१२ ऑक्टोबर : गुप्तकाशी- बद्रीनाथधाम
१९५ कि.मी. लागणारा वेळ साधारण ७ तास
सकाळी ८ वाजता ब्रेकफास्ट.. ९ च्या सुमारास हॉटेल सोडायचं.. वाटेत ज्योतिर्मठ पाहून मुक्कामापर्यंत बद्रीनाथला पोचायचं.. असं आजच नियोजन..
नियोजन किती ही आशादायक असलं तरी तसं होईलच असं नाही.. हे आत्तापर्यंतच्या अनुभवानं चांगलंच कळालं होतं..
नऊ सव्वा नऊच्या दरम्यान हॉटेल सोडलं..
गुप्तकाशीचं विश्वनाथ मंदिर, अर्धनारीश्वर मंदिर, त्रियोगी नारायण मंदिर पाहण्यासारखं आहे.. खरं तर काल त्रियोगी नारायण मंदिर पाहता आलं असतं.. सोनप्रयागपासून अकरा किलोमीटरवर तर होतं.. सगळे जमून बस निघायला रात्रीचे नऊ वाजून जातील हे माहिती असतं तर नक्कीच गेले असते..
खडतर प्रवास, प्रतिकूल परिस्थिती असणार हे माहिती होतं पण धैर्याची ही परीक्षा घेतली जाईल हे माहिती नव्हतं..
काल दुपारी चार वाजता सोनप्रयागला आल्यापासून ते रात्री नऊ वाजता सोनप्रयाग सोडेपर्यंत.. ते पाच तास.. तीस किलोमीटर पेक्षा जास्त चालून थकलेली मी.. दिवसभराच्या घामट कपड्यात कावलेली मी.. ब्रेकफास्ट नंतर पोटात अन्न न गेल्यानं भुकेलेली मी.. जवळचं पाणी संपल्यानं तहानलेली मी.. आंतरिक शांतीवर कुरघोडी करणाऱ्या शरीराला पाहाणारी मी.. पेशन्स - धैर्याची परिक्षा देणारी मी..
ह्या सगळ्याकडं त्रयस्थ होऊन पाहणं महाकठीण होतं.. हा ही एक अनुभवच!.. स्वतःला जोखण्याचा.. तोल ढळू न देता सांभाळण्याचा.. स्वीकारात्मक राहण्याचा..
रोजच्या मानानं आज बस मध्ये शांतता होती.. तृप्ती आणि मी, आमचीच काय ती अखंड बडबड.. आठ दिवसांच्या प्रवासानं बहुतेक सगळे थकून झोपले होते..
दुपारच्या जेवणानंतर अभिषेक-टूर लीडर आमच्या बस मध्ये आला आणि तृप्ती दुसऱ्या बस मध्ये.. जोतिर्मठ येईपर्यंत much needed झोप काढून घेतली..
चारच्या सुमारास ज्योतिर्मठला पोचलो..
ज्योतिर्मठ..
समुद्रसपाटीपासून ६००० फूट उंच, गंधमादन पर्वताच्या पायथाशी असणारं हे ठिकाणं जोशीमठ म्हणून ओळखलं जातं..
विंटर स्पोर्ट्स साठी देशाविदेशात प्रसिद्ध असलं तरी अध्यात्मिक, धार्मिक दृष्टया ही तितकंच महत्वाचं..
नृसिंह मंदिर..
अशी मान्यता आहे कि, भक्त प्रल्हादानं विनंती केल्यावर आपलं उग्ररूप त्यागून भगवान नृसिंह सौम्य रूपात इथं प्रगट झाले..
हिवाळ्यांत बद्रीनाथधामचं कपाट बंद झालं की भगवान इथं निवासाला येतात..
बद्रिनाथधामला जाण्यापूर्वी भगवान नृसिंहांचं दर्शन घेतलं तर यात्रा सफल होते असं मानलं जातं..
ह्याच मंदिराच्या आवारात, आदि गुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेला पहिला मठ पाहताना भारावून गेले.. काल तर त्याचं समाधीस्थळ पाहिलं आणि आज त्यांच्या महान कार्याची सुरुवात झालेला मठ..
श्री दंडधारा - आदिगुरू शंकराचार्यांनी त्यांच्या दंडानी वार करून जमिनीतून पाण्याची धार काढली..
भगवान बद्रीनाथांचं हिवाळ्यातील निवासस्थान, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि औलीचं प्रवेशद्वार, भारत-चीन सीमेकडं जाणाऱ्या सैनिकांचं छावणी तळ म्हणून ओळखलं जाणारं जोशीमठ, इथल्या नयनरम्य टेकड्याचं अवतलन (land subsidence) झाल्यानं स्वतःच्याच वजनानं खचत चाललं आहे.. हे ऐकून खूप वाईट वाटलं..
साडे सहाच्या सुमारास जोतिर्मठहून निघालो..
संध्याकाळ झाल्यानं रोजच्या सारखीच परवचा म्हंटली.. आणि उद्या बद्रीनाथधामला 'विष्णू सहस्त्रनाम' म्हणायचं ह्या माधुरीताईंच्या इच्छेवर शिक्कामोर्तब ही झालं..
चाळीस किलोमीटरच अंतर असल्यानं साडे सात आठ पर्यंत हॉटेलवर पोचलो..
बद्रीनाथधाम:
दिव्यत्व आणि भव्यता यांचा संगम असणारं धाम..
आदि गुरु शंकराचार्यांनी, हिंदू धर्माला प्रतिष्ठा देण्यासाठी, देशाला एका सूत्रात बांधण्यासाठी पुनर्स्थापित केलेलं धाम..
वैष्णवांसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असणारं हे विशालपुरी विष्णुधाम..
एका आख्यायिकेनुसार, भगवान विष्णू बद्रीनाथला येण्याआधी भगवान शिव आणि देवी पार्वती इथं रहात असत.. बद्रीनाथ हे त्यांचं आवडतं ठिकाणं.. एके दिवशी त्यांच्या दारासमोर घामानं पूर्णपणे भिजलेलं एक बाळ त्यांना दिसलं.. त्या गोंडस बाळाला पाहता क्षणीच पार्वतीचं हृदय द्रवलं आणि बाळाला सांभाळायचं ठरवलं.. बर्फात कोणतेही पावलांचे ठसे नसताना बाळ इथं असं आलं, यामागं काहीतरी छल-कपट आहे वाटून भगवान शिवांनी असहमती दर्शवली.. पण देवी पार्वतीचा हट्ट!!.. लाडाकोडानं बाळाला सांभाळायला सुरुवात केली.. एकदा शिव-पार्वती बाहेरून घरी परत आले तर घराचे सगळे दरवाजे खिडक्या आतून बंद.. किती कि आवाज दिला तरी बंद त्या बंदच.. आता त्यांच्या समोर दोन पर्याय होते.. घरात जाण्यासाठी शक्तीचा वापर करणं किंवा दुसऱ्या घरी जाणं.. त्यांनी दुसरा पर्याय निवडला कारण पार्वतीला प्रिय असलेल्या त्या मुलाला त्यांना दुखवायचं नव्हतं.. ते मूल दुसरं तिसरं कोणी नाही तर भगवान विष्णू होते.. त्यांना तापासाठी ही शांत एकांत जागा हवी होती.. त्यासाठी त्यांनी केलेली ही लीला..
ह्या पवित्र धामाला बद्रीनाथ नाव पाडण्यामागं एक कथा आहे..
पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू या ठिकाणी ध्यानस्थ बसले होते.. ध्यानावस्थेत असताना त्यांचं थंडीपासून, हिमवृष्टीपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्या पत्नीनं लक्ष्मीनं विशाल बद्री (बोर) वृक्षाचं रूप घेतलं.. लक्ष्मीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांनी या जागेला बद्रीकाश्रम असे नाव दिले.. बद्रिकाश्रमाचा नाथ म्हणून बद्रीनाथ..
| बद्रीनाथ मंदिर : रात्रीची रोषणाई |
हॉटेल वर येऊन चेक इन केलं.. आजचा दिवस तसा निवांत आरामदायी होता.. आवरून खाली डिनरला आले तर गप्पा छान रंगात आल्या होत्या..
चारधामांपैकी तीन धाम सुखरूप पार पडले होते.. यात्रेचा खडतर भाग पूर्ण झाला होता.. उद्या सकाळी बद्रीनाथाचे दर्शन.. आणि परतीचा प्रवास सुरु..
हॉटेल पासून मंदिर दोन अडीच किलोमीटरवर असल्यानं, आणि गरज पडल्यास पिट्टू मिळत असल्यानं फारश्या नियोजनाची गरज नव्हती..
आरामात जेवण करून अकरा साडे अकराला रूमवर गेलो..
तृप्तीला लगेचच झोप लागली.. बेड वर पडल्यावर मनांत विचार आला.. लांबूनच आज मंदिराची रोषणाई पाहिली.. किती निरव शांतता जाणवत होती तिथं.. भगवान विष्णूंचं वास्तव्य तर आहेच, पण ऋषीमुनी जे आत्मज्ञान प्राप्तीसाठी ध्यान करायला इथं आले, राहिले त्यांची ही ऊर्जा इथल्या अवकाशात असेल.. शिवतत्वाच्या ऊर्जेसारखीच ही ऊर्जा असेल का वेगळी असेल? का वृंदावनच्या ऊर्जेसारखी असेल?
१३ ऑक्टोबर : बद्रीनाथधाम - गुप्तकाशी
८ वाजता ब्रेकफास्ट.. बद्रीनाथ पूजा.. माना व्हिलेज.. मुक्कामाला गुप्तकाशी.. असं आजच नियोजन..
आज आम्हाला सकाळी बऱ्यापैकी फ्री टाइम होता.. सकाळी ११ वाजता पूजेचं ग्रुप बुकिंग मिळालं होतं..
काही जण पिंडदानाचा विधी करणार होते.. त्यांना सकाळी लवकर घाटावर जायचं होतं..
इथल्या ब्रह्म कपाल घाटावर श्राद्ध पिंडदान केल्यानं पूर्वजांच्या आत्म्याला पूर्ण आणि अंतिम मुक्ती मिळते.. गया इथं केलेल्या श्राद्धापेक्षा ते आठ पटीनं अधिक फलदायी मानलं जातं.. यामुळं 'पितृदोष' कायमचा दूर होतो आणि दिवंगत आत्म्याला जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे..
ब्रेकफास्ट करून वैशाली, आनंद आणि मी बाहेर पडलो..
अलकनंदेच्या एका काठाला गांव आणि दुसऱ्या काठाला मंदिर.. आणि ह्या दोन्ही काठांना जोडण्यासाठी एक सुंदर लोखंडी पूल..
पुलावर उभं राहून खालून खळाळत जाणारी अलकनंदा पाहायला मजा वाटते..
पूल ओलांडून पलीकडं गेलो.. आणि एका वेगळ्याच दुनियेत आल्या सारखं वाटलं.. इतकी प्रचंड गर्दी कि पाय ठेवायला ही जागा नाही.. कसे तरी पुलाला लागून असलेल्या पायऱ्या उतरून खाली आलो.. अलकनंदा आणि तिला लागूनच असणारी तप्तकुंडं-गरम पाण्याची कुंडं पाहण्यासाठी आलो.. पण कुंडं माणसांनी इतकी खचाखच भरली होती कि नुसत्या वाफाचं दिसत होत्या.. नदीकाठी तर जाणं फारच मुश्किल होतं.. अश्यावेळी त्या गर्दीचाच भाग होऊन, स्वतःला त्यांत झोकून देणं अजुनी जमत नाही..
आल्या वाटेनं परत वर मंदिराकडं गेलो..
अकरा शिवाय मंदिराच्या आवारात प्रवेश नसल्यानं बाहेरच्या प्रांगणातच वाट पाहत थांबलो.. इतका गोंधळ गोंगाट गर्दी होती कि कुठं शांतपणे बसायला ही जागा नव्हती.. रुद्राक्ष विकणारे, विविधरंगी गळ्यातल्या माळा, जपमाळा विकणारे, प्रसाद विकणारे, फोटोग्राफर्स सतत मागंपुढं फिरत होते.. सगळं अंगावर येतंय असं वाटलं..
अकरा वाजता पूजेच्या रांगेत उभे राहिलो.. तिथं तर वेगळाच गोंधळ.. अर्धातास रांगेत उभं राहिल्यावर हळूहळू रांग पुढं सरकायला लागली.. मंदिराच्या प्रांगणातून मंदिराच्या आवारात आलो.. आता आत गेल्यावर दर्शनासाठी आणि पूजेसाठी अश्या दोन वेगळ्या रांगा.. ही दर्शनाची रांग VIP रांग होती म्हणे.. म्हणजे सभामंडपातून दर्शन घ्यायचं.. अजुनी एक रांग होती जी मंदिराबाहेरून होती.. ज्यांचं लांबूनच दर्शन होणार होतं..
आम्ही पूजेच्या रांगेत उभे राहिलो.. आणि रांगेतून सभामंडपात.. का तर म्हणे ही पूजा आत्ता नाही.. पण रिसिटवर तरी होती.. दर्शनाच्या रांगेतून कधी आत गेले आणि कधी बाहेर आले समजलंच नाही.. ना मूर्ती पुढं उभी राहिले ना मूर्ती कशी आहे ते पाहिलं..
आवारात बाकी बरीच छोटी छोटी मंदिरं होती.. तिथंच एके ठिकाणी पाच मिनिटं बुढ टेकवलं.. आणि exit गेट मधून बाहेर..
ह्या सगळ्या गदारोळांत भक्तीच्या व्यवहाराशिवाय काहीच जाणवलं नाही.. मंदिरात VIP दर्शन, पूजा हे माझ्या स्वभावाविरुद्ध आहे.. पण ग्रुप बरोबर असताना काही गोष्टी कराव्या लागतात म्हणून केल्या.. पूजा-दर्शन झालं नाही ह्यापेक्षा फसवलं गेल्याचं वाईट नक्कीच वाटलं..
मागं वळून मंदिराकडं पाहिलं.. 'जशी तुझी इच्छा' म्हणून नमस्कार केला..
पूल ओलांडून गावांत आलो.. इकडं बऱ्याच व्हरायटीजचे वुलन कपडे मिळतात.. हिल स्टेशन सारखी रस्ताच्या दोन्ही बाजूला असलेली छोटी छोटी दुकानं.. विंडो शॉपिंग करत हॉटेलवर आलो.. सगळे जमून बद्रीनाथ सोडायला तीन वाजले..
माना व्हिलेज:
बद्रीनाथ पासून केवळ चार किलोमीटरवर असणारं हे गांव.. तिकडं जाणारं ट्रॅफिक बद्रीनाथ पर्यंत अडकलं होतं त्यामुळं तिकडं जाणं रद्द केलं आणि सरळ रुद्रप्रयागचा रस्ता पकडला..
माना व्हिलेज भारत-तिबेट हद्दीवरचं गांव.. पूर्वी 'माना भारतातलं शेवटचं गांव' असं म्हंटल जायचं.. पण आपल्या मोदींनी त्याचं नामकरण 'माना भारतातील पहिलं गांव' असं केलं..
माना हे महाभारताशी असलेल्या संबंधासाठी प्रसिद्ध आहे.. आख्यायिकांनुसार पांडव स्वर्गाच्या प्रवासाला इथून गेले.. व्यासांची 'व्यास गुंफा' जिथं महाभारत लिहिलं गेलं ती माना गावांत आहे..
सरस्वती नदी देखील येथूनच वाहते.. त्यामुळं या ठिकाणाला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे..
सतोपंथ ग्लेशिअर मधून उगम पावणारी अलकनंदा माना जवळ सरस्वती नदीला मिळते आणि पुढं बद्रीनाथकडं वहाते..
आज चौथा धाम ही झाला..
'शुद्धता शुद्धीकरणापासून सुरु झालेला प्रवास त्यागातून भक्तीतून आत्मसाक्षात्काराकडं जातो'.. हा जरी चारधाम यात्रेचा गर्भितार्थ असला तरी त्यावर खरं उतरायला केवढी तपस्या हवी, साधना हवी.. अजुनी अपेक्षेचं ओझं वाहणारी मी.. कुठून आत्मसाक्षात्कार होणार.. ऊर्जा अनुभवण्याची अपेक्षा असणं आणि त्या ऊर्जेशी जोडण्यासाठी आत्मिक तयारी असणं वेगळं.. प्रत्येक तत्वाची, प्रत्येक क्षेत्राची ऊर्जा वेगळी असते, सगळीकडं तो कनेक्ट जाणवेलच असं नसतं..
मंदिर परिसरात नाही तरी बद्रीनाथगावांत प्रत्येक श्वासांत पवित्रता जाणवली.. तिथलं प्रत्येक दृश्य निसर्गाच्या भव्यतेची साक्ष देतं होतं.. पण मंदिर, मंदिराचा परिसर इथं ती शांतता, ती पवित्रता लुप्त होतीय, ऐश्वर्याचा पगडा जास्ती आहे असं मला वाटलं.. अर्थात हे माझं मत झालं.. कदाचित ज्या अनुभवाची मी अपेक्षा केली होती तसा तो नव्हता..
तासाभरातच ड्राइवरनं बस रस्त्याच्या कडेला उभी केली.. आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला..
अलकनंदा नदीवर पंचप्रयाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच प्रमुख संगमांपैकी पहिला संगम विष्णुप्रयाग..
विष्णूप्रयाग इथं कामेत ग्लेशिअर मधून उगम पावणारी धौलीगंगा बद्रीनाथवरून येणाऱ्या अलकनंदाला मिळते..
पुराणानुसार विष्णुप्रयाग हे नांव भगवान विष्णूंच्या नावावरून पडलं.. विष्णूला प्रसन्न करण्यासाठी नारदमुनींनी अष्टाक्षरी मंत्राचा जप ह्या संगमावर केला.. प्रसन्न होऊन विष्णूंनी नारदमुनींना प्राणशक्ती प्रदान केली.. अष्टकोनी आकारातील विष्णुमंदिर इथं आहे..
प्रवासाच्या एकसूरीपणात चांगला ब्रेक मिळाला..
बद्रीनाथ - हरिद्वार नॅशनल हायवे NH-7 वर हे पंचप्रयाग पाहायला मिळतात.. परंतु आम्हाला बऱ्यापैकी उशीर झाल्यानं, अंधार पडू लागल्यानं नंदप्रयाग आणि कर्णप्रयाग पाहता आले नाहीत..
त्यानंतरचा परतीचा प्रवास मात्र बराच कंटाळवाणा झाला.. साधारण दहाच्या सुमारास हॉटेलवर पोचलो..
-मी मधुरा..
************************************************
मधुरा हा अप्रतिम अनुभव तुझ्या नजरेतून पुन्हा एकदा प्रत्ययास आला, मनःपूर्वक आभार!!
ReplyDelete