायला परवानगी नसल्यानं गावाबाहेरच आम्ही उतरलो.. सकाळी सातवाजता सुद्धा धोधो गर्दी.. यात्रेकरू तर होतेच पण विक्रेते ही.. काही ठेला घेऊन बसलेले तर काही हातात सामान घेऊन फिरणारे.. वॉटरप्रूफ मोबाईल कव्हर्स, शू कव्हर्स, ग्लोव्हस, कानटोप्या, पॉन्चो आणि असं बरंच काही.. मी शू कव्हर्स आणि बांबूची काठी विकत घेतली..
तिथून साधारण किलोमीटर अंतरावर यात्री रेजिस्ट्रेशन ऑफिस.. बरीच मोठ्ठी रांग असल्यानं अर्धातास लागलाच.. पावणेआठच्या सुमारास ट्रॅक्स स्टॅंडकडं जायला निघालो..
सोनप्रयाग ते गौरीकुंड शासनाच्या ट्रॅक्सनंच जावं लागतं.. ही शटल सर्विस असल्यानं येणाऱ्या ट्रॅक्सची वाट पाहावी लागते.. एका ट्रॅक्स मध्ये दहा सीट्स घेतात.. यात्री रेजिस्ट्रेशन ऑफिसपासून ट्रॅक्स स्टॅंड साधारण दीड-दोन किलोमीटर अंतरावर आहे.. बाकी ग्रुप घोडा, पिट्टू करणार असल्यानं रेजिस्ट्रेशन झाल्यावर माझी मी एकटी.. मग काय मी त्या दिशेनं चालायला सुरुवात केली..
ट्रॅक्स स्टॅंडवर प्रचंड गोंधळ सुरु होता.. पाच दहा मिनिटं वाट पाहिली.. आणि ट्रॅक्सचा नाद सोडून गौरीकुंडकडं चालत निघाले.. सकाळपासून साधारण अडीच-तीन किलोमीटर चालून झालेलंच होतं.. अजुनी पाचसहा किलोमीटर.. सुरवातीला बरं वाटलं पण नंतर मी आणि माझ्यासारखे काही वेडे च रोडवर होतो.. ठिकठिकाणी 'बच के रहीए लँडस्लाईड एरिया' असे बोर्ड्स दिसायला लागले.. रोड तर खड्यांतूनच.. आम्ही तीनचार जणं एकमेकांना दृष्टीक्षेपात ठेवून चालत होतो..
गौरीकुंडहून येणारी एक ट्रॅक्स आम्हाला पाहून थांबली.. "और ढायी किलोमीटर बचा हैं.. आपको दो किलोमीटर ले जाऊंगा.. अंदर नही आ सकता.. लेकिन पुरे पैसे देने होंगे".. आम्ही चार जणं लगेच ट्रॅक्स मध्ये.. गांवाबाहेर त्यानं आम्हाला सोडलं.. त्यातल्या एकानं दोनशेची नोट काढून दिली.. मी माझा शेअर द्यायला लागले तर म्हणाला.. नही दीदी, आपसे पैसे नही ले सकते.. त्यांच्याशी गप्पा मारत गौरीकुंडला पोचले तेव्हा नऊ वाजून गेले होते..
गौरीकुंड..
समुद्रसपाटीपासून ६५०० फुटावर असलेलं हे गौरीकुंड.. स्थानिक कथेनुसार, शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हिमालयची पुत्री गौरीनं अनेक तपश्चर्या आणि योगिक साधना ह्या ठिकाणी केल्या.. आणि याच ठिकाणी शिवानं आपलं प्रेम व्यक्त केलं.. इथून जवळच असलेल्या त्रियुगी नारायण इथं त्यांचा विवाह सोहळा पार पडला..
गरम पाण्याच्या कुंडाबरोबरच गार पाण्याचं असलेलं कुंड हे इथलं खास वैशिष्ठ्य.. वैद्यकीय उपचाराचे गुणधर्म असलेल्या गरमपाण्याच्या कुंडात अंघोळ करून भाविक केदारनाथच्या दर्शनाला जातात.. गार पाण्याच्या कुंडाचं पाणी जवळच वाहणाऱ्या मंदाकीनीत जातं..
गौरीकुंडापासून साधारण तीस पस्तीस पायऱ्या वर चढून गल्ली वजा बोळात आले.. हीच गल्ली गौरीकुंड गावातून होत केदारनाथ ट्रेलकडं जाते.. प्रचंड गजबजाट असलेली ही गल्ली.. राहण्याची, खाण्याची सोय असलेल्या दाटीवाटीनं खेटलेली घरं, दुकानं यांच्यामधून जाणारी.. यात्रेकरू.. सामान वाहणारे कुली.. कुत्री, गायी.. पाऊल ठेवायला ही जागा नव्हती.. मुंगीच्या पावलानं दहाच्या सुमारास ट्रेल हेड पाशी पोचले..
केदारनाथधाम..
समुद्रसपाटीपासून ११८०० फुटावर असलेलं हे केदारनाथधाम बारा ज्योतिर्लिंग आणि पंच केदार पैकी एक आहे..
असं मानलं जातं की भगवान विष्णूंनी भगवान शिवाच्या सहस्रनामाचा जप केदारनाथ इथं केला होता..
केदारनाथ मंदिर महालय पर्वताच्या पायथ्याशी असून पाच गंगांनी वेढलेलं आहे.. वासुकी गंगा, मधू गंगा, सरस्वती गंगा, मंदाकिनी आणि स्वर्गारोहिणी..
'जय केदारनाथ बाबा' म्हणून ट्रेल ला नमस्कार केला.. आणि साधारण २० कि.मी. अंतर आणि ५३०० फूट चढाई करण्यासाठी सज्ज झाले..
२० किलोमीटर आणि केवळ चढाई.. ट्रेकिंगच्या नियमाप्रमाणं प्रत्येक ५० मिनिटानंतर ५ मिनिटांची विश्रांती घ्यायची असं ठरवलं..
कैलासाच्या वेळी सद्गुरू एका सत्संगात म्हणले होते.. संपूर्ण कैलास परिसर शिव आहे.. ट्रेक करताना तुम्ही त्याच्या अंगाखांद्यावर खेळत आहात, बागडत आहात.. ही जाणीव नेहमी मनात असुद्या.. हा विचार मनात आला आणि मी डोळे मिटले.. खोल श्वास घेतला.. हा सगळा परिसरच केदारनाथ आहे.. मी मनात केदारनाथ म्हणत होते डोळ्यांसमोर आदियोगींची काळीशार मूर्ती.. केदारनाथ काय आणि आदियोगी काय.. फक्त दोन रूपं.. शंभो.. शंभो..
सोलो ट्रेक हा आत्मपरीक्षणासाठी, स्वतःशी संवाद साधण्यासाठी मला खूप आवडतो.. निसर्ग तुम्हाला तुमच्या मुळापाशी नेतो..
शिवाच्या सानिध्यात आहेच तर कैलासला केलेला संकल्प डिटॅचमेंट, अलिप्तता पडताळून पाहायचं मी ठरवलं..
अलिप्त व्हायचं म्हणजे काय तर त्रयस्थ बनून आपलंच आयुष्य आपण जगायचं.. त्रयस्थ होण्यासाठी आपल्या कर्मांशी असलेली बांधिलकी सोडायची.. कर्मांची बांधिलकी सोडायची असेल तर केलेल्या चुकांसाठी क्षमा मागायची, ज्यांनी दुखावलं आहे त्यांना माफ करायचं आणि घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञ असायचं..
आज ट्रेक करताना आयुष्यांत केलेल्या चुकांचं परीक्षण करायचं.. कोणाला दुखावलं असेल तर शिवाच्या साक्षीनं मनातल्या मनात का होईना त्या व्यक्तीची क्षमा मागायची.. बघू तरी काय काय आठवतंय..
ह्याच विचारात असताना, अचानक एका मोठ्ठ्या धबधब्याचं पाणी ट्रेलवरून जाऊन खाली दरीत कोसळताना दिसलं.. क्षणभर थबकले.. त्या घोटाभर पाण्यातून चालताना मात्र ऍक्चुअल ट्रेकचं फीलिंग आलं.. नाहीतर जवळ जवळ सगळा ट्रेल दगडांनीच बांधलेला..
केदारनाथचा ट्रेल यमुनोत्रीपेक्षा बराच रुंद आहे.. आणि यमुनोत्रीप्रमाणंच घोडे, पिट्टू, डोली सगळेच त्या ट्रेलवर असतात.. यमुनोत्रीचा ट्रेल स्टिफ असला तरी चालायला चांगला होता.. इथं मात्र जागोजागी उखडलेले दगड, साठलेलं पाणी, घोड्यांची लिद यामुळं चालायला कठीण जात होतं..
विचारांच्या नादात, निसर्गाशी तिथल्या वातावरणाशी तादात्म्य साधण्याचा प्रयत्नांत 'केदारनाथ १०' पाशी पोचले पण..
फोटो काढण्यासाठी फोन पहिला तर १२ वाजून १० मिनिटं झाली होती..
२ तास १० मिनिटं.. बापरे! इतक्या वेळात ब्रेकच घेतला नव्हता.. घोडे जाण्यासाठी थांबले असताना घोटभर पाणी प्यायले होते तेवढंच..
बसलं कि चालण्याची गती मंदावते.. म्हणून शांतपणे उभ्याउभ्याच बरोबर आणलेला बार खाल्ला.. पाणी प्यायले..
ग्रुपवर फोटो टाकला.. अजुनी तरी कोणी पास झालेलं दिसलं नव्हतं..
'जय केदारनाथ' म्हणून पुन्हा चालायला सुरुवात केली..
हळूहळू वरून खाली येणारे पण दिसायला लागले.. चेहऱ्यावर प्रसन्न भाव आणि हातात प्रसादाच्या पिशव्या घेऊन.. त्यांना पाहून मी ही जोशात पावलं टाकू लागले.. यमुनोत्री सारखा अजुनी तरी खडा चढ आलेला नव्हता.. खुपसा चढ काही ठिकाणी सपाट..
एक मोठ्ठा लोखंडी पूल आणि त्या खालून जाणारी मंदाकिनी..
ह्या नंतर बऱ्यापैकी चढ जाणवायला लागला.. बर्फाच्छादित पर्वत दिसायला सुरुवात झाली..
साधारण दोनच्या सुमारास लंचसाठी थांबले.. सॅक काढून खाली ठेवली.. स्ट्रेच केलं..
ब्रेकफास्टसाठी दिलेलं सँडविच, नट्स खाल्ले..
ग्रुप मधली काही मंडळी घोड्यावरून वर जाताना दिसली..
वॉशरूम ब्रेक झाला.. चारधामयात्रेत ही सोय मात्र चांगली आहे.. १० रुपये देऊन एकदम स्वच्छ वॉशरूम वापरायला मिळते..
१५ मिनिटाच्या ब्रेक नंतर चालायला सुरुवात केली.. लगेचच पुढच्या वळणावर केदारधाम ४ कि.मी. बोर्ड दिसला..
शेवटचा टप्पा बराच चढाचा.. खाल्ल्यावर असं ही चढायला जड जातंच..
साडे तीनच्या सुमारास हा बोर्ड दिसला..
अल्मोस्ट डन..
जसा घोडा पडाव जवळ आला तशी प्रचंड गर्दी.. अर्धा किलोमीटर जायला वीस पंचवीस मिनिटं लागली..
घोडा पडाव प्रचंड मोठठं मैदान.. घोड्यांची पागा असलेलं.. जिकडं पहावं तिकडे घोडेच घोडे..
मंदिराकडं जाणारा रस्ता इथूनच जातो.. मी मंदिराकडं जायला लागले..
'मधुरा मॅडम' आवाज आला.. एका चहाच्या टपरीत आमचा एक ग्रुप गप्पा मारत बसला होता.. 'बसा.. सगळे एकत्रच मंदिराकडं जाऊ..'
मला लगेचच मंदिराकडं जायचं होतं.. बाहेरून तरी मंदिर पहायचं होतं..
.. पण थांबले.. तोंडावर पाणी मारलं.. तिथं कॉफी नसल्यानं बळेच मला 'निंबुझ' पाजलं.. खरं सांगू 'निंबुझ' मी पहिल्यांदाच पीत होते.. पण प्यायल्यावर हुशारी आली..
साधारण सहा तासात मी हे अंतर चढून वर आले होते..
थोड्यावेळ थांबून मी मंदिराकडं जायला निघाले.. वाटेत वैशाली आणि आनंद ही भेटले..
मंदिरासमोर असलेला भला मोठ्ठा ॐ पाहून मला इतका आनंद झाला कि मी स्वतःभोवती दोन गिरक्या घेतल्या..
खाली बसून जमिनीवर डोकं ठेवून तिथल्या पवित्र भूमीला, भोवतालाला नमस्कार केला..
विस्मयानं कितीतरी वेळ लांबवर दिसणाऱ्या त्या मंदिराकडं पहात होते..
तिथल्या भवतालात, वातावरणात मी इतकी खुश होते कि ते सगळं कवेत घ्यावं.. स्वतःत सामावून घ्यावं.. स्वतः त्याचा भाग व्हावं.. असं वाटत होतं..
म्हातारीच्या फुलासारखं हलकं हलकं होऊन त्याच्या मर्जीनं तो नेईल तिकडं तरंगत जावं..
आमची राहण्याची सोय मंदिराजवळच्या धर्मशाळा सदृश्य लॉज मध्ये केली होती.. ऍटॅच्ड बाथरूम असलेल्या सलग रूम्स.. दोनभिंतींच्या मध्ये एकाला एक लावून ठेवलेले चार-पाच बेड्स.. आणि जागा उरलीच तर अजुनी एक दोन बेड्स.. प्रत्येक बेडला एक गादी आणि एक जाड पांघरूण.. रूमच्या बाहेरच्या पडवीत टेन्ट्स ही टाकलेले.. ह्या पडवीतून मंदिर आणि हॉटेलच्या शेजारून वाहणारी मंदाकिनी दिसत होती.. एक छोटंसं किचन होतं.. एकावेळी सात-आठ जण बसतील इतकंच मोठ्ठ..
दोन दिवसापूर्वी हिमवृष्टी झाल्यानं अजुनी बर्फ होताच.. त्यामुळं गाद्या पांघरुणं खूपच गार पडली होती.. तृप्ती, तिचा नवरा महेश, वैशाली-आनंद आणि मी एका रूम मध्ये होतो..
जसजशी रात्र व्हायला लागली तशी थंडी ही वाढायला लागली.. सातच्या सुमारास शून्य डिग्री सेल्सिअस तापमान होतं.. आम्हाला मिळलेल्या पूजेची वेळ रात्री अकरा वाजताची.. त्यावेळी उणे तीन तापमान जाण्याचा अंदाज होता..
सातच्या सुमारास जेवणकरूनच रूमवर आले.. रूमवर हिटर वैगरे ची सोय नसल्यानं पांघरूण घेऊन बेडवर पडून राहिले.. आम्ही पाच जणं एकत्र होतो पण रूममध्ये एकदम शांतता.. बोलायला लागलं कि जीभच वळायची नाही..
दहा वाजता तयार होऊन - आतून थर्मल वर सलवार-कमीझ, जॅकेट, कानटोपी - मंदिराकडं निघालो..
बाहेर मस्त वातावरण होतं.. जागोजागी शेकोट्या पेटवलेल्या.. मंदिराला छान रोषणाई केलेली.. दुकानांतून बारीक लुकलुकणारे दिवे.. त्यामुळं उबदारपणा आला होता..
जवळच्याच एका दुकानातून पूजेसाठी सामान विकत घेतलं.. आणि पूजेसाठीच्या रांगेत उभे राहिलो.. शूज काढून.. पण ह्यावेळी जाड सॉक्स पायात होते.. उणे तीन तापमानात सॉक्स कितीही जाड असले तरी कितीवेळ तग धरणार.. पायांची बोटांची हालचाल करून गोठण्यापासून बचाव सुरु होता..
खरं तर, मंदिरांत गेलं की मनोभावे देवाला नमस्कार करणं इतकंच मी करते.. क्वचितच अशी मी हातात पूजेचं सामान घेऊन रांगेत वगैरे उभी असते..
ह्या भवतालात उडत राहावं ह्या सुरुवातीच्या वाटण्याला आता स्थिरता आली होती.. मन दर्शनासाठी ओढ घेत होतं.. रांगेतून मंदिराच्या पायऱ्या चढून सभामंडपात आल्यावर जाणवला तो मस्त मंत्रमुग्ध करणारा सुवास.. गर्भगृहात अभिषेक सुरु होता.. विग्रहाच्या भोवती तीन ठिकाणी तीन गुरुजी आणि त्यांच्या समोर पूजा करणारे तीन-चार जणं.. आणि एका बाजूला दोन गुरुजी कसला तरी पाठ करत बसले होते.. त्यामुळं विग्रह दिसतंच नव्हता..
गर्भगृहात गेल्यावर काळाभोर दगडी उंचवटा नजरेस पडला.. आणि हात जोडले गेले.. त्या तुकतुकीत उंचवट्यावरून नजरच हलत नव्हती.. डोळे-मन भरून आलं.. कंठ दाटून आला.. पूजेसाठी आमच्या चार जणांच्या ग्रुपला बोलावलं.. गुरुजी काय सांगत होते ते माझ्या पर्यंत पोचत नव्हतं.. पूजेच्या सामानातलं जे काही हाताला लागेल ते वाहिलं.. आणि नंतर विग्रहावर हात ठेवून बसून राहिले.. विग्रहाचा तो स्पर्शच माझ्यासाठी खूप मौल्यवान होता..
पूजा करायची म्हणजे आपल्या समोर असणाऱ्या उंचवट्याच्या त्या छोट्या भागाची पूजा करायची.. त्यावर तूप, भस्म, हळद लावायची.. हा उंचवटा बराच पसरलेला आणि मोठ्ठा आहे.. एकवेळेला साधारण १२-१५ जणं पूजा करत असतात..
पूजा झाल्यावर विग्रहावर डोकं ठेवून नमस्कार केला.. बाहेर पडताना गर्भगृहातच लक्ष्मीमातेचं छोटंसं मंदिर आहे.. बाकीच्यांनी पूजेच्या सामानातून सौभाग्य वाण काढून देवी पुढं ठेवलं तसंच मी ही केलं.. आणि बाहेर आले..
आजपर्यंत कोणत्याही मंदिरात मी विग्रहाला स्पर्श केला नव्हता.. त्या स्पर्शाच्या ऊर्जेची स्पंदन कितीतरी वेळ जाणवत होती.. अजुनी त्या प्रभावाखाली असणारी मी मंदिराबाहेर अंथरलेल्या सतरंजीवर जाऊन बसले.. डोळे मिटून.. माझ्या शेजारी एक कुत्रं येऊन बसलं.. त्याच डोकं जवळजवळ माझ्या मांडीवर होतं.. त्याच्या गळ्यांत बऱ्यापैकी जड लोखंडी पट्टा होता.. त्याच्याकडं पाहून डोळे भरून आले.. त्याच्या पाठीवर मी थोपटलं.. त्यानं ही त्याचं डोकं माझ्या मांडीला घासून प्रतिसाद दिला..
मला आणि वैशालीला तिथं बसलेलं पाहून तृप्ती पण आली.. माझं बरंच उरलेलं पूजेचं सामान पाहून म्हणाली, अगं हे सगळं वहायचं होतं..
पूजेचे त्यांचे अनुभव ऐकताना, अरे मी काहीच केलं नाही.. ह्या अनुभवाला मी मुकले.. हे खूप मनाला लागलं.. आधी सगळं सामान बघून घेऊन ते कसं वापरायचं हे विचारलं असतं तर बरं झालं असतं.. ह्या विचारानं अजुनीच वाईट वाटलं..
ह्याच अस्वस्थतेत रात्री कधी तरी झोप लागली..
११ ऑक्टोबर: केदारनाथ - गुप्तकाशी
पहाटे साधनेच्या वेळी पण ती रुखरुख होतीच.. डोळे मिटले.. केदारनाथांचा विग्रह डोळ्यांसमोर आणला.. आणि श्वासावर लक्ष देत शांतपणे बसून राहिले.. 'तुझा मूर्तिपूजेवर विश्वास नाही ना मग का वाईट वाटून घेतेस.. तुला जो हवा तो कनेक्ट जाणवला ना.. मग..' .. मनावरचं मळभ दूर झालं.. आणि डोळ्यांतून पाणी वाहायला लागलं.. हा आवाज, हा विचार कोणाचा का असेना पण वेगळा दृष्टीकोन मिळाला..
आज परत गुप्तकाशीला जायचं असल्यानं सामानाची आवराआवर केली.. सामान रूमवरच ठेवून बाहेर पडलो.. मंदिराच्या आजूबाजूची ठिकाणं अजुनी पाहिलीच नव्हती..
मंदिर सकाळी एकदम वेगळं दिसत होतं.. बाहेरूनच नमस्कार केला.. मंदिराच्या एकदम मागच्या बाजूला असलेली भीमशिळा पाहायला गेलो.. मागच्या बाजूला मंदिराला लागूनच पाण्याचे झरे असलेलं 'उदक कुंड' आहे.. ह्यातील पाणी तीर्थ म्हणून प्यायलं जातं..
मागून ही मंदिर तितकंच लोभसवाणं दिसत होतं..
भीमशिळा पासून वर चालत गेल्यावर आदि गुरु शंकराचार्यांचं निर्वाण-समाधी स्थळ आहे.. खूप सुंदर वास्तू आहे ही..
केदारनाथ मंदिर पांडवांनी जरी बांधलं असलं तरी त्याची पुनर्बांधणी आदि शंकराचार्यांनी केली..
कर्मकांडं आणि बाह्य प्रभावांमुळं सनातन धर्माची, हिंदू धर्माची अधोगती होत असताना, अद्वैत वेदान्ताचं एकत्रीकरण करून त्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रवास केला.. आणि सनातन धर्माची निव ठेवून सर्व मंदिरांना एका सूत्रात बांधलं..
उत्तरेकडंच्या मंदिरांमध्ये दक्षिणेकडंचे पुजारी - रावल आणि दक्षिणेकडं उत्तरेकडंचे पुजारी आणून दक्षिण-उत्तर भेद संपवला..
आध्यात्मिक परंपरेनुसार, आदि शंकराचार्यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी केदारनाथ इथं महासमाधी घेतली..
त्यांच्या त्या भव्य मूर्तीपुढं नतमस्तक होताना वाटलं.. 'तुमच्यामुळं हा केदारखंड आहे.. केदारनाथ मंदिर आहे.. हा सनातन धर्म आहे आणि असंख्य अनुयायांपैकी मी एक आज इथं आहे..
ब्रेकफास्ट करून दहाच्या सुमारास हॉटेल सोडलं.. वैशाली-आनंद बरोबर रमत गमत घोडा पडाव पर्यंत आले..
तिथूनच हात जोडून नमस्कार केला आणि उतरायला सुरुवात केली..
समाधानानं तृप्तीनं मन काठोकाठ भरलं होतं.. त्यामुळं मागं काही ठेवून जातीय असं अजिबातच वाटत नव्हतं.. जसा कैलासपती सदैव माझ्या बरोबर असतो तसाच केदारनाथ ही असेल.. तिथली ऊर्जा, तिथली शक्ती अनुभवल्यानंतर मी आणखीनच शिवाच्या प्रेमात पडले..
ब्रह्मानंद स्वरूपा ईशा जगदिशा
अखिलानंद स्वरूपा ईशा महेशा..
आज बऱ्यापैकी ऊन लागत होतं.. काल ढगाळ असल्यानं ट्रेल वर झाडी नसल्याचं लक्षातच आलं नाही.. दर एक दीड तासानं ब्रेक घेऊन पाणी पीत होते, एनर्जी बार्स खात होते..
जातानाची मी आणि परत येतानाची मी.. निश्चितच फरक होता..
आता ना कसले विचार होते.. ना कश्याची ओढ.. ना कसली तगमग..
अनुभवलेल्या ह्या आंतरिक शांतीसाठी नेहमीच कृतज्ञ असेन..
अडीच-पावणेतीनच्या सुमारास गौरीकुंड ला पोचले पण.. साधारण चार तास..
सोनप्रयागला जायला लगेचच ट्रॅक्स ही मिळाली.. पावणेचार पर्यंत सोनप्रयाग ट्रॅक्स स्टेशन.. तिथून चालत सोनप्रयाग गांव..
गावांत पोचल्यावर बऱ्यापैकी रेस्टोरेंट पाहून पहिली खांद्यावरची बॅग काढून ठेवली.. गार पाण्यानं तोंड धुतलं.. आणि कॉफी सांगून हुश्श्श करून बसले..
-मी मधुरा..
************************************************
शंभो शंभो!!! Thank you for adding photos and videos! तुझे लिखाण वाचता वाचता सुंदर अनुंभव मलाही जाणवला! खूप छान !!!👌
ReplyDeleteतू केलेलं वर्णन वाचून अंगावर रोमांच उभे राहिले, बाबा केदारनाथाचे दर्शन हा अतिशय दुर्मिळ योग जुळून आला आणि त्यात तुझ्या जिवंत वर्णनाने मन भरून आले.👌👌👍👍
ReplyDelete